आलेपाक

Submitted by रूनी पॉटर on 27 March, 2009 - 11:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१ वाटी किसलेले आले
२ वाटी साखर
१ वाटी घट्ट साय किंवा रिकोटा चीज किंवा मिल्क पावडर

क्रमवार पाककृती: 

१. किसलेले आले आणि साखर एका भांड्यात एकत्र करुन तास-दीड तास ठेवा. मध्ये मध्ये दर १५-२० मिनीटांनी एकदा असे ३-४ वेळा मिश्रण ढवळा.
२. हे मिश्रण मिक्सरमधुन काढुन बारीक करा.
३. गॅसवर मंद आचेवर एका जड बुडाच्या पातेल्यात/कढईत हे मिश्रण थोडावेळ शिजायला ठेवा. याचा आधीचा फिका रंग आता गडद व्हायला लागेल.
४. आता यात साय घालुन हे मिश्रण चांगले ढवळा आणि मंद आचेवर घट्ट होई पर्यंत शिजवा. वड्या थापता येतील इतपत घट्ट शिजवायचे.
५. एका ताटाला तुपाचा हात लावुन घ्या. त्यात हे मिश्रण थापा. थोडेसे सेट झाल्यावर वड्या पाडा.
६. वड्या काढुन नंतर हवाबंद डब्यात ठेवा.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे.
अधिक टिपा: 

१. मी सायी ऐवजी मिल्क पावडर टाकुन आलेपाक केला होता पण तेव्हा मिश्रण गॅसवर शिजवतांना आळुन यायला/घट्ट व्हायला खूप जास्त वेळ लागला त्यामानाने रीकोटा चीज घालुन शिजवतांना लवकर घट्ट झाले. त्यामुळे मी आता दरवेळी रिकोटा चीजच वापरणे पसंत करते.
२. मला आलेपाक आणि आल्याच्या वड्या यातला फरक (असला तर) माहित नाही. माझ्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीणीची आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! आलेपाकाची/ आलेवडीची पाकृ Happy

दूध, साय, दूधाची पावडर, रिकोटा चीज हे प्रकार वापरले नाहीत तर तो आलेपाक ( म्हणजे म्हाराष्ट्रातील तमाम यष्टी स्टँडांवर मिळतो तो आल्लेsssssssपाssssssक ) आणि हे वरचे प्रकार वापरले तर त्या वड्या, अशी व्याख्या करु या का ?

ओह ओके. म्हणजे दूग्धजन्य पदार्थ घालुन आणि न घालता असा फरक आहे तर. धन्यवाद.

बापरे. हे असे करतात हे पहिल्यांदाच कळले. मी मिनोतीचा सल्ला शिरोधार्य मानायचे ठरवले आहे. (ह्या भानगडीत पडू नका वाला)
रुनी- त्या वडी चा आणि तुझा एक फोटो टाक प्लिज.
हे म्हणजे मुगाच्या हलव्याच्या तोडिस तोड प्रकरण दिसते.

रुनी जरा कठीण वाटतीय रेसिपी. Sad मी चितळे मध्ये या वड्या खाल्लेल्या. फार सुंदर लागत होत्या. आता कळल ते रेसिपी वाचुन इतक्या का चांगल्या लागत होत्या ते Happy
------------------------------------------------------------------------
रोज ४ च पोस्ट लिहिणार. सेव्ह ग्रीन. Proud

बरंय आलेपाक आवडत नाही ते!!! Wink

रुनी, धन्यवाद!! आता आज सुट्टी संपली. सोमवारी परत माझा पाच दिवसांचा सप्ताहांत सुरु झाला की करून बघेन.

सीमा, रैना, सायो ही कृती अवघड वाटतेय का? तसे असेल तर तो माझ्या लिहीण्याच्या पद्धतीचा दोष आहे. करायला अवघड नाहीये अजिबात. आले +साखर कालवा, गॅसवर ठेवा, साय घाला, थोडे शिजवा आणि वड्या थापा. झालं. एवढी सोपी आहे. Happy
झक्की केली की इकडे फोटो डकवा रैनाला बघायचाय Happy

नुसती साखर/गूळ ,किंचीत वेलची दाणा नी किसलेले आले घातलेला आलेपाक. जवळपास दोन तारी पाक करायची आई. आलेपाक हा कडकच असतो. तर साखर्,किसलेलं आलं,दूध्,किंचीत ओले खोबरे, वेलची वगैरे घालून बर्‍यापैकी ठिसूळ त्या वड्या. ह्याचा पोटदुखीवर उपयोग नाही होत. हाच फरक.
म्हणून पोटात दुखत असेल, प्रवासात मळमळ झाली तर आलेपाकच खातात. गावी गूळ नी आले टाकून आलेपाक बनलेला आठवतो.
तसेही आले नी गूळ अ‍ॅसीडिटीला एकदम मारक आहे. (ginger is carminative and jaggery has iron and other beneficial factors plus cardamom has specific oil which is very effective on acidity).
अ‍ॅसिडीटी,गॅस, अपचन झाले की नुसता आलं,गूळ्,वेलची नी लवंग तोंडात ठेवून चघळले की मोजून दहा मिनीटात एकदम बरे वाटते(स्वानुभव).

>>>> प्रवासात मळमळ झाली तर आलेपाकच खातात.

एसटीच आठवली मला पटकन. Wink