डाकोर-गुजरात चे गोटे..

Submitted by सुलेखा on 23 December, 2011 - 23:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

माझे लहानपण ,शिक्षण गुजरात मधले..त्यामुळे तिथल्या रितीभाती खुप जवळुन अनुभवल्या..गुजराती लोक तेलकट ,चमचमीत,पण गोडसर चवीचे पदार्थ जास्त आवडीने खातात ..भाज्या तर पुर्ण पणे तेलातच शिजवतात..पानात वाढलेल्या भाजीचे तेल थोडेसे ओघळलेच पाहिजे..उन्हाळ्यात ज्वारी-बाजरीचे--तांदुळाचे -अजुन बर्‍याच प्रकाराचे उकड काढुन केलेले पापड,बटाटा-केळ्याचे वेफर्स परात -भर तळुन ठेवतात..तहान लागली कि आधी पापड खायचा मग पाणी प्यायचे.. त्याशिवाय भजी-फरसाण-चिवडा तर असतेच..
गुजराती गोटे हा भज्यांचाच एक सुसंस्कृत प्रकार आहे..फार तेलकट नसतात..बडोद्याजवळ डाकोर नांवाचे कृष्णाचे प्रसिद्ध तीर्थस्थान आहे..तिथले गोटे खुपच प्रसिद्ध आहेत..हे गोटे करण्यासाठी लागणारे जिन्नस या प्रमाणे--
जाडसर बेसन पिठ २ वाटया..
रवा जाडसर १/२ वाटी..
[जर जाडसर बेसन नसेल तर साधे बेसन व रवा १-१ प्रमाणात घेता येतो..अगदी तशी चव येणार नाही पण झक्कास लागेल.]
धणे व मीरे २-२ चमचे घेवुन जाडसर खरडुन घ्यावे--हे एकाचे २ तुकडे झाले तरी पुरेसे आहे..
बडीशोप जाडी २ चमचे..
तिखट २ ते ३ चमचे ...[आवडीप्रमाणे कारण काळ्यामिर्‍याचे तिखट ही आहे..]
मीठ चवीप्रमाणे..
हळद १ चमचा..
जिरे १ चमचा..
साखर २ लहान चमचे.
आंबट दही अर्धी वाटी..
सोडा पाव चमचा /चुटकीभर..
मोहनासाठी गरम कडाकडीत तेल २ मोठे चमचे..
भिजवायला गरम पाणी साधारण ३ वाटी--[पाणी लागेल तसे थोडॅ थोडे घालायचे आहे.]
..तळण्यासाठी तेल..
कोथिंबीर-मिरची-खोबरे-लसुणपात घातलेली पातळसर चटणी..

क्रमवार पाककृती: 

बेसन ,रवा एकत्र करा त्यात दही व तिखट,मीठ,हळद,साखर-धणे-जिरे-मिरे-बडीशोप घालावे..गरम पाणी अगदी थोडे थोडे घालत कालवावे..घट्टसर मिश्रण तयार झाले पाहिजे..आता हे मिश्रण १५ मिनिटे तसेच ठेवावे..
पुन्हा एकदा कालवुन पहावे..[रवा घातल्याने कधीकधी मिश्रण जास्त घट्ट होते तेव्हा थोडेसेच चमच्याने पाणी घालावे..तर कधी-कधी मिश्रण सैल ही होते..अशावेळी थोडे रवेदार बेसन अथवा रवा घालावा..]
आता कढईत तेल तापायला ठेवावे..यातील २ चमचे तेलाचे मोहन मिश्रणात घालुन ढवळावे व सोडा घालुन पुन्हा ढवळावे..या मोहनाच्या तेलानेही मिश्रण सैल होते..तेव्हा हे लक्षात ठेवुन च पाणी घालायचे आहे ..कि मिश्रण घट्टसर च असले पाहिजे..
गरम तेलात मध्यम आकाराचे गोलाकार गोटे सोडावे..गॅस कमी करुन अगदी मंद आचेवर हे गोटे गुलवट रंगावर तळावे..तळलेले गोटे कागदावर काढुन जास्तीचे तेल टिपुन घ्यावे..
चटणीबरोबर आस्वाद घ्यावा..

वाढणी/प्रमाण: 
आवडेल तसे...या प्रमाणात २०-२२ गोटे तयार होतात..
अधिक टिपा: 

डाकोरला बटाटेवड्याच्या आकारातील खुसखुशीत गोटे खाल्ले आहेत..मंद आचेवर तळले कि आतुन खुसखुशीत होतात..
हे गोटे -प्रत्येकी ३-४ तुकडे करुन वरुन कोथिंबीर्,बारीक चिरलेली थोडीशी चवीपुरती हिरवी मिरची,कांदा ,हिरवी तसेच चिंचे ची चटणी व गोडसर दही व शेव घालुन भन्नाट लागते..
चिंचेची चटणी-सॉस ही चालेल..
आधी तळुन ठेवले तरी चालतात ..थंड ची चव ही छान लागते..तसेच मावेत गरम ही करता येतात..
उसगावातील लो़कांना तर फारच आवडले..त्यांनी आधी भजी/वडे खाल्ले होते..त्यांनी गोटे करुन ही पाहिले व आवडल्याचे कळवले..

माहितीचा स्रोत: 
माझे रंग-रंगीले गुजरात..
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी एकदा अहमदाबादहुन ट्रेन ने येताना एका स्टेशन वर खाल्ले होते गरम गरम. फारच सुरेख लागतात. आता एकदा करुन बघेन. रेसिपीबद्दल धन्यवाद!

नीधप,योगायोग म्हणावा का? कृति,साहित्य सारखे आहे का?
या गोटयाचे तयार पिठ ही गुजरातेत मिळते..पण अस्सल डाकोर सारखा घरी करण्याचा मजा वेगळा आहे..

खरय सुलेखा, मी पण बडोदयाची असल्‍याने गोटानी वानगी वाचल्‍यावर एकदम घरी गेल्‍यासारखे वाटले लोकसत्‍तेत अशीच रेसिपी दिली आहे

योगायोगच. मी काय पाकृ खूप तपशीलात वाचत नाही त्यामुळे ते हे सेमच आहे का ते माहित नाही. नाव सारखेच वाटले म्हणून सांगितले केवळ.

मी खाल्लेत हे. चवीष्ट लागतात. गुजरातचा सकाळचा नाश्ता एकदम भन्नाट प्रकार आहे.
सगळे जवळपास तेलकटच(फाफडा, गाठिया, मुठिये,जलेबी असे सकाळ/ तर कधी संध्याकाळच्या नाश्त्यात असते एखाद दुसरा ढोकळा/खांडवी सोडली तर.

गिटसचे मिळतात पण खूप खूप तेल पिवून मग वर येतात. Happy आत जाळी पडते पण खाल्लं की नंतर घशात तेल लागते ह्या पाकिटातील गोटे केले की.

चवदार लागतात हे गोटे. पण तयार पिठात सोडा खूप घातलेला असतो म्हणून हलके होतात. मी मेथी (पाला) घालून केले होते एकदा.

सोडा अगदी कमीच घालायचा. त्यामुळे जाळी थोडी कमी होते पण घशात खवखवते कमी.. .पण आंबट दही घातलेले असते त्यामुळे हलके होतात..,कसुरी मेथी..मेथी ची पाने,मेथी खरबरीत किंवा अर्धा चमचा सबंध घालुनही छान चव येते..
मंजुडी-गट्टे की सब्जी मधे फक्त रवेदार बेसन च वापरतात व कृति ही वेगळी आहे..
नीधप-घरात लाडुबेसनचे रवेदार बेसन थोडेसे उरले होते..त्याचे अगदी परवा च केले होते त्यामुळे इथे रेसिपी लिहीली आहे..खरंच योगायोग आहे हा..
परिणीता,मी ही अशीच अधुन मधुन पाकृ.च्या सौजन्याने गुजरातमा फरी आवुं छुं..

'गोटे' म्हणजे गोल आकारात असायला हवेत ना आयडियली? Happy करावेसे वाटत आहेत. 'गोल' झाले चांगले तर फोटो टाकेन Happy

सुलेखा.. एकदम तोंपासु आहे रेसिपी.. नक्की ट्राय करीन..
मोठ्या कंच्यांच्या आकाराचे केले तर चालतील?? बटाटेवड्यांसारखा आकार.. फार मोठे होतील बहुतेक!!!
ते फोटू चं बघ हां...
Happy

वर्षूनील,
मोठ्ठा कंचा [लहान गोटी नाही] अगदी चालेल..तळुन थोडासा मोठा होईलच..मंद आचेवर तळायचे म्हणजे आतुन खरपुस तळले जातील-गिच्च होणार नाहीत..खरी कमाल तळण्याचीच आहे..तेव्हाच ते खुसखुशीत होतील..
पौर्णिमा,
होय.गोटा गोल आकारात च हवा..

बित्तुबंगा,तमे बतावेली साइट उपर लखेला हमणाज वांच्या...सारा छे..सामग्री मा फेर छे में आवी कोई साईट परथी नथी लिधा..डाकोर जी ना दर्शन माटे गया हता..त्यारे गोटा नो आस्वाद लिधो हतो अने विधी पण त्यांथीज मळी हती.

अश्विनीमामी-रवेदार बेसन आणुन करुन पहा...आवडतील तुम्हाला

मी पण नेहमी तयारच खाल्लेत. गुजराथमधेही आणि राजस्थानातही.
मस्तच लागतात.

सुलेखा, फोटोचे अजून जमत नसेल तर आमच्यापैकी कुणालाही इमेलने
पाठवा. आमच्यापैकी कुणीही आनंदाने करेल हे काम.
सगळ्यांनाच फोटो हवे आहेत.

दिनेशदा
धन्यवाद. फोटोसाठी कुठेतरी माझे चुकत आहे..बहुतेक १-२ दिवसात शिकेन.[फोटो चा साईज कमी होत नाहीये..].प्रयत्न चालु आहे..

मस्त रेसिपी. इथे उसगावात दीप ब्रँडचं गोटा मिक्स मिळतं ते केलेलं आहे. अर्थात त्याची तुलना वरच्या रेसिपीशी नकोच.

सुलेखा, तुमचा मूळ फोटो राईट क्लिक करुन पेंट ब्रशमध्ये उघडा आणि साईझ कमी करत आणा आणि मग इथे अपलोड करा. सुरवातीला कटकटीचं वाटेल पण एकदा तंत्र जमलं की काहीच प्रॉब्लेम नाही.

Pages