गल्ली क्रिकेटचे नियम !

Submitted by राफा on 30 March, 2011 - 01:52


गल्ली क्रिकेट मधे अनेक पोटविभाग असतात. ते ‘ट्वेंटी ट्वेंटी’ किंवा ‘वन डे’ असे नसतात कारण सहसा गल्ली क्रिकेटचा सामना एका दिवसात कधीच संपत नाही. अंधार झाल्यामुळे किंवा आत्ता फलंदाजी करणारा भिडू सांगितलेले महत्वाचे काम विसरला आहे, हे त्याच्या मातोश्रींच्या लक्षात आल्याने सामना संपतो. त्यामुळे, दर दिवशीचा खेळ ‘कालचा सामना पुढे चालू करायचा’ का ‘नवीन डाव सुरु करायचा’ ह्या चर्चेपासूनच चालू होतो.

गल्ली क्रिकेटचे पोटविभाग मुख्यत: स्थळानुसार बदलतात. गल्ली जिथे संपते तिथे म्हणजे ‘डेड एंड’ वर खेळली जाणारी लाइव्हली मॅच; सिमेंट किंवा फरशांच्या जमीनीवर सोसायटीत खेळला जाणारा दररोजचा सामना; शाळेत मधल्या सुट्टीत रंगणारे अतिझटपट क्रिकेटचे सामने असे त्याचे स्वरुप बदलत असते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट आता बरेच गुंतागुंतीचे व नवनवीन नियम असलेले झाले आहे. पण पारंपारिक गल्ली क्रिकेटचे नियम व क्षणाक्षणाला पलटणारी बाजी पाहिली तर ते नक्कीच आंतरराष्टीय क्रिकेटला
यष्टीचीत करणारे असेल.

गल्ली क्रिकेट खेळण्यासाठी त्याचे एकंदर वातावरण व आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तोंडात मारतील असे नियम व पोटनियम समजून घेणे जरुरीचे आहे:

  1. केवळ क्रिकेटच्या सामानाची कमतरता ह्यामुळे सामना सुरु व्ह्यायला कधीही उशीर होत नाही. शाळेत दफ्तरांची रास करून त्याचे स्टंप होतात. परीक्षेनंतर अचानक सामना ठरला (बहुदा एका ‘तुकडी’ ने दुसरीला चॅलेंज फेकले म्हणून) तरी काही क्षणातच रुमालाचा चेंडू व परीक्षेसाठी आणलेल्या ‘पॅड’ ची बॅट होते.
  2. गल्ली क्रिकेटमधे ज्याची बॅट सर्वात चांगली त्याची पहिली बॅटींग असते.
  3. सोसायटीत सर्वात वरच्या मजल्यावर राहणा-या डॉ. गोगट्यांच्या गाडीला फटकावलेला चेंडू आदळला तर फलंदाज बाद होतो !
  4. चेंडू ‘मृत’ होण्याची वाट न बघता, धाव काढल्या काढल्याच नुसती बॅट टेकवून इकडचा फलंदाज तिकडच्याशी हितगूज करायला कधीही जाऊ शकतो.
  5. जिथे सर्वात जास्त ‘शॉट’ मारला जाण्याची शक्यता असते नेमक्या त्या दिशेला व त्या उंचीवर सोसायटीतल्या सर्वात रागीट आणि ‘सरकलेल्या’ बि-हाडकरूच्या खिडकीची काच असते. (दर वेळी काचेला बॉल लागल्यावर क्रिडांगणात हमखास पांगापांग होते)
  6. पत्र्याचा डबा, जमीनीत खोचलेल्या दोन लहान फांद्या, किंवा खडू अथवा विटकरीने भिंतीवर काढलेला आयत हे ‘स्टंप’ होऊ शकतात.
  7. ‘थर्ड अंपायर’ हे बहुदा गॅलरीत मळकट बनियन मधे बसलेले सुखापुरे आजोबा असतात.
  8. ‘स्लेजिंग’ हा नियम असतो व ‘जेंटलमन्स गेम’ हा अपवाद असतो.
  9. ‘हूक शॉट’ वर बंदी असते कारण क्रिडांगणाच्या आकारामुळे अशा शॉट मधे, बॅट ही जवळच्या फिल्डरला लागू शकते.
  10. ‘बेल्स’ नवीन ‘किट’ असेल तर फार तर आठवडाभर वापरल्या जातात. नंतर त्यातली एक हरवते किंवा दर वेळी लावायचा कंटाळा येतो त्यामुळे फारच अभावाने वापरल्या जातात.
  11. उत्कृष्ट मारलेला शॉट जर पलिकडच्या झोपडपट्टीत किंवा गटारात किंवा पलिकडच्या वाड्यातल्या विहीरीत वगैरे गेला तर फलंदाज बाद होतो.
  12. भाजी घेऊन संथपणे येणा-या काकू काही काळ सामना स्थगित करू शकतात.
  13. ‘टिम्स’ पाडताना एक अष्टपैलू भिडू असा असतो जो दोन्ही बाजूच्या कर्णधारांचा पहिला चॉईस असतो त्यामुळे अपेक्षित निवड झाल्यावर तो विजयी मुद्रेने आपल्या नवीन कर्णधाराकडे जातो.
  14. क्रिडांगणाची एकंदर भौगोलिक मर्यादा लक्षात घेता, षटक संपल्यावर इकडचा फलंदाज तिकडे जातो आणि तिकडचा इकडे. गोलंदाजी नेहमी एका बाजूनेच करायची असते.
  15. ‘नो बॉल’ नसतोच कारण ब-याच वेळा गोलंदाजाच्या बाजूला आखलेल्या रेषा वगैरे नसून फक्त एक दगड ठेवला जातो. (क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू, गोलंदाज ह्याच दगडावर पाय ठेवून झेलतो तेव्हा ‘सर्कीट’ पूर्ण झाल्यामुळे अजून न पोचलेला फलंदाज धावचीत होतो असा नियम आहे)
  16. त्या दिवशी सर्दी खोकला वगैरेने माफक आजारी असलेल्या मुलाला अंपायरगिरी करायला खाली उतरावे लागते. इतर वेळी, नियम माहित असणे ह्यापेक्षा न रुचलेल्या निर्णयामुळे अंगावर धावून येणा-या आक्रमक खेळाडूंना शांतपणे तोंड देण्याची क्षमता असणा-या भिडूला अंपायर केले जाते.
  17. उत्तुंग षटकारानंतर चेंडू दाट झाडीत किंवा छपरावर वगैरे गायब झाला तर फलंदाजाच्या वाट्याला कौतुकाऐवजी नवीन चेंडूचा खर्च येऊ शकतो. शिवाय, ‘साला वानखेडेवर खेळल्यासारख्या स्टाईली करतो. आम्ही पण हाणू शकतो असे शॉट्स’ असे शेरे ऐकावे लागतात.
  18. दुस-या मजल्यावरून एखादा मोहक चेहरा जर सामना बघत असेल तर खेळाडूंच्या कौशल्यात अचानक वाढ होऊन सामना अगदी चुरशीचा होतो. (मॅच नंतर काही ‘फिक्सिंग’ होईल का ह्याची स्वप्ने प्रत्येक भिडू खेळताना पाहत असतो.)
  19. ‘कस्ला मारला ना मी’ अशा नांदी होऊन मग दोन तीन वेळा त्याच त्याच ऍंगलने फलंदाजाकडून एखाद्या फटक्याचा ‘ऍक्शन रिप्ले’ पहायला लागतो.
  20. जुन्या चेंडूचा पिचून नैसर्गिक मृत्यू झाला तरच वर्गणी काढून नवीन चेंडू घेतला जातो नाहीतर ज्याच्या चुकीमुळे चेंडू गेला त्याने तो ‘भरून’ द्यायचा असतो.
  21. एकच बॅट चांगली व त्यामुळे सर्व फलंदाजांची लाडकी असते. त्यामुळे दर वेळी एक धाव घेतली की बॅटींची अदलाबदल करण्याचा कार्यक्रम होतो.


- राफा

गुलमोहर: 

>>रच्याकने, शाळेत असताना लहान सुट्टीत / ऑफ पीरियडला किंवा तास चालू असताना वर्गशिक्षकांची नजर चुकवत मागच्या बाकावर बसून डेस्कवर खडूने रेषा आखून खोडरबर (स्टंप्स), पेन्सिल (बॅट) व बॉल बेअरिंग मधील बॉलच्या सहाय्याने कोणी क्रिकेट खेळलाय का

गिल्टी अ‍ॅज चार्ज्ड Proud

>>शिवाजी पार्कात खेळताना बाऊंड्रीवरचा खेळाडू कधी कधी बाजूच्या मॅचचा अंपायर असू शकतो, त्याला दोन वडापाव मिळणार आहेत याची त्याने जाणीव ठेवावी

आता एप्रिल-मेमध्ये बघायलाच नको. Sad हेल्मेट घालूनच फिरायचं

लेख नेहमीप्रमाणेच सॉल्लिड!

नेहमीप्रमाणेच उत्साहवर्धक प्रतिक्रियांबद्दल व आपापल्या आठवणी दिलखुलासपणे लिहील्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार !

सकाळी गल्ली स्टाईल क्रिकेट बघतानाच सुचले, म्हणून तासाभरात एकटाकी लिहून काढलेला हा लेख.. पण त्या निमित्ताने सगळ्यांच्या सुखद आठवणी जाग्या झाल्या ह्याचा विशेष आनंद आहे!

अजून येऊ देत Happy !

(विनय, 'वा-यातल्या R' बद्दल आभार ! Happy )

- राफा

राफाजी, तुमच्या लेखाने व त्यावरील प्रतिसादांनी क्रिकेटचं एक लोभस युगच सजीव केलं ! धन्यवाद.
आपली बॅटींग झाल्यावर आपल्या आईला किंवा ताईला वरून हाका मारून आपल्याला घरीं बोलवायला सांगणारे बॅटींग स्पेशॅलिस्टही असतच गल्ली क्रिकेटमधे ! "वन डी", "टू डी " हाही प्रकार असायचा गिरगावात - पहिल्या मजल्यावर बॉल गेला कीं एक रन 'डिक्लेअर्ड', धावून काढायची नाही, वगैरे; व प्रत्येक चाळीचे हे वेगवेगळे पण निश्चित नियम असत व 'व्हिजीटींग' संघ ते न कुरकुरता स्विकारायचे ! पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र कायम असायची - खेळाचा निखळ आनंद !!!

Lol Lol Lol खल्लास ! दिन याद आये. लांब गेलेला चेंडू आणायला गेलेला जर ब्याटिंग झालेला असेल तर तो गायबायचा तिकडेच थेट घरी Happy

बेबी ओव्हर खरंच धमाल असायची...आणि एखादा दुबळा गोलंदाज असेल तर ओव्हरआधीच ती बेबी ओव्हर म्हणून डिक्लेअर व्हायची.

आम्ही तर लिमिटेड ओव्हर्सच्या टेस्टमॅचेसपासून काय वाट्टेल त्या रूल्सने खेळलोय...जितक्या लोकांची टीम असेल तितक्या ओव्हरपासून सुरूवात...मग प्रत्येक मॅचला एकएक ओव्हर कमी होत जायची. शेवटी एक ओव्हर, पाच बॉल, चार बॉल करत एका बॉलची मॅच व्हायची...
त्यात पुन्हा आऊट हे निगेटीव्ह असायचे म्हणजे आऊट झाले की मायनस २ रन्स...

राफा खुपचं छान लिहिले आहे. सगळ्यांचे अनुभव सारखेच.
(क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू, गोलंदाज ह्याच दगडावर पाय ठेवून झेलतो तेव्हा ‘सर्कीट’ पूर्ण झाल्यामुळे अजून न पोचलेला फलंदाज धावचीत होतो असा नियम आहे)<<< टू गुड! Happy

लई भारी .कोणाच्या घरी आमटीत बाँल पडला तर सगळे प्लेयर्स पटापट घरी .कोणाच्या खिडकीची काच
फुटली तर ज्याच्या शाँटने फुटली त्याने भरून द्यायची .काही आठवडे खेळ रद्द .गटारात बाँल गेला तर
वन डी ,पुढे दुसर्‍या वाडीत गेला तर टुडी .पण वाडीतल्या मँचमध्ये चैतन्य असायच .

राफा ईज ब्याक....!!!! Lol मस्त.... जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातलास...

आज वाचला हा लेख... pdf शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद. आजच समस्त मित्रपरिवारास ई-मेल करण्यात येईल....

अतिचशय आवडला..... कारण १००% पटला हे वेगळे सांगणे न लगे Happy

mulina kriket madhe ghet nasalyane. virodhi umedvara pramane lahan sahan sanktana tod dyave lagate.
ie. khelachya ground madhe Pani sandne, ground chya javal mulincha gatt basavane, boll lagalyas donhi team chya ghari complaint karane.

Stri shakti (Mastikhor)

आम्ही आमच्या मजल्यावर खेळायचो.. मी, माझे दोन भाऊ आणि एक शेजारचा मुलगा.. स्टंप म्हणुन स्टुल आणि बॅट म्हणुन कपडे धुवायचा धोका.. अजुनही आठवलं की गंमत वाटते.. Happy

Pages