गल्ली क्रिकेटचे नियम !

Submitted by राफा on 30 March, 2011 - 01:52


गल्ली क्रिकेट मधे अनेक पोटविभाग असतात. ते ‘ट्वेंटी ट्वेंटी’ किंवा ‘वन डे’ असे नसतात कारण सहसा गल्ली क्रिकेटचा सामना एका दिवसात कधीच संपत नाही. अंधार झाल्यामुळे किंवा आत्ता फलंदाजी करणारा भिडू सांगितलेले महत्वाचे काम विसरला आहे, हे त्याच्या मातोश्रींच्या लक्षात आल्याने सामना संपतो. त्यामुळे, दर दिवशीचा खेळ ‘कालचा सामना पुढे चालू करायचा’ का ‘नवीन डाव सुरु करायचा’ ह्या चर्चेपासूनच चालू होतो.

गल्ली क्रिकेटचे पोटविभाग मुख्यत: स्थळानुसार बदलतात. गल्ली जिथे संपते तिथे म्हणजे ‘डेड एंड’ वर खेळली जाणारी लाइव्हली मॅच; सिमेंट किंवा फरशांच्या जमीनीवर सोसायटीत खेळला जाणारा दररोजचा सामना; शाळेत मधल्या सुट्टीत रंगणारे अतिझटपट क्रिकेटचे सामने असे त्याचे स्वरुप बदलत असते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट आता बरेच गुंतागुंतीचे व नवनवीन नियम असलेले झाले आहे. पण पारंपारिक गल्ली क्रिकेटचे नियम व क्षणाक्षणाला पलटणारी बाजी पाहिली तर ते नक्कीच आंतरराष्टीय क्रिकेटला
यष्टीचीत करणारे असेल.

गल्ली क्रिकेट खेळण्यासाठी त्याचे एकंदर वातावरण व आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तोंडात मारतील असे नियम व पोटनियम समजून घेणे जरुरीचे आहे:

 1. केवळ क्रिकेटच्या सामानाची कमतरता ह्यामुळे सामना सुरु व्ह्यायला कधीही उशीर होत नाही. शाळेत दफ्तरांची रास करून त्याचे स्टंप होतात. परीक्षेनंतर अचानक सामना ठरला (बहुदा एका ‘तुकडी’ ने दुसरीला चॅलेंज फेकले म्हणून) तरी काही क्षणातच रुमालाचा चेंडू व परीक्षेसाठी आणलेल्या ‘पॅड’ ची बॅट होते.
 2. गल्ली क्रिकेटमधे ज्याची बॅट सर्वात चांगली त्याची पहिली बॅटींग असते.
 3. सोसायटीत सर्वात वरच्या मजल्यावर राहणा-या डॉ. गोगट्यांच्या गाडीला फटकावलेला चेंडू आदळला तर फलंदाज बाद होतो !
 4. चेंडू ‘मृत’ होण्याची वाट न बघता, धाव काढल्या काढल्याच नुसती बॅट टेकवून इकडचा फलंदाज तिकडच्याशी हितगूज करायला कधीही जाऊ शकतो.
 5. जिथे सर्वात जास्त ‘शॉट’ मारला जाण्याची शक्यता असते नेमक्या त्या दिशेला व त्या उंचीवर सोसायटीतल्या सर्वात रागीट आणि ‘सरकलेल्या’ बि-हाडकरूच्या खिडकीची काच असते. (दर वेळी काचेला बॉल लागल्यावर क्रिडांगणात हमखास पांगापांग होते)
 6. पत्र्याचा डबा, जमीनीत खोचलेल्या दोन लहान फांद्या, किंवा खडू अथवा विटकरीने भिंतीवर काढलेला आयत हे ‘स्टंप’ होऊ शकतात.
 7. ‘थर्ड अंपायर’ हे बहुदा गॅलरीत मळकट बनियन मधे बसलेले सुखापुरे आजोबा असतात.
 8. ‘स्लेजिंग’ हा नियम असतो व ‘जेंटलमन्स गेम’ हा अपवाद असतो.
 9. ‘हूक शॉट’ वर बंदी असते कारण क्रिडांगणाच्या आकारामुळे अशा शॉट मधे, बॅट ही जवळच्या फिल्डरला लागू शकते.
 10. ‘बेल्स’ नवीन ‘किट’ असेल तर फार तर आठवडाभर वापरल्या जातात. नंतर त्यातली एक हरवते किंवा दर वेळी लावायचा कंटाळा येतो त्यामुळे फारच अभावाने वापरल्या जातात.
 11. उत्कृष्ट मारलेला शॉट जर पलिकडच्या झोपडपट्टीत किंवा गटारात किंवा पलिकडच्या वाड्यातल्या विहीरीत वगैरे गेला तर फलंदाज बाद होतो.
 12. भाजी घेऊन संथपणे येणा-या काकू काही काळ सामना स्थगित करू शकतात.
 13. ‘टिम्स’ पाडताना एक अष्टपैलू भिडू असा असतो जो दोन्ही बाजूच्या कर्णधारांचा पहिला चॉईस असतो त्यामुळे अपेक्षित निवड झाल्यावर तो विजयी मुद्रेने आपल्या नवीन कर्णधाराकडे जातो.
 14. क्रिडांगणाची एकंदर भौगोलिक मर्यादा लक्षात घेता, षटक संपल्यावर इकडचा फलंदाज तिकडे जातो आणि तिकडचा इकडे. गोलंदाजी नेहमी एका बाजूनेच करायची असते.
 15. ‘नो बॉल’ नसतोच कारण ब-याच वेळा गोलंदाजाच्या बाजूला आखलेल्या रेषा वगैरे नसून फक्त एक दगड ठेवला जातो. (क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू, गोलंदाज ह्याच दगडावर पाय ठेवून झेलतो तेव्हा ‘सर्कीट’ पूर्ण झाल्यामुळे अजून न पोचलेला फलंदाज धावचीत होतो असा नियम आहे)
 16. त्या दिवशी सर्दी खोकला वगैरेने माफक आजारी असलेल्या मुलाला अंपायरगिरी करायला खाली उतरावे लागते. इतर वेळी, नियम माहित असणे ह्यापेक्षा न रुचलेल्या निर्णयामुळे अंगावर धावून येणा-या आक्रमक खेळाडूंना शांतपणे तोंड देण्याची क्षमता असणा-या भिडूला अंपायर केले जाते.
 17. उत्तुंग षटकारानंतर चेंडू दाट झाडीत किंवा छपरावर वगैरे गायब झाला तर फलंदाजाच्या वाट्याला कौतुकाऐवजी नवीन चेंडूचा खर्च येऊ शकतो. शिवाय, ‘साला वानखेडेवर खेळल्यासारख्या स्टाईली करतो. आम्ही पण हाणू शकतो असे शॉट्स’ असे शेरे ऐकावे लागतात.
 18. दुस-या मजल्यावरून एखादा मोहक चेहरा जर सामना बघत असेल तर खेळाडूंच्या कौशल्यात अचानक वाढ होऊन सामना अगदी चुरशीचा होतो. (मॅच नंतर काही ‘फिक्सिंग’ होईल का ह्याची स्वप्ने प्रत्येक भिडू खेळताना पाहत असतो.)
 19. ‘कस्ला मारला ना मी’ अशा नांदी होऊन मग दोन तीन वेळा त्याच त्याच ऍंगलने फलंदाजाकडून एखाद्या फटक्याचा ‘ऍक्शन रिप्ले’ पहायला लागतो.
 20. जुन्या चेंडूचा पिचून नैसर्गिक मृत्यू झाला तरच वर्गणी काढून नवीन चेंडू घेतला जातो नाहीतर ज्याच्या चुकीमुळे चेंडू गेला त्याने तो ‘भरून’ द्यायचा असतो.
 21. एकच बॅट चांगली व त्यामुळे सर्व फलंदाजांची लाडकी असते. त्यामुळे दर वेळी एक धाव घेतली की बॅटींची अदलाबदल करण्याचा कार्यक्रम होतो.


- राफा

गुलमोहर: 

राफा रॉक्स पुन्हा एकदा,..

Biggrin

दुस-या मजल्यावरून एखादा मोहक चेहरा जर सामना बघत असेल तर खेळाडूंच्या कौशल्यात अचानक वाढ होऊन सामना अगदी चुरशीचा होतो. (मॅच नंतर काही ‘फिक्सिंग’ होईल का ह्याची स्वप्ने प्रत्येक भिडू खेळताना पाहत असतो.).. हे तर खासच आहे. Happy

झकास !!!
उत्कृष्ट मारलेला शॉट जर पलिकडच्या झोपडपट्टीत किंवा गटारात किंवा पलिकडच्या वाड्यातल्या विहीरीत वगैरे गेला तर फलंदाज बाद होतो.
जिथे सर्वात जास्त ‘शॉट’ मारला जाण्याची शक्यता असते नेमक्या त्या दिशेला व त्या उंचीवर सोसायटीतल्या सर्वात रागीट आणि ‘सरकलेल्या’ बि-हाडकरूच्या खिडकीची काच असते. (दर वेळी काचेला बॉल लागल्यावर क्रिडांगणात हमखास पांगापांग होते)
एकच बॅट चांगली व त्यामुळे सर्व फलंदाजांची लाडकी असते. त्यामुळे दर वेळी एक धाव घेतली की बॅटींची अदलाबदल करण्याचा कार्यक्रम होतो.
‘स्लेजिंग’ हा नियम असतो व ‘जेंटलमन्स गेम’ हा अपवाद असतो.

>>> हे एकदम जबरद्स्त . एकदम गल्लीत खेळलेल्या मॅचेस ची आठवण करून दिलि .

जबरी...

ह्यात काही वाढीव....

एखाद्या कोपर्‍यात काही ठिकाणी डबा, पिशवी असे काही तत्सम वर्षानुवर्षे लटकत असते किंवा ठेवलेले असते.. त्याला बॉल लागल्यास बोनस धावा मिळतात...

गच्चीवर खेळताना बॉल खाली मारल्यास फलंदाज बाद असतो आणि त्यानेच लवकरात लवकर खाली जाऊ बॉल वरती घेऊन येणे अपरिहार्य असते... त्याचीच बॉलिंग असेल तर तो येई पर्यंत मॅच स्थगित असते..

सायकलचे चाक, गाडीचे चाक असेही विविध स्टंप्स असू शकतात...

बॉलिंगच्या स्पीडला मर्यादा असू शकते.. तसेच खांद्याच्या खालून बॉल टाकणे असाही नियम असतो..

अजून एक :
जनरली अंपायर हा बॅटींग साईड्चा असल्याने "तुमच्या वेळी कमरेवरून नो बॉल दिला , आम्ही पण देणार" " साला बॅट वरन गेलेला बॉल वाईड दिला , असु दे , दुसरी अंपायरींग आमची आहे " हे संवाद कायम असतात .

गल्ली क्रिकेटची नियमावली झक्कासच रे राफा. Rofl

आणखी काही नियम.

१. चेंडू टाकताना खांदा हालवला किंवा उडवला तर नो बॉल.
२. फलंदाजाची बॅट खेळता खेळता स्टंपला लागली तो तो खेळाडू बाद.
३. पहिला सामना जो जिंकेल त्याची बॅटींग पहिली पुढच्या सामन्यात.
४. टॉस साठी कॉईन नाही मिळाला तर पेप्सी-थम्सअप बॉटलचं क्राऊन चालतं पण ते हवेत गेल्यावर टॉस कुठे पडतो हे शोधायला एक माणूस लागतो.
५. जो बॉलिंग पहिली घेतो तो फलंदाज शेवटी खेळणार हा नियम फारच चिडचिडा ठरतो.
६. चेंडू कुरतडण्याचे प्रकार इथे चालत नसले तरी उगाच पिचका चेंडू घासून हाताची 'निन्जा' स्टाईल करून स्पिन केला तर तो उत्कृष्ठ फिरकी गोलंदाज म्हणून सेट होतो.
७. लेट रन कधी कधी हरणार्‍याच्या पक्षात जातो.

हाल्फ पीच टुर्नामेंट नियम -

१. नॉकाऑऊट राऊंडला एखादा संघ बाद झाला तर तो डबल प्रवेश फी भरून पुन्हा एकदा बक्षिस फेरीस खेळण्यास पात्र होतो. ( वाईल्ड कार्ड एंट्री )
२. सर्वोतकृष्ट झेलचं बक्षिस घेणारे हमखास सालटून घेतलेले असतात.
३. एखादा प्लेअर बाद होत नसेलच तर युक्ती म्हणून खास समोरच्या बिल्डींगमधे जाऊन उन्हात आरसा धरून त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी करून बाद करण्याची नामी युक्ती तिथे चालते.
४. पहिल्या दोन चेंडूत सलग दोन सिक्सर मारले तर तीसरा बॉल कसाबसा टाकून ती ओव्हर 'बेबी ओव्हर' म्हणून घोषित करून पुढच्या बेबी ओव्हरचा बाबा दुसरा असतो.
५. ऐन वेळेस या सगळ्या नियमात बदल केले जातील अशी टिप त्या अ‍ॅडवर लिहायला ते विसरत नाहीत अजिबात.

मस्त.
हे सगळीकडे होत नाही का? पहिल्या बॉलवर आउट झालं की ट्रायल बॉल होता सांगायचं.
गल्ली क्रिकेट मुळेच मुंबईचे फलंदाज बेस्ट स्ट्रेट ड्राइव्ह मारतात्...जमिनीलगत आणि बरोब्बर अंपायरच्या पायाला नेम धरुन!

हे सगळीकडे होत नाही का? पहिल्या बॉलवर आउट झालं की ट्रायल बॉल होता सांगायचं. >> होत .
पण आमच्या इथे ट्रायल बॉल ला फक्त कॅच आउट असायच .

Lol

- आम्ही भिंतीवर आखलेले स्टंप्स, रॉकेलचं गॅलन, दगडाला टेकून ठेवलेली फळी इत्यादी प्रकारचे स्टंप्स वापरले आहेत.
- "क्काय चोपलाय !" असे उद्गार काढतानाच दांड्यापासून बॅट निखळून वेगळी झालेली पाहिलीय.
- फ्रॉकवाले खेळाडू पलीकडल्या गटारात गेलेला बॉल काढायला गटारात उतरत नसत. हाफचड्डीवाले खेळाडूच उतरत. एकदा एक हाफचड्डी खेळाडू गटारात उतरला असताना घसरुन पडला आणि बरबटला. त्याला सगळे खेळाडू हसले, त्याची आई वरुन बघत होती ती ओरडू लागली. त्यानंतर त्या बहाद्दर खेळाडूने "जीवन हे असंच असतं..." Uhoh असा डायलॉग मारुन हसणार्‍यांची तोंडं बंद केली होती.
- तळमजल्यावरल्या काणेकाकूंनी नारळाच्या करवंट्यांसारखी बॉलची दोन शकले हातात ठेवली होती (विळीवर चिरुन).
- विकेट किपिंग करायला मला उभं केलं की मी बॉलरने बॉल टाकल्या टाकल्या पट्कन बॉल लागू नये म्हणून बचावात्मक पवित्रा घेत असे. त्यात आजूबाजूला उड्या मारणे वगैरे प्रकार असत.
- मध्ये मध्ये टाईमप्लिज घेतली जाऊन तळातल्या वर्तकांकडून पाणी मागून ढोसले जाई.

गल्ली क्रिकेट मध्ये स्कोररची कमतरता असल्याने कोणत्या संघाच्या किती धावा झाल्या आणि ओव्हर संपला की नाही यावर गंभीर चर्चा होतात (आजकाल न्युज चॅनेलवर होतात तशा) मग प्रत्येक बॉल कुठे गेला याचे समालोचन करून धावा /चेंडूंचा हिशेब लावायचा.

आमच्याकडे "तीनवेळा स्टंपला लागला" की एकदा आउट असाही नियम होता. स्मित >> आमच्यात तीन अंगी हा प्रकार होतो . lbw ला सोपा पर्याय . त्यात २ अंगी झाले की स्टंप वर बॉल टाकणार्याला वेड्यात काढायचे .
बाकी कुणाकडे असतो का हा प्रकार ?

आमच्या इथलेही काही नियम..

१) एकच फलंदाज फार काळ खेळत राहीला, तर आम्ही "एक टप्पा कॅच" हा नियम वापरायला सुरूवात करत असू.
२) विकेटकीपर कधीही न ठेवता यष्टींमागे गेलेला चेंडू फलंदाजानेच आणावा.
३) काही ठीकाणी धावा ठरवून दिलेल्या असत.

लेख आवडला हे सांगणे नलगे.. Lol

मस्त लिहिलय !
आमचे पण हेच नियम असायचे. शिवाय येता जाता बॉलिंगची अ‍ॅक्शन करत, प्रॅक्टीस केली जात असे.
क्रिकेटचाच बॉल, मग लगोरी आणि अबादुबी साठी वापरत असत.

राफा, मस्त लिहिलंय ….. Happy

लहानपणीचे दिवस आठवले... गेले ते दिन गेले...>>>
विनय भिडेंना अनुमोदन.
-----------------------------------------------------------------------------------------
काही वर्षांपूर्वीची एक आठवण ......

आमच्या सोसायटीत मुलं क्रिकेट खेळत होती. मॅचचे नियम ठरवणं सुरू होतं. "अमुक ठिकाणी बॉल गेला तर आउट, गाडीच्या काचेला लागला तर आउट, गटारात पडला तर आउट" ..... इ.इ.इ.

"अरे कुणाल !" .... मी खिडकीतून हाक मारली.
"काय काका ?" ... कुणालने विचारलं.
"आणखी एक नियम केलात तर खेळ सोप्पा होईल ?" ... मी.
"कुठला ?" .... कुणाल.
"बॅटला बॉल लागला तर आउट" ..... मी उद्गारलो.

..... काही मुलं आ वासून वर बघायला लागली, काहींनी कोपरापासून हात जोडले.
कुणालने तर चक्क साष्टांग नमस्कार घातला.......

लय भारी.. लेख पण आणी प्रतिक्रिया पण.. केदार जाधव, ते 'तीन अंगी' तर किती वर्षांनी ऐकलं परत Happy हा 'तीन अंगी' नियम बहुतेक जिमी अ‍ॅडम्सची भारतीय गल्लीक्रिकेटला देणगी आहे.. त्याने कुठलाही बॉल पायाने खेळणे अधिक फायद्याचे असते निदर्शनास आणून दिले आपल्या..

एकदा आम्ही ठरवून सरपटी खेळलो होतो. बॉलिंग सरपटी टाकल्यावर आपसूक बॅटिंगही सरपटी होत होती आणि ते दृष्य क्रिकेट न वाटता हॉकी वाटत होते.

Lol छान लिहिलं आहेस....
रच्याकने, शाळेत असताना लहान सुट्टीत / ऑफ पीरियडला किंवा तास चालू असताना वर्गशिक्षकांची नजर चुकवत मागच्या बाकावर बसून डेस्कवर खडूने रेषा आखून खोडरबर (स्टंप्स), पेन्सिल (बॅट) व बॉल बेअरिंग मधील बॉलच्या सहाय्याने कोणी क्रिकेट खेळलाय का? त्यातही औरच मजा असते!

राफा Rofl

Pages