गल्ली क्रिकेट मधे अनेक पोटविभाग असतात. ते ‘ट्वेंटी ट्वेंटी’ किंवा ‘वन डे’ असे नसतात कारण सहसा गल्ली क्रिकेटचा सामना एका दिवसात कधीच संपत नाही. अंधार झाल्यामुळे किंवा आत्ता फलंदाजी करणारा भिडू सांगितलेले महत्वाचे काम विसरला आहे, हे त्याच्या मातोश्रींच्या लक्षात आल्याने सामना संपतो. त्यामुळे, दर दिवशीचा खेळ ‘कालचा सामना पुढे चालू करायचा’ का ‘नवीन डाव सुरु करायचा’ ह्या चर्चेपासूनच चालू होतो.
गल्ली क्रिकेटचे पोटविभाग मुख्यत: स्थळानुसार बदलतात. गल्ली जिथे संपते तिथे म्हणजे ‘डेड एंड’ वर खेळली जाणारी लाइव्हली मॅच; सिमेंट किंवा फरशांच्या जमीनीवर सोसायटीत खेळला जाणारा दररोजचा सामना; शाळेत मधल्या सुट्टीत रंगणारे अतिझटपट क्रिकेटचे सामने असे त्याचे स्वरुप बदलत असते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट आता बरेच गुंतागुंतीचे व नवनवीन नियम असलेले झाले आहे. पण पारंपारिक गल्ली क्रिकेटचे नियम व क्षणाक्षणाला पलटणारी बाजी पाहिली तर ते नक्कीच आंतरराष्टीय क्रिकेटला
यष्टीचीत करणारे असेल.
गल्ली क्रिकेट खेळण्यासाठी त्याचे एकंदर वातावरण व आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तोंडात मारतील असे नियम व पोटनियम समजून घेणे जरुरीचे आहे:
- केवळ क्रिकेटच्या सामानाची कमतरता ह्यामुळे सामना सुरु व्ह्यायला कधीही उशीर होत नाही. शाळेत दफ्तरांची रास करून त्याचे स्टंप होतात. परीक्षेनंतर अचानक सामना ठरला (बहुदा एका ‘तुकडी’ ने दुसरीला चॅलेंज फेकले म्हणून) तरी काही क्षणातच रुमालाचा चेंडू व परीक्षेसाठी आणलेल्या ‘पॅड’ ची बॅट होते.
- गल्ली क्रिकेटमधे ज्याची बॅट सर्वात चांगली त्याची पहिली बॅटींग असते.
- सोसायटीत सर्वात वरच्या मजल्यावर राहणा-या डॉ. गोगट्यांच्या गाडीला फटकावलेला चेंडू आदळला तर फलंदाज बाद होतो !
- चेंडू ‘मृत’ होण्याची वाट न बघता, धाव काढल्या काढल्याच नुसती बॅट टेकवून इकडचा फलंदाज तिकडच्याशी हितगूज करायला कधीही जाऊ शकतो.
- जिथे सर्वात जास्त ‘शॉट’ मारला जाण्याची शक्यता असते नेमक्या त्या दिशेला व त्या उंचीवर सोसायटीतल्या सर्वात रागीट आणि ‘सरकलेल्या’ बि-हाडकरूच्या खिडकीची काच असते. (दर वेळी काचेला बॉल लागल्यावर क्रिडांगणात हमखास पांगापांग होते)
- पत्र्याचा डबा, जमीनीत खोचलेल्या दोन लहान फांद्या, किंवा खडू अथवा विटकरीने भिंतीवर काढलेला आयत हे ‘स्टंप’ होऊ शकतात.
- ‘थर्ड अंपायर’ हे बहुदा गॅलरीत मळकट बनियन मधे बसलेले सुखापुरे आजोबा असतात.
- ‘स्लेजिंग’ हा नियम असतो व ‘जेंटलमन्स गेम’ हा अपवाद असतो.
- ‘हूक शॉट’ वर बंदी असते कारण क्रिडांगणाच्या आकारामुळे अशा शॉट मधे, बॅट ही जवळच्या फिल्डरला लागू शकते.
- ‘बेल्स’ नवीन ‘किट’ असेल तर फार तर आठवडाभर वापरल्या जातात. नंतर त्यातली एक हरवते किंवा दर वेळी लावायचा कंटाळा येतो त्यामुळे फारच अभावाने वापरल्या जातात.
- उत्कृष्ट मारलेला शॉट जर पलिकडच्या झोपडपट्टीत किंवा गटारात किंवा पलिकडच्या वाड्यातल्या विहीरीत वगैरे गेला तर फलंदाज बाद होतो.
- भाजी घेऊन संथपणे येणा-या काकू काही काळ सामना स्थगित करू शकतात.
- ‘टिम्स’ पाडताना एक अष्टपैलू भिडू असा असतो जो दोन्ही बाजूच्या कर्णधारांचा पहिला चॉईस असतो त्यामुळे अपेक्षित निवड झाल्यावर तो विजयी मुद्रेने आपल्या नवीन कर्णधाराकडे जातो.
- क्रिडांगणाची एकंदर भौगोलिक मर्यादा लक्षात घेता, षटक संपल्यावर इकडचा फलंदाज तिकडे जातो आणि तिकडचा इकडे. गोलंदाजी नेहमी एका बाजूनेच करायची असते.
- ‘नो बॉल’ नसतोच कारण ब-याच वेळा गोलंदाजाच्या बाजूला आखलेल्या रेषा वगैरे नसून फक्त एक दगड ठेवला जातो. (क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू, गोलंदाज ह्याच दगडावर पाय ठेवून झेलतो तेव्हा ‘सर्कीट’ पूर्ण झाल्यामुळे अजून न पोचलेला फलंदाज धावचीत होतो असा नियम आहे)
- त्या दिवशी सर्दी खोकला वगैरेने माफक आजारी असलेल्या मुलाला अंपायरगिरी करायला खाली उतरावे लागते. इतर वेळी, नियम माहित असणे ह्यापेक्षा न रुचलेल्या निर्णयामुळे अंगावर धावून येणा-या आक्रमक खेळाडूंना शांतपणे तोंड देण्याची क्षमता असणा-या भिडूला अंपायर केले जाते.
- उत्तुंग षटकारानंतर चेंडू दाट झाडीत किंवा छपरावर वगैरे गायब झाला तर फलंदाजाच्या वाट्याला कौतुकाऐवजी नवीन चेंडूचा खर्च येऊ शकतो. शिवाय, ‘साला वानखेडेवर खेळल्यासारख्या स्टाईली करतो. आम्ही पण हाणू शकतो असे शॉट्स’ असे शेरे ऐकावे लागतात.
- दुस-या मजल्यावरून एखादा मोहक चेहरा जर सामना बघत असेल तर खेळाडूंच्या कौशल्यात अचानक वाढ होऊन सामना अगदी चुरशीचा होतो. (मॅच नंतर काही ‘फिक्सिंग’ होईल का ह्याची स्वप्ने प्रत्येक भिडू खेळताना पाहत असतो.)
- ‘कस्ला मारला ना मी’ अशा नांदी होऊन मग दोन तीन वेळा त्याच त्याच ऍंगलने फलंदाजाकडून एखाद्या फटक्याचा ‘ऍक्शन रिप्ले’ पहायला लागतो.
- जुन्या चेंडूचा पिचून नैसर्गिक मृत्यू झाला तरच वर्गणी काढून नवीन चेंडू घेतला जातो नाहीतर ज्याच्या चुकीमुळे चेंडू गेला त्याने तो ‘भरून’ द्यायचा असतो.
- एकच बॅट चांगली व त्यामुळे सर्व फलंदाजांची लाडकी असते. त्यामुळे दर वेळी एक धाव घेतली की बॅटींची अदलाबदल करण्याचा कार्यक्रम होतो.
- राफा
भन्नाट, आमच्या शाळेत बेन्चला
भन्नाट, आमच्या शाळेत बेन्चला एक खोलगट आडवी रेघ असायची, जिचा उपयोग पेन पेन्सील ठेवण्याकरता असायचा. पण आम्ही तिथे बाल बेअरिंग घेऊन क्रिकेट खेळत असू. त्यात पण पेन्सील च्या टोकाला सपाट करून bat मोठी होईल असे करत असू. झोल त्यावेळी व्हायचा, जेव्हा चेंडू खाली पडत असे. आणि हे बाल बेअरिंग गोळा करायला सायकल च्या दुकानापाशी शोधत असू.
मस्त!
मस्त!
मस्त
मस्त
लै भारी! लहानपणीचे दिवस
लै भारी! लहानपणीचे दिवस आठवले.
आऊटिंग बँटीग राहीली. म्हणजे
आऊटिंग बँटीग राहीली. म्हणजे बॅटला बॉल लागला की रन काढायचीच नाहीतर फलंदाज बाद.
राफा मायबोलीवर R वापरून वार्या ( vaaRyaa) तला 'र' लिहीता येतो..
राफा.. शॉलिड रे.. अगदी
राफा.. शॉलिड रे.. अगदी तंतोतंत जुळते..
(No subject)
एकदम मस्त ! माझ्याकडुन अजुन
माझ्याकडुन अजुन काही:
- लाकडी पाट ही वस्तु स्टंप म्हणुन लोकप्रिय आहे.
- सुट्यात मॅच असेल तर ओव्हर्सची मर्यादा नसते. एखादा तगडा फलंदाज कितीही वेळ खेळु शकतो.
- टीम मधुन एखाद्या खेळाडुला मधुनच जावे लागले तर दुसरा खेळाडु त्याच्या ऐवजी बॅटींग करु शकतो.
- टीम मधे बॉलर्स नसतील तर जे आहेत त्यांना षटकात ६ बॉल्स असले नियम मर्यादा नसतात. सलग २०-२५ बॉल्स् टाकु शकतात.
- अनेक वेळा 'उलट्या बॅटने मारल्यास आउट' असा नियम असतो.
- जागा लहान असेल तर एक टप्पा कॅच आउट असा पण नियम असतो.
- विजयी संघाला बक्षिस म्हणुन पराभुत टीमने बिस्कीट पुडा (पारले-जी) अथवा टपरीवर चहा -भजे /क्रिमरोल असे द्यायचे असते.
वा वा मस्त आठवणी. आता आमचे
वा वा मस्त आठवणी.
आता आमचे नियम.
१. बॉलच्या वेगावर मर्यादा असे, जास्त जोरात बॉल टाकला तर आउट नाही.
२. एक टप्पा आउट असेल तर भींतीवरचा टप्पा पकडायचा का नाही या बाबात बरेच वाद.
३. प्लेयर जर लहान असेल तर त्याला लिंबुटिंबु (माबोवरचा नव्हे) करायचे, कधी कधी प्लेयर्स वाटुन झाल्यावर एखादा प्लेयर उरला तर त्याला लिंबुटिंबु करुन दोन्ही टिमकडुन बॅटींग पण बॉलींग नाही.
४. परत तो, ३ दा अंगाला बॉल लागला की आउट.
५. मॅच जर हॉल मधे / घरात कुठेही असेल तर, बॉलरच्या मागच्या भींतीवर पहीला टप्पा सिक्स, दुसरा टप्पा फोर.
६. बॉल जर बॅट्समने मागे मारला तर आप्सुकच २ रन घोषीत, पळून काढायची गरज नाही.
७. कोळश्याने रेखाटून भिंतीवर स्टंप बनवलेला असेल तर, बॉलवर काळा मार्क अस्ल्याशिवाय आउट नाही. येथे अंपायरची काम सोपे.
८. रन आउट हा वादाचा विषय, त्यामूळे जो हरेल त्यांकडुन " तुम्ही चिडकी खेळलात, सरळ सरळ रण आउट दिले नाही " असे संवाद हमखास.
९. जर बॉल गहाळ झाला असेल, उपलब्ध नसेल तर प्लास्टी़कचा बॉल वापरता येतो.
१०. प्लास्टी़कचा बॉल वापरला तर, एक टप्पा आउट, खांद्याखालुन बॉलींग, हे नियम ग्रहीत असतात.
११. बॉल ज्याने हरवला त्याने भरुन द्यावा(हा नियम तगड्या फलंदाजाला रोखण्यासाठी), बॉल फुट्ला तर सर्वांनी मिळून "ओनरला" भरुन द्यावा.
१२. ज्याची बॅट असेल तो ओपनींग करणार. त्याला घरी जावे लागले तर एकतर सामना बंद नाहीतर "घरी आणुन देतो" म्हणुन भलावण आवश्यक.
आण्खी खुप नियम आहेत .
# दुस-या मजल्यावरून एखादा
# दुस-या मजल्यावरून एखादा मोहक चेहरा जर सामना बघत असेल तर खेळाडूंच्या कौशल्यात अचानक वाढ होऊन सामना अगदी चुरशीचा होतो. (मॅच नंतर काही ‘फिक्सिंग’ होईल का ह्याची स्वप्ने प्रत्येक भिडू खेळताना पाहत असतो.) >>
- एक खेळाडू किती balls/overs खेळू शकतो ह्यावर इतरांच्या सहनशक्तीप्रमाणे येणार्या मर्यादा
- कमी खेळाडू असल्यास, काही जण दोम्ही टीममधून खेळतात
- odd number असल्यास एक जण जो दोन्ही टिममधून खेळू शकतो आणि (बहुतेक सगळे जण bradman असल्यामुळे) त्याला double batting but no balling असा choice मिळतो.
- वयाने लहान असणार्यांना (बहुतेक वेळा मह्त्वाच्या players चे भाऊ etc) लिंबू टिंबू घेऊन No LB, no fast ball असे house rules असतात.
- batting team umpire असे असेल तर बॅटला न लागलेला बॉल wide असतो. बहुतेक वेळा कोणीच run out नाही. अशा वेळी DRS काय hawk eye च्या ही तोंडात मारेल अशा तर्हेने बॉलची trajectory bounce विषद करून दाखवला जातो.
- stadium च्या स्थामाहात्मामुळे अमक्या विंगच्या पुढे २ रर्न्स, भिंतीला चार असे प्रकार असतात. बहुतेल वेळा सिक्स out धरला जातो.
- MRI बॉल हा खास weekEnd मॅचेस ला वापरला जातो. हा बॉल स्वतःच्या खरचाने आणू शकणारा captain असतो.
- एखादा 'खास' प्रेक्षक आजूबाजूला असेल तर काही विशीष्ट जणांना त्याच वेळी batting/balling द्यावी लागते.
राफा रॉक्स!!! ती पीडीफ
राफा रॉक्स!!!
ती पीडीफ दिल्याबद्दल धन्यवाद!
तुफान आहेत रे
तुफान आहेत रे नियम...........
<<‘स्लेजिंग’ हा नियम असतो व ‘जेंटलमन्स गेम’ हा अपवाद असतो.>>
१००००००% सहमत........गल्ली क्रिकेट खेळताना चालू असणारे स्लेजिंग जर लिहून ठेवले तर शेक्सपियर, कालिदास वगैरे सुद्धा झक मारतील असे साहित्य तयार होईल.
<<भाजी घेऊन संथपणे येणा-या काकू काही काळ सामना स्थगित करू शकतात.>>
अशा काकू फार डोक्यात जातात पण काही बोलायची सोय नसते.....
<<एकच बॅट चांगली व त्यामुळे सर्व फलंदाजांची लाडकी असते. त्यामुळे दर वेळी एक धाव घेतली की बॅटींची अदलाबदल करण्याचा कार्यक्रम होतो.>>
ह्याबाबत तर legends सांगता येउ शकतील.....;)
नियम म्हणता येणार नाहीत पण
नियम म्हणता येणार नाहीत पण जुन्या आठवणी....
एकच बॅट चांगली व त्यामुळे सर्व फलंदाजांची लाडकी असते. त्यामुळे दर वेळी एक धाव घेतली की बॅटींची अदलाबदल करण्याचा कार्यक्रम होतो.>> जरी बॅट बदलयची नसेल तरी रन काढुन झाल्यावर बॅटी टीक करायला दोन्ही फलंदाज परत भेटायचे.. त्यालाकाहितरी पेट्ट शब्द होता.
शाळेत असताना आला आला घोडा नाव काय फोडा म्हणुन 'पार्ट्या' पाडुन सुर्वात असायची आणि नाव काय ठेवायची याची फिक्सिंग कॅप्टन बरोबर मधल्या सुट्टीत व्हायची.
आणि नंबर पाडुन खेळायचे असेल तर एखद्या बारक्याला खाली वाकवुन पाठीवर मारुन 'ह्यो' कोण विचारायचे... त्यात पण अगोदरच फिक्सिंग व्हायचे. तरी आंतरराष्ट्रीय सामन्यात 'फिक्सिंग' त्या मानाने खुप उशीरा आले.
"तीनवेळा स्टंपला लागला",
"तीनवेळा स्टंपला लागला", तीन अंगी हे सर्व नियम, ज्याची बॅट असेल, ज्याचा चेंडू असेल, किंवा 'ज्याच्या' गल्लीत खेळ चालू असेल त्याच्यासाठी थोडे सैल केले जात.
(आम्ही गल्ली क्रिकेट खेळत असू, त्या वेळी भारत हा अतिशय गरीब देश होत. आम्ही पण. बॅट असणे, चेंडू असणे म्हणजे गडगंज श्रीमंत असलेला मुलगाच! )
शिवाय बॅटिंग साईडचा अंपायर, त्यामुळे पायचीत होणे अशक्य, धावचित सुद्धा अगदी स्पष्ट असेल तर!
‘नो बॉल’ नसतोच कारण ब-याच
‘नो बॉल’ नसतोच कारण ब-याच वेळा गोलंदाजाच्या बाजूला आखलेल्या रेषा वगैरे नसून फक्त एक दगड ठेवला जातो. (क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू, गोलंदाज ह्याच दगडावर पाय ठेवून झेलतो तेव्हा ‘सर्कीट’ पूर्ण झाल्यामुळे अजून न पोचलेला फलंदाज धावचीत होतो असा नियम आहे)
>>> सर्कीट
सहीये आम्ही एकदा बॅट नाही
सहीये
आम्ही एकदा बॅट नाही म्हणून घरमालकांनी आणून ठेवलेल्या फायर वूडच्या फळकुटाने मॅच खेळलो आहोत. टेनिस बॉल होते घरात. एक बॉल शेजार्यांच्या छ्तावर गेला तो मागायची अजून हिंमत नाही
आमच्या टिममधे एखादा चांगला
आमच्या टिममधे एखादा चांगला खेळला कि त्याला लगेच नावाजलेल्या क्रिकेट प्लेअरचं नाव देत होतो...
राफा अशक्य ज्या घरात चेंडे
राफा अशक्य
ज्या घरात चेंडे गेला की परत मिळण्याची शक्यता नसे त्या घरातील एकतरी प्लेयर टीममधे असावाच लागतो. त्याशिवाय मॅच सुरुच होत नाही.
चेंडु कशानेही तयार करता येऊ शकतो. उदा : भिजवलेला कागद व त्यावर पंक्चर झालेल्या ट्युबचे रबरबँड, बहावाच्या शेंगांचा लगदा, पूर्वी ट्रकच्या बॉनेटला लावलेल्या रबरी स्टॉपरचा कापलेला गोल (डिस्को बॉलचा जनक), लेदर बॉलमधल्या गोटीचा बॉल, खुपच धाडसी टीम असेल तर बुचचा बॉल इत्यादी.
मस्त...
मस्त...
(No subject)
राफा रॉक्स!! अशक्य हसवलत!!
राफा रॉक्स!! अशक्य हसवलत!!

आम्हा मुलींच्या क्रिकेटची वेगळीच गंमत असते.
१) आम्ही सायकलचे पुढचे चाक स्टंप म्हणुन वापरले होते. मुलांचाच जुना तुटका-फुटका चेंडु.
२) फलंदाजाने सरपटी मारली की 'कोंबडी, 'कोंबडी' केल्यासारखं आमचे फिल्डर्स बॉलच्या मागे पळत जायचे.
३) एखादी फिल्डर बॉलच्या मागे पळत असेल तेव्हा बाकीच्या २-३ अशा घोळक्याने उभ्या राहुन गप्पा मारत होत्या.... किंवा दुसरीच्या ड्रेस, कलर याबद्द्ल गहन चर्चा करत रहात.
हे सगळं आम्ही युनिवर्सिटीत पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेस केलं होतं. शेवटी मुलांनी आम्हाला शिकवता शिकवता हात टेकले आणि जाहिर केले की 'स्वतःचं डिव्हॅल्युएशन' करुन घेऊ नका! स्पोर्ट्स डे ला एमबीएच्या मुलींविरुद्धची मॅच कॅन्सल!
आर्या काय हे ! आमच्या ऑफिसात
आर्या काय हे !
आमच्या ऑफिसात दरवर्षी पुरुष व स्त्रियांच्या (वेगवेगळ्या) क्रिकेट मॅचेस असतात. एखादं ग्राऊंड भाड्याने घेतले जाते. इंटर मजला मॅचेस असतात. गेली ४ वर्षं मी आळसामुळे भाग घेतला नाही. रन काढण्यासाठी पळायचाही कंटाळा येतो. पण टिम्स प्रॅक्टिस करतात ऑफिसच्याच परिसरात तेव्हा आवर्जून ३-४ बॉल्स टाकून यायचे. आता टिममध्ये नसल्याने कुणी बॅटिंग देतच नाहीत. मॅचेस डिक्लेअर झाल्या की कार पार्किंग आपोआपच शिफ्ट होतं
प्रॅक्टीस करताना नियम अगाध ठेवावे लागतात, म्हणजे कँटीनच्या भिंतीला बॉल लागला की फोर वगैरे. लंच ब्रेक आणि ऑफिस सुटल्यानंतर बिल्डिंगमागे पुरुष आणि डाव्याबाजूला बायका अशी प्रॅक्टिस चालते. पहिल्याच वर्षी एका उंचाड्या मुलीची, रन काढताना वाटेत असलेल्या थोड्याश्या वाळूवर घसरुन गुढघ्याची वाटी सरकली होती आणि ती पुढे २ महिने रजेवर 
मस्तच अजुन एक - ऑल आउट झाली
मस्तच
अजुन एक -
ऑल आउट झाली टीम तरी नॉट आउट राहिलेल्या बॅट्समनला बॅटींग.
ओ हो झक्कास आहे गल्ली
ओ हो झक्कास आहे गल्ली क्रिकेट
क्रिकेट साठी एवढे बोलने खाल्ले की बस
शॉट मारुन गल्लीती घरमालकाचे रस्त्यावरील लाईट काय फोडले
उन असो की पाऊस क्रिकेट सुरुच असायचे
मस्त! १२ नंबरचा नियम सर्वात
मस्त!
१२ नंबरचा नियम सर्वात भारी!
बेल्सचं निरिक्षण अचूक! खरंच त्या कुठे जातात काय माहित! 
क्रिकेट खेळून झाल्यानंतरच्या त्या न संपणार्या गप्पा!!- विरुद्ध पार्टी कशी चिडकी आहे, त्यांच्याविरुद्धचे डावपेच आणि एक तरी 'दोन्हीघरचा पाहुणा'- खबरा आणायला!
एवढीशी पोरंही अशी काही स्टाईल मारतात की यंव रे यंव!
सही रे राहुला! बर्याच
सही रे राहुला! बर्याच दिवसांनी त्या आठवणी काढून हसलो.
भिंतीवर आयतावर असा टप्पा उठून दिसतो!
गटारीत गेलेला चेंडूने तशीच गोलंदाजी केल्यास हमखास विकेट पडते, हा स्वानुभव
- MRI बॉल हा खास weekEnd
- MRI बॉल हा खास weekEnd मॅचेस ला वापरला जातो. हा बॉल स्वतःच्या खरचाने आणू शकणारा captain असतो.
>>>
हे लै भारी असाम्या.. MRI बॉल असेल तर तो महा-सुदीन.. सर्कीट रन-आउट बहुतेक बेसबॉलमधून आलेला प्रकार असावा
केप्याने उल्लेखलेला तो चिक्कीचा बॉल असा काही अफलातून स्पिन होतो आणि लो राहतो की गुढग्याखाली हाडावर नेमकं शेकायचं त्या बॉलने खेळताना..
राफा मस्तच खुळ्या दिवसांची
राफा मस्तच
खुळ्या दिवसांची याद!
सुट्ट्यांमधे आम्ही दिवसभर गल्ली किरकट खेळायचो... दुपारच्या वेळी आंटी ओरडते म्हणून 'सायलेंस' किरकिट खेळायचो... म्हणजे नो बॉल, वाईड बॉल, यल्बी, रानाऊट ची झंझट नसायची.
ज्या गल्लीत आम्ही खेळायचो ती गल्ली पुढे मुख्य रस्त्याला मिळायची त्यामुळे ये-जा करणार्यांची मने सांभाळून किंवा वेळ प्रसंगी त्यांनाच थांबवून खेळावे लागे... त्यामुळे कधी कधी तर दोन चेंडूच्या वत्ययात लंच ब्रेक उरकला जायचा :p
पण हे गल्ली क्रिकेट हल्ली दिसतच नाही फार...
बेल्सचं निरिक्षण अचूक! खरंच त्या कुठे जातात काय माहित >>> मी काल परवा पर्यंत सांभाळून ठेवल्या होत्या... मात्र पोराला त्यांची किम्मत नाही
मस्त!! बोलरने अंपायरकडे अपील
मस्त!!
बोलरने अंपायरकडे अपील करताना 'अवस दे?' असं म्हटलं तर(च) ते अपील ग्राह्य धरून त्यावर विचार करण्यात येतो.
मोहक चेहरा बघत असताना बाकिच्यांनी 'श्शॉट याssर!', 'अssईssल्लॉ!' इत्यादी डायलॉग वरचेवर फेकणं आवश्यक.
शिवाजी पार्कात खेळताना बाऊंड्रीवरचा खेळाडू कधी कधी बाजूच्या मॅचचा अंपायर असू शकतो, त्याला दोन वडापाव मिळणार आहेत याची त्याने जाणीव ठेवावी.
शिवाजी पार्कात खेळताना
शिवाजी पार्कात खेळताना बाऊंड्रीवरचा खेळाडू कधी कधी बाजूच्या मॅचचा अंपायर असू शकतो, त्याला दोन वडापाव मिळणार आहेत याची त्याने जाणीव ठेवावी >>>
Pages