असे प्रेम देवा

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

सहज गीत ओठी कुणी गुणगुणावे
असे प्रेम देवा नशीबी असावे
जणू शिंपल्यातून मोती वसावे
असे प्रेम देवा नशीबी असावे

किती छाटले झाड फुटती धुमारे
किती मेघ आले विझे सूर्य कारे ?
किती, वार झेलूनही ना मिटावे
असे प्रेम देवा नशीबी असावे

जशी भेटते ती नदी सागराला
जशी लाट शोधून गाठे किनारा
जळावीण मासे जसे तडफडावे
असे प्रेम देवा नशीबी असावे

जरी जीवनाच्या दिशा भिन्न झाल्या
कधी धुंद अथवा कधी खिन्न झाल्या
तरीही मनांनी मनांतच वसावे
असे प्रेम देवा नशीबी असावे

धरा सांग चंद्रा कधी भेटते का
पहाटेस संध्या कधी गाठते का
तशी जाणती साथ देण्या असावे
असे प्रेम देवा नशीबी असावे

कधी दक्षिणा ना धरा मागते(रे)
कधी दाम प्रेमास का माय घेते
सदा प्रेम निरपेक्ष हृदयी ठसावे
असे प्रेम देवा नशीबी असावे

उगा ध्यान बगळ्यास भावे कशाला
उगा मकर नेत्रात आसू कशाला
अशा मृगजळा ना कधीही फसावे
असे प्रेम देवा नशीबी असावे

सदा संत गाती तुझे नाम भावे
अनंता तुझे रूप कोणा न ठावे
तरी आळवीता मिळावे विसावे
असे प्रेम देवा नशीबी असावे

विराटा तुझे रूप गगनी दिसावे
कधी सूक्ष्म रूपी तुझे भास व्हावे
न दिसता जसे गंध ते दरवळावे
असे प्रेम देवा नशीबी असावे. . . .
सुधीर

प्रकार: 

खूप छान लिहिलय. आवडल.

सुंदर, खरच असे प्रेम देवा नशिबी असावे. Happy

नितांत सुंदर आहे कविता!! आवडली...

अगदी अगदी नितांत सुंदर कविता. एक निर्व्याज प्रार्थना.
जशी लाट शोधून गाठे किनारा....
कधी धुंद अथवा कधी खिन्न झाल्या....
तशी जाणती साथ देण्या असावे...
तरी आळवीता मिळावे विसावे....

अशा किती तरी सुंदर कल्पना आणि अप्रतिम शब्द योजना....

सुधीर, खरच सुंदर!

शैलजा, स्व, दिव्य, दाद
प्रतिक्रियेबद्दल धंन्यवाद

सुधीर

मस्त. अगदी आतून आलेली.

>> किती मेघ आले विझे सूर्य कारे ?

>>विराटा तुझे रूप गगनी दिसावे
कधी सूक्ष्म रूपी तुझे भास व्हावे
न दिसता जसे गंध ते दरवळावे
असे प्रेम देवा नशीबी असावे. . . .

क्या बात है!

संघमित्रा
प्रतिसादाबद्दल अभारी आहे.

सुधीर

मनस्वि आहे कविता. खूपच सुन्दर.
आप्रातिम!

विचा॑रांची श्रीमंती आणि शब्दांची मस्ती अजून काय हवं असतं कवितेला ? ती खुष आहे तुमच्यावर. नशीबवान आहात. !!