वासोटा ते नागेश्वरः भाग२: दर्शन वासोटा

Submitted by Yo.Rocks on 24 November, 2011 - 13:55

वासोटा ते नागेश्वरः भाग१- प्रवास बोटीचा !
http://www.maayboli.com/node/30718

इथून पुढे....

बोटीतून बाहेर पडलो तरी सारखे वळून मागे बघावेसे वाटत होते.. पण शेवटी पुढे वाटचाल करायची होती सो थांबून राहणे शक्य नव्हते.. इथे काठावरच वनखात्याचे कार्यालय आहे.. वासोटयासाठी जाताना इथेच नावनोंदणी करुन पुढे जावे लागते.. याच कार्यालयात येथील जंगलात आढळणार्‍या पक्षुपक्ष्यांची सचित्र माहिती दिली आहे.. शिवाय कास पठारावर आढळणार्‍या फुलांची ओळखही करून दिलेली आहे.. एकूण छोटेच पण छान दालन आहे.. आता पुर्वीसारखे वासोटयावर राहता येत नाही.. मुक्काम करायचा असेल तर पुन्हा याच जागी यावे लागते.. आमचा मुक्काम इथे नव्हता.. वासोटयावर नव्हता.. नागेश्वरकडे पण नव्हता.. !! बस्स चालत रहायचे होते... एका दिवसात वासोटा ते नागेश्वर ट्रेक पूर्ण करून गावात उतरायचे असा प्लॅन होता.. !

वाटेत संपुर्णपणे झाडांचे छत असल्याने उनाच्या कवडसांचा आस्वाद घेत आमची टोळकी जंगलातून पुढे सरकू लागली..
प्रचि १

मला व रोहीतला जितके अपेक्षित होते तितके जंगल दाट वाटले नाही.. अर्थात अंगाशी झटापटी करणारे जंगल असेल की काय असे वाटले होते.. पण तसे काही नाही... वाट मस्तपैंकी रुंद नि चांगली मळलेली आहे.. चढही फारसे नाहीयेत.. तरीदेखील समिर, त्याचा मित्र (प्रदीप) व ग्रुपमधील विपुल म्हणून अजुन एक अशा या तिघांचा (आमच्या भाषेत इंजिन नसलेले डबे) ट्रेकशी फारसा संबंध नसल्याने त्यांना धापा लागणे स्वाभाविक होते.. चढताना वाटेत एक ओढा नंतर 'हनुमान व गणपती यांचे मंदीर ' अशा खुणा आढळतात.. त्या तीन डब्यांना खेचत ढकलत प्रोत्साहन देत हसतखेळत आम्ही कसेबसे ठरल्या वेळेत टॉपच्या समिप जाउन पोहोचलो... अर्थात या तिघांनी सर्वप्रथम सुटकेचा निश्वास सोडला.. Proud

मागे वळून पाहिले तर आतापर्यंतची वाटचाल दिसून येत होती.. वाटेचा पत्ता नव्हता.. पण वासोटयाकडे सरकलेला जलाशय सभोवतालच्या जंगलापुढे फिका वाटत होता..
प्रचि २:

प्रचि३:

इथूनच शेवटच्या टप्प्यातले कारवीचे छोटेसे जंगल पार करून वासोटयावर येउन पोहोचलो.. समोरच बजरंगाचे छप्पर नसलेले देउळ आहे.. पण मुर्ती छान आहे..

प्रचि४:

तिथेच मंदीराच्या समोरून एक वाट जंगलातून पुढे जाते तिथे काही अवशेष शिल्लक आहेत.. अवशेष असले तरी जे काही शिल्लक आहे ते एकदम मजबूत..

प्रचि५:

तिथूनच माघारी येउन मंदीराच्या मागच्या बाजूला गेलो की पाण्याचे टाके (इथले पाणी पिण्यास योग्य), चुना करण्याचे जाते(!!) नजरेस पडते...

प्रचि६:

आम्ही इथूनच पुढे गेलो जिथून जुना वासोटा खूप जवळ भासतो.. इथेच मग येथील प्रसिद्ध बाबूकडयाचे दर्शन होते... या बाबूकडयाचे रौद्ररुप बघण्यासारखेच... इथून दुरवर धूसर वातावरणात डोंगररांगा पसरलेल्या दिसत होत्या.... आणि खाली दरी बघायची तर दाट जंगलच !

प्रचि ७:

प्रचि ८:

इथेच मग उडीबाबाचा कार्यक्रम आटपूण घेतला... आमच्या उडया नेहमीच्याच.. त्यात आमची लिडर झीनत पण मग 'उडी मारो उडी' म्हणत सामिल झाली..

प्रचि ९:

उडया आटपून आम्ही पुन्हा माघारी फिरलो..नि तिथेच सावलीमध्ये पेटपूजा आटपून घेतली... सम्याने आपल्या बायकोच्या हातचे पराठे संपावेत म्हणून जबरदस्त मार्केटींग केली नि तो यशस्वी झाला... नाहीतर घरी त्याला धपाटे मिळालेच असते.. Happy

इथूनच मग आम्ही वासोटयाच्या दुसर्‍या टोकाकडे वळालो जिथून नागेश्वर गुहेचा माथा दिसतो.... या वाटेतच महादेवाचे मंदीर लागते.. बांधकाम बर्‍यापैंकी सुस्थितीत आहे..
प्रचि१०:

इथली शीतल जागा बघून मग थकल्या भागलेल्या मंडळींनी इथेच बसकण मारली.. पुढे येण्याचे कष्ट घेण्याच्या भानगडीत पडले नाहीत.. आम्हीसुद्धा त्यांना आग्रह न करता पुढे गेलो.. काय करणार.. खरा ट्रेक पुढे वाट पाहत होता.. !

आम्ही पुढे एका दरवाज्यातून दुसर्‍या माचीवर आलो.. इथून दिसणारे दृश्य छानच.. समोरच दोन टोकं दिसतात.. पहिले ते तुळस वृदांवन. .. नि मागचे दिसते ते नागेश्वर.. ! नागेश्वरला जाणारी वाट बघितली नि एकदम ट्रेकींग कुतूहल जागृत झाले... इतकेच काय तर तिथूनच कोकणात उतरणार्‍या डोंगरसोंडा बघून थक्क व्हायला होते..

प्रचि ११:

मी तर कितीतरी वेळ हा नजारा बघत होतो.. नागेश्वर गुहेपर्यंतचा मार्ग लक्षात आला होता.. पण आमचा पुढचा प्लॅन तिथूनच चोरवणे मार्गे कोकणात उतरण्याचा होता.. ते कसे हे मला पडलेले प्रश्णचिन्ह होते.. सुन्याला तसे विचारले.. त्याने मार्ग दाखवला.. मी वेळ बघितली.. दुपारचे दोन वाजत आले होते.. म्हटले.. 'लागणार.. चांगलीच बोंब लागणार.. नागेश्वर पर्यंत जाताना नाही तर तिथून उतरताना..' थंडीचे दिवस म्हणजे सुर्यास्त लवकर होणार नि अंधारात त्या जंगलमय दरीतून उतरणे म्हणजे मला टेंशनच आले.. ! म्हटले आता कमीतकमी वेळेत पटापट चालू नि शक्य तितके अंतर अंधार होण्याअगोदर कापू...

आम्ही तिथले फोटोसेशन आवरुन माघारी फिरलो.. इथून ते महादेवाचे मंदीर नि तो परिसर छान दिसत होता.. आम्ही किल्ल्यावर आहोत याची जाणीव करून देत होता..

प्रचि १२:

प्रचि १३: रानफुला...

जुना वासोटा हा चढण्यास कठीण आणि किती धोकादायक आहे हे खालील फोटोतील जंगल बघितले की कळेलच..
प्रचि १४:

म्हणूनच की काय तिथे जाण्यास बंदी आहे.. तर इथे वासोटा वा नागेश्वरला राहण्यास बंदी आहे... कारण इथे आढळलेले वाघ, बिबटे सारखे हिंस्त्र प्राणी.. त्यामुळे आम्हाला इथे कुठेच राहण्याजोगे नव्हते.. अंधार पडला तरी चालेल पण उतरणे सक्तीचे होते.. शिवाय नागेश्वरला जाताना लागणारे व हिंस्त्र प्राण्यांसाठी नावाजलेले घनदाट जंगल आमच्या पुढयात काय वाढून ठेवेल हे ठाउक नव्हते... एवढे असूनही इथे अगोदर जाउन आलेला आमचा लिडर सुन्या व झीनत मात्र निर्धास्त होते.. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोहोचू सांगत होते.. पण मला स्वतःला टेंशन आले होते.. एकवेळ आम्ही नेहमीचे ट्रेकर्स असतो तर भरवेगात अंतर कापले असते.. पण आमच्या ग्रुपमध्ये दोन तीन 'इंजिन नसलेले डबे' होते ते कोण विसरणार.. आपल्या आयुष्यातील पहिला ट्रेक करणारा समीरचा मित्र 'प्रदीप' तर बैचेन झाला होता. ट्रेक कधी संपणार याची वाट बघत होता जिथे अजून खरा ट्रेक सुरु झाला नव्हता.. ! Proud

आता आमची पुढील वाटचाल एक रोमांचक अनुभव देणारी होती.. आधी जंगलातून.. मग कडेकडेने.. नि मग उतरतान थेट कातळाला बिलगुनच.. !

क्रमशः

गुलमोहर: 

जबरदस्त!!!! Happy

प्रचि ११ क्लासच Happy
शब्दच नाही सगळे बाण पाहिल्यानंतर!!>>>>+१>>>> +१ Happy

(आमच्या भाषेत इंजिन नसलेले डबे)>>>:फिदी: Happy

सम्याने आपल्या बायकोच्या हातचे पराठे संपावेत म्हणून जबरदस्त मार्केटींग केली नि तो यशस्वी झाला... नाहीतर घरी त्याला धपाटे मिळालेच असते>>>>>>:फिदी: तुम्ही केलेल्या उल्हास दरी ट्रेकवेळी पुरणपोळीची मार्केटिंग होती ना रे? Wink आणि दापोली बाईक ट्रेकच्या वेळी कुळथाच्या पीठाची Proud सम्या दिवा घे रे Happy

मस्त, कोकणकडा भव्यदिव्य दिसतो. आणि वासोट्याच्या जंगलाबाबत ज्या कहाण्या ऐकल्या होत्या त्या हे जंगल पाहून खर्‍या असाव्यात असे वाटते. Happy

हे भ्रमण, त्याचे फोटो, त्याचे वर्णन सर्वच आवडले. भावले. म्हणूनच.....

वन्य वाट चालती, पाठी न वळून पाहती । रम्य रानवाट अन्‌, दिलेर साथी पाठीशी ॥ १ ॥
उंच डोंगरावरून दृष्टी, टाकताच खालती । सखोल, साथी राहती, तळात पाणी पाहती ॥ २ ॥
जलाशयही रम्य तो, हिरवे अरण्य भोवती । पाठीशी आडवी पडे, सह्य-रांग लांब ती ॥ ३ ॥
बलदंड मारूतीची, मूर्ती पत्थरात कोरली । सुबक शिल्प देखणे, द्वारी कमान मोडली ॥ ४ ॥
तिथेच मंदिरानजीक, वाट दूर चालली । अवशेष भग्न, भिंत परि पत्थरी उभारली ॥ ५ ॥
पाथरवटी चुन्याची चक्की, चाकही उभे दिसे । उभारले कधीतरी इथेही, काम देखणे ॥ ६ ॥
भव्य भिंत कातळी, मग वाट आडवे पुढे । पाऊले खुशाल तरीही, पाठी घालती कडे ॥ ७ ॥
उंच कातळी कड्याचे, टोकही मग ये पुढे । खालती दरी सखोल, दृश्य दिव्य देखणे ॥ ८ ॥
उंच ही उडी किती, मजेत मारली वरी । जीनत१ सहर्ष सर्वही, आस्वादती पुरी पुरी ॥ ९ ॥
पत्थरी, कमान-कळस, गर्भगार नंदीही । शिवालयी ध्वजा सुखे, खुले उन्हात पत्यही ॥ १० ॥
नाल वाटते जशी ही, रांग रास डोंगरी । इथेच साथी आपले, वाट चालती वरी ॥ ११ ॥
किल्ला अनुपमेय तो, वासोटा नाव लावतो । गोलसे पठार वरती, परत-वाट दावतो ॥ १२ ॥
रानकोंबडा प्रकाशचित्र, सुबक रेखते । दृष्टीक्षेप एक पाठी, टोळी सर्व टाकते ॥ १३ ॥
हिरवे असूनही पुरे, घनदाट वनही दाटले । दिवस मावळून रात्र, अंधार भीती दाखवे ॥ १४ ॥
नकाशावरील शुभ्र-बाण, वाट दावती तरी । कुठे कळे न, काय वाढले पुढ्यात ते वरी ॥ १५ ॥

ह्या सहलीत शरीक (सामील) झालेल्या सर्व पदभ्रमरांच्या आनंदात सहभागी होण्याचा, मनःपूर्वक केलेला एक प्रयास! - नरेंद्र गोळे २०११११२५

१ “जीनत” ह्या ऊर्दू शब्दाचा मराठीतला अर्थ “शोभा”.

कसला सोपा ट्रेक आहे हा! माझ्या डाव्या पायाचा मळ

..... असं मी या जन्मात म्हणू शकणार नाही Happy तेंव्हा तुम्हाला __/\__ .

यो आरे << एका दिवसात परत खाली >>:-( आरे आम्ही तर नागेश्वर ला २ रात्री घालवल्या होत्या
प्र . ची. अन सफर झक्कास चालु आहे येउदेत Happy

येस्स!!
मी फोटॉ झब्बू देणार याला...
चार वर्षांपूर्वी दत्तजयंतीच्या पौर्णिमेच्या रात्री आम्ही वासोट्याच्या पायथ्याला मुक्काम केला होता. पट्टेरी वाघाची खालच्या आवाजातली गुरगुर मी आणि फारेष्ट गार्डने ऐकली होती. मागच्या जंगलात पाचशे मीटरवर एक गवाही आलेला पाहिला होता... त्या आठवणी जाग्या केल्यास मित्रा! Happy

गड किल्ले किंवा तत्सम सर्व ट्रेकर्स मला तरी गत जन्मींची कातकरी, ठाकर वगैरे भटकी मंडळी Happy Happy ( पण मुख्यतः निसर्गप्रेमी) अशा कॅटॅगरीतील वाटतात - त्यांना या जन्मात नाईलाजाने शहरात रहावे लागते. शहरात घुसमटायला झालं की चालले पुन्हा निसर्गसान्निध्यात......... अशी खरी निसर्गप्रेमी मंडळी आहेत ही.....
त्या ट्रेकमधील "अडीअडचणी" या माझ्यासारख्या इंजिन नसलेल्या डब्याला लागू आहेत...... या अडीअडचणीही एंजॉय करतात ती ही सच्ची निसर्गप्रेमी मंडळी........
एक दंडवत रे समस्त ट्रेकर्स मंडळींना (अंगाला धूळ लागू नये अशा अवस्थेत नमस्कार घालणारा बाहुला......:स्मित:.)

भव्य भिंत कातळी, मग वाट आडवे पुढे । पाऊले खुशाल तरीही, पाठी घालती कडे ॥ ७ ॥
उंच कातळी कड्याचे, टोकही मग ये पुढे । खालती दरी सखोल, दृश्य दिव्य देखणे ॥ ८ ॥ >>> अगदी अचूक वर्णन गोळे साहेब.

बाण दाखविलेला फोटो फारच छान... >>> अनुमोदन

वासोटा ट्रेक हा सगळ्यांसाठीच अविस्मरणिय असतो... ते कोयनेचे बॅकवॉटर, काठावरील जंगल, जंगलातील निरनिराळे आवाज, किनार्‍यावरील मातीच्या पायर्‍या, जंगलातील पायपीट, रानमेवा, बाबुकडा आणि नागेश्वरचा नजारा... केवळ केवळ अप्रतिम.

यो मस्तच!

चोरवण्याचा थरार लवकर येऊ दे...

धन्यवाद मंडळी..

शशांक, गंधर्व.. Happy

नरेंद्रकाका.. अगदी तंतोतत.. मस्तच लिहीले आहे..

वासोटा ट्रेक हा सगळ्यांसाठीच अविस्मरणिय असतो... ते कोयनेचे बॅकवॉटर, काठावरील जंगल, जंगलातील निरनिराळे आवाज, किनार्‍यावरील मातीच्या पायर्‍या, जंगलातील पायपीट, रानमेवा, बाबुकडा आणि नागेश्वरचा नजारा... केवळ केवळ अप्रतिम. >> इंद्रा.. +१

आरे आम्ही तर नागेश्वर ला २ रात्री घालवल्या होत्या >> नशिबवानलोक्स.. पुढच्या खेपेस चोरवण्याने वरती चढून तिथे राहण्याचा मानस आहे.. पण सोबत गावातील एककोण तरी असणे आवश्यक आहे.. अन्यथा वनखात्यांच्या हाती लागाल तर चांगलाच कापतात अशी माहिती मिळाली..

अरे शैलजा.. बरोबर आहे तूझे.. Happy पण ती जागा खरच भुरळ पाडणारी आहे.. कोणत्याही भटक्याला तेथील रात्रीच्या मुक्कामाचा अनुभव हवाहवासाच वाटेल... Happy

ते सगळे खरे आहे, पण तुझे हे पोस्ट मला तरी काही पटले नाही. Happy असो. कासला लोक जाऊन तिथल्या निसर्गवैभवाला धक्का पोचवतात असे तू म्हणत होतास ना? त्या मनोवृत्तीत आणि ह्या नियम मोडण्याच्या मनोवृत्तीत मला तरी दुर्दैवाने फारसा फरक वाटत नाही.

सुंदर.

यो पराठे होते म्हणुन एवढं अंतर कापू शकलात नाहितर गळले असतात. :p
anyways हे अवाढव्य अंतर पाहुन थोडे पाय दुखायला लागले.
BTW फोटो आणि वर्णन अफाट अगदी वासोट्यासारखं. :p

अप्रतिम. कौतुक व हेवा वाटतो.
<< सर्व ट्रेकर्स मला तरी गत जन्मींची कातकरी, ठाकर वगैरे भटकी मंडळी ( पण मुख्यतः निसर्गप्रेमी) अशा कॅटॅगरीतील वाटतात >> अरेच्चा, म्हणजे पुढच्या जन्मी कातकरी, ठाकर वगैरे झालं तरच त्याच्या पुढच्या जन्मीं आमच्या नशीबी हा थरार येणार !! मला वाटतं माबोकर ट्रेकर्सची 'चिठी' घेतली तर कदाचित डायरेक्टही पुढच्या जन्मी 'ट्रेकर' होता येईल; तोपर्यंत अर्थात जंगलं राहिली म्हणजे मिळवलं !

अन्यथा वनखात्यांच्या हाती लागाल तर चांगलाच कापतात अशी माहिती मिळाली..>>>>>>> होय
शैलजा तै >>>> माफी पण आम्ही निरुपद्रवी ट्रेकर आहोत हो Happy

निरुपद्रवी जरुर आहात पण नियम मोडला तर उपद्रवी ठराल ना? की तुमच्यासाठी नियम नाहीत अणि इतरांच्या वागण्यावर तुम्ही आक्षेप घेणार, ट्रेकरच्या लेबलखाली? खर ट्रेकर नियम नक्कीच पाळेल, कारण त्यात त्याची, इतरांची (ग्रूपची) आणि निसर्गाची भलाई आहे असं मला तरी वाटतं, पण मी ट्रेकर नाहीये म्हणा. Happy

मस्तच यो...
भारी लिव्हलयस..
खरी धमाल तर पुढे आहे..... सुर्याने केला लाईटस ऑफ ... & अ‍ॅक्शन .....

हे बघ, तुझ्यासारखाच काढलेला एक फोटॉ -

हा आदल्या दिवशी संध्याकाळी लाँचमधून जाताना घेतलेला वासोटा -

बादवे, कालच्या पेपरमध्ये वाचलं - सरकार दाजीपूर ते वासोटा २००किमी चा जंगल वॉक करणार आहे!!! आपल्यासाठी ऑफिशिअल जंगल ट्रेक!!! Happy

झब्बु खास आहे , << सरकार दाजीपूर ते वासोटा २००किमी चा जंगल वॉक करणार >>>>>छापलय खरं बघु आता अस्तित्वात कधी येतय Happy
खर ट्रेकर नियम नक्कीच पाळेल, कारण त्यात त्याची, इतरांची (ग्रूपची) आणि निसर्गाची भलाई आहे असं मला तरी वाटतं, . >>>> १००% पटलं पुढील ट्रेकला चुकणार अन चुकवणार नाही Happy
>>>पण मी ट्रेकर नाहीये म्हणा >> निसर्गा बद्दल प्रेम कळकळ असण्याला ट्रेकरच पाहीजे अस काय नाय Happy
आपल्या मार्गदर्शनाच स्वागत्चं !

Pages