भरली ढेमसे - भरवा टिंडे (फोटोसह)

Submitted by डॅफोडिल्स on 16 November, 2011 - 06:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ढेमसे अर्धा किलो
दोन मध्यम आकाराचे कांदे सोलून पातळ उभे चिरून
सुकं खोबरं अर्धी वाटी
लसूण पाकळ्या आठ दहा
तिळ पाव वाटी
खसखस एक चमचा
बडीशेप एक चमचा
आमचूर पावडर एक चमचा
लाल तिखट, हळद, गरम मसाला, मिठ अंदाजाने स्वादानुसार आवडीप्रमाणे.
फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मोहरी

क्रमवार पाककृती: 

ढेमसे स्वच्छ धुऊन पुसुन घ्यावीत.
मग देठाजवळ गोलाकार कापून देठ काढुन टाकावा व आतिल बिया व गर पोखरुन बाहेर काढुन टाकावा.

कढईत एक चमचा तेल टाकून त्यावर पातळ उभा चिरलेला कांदा खमंग परतून घ्यावा. मग लसूण, सुके किसलेले खोबरे, तिळ, खसखस, बडीशेप हे सगळे एक एक करून खमंग भाजून घ्यावेत.
मग हे कांदा खोबरे व इतर भाजलेल्या वस्तूंचं मिश्रण थोडं गार करून घ्यावं. मिश्रण थंड झाल्यावर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, मिठ, आमचूर पावडर घालून मिक्सर वर बारिक वाटून घ्यावं.

तयार वाटप पोखरलेल्या ढेमश्यांमध्ये दाबून गच्च भरुन घ्यावं.
कढईत तेल तापउन जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी करून हि भरलेली ढेमसे त्यात टाकावीत. कढीवर झाकण ठेउन मंद आचेवर शिजु द्यावीत. सारण भरून जर थोडे शिल्लक असेल तर तेही वरुन टाकले तरी चालते. पण भाजी शिजताना त्यात पाणी घालू नये. मधे मधे हलक्या हाताने हलवावी म्हणजे ढेमसे जळणार नाहीत. भाजी शिजल्यावर वरून कोथींबीर घालून खायला तयार. फुलके, तांदळाच्या भाकरी किंवा नुसतीही खायला भन्नाट लागतात.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांसाठी
अधिक टिपा: 

आपल्या ह्या पारंपारीक पद्धतीत बडिशेप आणि आमचूर पावडर घातल्याने मस्त स्वाद येतो. Happy
नॉर्थ कडे ह्यात बारीक चिरलेला कांदा + पनिर किंवा खवा कुसकरुन + मसाले असे स्ट्फिंग करतात.

माहितीचा स्रोत: 
खानदेशी भाज्या
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॅफो, पाककृती सार्वजनिक कर.

लाजो, इकडे चिन्मयने दिलेली लिंक पहा आणि त्याच बाफवर दिनेशदांनी या भाजीचा मोठा फोटो टाकला आहे.

झकास.. हे टिंडे बर्‍याचवेळा बघतो दुकांनात पण 'या टिंड्यांचं करायचं काय असतं नक्की?' असा प्रश्न नेहमी पडून कधीच घेत नाही. आता घेईन. यांनाच ढेमसं म्हणतात हे ठाऊक नव्हतं ज्ञानात भर घातल्याबद्दल धन्यवाद! Happy

सगळ्या पायर्‍यांचे फोटो टाकलेत ते छानच.
(मला कधी जमणार हे ?)

सगळ्या पायर्‍या टाकुन तरी आम्हाला काय फायदा? आम्ही केलेलं तुमच्या फोटोप्रमाणे होतच नाही ! Proud

छान रेसिपी!! माझी फेवरेट भाजी Happy मी आतला गर टाकुन न देता, तेलात परतुन मिक्सरमधुन इतर मसाल्यांसोबत वाटुन घेते, छान चव येते.

गेल्या वर्षि अमॄतसर ला एका पंजाबी मैत्रिणी च्या लग्नात हे भरवां टिंडे खाल्ले होते त्यात खवा घातला होता.प्रचंड आवडली होती हि डिश मला.आता घरी करुन बघायला हवी.

धन्स मंजुडी Happy कुणितरी लिहिल्यासारखं वाटत होतं म्हणून खुप शोधलं तर सापडलीच नाही चिनुक्स ची रेसिपी. Uhoh तो धागा पण सार्वजनीक नाहिये.