भयानक : भाग ५

Submitted by यःकश्चित on 6 November, 2011 - 06:17

भयानक भाग १
भयानक भाग २
भयानक भाग ३
भयानक भाग ४

------------------------------------------------------------------------------------------------

थोड्या वेळापूर्वीच नानांनी विश्वास हा दामलेंचा वारसदार असल्याचा गौप्यस्फोट केला होता, तरी विश्वासकडून काही नवी माहिती मिळवावी म्हणून मोहनराव काही माहित नसल्याचे दाखवत होते.

" पण मला असा वाटतंय की फार पूर्वीपासूनच नाना आणि तुमचा काहीतरी संबंध आहे. "

" काहीतरीच काय बोलताय मोहनराव. मी कसा काय ओळखेन नानांना ! तुमच्याकडूनच प्रथम मी नानांच नाव ऐकलं. नानांबद्दल तुम्ही जी काही थोडीफार माहिती दिली आहे, तेवढंच काय ते ओळखतो. आणि मी नानांना ओळखणार कसा ? कारण मुळात मी अजून नानांना भेटलोच नाहीये. "

हे शेवटचं वाक्य ऐकताच मोहनरावांना धक्काच बसला. घास खाण्यासाठी तोंडात घातलेला हात तोंडातच राहिला.

" अहो मोहनराव, काय पहाताय असे ? "

" तुम्ही पूर्ण शुद्धीत आहात ना ? ", मोहनराव भानावर येत म्हणाले, " असे काय बोलता आहात तुम्ही ! मगाशी नाही का आपण दोघे नानाकडे गेलो. तुम्ही तिथे नानांना भेटलात, मिठी मारलीत आणि गप्पाही मारल्यात. एवढंच नव्हे तर तुम्ही 'त्या'च्याविरुध्द लढायचं ठरवलंत. "

विश्वासच्या चेहऱ्यावर भलं मोठ्ठं प्रश्नचिन्ह दिसत होतं. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून मोहनरावांना कळत होतं की त्याला काही आठवत नसावं. मोहनराव त्याला आठवून द्यायचा प्रयत्न करत होते. पण त्याला काहीच आठवत नव्हत.

" अहो विश्वासराव आठवतं का तुम्हाला, आपण दोघे नानाकडे गेलो होतो. जाता जाता तुम्हाला चक्कर आली मग - "

" तुम्ही माझ्या चेहऱ्यावर पाणी मारलंत. ", विश्वास मोहनरावांचे वाक्य तोडत म्हणाला, " मग मला शुद्ध आली. तुम्ही मला तुमच्या खोलीत आणून झोपवलं. मग तुम्ही थोड्या वेळासाठी बाहेर गेलात. मी झोपेतून उठलो तेंव्हा तुम्ही आधीच येऊन आरामखुर्चीत झोपला होतात. मी तुम्हाला उठवलं आणि आपण जेवायला आलो. आता मला सांगा, आपण कधी भेटलो नानांना ? "

मोहनरावांना काय बोलावं तेच कळेना. विश्वासला काहीच आठवत नव्हते. मोहनराव परत एकदा त्याला काही आठवतं का बघू लागले.

"अहो विश्वासराव, डोक थोडं शांत ठेवा. एकदम रीलॅक्स व्हा, एक दीर्घ श्वास घ्या आणि डोक्याला थोडासा ताण देऊन बघा. काही आठवतं का. "

ते दोघे दोन मिनिट शांत होते. विश्वास पुन्हा पुन्हा आठवून बघत होता, काही आठवतंय का, पण काहीच आठवत नव्हतं. त्याने मोहनरावांकडे पाहिले. ते विश्वासला काही आठवेल अशा अपेक्षेत होते. तसं त्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होतं. खूप प्रयत्न करूनही काहीच आठवेना झाल्याने विश्वास मोहनरावांना म्हणाला,

" नाही हो मोहनराव , काहीच आठवत नाहीये. आपण नानांकडे गेलोच नाही तर कसे आठवेल. मला चक्कर आल्यावर आपण परतलो. "

" विश्वासराव आपण एक काम करुया. सध्या जेवताना डोक्याला ताण नको. जेवण झाल्यावर आपण निवांतपणे नानांकडे जाऊया. तिथे गेल्यावर काय ते कळेलच. "
विश्वासने नुसतीच मान डोलावली आणि तो जेऊ लागला.

*****

दोघेही जेवण आटोपून मधल्या खोलीत आले. एक मोठी ढेकर देत मोहनरावांनी विश्वासला चालायची खुण केली. तसा विश्वास त्यांच्या पाठोपाठ चालू लागला. ते वरच्या मजल्यावर आले. ते आता तिथून चालत होते जिथे विश्वासला चक्कर आली होती. ती जागा पाहून विश्वास मोहनरावांना म्हणाला,
" हीच ती जागा, जिथे मी बेशुध्द झालो होतो आणि इथूनच आपण परतलो होतो."

मोहनराव काहीच बोलले नाहीत. कारण काही बोलूनही फायदा नव्हता. विश्वासला काहीच आठवत नव्हते. नानाकडे गेल्यावर या प्रश्नांचा सोक्षमोक्ष लागणार होता. तसं पाहिलं तर तिथेसुद्धा हा प्रश्न सुटण्याची शाश्वती नव्हती. कारण नाना सध्या नॉर्मल असतील का किंवा त्यांना कधी झटका येईल हे सांगता येत नव्हते. जर का नाना अजून मगाशीच्या झटक्यातून बाहेर आले नसले तर रिकाम्या हाताने परत फिरावे लागणार होते. सारं अनिश्चित होतं.

मोहनराव विचार करत होते. इतक्यात विश्वास काही विचित्र आणि वेड्यावाकड्या हालचाली करू लागला. कदाचित तो या जागेचा प्रभाव असेल पण यावेळी त्याला चक्कर आली नव्हती तर तो दारू पिऊन झिंगलेल्या माणसाप्रमाणे इकडे तिकडे करत होता. तो वाकड्या चालीने जाऊ लागला. अचानक तो उलट फिरला आणि माघारी जाऊ लागला. मोहनराव त्याला अडवत होते पण तो मात्र कसाही कुठेही जात होता.तो अगदीच विचित्रपणे वागू लागला होता. मोहनरावांना काही कळत नव्हते.

हा असं का वागतोय ? याच ठिकाणी याला असे काही का होते ? या जागेचा काही प्रभाव त्याच्यावर पडत असावा का ? असं काय होतं त्या जागेत ? मागच्या वेळी तो इथेच बेहोश झालं होता. यावेळी पुन्हा इथेच ?

मोहनराव विश्वासची विचारपूस करीत होते. त्याला समजावून सांगत होते की आपल्याला नानाकडे जायचं आहे तुम्ही इकडे उलट दिशेने कुठे जात आहात ! पण विश्वास आपल्याच तंद्रीत होता. आजूबाजूला काय चालू आहे , कोण काय बोलताय याकडे त्याचं लक्षच नव्हतं. तो काहीच ऐकेना म्हणून मोहनरावांनी विश्वासला नानाच्या खोलीकडे जबरदस्तीने ओढत न्यायचे ठरवले आणि त्यांनी विश्वासच्या दंडाला पकडले. विश्वासने मोहनरावांकडे पाहिले. त्याचे डोळे लालभडक झाले होते. नजरेत एक प्रकारचा अंगार होता. अशा रुपात मोहनराव विश्वासला प्रथमच पाहत होते. त्या अंगारपूर्ण नजरेने आधी ते जरा बिचकले पण मग ते विश्वासला तसेच ओढू लागले. विश्वास जागचा हलेना म्हणून त्यांनी अजून थोडा जोर लावला , तोच विश्वासने त्यांना जोरात ढकलून दिले. जवळपास पाच-सहा फुटावर असलेल्या भिंतीवर मोहनराव जाऊन आदळले. त्यांच्या कपाळाला मार लागला आणि रक्त बाहेर आले. पण त्याकडे त्यांचे लक्षच नव्हते. ते विश्वासला अडवण्याच्या प्रयत्नात होते.

विश्वास अजूनच वेड्यासारख वागू लागला. तोंडाने चित्रविचित्र आवाज काढत तो ओरडू लागला. त्याचा आवाज राक्षसी आणि घोगरा बनला होता. त्याचा आरडाओरडा ऐकून खालच्या मजल्यावर घरातले सारे जमा झाले. हा काय प्रकार चालू आहे हे त्यांना समजत नव्हते. नुसते माना वर करून ते या प्रकाराकडे पाहत होते. मोहनरावांनासुद्धा काय करावे ते सुचेना. थोडी हालचाल केली की विश्वास ओरडायला लागायचा. त्यामुळे ते ही काही करू शकत नव्हते. त्यांच्या मनात विचार आला , ' नानांना हाक मारुयात का ! जर का ते नॉर्मल असतील तर ते काही करू शकतील. पण ते बाहेर आले अन् विश्वासनी काही उलटसुलट केलं आणि नानांना काही केलं तर... नको नको त्यापेक्षा नानांना न बोलावलेलच बरं. ' या बाबतीत मोहनरावांची द्विधा मनस्थिती झाली होती.

आपणच काही करावे म्हणून ते उठले आणि सावधपणे विश्वासकडे सरकू लागले. त्यांना आपल्याकडे येत असलेलं पाहून विश्वास अजून आरडाओरडा करू लागला. मोहनरावांना पाहून तो ' इकडे येऊ नको, आहे तिथेच थांब ' असे ओरडू लागला. त्यामुळे मोहनराव आहे तिथेच थांबले. शेवटचा एक प्रयत्न म्हणून मोहनरावांनी शेवटी नानांना बोलावयाचे ठरवले. ते नानांना हाक मारणार इतक्यात नानाच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि ' काय गोंधळ लावला आहे ? ' असे म्हणत नाना खोलीच्या बाहेर आले. आवाजाच्या दिशेने त्यांची नजर गेली आणि तोंडातून शब्द बाहेर पडले,

" विश्वाsssss थांब..."

विश्वासने आपले लालभडक डोळे नानावर रोखले आणि मगाशीच्या घोगऱ्या आवाजात तो ओरडला,
" तू आत हो.."

नानांनी एकदा त्याच्याकडे पाहिले, त्याचं ते विचित्र रूप पाहिलं आणि ते खोलीत निघून गेले. नानांच्या येण्याने आनंदी झालेले मोहनराव नानाच्या खोलीत परत जाण्याने हताश झाले. मोहनराव चकित होऊन विश्वासकडे पहात होते कारण त्याने नानांना चक्क एकेरी संबोधले होते. तेवढ्यात त्यांच्या कानावर ' नको नको ' असा आवाज आला. त्या आवाजाने भानावर येत मोहनरावांनी विश्वासकडे पाहतो तो काय ! विश्वासने एक पाय कठड्यावर टाकला होता आणि खाली उभे असलेले ' नको नको ' म्हणून ओरडत होते.
विश्वास हळू हळू कठड्यावर भार देऊन अंग वर उचलत होता. कोणत्याही क्षणी तो खाली उडी टाकण्याच्या बेतात होता. हे पाहून मोहनराव जोरात ओरडले , " थांबा विश्वासराव ".
विश्वासने मोहनरावांकडे लक्ष न देता आपले अंग अजून थोडे वर उचलले. मोहनराव आणि खाली उभे असलेल्या साऱ्यांची धडधड वाढली.

मोहनरावांना आता विश्वासला इकडे आणून आपण चूक केली कि काय असे वाटू लागले. आपण उगाच इकडे आणले विश्वासरावांना. आता जर का त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर आपण त्याला जबाबदार ठरणार. त्यांची पत्नी तिकडे वाट बघत असेल आणि इकडे हे प्रकरण भलतीकडेच जात आहे. या साऱ्याला मीच कारणीभूत आहे. जर का विश्वासला इकडे आणला नसता तर हे काही घडलंच नसतं.

असा विचार करत असतानाच " विश्वाssss " अश्या आवाजाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. नाना " विश्वा " असं ओरडत विश्वासकडे येत होते. ते विश्वासपासून हातभर अंतरावर उभे राहिले आणि पुन्हा एकदा ते जोरात ओरडले, " विश्वास थांब ".
विश्वासने मान वळवून नानांकडे तुच्छतापूर्ण नजर टाकली. त्या नजरेतही एक प्रकारचा अंगार होता. डोळे अजून लालभडक होते. पण नानांनी तिकडे लक्ष न देता त्याच्या चेहऱ्यावर कसलीशी विभूती टाकली. तापमापीचा पारा उतरावा तसा त्यांच्या चेहऱ्यावरील तो अंगार झटकन उतरला आणि विश्वास कावऱ्याबावऱ्या नजरेने तो इकडे तिकडे पाहू लागला. कठड्यावर टाकलेला पाय त्याने काढला आणि साऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

*******

ते तिघे नानाच्या खोलीत बसले होते. खोलीत एक प्रकारची शांतता पसरली होती. थोड्यावेळापुर्वी जे घडलं होतं ते नक्की काय होतं याचा विचार करत होते.

" आता काय करायचं ? ", मोहनरावांनी नानांना प्रश्न केला. विश्वासने नानाकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती. कपाळाला आठ्या घालून दीर्घ सुस्कारा सोडत ते म्हणाले,

" आता आपल्या हातात काहीच राहिले नाही. या खेळाची सारी सूत्रे त्याच्याकडे गेली आहेत. आधी तर तो शक्तिशाली झाला आहे आणि त्यात आपल्याकडे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काहीच नाहीये. "

" त्यादिवशी विश्वासराव म्हणाले ना की आपण 'त्या'च्याशी लढूया. त्यांच्या बोलण्यात केवढा आत्मविश्वास होता. मग आता तुम्ही असे का बोलताय ? विश्वासराव तुम्हीपण बोला ना काहीतरी ", मोहनराव विश्वासकडे पाहत म्हणाले.

" तो काहीच बोलणार नाही. त्यादिवशी तो बोलला खरे पण आता तो काहीच बोलू शकणार नाही. किंबहुना त्याला ते आठवणारही नाही. काय विश्वास ? "

त्यांनी विश्वासकडे बघितले. तो प्रश्नार्थक मुद्रेने दोघांकडे बघत होता. त्याने मोहनरावांना विचारलं,
" तुम्ही जेवताना बोलत होतात त्याचबद्दल नाना बोलत आहेत का ? "
मोहनरावांनी डोळ्यानेच होकार दिला. त्यांच्या एका प्रश्नाला आता उत्तर मिळणार होते.
" हो नाना , मगाशी जेवताना मी यांच्याशी बोललो पण त्यांना काहीच आठवत नव्हतं. का बरे आठवत नाहीये विश्वासरावांना ? "

नानांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली,

" आता सारे काही सांगायची वेळ आली आहे. तू थोड्या वेळापूर्वी म्हणालास ना की मी मधूनच विचित्र वागतो आणि आजारी होतो मग बरा कसा काय झालो. खरंतर मी आजारी कधी नव्हतोच आणि आत्ताही नाहीये. "

नानांना काहीतरी होऊ लागले. ते चेहरा वेडावाकडा करू लागले. ते पाहून मोहनराव आणि विश्वास त्यांच्याकडे जाण्यासाठी उठले, तोच नानांनी त्यांना बसायची खुण केली आणि तसेच बोलू लागले,

" मोहन, आता मी सांगतो तसं कर. ज्या काही अनाकलनीय घटना घडत आहेत त्याचा जास्त विचार करत बसू नकोस. विश्वासच्या जीवाला इथे धोका आहे. विश्वासला शहरात त्याच्या घरी सोडून ये आणि चुकूनही परत इथे आणू नकोस. आता जे काही होईल ते हातावर हात ठेऊन बघण्याशिवाय काही पर्याय नाही. आता निघा दोघे. मी माझी काळजी घेईन. विश्वास तूही काळजी घे स्वतःची. "

त्या दोघांनी उठून नानांना नमस्कार केला आणि दरवाज्याकडे गेले. दरवाज्यातून वाकून त्यांनी नानांकडे पाहिले. नाना डोकं धरून बसले होते. दोघे तसेच पुढे गेले.ते जिन्यात असतानाच नानाच्या खोलीचा दरवाजा जोरात बंद झाल्याचा आवाज झाला.

******

दुपारचे पाच वाजले होते. विश्वासला त्याच्या घरी सोडण्याची जबाबदारी नानांनी मोहनरावांवर सोपविली होती. दोघेही नुकतेच झोपेतून उठले होते. दिवसभराच्या तणावामुळे पडल्यापडल्या झोप लागली होती. दोघांनी तोंड धुतले, चहा घेतला आणि ते शहराकडे जाण्यास निघाले. मोहनरावांनी बाहेरूनच ' शहरात विश्वासरावांना सोडून येतो ' असे ओरडून सांगितले. ते ऐकून नाना खोलीतून बाहेर येऊन सज्जात कठड्याला रेलून उभे राहिले. त्यांनी दोघांना ' काळजी घ्या ' असे सांगितले आणि हाताने टाटा केले.

दोघांनी चपला घातल्या. वाड्याच्या मुख्य दरवाजाकडे वळाले आणि दरवाज्यात उभ्या असलेल्या दोन पायांवर त्यांची नजर खिळली.

क्रमशः

गुलमोहर: 

वाचकहो, माफ करा .
मी मागे म्हटल्याप्रमाणे यात रहस्यांचा गौप्यस्फोट आणि धुमाकूळ नाहीये कारण काही कल्पना मला अचानक सुचल्या त्यामुळे मी कथा जरा लांबवली.
तुमच्या अपेक्षांची पुरती मी पुढच्या भागात नक्की करेन.
पुनःश्च क्षमस्व......

next

कथा पाहीजे तेव्हढी लांबवा हो..........
फक्त भाग रोज टाका हो...>> अनुमोदन.
आणी अगदीच रोज नाही तरी नियमीत टाका.

like it!

मला तर आवडलीये खुप. आता ते दोन पाय म्हणजे तो जो कुणी आहे तो विश्वासरावांना गावाबाहेरच काय कदाचित घराबाहेरही पडू देणार नाही.

काय हे????????????????????
अजूनही क्रमशः Sad
लवकर येवुद्या पुढचे भाग

@टोकूरिका : मला तुमचा गेस आवडला ... पण ते तसं नाहीये

@ अनुसया : विश्वासचे दोन पाय विश्वासलाच कसे दिसतील हो ...?

by the way छान गेसेस करता तुम्ही...दोघींचेही गेसेस फार आवडले मला....

@टोकूरिका : 'तो' जो कुणी आहे...तो या गावात कशाला बरे येईल...? तो तर त्या जंगलातल्या गुहेत गेलाय ना ? भाग २ ची सुरुवात विसरलात वाटत .......

इथे ३-४ हॉरर ईश्टोरी चालु आहेत. त्यामुळे माझा सारखा घोळच होतो, ह्याचे त्याला व त्याचे ह्याला. Happy

वाचत आहे.

प्रणव_देशमुख | 8 November, 2011 - 08:24 नवीन
@निलिमा : मोरपिस म्हन्जी काय वो ?

>> नंदिनीला विचारा Happy

@नक्षी : लय भन्नाट...राव ...तुम्हाला आणि तुमच्या तर्कशक्तीला माझा नुसता सलाम नाही दंडवत....

Pages