सणांचे नैवेद्य/फराळ ४) ऋषीपंचमी - पायनू भाजी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 September, 2011 - 07:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

ह्या भाज्यांना प्रमाण असे नसते. मिळतील तेवढ्या घ्यायच्या.
१) भेंडी
२) काकडी
३) अळूची पाने
४) कवळा
५) टाकळा
६) शिराळ
७) घोसाळ
८) दुधी भोपळा
९) डांगर भोपळा
१०) माठाचा पाला व भाजे म्हणजे जाड देठे
११) सुरणाची देठे
१२) दिंडयाची देठे
१३) करांदे
१४) कारले (एक किंवा कारल्याचा एखादा तुकडा जास्त घेउ नये.)
१५) मायाळूची पाने
१६) ओव्याची पाने
१७) मिरची
१८) मका
१९) शेवग्याचा पाला
२०) सातपुती
२१) नारळ (खरवडून)
२२) चिंचेचा कोळ
२३) दही
२४) मिठ

फोटो मध्ये मला जेवढ्या मिळाल्या तेवढ्या भाज्या आहेत. वरील सगळ्या नाहीत.

क्रमवार पाककृती: 

वरील १ ते २० पर्यंतच्या सर्व भाज्या धुवुन त्यांचे तुकडे करावेत. पालेभाज्या चिरुन घ्याव्यात व भांड्यात सगळे एकत्र करावे.

थोडेसे पाणी टाकुन झाकण देऊन शिजत ठेवावे. भाज्या शिजल्या की त्यात मिठ, खवलेला नारळ, चिंचेचा कोळ घालावा. हे मिश्रण थोडावेळ उकळवुन मग त्यात शेवटी दही घालावे व पुन्हा ५ मिनीटे ठेवुन गॅस बंद करावा.

ही घ्या.

वाढणी/प्रमाण: 
तुमच्या आवडीवर आहे.
अधिक टिपा: 

स्वकष्टाने केलेले तसेच बैलाचे कष्टाचे नसलेले असे अन्न ऋषीपंचमीचे उपवास धरणारे भक्त सेवन करतात. त्या सेवन करण्यासाठी लागणार्या घटकांना आमच्याकडे पायनू भाज्या असे म्हणतात. म्हणजे वरील भाजीला पायनू भाजी, पायनू भात, पायनू भाकरी असे म्हणतात. पायनु पोहेही करतात. पुर्वी ह्यात तथ्य होते पण आता स्वकष्टाने लावलेल्या भाज्या म्हणुन शेतीलागवडीतील भाज्याच विकायला येतात. त्याच घेउन ऋषीपंचमीची श्रद्धा मनात ठेउन ही भाजी केली जाते. शेवटी श्रद्धेला महत्व आहे.

ह्या दिवशी कुत्र्याचे तोंड पाहण्याचे टाळतात. ग्रामिण भागात पहाटेच्या अंधारातच स्त्रिया नदिवर अंघोळीसाठी जातात डोक्यावर कापड (बुरखा) ठेउन आणि घरातही तशाच येतात कुत्रा दिसू नये म्हणून. मग आल्यावर पुर्ण दिवस पायनू पदार्थांचे सेवन केले जाते. ह्यामागे पुर्वीची काही कथा असावी.

आमच्या घरात उपवास वगैरे नसतो पण ही भाजी सगळ्यांनाच आवडते म्हणून मी करते. फक्त ह्याच दिवशी नाही तर मधुन मधुन करते. डिमांडच असते ह्या भाजीसाठी आमच्या घरात.

दिसायला ही भाजी तुम्हाला कशीतरी वाटेल पण खरच ही बिनफोडणीची पौष्टीक आणि चविला अप्रतिम अशी भाजी लागते. माझ्या मुलीला ह्यातील मके आणि भाजी दोन्ही आवडतात.

भाजीत जास्त पाणी घालु नका चव जाते.

भेंड्यांचे प्रमाण जास्त असेल तर अजुन चांगली लागते.

वरच्या भांड्यात दिसते त्याच्या अर्धी होते ती अळून. त्यानुसार तुमचे प्रमाण ठरवा.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वत्सला, माधव Happy

काही ठिकाणी दही नाही वापरत जर सोवळ्याप्रमाणे केल तर. पण दह्याने छान चव येते. थोडी साखर टाकुनही चांगली चव येते.

जागू, तुझ्याकडून बर्‍याचप्रकारच्या नैवद्यांची तसेच सणांची छान माहिती मिळणार आम्हाला. Happy

ह्या भाजीतल्या बर्‍याच भाज्या माझ्या आवडीच्या असल्याने मला नक्की आवडणार ह्याची चव. Happy
आमच्याकडे अशी भाजी केल्याचे नाही पाहिले कधी.

आमच्याकडे आजी करायची हा उपवास. सकाळी पाटाला (कॅनल) पाणी असेल तर सगळ्या बायका तिकडे जायच्या आंघोळीला. नाहीतर मग आमच्या विहिरीवरच्या थारोळ्यात आंघोळ. मग पुजा.
दिवसभर बैलांच्या श्रमाचे काही खायचे नाही, गायीचे दुध पण नाही, त्यादिवशी फक्त म्हशीच्या दुधाचा चहा. आजी त्या दिवशी म्हशीचे दुध डेअरीला देत नसे, आजूबाजूच्या बायकांना ते देत असे.

व्वॉव tongue0022.gif त्या टोपातलं मला पुरणार नाही....

पण खरच ही बिनफोडणीची पौष्टीक आणि चविला अप्रतिम अशी भाजी लागते. >> हो, आणि गरम असतानाच घेतली तर आणखी छान लागते.

अज्जीची आठवण आली.... Happy

आमच्या घरी बनते ही भाजी दरवर्षी.
ऋषीपंचमीला ती लांब खोडवाली भाजी लाल जांभळ्या रंगात सुध्द्दा येते (तिला आम्ही ऋषीची भाजीच म्हणतो)
कशी बनते ते माहीत नव्हते फक्त भकाभका ढकलायचंच माहीत होतं...... Proud

आज कळलं सोप्पी आहे रेसिपी ते, धन्स जागुतै... Happy

एका ऋषीने भूक लागली म्हणून कुत्रा खाल्ला होता तो संदर्भ आहे.

माझी अत्यंत आवडती. एकटा असलो तरी करतो (आणि मग ती आठवडाभर खावी लागते. पण तरिही आवडते.)

जागु , माझ्या माहेरी बनवतात हि भाजी ऋषीपंचमीला . पण त्यात दहि नाही टाकत ,चिंच टाकतात .
त्या सेवन करण्यासाठी लागणार्या घटकांना आमच्याकडे पायनू भाज्या असे म्हणतात>>>> आमच्याकडेहि याभाज्यांना पायनू भाज्या म्हणतात. Happy

मस्त भाजी आहे गं जागु. चवीला चांगली लागत असणार.

बैलांच्या श्रमाचे म्हटले की मला दूरदर्शनचे चिमणराव-गुंड्याभाऊ आठवतात. ऋषिपंचमीच्या दिवशी चिमण बाजारात भाजी आणायला जातो. भाज्यांनी भरलेल्या त्या टिपिकल कापडी पिशव्या घेऊन घरी येतो आणि झोपाळ्यावर धापा टाकत बसतो. काऊची मैत्रिण गुलाब आलेली असते. ती चिमणला धापा टाकताना बघुन म्हणते, 'ह्या भाज्या चालायच्या नाहीत आज नैवैद्याला.' चिमणला काही कळत नाही भाज्यांना काय झाले ते. तेव्हा ती स्पष्टीकरण देते की 'भाज्या आणायला तुम्हाला एवढे श्रम घडले आणि ऋषिपंचमीला तर बैलांच्या श्रमाचे अजिबात चालत नाही......' चिमणच्या चेह-यावर प्रचंड राग...

साधना Lol
चातक ती लांब खोडवाली म्हणजे लाल माठाचे जाडे देठ.

नुतन आपल्या बहुतेक रिती रिवाज सारखेच आहेत मला वाटत.

दिनेशदा मला वाटत हसरीने ती कथा टाकली असेल.

मी चिचेंऐवजी अंबाडी( फळे) टाकते.भाजीत पाणी नाही घालत.पानात वाढल्यावर बाकीचे त्यावर दही घालून खातात.या भाजीसोबत तांदळाचे वडे असतात.

मस्तच.

माझी आई फार सुंदर करते ही भाजी. असं वाटतं भाजीच खावी फक्त बाकी काही नको. आई कणीस नाही टाकत पण नालासोपाऱ्याला आमच्या शेजारच्या वाहिनी कणीस टाकायच्या तीपण आवडायची मला.

छान झाली होती

लाल माठाला पाणी भरपूर सुटले, एक वाटी पाणी काढून सूपसारखे पिऊन टाकले, मस्त होते.

SAVE_20210912_241249.jpegSAVE_20210912_241301.jpegSAVE_20210912_241312.jpegSAVE_20210912_241323.jpeg

( कणिस घालणे अगदी मस्ट आहे , त्यामुळे बाकी चोथा खावासा वाटतो. Proud )

अरे वा छानच दिसतेय. लोकांना ही भाजी बघून खावीशी वाटत नाही पण ही खरच इतकी टेस्टी लागते आम्ही तर नुसती पण खातो.

आम्ही सिमला मिरची, घेवडा, वांगी टाकत नाही. तुम्ही टाकलीत त्यामुळे त्याला अजून वेगळी चव आली असणार.

हो चांगले केलेत. जास्त पालेभाजीचा आणि भेंडयांचा वापर करायचा त्यामुळे भाजी चांगली मिळून येते.

आमच्याकडे पण करतात. पण मला ही दिशाहीन भाजी वाटते. ना धड पालेभाजी, ना फळभाजी, ना अजून काही.. काही लोकांना खूप आवडते आणि काहीना अजिबात नाही.. बायनरी भाजी आहे.. Happy

मस्त लागते. आमच्याकडे खडे मीठ वापरतात. नेहमीचं मीठ नाही चालत. का माहिती नाही. भाज्या, मिरच्या हे सगळं घरीच पिकवलेले. भात पण वेगळा. तांदूळ हाताने नांगरून शेती केलेले. बैलाने नांगरलेले नाही. आता गावाकडे बैल वगैरे फार राहिले नाहीत. आता लोक ट्रॅक्टरच वापरतात.