भोपळ्याचा कोरोडा

Submitted by मृण्मयी on 18 September, 2011 - 10:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लाल / तांबडा भोपळा सालासगट, किसून साधारण ५ वाट्या
३ हिरव्या मिरच्या - चिरून
७-८ लसूण पाकळ्या
दोन पेरं आल्याचा तुकडा
भरपूर कोथिंबीर
पळीभर तेल
हिंग
मोहरी
हळद
तिखट
मीठ
धणेपूड -चमचाभर
डाळीचं पीठ - वाटीभर.
भाजलेल्या तीळ-दाण्याचा कूट (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

*तेलाच्या फोडणीत आधी चमचाभर कीस घालून त्यावर आलं लसूण वाटणाची गोळी आणि हिरव्या मिरच्या घालून परतायचं.
* वाटणाचा ऊग्र वास गेल्यावर यात हळद, तिखट, मीठ आणि धणेपूड घालून पुन्हा परतून घ्यायचं.
* (तीळ-शेंगदाणे कूट घालायचा असेल तर तो आता घालायचा.)
* उरलेला कीस घालून पुन्हा एकदा व्यवस्थीत परतून कीस-मसाले मिसळून घ्यायचे.
* झाकण न ठेवता भोपळा शिजून द्यायचा. सुटलेलं पाणी आटू द्यायचं.
* भोपळा शिजला की यात आता डाळीचं पीठ भुरभुरवून एकत्र करायचं.
* पुन्हा एकदा झाकण न ठेवता दणदणीत वाफ येऊ द्यायची.
* कोथिंबीर घालून १-२ मिनिटं परतलं की कोरोडा तयार.

bhopaLyacha-koroDaa-maayboli.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांपुरता
अधिक टिपा: 

* मीठ घालताना जपून घालायचं. कारण भोपळ्याचा कीस शिजून अर्धा होतो आणि न शिजलेल्या किसाच्या अंदाजानं मीठ घातलं तर खारट होऊ शकतं.

* डाळीचं पीठ आधी खमंग भाजून घेतलं तर चांगली चव येते. पण भाजलं नाही तरी बिघडत नाही.

* भोपळा मुळातच गोड असल्यामुळे यात जराही साखर-गूळ घालायची गरज नाही.

*भोपळा अती गोड असेल तर वरून जरासं लिंबू पिळावं किंवा आमचूर पावडर घालावी

माहितीचा स्रोत: 
आई
आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीनच पाककृती ऐकली मृणमयी. छानचं आहे.
भोपळ्याचे पिठले असं काहीतरी वाटतयं.
आता बरेच भोपळे येतायेत त्यामुळे ट्राय करायला भरपूर
चांस आहे.

मला लाल भोपळा अजिबात आवडत नाही. पण अशा पद्धतिने आवडेल असं वाटतयं. करून बघते आवडतोय का Happy
धन्यवाद, मृ.

मस्तच ! माझ्या सासूबाई अशाच पद्धतीने काकडीचं कोरडं सुद्धा करतात . ते सुद्धा मस्त लागतं Happy .

मस्तच गं मॄ. तू मागे अशाच पद्धतीने काकडीचा ( की झुकिनीचा ? ) कोरोडा पण सांगितला होतास ना ? तेव्हा तो करुन पाहिला होता. मस्तच लागला होता Happy
बटरनट स्क्वॉश घेतला तरी सालासकट घ्यावा का ? बटरनटचे साल खातात का ह्याची कल्पना नाही म्हणून विचारले.

मृण्मयी, वेगळीच पाकृ आहे. करुन बघिन. मला असाही लाल भोपळा आवडतोच. संपदा म्हणते तशी काकडीची ही करुन बघायला पाहिजे.

भोपळा आवडतो, पण सालीसकट किसायचा? Uhoh

मी साल काढून किसून घेतला तर चालेल का? कसा लागेल? (खरंच विचारतेय.)

धन्यवाद मंडळी.

>> तू मागे अशाच पद्धतीने काकडीचा ( की झुकिनीचा ? ) कोरोडा पण सांगितला होतास ना ?
व्हय जी! याच पध्दतीनं काकडीचा कोरोडा होतो. पण काकडीला भोपळ्यापेक्षा जास्त पाणी सुटतं, त्यामुळे बराच वेळ परतंत बसावा लागतो. बटरनट स्क्वॉशचा कधी करून बघितला नाही. पण वाईट कशाला लागतोय? त्याचं सूप करताना साल काढलं होतं.

>>>कुठल्या भागातला आहे ?
माझ्या माहितीनुसार विदर्भातला. वैदर्भीय दिसेल त्या भाजीत डाळीचं पीठ घालतात. काकडी, भोपळा, ढोबळ्या मिरच्या, पानकोबी, कांदे, कांद्याची पात, लसणाची पात, जवळपास सगळ्या पालेभाज्या, .. Proud

>>>खायचं कशाबरोबर ?
पीठ पेरलेल्या भाज्या ज्याच्याज्याच्याशी खाता येतात त्या सगळ्याबरोबर. घरी भातात घालून, वर तळलेल्या मिरच्यांची फोडणी घेऊन, किंवा लोणच्याचा खार घेऊन पण खातात.

>>>सालीसकट किसायचा?
हो. उत्तम लागतो. साल अगदी मऊ शिजतं.

अगो, बटरनटच्या सालाची काहीजणांना अ‍ॅलर्जी असू शकते.
>>> बापरे, हे माहीत नव्हतं. तसंही बटरनटचे साल बरेच कडक असते. साल काढूनच करुन बघेन.

कोरोडा कि कोरडा ?
माझ्या सासरी कोरडा म्हणतात.
भोपळ्याचा कोरडा कधी खाल्ला नाही , काकडीचा करते नेहेमी, पण खूप कोरडा नाही थोडा झुणका टाइप :).
काकडीचा स्वाद आणि हिंगाची फोडणी एकत्र स्वाद सही लागतो , बरोबर वर्‍हाडी ठेचा मस्ट.

ka.jpg

छान आहे रेसिपी मृण्मयी!! नक्की करून पहाणार!! मला वाटतं की जरा झणझणीतच जास्त छान लागेल. मी भोपळा सोडुन बाकी सगळे प्रकार नेहेमीच करते. थोडे तेल आणि तिखट जास्त घालते मी. हा पण प्रकार करुन पाहीन आता!!

डीजे मस्त फोटो.
मी पण ही रेसिपी पहिल्यांदा ऐकली. नक्की करुन बघणार. काकडीचा ही करुन बघेन.

डीजे, मस्तं फोटो. कोरोडा सात्त्विक दिस्तोय. फुलका पण आवडला. (गॅसवरचा का? )कांदा आणि वर्‍हाडी ठेचा तोंडीलावणं.. सही काँबो!

कोरडा/कोरोडा/कोरडं.. बरीच नावं आहेत.

अमया, हिरव्या मिरच्या वाटणात, सांडगी मिरची फोडणीत आणि लाल तिखट आलं-लसूण गोळीबरोबर असं घेतलं की भरपूर तिखट लागतो. (मग मातुर वर्‍हाडी ठेचा नको. :P)

थँक्स मृ,
हो, फुलका फ्लेम वाल्या गॅस वरचा ( सुजाता मल्टिग्रेन आटा.)

अमया, हिरव्या मिरच्या वाटणात, सांडगी मिरची फोडणीत आणि लाल तिखट आलं-लसूण गोळीबरोबर असं घेतलं की भरपूर तिखट लागतो. (मग मातुर वर्‍हाडी ठेचा नको. फिदीफिदी)
<< तों पा.सु बाहुली..

आमच्याकडे काकडीचा असा प्रकार करतात. थोडेसे ताकही घालतात ह्यात आंबटपणासाठी अन वरुन लसणाची खमंग फोडणी. सही लागतो तो प्रकार ! हा पण मस्त लागत असणार्,नक्की करुन पाहिन.
थॅंक्स, मस्त रेसिपी दिल्याबद्दल.
दीपांजली, फोटु मात्र सुरेख हं ! वर्‍हाडी ठेचा कसा केलास ?

आज मला अचानक आठवलं. आम्ही साधारण अशीच दोडक्याची भाजी करतो. ह-हि-मो च्या फोडणीत कडिपत्ता, हि मि घालायची. वरुन दोडक्याचा कीस, थोडी साखर घालून अर्धा कच्चा वाफेवरच शिजवून घ्यायचा दोडका. त्यात मग मीठ आणि दाण्याचा कूट. नीट हलवून पुन्हा एक वाफ काढायची की भाजी तयार. वरुन कोथिंबीर पेरायची. यम्मी Happy

हिवाळ्यात मुबलक भाज्या आल्या/ स्वस्त झाल्या की ज्या त्या भाजीचा कोरोडा / कोरड्यास करता येतं. आम्ही भोपळा, काकडी, पत्ताकोबी, फुलकोबी इ..चा केलेला आहे सिझनमध्ये. तेल अन तिखट जरा बर घालावं लागत पण. अन मीठ जपून लिहीलय ते अगदी बरोबर आहे.
गावाकडे करडईची पाने स्वहस्ते खुडून त्याची भाजी अथवा सॅलड (घोळाणा) करायचो ते आठवून तोंपासू झाले Happy

Pages