भोपळ्याचा कोरोडा

Submitted by मृण्मयी on 18 September, 2011 - 10:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लाल / तांबडा भोपळा सालासगट, किसून साधारण ५ वाट्या
३ हिरव्या मिरच्या - चिरून
७-८ लसूण पाकळ्या
दोन पेरं आल्याचा तुकडा
भरपूर कोथिंबीर
पळीभर तेल
हिंग
मोहरी
हळद
तिखट
मीठ
धणेपूड -चमचाभर
डाळीचं पीठ - वाटीभर.
भाजलेल्या तीळ-दाण्याचा कूट (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

*तेलाच्या फोडणीत आधी चमचाभर कीस घालून त्यावर आलं लसूण वाटणाची गोळी आणि हिरव्या मिरच्या घालून परतायचं.
* वाटणाचा ऊग्र वास गेल्यावर यात हळद, तिखट, मीठ आणि धणेपूड घालून पुन्हा परतून घ्यायचं.
* (तीळ-शेंगदाणे कूट घालायचा असेल तर तो आता घालायचा.)
* उरलेला कीस घालून पुन्हा एकदा व्यवस्थीत परतून कीस-मसाले मिसळून घ्यायचे.
* झाकण न ठेवता भोपळा शिजून द्यायचा. सुटलेलं पाणी आटू द्यायचं.
* भोपळा शिजला की यात आता डाळीचं पीठ भुरभुरवून एकत्र करायचं.
* पुन्हा एकदा झाकण न ठेवता दणदणीत वाफ येऊ द्यायची.
* कोथिंबीर घालून १-२ मिनिटं परतलं की कोरोडा तयार.

bhopaLyacha-koroDaa-maayboli.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांपुरता
अधिक टिपा: 

* मीठ घालताना जपून घालायचं. कारण भोपळ्याचा कीस शिजून अर्धा होतो आणि न शिजलेल्या किसाच्या अंदाजानं मीठ घातलं तर खारट होऊ शकतं.

* डाळीचं पीठ आधी खमंग भाजून घेतलं तर चांगली चव येते. पण भाजलं नाही तरी बिघडत नाही.

* भोपळा मुळातच गोड असल्यामुळे यात जराही साखर-गूळ घालायची गरज नाही.

*भोपळा अती गोड असेल तर वरून जरासं लिंबू पिळावं किंवा आमचूर पावडर घालावी

माहितीचा स्रोत: 
आई
आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे कसला सही होतो हा कोरोडा !! आत्ताच केला आणि लग्गेच फीडबॅक द्यायला आलेच. नवर्‍यला म्हटले तुमचा वेगळा विदर्भ दिसतोय , मला आधी कुणी सांगितली नाही ते ही रेसिपी Wink

छानच लागतो... हो हा विदर्भातला च प्रकार आहे... विदर्भात डाळीच्या पीठावर जास्त जोर असतो... तांदळाचेठ पीठ
कमी वापरतात...

आमच्या सी एस ए* कडून गेल्या महिन्याभरात वेगवेगळ्या प्रकारचे स्क्वाशेस अन भाराभार झुकिन्या येत होत्या. जवळपास दर आठवड्याला एकदा तरी या रेसिपीने कोरोडा झालाय. चिल्लर पार्टीने आवडीने खाल्लाय दरवेळेस. मी दाण्याचं कूट घातलं. आता परत कधी करेन तर तीळ + दाणे असं मिक्स करुन पहाणार.

* कन्युनिटी सपोर्टेड / सस्टेन्ड अ‍ॅग्रिकल्चर - दर आठवड्याला हापिसात भाज्या / फळे / अंडी / ब्रेड्स / मीट पोचवतात. मी भाज्या आणि फळे असा शेअर घेतलाय.

घरच्या झुकिनीच्या वेलाला दिन दुनी रात चौगुनी या हिशोबाने झुकिनी लागताहेत सध्या. शेजारी वाटून, ऑफिसमधल्या लोकांना देऊन देखील घरात कायम दोन तीन मोठ्या झुकिनी असतातच. आलटून पालटून कोरोडा, ग्रिल्ड झुकिनी आणि झुकिनीचे फ्रिटर्स करणे चालू आहे.
कोरोडा आणि ज्वारीची भाकरी एकदम हिट जोडी आहे !

Pages