शेवटचं वळण - "शेवटचे वळण, उडाली गाळण!"

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 3 September, 2011 - 03:56

अभिजीत वैतागून बसला होता. अजून चार वाजले पण नव्हते आणि दिग्दर्शक आझमी पॅकप करण्याची बात करत होता. बात करायला त्याच्या बाचं काय जातंय. चॅनलवाली काजल मॅडम आझमीला बडबडणार नव्हती. दिवसाभरामधे अवघे चार सीन शूट झालेले बघून काजलचा बीपी चारशेपर्यंत चढलाच असता.

"स्पॉट, एक चाय देना" अभिजीतने ओरडून सांगितले. अर्थात सेटवरचा गोंधळ इतका होता की कुणालाच ते ऐकू गेलं नसतं. तितक्यात सीरीयलची हिरविण मेनकामॅडम मेकप रूममधून बाहेर डोकावून गेलीच. टवळीला दुसर्‍या कुठल्याच सीरीयल मधे चान्स देत नाहीत पण म्हणून ही मुरकायचे नखरे काही कमी करत नाही...

इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. काजलमॅडम नाव मोबाईलवर दिसताच तो जवळ जवळ उडालाच.

"आता कशाला केला या बयेने फोन??" पुटपुटतच त्याने कॉल घेतला.

"अभिजीत." हॅलो वगैरे बोलायची पद्धती आता संपुष्टातच आलेली आहे. "कितना सीन हुआ?"

"काजल, आत्ता एक शिफ्ट संपलीये. पाचवा सीन चालू आहे. अजून दोन सीन होतील"

"रब्बिश, अजून चार सीन घ्यायला सांग त्या आझमीला. आणि लवकरच एक नविन कॅरेक्टर घालायचं सीरीयलमधे. त्याची बॅकग्राऊंड तयार करायला सांग आजच्या एपिसोडमधे" काजलने फोन कट केला.

अभिजीत हातातला फोन जवळ जवळ फेकूनच देणार होता. साला.. काय आयुष्य आहे आपलं... गेली पंधरा वर्षं या लाईनमधे स्ट्रगलच स्ट्रगल केला आणि आता कुठे जरा चांगली पोझिशन मिळत होती तर ही बया आणून बसवली आपल्या डोक्यावर. बँकग्ग्राऊंड कोण बनवणार? रायटर की डिरेक्टर? आणि कोण कॅरेक्टर? बुवा आहे का बाई ते तरी सांगायचे कष्ट घ्यायचे होते. इतक्यात स्पॉटने चहाचा कप आणून दिला.

"साब, आता काय करायचं?" आझमी त्याच्या बाजूच्या खुर्चीत बसत म्हणाला.

"नेक्स्ट सीन. काजलमॅडमचा फोन होता, पुढचे पण सीन घेऊन टाक."

आझमीने त्याच्याकडे दयाद्र नजरेने पाह्यलं. एखाद्या लहान बाळाला गणित समजावल्यासारखा बघत तो म्हणाला.
"आता सगुणाच्या लग्नाचा सीन घेतला. पुढचा सीन रायटरने सगुणाच्या एक्स बॉयफ्रेंड जेलमधून पळून जातो असा घेतलाय. सेट डीझायनरवाल्याने बंगल्याचाच सेट अजून चार दिवस कायम ठेवायचा ठरवलाय. आता मी काय करू?"

अभिजीत हसला. काय करू म्हणून मलाच काय विचारतोस?

"सगुणाच्या बिदाईचा सीन घेऊन टाक."

"पण रायटरने तो सीन अजून दिला नाहिये"
अभिजीत मूग गिळल्यासारखा चहा प्यायला. अरे साल्या बिदाईच्या सीनला रायटर लागत नाय रे. बादलीभर ग्लिसरीन लागतं... सांग कधी कळणार तुला...

सांग कधी कळणार तुला.. अभिजीतच्या मनामधे गाण्याची धून आपोआप वाजायला लागली.

भाव माझ्या मनातला... आज तरी ती येइल का सेटवर.. हा एकच प्रश्न सतत त्याच्या मनामधे नाचत राहिला. खरंतर जेव्हापासून तिला बघितलं होतं तेव्हापासून त्याच्या मनामधे तिच्यासाठी पुष्कळ गाणी वाजून गेली होती. अगदी त्याच्या मनाचा एफेम रेडिओ झाला होता. सावरी..सावरी... सावरी...जेव्हापासून तिला बघितलं होतं तेव्हापासूनच...

सावरी. आसावरी चित्तरंजन. त्याच्या प्रोड्युसरची मुलगी. अभिजीत भानावर आला. हे प्रकरण आपल्या हातामधले नाही हे त्याला कधीच समजलेले होते. पण काय करणार दिल है के मानता नही... टणॅव, टणॅव...

खरंतर सावरीबद्दल अभिजीतच्या मनात हा विचार यायला आणि सेटवर एक पॉश इंपोर्टेड गाडी येऊन थांबायला एकच वेळ झाला. त्याचबरोबर एक सुगंधाची लकेर सर्व आसमानात पसरली. आणि सावरी गाडीतून खाली उतरली.

अभिजीतचे हृदय जागच्याजागी टणाटणा उड्या मारू लागले. सावरी मेकप रूममधे जाईस्तोवर अभिजीत नजरेने तिचा पाठलाग करत होता.

"आता ही बघणार आहे ही सीरीयल." आझमी म्हणाला. अभिजीतला भानावर यायला अजून पाच क्षण गेलेल. "म्हणजे तो जाड्या येणार नाही रोज?"

"नाही, तो वेगळी सीरीयल बनवतोय, मारूती जमादार डिरेक्टर घेतलाय." आझमी म्हणाला. मारूती जमादारने या आधी ओळीने चार पिक्चर सुपरडुपर फ्लॉप दिलेत.

तितक्यात मेकपरूमाम्धून अभिजीतला बोलावणे आले. सावरी तिथेच असेल या उद्देशाने त्याला भरपूर उत्साह आला आणि तो नाचत नाचत मेकपरूममधे गेला.

"अहो, ऐकलं का?" सावरीच्या या वाक्याने अभिजीत सुपरमॅनसारखा उडाला. त्यानंतर त्याच्या लक्षात आलं. सावरीला कॉन्व्हेंट मराठी येत आणि आपलं नाव तिच्या लक्षात नसल्याने तिला आपल्याला अशी आदरार्थी हाक मारलेली आहे. "मेनका कायतरी म्हणतेय. तुम्ही पण म्हणा तिच्यासोबत"

मेनका मॅडम ( हे अर्थातच तिचे खरे नाव नव्हते.) हातातल्या कागदावरचे डायलॉग वाचत होत्या. अभिजीत हताशपणे खाली बसला आणि मेनका सोडून इतराचे डायलॉग वाचायला लागला.

सावरी तोपर्यंत सेटवर निघून गेली. तिथे आझमी सेट डिझायनरला काहीतरी समजावत होता. "हाय.." सावरी त्याला म्हणाली.

"हॅलो मॅडम"

"व्हॉट्स दिस? आझमी, मी तुला कितीवेळा सांगले की मला मॅडम सांगू नका. सावरी सांग ना.." लाडात ती म्हणाली.

"माझ्या लक्षातच राहत नाही. तुम्ही किती वेळा सांगली आपलं चुकलं बोलली तरी..." आझमी हसला.

"आझमी, मी तुला एक विचारू?"

"विचार ना!"

"तू माझ्यासोबत आज येशील? डिनरला?"

आझमी जागच्याजागी धसकला. सावरी आपल्याला डिनरला बोलावते??? तेही इतकं गोड गोड बोलत.. आयला ही पण सीरीयल हातातून गेली का काय?? नक्की विचार काय आहे काय हिचा?

अभिजीत तेच तेच डायलॉग वाचून वैतागला. मेनका मात्र अजून प्रॅक्टिस करू म्हणत होतीच. इतक्यात स्पॉट धावर मेकपरूममधे आला. काजल मॅडम आयेली है, असे सांगून गेला.

मेनका मॅडम अचानक उठून उभी राहिली. आरश्यामधे स्वतःचा मेकप नीट आहे की नाही ते बघितले. आणि अभिजीतला म्हणाली. "अभिजीत, आता तू सेटवर जा. आझमीला सांग मी तासाभरात सीनसाठी येते."

"तासाभरात? पण सेट तयार आहे. तुम्ही पण रेडी आहात. मग हा सीन पटकन घेऊन टाकू. "

मेनका मॅडम एकदम लाजून हसली. "काजलशी मला जरा पर्सनल काम आहे, ते झाले की सीन घेऊ ना.. तू जा ना तवर सेटवर"

अभिजीत चिडून उठला. काजलला दिवसाभरात चार चार सीन शूट करायची घाई आणि ही म्हणे तासाभराने येणार. मेनकाचे काम असून असून काय असणार? चॅनलवाले परत एखादा डान्सचा प्रोग्राम करत असतील त्यामधे हिचे नाव आतातरी येऊ दे म्हणून काजलच्या हातापाया पडायच्या असतील, दुसरे असून असून काय असणार?.

तो उठून बाहेर येऊन बसला. त्याने खिशामधले पत्र पुन्हा काढून वाचले.

सीरीयलसाठी लिहिणार्‍या तीन चार लोकांकडून त्याने हे पत्र लिहून घेतले होते. सावरीला देण्यासाठी. पत्राची सुरूवातच मुळात "ओ मोरी प्यारी सावरिया" अशी सुंदर होती. आज सावरीला हे पत्र द्यायचेच. आपल्या मनातल्या भावना तिलाच सांगायच्या असे त्याने मनोमन ठरवले होते. हातातले पत्र त्याने पुन्हा खिशात ठेवले आणि तो सावरी जिथे बसली होती तिथे निघाला....

तितक्यात काजल कारमधून खाली उतरली. तिच्या हातामधे एक भला मोठा खोका होता.

--------------

काजलच्या हातातील खोका घ्यायला एक-दोनजण धावले तशी तिने तो खोका आणखी घट्ट आवळून धरला.
''मॅडम, लाइये ना, हमे दीजिये.... आप क्यूं तकलीफ करते हो उठाने की?'' काजलच्या भोवती घुटमळणार्‍या असिस्टंटकडे तिने एक तुच्छ कटाक्ष टाकला आणि तसाच तो खोका कवटाळून तरातरा चालत सेटवर आली.
तिथे आल्यावर तिने तो खोका खाली ठेवला आणि असिस्टंटला खोका उघडायची खूण केली.

तितक्यात तिला कपाळाला आठ्या घालून खिसा चाचपणारा अभिजीत दिसला.

''अभिजीऽत, तिथे काय करतो आहेस? इकडं ये लवकर. पाचव्या सीनचं काय झालं?'' काजलच्या धारदार हाकेसरशी अभिजीतने चेहर्‍यावर एक सक्तीचे स्मित आणले आणि झपझप पावलांनी तो काजलच्या बाजूला जाऊन पोहोचला.
''काजलजी, त्याचं काय आहे, थोऽडा प्रॉब्लेम आला पाचव्या सीनला...''
''रब्बिश.... मी तुला प्रॉब्लेम सोडवायचे पैसे देते... माझ्यासमोर कसलीतरी फालतू कारणं उगाळायचा पगार मिळत नाही तुला, समजलं?''
काजलचा मूड आज बिनसलेला दिसत होता.
तितक्यात बाजूला खोका उघडण्याच्या खटपटीत असलेल्या असिस्टंटच्या तोंडातून एक अस्फुटशी किंकाळी बाहेर पडली. दचकून अभिजीतने त्याच्या दिशेने धाव घेतली. असिस्टंट जागच्या जागी थरथरत होता. त्याचा चेहरा पांढराफट्ट पडला होता. हाता-पायांना कंप सुटला होता. डोळे जागीच थिजले होते. अंग घामाने डंवरले होते.

''अरे काय झालं ह्याला?'' अभिजीत ओरडला, ''अरे कोणीतरी पाणी आणा आधी!!'' असिस्टंटचे अंग एव्हाना गदागदा हालू लागले होते. भयचकित नजरेने तो त्या वेष्टनांच्या व सेलोटेपच्या अस्ताव्यस्त पसार्‍याच्या मधोमध असलेल्या उघड्या खोक्याच्या दिशेने पाहत होता. अभिजीतने धावत आलेल्या स्पॉटबॉयच्या हातातील पाण्याची बाटली जवळपास हिसकावली आणि त्यातील पाणी तो थरथरणार्‍या असिस्टंटच्या चेहर्‍यावर मारणार तोच खोक्याच्या दिशेने त्याला एक घोगरट, विचित्र आवाज ऐकू आला. चमकून त्याने खोक्याकडे पाहिले.

काजल घाबरलेल्या असिस्टंटकडे वैतागाने चिडून पाहत होती.

''काजलजी, खोक्यात काय आहे त्या?'' अभिजीतने चाचरत विचारले.
आपल्या मोबाईलशी चाळा करणार्‍या काजलच्या चेहर्‍यावर एक अनामिक भाव आला. खांदे किंचित उडवून ती बोअर झालेल्या स्वरांत उद्गारली, ''ओऽह... दॅट!! ते सीरियलमध्ये नवं कॅरेक्टर म्हणाले नव्हते का मी.... हिअर, मीट अवर लेटेस्ट अ‍ॅडिशन टू दि सीरियल....डॉबी!!!!'' मग जरा कौतुकाने ओथंबलेल्या स्वरांत ती पुटपुटली, '' इजन्ट ही द क्यूटेस्ट?''

Dobby_at_Hogwarts.jpg

खोक्यातून बाहेर पडणार्‍या डॉबीकडे काजलने प्रेमाने हसून पाहिले. तिच्यामागे धप्पदिशी आवाज आला. अभिजीत सेटच्या जमिनीवर घेरी येऊन कोसळला होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

डॉबीच का?? आणायचा तर किमान व्होल्डमार्ट (मेमरी गेलेला) किंवा स्नेप (प्लास्टिक सर्जरी केलेला) आणायचा!!!

हा हा हा.... नंदिनी, मग तू आता तसा शेवट लिही, हाकानाका! Wink

प्रतिसादाबद्दल धन्स सर्वांचे! Happy

मस्तच.