गणेशोत्सव : काही आठवणी - दिनेशदा

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 04:59

सर्वसाधारण मुंबईतील कोकणस्थ म्हणत असतात, तसा आमचा गणपती गावाला. आमचे मूळ गाव राजापूर. म्हणजे आमच्या घराण्याचा मूळ गणपती तिथेच असतो. मला मात्र इतक्या वर्षात कधीही तिथे जाता आले नाही. पूर्वीदेखील गणपतीला एस्टीच्या जादा गाड्या सोडत असत. आताही असतात, आता तर रेल्वेच्या जादा गाड्या पण असतात. पूर्वी लोक गणपतीच्या सजावटीचे सामान घेऊन कोकणात जात असत. खूपदा गावचे घर बंदच असे. मग तिथे जाऊन साफसफाई करावी लागे. आता निदान कोकणातील घरात लोक राहतात.

गणेशचतुर्थीच्या आधी काही दिवस मात्र, मुंबई गोवा हायवे नुसता भरून वाहत असतो. एस्टीबरोबरच आता खाजगी गाड्याही भरपूर दिसतात.

आजोळचा गणपती पण मी कधी बघितला नाही. तिथल्या आठवणी मात्र आई सांगत असते. ज्योतिबा हे आजोळचे कुलदैवत असल्याने, तिथला गणपती हा कायम घोड्यावरचाच असतो. तो घोडा वर्षानुवर्षे तोच आहे. गणपतीच्या आधी तो घोडा कुंभाराकडे द्यायचा, मग तो कुंभार त्यावर गणपती करून देतो. हीच प्रथा आजतागायत चालू आहे.

त्यामुळे माझ्या गणपतीच्या आठवणी बहुतांशी मुंबईतल्याच. आमच्या घरी श्रावण, गणेशचतुर्थीपर्यंत पाळला जातो. उकडीच्या एकवीस मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवल्याशिवाय, आमची गणेशचतुर्थी साजरी होत नाही. हा नैवेद्य पण आई, घरच्या देवांना न दाखवता, पुजलेल्या गणपतीला दाखवते.

१९७४ पर्यंत आम्ही मालाडला राहत होतो. त्यावेळी मालाडला वस्ती पण कमी होती आणि गर्दीही. आमच्या समोर राहणारे कांदळगांवकर, यांच्याकडे गणपती बसवत असत. आमच्या दोनतीन इमारतींचा मिळून तोच गणपती. त्यामुळे आम्हा मुलांचा वावर, त्या दिवसात त्यांच्याचकडे असायचा. त्यावेळी कॅसेट्स वगैरे नसायच्या, त्यामुळे पूजेसाठी भटजी येईपर्यंत सगळेच वाट बघायचे.

सकाळ-संध्याकाळची आरती हे आमचे आकर्षण. 'येई ओ विठ्ठले' या आरतीत बेंबीच्या देठापासून ओरडून सूर लावत असू. त्याच काळात लता मंगेशकरने गायलेल्या आरत्या आल्या होत्या. त्या ऐकून, अशी आरती म्हणणे आपल्याला जमणार नाही, असे आम्हाला वाटत असे. आजही त्या आरत्या ऐकल्याशिवाय, मला गणपती बसल्यासारखे वाटत नाही.

त्यावेळच्या आरत्यांमध्ये सुखकर्ता दुःखहर्ता, शेंदूर लाल चढायो, लवथवती विक्राळा, दुर्गे दुर्गट भारी, आरती ज्ञानदेवा, आरती तुकारामा या जास्त लोकप्रिय. दशावताराची आरती हि फक्त शेवटच्या दिवशी, कारण ती खूप मोठी (आरती सप्रेम) मग घालीन लोटांगण आणि मग मंत्रपुष्पांजली. त्याकाळी पाठ केलेले हे सर्व, मला अजूनही बर्‍यापैकी आठवतेय. (साईबाबा, संतोषी माता वगैरे आरत्या त्या काळात प्रचलित नव्हत्या.)

आमच्या शाळेत म्हणजेच उत्कर्ष मंदिरामध्येही दीड दिवसांचा गणपती असायचा. त्याकाळात गाणी वगैरे म्हणण्यासाठी मला आमंत्रण असायचे. त्याकाळात पेढे पण इतक्या प्रमाणात मिळायचे नाहीत. त्यामुळे प्रसाद म्हणजे साखरफुटाणेच असत. पण त्याचे खूप अप्रूप असायचे. कांदळगांवकरांकडे त्याच दिवसात सत्यनारायणाची पूजा असायची आणि त्याच दिवशी एखादे भजनी मंडळ ते बोलावत असत. त्यांचे भजन मोठमोठे टाळ आणि ढोलकींच्या तालावर होत असे. त्यांच्या चाली वेगळ्या, त्यामुळे आम्हा मुलांना त्यात भाग घेता येत नाही, याचा जरा रागच यायचा. गणपती विसर्जनाच्या दिवशी आम्ही मुले रडायचेच काय ते बाकी ठेवायचो. मालाड पूर्वेपासून, मढ पर्यंत आम्ही चालत जात असू. त्यावेळी मालाडमध्ये रिक्षादेखील नव्हत्या, टांगेच होते. त्यादिवशीची खिरापत म्हणजे टरबूज, पोहे आणि पपनस.

मालाडमध्ये त्यावेळी सार्वजनिक गणपती खूपच कमी असत. रेल्वे पुलाजवळचा पापाचा गणपती, हे आकर्षण. त्याला असे नाव बहुतेक एका सिंधी माणसामुळे पडले होते. पण याच नावाने तो ओळखला जात असे हे नक्की.

गणेशचतुर्थीच्या दिवशी कमीतकमी पाच गणपतींचे दर्शन घ्यायचे, हा आमचा नियम होता. तेवढ्या घरातली आमंत्रणे असायचीच, पण कधी कधी अनोळखी घरात शिरून देखील गणपतीचे दर्शन घेतल्याचे आठवतेय.

मग आम्ही चेंबूरला राहायला आल्यानंतर आमच्या शिवसृष्टीतला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. त्यावेळी तिथे वस्ती कमी होती. वर्गणीही कमीच जमायची. पण तरीही उत्साह अमाप असायचा. एक मराठी ऑर्केस्ट्रा, एक हिंदी ऑर्केस्ट्रा आणि स्थानिक कलाकारांचे (म्हणजे आम्हीच) कार्यक्रम व स्पर्धा असायच्या. रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, अभिनय, हस्ताक्षर, चित्रकला अशा सगळ्याच स्पर्धात भाग घेत असे मी. आमच्या शिवसृष्टीतल्या रहिवासी, उषा तिमोथी आवर्जून गाणी म्हणत असत. हा काळ म्हणजे व्हिडिओ यायच्या आधीचा काळ. त्या काळात गणेशोत्सवात हिंदी सिनेमा दाखवणे (म्हणजे चक्क प्रोजेक्टर आणून) खूप लोकप्रिय होते. रस्त्यावर उघड्यावर असे पडदे लावलेले असायचे. त्यावरच रस्त्यावरील गाड्यांचे लाईट्स पडणार, अधून मधून प्रोजेक्टरचा बल्ब जाणार, रिळ बदलावे लागणार अशी सगळी विघ्ने यायची. पाऊसही पडायचा. तरीपण पब्लिक पडद्याच्या दोन्ही बाजूला बसून मजा घ्यायचे. झुमरु, मधुमती सारखे चित्रपट असे बघितलेले आठवताहेत. रंगीत चित्रपट असला तर तोबा गर्दी व्हायची. कच्चे धागे, शर्मिली असे रंगीत चित्रपट बघितल्याचे आठवतेय.

आमच्या शेजारीच असणार्‍या नेहरुनगरमधे देखील अनेक सार्वजनिक गणपती असतात. त्यांच्याकडचे कार्यक्रमही साधारण याच धर्तीवर असतात. टिळकनगरचा खास सजावटीचा गणपती मात्र अलीकडच्या काळातच नावारूपाला आलाय.

मोठे गणपती बघण्यासाठी आम्ही लालबाग परळ भागात जात असू. त्या काळात हालणारे देखावे हे मुख्य आकर्षण असायचे. त्याकाळात त्या देखाव्याचे फोटो तिथे विक्रीसाठी असत. आणि ते विकत घेतले की रांग मोडून वेगळ्या वाटेने दर्शनाला सोडत असत. 'रंगारी बदक चाळ' वगैरे गणपती त्या काळातही भव्य असत, पण त्यांच्या नावापुढे 'राजा' आणि नावामागे 'नवसाला पावणारा' असे शब्द नक्कीच लागलेले नसत. दादर भागातला भाजी मार्केटमधला एकच मोठा गणपती आठवतोय.

१९७७ सालापासून पोद्दार कॉलेजला जायला लागल्यापासून माटुंगा भागातले गणपती बघू लागलो. पापा पगली चौक आणि आजूबाजूचे तसेच कपोल निवासचे मोठे गणपती आठवताहेत. पण त्या काळात माटुंगा स्टेशनजवळचा वरदराजनचा (त्यावेळी उघडपणे हे नाव घेतले जात नसे.) गणपती सर्वच बाबतीत भव्य असायचा. त्यावेळी स्टेशनबाहेर पोलिस चौकी नव्हती आणि दुकानेही नव्हती. त्या विस्तीर्ण मोकळ्या जागेत दोन मंडप असत. एकात गणपती तर दुसर्‍यात कार्यक्रम असत. हा गणपती, प्लाझाजवळच्या खांडके बिल्डिंगपासून मिरवणुकीने आणत. त्या मिरवणुकीत नाचण्यासाठी खास दाक्षिणात्य कलाकार येत. डोक्यावर सुशोभित कलश गरगरा फिरवत त्या बायका नाचत असत. या गणपतीची विसर्जनाची मिरवणूकही अशीच वाजत गाजत जात असे. (ती अनंत चतुर्दशीच्या नंतरच्या दिवशी निघे.) त्या काळात त्या भागात फार उत्साही वातावरण असे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रोषणाई, तसेच केवड्याच्या पानापासून केलेली कलात्मक तोरणे असत.

रात्री उशीरा कॉलेजमधून घरी जाताना तिथले कार्यक्रमही दिसत. लोकनृत्य, शरीरसौष्ठव स्पर्धा वगैरे बघितल्याचे आठवतेय. त्याच दरम्यान तिथे संपूर्ण मंडपाला आग लागण्याची दुर्दैवी घटनाही घडली. रातोरात मूर्तीचे विसर्जन करून, नव्या सजावटीसह नवीन मूर्ती बसवली होती. नंतर तिथे पोलिस चौकी झाली तरी अजूनही तो उत्सव मोठ्या प्रमाणातच होतो.

रुईया नाका मित्र मंडळाचा गणपती पण त्याच काळात बसू लागला. मध्यंतरी एक वर्ष तो दिसला नाही, त्यावर्षी मलाच चुकल्या चुकल्यासारखे वाटले होते. या गणपतीची सजावट नेहमीच सामाजिक प्रश्नांवर आधारित असते. ती बघण्यासाठी मी आवर्जून जात असतो.

त्याच काळात संगीतावर आधारित रोषणाई नव्यानेच होऊ लागली होती. तो प्रकार खूपच आकर्षक असायचा. ती बघण्यासाठी तुफान गर्दी व्हायची. पुढे ती का दिसेनाशी झाली ते कळत नाही.

पूर्वीही लालबाग भागातल्या गणेशमूर्ती भव्य असायच्या. पण आता सर्वच ठिकाणी मोठ्या मूर्तींचा अट्टहास धरला जातो. एवढी मोठी मूर्ती तरीही तिचे दर्शन मात्र मंगलमय, हि खास मूर्तिकारांची कारागिरी. पण मोठ्या मूर्तीमुळे विसर्जनाच्या वेळेस काही प्रश्न निर्माण होतात, त्याचे भानही ठेवायलाच पाहिजे. चेंबूरला आरके स्टुडिओचा पण गणपती मोठा असतो, पण एका वर्षी प्रियदर्शिनीच्या जवळच्या रेल्वेपुलाखालून तो न्यायला खूपच अडचण आली होती.

आर्टीकलशिप करताना माझे ऑफिस चर्नीरोडला होते. त्यामुळे गौरी विसर्जन, अनंत चतुर्दशीला मी हमखास गिरगाव चौपाटीवर असे. गौरी विसर्जनाला कोळी लोकांच्या देखण्या गौरी बघत राहाव्याश्या वाटत. कारवारी लोकांची फुलांची गौर आणि त्याभोवती त्या बायकांनी फेर धरत गायलेली गाणी, हे दृश्य पण अजून स्मरणात आहे.

तिथल्या पुलावर पोलिसांचे ठाणे आणि महापौरांनी हेलिकॉप्टरमधून केलेली पुष्पवृष्टी मात्र माझ्या मनाला पटत नाही. पूर्वी त्यादिवशी तिथे बघ्यांची खूपच गर्दी व्हायची, नंतर केबलवर थेट प्रक्षेपण होऊ लागल्याने, आता जरा कमी गर्दी असते. पण पुण्याच्या मानाने मुंबईची मिरवणूक जरा कमी गोंगाटाची आणि जलद वाटते. (मुंबईकरांना विसर्जनासाठी अनेक समुद्रकिनारे उपलब्ध आहेत, हेही एक कारण आहेच.) पण अजूनही मुंबईत रोंबासोंबा नाचच दिसतो (यावर्षी दबंग, सेनोरिता वगैरे गाणी वाजतील बहुतेक) लेझीम पथक फारच क्वचित बघितलेय मी मुंबईत.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मूर्तिकारांची कला समोर येते. फुले, सजावटीचे सामान यांची प्रचंड उलाढाल होते आणि त्या सर्व कलाकारांना रोजगार मिळतो, हि अत्यंत समाधानाची बाब असली, तरी काही ठिकाणचे प्रचंड व्यापारीकरण मात्र मला क्लेशदायकच वाटते. पुढे पुढे प्रचंड गोंगाटाचा त्रास व्हायला लागल्याने, मी गणेशोत्सवात भाग घेणे बंद केले.

गोव्याच्या वास्तव्यात मात्र घरमालकांचाच गणपती असल्याने, माझा सहभाग असायचाच. शिवाय आत्याकडे पण जाणे व्हायचे. सगळे म्हणतात की गोव्यात पोर्तुगीजांचा प्रभाव दिसतो, पण तिथले काही उत्सव बघितल्यावर त्या लोकांनी प्राणपणाने जपलेली संस्कृती जाणवल्याशिवाय राहत नाही. तिथे गणेशोत्सव, दसरा दिवाळीपेक्षा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. फटाकेही याच काळात वाजवले जातात.

खरे तर श्रावणातच याची चाहूल लागते. अनेकजण वर्षभराची रजा यासाठी राखून ठेवतात. या काळात सरकारी कार्यालयातील काम पण थंडावलेलेच असते. चवथ जावनी, मागीर पळू (गणपती होऊन जाऊ देत, मग बघू.) असेच सगळीकडे ऐकायला येते.

गोव्याच्या गणपतीचा तोंडवळा, महाराष्ट्रातील गणपतींपेक्षा थोडा वेगळा असतो. आणि माझ्या
आठवणीप्रमाणे तिथे मातीच्याच मूर्ती घडवल्या जातात. तिथल्या गणपतीच्या सजावटीत माटोळीला अतिशय महत्त्व आहे. माटोळी म्हणजे एक लाकडी चौकट, जी मूर्तीच्या वर आडवी टांगतात. त्या माटोळीला तरतर्हेची फळे आणि इतर वस्तू बांधतात. ती माटोळी जास्तीत जास्त भरगच्च कशी दिसेल याकडे त्यांचा कटाक्ष असतो. गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी पणजीच्या बाजारात अशा वस्तूंचे ढीग लागलेले असतात. त्या दिवशी तर बाजार मांडवीचे किनारे व्यापून टाकतो. भाव खूपच चढे असतात, आणि अस्सल गोवेकर त्या वस्तू घेतल्याशिवाय राहत नाही. (वाईट एवढेच की दुस-या दिवशी तो सर्व माल मातीमोल होतो, आणि न विकला गेलेला माल तिथेच टाकून विक्रेते निघून गेलेले असतात.)

त्यांच्याकडे नैवेद्याला मोदकच असतात पण पातोळ्याही आवर्जून केल्या जातात. त्यांची आरती म्हणायची पद्धत मात्र जरा वेगळी आहे. एक ओळ संथ लयीत तर पुढची ओळ द्रुत लयीत असते. (हा प्रकार मला कधी जमलाच नाही.) गोव्यात सार्वजनिक गणपती फारसे दिसले नाहीत, पण बहुतेक घरात तो असायचाच.

गणेश विसर्जनाला ते थेट बुडवणे असाच शब्द वापरतात. गणपती केन्ना बुडयता रे, असेच विचारतात. विसर्जनाच्या दिवशी परत मोठा प्रसाद असतो. विसर्जनाच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. गणपतीची शेवटची आरती संपत आल्यावर माटोळीखाली लहान मुले जागा पकडून उभी राहतात आणि गणपती उचलल्याबरोबर उड्या मारून माटोळीची फळे तोडतात. खरे तर त्यांना तशी मुभाच असते.

गणपतीचे १० दिवस मात्र घरात मासे खाल्ले जात नाहीत. गोवेकरांचे मत्स्यप्रेम बघता हा फारच मोठा त्याग आहे. मात्र विसर्जनाच्या दिवशी पुढच्या दारातून गणपती बाहेर पडला की मागच्या दाराने मासे आत येतात.

एका वर्षी गणेशचतुर्थीलाच माझा मुक्काम गणपतीपुळ्याला होता. त्या गावात घरी गणपती बसवत नाहीत (असे ऐकले होते). देवळातला गणपती हाच गावाचा गणपती. मला त्या गावातली एक प्रथा मला फारच आवडली. एरवी सोवळ्यात असणारा तो गणपती त्या दिवशी मात्र मुक्त होतो. सगळ्यांना त्याची गळाभेट घेता येते.

असे अद्वैत सर्वच देवांबाबत असावे. नाही का ?

- दिनेशदा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपतीपुळ्याच्या आसपासच्या गांवात ही प्रथा आहे. माझी सासुरवाडी नेवरे गावची. त्यांच्याकडेही या प्रथेनुसार घरी गणपती बसवत नाहीत.
गोव्यातील गणेशोत्सवाबद्दल मला खूपच उत्सुकता आहे. तिथल्या आरत्या हा एक वेगळा विषय आहे. मध्यंतरी कुणीतरी ठाणे ते गोवा पट्ट्यांतील सर्व ठि़काणच्या गणपतीच्या आरत्यांच्या विविध पद्धतींवर एक डॉक्युमेंटरी बनवली होती व त्यांची मुलाखत दु.द. वर झाली होती. त्यांनीही सगळ्या ठिकाणांमध्ये गोव्यातील आरत्या त्यांना जास्त भावल्याचे म्हटले होते. ज्योतीताईंकडून या विषयावर आपण लिखाणाची अपेक्षा करुया.
अत्यंत सुरेख माहिती असलेला लेख. धन्यवाद.

दिनेशदा माझ्या सर्व आठवणी जाग्या केल्या तुम्ही. अगदी मालाड पासून कुर्ला नेहरू नगर पर्यन्त. स्पेशली
माटोळी, गणपतीच्या आरासाच्या.
Thanks a lot !!

दिनेशदा,उत्कर्ष-मंदिर,मालाड ह्या शाळेची आठवण काढून तुम्ही मलाही भूतकाळात नेलंत....तसेच मालाडमधले गणपती....माझ्याही आठवणी जवळपास तुमच्यासारख्याच आहेत....
मी उमं(पश्चिम) चा १९६८(शालांत परीक्षा) चा विद्यार्थी....आपण कधीचे?

हा लेख अत्यंत विस्कळीत होता. त्यावर हात फिरवून दिल्याबद्दल आणि माझ्या शुद्धलेखनाच्या चुका मायेने पोटात घातल्याबद्दल, एका मैत्रिणीचे शतशः आभार. तिचे नाव घेणे मला अनावश्यक वाटतेय आणि तिला संकोचाचे वाटेल.

प्रमोद, मी १९६८ ते १९६९ उत्कर्ष मंदिर पश्चिमेला आणि १९६९ ते १९७३ पूर्वेला.

खुप सुंदर लेख. वाचताना अगदी जुन्या आठवणी यायला लागल्या.

रस्त्यावर बघितलेले ते चित्रपट आजही आठवताहेत. रस्त्यावर बसुन, गॅलरीत उभे राहुन, जसे जमेल तसे चित्रपट पाहिलेत. चोरी चोरी तर रात्रभर पाहिला. गाणे संपले की पब्लिक ओरडायचे वन्स मोर.. मग परत रिळ फिरवुन गाणे चालु.. Happy इतकी धमाल यायची.

गणेशोत्सवात नाटके, ऑर्‍केस्ट्रा इतर स्पर्धा इ.इ. असायचे. एका वर्षीच्या गणेशोत्सवात बिल्डींगमधल्या मुलांनी मर्चंट ऑफ वेनिस नाटकाचा मराठी अवतार सादर केलेला. तो एकुण प्रकार प्रचंड विनोदी झालेला. दिग्दर्शकानेच नाटकातली प्रमुख भुमिका केली होती आणि त्याला केले जाणारे प्रॉम्पिंट अगदी वर गॅलरीतुन बघणा-या प्रेक्षकांनाही ऐकायला येत होते.

वा खुप छान लेख. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. चलचित्र पाहण्यासाठी वडील आम्हाला उरणवरुन मु.न्बईला न्यायचे. ती पाहण्यासाठी रा.न्ग लावायला लागायची पण १५ मिनीटा.न्त दर्शन व्हायच.

गोव्याच्या गणपतीचा तोंडवळा, महाराष्ट्रातील गणपतींपेक्षा थोडा वेगळा असतो. आणि माझ्या
आठवणीप्रमाणे तिथे मातीच्याच मूर्ती घडवल्या जातात. तिथल्या गणपतीच्या सजावटीत माटोळीला अतिशय महत्त्व आहे. माटोळी म्हणजे एक लाकडी चौकट, जी मूर्तीच्या वर आडवी टांगतात. त्या माटोळीला तरतर्हेची फळे आणि इतर वस्तू बांधतात. ती माटोळी जास्तीत जास्त भरगच्च कशी दिसेल याकडे त्यांचा कटाक्ष असतो. गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी पणजीच्या बाजारात अशा वस्तूंचे ढीग लागलेले असतात. त्या दिवशी तर बाजार मांडवीचे किनारे व्यापून टाकतो. भाव खूपच चढे असतात, आणि अस्सल गोवेकर त्या वस्तू घेतल्याशिवाय राहत नाही. (वाईट एवढेच की दुस-या दिवशी तो सर्व माल मातीमोल होतो, आणि न विकला गेलेला माल तिथेच टाकून विक्रेते निघून गेलेले असतात.) >>
अगदी अगदि आमच्याकडे सिंधुदुर्गात पण माटिची प्रथा आहे. दर पाच ते सहा वर्षांनंतर नविन माटि बनवली जाते. तालुक्याच्या ठिकाणी बाजारात हे सामान विकत मिळत. वडलांकडे चोकूळला वगैरे जंगलातुन शोधुन आणून माटी बांधली जायची. इथे माटी - झाडंवरच शेवाळ हेच गणपतिचे डेकोरेशन असते.

गोव्याला पण आता भरपुर सार्वजनीक गणपती आहेत. पण मुर्त्या मात्र मोठ्या नसतात. जास्त भर चलचित्रांवर दिला जातो.