स्वरचित आरत्या, श्लोक, स्तुती, ओव्या, काव्य

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 08:00

e543_olde_tyme_writing_set-594x1024.jpg

देवाची अर्चना कोणी साग्रसंगीत पूजा करून करतात तर कोणी मानस-पूजा करतात. मार्ग कोणताही असो, मनापासून केलेली प्रार्थना देवाला पोहोचते.

देवाच्या चरणी आपली ओंजळ वाहावी असे सर्व भक्तांना वाटतच असते. त्यातून गणपती हा सर्व कलांचा अधिष्ठाता. त्याच्या चरणी जर कोणाला आपली काव्यपुष्पे वाहायची असतील तर इथे अर्पावीत ....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीगणेशा..!!

Ganesh

नमन करतो श्री गणेशा, वक्रतुंडा रे परेशा
लेखना प्रारंभ करतो, तरल शब्दा दे परेशा

शक्य करसी तू अशक्या, गम्यता देसी अगम्या
लक्ष अपराधास माझ्या, तूच पोटी घे परेशा

तू गजानन निर्विकल्पा, फेड माझ्या तू विकल्पा
वेल कवितेची चढू दे, वृक्ष तू व्हावे परेशा

तूच माझा सोयरा रे, पाठराखा तू सखा रे
तूच माझा भाव भोळा, मधुरसे गाणे परेशा

अभय कविता देखणी तू, वृत्त्त तू, स्वरशब्द तू रे
अंत्ययमका संग दे ते यमक तू माझे परेशा

गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......

श्रीगणेशश्री गणराया

कृपावंत व्हावे श्री गणराया
भूलचूक माझी हृदयी धराया ॥धृ॥

चिंतामणी तू चिन्मय देवा
अनुतापी मी, तू करुणा ठेवा
द्वारी उभा मी नाम स्मराया ॥१॥

भयमोचक तव मंगलदृष्टी
अनुदिन लाभो तारक वृष्टी
हा भवबंध पार कराया ॥२॥

अनुष्ठान हे तव पूजनाशी
क्षणभंगुर मी, तू अविनाशी
साह्य होई मज अभय तराया ॥३॥

गंगाधर मुटे
.....................................................

Ganeshगणपतीची आरती

जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा
आरती स्वीकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥

वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी
कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी
खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥

पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची
नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची
रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥

तूच बाप,माय तुचि, आम्ही तुझी लेक
एक आस जीवनास, पंथ दावी नेक
अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥

गंगाधर मुटे
................................................

लंबोदर, शूर्पकर्ण, अमित, विनय
भालचंद्र, धूम्रवर्ण, गौरितनय ||धृ||

ब्रम्हतत्व तूच, तूच आत्मरूप
वाणीरूप, नामरूप, जीवरूप
अद्वितीय, ज्ञानरूप, मंगलमय
भालचंद्र, धूम्रवर्ण, गौरितनय ||१||

त्रिविधशक्तिरूप तूच, तू गणेश,
उत्पत्ती, स्थिति, लयही तू गुणेश
पाशांकुश धारिसि हे सांबतनय
भालचंद्र, धूम्रवर्ण, गौरितनय ||२||

तीन काल, तीन देह, आणि त्रिगुण
यांपरता तू, निर्गुण आणि सगुण
ओंकारा, तारि भक्त, देत अभय
भालचंद्र, धूम्रवर्ण, गौरितनय ||३||

क्रांति

शिवगौरीतनयास नमावे
कार्यारंभी प्रथम पुजावे ||धृ||

विद्येचा स्वामी गणनायक
बुद्धीदाता सिद्धिविनायक
चिंतन त्याचे नित्य करावे ||१||

सकल कलांचा स्त्रोत गजानन,
दर्शन ओंकाराचे पावन
अविरत या नेत्रांस घडावे ||२||

वक्रतुंड, गजवदन, गणेशा,
तुज आळविते मी सिद्धेशा,
स्तवनी, कवनी भान हरावे ||३||

क्रांति

सगळ्या आरत्या फार सुंदर.

मुटेजी, आपली 'नमन करतो श्री गणेशा, वक्रतुंडा रे परेशा, लेखना प्रारंभ करतो, तरल शब्दा दे परेशा' ही आरती; तसंच क्रांतिजींची 'लंबोदर, शूर्पकर्ण, अमित, विनय भालचंद्र, धूम्रवर्ण, गौरितनय' ही आरती विशेष आवडल्या.

विद्याधीशा वक्रतुंड तू एक दंत विघ्नेशा
हे मयुरेशा चिन्तामणी तू सिद्धीचा दाता
जगधीशा तू सिद्धीविनायक हे सिंदूरवदना

अष्टसिद्धीच्या अष्टविनायका गौरीच्या नंदना
शंकराच्या हे सुपुत्रा कार्तीक तुझाच भ्राता

तिन्ही लोकी तू त्रैलोक्याचा तूच शक्ती दात्या
वंदिती तुजला देवदेवता रिद्धी सिद्धीच्या दात्या
मंगल समयी तुजला पुजितो विघ्नांच्या हरत्या

अष्टसिद्धीच्या अष्टविनायका गौरीच्या नंदना
शंकराच्या हे सुपुत्रा कार्तीक तुझाच भ्राता

शूर्पकर्ण तू सूक्ष्म नयनी दुंदील हे गजवदना
ऊंदरा वरुनी स्वार होऊनी रक्षिसि भक्तगणा
तुझ्या कृपेने मंगलदायी जीवन होवो सर्वदा

अष्टसिद्धीच्या अष्टविनायका गौरीच्या नंदना
शंकराच्या हे सुपुत्रा कार्तीक तुझाच भ्राता

गण्पती बप्पा मोरया,मंगल मुर्ती मोरया...........

दुर्वांकुर अन् शमीची पत्रे,तुज आवडती गणराया
अगणित भक्त तुझेची झाले श्रेष्ठोत्तम तो मोरयाSS
.......गणपती बाप्पा मोरया,मंगल मुर्ती मोरया ३

दु:ख जनांचे घेउनी उदरी लंब झाले रे उदर तुझे
कसा वाहतो भार तुझा आश्चर्य जगी हे मुषक असे
शक्ती असावी मुषकापरी ,भक्ती असावी मुषकापरी
वाटते मजला गणराया.२
अगणित भक्त तुझेची झाले श्रेष्टोत्तम तो मोरयाSS
.......गणपती....

गवत पत्री फुल तुज आवडे निसर्गाशी प्रेम दिसे
मूषक मयूर तुज साथी असती दीन करूणा ह्रदयी वसे
दीन सेवेचा धडा शिकावा,जन सेवेचा धडा शिकावा
तुज पासून श्री गणराया.२
अगणित भक्त तुझेची झाले श्रेष्ठोत्तम तो मोरयाSS
.......गणपती....

रामायण सांगती वाल्मिकी लेखपाल श्री तू होशी
बटूक वेश तू धरूनी रावणे शिवलिंग घेऊनी येशी
मातृ पितृ भक्ती शिकावी,मातृ पितृ भक्ती शिकावी
तुज पासून श्री गणराया.२
अगणित भक्त तुझेची झाले श्रेष्ठोत्तम तो मोरयाSS
.......गणपती....

अनंत भक्त जे तुज भजती ते का असती संकटी रे
अनंत मी ह्रदयातून नमीतो दे मजला तू सद्गती रे
पापी आम्ही क्षमाशील तू,पापी आम्ही क्षमाशील तू
शरणची तुझला गणराया.२
अगणित भक्त तुझेची झाले श्रेष्टोत्तम तो मोरयाSS
.......गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया...

विभाग्रज.

आरती नंतरचा जयघोष

मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे
ध्यान लागो मला, तुझी आवड लागो मला
बाप्पा मोरया रे, मोरया रे ओ बाप्पा मोरया रे..
वाकडी सोंड निशाण करते, मोदक भक्षाकडे
भक्तीराज गायन करती, भक्तीराज पुजन करती,
निशाण वरच्यावरे, बाप्पा मोरया रे मोरया रे.....

जय देव जय देव जय गणपती देवा
हर्षे स्विकारावी भक्तांची सेवा ||धृ||

लंबोदर सुंदर पाषंकुशधारी
वरदहस्ते मुर्ती मुषकाची स्वारी
नागेन्द्राचा विळखा धारूनिया उदरी
रत्नजडीत मुकुट शोभतो शिरी ||१||

सर्वांग सुंदर देवा गणराया
आदिशक्तीशाली गौरीच्या तनया
भक्तांची दु:खे नेशी तू विलया
तारिशी सारी विघ्ने करूनी तू किमया ||२||

कार्यारंभी पूजन तुझे करावे
निर्विध्न तू कार्य सिद्धीस न्यावे
संकट येता देवा मज तू तारावे
अनंतरूपे दर्शन आम्हा तू द्यावे ||३||

त्रैलोक्याचा देव देवांचा त्राता
दीनांचा उद्धार, ज्ञानाचा दाता
बुद्धीचा तू देव विद्यागणनाथा
सद्भावे ठेवितो तव चरणी माथा ||४||

कोटी सूर्य तेज निर्गुण आकार
ज्ञानियांचा राजा सद्गुण साकार
जय जय श्री गणराज मज तू पावावे
मानून घे ही सेवा केली मनोभावे ||५||

जय देव जय देव जय गणपती देवा
हर्षे स्विकारावी भक्तांची सेवा ||धृ||

~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~
हे अजून एक कडवं .. बप्पांच्या निरोपाचं

आनंदे उत्सवे राहिलासी देवा
पुढच्यावर्षी लवकर येशील ना देवा
अनुचित काही घडता क्षमा असावी
सदैव तुझी कृपा आम्हावरी व्हावी || ६||

-सत्यजित.

मुटेजी, हेमंत, विभाग्रज, सत्यजित खूप आवडल्या तुम्हा सगळ्यांच्या रचना. Happy प्रशू, मस्त आहे जयघोष.