मुक्त'पिठीय' लेख: अमेरिकेच्या प्रवासासाठी काही टिप्स

Submitted by संतोष किल्लेदार on 28 August, 2011 - 20:37

पाषाणभेद यांच्या लेखावरून मला आमच्याही अमेरिकेच्या प्रवासाची आठवण झाली. सध्या मी मलेशियामधे आमच्या दुसर्‍या सुनबाईंकडे आलो आहे. आमच्या एकुलत्या एक मुलाने मुसलमान धर्म स्वीकारला असून आमची एक सूनबाई अमेरिकेत आणि दुसरी मलेशियात असते. त्यामुळे आम्ही दोन्हीकडे आलटून पालटून असतो. आम्ही अमेरिकेचे ग्रीन कार्ड ,मलेशियाचे रेड कार्ड आणि भारताचे रेशन कार्ड घेतले आहे. मुलाचा आदर्श माझ्याही डोळ्यासमोर आहे. एक घर भारतात आणि एक परदेशात असावे असे माझे स्वप्न आहे. पण "हे विश्वची माझे घर" हे आमच्या सौ. ना अजिबात कळत नाही त्यामुळे मला त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवता येत नाही. ते खरे झाले तर सौ. वरचा अर्धा भार कमी होईल. एक मराठी व्यक्ती दुसर्‍या मराठी व्यक्तीला मागे ओढते ती अशी. माझे स्वप्न माझ्या मुलाने तरी पूर्ण करून दाखवले याचा मला अभिमान आहे.

डब्यात दशम्या घेऊन जाऊ नये. कारण फक्त लुफ्तांसाने जर्मनीतून गेलात तरच त्या दशम्या टिकतात. बाकी सगळ्या एअरलाईनमधे त्या खराब होतात हे मी स्वानुभवाने सांगतो.

आम्ही अमेरिकेच्या प्रवासाला जाताना नेहमी कॅंपातल्या मॅकडोनाल्डमधून बर्गर बांधून घेतो. तिथल्या मॅनेजरला "Want to carry to US" असे वेगळे इंग्रजीत सांगितले की तो बरोबर सगळी तयारी करून देतो. तिथे उपासाचे वेगळे बर्गरपण मिळतात. जंगली महाराजवरच्या मॅकडोनाल्डमधल्या गावंढळ माणसांना "अमेरिकेला विमानातून बर्गर न्यायचे आहे" वगैरे काही कळत नाही. तिथे फक्त पुण्यातल्या पुण्यात खायचे बर्गर घ्यावेत.

अर्बाना शँपेन, इलिनॉयच्या लायब्ररीत भरपूर मराठी पुस्तके आहेत. ती कुठल्याही गावातून मागवता येतात. मी पुण्यात कधी मराठी पुस्तकं वाचत नाही. पण मी आल्यावर सूनबाईंच्या मागे लागून आमच्या गावातल्या लायब्ररीतर्फे मुद्दाम मागावून घेतली. ३ महिने लागले. पण फु़कट आहेत म्हटल्यावर का नको? आणि म्हटले माझ्यापेक्षा तिला आपल्या संस्कृतीची ओळख होईल.

अमेरिकेत गेलाच आहात ते लॅंडर , वायोमिंग इथे जाऊन या. तिथे डाऊनटाऊनमधे एक भारतीय सोनार राहतो. त्याला "आम्ही भारतातून अंदमानातून आलो आहोत" असे सांगितले तर तो स्वस्तात हिरे देतो. पण आम्ही पुण्याचे असे अजिबात सांगू नका, त्याची सासुरवाडी पुण्याची आहे.

सियाटलवरून बोइंगने मुख्यालय शिकागोला नेले आहे. पण सियाटलवाले अजूनही जी कस्टमर सर्वीस देतात ती शिकागोला मिळत नाही. तुम्ही जर एयरबसवाले मला २०% डिस्काऊंट देतायत असे सांगितले तर सियाटल मधले बोईंगवाले (फक्त सियाटल, शिकागो नाही !) तो नुसता मॅच करत नाही तर आणखी २% जास्त (एकूण २२%) डिस्काऊंट देतात. पण २०% पेक्षा जास्त सांगू नका कारण त्यांना बरोबर कळतं तुम्ही बंडल मारत आहात म्हणून. तितके ते हुषार असतात. आणि तुमचे केमन आयलंडमधे बॅंकेत खाते असेल तर विमानाची डिलिव्हरी तिकडे घ्यायची, म्हणजे टॅक्सपण वाचतो. मला ही आयडीया फार फार आवडली. कारण तुमचे काही मिलियन डॉलर्स या युक्तिमुळे वाचू शकतात. (२२% डीस्काऊंट्+टॅक्स फ्री+ केमन आयलंडपर्यंत फ्री तिकिट)

मायामीला जाणार असाल तर तिथल्या ब्रोकरची अपॉईंटमेंट घेऊन ठेवाच. घरं सध्या पुण्यापेक्षा मायामीला स्वस्त मिळतायत. आणि आता तिथल्या काँट्रॅक्टवर सही करायला इथून पेन घेऊन जाता येतं. तितकेच तुमचे पेनातले डॉलर वाचतात. मी अजून घर घेतलं नाही पण जाताना विमानातच हवाईसुंदरीकडून उसनं घेतलेलं पेन अजून तसंच मुद्दाम ठेवलं आहे. त्यामुळे घर घ्यायच्या अगोदरच डॉलर आणि रुपये दोन्ही वाचले. हा नवीन नियम झाला आहे. अगदी १००% टक्के माहिती बरोबर आहे. मागे बुश आला होता तेंव्हा अणुकरारावर सही करण्यासाठी त्यानं भारतात असून अमेरिकन पेन वापरलं. त्यामुळे त्यांना आता आपल्यालाही आपलं पेन वापरायची परवानगी द्यावीच लागली.

तुम्हाला अजून काही टीप्स हव्या असतील तर मला केंव्हाही विचारा. तुमच्या कडे इतर काही टीप्स असतील तर इथे जरूर लिहा.

(हे लेखन अगोदर पाषाणभेद यांच्या लेखनाला प्रतिक्रिया म्हणून केले होते. पण खास लोकाग्रहास्तव एक वेगळा लेख म्हणून लिहले आहे. पुनरावृत्तीबद्दल क्षमस्व)

गुलमोहर: 

लेख छान आहे. पण अत्यंत मध्यमवर्गीय भाबडा प्रश्न. मुलगा एकुलता एक आणि सूनबाई २ असं कसं?

माझ्या मुलाने मुसलमान धर्म स्वीकारला आहे. जुनाट कल्पना आपल्याला त्याच त्याच बंधनांमधे अडकवून ठेवतात. त्या टाकून दिल्या तर काहीच अशक्य नाही.

Rofl

काका, मलेशियातल्या सूनबाईंकडे ईदनिमित्त आला आहात का? त्यांच्याकडे त्या सणाला हरी राया म्हणतात. हे आपल्याही धर्मातले पवित्र शब्द. त्यामुळे तुमच्या मुलाचे तिच्याशी सूर जुळले असावेत. सूनबाई केएलमध्येच की आणखी कुठे? आम्ही दरवर्षी F१ च्या वेळेला केएलला जातो. (इतरही वेळी जातो. पण मग एफवनचे लिहिले नाही तर इतरांना कळणार कसे आमचे स्टेटस?)

. एक घर भारतात आणि एक परदेशात असावे असे माझे स्वप्न आहे.<<< त्याच्यासाठी लग्न कशाला करायला हवे काका? फ्रीहोल्ड प्रॉपर्ट्यांचा पर्याय माहीत नाही वाटते? पांढरे केस झाले तरी मन हिरवे असल्याचे हे लक्षण आहे.

असो. आग्नेय आशियाबद्दल टिपा हव्या असतील तर जरूर विचारा.

आम्ही दरवर्षी याच सुमारास यायचा प्रयत्न करतो म्हणजे ईदही होते आणि रहाणेही होते. ही आमची सातवी ट्रीप.

जरूर जरूर . तुमच्याही टिपा येऊ द्या.

अच्छा! घर म्हणजे तुम्हांला भौतिक अर्थ अभिप्रेत नसून भावनिक अर्थ अभिप्रेत आहे तर.. मग ठीके! तुमच्या मुलाकडे अजून दोन स्लॉट मोकळे आहेत, ते भरेपर्यंत तो तुम्हांला पाठिंबा देणार नाही, असे वाटते. अहो, ही आजकालची स्वार्थी जनरेशन. मुलांना वडिलांच्या भावनांची कदर उरलेली नाही. तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे का? असेल तर त्याने तुम्हांला मदत करेपर्यंत तुम्हीही त्याच्या नावाने प्रॉपर्टी करू नका. माझे मावसचुलत मामा विल कसे बनवावे याचे सल्ले देतात. ते नांदगावात राहतात. आधी ते घटस्फोट स्पेशालिस्ट वकील होते, पण गावाचे नाव 'नांद'गाव असल्याने व्यवसाय चालेना म्हणून ते आता फॅमिली वकील म्हणून सर्वच बाबतीत सल्ले देतात. सल्ला हवा असल्यास पाचशे रुपयांचा डीडी आणि जोडपोस्टकार्ड पाठवावे.(स्पर्धा पोस्टकार्ड पाठवू नये.) प्रत्यक्ष जाऊन भेटल्यास काका पक्षकाराने केलेल्या खर्चाच्या प्रमाणात स्वतःच्या शेतातली काहीनाकाही भेट देतात. सध्या तुरीच्या शेंगांचा सीझन आहे. तुम्हांला ओल्या तुरीची आमटी आवडत असल्यास नांदगावला जा. तुमची मनीषा पूर्ण होवो.

शुभास्ते पंथान: सन्तु! काकू कशा आहेत? त्या बीफ आणि चिकन खातात का?

@श्रद्धा
तुमचा प्रतिसाद पाहून मला अगदी गहिवरून आले आहे. आमच्या कोपरे मास्तरांची आठवण येते आहे.
ते मला प्रेमाने "संतु" म्हणत. म्हणायचे "संतु, शुभास्ते पंथान: !" अणि आज तुम्ही म्हणालात
"शुभास्ते पंथान: संतु !"
वा !! जग किती छोटं आहे याची खात्रीच पटते असे अनुभव आले की. तुमच्यात मला आज कोपरे मास्तर दिसले !

मस्त लिहीलय Happy
(पण एक सान्गू? हे विनोदी वा अतिशयोक्तिपूर्ण वाटत असले तरिही, वास्तवात अशाच विविध प्रकारे विचार करणारे/वागणारे आजुबाजुला असन्ख्य दिसतात, नीट पाहिले तर कळते)

Rofl
(२२% डीस्काऊंट्+टॅक्स फ्री+ फ्री शिपींग + केमन आयलंडपर्यंत फ्री तिकिट) >> १०% OFF चे कुपनकोड अथवा BOGO चे डिल असेल असे पाहुन खरेदी करावी. थॅन्क्सगिव्हिंग विकेंडला चांगले डिल मिळु शकेल. Happy

काय हो? हे असे लिहिणे शोभते का तुम्हा लोकाना?? इथे भारतात असंख्य लोक गरीबीने भुकेने तळमळत आहेत आणि तुम्ही परदेश प्रवासाच्या गमजा मारतात्..इतकाच पैसा भारतातल्या गरीबासाठी खर्च केला असतात तर किती आशिर्वाद लाभले असते तुम्हाला....

बरं, श्रद्धा काकू, त्या आम्च्या चुलत नणंदेच्या जावेच्या मुलाचा कोरीयाचा व्हिसा बनवायला थोडी मदत का? कुणी आहे का तुमच्या ओळखेचे?

लग्ने करण्यासाठी मुसल्मान धर्म स्वीकारणार्‍या तुमच्या मुलाचा तीव्र निषेध. मोठ्या कौतुकाने मिरवताय. लाज नाही वाटत?
परदेशात आहे मुलगा म्हणून कुठल्याही गोष्टीचं कौतुक करायचं की क्काय?

श्रद्धाकाकू , तुम्हाला सगळी नाती पाठ कशी असतात हो? की फेकता दरवेळेला?

--- एक भारतीय ---

Lol

मुलाचा आदर्श माझ्याही डोळ्यासमोर आहे. एक घर भारतात आणि एक परदेशात असावे असे माझे स्वप्न आहे. पण "हे विश्वची माझे घर" हे आमच्या सौ. ना अजिबात कळत नाही त्यामुळे मला त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवता येत नाही. ते खरे झाले तर सौ. वरचा अर्धा भार कमी होईल.>> अय्या Happy काका हे हो काय.

दुसर्याना मदत करण्याच्या (टिप्स देण्याबद्दल) तुमच्या या भावनेचे खरचं कौतुक आहे.. आम्हीही शक्य तेव्हा अशी मदत करत असतो.
- मिसेस सार्देना यासोणकर - इज्राईल

@ मी_चिऊ.. मी विचारच करत होतो यासोणकरीण कुठे गेली..आलीच लगेच Happy

काका छान लेख. असेच लिहा. आम्ही तुमच्या लेखाची आतुरतेने वाट पहात आहे.

@श्रद्धा

तुला काय करायचे आहे ईद ला गेले असतील नाहीतर गणपतीला. काकू काहिही खात असतील तुला काय त्याचे? तू करून खायला घालणार आहेस का? आणि स्वताच्या नातेवाईकांची जाहिरात का करत आहेस? त्यांची वकिली चालत नाही कि काय? Happy

एक भारतीय बाई, आमची जॉइंट फ्यामिली आहे. त्यात सगळी नाती आपोआप लक्षात राहतात कारण ती महन्मंगल भारतीय सौंस्क्रुतीचे प्रतीक आहेत. भारतीय नाव घेणारीला भारतीय सौंस्क्रुतीबद्दल ओ की ठो माहीत नसावे हे दुर्दैव.

सार्देनामावशी, आमच्या सिंगापुरात अगदी वेटरलासुद्धा टिप द्यावी लागत नाही. टिप देणे म्हणजे मदत करणे नव्हे. सिंगापुरात या म्हंजे कळेल.
- एक सिंगापुरी मर्लायनीण

@ लंपन - खरतर धन्यवाद, कारण आत हे जवळ जवल सर्वानाच माहिती आहे की माझ्या प्रतिक्रेयेशिवाय मुक्त'पिठीय' लेख पुर्णच नाही होउ शकत..

@श्रद्धा - मी टिप नाही टिप्स म्हणाले, टिप्स म्हणजे माहितीपर वाक्ये.
मी इथे इज्राईल मधे असुनही माझ मराठी तुमच्या पेक्षा चांगल आहे.
- मिसेस सार्देना यासोणकर - इज्राईल

(टिप आणि टिप्स हे मराठी शब्द.. Proud )

जबरी!

>>> आमच्या एकुलत्या एक मुलाने मुसलमान धर्म स्वीकारला असून आमची एक सूनबाई अमेरिकेत आणि दुसरी मलेशियात असते.

तुम्हाला अजून २ सुनबाई मिळवण्याची संधी आहे (एक युरोपमध्ये व उरलेली आफ्रिकेत ठेवा). Biggrin

Pages