मुक्त'पिठीय' लेख: अमेरिकेच्या प्रवासासाठी काही टिप्स

Submitted by संतोष किल्लेदार on 28 August, 2011 - 20:37

पाषाणभेद यांच्या लेखावरून मला आमच्याही अमेरिकेच्या प्रवासाची आठवण झाली. सध्या मी मलेशियामधे आमच्या दुसर्‍या सुनबाईंकडे आलो आहे. आमच्या एकुलत्या एक मुलाने मुसलमान धर्म स्वीकारला असून आमची एक सूनबाई अमेरिकेत आणि दुसरी मलेशियात असते. त्यामुळे आम्ही दोन्हीकडे आलटून पालटून असतो. आम्ही अमेरिकेचे ग्रीन कार्ड ,मलेशियाचे रेड कार्ड आणि भारताचे रेशन कार्ड घेतले आहे. मुलाचा आदर्श माझ्याही डोळ्यासमोर आहे. एक घर भारतात आणि एक परदेशात असावे असे माझे स्वप्न आहे. पण "हे विश्वची माझे घर" हे आमच्या सौ. ना अजिबात कळत नाही त्यामुळे मला त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवता येत नाही. ते खरे झाले तर सौ. वरचा अर्धा भार कमी होईल. एक मराठी व्यक्ती दुसर्‍या मराठी व्यक्तीला मागे ओढते ती अशी. माझे स्वप्न माझ्या मुलाने तरी पूर्ण करून दाखवले याचा मला अभिमान आहे.

डब्यात दशम्या घेऊन जाऊ नये. कारण फक्त लुफ्तांसाने जर्मनीतून गेलात तरच त्या दशम्या टिकतात. बाकी सगळ्या एअरलाईनमधे त्या खराब होतात हे मी स्वानुभवाने सांगतो.

आम्ही अमेरिकेच्या प्रवासाला जाताना नेहमी कॅंपातल्या मॅकडोनाल्डमधून बर्गर बांधून घेतो. तिथल्या मॅनेजरला "Want to carry to US" असे वेगळे इंग्रजीत सांगितले की तो बरोबर सगळी तयारी करून देतो. तिथे उपासाचे वेगळे बर्गरपण मिळतात. जंगली महाराजवरच्या मॅकडोनाल्डमधल्या गावंढळ माणसांना "अमेरिकेला विमानातून बर्गर न्यायचे आहे" वगैरे काही कळत नाही. तिथे फक्त पुण्यातल्या पुण्यात खायचे बर्गर घ्यावेत.

अर्बाना शँपेन, इलिनॉयच्या लायब्ररीत भरपूर मराठी पुस्तके आहेत. ती कुठल्याही गावातून मागवता येतात. मी पुण्यात कधी मराठी पुस्तकं वाचत नाही. पण मी आल्यावर सूनबाईंच्या मागे लागून आमच्या गावातल्या लायब्ररीतर्फे मुद्दाम मागावून घेतली. ३ महिने लागले. पण फु़कट आहेत म्हटल्यावर का नको? आणि म्हटले माझ्यापेक्षा तिला आपल्या संस्कृतीची ओळख होईल.

अमेरिकेत गेलाच आहात ते लॅंडर , वायोमिंग इथे जाऊन या. तिथे डाऊनटाऊनमधे एक भारतीय सोनार राहतो. त्याला "आम्ही भारतातून अंदमानातून आलो आहोत" असे सांगितले तर तो स्वस्तात हिरे देतो. पण आम्ही पुण्याचे असे अजिबात सांगू नका, त्याची सासुरवाडी पुण्याची आहे.

सियाटलवरून बोइंगने मुख्यालय शिकागोला नेले आहे. पण सियाटलवाले अजूनही जी कस्टमर सर्वीस देतात ती शिकागोला मिळत नाही. तुम्ही जर एयरबसवाले मला २०% डिस्काऊंट देतायत असे सांगितले तर सियाटल मधले बोईंगवाले (फक्त सियाटल, शिकागो नाही !) तो नुसता मॅच करत नाही तर आणखी २% जास्त (एकूण २२%) डिस्काऊंट देतात. पण २०% पेक्षा जास्त सांगू नका कारण त्यांना बरोबर कळतं तुम्ही बंडल मारत आहात म्हणून. तितके ते हुषार असतात. आणि तुमचे केमन आयलंडमधे बॅंकेत खाते असेल तर विमानाची डिलिव्हरी तिकडे घ्यायची, म्हणजे टॅक्सपण वाचतो. मला ही आयडीया फार फार आवडली. कारण तुमचे काही मिलियन डॉलर्स या युक्तिमुळे वाचू शकतात. (२२% डीस्काऊंट्+टॅक्स फ्री+ केमन आयलंडपर्यंत फ्री तिकिट)

मायामीला जाणार असाल तर तिथल्या ब्रोकरची अपॉईंटमेंट घेऊन ठेवाच. घरं सध्या पुण्यापेक्षा मायामीला स्वस्त मिळतायत. आणि आता तिथल्या काँट्रॅक्टवर सही करायला इथून पेन घेऊन जाता येतं. तितकेच तुमचे पेनातले डॉलर वाचतात. मी अजून घर घेतलं नाही पण जाताना विमानातच हवाईसुंदरीकडून उसनं घेतलेलं पेन अजून तसंच मुद्दाम ठेवलं आहे. त्यामुळे घर घ्यायच्या अगोदरच डॉलर आणि रुपये दोन्ही वाचले. हा नवीन नियम झाला आहे. अगदी १००% टक्के माहिती बरोबर आहे. मागे बुश आला होता तेंव्हा अणुकरारावर सही करण्यासाठी त्यानं भारतात असून अमेरिकन पेन वापरलं. त्यामुळे त्यांना आता आपल्यालाही आपलं पेन वापरायची परवानगी द्यावीच लागली.

तुम्हाला अजून काही टीप्स हव्या असतील तर मला केंव्हाही विचारा. तुमच्या कडे इतर काही टीप्स असतील तर इथे जरूर लिहा.

(हे लेखन अगोदर पाषाणभेद यांच्या लेखनाला प्रतिक्रिया म्हणून केले होते. पण खास लोकाग्रहास्तव एक वेगळा लेख म्हणून लिहले आहे. पुनरावृत्तीबद्दल क्षमस्व)

गुलमोहर: 

Pages