टोमॅटो सॉस

Submitted by नलिनी on 22 August, 2011 - 04:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१ कि. टोमॅटो
१ इंच आले
४-५ लसूण पाकळ्या
साधारण १ इंच दालचिनीचा तुकडा
एक चमचा बारीक चिरलेला कांदा
१ चमचा जिरे
१ चमचा लाल तिखट
४ लवंगा
४-५ मिरे
३-४ वेलदोडे
२ चमचे साखर
अर्धा चमचा मिठ
१ टेबलस्पून अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड
पाव टीस्पून सोडिअम बेंझॉइट
हवा असल्यास लाल रंग

क्रमवार पाककृती: 

टोमेटो स्वच्छ धुवून पुसुन घ्यावेत. त्याच्या फोडी करून उकडून घ्यावे. जरा थंड झाले की उकडलेले टोमॅटो मिक्सरला वाटून घ्या. व तो रस गाळणीने गाळून घ्या. ह्यात टोमॅटोची सालं वर राहतील.
आले ते वेलदोड्या पर्यंत सगळे जरा जाडसर कुटुन एका पुरचुंडीत बांधून घ्यावे. गाळून घेतलेला रस आता एका पातेल्यात उकळायला ठेवावा व त्यात ही मसाल्याची पुरचुंडी सोडून द्यावी. रस चांगला उकळू द्यावा. साधारण निम्मे होईस्तोवर आटवावे. ते खाली लागणार नाही ह्याकडे पण लक्ष द्यावे.
नंतर पातेले खाली उतरवून त्यात गरम असातानाच साखर, मिठ, अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड, सोडिअम बेंझॉईट घालून ढवळून घावे.

अधिक टिपा: 

मी नेहमीच सॉस थोड्या प्रमाणावर करते त्यामुळे मी त्यात, वर उल्लेखलेले अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड, सोडिअम बेंझॉईट वापरत नाही.
अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड, सोडिअम बेंझॉईट हे प्रिझर्वेटिव म्हणून वापरले जातात. अर्थात सॉस फ्रिज बाहेर जास्त दिवस टिकवण्यासाठी.
मात्र ह्यांचा वापर शक्यतो टाळावा. त्याला पर्याय इथे जाणकार सांगतिलच.

माहितीचा स्रोत: 
सिंधूताईंच्या स्वयंपाकमधून मी पहिल्यांदा हा सॉस करून पाहिला होता. त्यात कधीच बदल करावासा वाटला नाही.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड, सोडिअम बेंझॉईट न वापरता फ्रीजबाहेर मी कधी ठेवून पाहिला नाही. फ्रिजमध्ये मध्ये महिनाभर तरी आरामात टिकतो.

हा खूप टेस्टी लागतो. फार पूर्वी आईने एकदा केला होता. मसाल्यांची चव अगदी फ्रेश येते. जी रेडिमेड मध्ये येत नाही. केचप तर गोडच असते.

व्हीनीगरमधे अ‍ॅसेटीक अ‍ॅसिडच असते. त्यामूळे ते वापरता येईल.
ते वापरल्यास खराब होण्याची भिती रहात नाही. बाजारच्या केचपमधे ते असतेच.

व्हीनीगरमधे अ‍ॅसेटीक अ‍ॅसिडच असते.>>>> पुढच्यावेळी नक्की वापरेन.
कांदा, साखर, जिरे, तिखट यासाठी टेबलस्पून वापरायचा ना?>>> टीस्पुन.
मी जेवणातला छोटा चमचा वापरते.

बाप रे, बरं झालं मी विचारलं. नाहीतर काहितरी भयंकर संयुग बनवलं असतं मी.

कृती छान आहे. बनवून पाहणार नक्की. Happy