जीझस ...... - कॅरोल

Submitted by बेफ़िकीर on 27 June, 2011 - 11:38

माझा एकाकीपणा रुमाल - पाणी खेळताना एखाद्याने रुमाल पळवावा तसा मला घेऊन जातो. माझ्यापासून दूर!

मग आपणच आपल्याकडे पाहणे, जसे आहोत त्याबद्दल थोडे रडणे आणि थोडे हासणे आणि मग पुढचा श्वास घेणे!

दिवसभर ऑफिसमध्ये थकून आल्यानंतर जेवणे झाल्यानंतर ओटा आवरणार्‍या पत्नीच्या केसांना चार पाच दिवसांपुर्वीच्या रविवार सकाळच्या शांपूचा सुगंध येत नसला तरी येत आहे असे वाटणे या अगतिकतेपासून एकाकीपण आपल्याला काही काळ सोडवते. तिला तिच्या अगतिकतेपासून कोण सोडवत असेल हा विचार स्वार्थी मनात येत नाही ही अगतिकता मात्र न सांगण्यासारखी ! 'मन बदलून मिळेल' अशी एकही पाटी जगात नाही. काही कवी मनस्थिती बदलून देतात तात्पुरती, मन नाही!

आपले मन 'तूर्त' कुणाकडे सुपुर्द करायचे ते मात्र ठरवता येते हे मला जेव्हा कॅरोलने सांगीतले तेव्हा आयुष्य हा 'एक रूम किचन फ्लॅट' नसून त्यात आणखीही अनेक खोल्या आहेत हे जाणवले.

त्या खोल्यांना लॉक होते हे तेव्हा समजले.

आणि 'कॅरोल' हे मुलीचे नांव असू शकते हेही तेव्हाच समजले!

"जीझस"

काही झाले की ती असे म्हणायची! त्यावेळेस तिच्या ओठांची आणि छातीची होणारी हालचाल आणि श्वास भरलेला आवाज यांचे मिश्रण, ज्या गोष्टीवर ती 'जीझस' म्हणायची ती गोष्टही सुंदर करून जायचे. तिने आणलेला टिफीन तिच्याच्याने उघडेना आणि त्यातील पेस्ट्री मला आणि तिच्या मैत्रिणीला देण्याची प्रचंड घाई या प्रसंगी ती पहिल्यांदा म्हणाली होती...

"जीझस"

बडोद्याहून नाशिकला आरामबसने येताना आरामबसमध्ये अजिबात आराम वाटू नये असे एक 'अ प्र ती म' ठिकाण लागते.

सापुतारा!

आणि सापुतारा हे ठिकाण 'ती तिथे नसली तर' रुक्ष वाटावे अशी कॅरोल नाशिकला जायला गाडीत येऊन बसली. ढगांच्या स्पर्शाने खाली उतरलेल्या प्रत्येकच प्रवाशाची त्वचा ओलावलेली आणि मन हुळहुळलेले होते. त्यातच गुजराथी स्वरुपाची भजी आणि एक अशक्य उच्च चहा असे मिश्रण जीभेवरून तरंगवत तरंगवत प्रत्येक जण आत येऊन बसलेला.

माझ्या पुढच्या आणि विरुद्ध बाजूच्या सीटवर कॅरोल अशी बसली होती की तिचा चेहराच मला दिसत नव्हता कारण तिचे केस त्याला झाकत होते.

सुंदर गोष्टी अप्राप्य असण्यातच जीवनाची मजा आहे. त्या प्राप्त होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची साखळी म्हणजे आपला जन्म आणि ती साखळीही सुंदरच व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे ही अध्यात्माशी झालेली जवळीक ! साखळी कुरूप होण्याचा अर्थ निसर्गाचे आणि मानवतेचे गुन्हेगार होणे आणि गुन्हेगार म्हणून जन्म मिळाल्यापासून अत्युत्तम साखळी निर्माण करण्याच्या बिंदूपर्यंतचा प्रवास म्हणजे मोक्षाकडे चाललेला प्रवास!

प्रसन्ना ट्रॅव्हल्सने त्यांच्या तिकीटात या पोटेन्शिअल सौंदर्याचे वर्णन केलेले नव्हतेच कारण आपलेच ड्रायव्हर्स मधेच उतारू घेतात हे त्यांना माहीत नव्हते. बसमध्ये चढणार्‍यांना उतारू म्हणणे हे बुटात पाय घालूनही पायात बूट घातल्यासारखे आहे.

माझी आणि तिची नजर एकमेकांत गुंफली ती कंडक्टरमुळे!

"यू हॅव चेंज? आय'ल गिव्ह बॅक अ‍ॅट नासिक"

कोण देणार नाही? दिले बुवा मी तरी सुट्टे!

पण एक मात्र सांगतो. आपल्या डोळ्यातून आपल्याच मनामध्ये इतक्या प्रभावीपणे एखादी नजर घुसते हे मला तेव्हा समजले आणि तीही आपली नजर नाहीच, दुसर्‍याचीच!

बुटकंच होत जरा ते येडं! पण बडबडायला लागलं!

"आयॅमॅट अ हास्टेल अ‍ॅन्नासिक, यू?"

"पुणे"

"सो व्हाय आर यू गेडिंडाउनॅन्नासिक?"

"टु गेट बॅक दॅट मनी"

दिल तो पागल है
दिल दिवाना है

हुस्न मुस्कुराया है!

सापुताराच्या थंड हवेत एक ओला ओला सुगंध पसरला आणि रोज डेन्टिस्टकडे गेलो तरी माझे कधीही होणार नाहीत तसे तिचे दात दिसले. सरळ, शुभ्र आणि तारुण्याची नशा आतच रोखून धरण्यासाठी उभारलेली चीनची भिंत असावी तसे! म्हणजे जीभ न दाखवणारे!

क्षण कसा जपायचा याचे क्लासेस काढावेत म्हणतो.

करोगे याद तो हर बात याद आयेगी

एकट्याने प्रवासासारखी मजा नाही. कारण त्यात तुम्ही 'तुम्ही' म्हणून वागू शकता. मी याचा मुलगा, तिचा नवरा, त्याचा भाऊ असे काहीही नसते.

कितीही साले काढली तरी गरच लागत नाही असे फळ असावे आणि शेवटी कळावे की हि साले म्हणजेच गर होता तसे माणसाचे व्यक्तीमत्व असते.

मला कलिंगड किंवा पोपईसारखे व्यक्तीमत्व असलेले लोक आवडत नाहीत. कारण ते लगेच हाताशी लागतात, लगेच समजतात. दुसरा पूर्णपणे कधीही न समजणे हे आयुष्य अत्यंत मनोरंजक असल्याचे निदर्शक तर स्वतःला स्वतः कधीही पूर्णपणे न समजणे हे मनोरंजनाला आयुष्य असे नांव दिल्याचे निदर्शक!

आयुष्याला मनोरंजन करायचे की मनोरंजनाला आयुष्य हे ज्याचे त्याने ठरवावे, मी दुसर्‍या कॅटेगरीत मोडतो.

कंटाळा यावा इतका उत्साह कुणाला आहे
कंटाळ्याचाही आता कंटाळा आला आहे

कुसुम नावाच्या मुलीने स्कर्ट घातला तर रसभंग होतो.

कॅरोलला काहीही शोभले असते. काही काळ तर तिला मीही शोभत होतो.

नाशिकला उतरल्यानंतर सुट्टे वगैरे देऊन टाकल्यावर उगाचच सेलफोन नंबर वगैरे देवाणघेवाण झाली आणि ती हॉस्टेलवरच असल्याचे माहीत असल्याने मी रात्री 'हाय' असा एसेमेस केला.

कॅरोलच्या 'खुली आणि बंद' दोन्ही 'पलकांमध्ये' प्यारच असावे. पण आपले साधेसुधे, नितळ आणि निखळ!

कारण तिचे उत्तर सकाळी आले.

लंचला भेटणार का? माझ्यातला 'मी'!

'नॉट शुअर'

अपेक्षित उत्तर!

आणि अपेक्षितच घटना!

लंचला भेटली.

जगातील एकाकी असलेल्या माणसांची संख्या जगातून आजवर मरून गेलेल्या माणसांपेक्षा जास्त आहे.

च्यायला लिहिताना माझा विश्वास बसत नाही पण आम्ही माझ्या रूमवर येऊन पत्ते खेळलो पत्ते! त्यानंतर तिने सुचवलेल्या तीन गेम्स!

कंपनीचे काम मी सकाळी निपटलेले होते. मी बहुधा टूरवर गेलो की असेच करतो. 'दुपार' माझ्यासाठी मोकळी ठेवतो. नाहीतर च्यायला स्वतःला कधी भेटायचे?

निसर्गाने स्त्री बनवली नसती तर जगातील तेहतीस टक्के लढाया झाल्या नसत्या पण उरलेल्या सदुसष्ट टक्के लढाया करायला कुणी जन्मालाच आले नसते.

आपल्या शरीराचे फुलपाखरू करण्याची अनोखी ताकद कॅरोलच्या नाजूक हातांमध्ये आहे हे मला जाणवले तेव्हा मला हेही जाणवले की.....

.... ती इथे आलीच कशी यावर मी विचारच केलेला नाही आहे..

खटकन मान खाली गेली.

घरातील बेडवर नागासारखे विळखे घालून घेतलेल्या आणाभाका आणि प्रणयाची मनमुराद बरसात हे खरे की आत्ताचा क्षण?

त्याक्षणी... त्या क्षणी माझा रुमालपाणीमधला रुमाल झालेला होता...

तिच्या चेहर्‍यावर असलेला निरागसपणा माझ्यातील निरागसपणा जागवत होता याचे वैषम्य वाटलेले मला अजूनही आठवते,.

एखादा माणुस आपल्याला झटक्यात असे 'एकाकी' का करतो?

घराच्या चित्राभोवती डोंगर, त्यातून उगवणारा सूर्य, झाडे, पाळीव प्राणी, काही माणसे वगैरे असावे आणि...

.... 'घर'च नसावे तसा मी त्या क्षणातून 'डिलीट' झालेलो होतो...

माझ्या व्यक्तीमत्वाच्या 'फळा'चे एक असे साल निघाले होते ज्याला मी आजवर 'गर' समजत होतो.

काही वेळाने चहा घेऊन निघालो आणि तिच्या हॉस्टेलवर गेलो तेव्हा तिची मैत्रीणही भेटली. तीही दिलखुलास, गप्पा मारणारी!

लिंगभेदापलीकडे जाऊन स्त्री पुरुष गप्पा मारतात हे कित्येकवेळा अनुभवलेलं होतं, पण 'या गप्पांत काय बुडतोस' असं आपल्याला खाणारं मन आपल्यालाच सुचवतं की 'अजून गप्पा मार'???

फळाची पूर्ण साले काढल्यानंतर आत बी असते आणि तिला चव नसते. किंवा कडवट चव वगैरे असते.

हेल विथ धिस लाईफ

पार अगदी हैदराबादला गेलो तरी तिलाच फोन आणि चेन्नईला गेलो तरी तिलाच फोन!

"जीझस, यु कॉल्ड्मी फ्रॉम्है'ड्रबड'?"

फोनवरही हवा भरलेल्या आवाजात उच्चारलेले किंवा येशूला आळवणारे हे शब्द ऐकताना कॅरोलच्या स्पंदनांची कल्पना येऊन मी थिजायचो.

तेव्हा रोमिंग असायचे. माझ्या सेलफोनला आणि तिच्या 'जीझसच्या' वेळच्या स्पंदनांना!

माझा सेलफोन नंबर ही माझ्या बायकोच्या खालोखाल टिकलेली माझी प्रेयसी आहे, गेली दहा वर्षे! म्हणजे पहिला नंबर मिळाला तोच अजूनही आहे. बायकोने रेकॉर्ड केव्हाच मोडलंय म्हणा!

धिरुभाई अंबानी स्कीम! एसेमेस फ्री! अनलिमिटेड!

पण कॅरोल लिमिटेड होती.

"विल यू कम?"

तिच्या मैत्रिणीने हा प्रश्न विचारला तेव्हा मी नॉयडाला होतो.

सत्यकथा आहे ही!

माझा तो रुमाल गेला तो... गेलाच!

तिच्या त्या पेस्ट्रीच्या क्रीमला ज्याची उपमा द्यावी असे पोट, चैतन्याला ज्याची उपमा द्यावी असे ओठ, दिलखुलासपणाची व्याख्या करणारा स्वभाव, नैसर्गीकतेला ज्याची उपमा द्यावी असे हावभाव, ब्राम्हणांनी शिकावे असे पावित्र्य, सवाष्णींनी शिकावे असे चारित्र्य, एक वर्षभर मनावर चढलेली नशा, नंतर मनाची झालेली दशा, मैत्रीचा अविरत वाहणारा रस..... जीझस... जीझस .... जीझस ... !!!!!

कॅरोल वॉझ डेड!

पार्किन्सन या वयात झाला होता तिला!

मी विवाहीत आहे हे माहीत असून आणि त्यानंतरची प्रत्येक नाशिक टूर मी फक्त तिच्याचसाठी ठरवलेली आहे हे माहीत असूनही एकेक दिवस आणि एकेक संध्याकाळ बफिकीरपणे माझ्यावर उधळवणारी आणि तरीही 'नुसतीच साले असलेले व्यक्तीत्व कधीच न स्वीकारणारी' कॅरोल गेली तेव्हा मी नाही जाऊ शकलो. आणि नंतर तिच्या मैत्रिणीला भेटण्यात काही अर्थच उरलेला नव्हता.

आजही जातो मी नाशिकला!

नाशिक ....... मायनस कॅरोल....

... जीझस....

दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो

-'बेफिकीर'!

========================================

नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826

जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871

घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000

नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? - http://www.maayboli.com/node/25088

मी सारखा सार्‍या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो - http://www.maayboli.com/node/25230

=================================

(सर्व नांवे काल्पनिक - या कथेतील सोडून)

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

बेफीकीर , जियो !!

ह्या कथेतील वाक्यनवाक्य आवडले !!

माझा तो रुमाल गेला तो... गेलाच! >>>

दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो>>>

जबरदस्त !!

सुंदर गोष्टी अप्राप्य असण्यातच जीवनाची मजा आहे. त्या प्राप्त होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची साखळी म्हणजे आपला जन्म आणि ती साखळीही सुंदरच व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे ही अध्यात्माशी झालेली जवळीक ! साखळी कुरूप होण्याचा अर्थ निसर्गाचे आणि मानवतेचे गुन्हेगार होणे आणि गुन्हेगार म्हणून जन्म मिळाल्यापासून अत्युत्तम साखळी निर्माण करण्याच्या बिंदूपर्यंतचा प्रवास म्हणजे मोक्षाकडे चाललेला प्रवास!

>>>>>> जीवनाला सुन्दर उपमा दिली आहे.

<< कितीही साले काढली तरी गरच लागत नाही असे फळ असावे आणि शेवटी कळावे की हि साले म्हणजेच गर होता तसे माणसाचे व्यक्तीमत्व असते. >>

मस्तच !

बर्‍याचशा गाळलेल्या जागा असल्याने गोष्ट निटशी कळली नाही पण त्यानिमित्ताने जे विविध विषयांवर चिंतन केलेय ते आवडले.

लिंगभेदापलीकडे जाऊन स्त्री पुरुष गप्पा मारतात हे कित्येकवेळा अनुभवलेलं होतं, पण 'या गप्पांत काय बुडतोस' असं आपल्याला खाणारं मन आपल्यालाच सुचवतं की 'अजून गप्पा मार'???

निसर्गाने स्त्री बनवली नसती तर जगातील तेहतीस टक्के लढाया झाल्या नसत्या पण उरलेल्या सदुसष्ट टक्के लढाया करायला कुणी जन्मालाच आले नसते.....

१००% अनुमोदन

एक्दुम छान... Happy

ओझरकर +१
त्याशिवाय, <दुसरा पूर्णपणे कधीही न समजणे हे आयुष्य अत्यंत मनोरंजक असल्याचे निदर्शक तर स्वतःला स्वतः कधीही पूर्णपणे न समजणे हे मनोरंजनाला आयुष्य असे नांव दिल्याचे निदर्शक> एक्दम झक्कास ! Happy

खूप काही आवडलय ह्या लेखातलं, बेफिकीर. खरंच आयुष्याबद्दल एक वेगळा चाकोरीबाहेरचा विचार मांडता तुम्ही. चाकोरीतल्यांना भुरळ पडेल.... कुठेतरी मनात "खरच... च्या*&" वगैरे येईल असा Happy
सुंदर.

आयशप्पथ..!! (जीझस म्हणणार होतो..)

केवळ अ प्र ति म...!

या लेखातली ओळनओळ कसली भयानक सुंदर आहे..! हॅटस ऑफ..! Happy

आवडत्या दहांत.

काय लिहाव कळत नाही.....
म्हणजे शब्दच नाहीत.....

सावरी

बेफिकीरीच्या मागचा माणुस मनाला भिडला !!
मी सारखा सार्‍या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो -

सहीच !!

"बसमध्ये चढणार्‍यांना उतारू म्हणणे हे बुटात पाय घालूनही पायात बूट घातल्यासारखे आहे. "
अप्रतिम, अशी वाक्य आवडतात.

खूप आवडलं. पुन्हा पुन्हा वाचलं.

बेफिजी, तुमचं लिखाण वाचत असते. पण हे काही विशेष आहे. तुमच्या आधीच्या शैलीशी न जुळणारं आहे. पण हेच जास्त आवडलं...

असं लिखाण पुन्हा वाचायला आवडेल Happy

फारच मस्त !

हे वाक्यही भारी!
निसर्गाने स्त्री बनवली नसती तर जगातील तेहतीस टक्के लढाया झाल्या नसत्या पण उरलेल्या सदुसष्ट टक्के लढाया करायला कुणी जन्मालाच आले नसते.
Happy

छानच लिहिलंय.
"कितीही साले काढली तरी गरच लागत नाही असे फळ असावे आणि शेवटी कळावे की हि साले म्हणजेच गर होता तसे माणसाचे व्यक्तीमत्व असते." >>> हे खासच.

ही कथा ही खुप सुन्दर..... अताशा मायबोली वर बेफिकीर ने लिहिलेली कथा दिसली तर मी अज्जिबात चुकवत नाही
मला नेहमीच तुमच्या कथे पेक्षा त्या कथेच्या अनुषंगाने आलेले विवेचन खूपच आवडते.....
आणि असे जगण्याचे किंवा समाजाचे नियम फाट्यावर मारून स्वतःला आवडेल तसे जगणारी तुमची पात्रे हि Happy