डाळ/तांदूळ ढोकळा

Submitted by तृप्ती आवटी on 5 September, 2009 - 11:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तांदूळ, १/२ वाटी हरबरा डाळ, १/२ वाटी उडीद डाळ, २ हिरव्या मिरच्या, ३-४ लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आले, मीठ, पाव चमचा हळद. फोडणीसाठी तेल, मोहोरी, जिरं, हिंग. सजावटीसाठी खोबरं, कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

तांदुळ आणि दोन्ही डाळी ५-६ तास एकत्र भिजवावे. पाणी उपसून टाकुन इडली/डोशासाठी वाटतो तसे वाटुन घ्यावे. थोडे मीठ घालुन ७-८तास आंबवुन घ्यावे. पीठ छान फसफसले पाहिजे.

ह्या पीठात १ टे स्पून तेल, हळद, बारीक वाटलेले- हिरव्या मिरच्या + आल्याचा तुकडा + लसूण आणि चवीप्रमाणे मीठ हे सर्व नीट मिसळुन घ्यावे. एका थाळ्याला (किंवा ढोकळे करायचे काही उपकरण असल्यास त्यात) तेलाचा हात लावुन पीठाचा हव्या त्या जाडीचा थर द्यावा. ढोकळा छान फुलतो. थाळा नीट बसेल अशा पातेल्यात अथवा कढईत घट्ट घाकण लावुन २० मिन वाफवुन घ्यावे. चांगली आंच लागली पाहिजे. ढोकळा झाला की पांढरी वाफ यायला लागते. पहिल्यांदाच करत असाल तर "नाइफ टेस्ट" करुन बघायला हरकत नाही.

गुजराथी पद्धतीने थोडा गोडसर ढोकळा करायचा असेल तर चमचाभर साखर घालावी. ताटात अगदी पातळ थर द्यावा. साधारण एक सेमिचा थर पुरेल. मिरची,लसणाची पाकळी एखादी कमी घालावी तसेच हळद घालु नये.

दोन्ही प्रकारात हिंग, मोहोरी, जिर्‍याची फोडणी आणि खोबरं/कोथिंबीर घालुन सजवावे.

dhokaLa.JPG

प्रकाशचित्रात पहिले चित्र आहे आईने केलेल्या ढोकळ्याचे. दुसरे आहे ते मी गुजराथी पद्धतीने केलेल्या गोडसर ढोकळ्याचे. आईने केलेला अर्थातच जास्त छान लागतो Happy

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांना पोटभर नाष्टा होतो.
अधिक टिपा: 

१. पीठ उन्हाळ्यात ५-६ तासांत छान फसफसते. एरवी मी रात्री ओवनमधे ठेवुन देते ढोकळे सकाळी करायचे असतील तर. अवन प्री-हीट करायची गरज नाही.
२. पीठ छान फसफसले नसेल तर मिश्रण ताटात घालण्याआधी अगदी एक मिनिट चिमुटभर सोडा घालावा.

माहितीचा स्रोत: 
आई :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजूडी,

मी घरी तांदूळ आणि डाळ भिजवलेली. पण इथला मिक्सर म्हणजे ब्लेंडर असल्यानं काही चिवडा झाला असेल का...म्हणजे थोडी कणी लागत होती हाताला. (त्यावर ढकलावा का झालेला पोपट?)

मी आता या विकएन्डला शेवटचा करून बघणार...नायतर न जमणा-या पदार्थांत पोळ्यांना एकटं वाटत असेल तिथे ढोकळ्यांना पोचवते झालं.

मला इतके आवडतात... रुनीची ओव्हनची आयड्या करून बघते.

धन्स सगळ्यांना... कधी मी केलेल्या खमंग, जाळीदार ढोकळ्याचे फोटो डकवणार देव जाणे.

चिवा, माझा फु स. स्क्रॅचपासून ट्राय करण्यापेक्षा आधी रेडिमेड मिक्सवय हात बसवून बघ. एकदा त्याचा कॉन्फिडन्स आला की स्क्रॅचपासून जमेल.

सायो शी सहमत! मलाही रेडिमेडच ढोकळा जमतो, फ्रॉम स्क्रॅच 'य' वेळा ट्राय करुन फार कमिवेळा जमलाय.
ढोकळा किंवा ईडली जमायला त्याच्या पिठातल्या पाण्यावरपण अवलंबुन आहे.
जरा पिठ पातळ झाले तर ढोकळा अजिबात फुलत नाही.

चिवा आधी चितळेचे ढोकळा मिक्स आणून करून बघ, सगळ्या सूचना तंतोतंत पाळायच्या काहीही बदल न करता. मला असा डाळ भिजवून वगैरे ढोकळा फारसा जमत नाही, गिट्सचे पाकीट आणले त्यावरच्या सूचना पाळल्या पण कधी जमायचा कधी नाही. मग चितळेंचे आणले त्याने एकदम झकास जमला.

रुनी, अगं हो...गीट्सचं मलापण नेहमी जमेलच याची खात्री नसायची. आता चितळे आणून बघते.

सायो...कोरेक्ट आहे...रेडिमेड जमला की मग एक पायरी पुढे जाता येईल. मुलींनो, ठंकू... खरंच... Happy

आमच्या मातोश्रींचा ढोकळा - http://vadanikavalgheta.blogspot.com/2010/05/dhokla-from-scratch.html

तूरडाळ, मूगडाळ, सालीची मूगडाळ, हरबरा डाळ, आणि कोणत्याही डाळींचे मिक्श्चर केलेतरी झक्कास होतो.

मी पण ढोकळ्याकरता पीठ वाटून ठेवलय. ते फसफसतंय की बेत फसतोय ते उद्या सांगीन.
>>> पहिला घाणा फारसा नामांकित नाही झाला. चव एक्दम ढिंगच्यॅक आहे पण पीठ कमी फसफसलं. आता अजून वाट बघतेय. आगे का आँखो देखा हाल देखिये एक ब्रेक के बाद! Proud

रुनी, अग मी थोडं पीठ घेऊन पसरट ढोकळे करायचं ठरवलं पण दुर्दैवाने ते पसरट आणि काहीसे चेमट पण झाले. बाकीचं पीठ अजून फुगण्याची वाट बघत आहे...... नाहीतर फ्रूट सॉल्ट आहेच. धन्स. Happy

ही वरची कृती मला आवडली आणि कळली सुध्दा. माझा ढोकळा कधीच जमत नाही. माझा एक खूपच बेसीक प्रश्न आहे. ढोकळा करताना, समजा कुकर मध्ये केला तर त्या ढोकळा पात्रावर झाकण ठेवायचं असतं का? मी आजवर फक्त रेडी मिक्सचाच ढोकळा केलाय पण अगदी तंतोतंत सुचना पाळून पण कधीच जमला नाही. झाकण ठेवून न ठेवून दोन्ही प्रकारे बिघडलाच आहे. आता ही कृती नक्की करून बघीन.

Pages