डाळ/तांदूळ ढोकळा

Submitted by तृप्ती आवटी on 5 September, 2009 - 11:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तांदूळ, १/२ वाटी हरबरा डाळ, १/२ वाटी उडीद डाळ, २ हिरव्या मिरच्या, ३-४ लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आले, मीठ, पाव चमचा हळद. फोडणीसाठी तेल, मोहोरी, जिरं, हिंग. सजावटीसाठी खोबरं, कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

तांदुळ आणि दोन्ही डाळी ५-६ तास एकत्र भिजवावे. पाणी उपसून टाकुन इडली/डोशासाठी वाटतो तसे वाटुन घ्यावे. थोडे मीठ घालुन ७-८तास आंबवुन घ्यावे. पीठ छान फसफसले पाहिजे.

ह्या पीठात १ टे स्पून तेल, हळद, बारीक वाटलेले- हिरव्या मिरच्या + आल्याचा तुकडा + लसूण आणि चवीप्रमाणे मीठ हे सर्व नीट मिसळुन घ्यावे. एका थाळ्याला (किंवा ढोकळे करायचे काही उपकरण असल्यास त्यात) तेलाचा हात लावुन पीठाचा हव्या त्या जाडीचा थर द्यावा. ढोकळा छान फुलतो. थाळा नीट बसेल अशा पातेल्यात अथवा कढईत घट्ट घाकण लावुन २० मिन वाफवुन घ्यावे. चांगली आंच लागली पाहिजे. ढोकळा झाला की पांढरी वाफ यायला लागते. पहिल्यांदाच करत असाल तर "नाइफ टेस्ट" करुन बघायला हरकत नाही.

गुजराथी पद्धतीने थोडा गोडसर ढोकळा करायचा असेल तर चमचाभर साखर घालावी. ताटात अगदी पातळ थर द्यावा. साधारण एक सेमिचा थर पुरेल. मिरची,लसणाची पाकळी एखादी कमी घालावी तसेच हळद घालु नये.

दोन्ही प्रकारात हिंग, मोहोरी, जिर्‍याची फोडणी आणि खोबरं/कोथिंबीर घालुन सजवावे.

dhokaLa.JPG

प्रकाशचित्रात पहिले चित्र आहे आईने केलेल्या ढोकळ्याचे. दुसरे आहे ते मी गुजराथी पद्धतीने केलेल्या गोडसर ढोकळ्याचे. आईने केलेला अर्थातच जास्त छान लागतो Happy

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांना पोटभर नाष्टा होतो.
अधिक टिपा: 

१. पीठ उन्हाळ्यात ५-६ तासांत छान फसफसते. एरवी मी रात्री ओवनमधे ठेवुन देते ढोकळे सकाळी करायचे असतील तर. अवन प्री-हीट करायची गरज नाही.
२. पीठ छान फसफसले नसेल तर मिश्रण ताटात घालण्याआधी अगदी एक मिनिट चिमुटभर सोडा घालावा.

माहितीचा स्रोत: 
आई :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचून लग्गेच उठून तांदूळ-डाळी भिजत घातल्या.

ढोकला ज्या पातेल्यात करतात त्याबद्दल कोणी लिहू शकेल का जास्त...

माझ्याकडे राइस कुकर आहे.
मोठ्या पातेल्यात पाणी घालून त्यात भांडं ठेवूनही वाफ आणतात ना बरेच जण...की ही चुकीची माहिती आहे.

मला हा ढोकळा जमला ना सिंडे, तर तुला मोदक पाठवणार...मला कधी मेला जमत नाही. तोंडात मारल्यासारखा होतो...फुलत नाही अजाबात. गिट्सचा केला तरी जमत नाही. थकलेय मी एकदम ढो च्या रेसिपीला. ही तुझीवाली रेसिपी हात देईल अशी आशा आहे. उद्या काय ते सांगण्यात येईल.

चिवा, मी साध्या प्रेशर कुकरमध्ये कुकरच्या भांड्यात करते. शिट्टी काढून टाकायची वाफवताना.

मी सांगते त्याप्रमाणे बघ जमतोय का ते. वरचा डाळ्+तांदूळ असो की गिट्स, दीप, चितळे पाकिटांचा असो.

सगळ्यात पहिलं म्हणजे कुकरमध्ये खालची जाळी बुडेल इतकं पाणी घालून अगदी बारीक गॅसवर ठेवून दे.
कुकरच्या भांड्यात ही ढोकळा मिक्स काढून घे. हाताने गुठळ्या मोडून घे. हे पाणी घालायच्या आधीच कर कारण पाणी घातल्यावर पटापट फेटायला हवा हाताने.
पाकिटावर जर १.५ कप पाणी लिहिलं असेल तर त्यापेक्षा जरा कमी पाणी घे. सव्वा कप वगैरे. आता हे हळूहळू घालत पटापट फेट हाताने. सगळं फेटून झालं की त्या मिश्रणात तेल घाल. दोन तीन मोठे चमचे साधारण. पुन्हा एकदा मिक्स कर आणि कुकरला शिट्टी काढून लाव. गॅस मिडीयम हवा. जर पधरा मिनिटं वाफवा म्हटलं असेल तर तू सतरा मिनिटं वाफव. गॅस बंद केलास की कुकर बंद ठेवून तसंच पाच मिनिटं आत असू देत मिश्रण. कुकरचा डबा बाहेर काढलास की दोन तीन ठिकाणी सुरी घालून नीट झालाय ना बघ आणि गार होईपर्यंत तसाच डब्यात असू देत. मग वड्या काप.

ढोकळा हा मला कधिही न जमणारा आणि म्हणूनच माझा ऑल टाईम फेवरिट पदार्थ आहे. हे नक्के करून पहाणार आहे. चिवा, तुझ्या ढोकळ्याचं काय झालं? हिट की मिस?
सिंडीबाय थांकू.

अगं केलाच नाही... Sad पालक घालून धिरडीश काहीतरी केलं.
आंबलं नव्हतं. घरी सोडा नव्हता.

काल इनो आणला...आता करणारे. या विकएन्डला...नक्क्की...

सिंडरेला,
मस्त आहे की तुझी पाकृ. मला ढोकळा खूप आवडतो.
पण तु साखर घातली नाहीस का अज्जिबात? Uhoh
मला गोड ढोकळा आवडतो...

चिवा मुंबईत असतेस ना तू? इथे हे पीठ इडलीसारखंच छान आंबतं. मस्त होतोत ढोकळा एकदम. सोडा न घालता कर शक्यतो... पण मुंबई सोडून कुठे असशील तर आंबण्याबद्दल काही नाही सांगणार Happy

सिंडरेला, तुझ्या आईला माझे आभार सांग आणि तुलाही. कालच केला होता आज डब्यातपण आणलाय. फक्त कॅमेर्‍याने माझ्यापासुन घटस्फोट घेऊन लेकिशी घरोबा थाटल्याने मला फोटु डकवता आलेले नाहीत.
पण चविला अतिषय अप्रतिम झाला होता म्हणुन लगे हाथ हापिसात पण आणला. आता माझं कौतुक करणारी चार माणसं अजुन वाढतील. धन्यवाद ग तुला. Happy

मी पुन्हा भिजवलं पीठ. पण ते नाहीच्चे आंबत...काय करू आता...मी त्यात इनो (खास आणला परवा ढोकळ्यांसाठी) घालून पाहिला, ताक घालून पाहिलं...पण पीठ जैसे थे...प्लीज मदता.

मंजूडी, मी सध्या डॅलसमध्ये...

चिवा, सोडा घातला तर जोडीला काहीतरी आंबट घालायला हवं फसफसायला. लिंबूरस / सायट्रिक अ‍ॅसिड यांपैकी काहीतरी चमचाभर घालून बघ. सोडा+आंबट घातल्यावर मिश्रण फेसाळेल, हा फेसच उकडत लावायचा आहे. (म्हणजे फेसाळल्यावर वेळ जाऊ द्यायचा नाही.) त्यासाठी कुकरला पाणी उकळत ठेवून मगच सोडा घालायचा.
सोडा घालून केला तर फोडणीत हळद घालायची नाही. लाल होते.

मेधा, गराज नाही गं...अपार्टमेंट हाये.

स्वाती, मी अगदीच चुका -खिळे करून ठेवलेत म्हणजे. सकाळी सोडा घातला...मेलं काहीच होताना दिसत नाही म्हणून मीठ, हळद घालून ठेवली. म्हटलं संध्याकाळी तुम्हा लोक्स ना विचारून काय ते करू...

आता काय करू....आता तांबडा होईल का ढोकळा...ताक घालून ठेवलय शिवाय...एडिबल तरी राहील ना हे सर्व...

संध्याकाळी गेल्यावर एक चमचा लिंबूरस घालून बघ. फेसाळलं तर ढोकळा होईल, नाहीतर या वेळी पाटवड्या म्ह्णून खा. Proud
पुढच्या वेळी सोड्याचं लक्षात ठेव. नक्की चांगला होईल. Happy

चिवा, मला बिघडलेला ढोकळा पण खूप आवडतो. माझ्याकडे घेवून ये. Happy
आता हे ढोकळा प्रकरण करायलाच हवं ह्या विकांताला.

नाही जमला. Sad

स्वाती, लिंबू आणि सोडा घातला घरी गेल्यावर, ते फसफसलं पण सगळं नाही. आणि हे घातल्यावर ढवळायचं की नाही. मी काहीतरी फारच चूक केलं बहुधा.

मग खरंच पाटवडीश काहीतरी करून चेपलं. चव चांगली होती पण ढोकळा कधी जमणार मला?

चिवा नॉट टु वरी. मी अत्ताच ब्रेक फास्ट म्हणुन ते ठोकळे खाल्ले. अगदीच वाईट नाही लागत. ईडली आवडेश तर हे खपेल. अगदिच नाही पण थोडासाच फुलला ढोकळा. सकाळि मी मजेत 'फुलले रे पीठ ढोकळ्याचे फुलले रे' म्हणत होते पण शिजल्यावर तो ईडलीचे अपर व ढोकळ्याचे लोअर वर्जन झाला.

भारताबाहेर पीठ आंबवतांना कस लागतो. त्याला फसफसायला हवे ते तापमान मिळणे जरा ट्रीकी असते.
मी कुठलेही पीठ आंबवायचे असेल तर ओव्हन आधी २०० फॅ. ला प्रिहीट करून घेते व मग त्यात पीठ ठेवते रात्रभर. सकाळी एकदम मस्त फुगलेले असते.

छान टिप्स आहे ढोकल्याला मोहरी, हिंगाची फोडणी झाल्यावर
त्यात थोडे पाणी घालावे व मग ढोकाळ्यावर घालावी ढोकला
हलका आणि जाळीदार होतो .

त्यात थोडे पाणी घालावे व मग ढोकाळ्यावर घालावी ढोकला
हलका आणि जाळीदार होतो .>> मी एकदा हा प्रकार केला, ढोकळा ओला झाला हलका नाही. Sad

मोनाली, तू ह्या ढोकळ्यासाठी काय काय कसे कसे केलेस ते लिहीशील का इथे? मी कुठे काय कसे करायला हवे होते ते सांगू शकेन. कदाचित चिवालाही उपयोग होऊ शकेल त्याचा...

सकाळी डाळ तांदुळ भिजत टाकले, रात्री बारिक केले, त्यात आले, लसुण, मीठ, मीरची टाकले.
सकाळी बरे फसफसले असल्याने सोडा टाळला. व कुकर ला लावले जसे ईडली लावतो.

हळद, लसूण, मिरची इत्यादी ढोकळा वाफवायच्या आधी पिठात मिसळ. आणि रात्री पीठ वाटशील ते हाताने चांगले फेटून घे आणि मग झाकण ठेवून आंबवायला ठेऊन दे.

Pages