भालचंद्ररावांनी हिंदूच्या मुलाखती द्यायला सुरूवात केल्यापासून हिंदू एकदम (प्रसिद्धी पूर्व) प्रकाशझोतात आली. आम्हास हिंदू वाचावी की नाही ह्याची चिंता लागलेली असतानाच विविध मान्यवर वाचकांनी व आम्हा सारख्या स्वघोषीत समिक्षकांनी हिंदू बद्दल भरपूर उलटसुलट लिहिले. आता उलटसुलट लिहिणे हे क्रमप्राप्तच आहे, काय करणार शीर्षकच हिंदू! उत्सायात्साते आम्ही हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ ६५० रू वजा टिच्चून १५ टक्के डिस्काउंट घेऊन मिळवली. आणि आम्ही बॅक टू द फ्युचर (की पास्ट? ) राईडीस तयार झालो.
हिंदू सुरू होते तीच मुळी मोठ्या स्वगतांतूनच. त्यातून आम्हास कळले ही खंडेराव नावाच्या कुण्या व्यक्तीची ही कहाणी. तो जातीने (आता हिंदू म्हणले की जात आली हे ओघानेच, ती द्विरुक्ती टाळून आम्ही जातच म्हणणार) कुणबी. मोप शेती बिती असलेला पण शेती करायची इच्छा नसलेला. खंडेराव घरातून श्रीमंत! अठरा प्रहर त्याचा खरी माणसांची ये-जा. पण गड्याला शिक्षणाची आवड. तो मोरगाव नावाच्या गावी राहतो, शिकतो, पूढे औरंगाबादेस येतो अन तिथे उच्चविद्याविभूषित होतो पण तरीही मनाने स्थिर नसतो. जाती व्यवस्था, पॉलीटिक्स, शेती की शिक्षण, घरची नाती आणि भारताचा पुरातत्त्व इतिहास हा सर्व गोंधळ त्याचा मनात कायम धुडगूस घालत असतो. त्यातच तो अचानक हिंदू संयुक्त कुटूंबाचा कुटुंबप्रमुखच होतो. मी जरा पुढेच गेलो. अन चार ओळीत हिंदूची कथाच सांगीतली नाही का? पण मग पास्टचे काय? तर ही कादंबरी वर्तमानातून भूत व परत वर्तमान अशी फ्लॅशब्याक स्वरूपात येते.
खंडेराव हा पुरातत्त्व विषयात पि एच डी करत असतो. आता पुरातत्त्व आले की आपण हडप्पा, मोहंजो-दाडो बद्दल बोलणार ही तुम्ही ताडले असेलच. अगदी तेच. उत्खननासाठी तो मोहंजो-दाडोला गेलेला असतो, तिथे त्याला वडील मरायला टेकले असल्याची तार येते आणि त्याचा सिंधू संस्कृती पासून परत मोरगावाकडे प्रवास चालू होतो. पाकिस्तान ते भारतातील मोरगाव एवढा मोठा प्रवास, त्यातच वडील आजारी म्हणजे वेळ जाता जाणार नाही, त्या प्रवासात त्याला आपले लहाणपण, भावंड, घरची माणसं, नाती-गोती, आला-गेला, बाराबलूतेदार, चिमणी-पाखरं, मोत्या-मुत्या, झीबू-ढबू , महार-मांग, पेंढारी-लभाने, होळकर-पेशवे, वेशीमधले-वेशीबाहेरचे, मराठा-कुणबी, वैदू-ब्राम्हण, तिरोनी आत्या ते चिंधी आत्या, मोरगाव ते औरंगाबाद, शेती ते पुरातत्त्वखाते, सिंधूसंस्कृती ते आजचे हिंदू हे सर्व आलटून पालटून त्याचा मनात पिंगा घालत असतात. पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा!! त्याचे मन हे असे धाव घेत असताना आम्ही त्यासोबत खंडेरावाचा प्रवास करत होतो. त्याच्या विचारातून मोरगाव सतत डोकावत राहते. त्याचे विचार केवळ शेती पुरते मर्यादित नसून ते विविध विषयांना स्पर्श करत असतात. उदाहरणार्थ तुलनेने अशिक्षित असलेल्या जातींमधील लैंगिक स्वातंत्र्य असो की भारतातील अनेक जमातींमधील स्त्रियांचे सामाजिक स्थिती, त्याची चिंधी आत्या नवर्याचा खून करते तो प्रसंग फारच मस्त उतरला आहे. चिंधी आत्याची घुसमट ही अनेक स्त्रियांच्या घुसमटीची प्रतिनिधित्व करते तर गावात असलेली लभानी वेश्या ही मुक्त असणार्या समाजाचे प्रतिनिधित्व करते. महार-मांग कुणब्याच्या शेतात काम करणारा भाग असो की विठ्ठलरावांनी गावाच्या उचापती सोडवण्याकरता केलेले लष्कराच्या भाकर्या भाजण्याचे काम असो, प्रत्येकाशी वाचक (खेड्यात न राहताही) रिलेट होऊ शकतो. आणि त्यामुळेच कदाचित हिंदू ह्या शब्दाचे प्रयोजन! ग्रामीण भागातील रुढी परंपरा व एकमेकांमध्ये गुंतलेली समाजाची अर्थव्यवस्था नेमाडे बर्यापैकी ताकदीने उभी करतात. बर्यापैकी लिहिण्याचं कारण बरेचदा पाल्हाळ लावले आहे, ते टाळता येते.
नेमाडे आपल्या त्याच त्या शैलीतून बाहेर येत नाहीत हे कादंबरी वाचताना प्रकर्षाने जाणवत राहते. उदाहरणार्थ
खंडेरावाचे व्यक्तीचे इंटर पर्सनल स्किल्स थेट आपल्या पांडुरंग सांगवीकरासारखे. आता हा पांडू कोण? हा प्रश्न तुम्हास पडला असेल. अहो पांडू म्हणजे आपला पिसपीओ. पांडूसारखेच खंडेरावास घरातल्या माणसाची घृणा (अपवाद त्याचा भाव भावडू) आई वडिलांबरोबर संबंध चांगले नाहीत, आई वडील पांडू सारखेच त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येतात पण बंड करून खंडेराव आपले इत्सिप्त साध्य करतो, त्या घडामोडी थेट कोसलाच्याच, ते कारेपण, मनाशीच चाललेली कुस्ती ह्याची तुलना वाचक नकळत कोसलाशी करतो. नेमाड्यांनी खंडेरावाचे कॅरेक्टर पांड्यावरून उचलले असल्याचे जाणवत राहते. पण थोडे वेगळे व्हर्जन. हो आता मारूती ८०० देखील इतक्या वर्षांनंतर कात टाकते, तर पांडू टाकणारच. पांड्याचे जाऊद्या तुम्हाला चांगंदेव माहित आहे का? औरंगाबादेतील बरीचशी घालमेल त्या चांगदेवासारखी. शिक्षणाची व शिक्षण संस्थांची ऐशी तैशी करणारे शिक्षण महर्षी व पॉलीटिक्स व एकूणच विद्यापीठातील भानगडी हे सर्व परत थेट चांगदेवासारखेच. फक्त तेवढे पाल्हाळ लावले नाही. तरी औरंगाबाद प्रकरणात १०० एक पाने खर्ची घातले आहेतच. आम्हास नंतर असे वाटले की पांडुरंगाच्या अस्वस्थपणात त्याच्या घरचे लोकं दिसत नाहीत, ते ओघाने पांडुरंगाचे कॅरेक्टर बिल्डींग साठीच येऊन जातात पण खंडेरावाच्या वेळी मात्र घरच्यांची सांगड घालून त्यात गावाची, गावकी-भावकीची भर टाकली आणि चांगदेवाच्या प्राध्यापकी, शिक्षकीपेशाची, हॉस्टेलच्या वातावरणाची फोडणी दिली की झाला खंडेराव अन पर्यायाने हिंदू तयार. चटणी म्हणून केवळ पुरातत्त्व येते. खरे तर नाव वाचून आम्ही हिंदू कडून खूप अपेक्षा वगैरे करून बसलो पण भलताच अपेक्षाभंग झाला.
खंडेराव हे नाव हिंदू, सिंधू संस्कृती हिंदू म्हणून हे नाव हिंदू. खंडेरावासारखाच कोणी इस्माईल खान असला असता तर कदाचित इस्लाम जगण्याची समृद्ध अडगळ असे नाव आले असते असे प्रथमदर्शनी वाटणे साहजिक आहे. आणि खरेतर कुण्या एका अमेरिकन बॉबची कथा जरी अशीच वाटली तर ती अमेरिकन, जगण्याची समृद्ध अडगळ असे नाव कोणी ठेवले तर वावगे नाही. तसेच पुस्तक प्रसिद्धी पूर्व चर्चेत हिंदू नावामुळे आले व त्यातच लेखक नेमाडे मग काय! मुलाखतीतून नेमाडे हिंदू धर्माबद्दल अनेकदा बोलले, रुढी परंपरांवर ताशेरे वगैरे ओढले, काही माहिती दिली जसे कृष्ण तीन होते वगैरे. आम्हास कादंबरी वाचून असे कळाले की हे सर्व त्या प्रसिद्धीसाठी ! कादंबरीत काही वेगळेच येते. कारण आम्ही तीन कृष्णांची कथा कधी येते ह्या उत्साहात्साते वाचत गेलो, पण किशन्या गावलाच नाही! वर तर वर खंड्याच मध्ये मध्ये बोअर मारू लागला.
त्यातल्या त्यात चांगली बाब अशी खंडेराव नुसतेच पाल्हाळ लावत नाही, पाल्हाळात कधी कधी समृद्ध बोलतो उदा " अशा रितीनं श्रमाला केंद्रस्थानी ठेवून नैसर्गिक पिकांनी पृथ्वीची शान वाढवणारी आत्ममग्न स्वायत्त कृषी संस्कृती परावलंबी होत गेली. याउलट, भाषेला केंद्रस्थानी ठेवून शोषण करणार्या नागरी, ऐतखाऊ औद्योगीक व्यापारी संस्थेची भरभराट झाली" हे वाक्य आजच्या भारतीय कृषी व्यवस्थेला अगदी लागू होतं. किंवा " आपला देश परदेश तर परदेश देश आपला" ही एखाद्या पुरातत्त्व चित्रा वरील खून उलटी किंवा सुटली वाचल्यावर येणारी गंमत आणि त्याचा गंभीर अर्थ किंवा प्रत्येक भारतातील प्रत्येक जातीचे स्वतःचे असे काही वैशिष्ट्य वगैरे वगैरे.
खंडेरावाला नुसत्या मुद्रा संशोधनात रस नाही तर त्याला त्या पाठी मागे असलेल्या मानवी विचारांच्या बद्दल संशोधन करायचे असते. जाणिवांच्या उत्क्रांती बद्दल खंडेराव बोलत राहतो. पण त्याचे गाईड त्याला तसे करता येत नाही असे सांगतात. सध्या पाश्चात्यांची इतिहासावर मालकी आहे, इतिहासात बंडल चालतात, पुरातत्त्व हे अस्सल. मडक्यावरच्या आकृत्या, मोंहजोदाडोला सापडलेल्या मूर्ती हेच खरे, तिथे बदल नाही आणि तेच खरे, तोच संस्कृतीचा पुरावा, असे त्याचे सर त्यास सांगू पाहतात पण खंडेरावास जाणिवांच्या उत्क्रातींवर काम करावे वाटते. आधी मातृसत्ता, पितृसत्ता नंत्तर कुटूंब, समाज, धर्म, विज्ञान पुढे काय? हे प्रश्न त्याला पडत राहतात.
कादंबरीचा काळ स्वातंत्र्यपूर्व ते उत्तर असा विभागलेला आहे. पुढे कादंबरीत युरिया, बियाणे ह्यामुळे झालेली हरितक्रांती देखील मोहंजोदाडोच्या जोडीला येऊन बसते. त्यातच मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रकरण पण आणतात. खंडेरावास गझल प्रकार आवडतो. गालिब, मिर असे सिद्धहस्त शायर व त्यांचे शेर तो मध्ये मध्ये आपल्याला सांगतो. त्याचे रूम पार्टनर चौघे चार जातीचे, त्यांच्या लकबी, विचार मध्येच येतात. पूर्ण कादंबरीच आठवेल तसे लिहिणे, असा बाज नेमाड्यांनी ठेवला आहे. तो कधी कधी बराही वाटतो. काही काही ठिकाणी अशक्य विनोद निर्मितीही आहे.
एकूणच ही कादंबरी मराठी साहित्यातील अडगळ ठरते की काय आहे असे आमचे मत झाले. आता ती समृद्ध अडगळ आहे की नाही? हा प्रश्न प्रत्येकास पडणे साहजिक आहे. आम्हास विचारले तर हो जर ती पूर्ण कादंबरी एकुण ३ एकशे पानांचीच असली असती तर कदाचित समृद्ध ठरलीही असती, पण खंडेरावाचे पाल्हाळ कधीकधी वाचायला बोअर होते अन ती त्या कादंबरीतील अडगळ नेमाडे दुर करू शकले नाहीत. बाराबलूतेदार, कुणबी मराठा, स्वायत्त ग्रामव्यवस्था, आणि हजारो वर्षे चालत आलेल्या संस्कृतीमुळे निर्माण झालेल्या काही रूढी परंपरा ह्याचा आढावा नेमाडे घेतात. एकूण त्यांच्या लिखाणातून. 'हे जे काही कडबोळं आहे ते अगदीच वाईट नाही, थोडा धुळ झटकली तर फरक पडेल' असा सूर दिसतो.
तुम्ही म्हणाल की नक्की आम्ही काय समीक्षण केले? कादंबरी घ्यावी की नाही? गोची तीच तर आहे. कधी बरी तर कधी अगदीच फ दर्जाची वाटते. काही भाग खरचं चांगला उतरला आहे, पण पुनरुक्तिचा दोष स्विकारून पाल्हाळ लावले आहे हे आम्ही इथे सांगू इच्छितो.
प्रश्न उरतो मग आम्ही समीक्षण का केलं? सोपं आहे. मायबोलीवरील अडगळ वाढवण्यासाठी! हे समीक्षण आणि ती कादंबरी समृद्ध आहे की अडगळ हे तुम्हीच ठरवा.
वाचक, अहो पांडूरंगांच्या वेळी
वाचक, अहो पांडूरंगांच्या वेळी झालंय ना ते मांडून मग आता पुढे जायला काय हरकत?
त्या लेखकाला माहित आहे की मायबोलीवरील बरेच लोक वाचणार आहेत. नि मायबोलीवर तर गेली चार पाच वर्षे तेच तेच लिहून त्यावर तीच तीच चर्चा करणारे, हसणारे लोक आहेत.
अजून त्रिज्या मध्यातून गेली की नाही हे कसे कुणि सांगितले नाही? कक्षा रुंदावल्या का? फॉसिलायझेशन झाले आहे का? आशयाची खोली मीटरमधे मोजावी का फुटात? फुटात मोजली तर भारतीयांना राग येईल, नि मीटरमधे मोजली तर अमेरिकनांना समजणार नाही.
त्याशिवाय साहित्याचे मूल्यमापन कसे होईल?
बापरे, बराच काथ्याकूट झालेला
बापरे, बराच काथ्याकूट झालेला दिसतोय. सर्व प्रतिसाद अगदी लक्षपूर्वक वाचले नाहीत, पण बेफिकीररावांच्या प्रतिसादाबद्दल म्हणावेसे वाटते, की मी तरी समीक्षा कुठे केलेली आहे असं मला वाटत नाही. मला काय भावलंय एवढंच मी लिहिलंय. बाकी प्रत्येकाला तेच भावलं पाहिजे किंवा माझ्या दृष्टीला त्यात फार काही दिसलंय सौंदर्यपूर्ण असं मी काही म्हणत नाही. आता त्यांना त्यात कंटाळा आला असेल कदाचित. पण म्हणून सगळ्यांनाच येईल असं तरी कुठाय? रनिंग कॉमेंटरी वाचून कुणाला आनंदही होत असेल. पण ते पुस्तक अगदीच टाकाऊ आहे असं मला वाटत नाही असं मी म्हणेन.
बाकी केदारचा प्रतिसाद बराच आवडला. त्याचा अपेक्षाभंग झाला हे पटू शकते. नेमाड्यांच्या लिखाणात तेच ते मुद्दे येत राहतात हेही खरं. मी आधी म्हटल्याप्रमाणे मला ते नवीन सेटिंगमध्ये ब~याच दिवसांनी बघायला मजा वाटली. मी स्वतः त्यांच्या मुलाखती वगैरे वाचल्या नसल्याने मला त्याबद्दल काही म्हणता येत नाही. ती कादंबरी ग्रेट आहे असं मीही म्हणत नाही.
> मला तरी हिंदू वाचायला पेशन्सवर तान द्यावा लागला नाही. स्मित वाचणे आवडले. अगदी श्री ना किंवा खानोलकर ज्या आवडीने किंवा कोसला जसे आवडले तसेच ही पण वाचली.
ह्याला +१
दुसरा काय म्हणतो म्हणून वाचणं
दुसरा काय म्हणतो म्हणून वाचणं सोडणं-सुरु करणं ह्याला काही अर्थ नाही. स्वतः ठरवायला हवं! >> अनुमोदन ट्यागो. केदार, नेमाडे करू देत की कितीही अँटिसिपेशन बिल्ड. त्यांचे अपत्य आहे ते, म्हणजे त्यांचा बाळ्याच म्हणा की. आपले आपण ठरवू बाळ्या नक्की कसा आहे ते.
कादंबरी फारसा न आवडल्याचा तुझा मुद्दा बरोबर असेल. (तेच ते फेमस- अॅग्री टू डिसअॅग्री). वरती मी जे लिहिलेय- पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या एक समृद्ध, सेल्फ डिपेंडंट अशा गावगाडा व्यवस्थेकडे, तिच्यातल्या बर्यावाईट गोष्टींकडे आणि कालौघात तिच्या पदरी आलेल्या हताशतेकडे केदार कसा बघतो- याची उत्सुकता होती- एवढाच माझा मुद्दा होता, बस.
नेमाडेंच्या मुलाखती बघून 'हाच का तो अफाट लिहिणारा माणूस?' असा प्रश्न पडण्याइतक्या आक्रस्ताळ्या आणि राईचा पर्वत करणार्या असतात. त्याकडे अजिबात लक्ष देऊ नये.
आस्चिगा, पॉईंटाचा मुदा आहे.
वर्षानुवर्षे फारसा आशय नसलेल्या गोष्टीप्रधान कादंबरी लिहिणार्या मराठी लेखकांवर दातओठ खाऊन नेमाडेंनी गोष्ट सांगायला मुद्दाम लांबण लावणारी स्वतःची पाल्हाळ शैली डेव्हलप केली असेल. पण मला तरी हे पाल्हाळ कानात सतत काहीतरी गोड संगीत वाजून ब्रम्हानंदी टाळी लागल्यासारखे वाटते.
ती कादंबरी आली आणि गेलीही..
ती कादंबरी आली आणि गेलीही.. कुणाला काहीफरज्क नाही पडला... सत्य साईबाबापासून अ बापूपर्यंत सगळे अडगल पुसत आहेत, कशाअला काळजी करायची?
आर्किऑलॉजिस्ट नायकामुळे मला
आर्किऑलॉजिस्ट नायकामुळे मला एकूणच कादम्बरी वाचायची उत्कन्ठा होती. मी जेव्हा वाचली तेव्हा कुठेही पेशन्स वगैरे ठेऊन वाचायची गरज पडली नाही. उलट उत्कंठा वाढीला लागत होती. फ्ल्याशब्याक प्रकार वेगवेगळ्या कालखंडात घेऊन जातो तरी पुन्हा 'समेवर' योग्य जागी येतोच. (मुळातच अजूनही यापुढचे भाग येणार आहेत असे नेमाडे म्हणताहेत. )
पेशन्स बद्दल बोलायचे तर कितीतरी इंग्रजी कादम्बर्या पहीले पन्नासएक पाने वाचेपर्यन्त कुठे जाताहेत हेच कळत नाही. उदाहरणादाखल माझी 'आवडती' फाउन्टनहेड घेता येईल. आयन रॅन्डचीच 'अटलास श्रग्ड' निम्मी वाचून झाली तेव्हा कुठे सूर सापडतो.
त्यापेक्षा हिन्दू मला पहिल्या स्वप्नापासून स्मजायला आणि आवडायला लागली.
प्रत्येक लेखकाची स्वतःची एक
प्रत्येक लेखकाची स्वतःची एक शैली असते.शैली ही आजवरच्या जगण्यातून आलेली अभिव्यक्तीची पद्धत असते.ती वयानुसार बदलू शकते,पण बदलेलच असे नाही.प्रत्येक चांगला लेखक स्वतःच्या शैलीच्या प्रेमात पडलेला असतो.मी अजून 'हिंदू' वाचली नाही.पण कोसला ,बिढार वाचल्या होत्या.कोसलात बराचसा घाबरट,लहरी,बालीश वाटणारा नायक बिढारमध्ये बराचसा मच्युअर वाटतो.
वाचकांनी पूर्वी विशिष्ट लेखकाची काही पुस्तके वाचली असल्यास कदाचित पूर्वीच्या वाचनाचा परिणाम(याला आपण पूर्वग्रह सुध्दा म्हणू शकतो) म्हणूनही ते 'वाचक' म्हणून नंतरच्या लिखाणाला न्याय देण्यात कमी पडू शकतात .तर कधीकधी आपल्या पहिल्या पुस्तकावर अनेक लेखकांचे प्रेम असते.त्यामुळे आपल्या पुढच्या पुस्तकांवर सुध्दा पहिल्या पुस्तकाची ची छाप उमटून जाते;हे कदाचित लेखकाच्या नकळत सहजपणे घडत असते.मला वाटते वाचकांनी वाचताना लेखकाच्या पूर्वीच्या लिखाणाशी तुलना न करता वाचले,तर वाचनाचा आनंद चांगल्या प्रकारे घेता येईल.
झक्कीकाका, आपण त्यांची एक ओळ,
झक्कीकाका,
नसेल तर मग इथे लिहीण्याचे (काडी टाकणे हा अधिकृत हेतू वगळता)प्रयोजन काय?
आपण त्यांची एक ओळ, एक कादंबरी वाचली आहे का?
बाकी तुम्ही नेमाडे वाचाच. काही नाही तर निदान तुम्हाला फटकेबाजी करायला नवीन विषय मिळेल. तुम्हाला आवडेल.
भास्कर,
चिल. तू लिही. ते समीक्षा वगैरे पर्सनली नको घेऊस. ते इथे नेहमीचे आहे.
केदार,
तुझी नक्की भूमिकाच मला कळत नाहीये. संमिश्र आहे.
अहो पांडूरंगांच्या वेळी झालंय ना ते मांडून मग आता पुढे जायला काय हरकत? >> नक्की झालंय?
तुला चांगदेवही पांडुरंगाचाच अवतार वाटतो. मला नाही वाटत.
मला हिंदू आवडली. त्यातल्या
मला हिंदू आवडली. त्यातल्या अतिसविस्तर वर्णनासकट आवडली. मलाही आधी ते अती वाटले होते. पण विचार करता लक्षात आले की 'पाल्हाळ' लावून बोलणे हे आपल्या ग्रामीण जनतेचे वैशिष्ट्य. शेती व शेतीसंबंधित कामे आटपली, तो विशिष्ट वार्षिक काळ गेला की बराच वेळ शिल्लक, मग पारावर/चावडीवर बसायचे आणि त्यातून जन्मलेली ही संवादपद्धती. दमामि, शंकर पाटील, खरात यांच्या साहित्यात ती बर्याच वेळा भेटते, शिवाय आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतात. मला वाटले की कदाचित आपला गावगाडा हेच एक साक्षात पाल्हाळ आहे. जातीजमाती, विविध पेशे, प्रत्येक जातीच्या, पेश्याच्या रुढी व प्रथा, एकमेकांवरचे अवलंबित्व, ते निभावण्याच्या परत प्रथा व रूढी....... एकेक गोष्ट बघत गेलो तर अत्यंत बारीकसारीक तपशिलांचा विचार केला गेलाय असे दिसते. उतरंडीची समाजव्यवस्था असे वरवर म्हणायचे पण ही उतरंड गुंतागुंतीची -
चांभार सोनार कुलकर्णी आप्पा / यांची संगत नको रे बाप्पा
अशी म्हण एकीकडे आणि दुसरीकडे एकमेकांवरचे अवलंबित्व. तर हे सगळे सुखकर अस्तित्वासाठी लावलेले पाल्हाळच. ते धागेदोरे त्यांनी आताच्या काळापर्यंत आणून ठेवले आहेत. ते मला सूचक वाटले. आपले जगणे म्हणजे शेवटी 'नव्या बाटलीत जुनीच दारू' की काय?
'ही एक ५ सेंमीची रेषा आहे' असे वर्णन करता येते आणि '-----------------' हेसुद्धा. केवळ वर्णनाद्वारेच नव्हे, तर खुद्द वर्णनपद्धतीद्वारेदेखिल काही सांगणे हे साहित्यात मुळीच नवे नाही. तसेच काहीसे नेमाड्यांना करायचे असेल असा दाट संशय येतो.
हे सर्व विचार कादंबरी धकत धकत वाचून काढल्यावर आले. पहिल्या वाचनात मला कुठलीच कादंबरी कळत नाही. त्यात ही इतकी हळू. पण सर्व झाल्यावर डोक्यात विचार आला, ठिकठाक आहे कारण लांबण लावली आहे. मग ते आवश्यक आहे का असा विचार केल्यावर वाटले की हे सकारण असू शकते. पण विचार करता करता मग परत एकदा वाचली. अधिक आवडली. जग फिरलेला, माझ्यापेक्षा अधिक जाणता असा खंड्या नेमाडे आणि मी चावडीवर गप्पा हाणत बसलो आहोत तर तो मला त्याचे अनुभव सांगेल, अगदी डिटेलवारी सांगेल तेही मी न विचारता, वर त्याचे खास असे भाष्य करेल असे चित्र जेव्हा रंगायला लागले तेव्हा तर ते लांबण लावणे आवश्यकच वाटू लागले. असे वाटले की कादंबरीचे पदर अजूनही उलगडत आहेत. त्यामुळे एकंदरीत आता असे वाटते की आवडली
(पहिल्या वाचनात एवढी भारी वाटली नाही तर सोडून का दिली नाही? केवळ नेमाडे आहेत म्हणून नव्हे. त्यांचे सर्वच भारी असते व ते आपल्याला आवडणे आवश्यक आहे म्हणून नाही. तर एवढा व्याप मांडणारी कुठलीही कादंबरी एका वाचनात झेपेल याची खात्री नव्हती. किंबहुना, झेपणार नाहीच याची खात्री होती आणि नंतरच्या वाचनात ते सिद्धच झाले.)
ता.क. मला खंडेराव चांगदेव अथवा पांडुरंगासारखा वाटला नाही. या प्राण्यात मुळात काहीतरी उत्सुकता तरी आहे खोदूनबिदून काढण्याची. हा आयुष्याला बराच सन्मुखबिन्मुख वाटला
केदार.. कादंबरी बाजारत येण्या
केदार..
कादंबरी बाजारत येण्या आधीच त्यात "हिंदू" संबंधीत विशेष काहीच नाही हे rediff.com (बहुतेक) वरील नेमाडे मुलाखत आणि नंतरच्या विश्लेषणातून जाणवले होते. तेव्हाच संशय होता एकंदरीत कादंबरीच्या शीर्षकाबद्दल आणि आतील मजकूराबद्दल.
असो. संशय खरा ठरला तर... थोडक्यात हे म्हणजे मा.बो. वर एखाद्या ज्वलंत विषयाचे शीर्षक देवून बा.फ. ऊघडायचा आणि नंतर पार पॉलिटीक्स पासून ते पॅथेटिक पर्यंत सर्व चोथा करायचा असे दिसते. फरक एव्हडाच की मा.बो. वर अशा बा.फ. चे आधी जोरदार मार्केटींग होत नाही, एक वर्षाविहार बा.फ. सोडल्यास!
वेळ आणि पैसा दोन्ही बद्दल सावध केल्याबद्दल आभारी.
>>वेळ आणि पैसा दोन्ही बद्दल
>>वेळ आणि पैसा दोन्ही बद्दल सावध केल्याबद्दल आभारी.
अगदी अगदी
झक्कीकाका, आपण त्यांची एक ओळ,
झक्कीकाका,
आपण त्यांची एक ओळ, एक कादंबरी वाचली आहे का? नसेल तर मग इथे लिहीण्याचे (काडी टाकणे हा अधिकृत हेतू वगळता)प्रयोजन काय?
नाही. मला साहित्यातले काही कळत नाही. पण पूर्वी खूप गणित, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र इ. वाचले आहे, थोडे फार भूगर्भशास्त्रहि. तेंव्हा कुणि त्रिज्या, कक्षा असले गणिती मूल्यमापन केले तर ते मला समजू शकेल नि मी पण साहित्याचा आस्वाद घेऊन शकेन, असे वाटले म्हणून लिहीले. मायबोलीवरच अशी चर्चा पूर्वी झाल्याचे आठवले म्हणून आशा वाटली की तसे मूल्यमापन केल्यास मलाहि कळेल.
तसे नसेल तर माफी मागतो.
तुम्ही साहित्यिक लोक करा कंपूबाजी. पण इतरांच्या कंपूबाजीला नावे ठेवा!
मुल्यमापन कळेल हो. ते आपण
मुल्यमापन कळेल हो. ते आपण उत्कृष्ट रीतीने करालही. पण कशाचे? तेही महत्त्वाचे नाही का? ज्याचे करणार ते तरी वाचलेले पाहिजे की नको.
तुम्ही साहित्यिक लोक करा कंपूबाजी. पण इतरांच्या कंपूबाजीला नावे ठेवा >> वेल सेड. हियर हियर.:-)
तुमचा फक्त गणिती व्याख्यांना लोक वापरतात पण नीट वापरत नाही हा आक्षेप आहे का?>> मग तेवढे म्हणायला पन्नासेक पोस्टी प्रत्येक बाफवर फक्त टोमण्यांच्या कशाला? सरळ म्हणाला असता तरी यु आर ऑलवेज वेलकम.
तुमचा फक्त गणिती व्याख्यांना
तुमचा फक्त गणिती व्याख्यांना लोक वापरतात पण नीट वापरत नाही हा आक्षेप आहे का?>> मग तेवढे म्हणायला पन्नासेक पोस्टी प्रत्येक बाफवर फक्त टोमण्यांच्या कशाला?
नाही हो. गणिति व्याख्या गणितात समजतात, साहित्यात त्या नीट वापरल्या की नाही हे मी कसे सांगणार? पण वारंवार विचारत राहिलो तर कुणितरी समजावून सांगेल अशी आशा आहे.
ते आपण उत्कृष्ट रीतीने करालही. पण कशाचे?
मी नाही, मी नाही. मला साहित्यातले अजून काही कळत नाही. तुम्ही मूल्यमापन करा, म्हणजे आम्हाला समजेल, अशी आशा आहे.
झक्की, कंपूबाजीचा काय संबंध
झक्की, कंपूबाजीचा काय संबंध आहे इथे? आणि गणित, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्रचा? जो तो ज्याचे त्याचे मत इथे केदारच्या बाफावर मांडतो आहे, आणि केदारलाही त्याबद्दल काहीच प्रश्न नाही. उगाच काहीतरी उथळ पांचट आणि विषयाला सोडून बोलायचे मग साळसूदाचा आव आणून उगाच पुन्हा अडुसष्टशे वर्षे जुने तेच ते त्रिज्या नि कक्षा नि परीघ नि मला समजत नाही, कळत नाहीचे तुणतुणे वाजवायचे. लोकांना कंटाळा येतो हे कळत असावे बहुतेक तुम्हाला. अशा पोस्टींना काडी(टाकण्या)चाही दर्जा नसल्याचेही कळतच असावे तुम्हाला.
जे हिंदू वाचत आहेत, किंवा वाचली आहे- ते इथे लिहित आहेत. तुम्हीही वाचा नि लिहा. नसेल वाचायची तर तेही ठीकच आहे. तुम्हाला खरेचच साहित्यातले कळत नसेल, तरी तेही ठीकच आहे. त्याला आम्ही काय करू?
च्यायला कसला सात्विक
च्यायला कसला सात्विक संताप!!
बरं बरं! आता नाही मधे मधे करणार! तुम्ही साहित्यिक म्हणजे ना, नुसते आय डी बघून टाळके भडकवून घेणार!! जाउ दे!!
लै भांडा, मज्जा करा, अडुसष्टशे वर्षे तेच तेच लिहा. मी दुसरीकडे जातो.
४% वाचुन झाली पहिल्या १%
४% वाचुन झाली
पहिल्या १% पेक्षा शेवटचे ३% जास्त आवडली.
पुढे काय म्हंटल्या जाते याची उत्सुकता आहे (काय होणार याची नाही - कारण होणारे आधिचेच असते बहुतेक वेळा)
भाषा मस्त वापरली आहे.
योग आणि मंदार वाचून बघा. वाईट
योग आणि मंदार वाचून बघा. वाईट / टाकावू नक्कीच नाही. आधी लिहिल्यासारखे आवडणे अन अपेक्षेला उतरणे ह्यात फरक आहे.
रैना म्हणाल्या सारखी माझी प्रतिक्रिया समिश्र आहे. मी ते वरही मांडले आहे. काही काही भाग अतिशय सुंदर तर काहीची गरज काय? असे वाटत राहते. ती टाकावू नाही पण माय मराठीत अशी कादंबरी झाली नाही वगैरे प्रचार निव्वळ आहे. त्यापेक्षा सुंदर साहित्य मराठीत नक्कीच उपलब्ध आहे. आमचा आक्षेप आहे तो ह्याला.
४% वाचुन झाली पहिल्या १% पेक्षा शेवटचे ३% जास्त आवडली. >> आशिष रनिंग कॉमेंट्री देत आहे. आता उद्या असे लिहिणार असे वाटते, ८ टक्के वाचली पहिला १ नाही, मधले ३ आवडले, नंतरचे २ आवडले पुढचे दोन नाही.
>>योग आणि मंदार वाचून बघा.
>>योग आणि मंदार वाचून बघा. वाईट / टाकावू नक्कीच नाही. आधी लिहिल्यासारखे आवडणे अन अपेक्षेला उतरणे ह्यात फरक आहे.
अरे हो पण त्या साठी ६५० रू आणि काही हजार एक छापिल पाने?
"झाडे वाचवा, अडगळ हटवा" असं काहितरी मनात येतय..
मी ४५ दिवसा पुर्वी विकत
मी ४५ दिवसा पुर्वी विकत घेतली...............
.
.
.
.
.
.
.
.
वाचली...............१/४ डोक्यावरुन गेली......(वैचारीक गरीबी..)
.
.
.
.
परत वाचली........१/३ डोक्यावरुन गेली.......(वैचारीक गरीबी..)
.
.
.
.
.
परत वाचली....... ....................... .............(वैचारीक गरीबी..)
.
.
.
.
.
.
ज्याच्या कडुन घेतली त्याला कमी किंमती मधे विकली...........( गरीबी सहन नाही झाली..)
शर्मिला, असं दीड वाक्यात
शर्मिला, असं दीड वाक्यात गुंडा़ळण्यासारखं आहे का ते पुस्तक
तुझं मत सविस्तर वाचायला आवडेल .
खूप आवडली हिंदू मला तरी.
खूप आवडली हिंदू मला तरी. विशेषतः असे म्हणेन की संदेशानुभुती होण्याची जाणीव होते तेव्हा वाचक त्या वातावरणाने भारावलेला असतो. एक लिंगरिंग इफेक्ट आहे हिंदूमध्ये. एकाच पदार्थाच्या तीन वेगवेगळ्या चवी असाव्यात तशी कादंबरी.
>>अरे हो पण त्या साठी ६५० रू
>>अरे हो पण त्या साठी ६५० रू आणि काही हजार एक छापिल पाने?
"झाडे वाचवा, अडगळ हटवा" असं काहितरी मनात येतय.
योग
४% वाचुन झाली पहिल्या १%
४% वाचुन झाली
पहिल्या १% पेक्षा शेवटचे ३% जास्त आवडली.
<<< एकदम आश्चिग-शैलीतला अभिप्राय.
इथली रोचक चर्चा वाचून नक्की
इथली रोचक चर्चा वाचून नक्की काय आहे ह्या कादंब्रीत ते वाचून बघावे वाटते आहे... कोणाकडे असल्यास भेटाल तेव्हा मला द्या वाचायला..
या पुस्तकाला दुसरे नाव दिले
या पुस्तकाला दुसरे नाव दिले असते तरि चलले असते.
इथल्या चर्चेमुळे वाचावेसे
इथल्या चर्चेमुळे वाचावेसे वाटत आहे. अमेरिकेत असतो तर बार्न्स अँड नोबल मधे असते तर चकटफु वाचता आले असते. पुण्यात असे चकटफु कुठे वाचायला मिळेल का?(रु.६५० जरा महागच आहे नाही? आर ओ आय ची गॅरंटी नाही असेही काही प्रतिक्रियांवरुन वाटतेय
उगाच विकत घेतले तर गळ्यात पडेल. )
विवेक साप्ताहिकाचे संपादक
विवेक साप्ताहिकाचे संपादक दिलीप करंबेळकर ह्यांनी 'हिंदू' वर लिहिलेला लेख
http://evivek.com/26sept2010/lekh001.html
http://evivek.com/17oct2010/lekh005.html
अक्षय धन्यवाद. चांगली लिंक
अक्षय धन्यवाद. चांगली लिंक आहे ही. माझा व इतर अनेकांचा अपेक्षाभंग का? ह्याचे उत्तर नक्कीच तिथे मिळेल.
अस्सल तुपाचे खाणार्यांना डालडा खपवला तर कसे होईल? तसे माझे झाले आहे. (म्हणजे होते).
Pages