हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ!

Submitted by केदार on 4 July, 2011 - 23:23

भालचंद्ररावांनी हिंदूच्या मुलाखती द्यायला सुरूवात केल्यापासून हिंदू एकदम (प्रसिद्धी पूर्व) प्रकाशझोतात आली. आम्हास हिंदू वाचावी की नाही ह्याची चिंता लागलेली असतानाच विविध मान्यवर वाचकांनी व आम्हा सारख्या स्वघोषीत समिक्षकांनी हिंदू बद्दल भरपूर उलटसुलट लिहिले. आता उलटसुलट लिहिणे हे क्रमप्राप्तच आहे, काय करणार शीर्षकच हिंदू! उत्सायात्साते आम्ही हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ ६५० रू वजा टिच्चून १५ टक्के डिस्काउंट घेऊन मिळवली. आणि आम्ही बॅक टू द फ्युचर (की पास्ट? ) राईडीस तयार झालो.

हिंदू सुरू होते तीच मुळी मोठ्या स्वगतांतूनच. त्यातून आम्हास कळले ही खंडेराव नावाच्या कुण्या व्यक्तीची ही कहाणी. तो जातीने (आता हिंदू म्हणले की जात आली हे ओघानेच, ती द्विरुक्ती टाळून आम्ही जातच म्हणणार) कुणबी. मोप शेती बिती असलेला पण शेती करायची इच्छा नसलेला. खंडेराव घरातून श्रीमंत! अठरा प्रहर त्याचा खरी माणसांची ये-जा. पण गड्याला शिक्षणाची आवड. तो मोरगाव नावाच्या गावी राहतो, शिकतो, पूढे औरंगाबादेस येतो अन तिथे उच्चविद्याविभूषित होतो पण तरीही मनाने स्थिर नसतो. जाती व्यवस्था, पॉलीटिक्स, शेती की शिक्षण, घरची नाती आणि भारताचा पुरातत्त्व इतिहास हा सर्व गोंधळ त्याचा मनात कायम धुडगूस घालत असतो. त्यातच तो अचानक हिंदू संयुक्त कुटूंबाचा कुटुंबप्रमुखच होतो. मी जरा पुढेच गेलो. अन चार ओळीत हिंदूची कथाच सांगीतली नाही का? पण मग पास्टचे काय? तर ही कादंबरी वर्तमानातून भूत व परत वर्तमान अशी फ्लॅशब्याक स्वरूपात येते.

खंडेराव हा पुरातत्त्व विषयात पि एच डी करत असतो. आता पुरातत्त्व आले की आपण हडप्पा, मोहंजो-दाडो बद्दल बोलणार ही तुम्ही ताडले असेलच. अगदी तेच. उत्खननासाठी तो मोहंजो-दाडोला गेलेला असतो, तिथे त्याला वडील मरायला टेकले असल्याची तार येते आणि त्याचा सिंधू संस्कृती पासून परत मोरगावाकडे प्रवास चालू होतो. पाकिस्तान ते भारतातील मोरगाव एवढा मोठा प्रवास, त्यातच वडील आजारी म्हणजे वेळ जाता जाणार नाही, त्या प्रवासात त्याला आपले लहाणपण, भावंड, घरची माणसं, नाती-गोती, आला-गेला, बाराबलूतेदार, चिमणी-पाखरं, मोत्या-मुत्या, झीबू-ढबू , महार-मांग, पेंढारी-लभाने, होळकर-पेशवे, वेशीमधले-वेशीबाहेरचे, मराठा-कुणबी, वैदू-ब्राम्हण, तिरोनी आत्या ते चिंधी आत्या, मोरगाव ते औरंगाबाद, शेती ते पुरातत्त्वखाते, सिंधूसंस्कृती ते आजचे हिंदू हे सर्व आलटून पालटून त्याचा मनात पिंगा घालत असतात. पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा!! त्याचे मन हे असे धाव घेत असताना आम्ही त्यासोबत खंडेरावाचा प्रवास करत होतो. त्याच्या विचारातून मोरगाव सतत डोकावत राहते. त्याचे विचार केवळ शेती पुरते मर्यादित नसून ते विविध विषयांना स्पर्श करत असतात. उदाहरणार्थ तुलनेने अशिक्षित असलेल्या जातींमधील लैंगिक स्वातंत्र्य असो की भारतातील अनेक जमातींमधील स्त्रियांचे सामाजिक स्थिती, त्याची चिंधी आत्या नवर्‍याचा खून करते तो प्रसंग फारच मस्त उतरला आहे. चिंधी आत्याची घुसमट ही अनेक स्त्रियांच्या घुसमटीची प्रतिनिधित्व करते तर गावात असलेली लभानी वेश्या ही मुक्त असणार्‍या समाजाचे प्रतिनिधित्व करते. महार-मांग कुणब्याच्या शेतात काम करणारा भाग असो की विठ्ठलरावांनी गावाच्या उचापती सोडवण्याकरता केलेले लष्कराच्या भाकर्‍या भाजण्याचे काम असो, प्रत्येकाशी वाचक (खेड्यात न राहताही) रिलेट होऊ शकतो. आणि त्यामुळेच कदाचित हिंदू ह्या शब्दाचे प्रयोजन! ग्रामीण भागातील रुढी परंपरा व एकमेकांमध्ये गुंतलेली समाजाची अर्थव्यवस्था नेमाडे बर्‍यापैकी ताकदीने उभी करतात. बर्‍यापैकी लिहिण्याचं कारण बरेचदा पाल्हाळ लावले आहे, ते टाळता येते.

नेमाडे आपल्या त्याच त्या शैलीतून बाहेर येत नाहीत हे कादंबरी वाचताना प्रकर्षाने जाणवत राहते. उदाहरणार्थ
खंडेरावाचे व्यक्तीचे इंटर पर्सनल स्किल्स थेट आपल्या पांडुरंग सांगवीकरासारखे. आता हा पांडू कोण? हा प्रश्न तुम्हास पडला असेल. अहो पांडू म्हणजे आपला पिसपीओ. पांडूसारखेच खंडेरावास घरातल्या माणसाची घृणा (अपवाद त्याचा भाव भावडू) आई वडिलांबरोबर संबंध चांगले नाहीत, आई वडील पांडू सारखेच त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येतात पण बंड करून खंडेराव आपले इत्सिप्त साध्य करतो, त्या घडामोडी थेट कोसलाच्याच, ते कारेपण, मनाशीच चाललेली कुस्ती ह्याची तुलना वाचक नकळत कोसलाशी करतो. नेमाड्यांनी खंडेरावाचे कॅरेक्टर पांड्यावरून उचलले असल्याचे जाणवत राहते. पण थोडे वेगळे व्हर्जन. हो आता मारूती ८०० देखील इतक्या वर्षांनंतर कात टाकते, तर पांडू टाकणारच. पांड्याचे जाऊद्या तुम्हाला चांगंदेव माहित आहे का? औरंगाबादेतील बरीचशी घालमेल त्या चांगदेवासारखी. शिक्षणाची व शिक्षण संस्थांची ऐशी तैशी करणारे शिक्षण महर्षी व पॉलीटिक्स व एकूणच विद्यापीठातील भानगडी हे सर्व परत थेट चांगदेवासारखेच. फक्त तेवढे पाल्हाळ लावले नाही. तरी औरंगाबाद प्रकरणात १०० एक पाने खर्ची घातले आहेतच. आम्हास नंतर असे वाटले की पांडुरंगाच्या अस्वस्थपणात त्याच्या घरचे लोकं दिसत नाहीत, ते ओघाने पांडुरंगाचे कॅरेक्टर बिल्डींग साठीच येऊन जातात पण खंडेरावाच्या वेळी मात्र घरच्यांची सांगड घालून त्यात गावाची, गावकी-भावकीची भर टाकली आणि चांगदेवाच्या प्राध्यापकी, शिक्षकीपेशाची, हॉस्टेलच्या वातावरणाची फोडणी दिली की झाला खंडेराव अन पर्यायाने हिंदू तयार. चटणी म्हणून केवळ पुरातत्त्व येते. खरे तर नाव वाचून आम्ही हिंदू कडून खूप अपेक्षा वगैरे करून बसलो पण भलताच अपेक्षाभंग झाला.

खंडेराव हे नाव हिंदू, सिंधू संस्कृती हिंदू म्हणून हे नाव हिंदू. खंडेरावासारखाच कोणी इस्माईल खान असला असता तर कदाचित इस्लाम जगण्याची समृद्ध अडगळ असे नाव आले असते असे प्रथमदर्शनी वाटणे साहजिक आहे. आणि खरेतर कुण्या एका अमेरिकन बॉबची कथा जरी अशीच वाटली तर ती अमेरिकन, जगण्याची समृद्ध अडगळ असे नाव कोणी ठेवले तर वावगे नाही. तसेच पुस्तक प्रसिद्धी पूर्व चर्चेत हिंदू नावामुळे आले व त्यातच लेखक नेमाडे मग काय! मुलाखतीतून नेमाडे हिंदू धर्माबद्दल अनेकदा बोलले, रुढी परंपरांवर ताशेरे वगैरे ओढले, काही माहिती दिली जसे कृष्ण तीन होते वगैरे. आम्हास कादंबरी वाचून असे कळाले की हे सर्व त्या प्रसिद्धीसाठी ! कादंबरीत काही वेगळेच येते. कारण आम्ही तीन कृष्णांची कथा कधी येते ह्या उत्साहात्साते वाचत गेलो, पण किशन्या गावलाच नाही! वर तर वर खंड्याच मध्ये मध्ये बोअर मारू लागला.

त्यातल्या त्यात चांगली बाब अशी खंडेराव नुसतेच पाल्हाळ लावत नाही, पाल्हाळात कधी कधी समृद्ध बोलतो उदा " अशा रितीनं श्रमाला केंद्रस्थानी ठेवून नैसर्गिक पिकांनी पृथ्वीची शान वाढवणारी आत्ममग्न स्वायत्त कृषी संस्कृती परावलंबी होत गेली. याउलट, भाषेला केंद्रस्थानी ठेवून शोषण करणार्‍या नागरी, ऐतखाऊ औद्योगीक व्यापारी संस्थेची भरभराट झाली" हे वाक्य आजच्या भारतीय कृषी व्यवस्थेला अगदी लागू होतं. किंवा " आपला देश परदेश तर परदेश देश आपला" ही एखाद्या पुरातत्त्व चित्रा वरील खून उलटी किंवा सुटली वाचल्यावर येणारी गंमत आणि त्याचा गंभीर अर्थ किंवा प्रत्येक भारतातील प्रत्येक जातीचे स्वतःचे असे काही वैशिष्ट्य वगैरे वगैरे.

खंडेरावाला नुसत्या मुद्रा संशोधनात रस नाही तर त्याला त्या पाठी मागे असलेल्या मानवी विचारांच्या बद्दल संशोधन करायचे असते. जाणिवांच्या उत्क्रांती बद्दल खंडेराव बोलत राहतो. पण त्याचे गाईड त्याला तसे करता येत नाही असे सांगतात. सध्या पाश्चात्यांची इतिहासावर मालकी आहे, इतिहासात बंडल चालतात, पुरातत्त्व हे अस्सल. मडक्यावरच्या आकृत्या, मोंहजोदाडोला सापडलेल्या मूर्ती हेच खरे, तिथे बदल नाही आणि तेच खरे, तोच संस्कृतीचा पुरावा, असे त्याचे सर त्यास सांगू पाहतात पण खंडेरावास जाणिवांच्या उत्क्रातींवर काम करावे वाटते. आधी मातृसत्ता, पितृसत्ता नंत्तर कुटूंब, समाज, धर्म, विज्ञान पुढे काय? हे प्रश्न त्याला पडत राहतात.

कादंबरीचा काळ स्वातंत्र्यपूर्व ते उत्तर असा विभागलेला आहे. पुढे कादंबरीत युरिया, बियाणे ह्यामुळे झालेली हरितक्रांती देखील मोहंजोदाडोच्या जोडीला येऊन बसते. त्यातच मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रकरण पण आणतात. खंडेरावास गझल प्रकार आवडतो. गालिब, मिर असे सिद्धहस्त शायर व त्यांचे शेर तो मध्ये मध्ये आपल्याला सांगतो. त्याचे रूम पार्टनर चौघे चार जातीचे, त्यांच्या लकबी, विचार मध्येच येतात. पूर्ण कादंबरीच आठवेल तसे लिहिणे, असा बाज नेमाड्यांनी ठेवला आहे. तो कधी कधी बराही वाटतो. काही काही ठिकाणी अशक्य विनोद निर्मितीही आहे.

एकूणच ही कादंबरी मराठी साहित्यातील अडगळ ठरते की काय आहे असे आमचे मत झाले. आता ती समृद्ध अडगळ आहे की नाही? हा प्रश्न प्रत्येकास पडणे साहजिक आहे. आम्हास विचारले तर हो जर ती पूर्ण कादंबरी एकुण ३ एकशे पानांचीच असली असती तर कदाचित समृद्ध ठरलीही असती, पण खंडेरावाचे पाल्हाळ कधीकधी वाचायला बोअर होते अन ती त्या कादंबरीतील अडगळ नेमाडे दुर करू शकले नाहीत. बाराबलूतेदार, कुणबी मराठा, स्वायत्त ग्रामव्यवस्था, आणि हजारो वर्षे चालत आलेल्या संस्कृतीमुळे निर्माण झालेल्या काही रूढी परंपरा ह्याचा आढावा नेमाडे घेतात. एकूण त्यांच्या लिखाणातून. 'हे जे काही कडबोळं आहे ते अगदीच वाईट नाही, थोडा धुळ झटकली तर फरक पडेल' असा सूर दिसतो.

तुम्ही म्हणाल की नक्की आम्ही काय समीक्षण केले? कादंबरी घ्यावी की नाही? गोची तीच तर आहे. कधी बरी तर कधी अगदीच फ दर्जाची वाटते. काही भाग खरचं चांगला उतरला आहे, पण पुनरुक्तिचा दोष स्विकारून पाल्हाळ लावले आहे हे आम्ही इथे सांगू इच्छितो.

प्रश्न उरतो मग आम्ही समीक्षण का केलं? सोपं आहे. मायबोलीवरील अडगळ वाढवण्यासाठी! हे समीक्षण आणि ती कादंबरी समृद्ध आहे की अडगळ हे तुम्हीच ठरवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदू वाचल्यानंतर... अर्थात एक होती कोसला
उत्पल चंदावार- मिळून सार्‍याजणी जानेवारी २०११

एक होती कोसला, सांगे पांडुरंगाचे आर्त
बेफिकीर वयामधले विविध रंग उदाहरणार्थ

पुण्यामध्ये उणे होते, शब्दांचे मोहक दर्शन होते
सांगवीतल्या बांधवांचे भयचकित जगणे होते

भावनांचा ओघ होता, अलम दुनियेचा शोक होता
कॉलेज, कट्टा,हॉस्टेल, मद्रास सर्वत्र साल्या जगण्याचा
मुळारंभ जोक होता

पांडुरंगाच्या लीळा होत्या, रमीचे हुरहुरते चरित्र होते
'आपण घर करुया' हे वाचल्यावर
आमच्याही मनात गलबलले एक चित्र होते

भाषेचे वैभव अफाट होते, शैलीचा मानदंड होता
भकास, भंकस जाणिवांचा, आम्ही वेचला आनंद होता

मनूचा मृत्यू भिडला होता, बधिर होऊन रडला होता
आयुष्याच्या भयाण पसार्याकडे हताशपणे बघत बसलाही होता

कोसला म्हणजे जरा फारच, कोसला म्हणजे अगदी अशक्यच,
कोसला म्हणजे व्याख्येतून मुक्त, कोसला म्हणजे हे मुक्त, ते मुक्त
कोसला म्हणजे आभाळाकडे डोळे लावून एकट्याने म्हणायचे
एकट्याचे सूक्त

मग आम्ही हिंदू वाचली
आणि मग आम्ही टरकलो.

येणार येणार म्हण्न गाजत होती, आमची उत्कंठा वाढवत होती
प्रकाशनपूर्व कीर्ती गगनांतरी पोचली होती

अगोदरच राखून ठेवलेली प्रत बरीच वाट बघितल्यावर हाती आली
सहाशे पानांची सुबक बांधणी बघून वाटलं, चला प्रतीक्षा सार्थ झाली

मात्र कथा पकड घेईना, तपशिलातून बाहेर येईना
तपशिलाचे कौतुक वाटे, पण 'कादंबरी' चे रुप थिटे

कालखंडाची गडबड आहे, गोष्टीतल्या धाग्यांचा गुंता आहे
मध्येच काही प्रसंग विलक्षण, पण एकुणात जरा चिंताच आहे

खंडेराव खूप काही बघत आहे, आम्हीही बापडे बघतो आहोत
पण सुसूत्रतेचे काय झाले, याचे उत्तर शोधतो आहोत

तपशिलाचा प्रश्नच नाही, मोठाच पट उभा राही
पण तपशील म्हणजे शेवटी मालगाडीचे डबे.. वाहतूक होई
पण घाटाची मजा घ्यायला कुणी नाही

अशा वेळी आठवे कोसला अन ती झपाटलेली भाषा
लहानशाच आयूष्याच्या प्रचंड अनूभूतीची नशा

हिंदूरावांचे नाव मोठे, म्हणून त्यांना साकडे
इथून पुढल्या खंडांना, द्या कादंबरीचे रुपडे

मायमराठीत कादंबरीच नाही अशी म्हणे हिंदुरावांना बोच
असं काय करता मालक, वाचा की एकदा तुंबाडचे खोत !

अत्यंत मोठ्ठी अडगळ आहे ती! १०८ पानांवर मी थांबलो आणि त्याग केला. असंबद्ध कादंबरी आहे. तेही ठीक, पण प्रचंड कंटाळवाणी आहे.

-'बेफिकीर'!

एकूणच ही कादंबरी मराठी साहित्यातील अडगळ ठरते की काय आहे असे आमचे मत झाले. बर झाल बाबा आधी सांगितल. मोठ्या संकटातुन वाचलो. ज्यांना वाचायची फारशी आवड नाही यांनी "कोसला" आणि नेमाडेंची फारच स्तुती केल्यामुळे "कोसला" पासुन सुरवात करणार होतो पण बचावलो.

काल वाचणे सुरु केले. काही पाने वाचली, पण फार भावली नाहीत. तशीच असतील तर अडगळच आहे. चक्क आमच्याच दोन-चार गोष्टी आठवल्या (म्हणजे वाचकांना अडगळ वाटतात अशा). पुन्हा थोडे वाचुन पाहीन.

कथेत मर्म आहे, थोडा फार जर्म पण आहे. पण पण पण आहे.

प्रश्न उरतो मग आम्ही समीक्षण का केलं? सोपं आहे. मायबोलीवरील अडगळ वाढवण्यासाठी>> हो अगदी खर आहे. प्रचंड बोअर झालो समीक्षण वाचताना.:-) पुस्तकाला हात पण लावणार नाही आता.

नेमाड्यांनी आजवर कधीही निराशा केली नाही. त्या वाचल्या पानांना जागुन हिंदु वाचणारच. Proud

अरे हो. हा चांगदेव चतुष्ट्यावरील टण्याचा लेख
http://vishesh.maayboli.com/node/835

याबद्दल मी फारसा सहमत नाही. जो कंटाळवाणेपणाचा किंवा पाल्हाळाचा आक्षेप आहे, त्याबद्दल असे म्हणावेसे वाटते, की मुळात मराठी भाषेतील कादंब~यांची शैली ही व्यक्तिरेखेचे मन वाचकांना प्रत्यक्ष न दाखवता प्रसंगांद्वारे उलगडून दाखवणारी. क्वचितप्रसंगी कोणी तसा प्रयत्नही केला, तरी तो 'लेखक वाचकांना व्यक्तिरेखेच्या मनात काय होते आहे हे सांगतोय' अशा स्वरूपाचा होऊन प्रसंगी बराच बाळबोध वाटणारा. 'व्यक्तिरेखा वाचकांना स्वत:च्या मनात तंतोतंत काय होते आहे हे सांगतेय' अशी हेमिंग्वेच्या धाटाची कादंबरी, या दृष्टीने ह्या कादंबरीकडे मी पाहतो. विचारांचा वेग आणि आवाका पाहता अशी कादंबरी मोठी असणे अपेक्षितच आहे. आपणही आपला प्रत्येक विचार आठवू शकत नाही. आपण शेवटी आठवतो तो सारांश. असे असताना एखाद्या व्यक्तिरेखेच्या मनाचे धावते चित्रण कोणी करत आहे, ही बाबदेखील बरीच मोठी आहे. मलातरी ह्या पुस्तकाचा कॅनव्हासच खूप मोठा वाटतो. त्यावर चित्रण करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे. नेमाड्यांनी तो ब~यापैकी समर्थपणे पेललाय. प्रपोर्शनची जाण, रंगसंगती हे सगळे मला तरी भावले.

तोचतोचपणा हा अजून एक मुद्दा असावा. मी तरी ह्याला नेमाड्यांची 'पांडुरंग सांगवीकर ते खंडेराव व्हाया चांगदेव' अशी उत्क्रांती मानतो. तो अस्वस्थपणा, ती महाविद्यालयातील शैली हे तेच आहे हे खरे आहे, पण इतक्या वर्षांनी ती पाहून ती आवडत असलेल्या मला तरी आनंदच झाला. नेमाड्यांनी एवढी वर्षे जाऊन आणि दाढीचे एवढे केस पांढरे होऊन देखील तीच मजा राखली ह्याची मला मजा वाटली.

तसेच ह्या पुस्तकात एकंदरीतच गावातलं जगणं, शेती ह्याबद्दल एवढी माहिती आणि रेफरन्सेस आहेत, की नेमाड्यांनी ते एवढं सगळं शहरात वाढलेल्या माझ्यासारख्यासमोर ठेवलंय ह्याचंच मला अप्रूप. एवढा अभ्यास करायला, एवढी कादंबरी लिहून त्यात ते सगळं बसवण्याची दृष्टी असायला माणसात काहीतरी असलं पाहिजे, हे जाणवलं.

ही कादंबरी ग्रेट आहे, असं मात्र मला वाटत नाही. नेमाडे एकाच दृष्टिकोनातून लिहित असल्याने त्यांना ग्रेट लोकांपेक्षा जरा जास्त सोपं जात असावं असं मला वाटतं. पण तरीही, नेमाड्यांनी असं काहीतरी लिहिण्याचं धनुष्य ब~यापैकी पेललंय एवढं मी म्ह्णेन. वरती कोणितरी 'कोसला' वाचणार नाही असं म्हटलंय. माझं म्हणणं एवढंच, की प्रयत्न करून मग सोडा वाटल्यास. पण इग्नोअर करण्यासारखं मात्र कोसला ही नाही आणि हिंदू ही नाही.

कादंबरी, पुस्तक, कोणतेही साहित्य लेखन हे समीक्षकांच्या स्तुतीसाठी, त्यांच्या अती उच्च अभिरुचीसाठी किंवा पेपर तपासणीसाठी निर्माण होत नसते. समीक्षक जड जड शब्द वापरून चांगले वाईट सांगत बसतात. हू केअर्स ? मनाला दोन घटिका आनंद मिळाला का इतकाच प्रश्न वाचकाने विचारावा अशा मताचा मी आहे. समाज, संस्कृती याची जबाबदारी घेणे हा लेखनाचा प्राथमिक हेतू नसून ते त्यात आडवळणाने येत राहते वे तितकेसे पुरेसे आहे. त्या पुस्तकातून काहीही मिळालेले नाही. निव्वळ रनिंग कमेंट्री आहे ती!

श्रमाला केंद्रस्थानी ठेवून नैसर्गिक पिकांनी पृथ्वीची शान वाढवणारी आत्ममग्न स्वायत्त कृषी संस्कृती परावलंबी होत गेली >> यावर नेमाड्यांपेक्षा तुझे विचार वाचायला आवडतील. ती आर्य संस्कृतीची समृध्द अडगळ आवरून ठेवली आहेस ती परत काढ.

काल वाचणे सुरु केले. काही पाने वाचली, पण फार भावली नाहीत.>>>
हे अन् वरील बरीच मतं माझीही होती.
पण नेटाने वाचली हिंदू, एकदा. मग वैतागलो. नेमकं काय कळेना. कोसला वा इतर चांगदेव चतुष्ट्यांची मोजपट्टी लावली कि हा घोळ होतोय असं कळालं. मग पुन्हा दुसर्‍यांदा वाचली. चक्क खूप आवडली.
तिसर्‍यांदा वाचून झालिये. महान लिहलंय. कादंबरीत सुसूत्रता नाही म्हणे. नसो बापुडी, पण त्याने काही फरक पडतो असेही नाही. ग्रेट लिहलंय जे याधी मराठीत तरी नाही लिहलं गेलं!

(दुसरा काय म्हणतो म्हणून वाचणं सोडणं-सुरु करणं ह्याला काही अर्थ नाही. स्वतः ठरवायला हवं!)

एकदा नक्की वाचावी. समृद्ध असली तरी अडगळ ठरु पहात आहे का..... 'हिन्दु' ?

समिक्षण आणि सविस्तर प्रतिसाद, दोन्हीही अपुर्ण, कादंबरीला पुर्ण न्याय न देउ शकलेले( हे साहजिक आहे. दोष नव्हे). भुषणचा प्रतिसाद पुर्णपणे भरकटलेला. असो.

खंडेराव नुसतेच पाल्हाळ लावत नाही, पाल्हाळात कधी कधी समृद्ध बोलतो
>>
खंडेरावाचे अख्खेच्या अख्खे पाल्हाळच भाषा आणि आशयाच्या समृद्धीचा उत्कृष्ठ नमुना आहे. नेमाडेंची भाषा-शैली मला भावली तितकी इतर कुणाची याहीपुढे भावणार नाही- हे पुनह एकदा नीट कळले. Happy

केदारचे परीक्षण वाचून निराशा झाली. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या एक समृद्ध, सेल्फ डिपेंडंट अशा गावगाडा व्यवस्थेकडे, तिच्यातल्या बर्‍यावाईट गोष्टींकडे आणि कालौघात तिच्या पदरी आलेल्या हताशतेकडे केदार कसा बघतो- याची उत्सुकता होती. 'आम्ही तीन कृष्णांची कथा कधी येते ह्या उत्साहात्साते वाचत गेलो', 'चिंधी आत्या नवर्‍याचा खून करते तो प्रसंग फारच मस्त उतरला आहे', 'हे जे काही कडबोळं आहे ते अगदीच वाईट नाही, थोडा धुळ झटकली तर फरक पडेल' अशासारखी वाक्ये आणि खंडेरावाची पांडूरंग-चांगदेवाशी केलेली तुलना- इथेच सारे फसते. हे तीनही नायक एकमेकांपासून संपूर्णपणे वेगळे आहेत. तिघेही इथल्या अस्सल मातीतले, आपली मुळे घट्ट रोवलेले आहेत- एवढेच त्यांतले साम्य. Happy पांडूरंग, चांगदेव हे कथांचा भाग होते- त्यांच्याभोवती त्या कादंबर्‍या फिरत होत्या आणि कथा, विषय, आशय, भाषा कादंबरीत पुढे सरकते तसतसे त्या त्या नायकांच्या व्यक्तिमत्वांचे कंगोरे, वीण आपल्याला समजत जाते. याउलट खंडेराव इथला नायक असूनही फक्त निवेदकच आहे- तो त्या गोष्टीत खरे तर नाहीच. ती जी काय व्यवस्था, संस्कृती म्हणून तो सहाशे पानेभरून त्रयस्थ बनून सांगतो आहे- ते चांगले किंवा वाईट आहे- असे त्याचे काहीच म्हणणे नाही. लोकांना गोष्ट, कथा हवी असते, कादंबरी हवी असते, सहाशे पानांचे हिंदूस्थानच्या मातीत मुळे घट्ट रोवलेले-रुजवलेले आणि भाषा-आशयाने समृद्ध असे पाल्हाळ नाही- हे सिद्ध झाले. हेच तर खंडेराव तिथे मधून मधून टोकून सांगत राहतो. लौकिकार्थातल्या व्याख्येत बसणार्‍याच कादंबर्‍या का हजारो वर्षे लिहित राहायच्या हा खरा प्रश्न आहे.

खंडेराव, आता तू लिहिणे क्रमप्राप्त आहेच ब्वा. स्वतंत्रपणे. Proud आणि तिथे गोष्टीबद्दल ब्र सुद्धा काढायचा नाही, सांगून ठेवतो.

--साजिरा

नेमाडेंची भाषा शैली नीरस वाटली. आशयाची समृद्धी म्हणजे काय ते मला माहीत नाही. कुणी कृपया सांगीतल्यास आभार मानेन.

आशयाची समृद्धी याबाबत कुणीतरी कृपया सांगावे अशी विनंती!

इथे फक्त हिंन्दु' कादंबरीबद्दल चर्चा व्हावी असे मला वाटते. बाकी 'आशयाची समृद्धी' पुर्णपणे सापेक्ष आहे. आपली आपण शोधावी आणि आनंद घ्यावा. हेमाशेपो.

Happy

मि येक सुचवितो. पुढिल कादंब्र्या वाचावेत व त्यावर विचार केलात तर कथा व कथापात्रे इत्यादि सोडुन त्यापलिकडचे किम्वा त्यामागचे आसे काही एक समान आढळेल व ते आपल्या मनात 'माझि द्रुश्टि विस्तारून मि येक अधिक श्रिमन्त माणुस झालो हे' असा उबदार विचार जन्माला येइल व जेव्हा आसे होते त्यास अनेक वाचक 'आशयाचे सम्रुध्दि' या नामाभिधानाने ओळखतात-----
तुम्बाडचे खोत (श्री ना पेंडसे), बनगरवाडि (व्यंकटेश माडगुळकर), कोसला (नेमाडे), काळा सुर्य व ह्याट घातलेलि बाइ (कमल देसाइ), कळ (श्याम मनोहर), रणांगण (विश्राम बेडेकर), सात सक्कं त्रेचाळिस (किरण नगरकर), वासुनाका (भाऊ पाध्ये), रात्र काळी घागर काळी (आरती प्रभु) इ इ
हि लिश्ट मासलेवाइक मानावित सम्पूर्ण नाहि परन्तु परन्तु परन्तु "नेहमिच" केवळ दोन घटिका "करमणुक अथवा मनास दोन घटिका आनन्द" म्हणुन आपण साहित्य वाचणार असाल व "जे करमणुक अथवा आनन्द कर भरत नाहि ते साहित्य नाहि'" असाच विचार आपले मनीं सातत्याने ठाण मांडुन बसला असेल व आपले मनिंचा हा विचारच अनादिअनंत काळासाठि "योग्यच" आहे अशि आपलि खातरजमा झालि आसेल तर आपण आशयाचे सम्रुध्दिसाठि फार शिणावाशिणवि करु नयेत आशि माझि आपणांस विनन्ति राहिल.

टिंबू,

मी अगदी हेच विचारायला परत येथे येणार होतो. आपण तोच मुद्दा काढलात त्याबद्दल धन्यवाद!

जे लोक वरील आपण नमूद केलेल्या कादंबर्‍या पेशन्स ठेवून वाचतात ते त्यांचे आयुष्य सामान्यच जगताना व करमणुकीकडे भर देताना आढळतात. फार तर साहित्य चर्चा कुठे निघाली तर चार वाक्ये ऐकवू शकतात. तसेच, त्यांनी कधी लिहीलेच तर ते काही आशयाने समुद्ध (सापेक्ष असते हे मान्य करूनही त्यांच्या आदरस्थानांच्या पातळीचेही नसते) लिहीत नाहीत.

म्हणजे आम्ही वाचणार सगळी मोठमोठी नांवे, भाषणं देणार जी ए आणि नेमाड्यांवर आणि आयुष्यभर करणार टाईमपास, सामान्य दैनंदिनी आणि सुमार लेखन (जर लेखन केलेच तर).

मग ही आशयाची समुद्धी काय लोणच्यासाठी?

लेखन वाचून किमान वर्तणुकीत तरी फरक पडला असे उदाहरण असल्यास फक्त त्याच माणसाचे बोलणे ऐकण्यात अर्थ आहे.

आपण तरी जे वाचतो ते एक तर करमणूकीसाठी नाहीतर मग जर खरच एखादे लेखन आवडले तर त्यातील काही घेण्याचा प्रयत्न करतो. मला मुनव्वर रानाची कविता आवडली. मी दोन दिवस खूप विचार केला आणि असह्य झाल्यावर स्वतःशीच मान्य केले की कविता अशी करायला हवी. त्याप्रमाणे बदल करत राहिलो.

काही पाने वाचुन अडगळ जरी जाणवली तरी त्यातील समृद्धता सुद्धा दिसते. पाल्हाळ जरी चांगले वाटले तरी पाल्हाळ-स्क्वेअर्ड नको. नेटानी वाचल्यास बरेच काही, खास करुन आनंद, मिळु शकेल हे जाणवते. अनेकदा अशा कादंबर्यांमधे तो आनंद एखाद्या शिंपल्यातील हिर्यासारखा असतो. पण मसल्स खायच्या जगात हेच जाणवते की गोष्टीला तितकी पाने लागतात म्हणुन ती तशी नसुन काही लोकांना दूर ठेवण्यासाठी आहे.

मोबी डीक वगैरे प्रमाणे अनेकदा सुरु करावी लागु शकते.

>>इथे फक्त हिंन्दु' कादंबरीबद्दल चर्चा व्हावी असे मला वाटते. बाकी 'आशयाची समृद्धी' पुर्णपणे सापेक्ष आहे

बरं. मग हिंदू कादंबरीमधे तुम्हाला सापडलेली आशयाची खोली विशद करुन सांगा.

कादंबरी मला अर्धवट आवडली असे माझे म्हणने मी परत एकदा मांडू इच्छितो.
आता काही मुद्दे
१. नेमाड्यांच्या लेखणात तेच ते मुद्दे येत राहतात, ह्याला कोणी आशयाची समृद्धी असे नाव देते तर माझ्या सारखे वाचक, अहो पांडूरंगांच्या वेळी झालंय ना ते मांडून मग आता पुढे जायला काय हरकत? असा विचार करू शकतात.

२. गावगन्ना, गावगाडा हा नेमाड्यांनी उत्कृष्ट पद्धतीने मांडला आहे हे मी वरही मांडले आहे, माझे वाक्य "ग्रामीण भागातील रुढी परंपरा व एकमेकांमध्ये गुंतलेली समाजाची अर्थव्यवस्था नेमाडे बर्‍यापैकी ताकदीने उभी करतात. बर्‍यापैकी लिहिण्याचं कारण बरेचदा पाल्हाळ लावले आहे, ते टाळता येते. "
खरेतर मी त्यांचे जे काही समृद्ध वाटले त्यावर लिहिले आहे. त्यात कृषी व्यवस्थेवर आधारित संपूर्ण स्वायत्त अशी भारतीय ग्राम व्यवस्था. अनेक आक्रमणे आली आणि गेली पण बलुतेदारी कायम राहिली. सत्तेचे विकेंद्रीकरण होतं ते इंग्रजांनी केंद्रीकरण केले आणि ही स्वायत्त संस्था ढासळली. ह्याबद्दल नेमाड्यांनी खंडेरावाच्या तोंडातून विस्तृत लिहिले आहे.

लौकिकार्थातल्या व्याख्येत बसणार्‍याच कादंबर्‍या का हजारो वर्षे लिहित राहायच्या हा खरा प्रश्न आहे. >> नाही अजिबात नाही. श्री ना बघ. त्यांच्या कादंबर्‍यात वर म्हणताय ती आशय संपन्नता दिसते, आशय दिसायला शब्दबंबाळ करायची गरज नाही. गारंबीचा बापू म्हण की खोत तिथे हा गाव मुद्दाम प्रयत्न न करता दिसतो. म्हणून बर्‍यापैकी शब्द. असे लिहिताना गावगाडा उभा केलेले अनेक लेखक व त्या लिखाणाची हिंदूंची तुलना होणे अपरिहार्य आहे. त्यामुळे माझ्या पाहण्याच्या दृष्टिकोणात्त कळत नकळत ते वाचलेले येईलच.

मराठी साहित्यातील एक सुरेख, अढळ स्थान वगैरे जाहिरातीला ती निदान माझ्यादृष्टीने पूर्ण उतरत नाही. कारण त्यापेक्षा अधिक चांगले वाचले असण्याची शक्यता असू शकते. जाहिरातीमुळे हिंदू कडून खूप अपेक्षा होत्या ते निदान माझ्याबाबतीत खरे आहे आणि त्यामुळेच निदान माझा अपेक्षाभंग झाला. शेवटी कादंबरी किंवा साहित्य आवडणे हा वैयक्तीक भाग असतो, मलाही ही आवडली / बरी वाटली पण ५ पैकी चार नाही तर ३ च असा १९-२० चा फरक आहे.

आता साजिरा, आशिष, टण्या , बाई यांचे परिक्षण वाचायची उत्सुकता आहे.

स्वगत - पुस्तक वाचायची उत्त्सुकता आहेच, पण याआधी मायबोलीवरच्या चर्चा वाचून मग वाचलेली पुस्तके म्हणजे ना****, पॅक***** अन बा* *न्य ( ते तिसरं अजून वाचतेच आहे ) . मायबोलीकरांचं प्यॅकेज दिसतंय का Proud

मला कादंबरी आवडली. पेशन्स ठेवून वाचायला लागली, वाचायला वेळ लागला तरीही आवडली. तथाकथीत 'पाल्हाळ' म्हणून जे वर्णन आहे तेही आवडले.

जाहिरातींचा आणि हिंदू (आपल्या दृष्टीने, ज्याच्या त्याच्या दृष्टीने) चांगली असण्याचा नसण्याचा, आपल्याला चांगली वाटण्याचा, न वाटण्याचा काय संबंध?

विश्वास ठेवा, मी वर्तमानपत्रे वाचण्याचे जवळपास सोडून दिलेय. न्युज चॅनेलवर ऐंशी (किंवा नव्वद) वर्षांचे नेमाडे कसे दिसतात, हे देखील मी पाहिलेले नाही. अर्थातच आक्रस्ताळी हातवारे करून 'हिंदू'बद्दल ते कायकाय बोललेले आहेत हेही मला माहिती नाही. इतरांनी सांगितलेले कानावर आले तरी मी हिंदू वाचेस्तोवर त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले असे समजा पाहिजे तर. जाहिराती आणि प्रोमोजवर जायचे असले असते तर दबंग, रेडी सारखे सिनेमे व्ह्युअर्स चॉईस म्हणून उत्कृष्ट ठरले असते.

श्रीना आणि नेमाडे यांची तुलना होऊ शकत नाही. कुठच्याही दृष्टीने, कुठच्याही पातळीवर नाही. श्री ना हेही अर्थातच माझे आवडते, पण ते वेगळ्या कारणांसाठी. काहीच कथा (किंवा लौकिकार्थातले कादंबरी मटेरियल) नसताना श्रीनांनी आपल्या कादंबर्‍यांत नक्की काय केले असते, याची मला कल्पना करवत नाही.

आणखी लिहितो आहे. कारण 'हिंदू'ची अजूनही शेवटची काही पाने वाचायची बाकी आहेत. Happy थोडा वेळ हवा आहे.

जाहिरातींचा आणि हिंदू (आपल्या दृष्टीने, ज्याच्या त्याच्या दृष्टीने) चांगली असण्याचा नसण्याचा, आपल्याला चांगली वाटण्याचा, न वाटण्याचा काय संबंध? >>

जाहीरातींचा नाही मुलाखतीचा संबंध असतो की नाही. त्यात नेमाड्यांनी ज्या रितीने अ‍ॅन्टीसिपेशन बिल्ड केले तेवढी ही कादंबरी चांगली उतरली नाही हे वाचकाला म्हणता येत नाही का?

विश्वास ठेवा, मी वर्तमानपत्रे वाचण्याचे जवळपास सोडून दिलेय >> पण दुर्दैवाने मी वाचतो. त्यांचा मुलाखतीही वाचल्या. अपेक्षा नसलीच असती (म्हणजे मी अगदीच कागद कोरा ठेवून वाचली असती तर मी देखील अपेक्षाभंग झाला असे लिहिले नसते. नेमकी गोची तिथेच आहे. आणि मी तेंव्हापासून हेच सांगतो आहे.

ही बघ रैनाने दिलेली कविता - माझ्यासारखेच इतर ज्यांनी अपेक्षा केली, त्यांना हे वाटत आहे. धन्यवाद रैना. Happy

मग आम्ही हिंदू वाचली
आणि मग आम्ही टरकलो.

येणार येणार म्हण्न गाजत होती, आमची उत्कंठा वाढवत होती
प्रकाशनपूर्व कीर्ती गगनांतरी पोचली होती
---
मायमराठीत कादंबरीच नाही अशी म्हणे हिंदुरावांना बोच

आणि नेमकी हीच अपेक्षा करा असे प पु नेमाडेंनी लिहिले आणि मी म्हणत आहे की ह्या वरील ओळींना ती जागत नाही. अर्थात अजून पुढचे भाग आहेत, पण पहिला खंड फसला. तरी आम्ही उरलेले असेच विकत घेऊन वाचणार ह्यात शंका नाही. नेमाडेंनी तिथे षटकार मारला तर आम्ही कौतूक करू.

पेशन्स ठेवून वाचायला लागली > मला तरी हिंदू वाचायला पेशन्सवर तान द्यावा लागला नाही. Happy वाचणे आवडले. अगदी श्री ना किंवा खानोलकर ज्या आवडीने किंवा कोसला जसे आवडले तसेच ही पण वाचली.

Pages