भोग दुर्दैवाचे ..... (तृतीयपंथी)

Submitted by पुरंदरे शशांक on 22 March, 2011 - 02:13

भोग दुर्दैवाचे ..... (तृतीयपंथी)

४-५ वर्षांपूर्वीची गोष्ट ....... पुण्यातील एका प्रख्यात endocrinologist समोर रीतसर appointment घेउन नुकताच त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसतोय तोच.....
धाडकन दरवाजा उघडून... एक महिला आत आली.....माझ्या आधी येऊन गेलेली.....ग्रामीण भागातील, कावर्‍या - बावर्‍या चेहर्‍याची........
"माझ्या पोराला आता खरंच काही इलाज करता यायचा नाही का हो ?"
मी अवघडून उभा राहिलो व बाहेर जायला निघालो.
डॉ. नी खुणेनेच मला बसायला सांगितले. डॉ. चांगले professional असले तरी त्या महिलेशी सह्रदयतेने १-२ मिनिट बोलले.
त्या संवादातून मला थोडा- फार जो काही बोध झाला त्यामुळे मी हादरूनच गेलो होतो.
ती महिला बाहेर गेल्या गेल्या माझा प्रश्नांकित चेहरा बघून डॉ. (जे आमचे चांगले मित्रही आहेत) पुटपुटले....काय करणार...भोग असतात एकेकाचे......
"तुमची हरकत नसेल तर जरा सांगणार का त्या महिलेच्या अडचणी विषयी ?" माझी उत्कंठा शिगेला पोचलेली.
" हरकत कसली? ती बाई विजापूर जवळच्या कुठल्याशा खेडयातून आलेली आहे. तिचे मूल आता १२ - १३ वर्षांचे आहे -त्याच्या करता आली आहे."
"पण नक्की problem काय आहे ?"
"ते मूल... ना धड पुरुष ना धड स्त्री...थोडक्यात तृतीय पंथी किंवा सामान्य भाषेत - "हिजडा".."
मला चक्करच यायची बाकी होती.
डॉ. पुढे सांगत होते की मूल जन्मल्या -जन्मल्या डॉ व प्रशिक्षित नर्ससेस असे मूल ओळखू शकतात. हे शहरातच शक्य असते. खेड्यात तेही दुर्गम असेल तर सामान्य लोक काय करणार बिचारे?
मी कसाबसा धीर एकवटून विचारले "पण समजा ओळखलेच असे मूल तर त्याचे भवितव्य काय ?"
"काही ऑपरेशन व औषधोपचाराने त्याला "ती" किंवा "तो" बिरूद लागते. पण अर्थातच ती असेल तर गर्भ धारणा होऊ शकत नाही व "तो " असेल तरी नपुंसकच"
पुढे ते म्हणाले - आम्ही फ़क्त एवढेच करू शकतो की वरवर पुरुष असेल तर स्त्रियांसारखी स्तनांची वाढ अथवा वरवर स्त्री असेल तर दाढी येणे असा प्रकार रोखू शकतो.
डॉ. पुढे काय काय सविस्तर, शास्त्रीय माहिती सांगत होते ते ऐकायला माझे चित्तच थार्‍यावर नव्हते.
त्या बाईचे ते आतापर्यंत मुलगा म्हणून वाढवलेले मूल आता स्त्री सारखे दिसू लागले....एव्हढेच माझ्या नजरेसमोर येऊ लागले.
एक "हिजडा" कसा निर्माण होतो हे कटु, जळजळीत वास्तव मला पहिल्यांदाच कळत होते.
आपण नक्की कोण - स्त्री का पुरुष ? ही identity गमावलेली व्यक्ती माझ्या मनातून पुसता पुसली जाईना..........
आपल्या समाजात अशा व्यक्तींकडे काय नजरेने बघतात, त्यांचे काय हाल होतात या सगळ्या गोष्टी आठवून ही समोर दिसलेली घटना मनाची फ़क्त चिरवेदना देणारी जखम होऊन राहिली........
भोग दुर्दैवाचे......एवढेच आपण म्हणणार......

स्वाती २ यांनी दिलेली ही खालील लिन्क पाहिल्यास बर्‍याच मूलभूत शंकांचे निरसन होईल.
http://en.wikipedia.org/wiki/Intersexuality

तसेच डॉ. प्रज्ञा / रुणुझुणु आपल्याला मार्गदर्शन करायला आहेतच.

शांती सुधा यांनी दिलेली ही लिंक -
ही इ-सकाळ मधील बातमी. याच विषयावर आहे.

http://www.esakal.com/esakal/20110810/5174501571479533691.htm

गुलमोहर: 

मामी,

तृतीय्पंथी लोकांची मानसीकता हा एक मोठ्ठा भाग आहे ज्या कारणाने त्यांना सैन्यात घेतले जात नसावे. त्यांची तृतीयपंथी ओळख झाकणे अवघड आहे. अश्या वेळेला समाजात मिळणारी वागणुकीने त्यांची मानसीक जडण घडण होत असते. बस मध्ये ह्या तृतीयपंथी लोकांच्या शेजारी कोणी बसायला तयार नसते. सततच्या हेटाळणीने त्यांना किती आत्मसन्मान शिल्लक असतो हा प्रशन आहे. सबब सैनीकाचा कणखर पणा त्यांच्या येऊ शकेल असा विश्वास वाटत नसल्यामुळे त्यांना सैन्यात घेण्यास लोक तयार नसावेत.

<<कोणी कशाला ? मी गप्पा मारते आहे, पण उद्या अशा एखाद्याला शिकवायचे म्हटले तरी माझी ततपप होइल.>>
मनिमाऊ, सेम पिंच.....मला सगळी पॅथॉलॉजी माहीत असूनही हे लोक गाडीच्या काचेजवळ किंवा ट्रेनमध्ये जवळपास आले तर नकळत धडधडतं.
शिखंडीबाबत दिनेशदांशी सहमत.

त्यांच्यावर निसर्गाने केलेल्या अन्यायाची जाणिव ठेउन, त्यांना कमीत कमी माणुस म्हणुन तरी वागवायला हवं आपण.
----पुर्ण अनुमोदन... मला केवळ सहानभुती वाटत रहाते :अरेरे:.

मुंबईत हिजड्यांना सन्मानाचे जिणे अशक्य होईल, पण विकृत समाधानासाठी त्यांचा वापर होतोच.
अनेकदा सिग्नलजवळ, ते त्रास देतात, गाडी, टॅक्सी असेल तर काचा बंद करता येतात, पण रिक्षात काय करणार ?
अंगावर थुंकणे, साडी वर करुन दाखवणे असा पवित्रा ते घेऊ शकतात. एकदा आई माझ्याबरोबर असताना, त्याने रिक्षा अडवली (अशावेळी रिक्षावाला काहि करत नाही) आईने त्याला पैसे दिले आणि माझ्या मूलाला आशिर्वाद दे असे सांगितले. त्याने खरंच माझ्या गालावरुन हात फिरवून, बोटे मोडून घेतली. त्याच्या चेहर्‍यावर मला कृतज्ञतेचे भाव दिसले.

तेव्हापासून मी तसेच करतो. थोडेफार पैसे दिल्यावर, ते त्रास देत नाहीत.

सैन्यात भरती करणे, याबद्दल माझे मत वेगळे आहे त्यांचे कुणीच असते, ते मेले तरी चालतील, असा तर विचार नाही ना आपण करत ?

मागे एकदा, एका बँकेने कर्जवसुलीसाठी, त्यांचा वापर करुन घेतल्याचे वाचले होते. पण त्या कृतीला बंदी घातली गेली.
उद्या त्यांनी कुठलाही उद्योगधंदा करायचे ठरवले. उदा. भाजी विकणे, फूले विकणे, तर कुणीही त्यांच्याकडून काहि घेईल का ?

सर्व वाचून असे वाटते की लक्ष्मी किंवा या मंडळींसाठी काम करणार्‍या संस्थांना विचारले पाहिजे - आपण नक्की काय मदत करु शकतो ते. हेच लोक आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करु शकतील. त्यांच्या नेमक्या अडचणी आपल्याला कुठे माहित आहेत ?
अशाच चर्चांनी आपल्याही जाणीवा बदलू शकतात हे मात्र खरे !

मामींना अनुमोदन. मागे एका न्यूज चॅनेलवर ह्यावर एक कार्येक्रम दाखवला होता.त्यात त्यांनी उत्तर प्रदेशातली माहिती दिली होती.लहान मुलांना पळवून नेले जाते,व त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन त्यांना हिजडे बनवून त्यांच्याकडुन भीक, व धंदा करवला जातो. हे सर्व पैशासाठी करवले जाते. एकदा ही मुले अशी बनली कि समाजात त्यांना कुठ्लेच स्थान नाही,व पुढे त्यांना हेच करण्यावाचून दुसरा पर्याय रहात नाही.अंगावर काटा आला होता हे पाहून. निसर्गतः अश्या केसेस कमी असतात.

मामी अणि समईला अनुमोदन. मुद्दाम खच्चीकरण करुन असे करण्याचे प्रमाण खूप आहे. प्रत्येक संस्कृतीत वेगवेगळ्या करणांसाठी पूर्वीही असे केले जायचे. http://en.wikipedia.org/wiki/Eunuch येथे या बद्दल बरीच माहिती आहे. आपल्याकडे वेश्याव्यवसाय काय किंवा हे असे हिजडे काय एकदा पळवुन नेऊन अत्याचार केला की त्यातुन त्यांची सुटका होणार नाही याची काळजी बाकीचा 'सभ्य आणि सुसंस्कृत' समाजच घेतो.
माझ्या सासर्‍यांच्या घरी सोलापुरला घरकामाला हिजडा होता. त्याची आई त्यांच्याकडे काम करायची त्यामुळे त्या ओळखीतून त्यालाही कामावर ठेवले होते. हातावर छान भाकर्‍या करायचा वगैरे आठवणी सासरे सांगायचे. नंतर परीस्थिती वाईट झाल्यावर सगळीच नोकरमाणसे कमी करावी लागली. मग काही संपर्क उरला नाही.
मी देशात नोकरी करत असताना एकदा असेच खालच्या दुकानात हिजडे भीक मागत होते. ऑफिसची पाटी पाहून वरती आले. ऑफिसमधे मी एकटी होते. मी त्यांना पैसे देऊ केले तर ते म्हणाले, ' बेटी वो बोर्ड पें कंप्युटर लिखा है इसलिये उपर आये. हमे दिखा सकती हो तो...' ९१-९२ साली काँप्युटर तसा कुतुहलाचाच प्रकार होता. मग मी त्यांना डॉसवाला कॉंम्पुटर दाखवला. अगदी उत्सुकतेने आणि अचंब्याने त्यांनी ५ मिनिटांचा डेमो बघितला. त्यांना कीबोर्ड हाताळायला दिल्यावर तर त्यांचे चेहरे इतके खुलले. जाताना मला त्यांनी तोंडभरुन आशिर्वाद दिले.

मलाही एका हिजड्याने चांगला धङा दिलेला आहे..

सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आम्ही शेअर टॅक्सीने दादरला येत होतो.. मी खिडकीजवळ होतो. बाहेर एक हिजडा आला आणि पैसे मागू लागला. मी दहा रूपये तरी जनरली देतो. पण माझ्याकडे नेमके १०० ची नोट होती, ती त्याला दिली आणि ९० रू द्यायला सांगितले.बायकोकडेही सुट्टे २ रु होते.. .. नेमकी त्या हिजड्याने कनवटीला पैशाची जी बारीक पिशवी लावली होती, तिची गाठ निघेना.. तोपर्यन्त टॅक्सी भरली.. मी ड्रायवरला जरा थांबायला सांगितले, पण लोक कुरकुरु लागले.. या हिजड्याला पैसे परत द्यायचे नसतील, म्हणून तो नाटक करतोय असे म्हणू लागले..तो आता असाच वेळ काढणार आणि पसार होणार असे लोक म्हणत होते...

आणि अनपेक्षितपणे त्या हिजड्याने मला १०० रु परत दिले.. आणि बायकोच्या हातातील दोन रु घेतले.. टॅक्सी चालू झाली... मी मागे वळून पाहिलं. मला वाटले होते, तो/ती नाराज असेल, पण नाही, हात वर करून 'भला हो तेरा' म्हणत होता..दहा रुच जर द्यायचे होते, तर त्याला दोन लाडू दिले असते तरी चालले असते, पण मला तेही सुचले नाही.. कारण १० द्यायचे आहेत, यापेक्षा ९० परत घ्यायचे आहेत, हे डोक्यात जास्त भिनले होते...

ढीगभर सुखे मिळूनसुद्धा सिद्धीविनायकाच्या देवळात नव्या अपेक्षेने रांग लावणारे आणि थोडे अपेक्षेपेक्षा कमी मिळाले तरी देव्/नशीब यांच्या नावाने खडी फोडणारे आपण.... आणि तो हिजडा... मला हे व्यस्त प्रमाण आजही वारंवार आठवते... यात हिजड्याचा प्रोफेशनलपणा असू शकतो, पण काहीही असले तरी हा एक धडा होता, हे नक्की...

आज वाचला हा बाफ... फारच विचार करायला लावणारा विषय आहे हे नक्की..
नजरेतून सुटला कसा काय कोणजाणे. Sad

तृतीयपंथी सन्मानाने का जगू शकत नाहीत हा प्रश्न खरंतर एका नॉर्मल माणसाने स्वत:ला विचारायला हवा... त्यामुळे सिग्नलवर भीक मागणे किंवा असे प्रकार करणे त्यांना भाग पडते जेणेकरून सामान्य माणूस त्यांना पैसे देऊन लवकरात लवकर त्यांच्यापासून स्वत:ची सुटका करून घेईल. पण ही वेळ सामान्य जनतेनेच त्यांच्यावर आणली.. त्यांच्यात काहीतरी शारिरिक कमतरता आहे म्हणून त्यांनी कोणतंही डिग्निटीचं काम करायचं नाही? Sad हा सारासार अन्याय आहे. दुर्दैवाने वर्षानुवर्ष तृतीयपंथीयांना अशीच खालच्या पातळीची वागणूक मिळाल्याने त्यांनी ही जशास तसे वागायचा प्रकार अंगी बाणवला आहे.

मला ही पुर्वी या लोकांचा तिटकारा असे... कारण जंगली महाराज रस्त्यावरून जाताना एकदा ७-८ जणांनी मला घेरले, जामोप्या सारखेच माझ्याकडेही १०० ची नोट होती... १० रू. घ्या वरचे परत करा असं म्हणलं तर ज्याने पैसे घेतले त्याने कनवटीला मारून इतरांच्या मदतीने मला विचित्र हावभाव करून दाखवले व पळ काढला.. Sad त्यांच्याबद्दल मनात घृ़णा निर्माण झाली..

पण गेल्या काही वर्षात माझ्या मतात बराच बदल झाला. लक्ष्मी चा टॉक शो तर मी ही पाहिला... मी अतिशय इंप्रेस झाले तिची कार्यपद्धती आणि अ‍ॅसर्टिव्ह नेचर पाहून. तिने एक किस्सा सांगितला ती जेव्हा पासपोर्ट बनवायला गेली तेव्हा फॉर्मवर स्त्री लिंग आणि पुल्लिंग असे दोनच ऑप्शन होते... भांडून तिने ३रा कॉलम सुरू करायला लावला other असा. हॅट्स ऑफ... हेच शब्द निघाले तो किस्सा ऐकून, सेम घटना जी तिच्याच बाबतीत घडली... तिला सार्वजनिक ठिकाणी लेडीज आणि जेण्ट्स दोन्ही टॉयलेट्स वापरण्यापासून मज्जाव करण्यात आला. तेव्हा तिने टाहो फोडून विचारले मग आम्ही जायचे कुठे? Sad इतक्या छोट्या जीवनावश्यक गोष्टीत जर त्यांना इतका संघर्ष करावा लागत असेल तर मोठ्या गोष्टींचे काय?

लिहावे आणी विचार करावा तितका थोडाच आहे. मूठभर सेन्सिटिव्ह लोकांनी यांच्याबद्दल आत्मियता दाखवून या लोकांना न्याय मिळणार नाही. आपल्यापैकी प्रत्येकाने अंतर्मुख होऊन ते केले पाहिजे.

माझ्या मते 'शिखंडी' नावाचं एक पुस्तक आहे, त्यामधे या गोष्टींचा चांगल्या पद्धतीने उहापोह केला आहे. मी फार वर्षांपूर्वी वाचलं होतं, त्यामुळे लेखक लक्षात नाही.

पण हे होते कसे? Uhoh

xx {=स्त्री} आणि xy { =पुरुष } हे दोनच सेक्स क्रोमोझोम्स असताना तिसरा पर्याय येतोच कसा ? यावर कोणी प्रकाश टाकेल का ?

विनम्र, या लेखाचा शेवट करताना मी एक लिंक दिली आहे त्यात सर्व शास्त्रीय माहिती दिली आहे - ती कृपया पहावी.

पण महत्वाची गोष्ट अशी की - आपण नॉर्मल मंडळी या "अशा" मंडळींचा कसा विचार करतो?, ही निसर्गाच्या काही चुकीमुळे निर्माण झालेली असली तरी "माणसे" च आहेत अशा विचाराने त्यांच्याशी वागू शकतो का ? त्यांना काही मदत करणे जरा लांबची गोष्ट झाली - पण "माणूस" म्हणून केव्हा स्वीकारणार ? इतर अपंग व्यक्तींबरोबर जसा व्यवहार करतो तसा केव्हा करणार?
वर जसे म्हटले की आपल्यापासून सुरवात करु या - थोडे थोडे करत हळुहळु समाजाला जाणीव होणे (याला खूप वेळ लागेल याची कल्पना आहे ) - त्यांना माणूस म्हणून स्वीकारणे हे फार गरजेचे आहे असे वाटते. सुरवात तर करु या....स्वतःपासूनच.

.....

हम्म्म, दक्षिणा खरं आहे तुझं. या लोकांनी विचित्र वागुन स्वतःबद्द्ल तिटकारा निर्माण करुन ठेवला आहे समाजात. त्या लोकांची किळस किंवा घृणा वाटण्यापेक्षा विलक्षण भीती वाटते आपल्याला.

मला स्वतःला खुप दया येते या लोकांची, मदत करावी, सहानुभुतीने बोलावे असे वाटते, पण खरं सांगु तर यातलं काहीही जमणार नाही. अशी व्यक्ती जवळ आली कि पाय थरथरतात, प्रचंड भीती वाटते. का? माहित नाही. उगाचच. मुर्खपणा आहे हे कळतं तरीही. पुढच्यावेळेस घाबरायचं नाही, हे ठरवुनही ते काही जमत नाही.

आपण असं वागतो, म्हणुन ते विचित्र वागतात कि ते विचित्र वागतात म्हणुन आपण घाबरतो? कुणास ठावुक. पण आपली भीती घालवणं हीच सुरुवात असेल बदलाची.

एक थोडासा वेगळा अँगल माहिति आहे मला. खुप वर्ष मी घाट्कोपर-विक्रोळी ईथे राहिलि आहे लग्नानंतर. ईथे बेठया चाळींमध्ये खुप हिजडे राहतात. मोठी, स्वच्छ आणि प्रशस्त घरं आहेत ह्यांची. त्यांचा स्वतःचा दर्गा / मंदिर आहे आणि राहणीमान सुद्धा अप टु द मार्क आहे. शेजार पाजार नॉर्मल लोकांचा आहे. दुकानदार, फेरीवाले, ई. त्यांना नॉर्मलच ट्रिट्मेंट देतात. आपापसांत खुप एकी आहे त्यांची आणि काहि वेडंवाकडं झालं कि सगळ्या मुंबईतले त्यांचे बांधव धाउन येतात. उदरनीर्वाहा साठि नक्कि काय करतात ते माहिति नाहि तरि बहुतेक वेळा नटुन सजुन कुठेतरि जात असतात.

दुसरं म्हणजे एका हाय प्रोफाईल लग्नात एक डान्स पार्टि बघितलि होती, आधि वाटलं बारबाला असतील, पण जवळुन बघितलं तेव्हा कळालं कि ते सारे तृतीय पंथी होते. पुन्हा एकदा गेट अप अगदि अप टु द मार्क होता.

सगळे अगदिच गरिब बिचारे नसतील बहुतेक.

मुंबईत असलेल्या एकुण तृतीयपंथी लोकांपैकी खरेखुरे तृतीयपंथी मोजता येण्याजोगे आहेत. पण घाबरून वा नस्ती ब्याद नको या विचाराने लोक त्यांना पैसे देतात. ती 'सक्तीची इनकम' पाहून बरेच जण या व्यवसायात उतरलेले आहेत. जे नैसर्गिक आहेत ते सहसा भीक मागण्याच्या फंदात पडत नाहीत. ते गाणे बजावणे किंवा नवजात मुलांच्या बारशाला जाऊन आशिर्वाद देणे अशी कामे करतात.
विचित्र पेहराव, अवास्तव मेकप आणि ओंगळ हावभाव ही त्यांची ओळख फुकट्या तृतीयपंथीनी बनवली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल चीड किंवा किळस वाटते. हे मत मांडायला एक कारण असे की मी जे काही तृतीयपंथी जवळून पाहीलेत त्यांना कधीही असल्या भडकपणाची गरज भासली नाही. दुसरे म्हणजे स्टेशनवर अरेरावीने वागणारे तृतीयपंथी खरे नसावेत हे त्यांच्या वागण्यामुळे प्रकर्षाने जाणवते. एखाद दुसरा असेलही. पण सगळेच नसतात हे नक्की.
आता हा समाज बर्‍यापैकी जागृत व्हायला लागला आहे आणि आपल्या अधिकारांसाठी त्यांनी तोंड उघडायला सुरुवात केली आहे. फक्त आपण आपला दृष्टीकोन थोडासा बदलला तर तर बराच फरक पडू शकतो.
मी कधीही त्यांना पैसे देत नाही, पण आजवर माझ्याशी कधी कोणीही वाईट वागलेलं नाही. शशांक तुम्ही एक फार चांगला विषय निवडलात. वाईट मात्र या गोष्टीचं की नको त्या बाफवर रतीब घालणार्‍या माबोकरांनी इथे प्रतिसाद देताना हात फारच आखडता घेतलाय.

मागे लिहिल्याप्रमाणे, ह्या फिल्डमध्ये काम करणार्‍या माझ्या मित्राशी कॉन्टॅक्ट झाला. त्याची संस्था तृतीयपंथी, समलिंगी ह्यांच्या समस्यांवर काम करते.

ह्याविषयी काही जाणून घ्यायची / काम करायची ईच्छा असल्यास विपुतून / संपर्कातून लिहा.

मी गायनॅक च्या पुस्तकात वाचले होते कि कधी कधी XO, XXO अशीही गुणसूत्रे तयार होतात. अनेकदा निसर्गच असले गर्भ नष्ट करतो, पण काही जन्माला येतात. कधी कधी एक पंथ म्हणून त्यांचे खच्चीकरण केलेले असते. यावर डॉक्टर मंडळींनी लिहायला हवे.

जन्माने जे तृतीयपन्थी असतात ते तर फार कमी असतात, पण ज्यांना बनवल्या जाते ते तर फार भयनक आहे, ऐकुनच कुणीही हादरुन जाईल.
पण अजुन एक वेगळा किस्सा पेपर मधे वाचण्यात आला, त्यात एका आई ने पोलीस कडे हिजड्यां विरुध्ध तक्रार दाखल केली मुलाला नादी लावल्या बद्दल, मुलगा हिजड्यां सोबत पकड्ला गेला, पण तपासात मुलाने स्वताहा पोलीसांना सांगितले की त्याला कुणी ही फीतवले नाही, त्याला स्वताहाला च तसे राहणे मना पासुन आवडते अन त्याला तसेच त्यांच्या सोबतच राहायचे आहे. तो मुलगा अगदी सामान्य घरातला अकरावीत शिकत होता.
विषयान्तर झाले नसेल अशी अपेक्षा आहे कारण त्या आई बापा ची वेदना ही मला तुमच्या लेखतल्या आई सारखीच वाटली म्हणुन लिहीले.

खुप बॅलन्स्ड लिखाण. मीही पाहिला होता तो अधिकारींचा कार्यक्रम. खुप चांगला हॅडल केला होता तो. रेणुका होती ना त्यात ? खरच खोलात गेलं की जाणवतं किती मोठे प्रश्न तेही उत्तरं नसलेले....
रैना>>><<इटस ओके. आहेत तर माणसंच. Happy अवघड आहे. अशक्य नाही.<<< किती छान लिहिलस !

शशांक, माझ्या माहितीप्रमाणे ही केवळ जन्मत:च असलेला दोष असतोच असे नाही. कदाचित हा [शरीरातील अतिशय प्रभावी हार्मोन्स + (सामाजिक पार्श्वभूमी + कौटुंबिक पार्श्वभूमी = मानसिक जडणघडण)] यांचा एकत्रित परिणाम असू शकतो. मग अशा व्यक्तींना बाह्यत: पुरूषाचे लैंगिक अवयव असले तरी ते मनाने पुरूषांकडेच आकर्षित होतात. त्यांच्यामध्ये बर्‍याचप्रमाणात मुलींमध्ये दिसतात तसे गुणधर्म, आवडीनिवडी, बोलण्याच्या लकबी दिसतात. उदा. आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगा आहे. त्याने केस लांबलचक वाढवलेले आहेत आणि ते मोकळे सोडूनच येतो. त्याच्या शर्टाच्या कापडांची डीझाईन्सही फुलाफुलांची, गुलाबी, केशरी, जांभळा अशा रंगाची असतात. त्याची चालण्याची लकबही मुलीसारखीच आहे.
ह्या लोकांना परदेशात "हिजडा म्हणजेच युनिक" असे कोणीही संबोधल्याचं ऐकिवात नाही. परदेशात या सगळ्या गोष्टी आता खूपच सहजतेने घेतल्या जातात. गेल्यावर्षी जुलै महिन्यात टोरंटो मध्ये असताना तिथली "गे परेड" पाहण्याचा योग आला होता. एकाचवेळी एखादी व्यक्ती पुरूषही असू शकते आणि त्याच बरोबर गे सुद्धा. म्हणजे त्या व्यक्तीला पुरूष तसेच स्त्रियां विषयीही आकर्षण वाटू शकते. माझ्या माहितीप्रमाणे ही अशाप्रकारची मानसिकता ही विशिष्ट प्रकारच्या मानसिक कोंडमार्‍यामुळे तसेच योग्यत्यावेळी योग्यत्या मानसिक गरजा न भागविल्या गेल्यामुळे सुद्धा समलिंगी संबंधांकडे व्यक्ती आकर्षित होतात. उदा. एखादी स्त्री जर अधिक इंडीपेंडंट असेल आणि नवर्‍याला ते आवडत नसेल तर त्यांचा घटस्फोट होऊन ती स्त्री स्वत:च्या मैत्रिणीबरोबर रहायला लागणं. बरेच जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ (न्युटन सहित) ’गे’ होते. असंही वाचण्यात आलंय की याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची स्वत:च्या करिअर मध्ये त्यांना वाटणारी असुरक्षिततेची भावना. उदा. गेम थेअरीमधील नोबेल लॉरेट डॉ जॉन नॅश. त्यांचं लग्नही झालेलं होतं आणि त्यांना दोन मुलंही होती. तरीही त्यांना त्याकाळी (ज्या काळात पाश्चात्य देशांत समलिंगी संबंध मान्यता पावलेले नव्हते) "गे" म्हणून एक रात्र तुरूंगात काढायला लागली होती.
पाश्चात्य देशांतील चर्चेस मध्ये (जिथे फक्त फादर्स आणि ब्रदर्स असतात) सुद्धा समलिंगी संबंधांच्या अनेक केसेस उघडकीस आल्या आहेत. कदाचित आपल्या देशातही असतील पण फारशा बाहेर आल्या नसतील.
मधे एकदा वाचनात एक बातमी आली की एका बाईने स्वत:च्या नवर्‍या विरूद्ध पोलीसात तक्रार दाखल केली की तो हिजडा बनलाय आणि त्यामुळे घरी येत नाही, मुलाबाळांची जबाबदारी घेत नाही. त्या माणसाला नोकरी नव्हती आणि दारूचं व्यसन होतं. बायकोने पैसे देणं बंद केल्यावर त्याला कुणीतरी हिजडा बनण्याचा उपाय सुचवला. भारतातील मुख्य शहरांमध्ये सिग्नलला उभं राहिल्यावर सगळीकडे आपण हिजडे टाळ्या बडवत फिरताना बघतो. फक्त पुरूष चालकांकडे जाऊनच हे हिजडे पैसे मागतात. त्यात दिवसभरात भरपूर पैसे मिळतात. कधी कधी दिवसाला १००० रूपये सुद्धा मिळतात. म्हणून केवळ पैशासाठी आणि स्वत:च्या व्यसनाची गरज भागवण्यासाठी त्या माणसाने हिजडा होणं पसंत केलं.
समलिंगी असणं हे फक्त जन्मजात दोषांमुळेच आहे असं नाहीये. त्याला आर्थिक आणि सामाजिक कारणं देखिल आहेत हे समोर आलेलं आहे. ज्यांच्यामध्ये जन्मजात दोष आहे त्यांचं आपण फारसं काही करू शकत नाही पण आर्थिक आणि सामाजिक कारणांचा तितकाच गांभिर्याने विचार व्हायला हवा असं मला वाटतं. स्त्रीभ्रूण हत्येचा उच्च दर असलेल्या भारतात हे कितपत शक्य आहे माहीत नाही.

गंमत म्हणजे समलिंगी ही समस्या आहे असं आपल्यासारख्यांना वाटतं पण जे समलिंगी आहेत ते त्यात खूपच आनंदात आहेत. Happy

एकाचवेळी एखादी व्यक्ती पुरूषही असू शकते आणि त्याच बरोबर गे सुद्धा. म्हणजे त्या व्यक्तीला पुरूष तसेच स्त्रियां विषयीही आकर्षण वाटू शकते. >> शांतीसुद्धा तुम्हाला बायसेक्शूअल म्हणायचं आहे का?

Pages