'विवेक आणि विद्रोह' - डॉ. अरुणा ढेरे

Submitted by चिनूक्स on 3 May, 2011 - 00:54

एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत रूढींच्या पाशात अडकलेल्या आणि कमालीचं जडत्व आलेल्या महाराष्ट्रीय समाजाला नव्या विचारांचं वारं लागावं, म्हणून अनेक समाजधुरिण प्राणपणानं लढले. बुरसटलेले विचार आणि परकीय सत्तेचा पाश अशा दुहेरी आव्हानांचा सामना करत या मंडळींनी एका पुराणप्रिय समाजाला डोळे उघडे ठेवून बघायला, स्वतःच्या डोक्याचा वापर करून विचार करायला शिकवलं. ज्यांचा मुक्तपणे जगण्याचा हक्कच नाकारला गेला होता, अशा विधवांना आणि दलितांना मोकळा श्वास महाराष्ट्रातल्या काही सुधारणावाद्यांमुळेच घेता आला. या सुधारणावाद्यांनी सामाजिक परिस्थितीविरुद्ध विद्रोह केला, पण विवेकाच्या आधारानं. कारण विध्वंस नव्हे, तर नवनिर्माण हा या विद्रोहाचा हेतू होता.

गेल्या काही वर्षांत पद्मगंधा प्रकाशनानं काही अतिशय महत्त्वाची पुस्तकं प्रकाशित केली आहेत. डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या ग्रंथांचा संच, मर्ढेकर, आरती प्रभू यांच्या कवितांच्या समीक्षा, र. धों. कर्वे यांच्या अफाट कार्याचा आणि व्यक्तित्वाचा वेध घेणार्‍या आठ पुस्तकांचा संच हे त्यांपैकी काही उल्लेखनीय. या ग्रंथांच्या रूपानं एक फार मोठा सामाजिक आणि साहित्यिक दस्तऐवज पद्मगंधा प्रकाशनानं आणि श्री. अरुण जाखडे यांनी उपलब्ध करून दिला आहे. डॉ. अरुणा ढेरे यांची तीन अतिशय महत्त्वाची पुस्तकंही या मालिकेत सामावता येतील. परंपरांचे पाश तोडून स्वतःचं स्थान निर्माण करणार्‍या स्त्रियांची ओळख करून देणारा 'त्यांची झेप, त्यांचे अवकाश' हा लेखसंग्रह आणि ज्येष्ठ विदुषी दुर्गाबाई भागवत यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा लेखसंग्रह ही या मालिकेतली पुस्तकं अभ्यासकांना आणि वाचकांना निखळ आनंद देणारी आहेत. 'विवेक आणि विद्रोह' हे या मालिकेतलं तिसरं पुस्तक. विद्रोहाची शक्ती समजूतदारपणे वापरून समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करणार्‍या सुधारक व्यक्ती आणि संस्थांचा सुरेख वेध या लेखसंग्रहात अरुणाताईंनी घेतला आहे.

न्या. महादेव गोविंद रानडे, आगरकर, काशीबाई कानिटकर, केशवराव जेधे अशा थोरांच्या कार्याची ओळख या पुस्तकात तर आहेच, शिवाय 'चित्रशाळा प्रेस'सारख्या महत्त्वाच्या संस्थेच्या कामाचा संशोधनात्मक आढावा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य ठरावं. विधवा आणि दलितांवर होणारे अत्याचार, समुद्रपर्यटनावर असलेली बंदी, धर्मांतर अशा विषयांचा घेतलेला वेध हा या लेखसंग्रहाचा महत्त्वाचा पैलू आहे. 'आनंदीबाईंचे जन्म-मृत्युस्थान', 'वेदान्तसार ते बायबल', 'विस्मृतिचित्रांविषयी थोडेसे', 'स्त्रीशिक्षणातील एक सनातनी अडसर' हे लेख विवेकवादी सुधारणांची उपयुक्तता पटवून देतात. या लेखांमधले ऐतिहासिक तपशील आणि सामाजिक स्थितीवर केलेलं भाष्य जितकं लक्षवेधक आहे, तितकीच खिळवून ठेवणारी आहे या लेखांची सुरेख, सौष्ठवपूर्ण मराठी भाषा.

'विवेक आणि विद्रोह' या लेखसंग्रहातील डॉ. अरुणा ढेरे यांनी लिहिलेली प्रस्तावना आणि 'सुधारक वृत्तीचा जाणता राजा' हा लेख...

हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Vivek-Aani-Vidroh.html

Vivek Ani Vidroha.jpg

विवेक आणि विद्रोह

वर्तमान महाराष्ट्राच्या समाजजीवनाची भली-बुरी घडण करणार्‍या संस्था आणि चळवळीच केवळ नव्हेत तर वृत्ति-प्रवृत्ती आणि व्यक्तिविचार, यांचे स्वरूप पूर्ण ध्यानात येण्यासाठी गेल्या दोनशे वर्षांच्या सातत्यपूर्ण परिवर्तनप्रक्रियेचा संदर्भ पुनःपुन्हा तपासावा लागतो. कारण स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचे जनजीवन पहिल्या महायुद्धानंतरच्या ज्या तीस-पस्तीस वर्षांच्या सामाजिक परिवर्तनातून आकाराला आले, त्या परिवर्तनाचे जवळजवळ सर्व प्रवाह एकोणिसाव्या शतकाच्या मायपोटातून जन्माला आले.

हे शतक म्हणजे एका फार मोठ्या स्थित्यंतराचा प्रारंभ होता. एक स्थितिशील, पुराणप्रिय, दैववादी समाज गतिशील, आधुनिक आणि बुद्धिप्रामाण्यवादी होण्याच्या प्रक्रियेची ती सुरुवात होती. सर्वसाधारणपणे अशा प्रक्रियेत ज्या प्रकारच्या क्रिया-प्रतिक्रियांची गुंतागुंत दिसते, त्या प्रकारची गुंतागुंत या काळच्या महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातही दिसून येते. शब्दप्रामाण्य मानणारा आणि सर्वच सामाजिक संस्थांना अपरिवर्तनीय मानणारा असा एक लोकसमूह या समाजात संख्येने लहान पण प्रभावी होता. त्याला स्वतंत्र प्रज्ञेपेक्षा प्राचीनांचे आज्ञापालन महत्त्वाचे वाटत होते. वास्तवाची चिकित्सा करुन नवे सिद्धांत निर्माण करण्यापेक्षा श्रद्धेने परंपरागत सिद्धांतांचा स्वीकार अकरणे त्याच्यासाठी अगत्याचे होते. नवनिर्माणापेक्षा पुनरुज्जीवनावर त्यांचा विश्वास होता.

आणि असा एक समूह त्याच काळी इथे होता की पाश्चात्य ज्ञान-विज्ञानाच्या स्पर्शाने तो जागा झाला होता. इहवादाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्याला कळले होते. समाजातले भेद कमी होतील, शिक्षण सर्वांना मिळेल, व्यवसायस्वातंत्र्य मिळेल आणि नव्या संधी उपलब्धी मिळाल्या तर आपले दैन्य फिटेल, आपली दु:खे संपतील आणि आपल्याला सर्वार्थाने समृद्ध, संपन्न असे जीवन जगता येईल, अशी आशा त्याला वाटत होती.

या दोन लोकसमूहांचा संघर्ष अटळ होता. स्थितिप्रियता आणि गतिशीलता यांच्या संघर्षात नेहमीच नाना प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांचे ताण वाढत जातात गुंतागुंत वाढत जाते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नाना प्रकारचे प्रश्न आणि नाना प्रकारचे ताण यांनी समाजजीवन विलक्षण खळबळून गेले. जुन्या संस्था, श्रद्धा आणि मूल्ये यांमध्ये स्थितिप्रिय समूहाचे हितसंबंध गुंतलेले होते. त्यामुळे त्या संस्था-श्रद्धांची किंवा मूल्यांची फेरतपासणी त्या समूहात मान्य होणारी नव्हती. आगरकर, लोकहितवादी, फुले यांच्या विचारांमधले अनिष्टसंहारक अग्नितत्त्व त्यांना नुसत्या दर्शनानेही भिववणारे होते. शासन, शिक्षण आणि नीती यांसंबंधीच्या नव्या कल्पनांची विविध स्तरांवरच्या प्रागतिकांकडून होणारी मांडणी त्यांना भयकारक वाटत होती. म्हणून पूर्वव्यवस्था अधिक बळकट आणि अभेद्य करण्याकडे स्थितिप्रिय समूहाचा कल होता.

दुसर्‍या बाजूला इहवादी विचारांना सामोर्‍या जाणार्‍या समूहालाही समृद्ध जीवनाचे आकर्षण वेगळ्या हितसंबंधांच्या स्थापनेकडे घेऊन जात होते. इंग्रजी विद्या, कला आणि आधुनिक व्यवसायक्षेत्रांमधल्या संधी त्याला संपन्नता आणि स्थिरता देणार्‍या ठरल्याने इंग्रजी राज्याची थोरवी मान्य करण्यात आणि वाढवण्यात त्याने सार्थक मानले होते.

अशा वेळी वेगवेगळ्या स्तरांवरचे पुढारपण करणार्‍या मंडळींपुढे मोठी आव्हाने निर्माण होत होती आणि त्या आव्हानांना आपापल्या प्रकृति-परिस्थितीप्रमाणे सामोरे जाणारे नेतृत्व कधी विद्रोहाची आणि विध्वंसाची भाषा करीत होते तर कधी तडजोडीची आणि सामंजस्याची वाट दाखवीत होते. परिवर्तनासाठी जनमत तयार करणे हे सर्वच लोकनेत्यांपुढे मोठे बिकट काम होते. मूठभर लोक वगळता बाकी बहुतेक अडाणी आणि दरिद्री असे लोक जगण्याच्या प्राथमिक लढाईत गुंतलेले होते. राजकारणातली आणि अर्थकारणातली गुंतागुंत त्यांना समजत नव्हती. त्यांना जागे करणे, त्यांना विश्वास आणि धैर्य देणे आणि त्यांच्या विचारशक्तीला चालना देऊन परिस्थितीतून मार्ग काढण्याची गरज त्यांना जाणवून देणे हे काम सोपे नव्हते. त्यांना कृतिशील बनवण्याचे काम त्याहून कठीण होते; कारण परिस्थितीत बदल घडवण्यासाठी सामुहिक कृतीची जरुरी असते.

पण लोकनेत्यांना त्याहीपलीकडच्या एका सत्याचा साक्षात्कार कमीअधिक प्रमाणात होत होता. ते म्हणजे लोककृतीतून घडलेले परिवर्तन चिरस्थायी व्हायचे असेल तर त्यासाठी लोकांच्या वैचारिक परिवर्तनाची जरुरी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि या परिवर्तनासाठी सर्वांत प्रभावी शस्त्र आहे विद्रोहाचे. स्वतःच्या पूर्वग्रहांशी झगडण्यात आणि त्याचवेळी, प्रस्थापित हितसंबंधांशी झगडण्यात हे शस्त्र काही प्रागतिक नेत्यांनी फार प्रभावीपणे वापरले.

अनिष्टाचा संहार करण्यासाठी विद्रोहाखेरीज दुसरा उपाय नाही, हे झडझडून जाणवलेल्या फुले-आगरकर-लोकहितवादींसारख्या नेत्यांचा विद्रोह अत्यंत जहाल होता, कारण तो समाजहिताच्या आत्यंतिक कळकळीतून आणि सुधारणेची विलक्षण आच असलेल्या भावनेतून जन्मलेला होता. मुळाशी जेवढी करुणा अधिक आणि विशाल, तेवढा विद्रोह प्रखर आणि प्रचंड अशी ही रीत दिसते. पाण्यातून उफाळलेल्या आगीसारखे त्यांच्या करुणेचे आणि विद्रोहाचे नाते होते.

आगरकरांनी अतिकळवळ्याने समाजाला उद्देशून म्हटले आहे, 'ज्या दुर्मतांनी, दुराग्रहांनी व दुराचारांनी महारोगाप्रमाणे या देशाच्या बुद्धीचा, नीतीचा व शरीरसामर्थ्याचा हजारो वर्षे फडशा चालविला आहे, त्यांचे यथाशक्ति निर्मूलन करणे अत्यंत उचित होय. या कामी तुमच्याकडून हलगरज झाल्यास या देशाला लवकरच जे दिवस येणार आहेत, त्यांचा नुसता विचार डोळ्यांपुढे आला तरी भय वाटल्यावाचून राहत नाही'.

या भयापासून मुक्तता मिळवायची तर जे जे म्हणून प्रगतीला बाधक आहे त्याच्यावर विद्रोहाचे शस्त्र चालवायचे. पण हे शस्त्र नुसत्या डोळसपणाने चालवणे पुरेसे नव्हते. कारण नव्या विद्या-कलांच्या परिचयाने समाजजीवनावर होणारे परिणाम आणि त्यातून समाजजीवनाला प्राप्त होणारे रुप हे त्या-त्या नेत्याच्या अपेक्षेपेक्षा, कल्पनेपेक्षा पुष्कळदा वेगळे असण्याची शक्यता होती. हितसंबंधांच्या आघात-प्रत्याघातातून त्याकाळी निर्माण होणार्‍या समस्या त्यामुळेच बिकट आणि गुंतागुंतीच्या होत्या.

त्यांमधून मार्ग काढण्यासाठी धडपडणार्‍या न्यायमूर्ती रानड्यांसारख्या सुधारकाजवळ वस्तुस्थितीचे सम्यक् ज्ञान होते. विविध पातळ्यांवर, विविध उद्दिष्टे घेऊन चाललेले प्रागतिकांचे परिवर्तनाचे प्रयत्न आपल्या काळाच्या व्यापक पटावर ते पाहू शकत होते आणि त्या प्रयत्नांच्या पातळ्या आणि त्यांची उद्दिष्टे तारतम्याने स्वीकारुन त्यामागचे दृष्टिकोन सुसंबद्ध रीतीने सामावून घेणारा एक मूलभूत परिवर्तनाचा मार्ग निश्चित करण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ होते. समाजजीवनाची अंगे एकमेकांपासून अलग नाहीत, हे जाणून त्यांच्या परस्परावलंबनाचे स्वरूप ते ओळखत होते. विरोधात उभ्या ठाकलेल्या समाजातल्या विविध वर्गांमधली भिन्नतेची तीक्ष्णता कमी कमी करत, राष्ट्रकार्याच्या दिशेने त्यांच्यातील जागृतीचा मोहरा वळवण्याचे अवधान त्यांनी ठेवले होते.

या गुणसमुच्चयामागची मौलिकता आज आपण ओळखली पाहिजे. विद्रोहाची विध्वंसक शक्ती योग्य प्रमाणात आणि योग्य जागीच वापरली गेली पाहिजे; याचे भान दाखवणारे आणि विध्वंसाबरोबरच विधायक नवनिर्माणाचा प्रारंभ झाला पाहिजे याचा आग्रह धरणारे विवेकी परिवर्तनवादी कोणत्याही काळात दुर्मिळ असतात. रानडे त्यांच्यापैकी एक होते.

गं. बा. सरदारांसारख्या विवेकवादी विचारवंताने आगरकर, फुले, महर्षी शिंदे यांना हुतात्मे म्हटले आहे. जाणिवा आणि जीवनक्रम यांच्यामधल्या विसंवादातून समाजजीवनात अनेक पेचप्रसंग निर्माण होतात. ते सोडवताना समाजधुरिणांना आणि विचारवंतांना पुष्कळदा आत्मक्लेशाचा मार्ग अनुसरावा लागतो. काहींना प्राणार्पणही करावे लागेत आणि काहींना लोकापवादाची क्षिती न बाळगता कणाकणाने झिजत राहून ध्येयसाधना करावी लागते. तशी साधना करणारे हे तिघेही हौतात्म्य पत्करणारे सुधारक होते. पण त्यांच्या भाळी जन्मविफलतेचा शाप लिहिला जाऊ नये यासाठी जनमत तयार करणारे रानडे यांचे प्रयत्न फार मौलिक होते, असे म्हणायला हवे.

सच्चा सुधारणावादी नेहमीच हे जाणून असतो की श्रद्धा डोळस हवी, त्याग सबळ हवा आणि तत्त्वे पोषक हवीत. जीवनातले उदात्त, न्याय्य आणि निर्माणक असे जे जे आहे ते ते राखण्यासाठी प्राणार्पणाचीही तयारी ठेवायला हवी, पण प्राणार्पण म्हणजे नुसतेच आततायी किंवा प्रक्षोभक कृत्य नसावे. त्यामागे विवेक हवा, ज्यासाठी प्राणार्पणाला सिद्ध व्हायचे, त्याविषयी आस्था तर हवीच पण प्राणांविषयीही हवी. असे बलिदान कधी व्यर्थ जात नाही. ते नेहमीच समाजधारक अशी एक शुभंकर प्रेरणा बनते.

गेल्या दोन शतकांमधल्या विवेकी सुधारणावादाच्या इतिहासाने हे सत्य वारंवार उजळले आहे. ह्या लेखसंग्रहात त्याचेच कवडसे भोवतालच्या अंधारासह दिसतील. हे दर्शन किती आणि कसे जागरण घडवते, किंबहुना जागरण घडवते की नाही, हे वाचकांनी ठरवायचे आहे.

- अरुणा ढेरे

***

सुधारक वृत्तीचा जाणता राजा

कालिदासाने 'रघुवंशा'तल्या दिलीपाचे वर्णन करताना त्याच्या राजेपणाचा अर्थ उलगडून सांगितला आहे - 'प्रजानां विनयाधानात् रक्षणात् भरणादपि स पिता, पितरस्तासां केवलं जन्म हेतवः|' प्रजाजनांना वळण लावणे, त्यांचे रक्षण करणे आणि त्यांचे भरणपोषण करणे, या बाबतीत दिलीपच त्यांचा पिता होता. त्यांची प्रत्यक्ष मातापितरे केवळ जन्माला कारण झाली होती.

कालिदास विसाव्या शतकात जन्मता, तर हे वर्णन सयाजीराव गायकवाड यांच्यासारख्या जाणत्या राजाचे आहे, असे म्हणाला असता. १९३९मध्ये जेव्हा त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा अस्थिविसर्जनाच्या वेळी प्रयागला झालेल्या सभेत पंडित मदनमोहन मालवीयांसारख्या श्रेष्ठ तत्त्वचिंतकाने उद्गार काढले होते की, 'हिंदुस्तानातला शेवटचा आदर्श महाराजा गेला.'

सयाजीरावांचे हे गुणवर्णन म्हणजे केवळ स्तुती नव्हती, ती वस्तुस्थितीच होती. अनेक बाबतींत अनेक पातळ्यांवर सयाजीरावांचे मोठेपण त्यांच्या काळाने अनुभवले होते आणि नंतरच्या अनेक दशकांनाही ते जाणवत राहिलेले दिसते. आपला व्यक्ती म्हणूनचा गुणसमुच्चय समाजहितासाठी अखंड उपयोगात आणणारा सुधारक आणि साहसी लोकनेता म्हणून सयाजीरावांचे वर्णन करावे लागेल.

१८६३मध्ये मनमाडजवळच्या कवळाणे नावाच्या लहानशा गावी काशीराव गायकवाड नावाच्या गृहस्थांच्या पोटी जन्माला आलेला गोपाळ वयाच्या बाराव्या वर्षी अगदी अचानक बडोद्याच्या राजगादीचा वारस बनला. खंडेराव गायकवाडांच्या निधनानंतर बडोद्याचा कारभार त्यांच्या भावाकडे मल्हाररावांकडे आला आणि काही काळातच खंडेरावांच्या विधवा पत्नी जमनाबाई आपल्या लहानग्या मुलीसह पुण्याला निघून गेल्या. मल्हाररावांची अनैतिक, बेबंद कारकीर्द हा बडोद्याच्या नशिबातला एक दुर्दैवी योग होता.

इंग्रज सरकारच्या मध्यस्थीनेच ते नष्टचर्य संपले. मल्हाररावांना पदच्युत केले गेले आणि जमनाबाई पुन्हा बडोद्यात परतल्या. त्यांनी ब्रिटिश सरकारला दत्तक पुत्र घेण्याची परवानगी मागितली. ती मिळाली तेव्हा बारा वर्षांचा चुणचुणीत गोपाळ त्यांनी निवडला आणि श्री. सयाजी म्हणून तो गादीवर आला.

उत्तम शिक्षकांकरवी अध्यापन, सर टी. माधवरावांसारख्या कर्तबगार आणि समयज्ञ दिवाणांची देखरेख, उपजत तीव्र बुद्धिमत्ता आणि मनाचे औदार्य यांमुळे सयाजीरावांचे व्यक्तिमत्त्व आदर्श राजेपणाची तत्त्वे सहज आत्मसात करीत गेले.

बडोदा संस्थानची गादी ही त्या काळात फार सुखाची गादी नव्हती. मल्हाररावांचा अनियंत्रित कारभार अनेक दुष्प्रवृत्तींना जन्म देऊन गेला होता. भल्या माणसांना पाठिंबा नव्हता. हलक्या माणसांचा आणि बायकांचा गादीभोवती गराडा होता. कुलीन स्त्रियांची अब्रू सुरक्षित नव्हती, सज्जनांना त्राता नव्हता. राज्य आणि प्रजा या आपल्या उपभोग्य वस्तू आहेत, असे मानून मल्हाररावांनी राजपद गाजवले होते. दुसर्‍या बाजूला सर्वच हिंदुस्थानी संस्थानांवर आपली घट्ट पकड ठेवण्याचे ब्रिटिश सरकारचे तंत्र यशस्वी होत होते. ब्रिटिश रेसिडेन्टाची भूमिका संस्थानांच्या भवितव्याबाबत फार निर्णायकपणे महत्त्वाची होती. याचे भान मात्र हिंदुस्थानातल्या कित्येक संस्थानिकांना नव्हते. काही ऐषोआरामात, विलासात दंग होते आणि काही ब्रिटिशांचे लाचार दास बनले होते.

१८८१मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी सयाजीरावांना राजाचे अधिकार देण्यात आले. मात्र त्यानंतरही दोन वर्षे 'काही अधिकार' वापरण्याची त्यांना परवानगी नव्हती. त्यांना लष्कराबाबत फारसे स्वातंत्र्य न देण्याचे ब्रिटिश सत्तेचे धोरण होते. अर्थात अगदी प्रारंभी सयाजीरावांनी संस्थानच्या अंतर्गत कारभाराची घडी व्यवस्थित बसवण्यावर लक्ष केंद्रित केले. सर टी. माधवरावांसारख्या चाणाक्ष आणि धडाडीच्या दिवाणांनी याबाबतीत अनेक प्रकारचे व्यवस्थापन केले. मात्र त्यांच्यानंतर जवळजवळ पासष्ठ वर्षे सयाजीरावांनी बडोदा संस्थानची सर्वांगीण उन्नती आश्चर्यकारक रीतीने घडवून आणली.

नियम हवेत पण नियमांच्या पोलादी चौकटी होता कामा नयेत हे त्यांचे पहिले सांगणे होते. अधिकार्‍यांनी आपली बुद्धी वापरून, विवेक करून, तारतम्याने नियम वापरले पाहिजेत, असे त्यांचे धोरण होते. सयाजीरावांचे राज्यतंत्र रेखीव, काटेकोर होते, पण त्यांची माणुसकीची जिवंत बाजू अधिकार्‍यांनी जागवली पाहिजे असा त्यांचा दृष्टिकोन होता.

सयाजीरावांच्या सुधारणांविषयी बोलायचे तर काही खुलासे करायलाच हवेत. त्यांपैकी पहिला खुलासा असा की, राज्याच्या भौतिक विकासासाठी त्यांनी राबवलेल्या कित्येक सुधारणांच्या योजना त्यांच्या राजेपणाच्या अधिकारामुळे सहज शक्य झाल्या आणि कित्येक योजना त्यांच्या राजेपणाचा आनुषंगिक लाभ म्हणून त्यांना मिळणार्‍या विशाल अनुभवांमुळे कराव्याशा वाटल्या. मात्र दुसरा खुलासा इथे केला पाहिजे की, काही सुधारणा केवळ त्यांच्या वैचारिक भूमिकेमुळे आणि त्यांच्या साहसामुळेच त्यांना शक्य झाल्या आणि त्याच सुधारणा काळाच्या संदर्भात विशेष महत्त्वाच्या आहेत.

सयाजीरावांनी जमिनीच्या पाहणी-मापणीची आणि तपासणीची शास्त्रशुद्ध कामे हाती घेतली आणि सर्व्हे सेटलमेंट हे नवे खाते त्यासाठी निर्माण केले. त्यांनी जुन्या ग्रामपंचायतींचे पुनर्घटन केले. प्रजासत्ताक राज्यपद्धतीची तत्त्वे जनतेने आत्मसात करावीत असा त्यांचा आग्रह होता. ग्रामपंचायतींच्या जोडीला त्यांनी तालुका पंचायती आणि नगरपालिका स्थापन केल्या. कायदेमंडळाची निर्मिती केली. १८८१मध्ये राजगादीवर आल्यानंतर आपल्या अधिकारात महाराजांनी नव्या कायद्यांच्या निर्मितीसाठी एक कोड केले आणि १९०२मध्ये पुनर्विवाहाचा कायदा संमत केला. त्याचबरोबर धर्मस्वातंत्र्याचाही कायदा संमत केला. पाठोपाठ १९०४मध्ये बालविवाहाला त्यांनी कायद्याने बंदी घातली.

स्त्रियांच्या विकासात महाराजांना विशेष आस्था होती. मुलींचे शिक्षण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. अल्पवयात मुलींना शाळेतून काढून घेतले जाते आणि त्यांचे शिक्षण खंडित होते याचीही त्यांना सतत चिंता असे. भाद्रज नावाच्या गावी एका कन्याशाळेत भाषण करताना १९१७ साली त्यांनी मोठ्या कळकळीने म्हटले होते,
'मोठ्या वयापर्यंत मुलींनी अभ्यास चालू ठेवला नाही, तर त्यांना भरीव शिक्षण देणे अशक्य होईल. तीन-चार वर्षांच्या अभ्यासाने आयुष्यावर चांगला परिणाम होत नाही. तेव्हा अर्धवट शिक्षणाचा परिणाम कोठे वाईट दिसून आल्यास तो शिक्षणाचा दोष नाही. परंतु आपली रुढीच दोषी आहे. जुने रीतीरिवाज आणि वाईट रूढी आपल्यावर जोपर्यंत जबरदस्त छाप आहे तोपर्यंत अज्ञान, बुरसटलेपंणा आणि संकुचित विचार यांच्या तडाख्यातून आपण कधी सुटत नाही. तेव्हा त्यापासून मुक्त होऊन आपल्या मुलींना मोठ्या वयापर्यंत शिकविले पाहिजे...'

सयाजीरावांनी स्त्रियांसाठी अनेक संस्थांची उभारणी केली. त्यांच्यासाठी वेगवेगळी प्रदर्शने भरवली, कलाशिक्षणाची केंद्रे उघडली आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी सहभागी व्हावे म्हणून उत्तेजन दिले. महाराणी चिमणाबाईंची साथ त्यांना मिळाली आणि महाराष्ट्रातील अनेक कर्तबगार स्त्रियांनी बडोदे हे आपले कार्यक्षेत्र बनवले. काशीबाई हेरलेकर, गंगूबाई पटवर्धन, सुलोचनाबाई सोमण, रखमाबाई दादाजी अशा अनेक बुद्धिमान आणि धडाडीच्या स्त्रिया बडोदा संस्थानात कार्य करीत राहिल्या.

प्राथमिक शि़क्षणाला उत्तेजन देणे आणि एकूणच स्त्रियांनी आपले व्यक्तिमत्व सर्वांगानी विकसित करून घ्यावे यासाठी संधी निर्माण करणे ही सयाजीरावांनी आपली कामे मानली. स्त्रियांच्या एका संगीत जलशात त्यांनी भाषण केले; तेव्हा ते म्हणाले होते, 'मी राज्यात आणि परप्रांतात जेव्हा प्रवास करतो, निरनिराळ्या संस्था पाहतो आणि ठिकठिकाणी स्त्रियांमध्ये दिसून येणारी निर्भय वृत्ती आणि जागृती अवलोकन करतो, तेव्हा मला फार फार आनंद होतो. ही क्रांती खरोखरच शुभचिन्ह आहे. आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्या उत्पन्नाची साधने म्हणजे आपले उद्योगधंदे वाढविले पाहिजेत आणि या कामी स्त्रियांनी पुरुषांशी चांगले सहकार्य केले पाहिजे. स्त्रिया आणि पुरूष यांच्या उन्नतीचे मार्ग भिन्न-भिन्न आहेत असे न मानता एकजुटीने राहून दोघांनी आपली प्रगती करून घेतली पाहिजे. असे झाले तरच आपले आणि देशाचे कल्याण होणार आहे. जे काही चांगले असेल ते स्वीकारले पाहिजे आणि आपल्यात जे दोष असतील ते घालवले पाहिजेत. यासाठी कायदेकानून आणि नियम यांची जरूरी लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळेच आपली उन्नती होईल... आपल्या स्त्रिया स्वतंत्र आणि स्वावलंबी बनलेल्या पाहून मला आनंदच होणार आहे...'

दुसर्‍या एका प्रसंगी म्हणजे महाराणी चिमणाबाई महिला पाठशाळेच्या पहिल्या संमेलनप्रसंगी तर स्त्रीपुरुष समानतेविषयी भावनाशील होऊन बोलताना ते म्हणाले होते, 'आपण भिन्नलिंगी असलो तरी देखील आपल्याला प्रगतीचा आणि कल्याणाचा विचार करण्यासाठी सहकार्य आवश्यक आहे हे ध्यानात बाळगा आणि आपल्या परिश्रमांची पराकाष्ठा करून आपली मुलेबाळे आणि आपल्या भावी पिढ्या यांची सेवा करण्याला आपण समर्थ व्हावे म्हणून, आपणां सर्वांच्या असमर्थतेचे वैगुण्य परमेश्वराला समबुद्धीनेच भरून काढावे लागेल, असा विश्वास धरा...'

स्त्री-पुरुषांविषयी समबुद्धी सयाजीराजांजवळ अतिशय निकोप स्वरूपात होती. म्हणून स्त्रियांच्या विकासाचे प्रयत्न पुरुषद्वेषावर, पुरुषांवर ईर्षायुक्त स्पर्धेवर आणि आकसावर आधारलेले असता कामा नयेत, असा त्यांचा आग्रह होता. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांच्यामधला फरक स्त्रियांनी मुळातून समजावून घेतला पाहिजे असेही त्यांना वाटत होते. 'महाराणी हायस्कूल फॉर गर्ल्स' या नामवंत शाळेत त्यांनी एका वार्षिकोत्सवात फार सुंदर भाषण केले होते. शाळेतील मुलींची वाढती संख्या पाहून त्यांना मनापासून आनंद झाला होता आणि मुलींचे खेळ, त्यांच्या कवायती हे सर्व पाहून ते उल्हासित झाले होते. त्यांना स्त्रियांच्या स्वतंत्र आणि समृद्ध जगण्याचा प्राचीन काळ आठवला आणि त्या काळाची आठवण देऊन त्यांनी नव्या काळात तसेच जगण्याचे स्त्रियांना आवाहन केले. स्पर्धेपलीकडे जाऊन विकासाचा फायदा घेतला पाहिजे हे त्यांनी आवर्जून सांगितले आणि ते म्हणाले, 'स्त्री आणि पुरुष हे काही परस्परांचे शत्रू नाहीत. एकमेकांना एकमेकांची जरूरी आहे. आयुष्यातील परमोच्च ध्येय जे गृहसौख्य, ते साधून जगाच्या आणि मानवजातीच्या कल्याणाकरता उभयतांनी सहकार्य करीत पुढे गेले पाहिजे. असे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत शिक्षणाचा हेतू सफल झाला असे म्हणता येणार नाही... स्त्री स्वातंत्र्याविषयी हल्ली आपण पुष्कळ ऐकतो. पण स्वातंत्र्याचे रूपांतर स्वैरतेच्या परवान्यात होणार नाही, याची खात्री आपण दिली पाहिजे तर्कशुद्ध किंवा उचित स्वातंत्र्याच्या दिशेने शक्यतोवर आपली प्रगती करून घेतली पाहिजे... या कामी अर्थातच शिक्षणाची, विचारांची, उद्योगप्रियतेची जरूरी आहे'. स्त्रियांना स्वातंत्र्य हवे, समान वागणूक हवी आणि शिक्षण हवे हा सयाजीरावांचा आग्रह होता, पण त्याचबरोबर त्यांनी स्वातंत्र्याचा योग अर्थ समजून घ्यावा आणि कायद्याची भाषा न करता समजुतीच्या पातळीवर त्यांनी समानता स्थापित करण्याचा आग्रह धरावा असाही त्यांचा आग्रह होता.

बडोदा संस्थानाचा त्या काळातला फार मोठा खर्च शि़क्षणखात्यावर होत होता. १९०६पासूनच महाराजांनी प्राथमिक शि़क्षण सक्तीचे केले होते. संस्थानात अडीच हजार प्राथमिक शाळा होत्या आणि त्यांत मुलींच्या शाळा तीनशेपेक्षा अधिक होत्या. मुलींच्या उच्चशिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था होती आणि ते कॉलेज कर्व्यांच्या विद्यापीठाला संलग्न केलेले होते. प्राथमिक शाळांसाठी उत्तम शिक्षिका तयार करणारे 'फिमेल ट्रेनिंग कॉलेज' स्थापन झाले होते आणि त्याचा लाभ महाराष्ट्रातल्याही अनेक कर्तबगार स्त्रियांनी घेतला होता. स्त्रियांना आर्थिक आधार देण्याचा हेतूही त्यांतून महाराजांनी साध्य केला होता.

महाराजांसाठी खरे तर एकूण शिक्षण हीच व्यक्तिविकासाची आणि ऐहिक-आत्मिक उन्नतीची गुरुकिल्ली होती. बडोदे संस्थानात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या जोडीला त्यांनी उच्चशिक्षणाच्या उत्तम सोयी केल्या तशा व्यवसाय प्रशिक्षणाच्या आणि कलाशिक्षणाच्याही सुविधा निर्माण केल्या. त्यांच्या संस्थानात पाच
उद्योगशिक्षण संस्था त्यांनी स्थापन केल्या होत्या. या 'हुन्नरशाळां'मधून अनेक विद्यार्थ्यांनी विविध उद्योगात नाव मिळवले आहे.

१८९० सालीच बडोद्यात त्यांनी 'कलाभवनाची' स्थापना केली होती. देशातली ती नामवंत इंजिनियरिंगची आणि तंत्रज्ञानाची संस्था म्हणून ओळखली जात होती, जात आहे. संगीत, नाटक आणि नृत्य यांसाठीही बडोद्यात स्वतंत्र पदविका आणि पदवी शिक्षणाचे अभ्यासक्रम होते.

संस्थानभर पसरलेली उत्तम वाचनालये, प्राच्यविद्यामंदिरांची निर्मिती, इंग्रजी भाषातेले अनेक उत्तम ग्रंथ मराठीत अनुवादित करण्यासाठी स्वतंत्र भाषांतर विभाग तसेच सयाजी साहित्यमाला आणि सयाजी बालज्ञानमाला यांतून
संस्थानातले ज्ञानविज्ञानाचे जग सयाजीरावांनी समृध्द केले. त्याकाळी त्यासाठी त्यांनी दोन लाख रुपयांचा निधी ठेवला होता. आज 'नॅशनल बुक ट्रस्ट' द्वारा किंवा 'नेहरु बाल पुस्तकालया'द्वारा ज्या प्रकारची पुस्तके मुलांना वाचायला मिळतात, त्या प्रकारची पुस्तके इतक्या जुन्या काळात सयाजी बालज्ञानमालेतून प्रसिद्ध झालेली दिसतात. भारतीयांच्या प्राचीन ज्ञानभांडाराचा शास्त्रीय अभ्यास प्राच्यविद्यामंदिरातून त्यांनी सुरु केला. आणि वाचनालयांची साखळी तर त्यांनी सार्‍या संस्थानात सर्वदूर निर्माण केली. 'फिरती वाचनालये' ही कल्पना त्याकाळी त्यांनी राबवली होती.

सुधारणांचा त्यांचा विचार सर्वांगीण होता आणि तो मुख्यतः शिशुकेंद्री होता. नव्या पिढीचे भविष्य उत्तम घडावे यासाठी जेवढे करणे शक्य आहे तेवढे त्यांनी फार जाणतेपणाने केले. बालचमूंची चळवळ हा त्यांतलाच एक भाग. मूकबधिरांसाठी स्वतंत्र शाळाही त्यांनी १९०९ मध्येच प्रोत्साहित केली.

पदार्थविज्ञानसंग्रहालय , चित्रसंग्रहालय यांसारख्या संग्रहालयांची उभारणी तर त्यांनी केलीच, पण वास्तुरचनेचे उत्तमोत्तम नमुनेही निर्माण केले. चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ यांना या संस्थानात मान होता. त्यांच्या कलेचे चीज होते. संस्थानभर उभारलेल्या आरोग्यसुविधा, औषधोपचारांच्या सुविधा, रेल्वे आणि पाणी पुरवठ्याच्या सुविधा - उत्तम राजा प्रजेला लेकराप्रमाणे मानून जे जे करील ते ते सयाजीरावांनी संस्थानासाठी केले. शिवाय शिथिल आणि निष्क्रिय सरकारी यंत्रणेला कार्यक्षम, जबाबदार, शिस्तशीर आणि निरलस करण्यासाठी त्यांनी जातीने प्रयत्न केले.

सयाजीरावांनी केलेल्या या सुधारणा तर सर्वक्षेत्रीय आणि महत्त्वाच्या होत्याच, पण त्याहीपेक्षा अधिक त्यांची त्यामागची दृष्टी महत्त्वाची होती. त्यांचे साहस त्या सुधारणांमध्ये नव्हते तर त्यामागच्या दृष्टीमध्ये
होते. स्त्रीला शिकण्याचे, सार्वजनिक जीवनात मिसळण्याचे, अर्थार्जन करण्याचे स्वातंत्र्य मिळावे, तिला समाजात
प्रतिष्ठा मिळावी, तिने साहित्य, संगीतादी कलांद्वारे स्वतःला समृद्ध करावे, तिला उत्तम आरोग्य लाभावे यासाठी त्याकाळी महाराष्ट्रातल्या सुधारकांना फार मोठा संघर्ष करावा लागला. सामाजिक क्षोभाला, टीकेला, प्रखर अशा विरोधाला तोंड देऊन बालविवाह, केशवपन, विधवावर्जन अशा अनेक अनिष्ट प्रथांचे निर्मूलन करण्यासाठी कित्येकांना आयुष्ये खर्ची घालावी लागली. महाराष्ट्रात स्त्री - शूद्रांना मिळालेला न्याय हा फार मोठी किंमत
मोजूनच मिळवावा लागला. या पार्श्वभूमीवर सयाजीरावांचे साहस फार मौल्यवान ठरते. हातातल्या अधिकारांचा वापर स्त्री - शूद्रांच्या उत्थानासाठी त्यांनी अचूक केला आणि त्या निर्णयाने परिवर्तनाची प्रक्रिया कितीतरी वेगाने, लवकर होऊ शकली.

अर्थात प्रजेसाठी अधिकाराचा वापर फारसा अवघड नसला तरी दोन प्रकारचे धोके त्यामुळे संभवत होते आणि त्या धोक्यांचा स्वीकार करणे हे एक प्रकारचे मोठे साहस होते. प्रजेने समंजसपणे जर सुधारणा स्वीकारल्या नाहीत तर संस्थानिक अप्रिय ठरण्याचा, अंतर्गत बंड निर्माण होण्याचा, राज्याचा गाडा अडकून पडण्याचा धोका फार मोठा होता आणि या असंतोषाचा फायदा उठवून ब्रिटिश सरकार अधिक शिरजोर आणि त्रासदायक होण्याचाही धोका होता. हे दोन्ही धोके सयाजीरावांसारखा 'जाणता राजा' मनोमन उमगला नसेल असे थोडेच आहे? पण तरीही त्यांची भूमिका कायम एकीकडे धडाडीच्या सुधारकाची राहिली आणि दुसरीकडे चतुर राष्ट्रवाद्याची राहिली. ब्रिटिश सरकारला न दुखवता, त्यांचे अवाजवी महत्त्व वाढू न देणे ही कसरत सोपी नव्हती. विशेषतः संस्थानांवर पकड ठेवू पाहणार्‍या बेरकी ब्रिटिशांना उपद्रवी होऊन न देता सुरक्षित अंतरावर ठेवणे फार अवघड होते, पण सयाजीरावांनी ती गोष्ट साध्य केली.

पंचम जॉर्जच्या दिल्ली दरबारात रीतीप्रमाणेच मुजरा न करता त्यांनी हिंदी संस्थानिकांचा स्वाभिमान काय असतो, याची झलक राजसत्तेला दाखवली. या घटनेचे पडसाद देशी- विदेशी सर्वदूर उमटले, पण सयाजीरावांनी त्याची क्षिती बाळगली नाही. संस्थानिकांच्या परदेशप्रवासावर ब्रिटिशांनी घातलेले निर्बंध त्यांनी दुर्लक्षित केले. त्यांनी राष्ट्रवादी क्रांतिकारकांची नावे सरकारला कळवण्याचे सरकारचे आवाहन चतुराईने डावलले. त्यांनी अरविंद
घोषांसारख्या जहाल क्रांतिकारकांची मूक पाठराखण केली. त्यांनी शाहू छत्रपतींशी सलोखा राखूनही लोकमान्य टिळकांशी मैत्री ठेवली. त्यांनी वेदोक्त करवून घेऊनही त्यांना ते प्रकरण बाधले नाही.

सयाजीरावांबाबत या गोष्टी अपूर्व होत्या. त्यामागे थक्क करणारे साहस होते आणि दृढता होती. यांतल्या एकेका गोष्टीचे परिणाम महाराष्ट्रातल्या लोकनेत्यांनी आणि सर्वसामान्यांनीही कसे भोगले, याचा विचार केला की त्या धाडसाचे आणि दृढतेचे स्वरूप कळते. मोलही कळते. विशेषतः जातिभेदांच्या अतीत जाण्याची त्यांची दृष्टी एवढी एक सामाजिक साहसाची गोष्ट जरी नजरेसमोर ठेवली तरी ते उदाहरण पुरेसे होईल.

जातिभेदांबाबत सयाजीरावांची दृष्टी अतिशय मार्मिक, उदार आणि समतोय न्यायाची होती असे वाटते. दृष्टी जातिभेदाला त्यांचा ठाम विरोध होता. पोटजातींचेही एकीकरण झाले पाहीजे असे त्यांना वाटत होते त्यासाठी त्यांनी एक परिषद घेतली होती. मात्र जातींचा प्रश्न जुलमाने किंवा कायदा करुन सुटेल असे त्यांना वाटत नव्हते. त्यांनी 'पोटजातीं'च्या एकीकरण परिषदेत म्हटले होते, 'ही सुधारणा लोकांचे मन वळवून झाली पाहिजे.. सक्तीने सुधारणा होईल असे म्हणणार्‍यांना जगाची माहिती नाही, जगाची ओळख पटली नाही, असेच म्हणावे'. बाबासाहेब आंबेडकरांची सयाजीरावांशी पहिली भेट झाली, त्या भेटीचा प्रसंग मोठा बोलका आहे. श्री. सयाजी गौरव ग्रंथात दामोदर सावळाराम यंदे यांनी तो वर्णन केला आहे. १९९५ साली मुंबईच्या जयमहाल मुक्कामी सयाजीराव असताना कृष्णाजी केळूसकर विद्यार्थी आंबेडकरांना घेऊन यंद्यांकडे आले आणि त्यांनी आंबेडकरांची महाराजांकडे शिफारस करण्याची विनंती यंदे यांना केली. यंदे आंबेडकरांना घेऊन महाराजांकडे गेले. पण प्रवेशद्वारातून आंबेडकर आत येईनात. 'मी महार आहे. आत कसा येऊ?' असं ते म्हणू लागले. तेव्हा यंदे एकटेच आत गेले आणि त्यांनी आंबेडकरांविषयी महाराजांकडे शिफारस केली. महार म्हणून ते आत यायला कचरतात, हे आंबेडकरांविषयी सांगितल्यावर सयाजीराव म्हणाले, 'पाहिलंत मिस्टर यंदे! परंपरेतल्या रूढींमुळे आपण अस्पृश्य आहोत अशीच या लोकांची समजूत झाली आहे'. मग महाराजांनी आंबेडकरांना आत बोलावले आणि जवळ बोलावून त्यांची चौकशी केली. ते म्हणाले, 'शिक्षण संपादन केल्यावर तुम्ही आपल्या जातींच्या आणि विद्येत मागे पडलेल्या लोकांत शिक्षणाचा प्रसार करण्याची कामगिरी हाती घेतली पाहिजे. आम्ही बडोद्यात अस्पृश्य वर्गात शिक्षणाचा प्रसार करण्याचे काम सुरू केले आहे. तुम्हीही आपल्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे'. आंबेडकर कबूल झाले तेव्हा लगेच महाराजांनी त्यांना दरमहा ५० रु. देण्याविषयी बडोद्यात आपल्या विद्याधिकार्‍यांना तार केली.

सयाजीरावांचे असे सारेच वागणे जाणत्या पण सुधारक राजाला शोभणारे होते आणि ते तसे होते हे एकट्या बडोदा संस्थानचे नव्हे तर तर महाराष्ट्रीयांचे ही भाग्य होते.

***

विवेक आणि विद्रोह

डॉ. अरुणा ढेरे
पद्मगंधा प्रकाशन
पृष्ठसंख्या - १४६
किंमत - रुपये १७०

***

टंकलेखन साहाय्य - अश्विनी के, श्रद्धा, अनीशा, ऋयाम, मंदार_जोशी

***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख आणखी एका चांगल्या विषयावरच्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. समाजातल्या बर्‍याच चुकीच्या गोष्टींना इथे योग्य पद्धतीने विरोध केला आहे असे जाणवते. अरुणाताईंचे सुद्धा आभार.

धन्यवाद टीम.
अजून एका सुरेख पुस्तक परिचयाबद्दल.

अलिकडेच बडोद्यातील लक्ष्मीविलास प्रासाद पहाणे झाले, सयाजीरावांचे कार्य खरेच थोर.
त्या काळात महाराणी चिमणाबाईं एका इंग्रजी पुस्तकाच्याही सहलेखिका होत्या.

नेहमीप्रमाणेच उत्तम परिचय, धन्यवाद!!!
मूठभर लोक वगळता बाकी बहुतेक अडाणी आणि दरिद्री असे लोक जगण्याच्या प्राथमिक लढाईत गुंतलेले होते. राजकारणातली आणि अर्थकारणातली गुंतागुंत त्यांना समजत नव्हती.>>> ही परिस्थिती आजही बदललेली नाही हे लक्षात येते तेंव्हा सयाजीरावांसारख्या माणसाचे मोठेपण अजूनच ठसते. लोकशाहीने काय कमावले आणि किती घालवले याचा हिशेब करण्याची वेळ आली आहे.

चिनूक्स व टीम,
धन्यवाद! अतिशय उपयुक्त! पद्मगंधा ची प्रकाशने आता वाचायला हवीतच..

>>जाणिवा आणि जीवनक्रम यांच्यामधल्या विसंवादातून समाजजीवनात अनेक पेचप्रसंग निर्माण होतात.
किती अचूक आणि मार्मिक.. त्या अनुशंगाने पुढील सर्व आजच्या काळातही लागू होते.

धन्यवाद अक्षरवार्ता चमू.. एका उत्तम पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल..

तसेच पद्मगंधा प्रकाशनाचेदेखील आभार. गेल्या दोन-तीन वर्षात सातत्याने विविध पुस्तकालयांमधून-प्रदर्शनांमधून पद्मगंधा प्रकाशनाची विविध विषयांवरची पुस्तके बघतो आहे. विशेषकरुन अनेक समिक्षात्मक ग्रंथ ह्या प्रकाशनाने प्रकाशित केलेले दिसले ज्यांचे व्यावहारिक मूल्य व खप इतर लोकप्रिय कादंबर्‍या/ललिल/कथासंग्रहांपेक्षा नक्कीच कमी असेल. त्याबद्दल ह्या प्रकाशनाचे खास आभार.

धन्यवाद अक्षरवार्ता.
पुस्तकाची कल्पना उत्तम आहे.

लेखातील काही वाक्ये योग्य अर्थासाठी संपादित करता आली असती असे वाटले.
उदा.
>>हलक्या माणसांचा आणि बायकांचा गादीभोवती गराडा होता.
हलकी माणसे??
शिवाय सरसकट सगळ्या बायका सत्तेशी संबंधित असणे वाईट?
तेही लेखाचा मूळ मुद्दा सयाजीरावांनी राजेपदाच्या अधिकारात विषमतेला कसे आव्हान दिले हा असताना?

दोन्ही उतारे वाचले. काही शंका आहेत. जमेल तेव्हढ्या मुद्देसूदपणे मांडल्या आहेत.

१.
>शब्दप्रामाण्य मानणारा आणि सर्वच सामाजिक संस्थांना अपरिवर्तनीय मानणारा असा एक लोकसमूह या >समाजात संख्येने लहान पण प्रभावी होता.

या लोकसमूहाच्या (=लो१) नेत्यांची नावं मिळतील काय?

२.
>वास्तवाची चिकित्सा करुन नवे सिद्धांत निर्माण करण्यापेक्षा श्रद्धेने परंपरागत सिद्धांतांचा स्वीकार अकरणे >त्याच्यासाठी अगत्याचे होते.

एखादं उदाहरण मिळालं तर बरं होईल. त्यामुळे चर्चेला आधार सापडेल.

३.
>आणि असा एक समूह त्याच काळी इथे होता की पाश्चात्य ज्ञान-विज्ञानाच्या स्पर्शाने तो जागा झाला होता. >इहवादाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्याला कळले होते.

याही लोकसमूहाच्या (=लो२) नेत्यांची व/वा अनुयायांची नावं मिळतील काय? दादाभाई नौरोजी यांचं Poverty and un-British Rule (१९०१ प्रकाशन) हे पुस्तक या समूहातल्या कोणी लोकांनी वाचलं होतं का? या पुस्तकाबद्दलचे त्यांचे विचार जाणून घ्यायला मला आवडेल.

४.
>समाजातले भेद कमी होतील, शिक्षण सर्वांना मिळेल, व्यवसायस्वातंत्र्य मिळेल आणि नव्या संधी उपलब्धी >मिळाल्या तर आपले दैन्य फिटेल, आपली दु:खे संपतील आणि आपल्याला सर्वार्थाने समृद्ध, संपन्न असे >जीवन जगता येईल, अशी आशा त्याला वाटत होती.

इंग्रजांनी भारताचे उद्योगधंदे बुडवले हे जगजाहीर आहे. त्यामुळे शेतीवरचा ताण वाढला. एतद्देशीय शिक्षणाची काय विल्हेवाट लावली इंग्रजांनी तेही उघड आहे. अशी राजवट असतांना उपरोल्लेखित आशावाद भाबडा नव्हे काय?

५.
>जुन्या संस्था, श्रद्धा आणि मूल्ये यांमध्ये स्थितिप्रिय समूहाचे हितसंबंध गुंतलेले होते.

हे हितसबंध कोणत्या स्वरूपाचे होते? आर्थिक? की अजून काही? याचंही उदाहरण मिळेल काय?

६.
>आगरकर, लोकहितवादी, फुले यांच्या विचारांमधले अनिष्टसंहारक अग्नितत्त्व त्यांना नुसत्या दर्शनानेही >भिववणारे होते. ...... म्हणून पूर्वव्यवस्था अधिक बळकट आणि अभेद्य करण्याकडे स्थितिप्रिय समूहाचा कल >होता.

आगरकर, लोकहितवादी, फुले यांच्या पंक्तीत लोकमान्य टिळक कसे नाहीत? ते लो२ मध्ये मोडतात की स्थितिप्रिय लो१ मध्ये?

७.
>परिवर्तनासाठी जनमत तयार करणे हे सर्वच लोकनेत्यांपुढे मोठे बिकट काम होते. ...... त्यांना कृतिशील >बनवण्याचे काम त्याहून कठीण होते;

ही दोन्ही कार्ये लो. टिळकांनी मोठ्या समर्थपणे पार पडली. व्हॅलेंटाईन शिरोलने त्यांना हिंदी असंतोषाचे जनक याचसाठी म्हंटले. टिळकांचा उल्लेखही प्रस्तुत उतार्‍यात नाही. पुस्तकात त्यांचं नाव चर्चेत आलं असेल अशी अशा आहे.

८.
>...वैचारिक परिवर्तनाची जरुरी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि या परिवर्तनासाठी सर्वांत प्रभावी शस्त्र आहे >विद्रोहाचे.

लोकशिक्षण हेही एक प्रभावी माध्यम म्हणून वापरता येते. यावर टिळक आणि आगरकर या दोघांचे एकमत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी (निदान फर्गसन कॉलेज तरी) त्यामुळेच जन्माला आली. केवळ विद्रोहावर लक्ष केंद्रित करता येत नाही.

९.
>आगरकरांनी अतिकळवळ्याने समाजाला उद्देशून म्हटले आहे, 'ज्या दुर्मतांनी, दुराग्रहांनी व दुराचारांनी >महारोगाप्रमाणे या देशाच्या बुद्धीचा, नीतीचा व शरीरसामर्थ्याचा हजारो वर्षे फडशा चालविला आहे, त्यांचे >यथाशक्ति निर्मूलन करणे अत्यंत उचित होय.

सोबत मॅकॉलेचे इ.स.१८३५ सालचे एक मत उधृत करावेसे वाटते. इथे टिचकी मारा.

जर आगरकरांनी सांगितलेले दुर्मते, दुराग्रह व दुराचार जर हजारो वर्षे चालू असते, तर भारतात इ.स. १८३५ साली चोर किंवा भिकारी सापडत नव्हते हे कसे काय शक्य आहे? मागल्या ६०+ वर्षांत जो अनाचार माजलाय त्यामुळे आज आपल्याला ठिकठिकाणी चोर आणि भिकारी दिसून येतात. भारताच्या अधोगतीस लो१ या समूहाला एकट्याला जबाबदार धरणे कितपत योग्य?

१०.
>विरोधात उभ्या ठाकलेल्या समाजातल्या विविध वर्गांमधली भिन्नतेची तीक्ष्णता कमी कमी करत, >राष्ट्रकार्याच्या दिशेने त्यांच्यातील जागृतीचा मोहरा वळवण्याचे अवधान त्यांनी ठेवले होते.

न्या.रानड्यांबद्दल हे म्हंटलेले खरे आहे. मात्र लोकजागृतीची चळवळ त्यांच्या शिष्योत्तमाने म्हणजे टिळकांनी शिगेस पोहोचवली.

११.
>सच्चा सुधारणावादी नेहमीच हे जाणून असतो की श्रद्धा डोळस हवी, त्याग सबळ हवा आणि तत्त्वे पोषक हवीत. >जीवनातले उदात्त, न्याय्य आणि निर्माणक असे जे जे आहे ते ते राखण्यासाठी प्राणार्पणाचीही तयारी ठेवायला >हवी,

या न्यायाने टिळकही सच्चे सुधारणावादी ठरतात. त्यांच्या गीतारहस्यावरून डोळस श्रद्धा दिसते. प्राणार्पणाची तयारी मंडालेतल्या तुरुंगवासावरून दिसते. आणि त्याग तर त्यांच्या पाचवीलाच पुजला होता.

-----------------------

सारांश :

१. स्थितिप्रिय लो१ आणि (तथाकथित) गतीप्रिय लो२ यांच्यामधली सीमारेषा ठळक नसून तुटक आहे. या सर्व विवेचनास इ.स. १८५७ च्या उठावाची पार्श्वभूमी आहे. तिची चर्चा येथे दिसून येत नाही. प्रस्तुत पुस्तकात असेल अशी अशा आहे.

२. एक उदाहरण पाहूया:

सावरकरांनी रत्नागिरीत अस्पृश्यता निर्मूलनाचे भरीव कार्य केले. त्यांनी एक निरीक्षण नोंदवले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ब्राह्मणांना सुधारणा चटकन मान्य होत असत. मात्र तळागाळातील जातींचा रूढी बदलण्यास प्रखर विरोध असे. त्यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर भंगी चांभाराच्या पंक्तीला जेवण्यास बसत नसे. अशा परिस्थितीतून सावरकरांनी निरलस सेवाभावाच्या योगे मार्ग काढला.

नेमका हाच आगम (=अ‍ॅप्रोच) सयाजीराव गायकवाडांना अभिप्रेत होता. वरील लेखाच्या दुसर्‍या उतार्‍यात त्यांच्या तोंडी आलेय की पोटजातींचेही एकीकरण झाले पाहीजे.

सावरकर आणि सयाजीमहाराज लो१ मध्ये मोडतात की लो२ मध्ये? त्यांनी आणि टिळकांनी परंपरेला तुच्छ न मानता आधारभूत मानले. साहजिकच विद्रोहाशिवाय जागृती कशी करावी याचा वस्तुपाठच जणू त्यांना देता आला.

तर मग विद्रोहाचे नक्की स्थान कोणते? कोणी स्पष्ट करेल काय?

कळावे लोभ असावा.
-निनाद चित्रे

निनाद चित्रे, हा धागा पुस्तकाची ओळख करुन देण्यासाठी आहे. आपल्याला जी काही चर्चा करायची आहे ती लेखक महोदयांशी करावी अथवा वेगळा धागा काढावा.

सिंडरेला,

बरोबर आहे तुझं/तुमचं. नवा धागा उघडण्यासाठी मला जरा शोधाशोध करावी लागेल.

लेखाच्या (अथवा उतार्‍याच्या) विचारप्रक्रियेत मर्यादानिश्चिती नसेल तर ती झालेली बरी. आणि मुख्य म्हंजे विचारमंथन सुरू होतं. ते विषयाला धरून असेल अशी आशा करूया.

क.लो.अ.
-निनाद चित्रे

श्री.निनाद....

मी तुमच्या वरील (आय मीन....डॉ.अरुणा यांच्या त्या पुस्तकातील विचारावरील तुमचे विवेचन) प्रतिसादावर इथेच मत देण्याच्या विचारात होतो, पण ज्यावेळी सिंडरेला यानी त्याबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला....जो मला योग्यही वाटला....त्यावेळी निर्णय घेतला की यदाकदाचित श्री.चित्रे यानी स्वतंत्र धागा सुरू करून त्यांचा मुद्दा छेडला तर तिथेच तो विषय व्यापक स्वरूपावर चर्चेला घेता येईल.

अ‍ॅडमिननुसार 'अक्षरवार्ता' इथे फक्त त्या त्या पुस्तकांचा परिचय अपेक्षित आहे, असे दिसते.

असो.

माझ्या आवडत्या शिक्षिकेने गेल्या दिवाळीची भेट म्हणून दिलेले पुस्तक पण त्याहीपेक्षा अरुणा ढेरेंचे लिखाण आणि ज्यांच्यावर लिहिले आहे त्या सर्व व्यक्तींबद्दल असलेली कृतार्थतेची भावना यामुळे झालेला गहरा वाचन अनुभव