सुरती उंधियो

Submitted by स्वाती_आंबोळे on 10 February, 2009 - 14:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

वांगी (छोटी - भरल्या वांग्यांना घेतो ती) ३-४
छोटे बटाटे २-३
रताळी, सुरण, कंद (प्रत्येकी साधारण कपभर फोडी)
घेवडा
तूर, सुरती पापडी, दाणा (वाल) पापडी - यांचे दाणे. (हे सगळे frozen मिळतात इथे. काही कॅनमधेही मिळतात. मी frozen वापरते.) - प्रत्येकी वाटीभर
ओले हरभरे वाटीभर. (मी frozen आणले होते.)
ओलं खोबरं २ वाट्या (मी frozen वापरलं.)
मेथी, शेपू - एकेक जुडी. थोडा पालकही घालायला हरकत नाही.
डाळीचं पीठ - अंदाजाने
आलं, लसूण, मिरचीची पेस्ट - अंदाजाने
तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा
गरम मसाला (मी ही भाजी करताना बादशहाचा 'रजवाडी गरम मसाला' म्हणून मिळतो तो वापरते.)
लिंबू, कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

१. वरून घालण्यासाठी अर्धी वाटी ओलं खोबरं वगळून ठेवून बाकी खोबर्‍यात तिखट मीठ मिसळून ते वांगी आणि बटाट्यांना चिरा देऊन त्यांत (भरल्या वांग्यांमधे मसाला भरतो तसं) भरायचं.
२. सगळे दाणे, निवडून चिरलेला घेवडा, रताळं,सुरण,कंद यांच्या फोडी हे कुकरला एक शिट्टी होईपर्यंत वाफवून घ्यायचे. पार मेण होवू द्यायचं नाही.
३. मेथी, शेपू, पालक निवडून धुवून चिरून त्यात तिखट मीठ हिंग हळद आणि मावेल इतकं डाळीचं पीठ घालून त्याची भजी (मुकटे वळून - मुठिया) तळून घ्यायची. यात पाणी घालायचं नाही. भाजी धुवून निथळून लगेच चिरली असेल तर त्यात असतं तितकं पाणी पुरतं गोळा व्हायला.
४. मी मुठिया तळलेल्या तेलातच भाजी करते. (तेव्हा मुळात तळायलाच फार तेल घ्यायचं नाही.)
५. तर या तेलात हिंग, हळद, ओवा यांची फोडणी करायची.
६. त्यावर आलं लसूण मिरचीची पेस्ट परतून घ्यायची. मग गरम मसाला घालायचा.
७. त्यात भरलेली वांगी, बटाटे आणि उरलेलं खोबर्‍याचं सारण परतायचं. पातेल्यावर झाकण ठेवून आधणाची एक चांगली वाफ येऊ द्यायची.
८. वांगी आणि बटाटे बर्‍यापैकी शिजले (अगदी मेण नाही!) की मग बाकी वाफवून घेतलेल्या भाज्या आणि दाणे घालायचे.
९. चवीनुसार मीठ घालायचं आणि लिंबू पिळायचं
१०. सगळं छान एकत्र परतून पुन्हा झाकण ठेवून एक चांगली दमदमून वाफ येऊ द्यायची.
११. शेवटी मुठिया पण त्यात मिसळायच्या.
१२. वाढताना वरून खोबरं कोथिंबीर घालून सोबत लिंबाची फोड द्यायची.
१३. मला नुसती वाटीत घेऊन खायलाही आवडते. जोडीला गरम फुलके केले तर ताटात स्वर्ग इ.इ. Happy

IMG_9110.JPGIMG_9111.JPGFullSizeRender.jpg

वाढणी/प्रमाण: 
वर दिलेल्या प्रमाणाने ४ जणांना भरपूर व्हायला हवी.
अधिक टिपा: 

भारतात आई यात दोन कच्ची केळी सालासकट प्रत्येकी ४-५ चकत्या कापून घालते. इथे मला प्लँटेन घालायचा काही धीर झाला नाही.
तसंच काही लोक थोडी साखरही घालतात चवीला. मी घालत नाही.

माहितीचा स्रोत: 
आई. तिच्या माहितीचा स्त्रोत तिची गुजराथी मैत्रिण. :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच आहे रेसिपी. करुन बघायलाच हवी. सुरती उंधियोचं पॅकेट वापरुन केलेल्यापेक्षा नक्कीच वेगळी चव येईल ताज्या भाज्यांची. (आता कळलं ती पार्सिपेनीवाली ८ पाउंडची ऑर्डर का घेते ते)

तू एवढा खटाटोप केलेलास तर 'झक्कास' न झाली तरच नवल.

ह्यात तू 'ओले हरभरे' फ्रोझन लिहिलं आहेस, ते काय म्हणून फ्रोझन मिळतात?

स्वाती, बढीया रेसिपी! मी उंधियो मसाला वापरून करते. पण नुस्तीच तिखटजाळ चव येते. आता रजवाडी आणून करते.

एकदाच फ्रोझन मुठीया मिळाले. चव छान होती.

मी ही उंधियो मसाला वापरते. तिखळजाळ चव नाही वाटली कधी मला. पण ताज्या भाज्यांची मजाच वेगळी.

ते green chick peas म्हणून मिळतात.
खटाटोप होतो खरा, पण थंडीत एकदातरी करतेच. Happy

मस्त. मुठियात 'शेपू' कधी घातला नाही, घालून पाहिले पाहिजे. मी मुठिया कणकेचे करते आणि डाळीचे पीठ थोडे चमचाभर. आणि भाज्यांत थोडा गूळ घालते.

मी ओवा, हिरवी मिरची, कोथिंबीर अन थोडं ओलं खोबरं हे सगळं वाटून घालते .
अन हिरवी किंवा भाजीची केळी न घालता साधीच पण पूर्ण न पिकलेली केळी घालते

सही रेसीपी! मी फ्रोजन पाकीटं आणून करते. रजवाडी मसाला घालून करून पाहते.
मुठियासाठी डाळीचे पीठ फार वापरायला आवडत नाही. लालु, मॄण, शोनू टीप्ससाठी धन्यवाद.

मी आणखी काही टीप्स शेयर करतेय.

ह्याच्यात ताजे मसाले जरासे भाजून टाकले तर आणखी छान. मी त्यात बडीशेप, जीरे, धणे,ओवा, एक दोन मेथी दाणे,काळमीरी फक्त हेच भाजून चाळून टाकते नी कच्चे तेल जरासेच,ओले खोबरे, कोथींबीर्,हिरवी मिरच्या,आले लसूण,लिंबूरस टाकून पेस्ट मिक्स करून चिरलेल्या कच्च्या भाज्याना लावून मूरून ठेवते. पुन्हा गरम मसाला टाकत नाही.
मग वरील प्रमाणेच तेलात आधी ज्यास्त वेळ लागणार्‍या भाज्यात टाकत लेयर करत जाते. भाज्या आधी शिजवून केल्या नाहीत. मग उतरताना वरून पुन्हा ओले खोबरे, लिंबू रस नी कोथींबीर. Happy
मुठीयात बेसन्,ज्वारी, बाजरी पिठे,पालक्,मेथी,शेपू टाकून आणखी मस्त लागते.
हे सर्व शेंगदाण्याच्या तेलात छान लागते असा अनुभव आहे माझा मुठीया सुद्धा त्याच तेलात तळून. वाटलेला मसाला मुठीयात सुद्धा किंचीत घालावा. नुसते मुठीये संपून जातात भाजी होइपपर्यन्त. Happy
बडीशेपने एक वेगळी चव लागते.
बडीशेप ही ज्यास्त करून राजस्थानी,मारवाडी,काठेवाडी गुज्जु जेवणात खूप वापरतात. एका काठेवाडी गुज्जुने ही रेसीपी मला शिकवली बडीशेप घालून. तीने सांगितले की ऑथेन्टीक उधींयोत शेंगदाणे सुद्धा घालतात. मी नाही घातले कधी.
नंतर मी दुसरा कुठलाही मसाला वापरण्यापेक्षा वरील मसाल्याबरोबर एक दोनदा आपला काळा मसाला एखाद चमचा टाकून केली नी थोडी कश्मीरी पॉवडर टाकून मस्त लागली. नाहीतर खूप जाळ होतो बाहेरचे मसाले वापरून.
एवढे कष्ट केल्यावर सोप्यावर भाजी, बाजरीची नाहीतर ज्वारीची भाकरी शुद्ध तूप ओतून खावून मूवी बघावा. Happy

ती फ्रोजन उंढीयो पाकीट बिलकूल आणू नका. चोथा असतो त्यात.
स्वाती,
एकदम एकजीव होत नाहीत भाज्या आधीच शिजवून घेतल्या नी लेयर करेपर्यन्त शेवटी शेवटी (असाच एक प्रश्ण)?

मनू, नाही होत. कारण आधीही पूर्ण शिजवत नाही, आणि नंतरही एकच वाफ देते. मात्र frozen ऐवजी कॅनमधल्या भाज्या / दाणे वापरले तर मात्र शिजवून घेऊ नयेत.

कंद (कोन असंही म्हणतात - गुजराथीत मला वाटतं रताळू म्हणतात का?) देशी दुकानांत ताजेही मिळतात, आणि frozen ही पाहिलेत.

स्वाती, धन्यवाद, आता मी रजवाडी मसाला वापरून बघेन. चांगली टीप आहे तुझी.
मी बादशहचे पाव भाजी मसाले नी इतर एक दोन वापरलेत काही वेळा. माझा त्याचा अनुभव चांगला आहे. पण एवरेस्ट नी MDH चे मसाले जळजळीत, भगभगीत वाटलेत नी मी पुर्णपणे बंद केले वापरायचे नी घरीच केले पटकन फ्रेश. काय प्रमाण असते काळमीरीचे वगैरे देवालाच ठावूक अश्या मसाल्यात.

मला उलट अनुभव आहे मनू. बादशहाचे मसाले मी शक्यतोवर घेत नाही. एवरेस्टच प्रिफर करते. MDH चे मात्र इथे आल्यावरच वापरायला लागलेय

खरे तर मी बाहेरचे मसाले खूप क्वचीतच वापरते. पाव भाजी मसाले वगैरे काय वाटत बसणार म्हणून वापरले बादशाह. MDH चे पण एक दोनदा सांबारासाठी वापरले नी पोटात आग पेटलीय असे झाले.:)
मग सहसा मी घरचे वापरते. आई जाते भारतात नी काही खास मसाले करून घेते गोव्याला जावून नाहीतर रत्नागीरीची मावशी देते करून अजूनही. हे नाहीच झाले तर गोडबोले मसाले आणि चिपळूणचे दळवी मसाले जिंदाबाद. हे दळवी मसाले मुंबईत सुद्धा मिळतात. दळवींच्या मसाल्याला घरच्या सारखी चव असते :). त्यात बडीशेप,धणे,जायपत्री वगैरे वगैरेचे प्रमाण एकदम बेस्ट.
असो. (नको तेवढे न विचारता मसाले पूराण लिहिले. सवय ना...) Happy

मस्त रेसिपी.. करून पाहिन.. पण खटाटोप बराच दिस्तोय.. Happy

कोन असंही म्हणतात - गुजराथीत मला वाटतं रताळू म्हणतात का?>> गुजरातीत रताळ्याला शक्करिया म्हंतेत..

ह्या पद्धतीने नव्हती केला उंधियो, आता करुन बघेन

हाच प्रकार शेगडीवर शिजवण्याऐवजी मडक्यामधे शिजवला तर कहर लागतो. खड्डा खणून त्यात भोवती निखारे घालून मंद आचेवर शिजवतात. आत केळ्याच्या पानात सगळे घातलेले असते. slurp ........

इकडे हे करायचे म्हणजे डोक्याला ताप नुसता.....

असामी, तुझ्याकडे बॅकयार्ड आहे? असेल तर पुढच्या वेळी जीटी़जी तुझाकडेच करु. तू कर आणि आम्हांला खाऊ घाल Wink

असामी, तुझ्याकडे बॅकयार्ड आहे? >> आहे पण सगळ्यांना पुरेल एव्हढे मडके नाही Lol

>>शेगडीवर शिजवण्याऐवजी मडक्यामधे शिजवला तर कहर लागतो.
Uhoh
खड्डे खणण्यापेक्षा, ते मडकं कोळश्याच्या शेगडीवर ठेवलं तर नाही का चालंत?

>>>सगळ्यांना पुरेल एव्हढे मडके नाही

सगळ्यांना पुरेल एवढं नसलं तरी मडकं आहे ना? त्यात मावेल तेवढंच कर. Wink

मी काल केला हा उंधियो! या आठवड्यात पाहुणे असणार आहेत जेवायला म्हणुन केला आता त्यांना खायला मिळतोय की नाही माहीती नाही Lol

मला रजवाडी गरम मसाला मिळाला नाही मग थोडा बादशहाचा गरम मसाला आणि थोडा मम्मीने केलेला गरम मसाला असे वापरले. आणि महत्वाचे म्हणजे मी वरती लिहिलेले १.५ तास लागेल हे वाचले नव्हते आणि खूप वेळ लागायला लागला तेव्हा परत येऊन रेसिपी पाहीली तेव्हा वाचले. खरोखर तेवढा वेळ लागतो. पण खरोखर वर्थ आहे तेवढा वेळ. पण स्वातीने वर चार लोकांसाठी लिहिलेय. माझी वाटी अगदी लहान आहे (१/३ कप मापाची साधारण) तरी साधरण ६ लोकाना खूप होईल असे वाटतेय. आणि मी कंद आणि सुरण घातलेच नव्हते.

एक शंका, मला सुरण आणि कंद मिळाले नाहीत फ्रोझन होते पण एवढे सगळे आणुन पुढे वापरीन की नाही असे वाटल्यामुळे वापरले नाही. त्याने चवीत कितपत फरक पडला असेल?

मी आज करायचा प्लॅन करतेय. सगळ्या भाज्या बिज्या आणून ठेवल्या आहेत.

स्वाती, तू वर लिहिलेले ओले हरभरे/ green chick peas काही मला मिळाले नाहीत. मला वाटतं मी त्याच टाईपचे, दुसरं नाव असलेले हरभरे आणले आहेत. बघूया घालून कसे लागतात ते.

सायो, मला अशोका कंपनीचे मिळाले हिरवे हरभरे. मी मागे पण आणले होते मसाले भातात मस्त लागतात.

पाहिन पुढच्या वेळी अशोकाचे. मला बादशहाचा रजवाडी गरम मसाला मिळाला.

वा, सहीच. मस्त फोटो. पाणी सुटलं तोंडाला.

काही टीपा माझ्याकडून :-

सुरती पापडी सालासकट घेतली तर छान लागते. सालीला एक चीर देऊन घ्यावी.

भरायच्या मसाल्यात साध्या लसणीऐवजी ओला लसूण मिळतो तो पातीसकट वाटायला घ्यायचा.

फार जळजळीत ज्यांना चालत नाही त्यांनी नुसती धणे-जिर्‍याची पावडर ताजी भाजून कुटून घाला.

मसाला भरण्यात वेळ घालवू नका. वांगी, कच्च्या केळ्याचे तुकडे आणि बटाटे चिरा देऊन बाकी भाज्यांच्या तुकड्यांबरोबर एकत्र करा. वरून मसाला घालून व्यवस्थित ढवळून चांगलं तासभर मुरवत ठेवा. भाजी शिजताना मसाला भाज्यांमध्ये शिरतो.

भाजी प्रेशर कूकरमध्ये शिजवल्यास तेल कमी लागतं. कूकर मंद आचेवरच ठेवून शिट्ट्या होऊ द्याव्यात, म्हणजे मसाला चांगला मुरेल.

दादर परीसरात राहणार्‍यांसाठी : सिटीलाईटच्या समोरच्या गोपीटँक मार्केटमध्ये उन्धियो साठी लागणार्‍या सगळ्या भाज्या एकत्रित स्वरूपात मिळतात म्हणजे चार वांगी, चार बटाटे इत्यादी थोड्या थोड्या भाज्या जमवायला नको.

वा वा, ही खरी पूर्णान्न रेसीपी....अनेक वेळा, अनेक ठिकाणि, होटेल मदे, मीत्रांच्या घरी बरेच्दा खायला मिळाली, पण दर वेळी मस्तच लागते!

Pages