सुरती उंधियो

Submitted by स्वाती_आंबोळे on 10 February, 2009 - 14:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

वांगी (छोटी - भरल्या वांग्यांना घेतो ती) ३-४
छोटे बटाटे २-३
रताळी, सुरण, कंद (प्रत्येकी साधारण कपभर फोडी)
घेवडा
तूर, सुरती पापडी, दाणा (वाल) पापडी - यांचे दाणे. (हे सगळे frozen मिळतात इथे. काही कॅनमधेही मिळतात. मी frozen वापरते.) - प्रत्येकी वाटीभर
ओले हरभरे वाटीभर. (मी frozen आणले होते.)
ओलं खोबरं २ वाट्या (मी frozen वापरलं.)
मेथी, शेपू - एकेक जुडी. थोडा पालकही घालायला हरकत नाही.
डाळीचं पीठ - अंदाजाने
आलं, लसूण, मिरचीची पेस्ट - अंदाजाने
तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा
गरम मसाला (मी ही भाजी करताना बादशहाचा 'रजवाडी गरम मसाला' म्हणून मिळतो तो वापरते.)
लिंबू, कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

१. वरून घालण्यासाठी अर्धी वाटी ओलं खोबरं वगळून ठेवून बाकी खोबर्‍यात तिखट मीठ मिसळून ते वांगी आणि बटाट्यांना चिरा देऊन त्यांत (भरल्या वांग्यांमधे मसाला भरतो तसं) भरायचं.
२. सगळे दाणे, निवडून चिरलेला घेवडा, रताळं,सुरण,कंद यांच्या फोडी हे कुकरला एक शिट्टी होईपर्यंत वाफवून घ्यायचे. पार मेण होवू द्यायचं नाही.
३. मेथी, शेपू, पालक निवडून धुवून चिरून त्यात तिखट मीठ हिंग हळद आणि मावेल इतकं डाळीचं पीठ घालून त्याची भजी (मुकटे वळून - मुठिया) तळून घ्यायची. यात पाणी घालायचं नाही. भाजी धुवून निथळून लगेच चिरली असेल तर त्यात असतं तितकं पाणी पुरतं गोळा व्हायला.
४. मी मुठिया तळलेल्या तेलातच भाजी करते. (तेव्हा मुळात तळायलाच फार तेल घ्यायचं नाही.)
५. तर या तेलात हिंग, हळद, ओवा यांची फोडणी करायची.
६. त्यावर आलं लसूण मिरचीची पेस्ट परतून घ्यायची. मग गरम मसाला घालायचा.
७. त्यात भरलेली वांगी, बटाटे आणि उरलेलं खोबर्‍याचं सारण परतायचं. पातेल्यावर झाकण ठेवून आधणाची एक चांगली वाफ येऊ द्यायची.
८. वांगी आणि बटाटे बर्‍यापैकी शिजले (अगदी मेण नाही!) की मग बाकी वाफवून घेतलेल्या भाज्या आणि दाणे घालायचे.
९. चवीनुसार मीठ घालायचं आणि लिंबू पिळायचं
१०. सगळं छान एकत्र परतून पुन्हा झाकण ठेवून एक चांगली दमदमून वाफ येऊ द्यायची.
११. शेवटी मुठिया पण त्यात मिसळायच्या.
१२. वाढताना वरून खोबरं कोथिंबीर घालून सोबत लिंबाची फोड द्यायची.
१३. मला नुसती वाटीत घेऊन खायलाही आवडते. जोडीला गरम फुलके केले तर ताटात स्वर्ग इ.इ. Happy

IMG_9110.JPGIMG_9111.JPGFullSizeRender.jpg

वाढणी/प्रमाण: 
वर दिलेल्या प्रमाणाने ४ जणांना भरपूर व्हायला हवी.
अधिक टिपा: 

भारतात आई यात दोन कच्ची केळी सालासकट प्रत्येकी ४-५ चकत्या कापून घालते. इथे मला प्लँटेन घालायचा काही धीर झाला नाही.
तसंच काही लोक थोडी साखरही घालतात चवीला. मी घालत नाही.

माहितीचा स्रोत: 
आई. तिच्या माहितीचा स्त्रोत तिची गुजराथी मैत्रिण. :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<खड्डे खणण्यापेक्षा, ते मडकं कोळश्याच्या शेगडीवर ठेवलं तर नाही का चालंत?>>

मडकं वरून पाल्याने झाकून बंद करून उलट करून पुरतात व भोवती गोवर्‍या व पाला लावून जाळतात, म्हणून त्याचे नाव उंधियो आहे. गुजरातीमा उंधू एटले उलट.

स्वाती, तुझी रेसिपी आणि मंजु, मनस्विनिच्या टिप्स वापरुन काल उंधियु बनवला. एकदम सही झाला !! आज डब्यात पण घेऊन आलेय.

गेल्या वर्षी केला होता या रेस्पीने उंधियु. आता या आठवड्यात पुन्हा करणार. मस्त भाज्या मिळायला लागल्यात.

Wa!!

५. तर या तेलात हिंग, हळद, ओवा यांची फोडणी करायची.
६. त्यावर आलं लसूण मिरचीची पेस्ट परतून घ्यायची. >>> त्यानंतर प्रेशरपॅन वापरले तर १ शिटीत उंधियो होतो.
मी लसूणपात,मिरची, खोबरे मिक्सरमधून वाटून फोड्णीत टाकते.

आमच्या इथे दुकानात तयार मिळतो. नक्की हा प्रकार कश्याबरोबर खायचा ते बघायला इथे आले. लॉट्स ऑफ व्हेजीज. लुक्स लाइक.

परवा केला होता त्यामुळे फोटो अ‍ॅड करता आले आज.

थोडा बदल म्हणजे वांग्याबटाट्यांत भरायच्या खोबर्‍याच्या सारणात गोडा मसाला घातला, आणि मुठियांमध्ये तीळ.

Pages