रमण लांबा आणि हेल्मेट

Submitted by मंदार-जोशी on 15 June, 2011 - 04:26

क्रिकेटचा खेळ जसा अनेक रोमहर्षक घटना आणि प्रसंगांनी भरलेला आहे, तसाच तो अनेक विनोदी आणि दु:खद घटनांचाही साक्षीदार आहे. मानवाच्या आयुष्यातील सगळ्यात दु:खद घटना म्हणजे अर्थातच मृत्यू. क्रिकेटच नव्हे, तर अनेक क्षेत्रातील व्यावसायिकांना आपल्याला आपले काम करतानाच किंवा कार्यप्रवण असतानाच मृत्यू यावा अशी इच्छा असते. अर्थातच बिछान्याला खिळून राहणे कुणालाच पसंत नसतं, पण याचाच अर्थ असा की आपले हात पाय व्यवस्थित चालत असतानाच मृत्यू आला तर तो अधिक स्वीकारार्ह असतो, मग तो कामाच्या ठिकाणी आला तर तो एक वेगळाच योग. प्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट अभिनेता राजा गोसावी यांना आलेला मृत्यू हा एका वेगळ्या अर्थाने सगळ्यात सुदैवी मृत्यू म्हणता येईल. राजा गोसावी यांना तर मेकअपच्या खोलीतच चेहर्‍याला रंग लावताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा इहलोकीचा प्रवास आटोपला. पण ही झाली वयोवृद्ध लोकांची गोष्ट.

पण वयाच्या फक्त अडतीसाव्या वर्षी मृत्यू आला तर, आणि ते ही मैदानावरच्या घटनेमुळे? ते मात्र दुर्दैवीच. अशीच गोष्ट आहे भारताचा फलंदाज रमण लांबा याची.

Raman_Lamba_Pic2.jpg

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये रमण लांबाचे आगमन झाले ते दणक्यातच. ऑस्ट्रेलिया विरुद्ध १९८६-८७ सालच्या मालिकेत धडाकेबाज कामगिरी करून तो सगळ्यांच्या नजरेत भरला. पण पुढच्या काही कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये मात्र तो सपशेल अपयशी ठरला. बी.सी.सी.आय. च्या निवड समितीने रमण लांबाला स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी नंतर अनेक सामन्यांत खेळण्याची संधी दिली, पण त्याचं तो सोनं करु शकला नाही. भारतातील स्थानिक स्पर्धात धो धो धावा करुनही तो पुन्हा संघात स्थान काही मिळवू शकला नाही. त्याची पुन्हा राष्ट्रीय संघात कधीच निवड झाली नाही.

राष्ट्रीय संघातून बाहेर फेकले गेल्यावर आजकाल कुत्र्याच्या छत्रीसारख्या उगवलेल्या वृत्तवाहिन्यांवर 'क्रिकेट तज्ञ' म्हणून चमकोगिरी करण्याची सोय त्याकाळी नसल्याने त्याने मग अनेक स्थानिक पातळ्यांवर क्रिकेट खेळायला सुरवात केली. रमण लांबा काही काळ आर्यलंडच्या क्लब क्रिकेटमध्ये काही काळ चमकला. तिथल्याच एका तरुणीशी (किम) त्याचे प्रेमाचे सूर जुळले आणि दोघे लवकरच विवाहबद्ध झाले.

काही काळाने त्याने बांगलादेशातून क्लब क्रिकेट खेळायला सुरवात केली. वंगबंधू स्टेडियम मध्ये अशाच एका क्लब पातळीवरच्या सामन्यात मोहमेडन स्पोर्टिंग या संघाविरुद्ध ढाका येथील अबहानी क्रिडा चक्र या संघातर्फे खेळत असताना सैफुल्ला खान या गोलंदाजाच्या एका षटकादरम्यान रमण लांबाला शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करण्यास पाचारण करण्यात आलं. खालीद मसूद या त्याच्या यष्टीरक्षक-कर्णधाराने त्याला हेल्मेटबाबत विचारलं, पण त्या षटकात फक्त तीन चेंडू बाकी असल्याने रमणने हेल्मेट घालायचा कंटाळा केला. आणि त्याच्या ह्याच निर्णयाने घात केला. सैफुल्लाने पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा टाकला. त्याला प्रत्युत्तर म्हणून फलंदाज मेहराब हुसेनने पुलचा एक सणसणीत फटका हाणला. चेंडू फार उंचावर उडून झेल पकडला जाऊ नये म्हणून त्याने चेंडू जमीनीवर पडेल अशा बेताने मारला पण तो सरळ रमण लांबाच्या डोक्यावर आदळला. फटका इतका जोराचा होता की चेंडू लांबाच्या डोक्यावर आदळून उंच उडाला, इतका की खालीद मसूदला तो काही अंतर मागे जाऊन झेलावा लागला. फलंदाज बाद झाल्याने सगळे क्षेत्ररक्षक जल्लोष करत खालीदकडे धावले.

Raman_Lamba_Pic1_Fielding.jpg

त्याच वेळी सगळ्यांचं रमण लांबाकडे लक्ष गेलं तेव्हा तो डोकं धरुन खाली पडलेला दिसला, आणि सगळे त्याच्याकडे धावले, पण लांबा एव्हाना त्या धक्क्यातून सावरला असावा. तो आरामात उठून उभा राहिला आणि "मी बरा आहे" असं क्षेत्ररक्षकांना सांगून ड्रेसिंग रूमकडे आरामात चालत गेला. संघाच्या डॉक्टरने त्याला पाणी पाजले, पण काही वेळाने अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला इस्पितळात हलवण्यात आलं. तिथे नेलं जात असताना वाटेतच त्याची शुद्ध हरपली. इस्पितळात त्याच्यावर शस्त्रक्रिया करून मेंदूतली गाठ काढून टाकण्यात आली. प्रकृती खालावल्याने दिल्लीहून एका तज्ञाला पाचारण करण्यात आलं पण तो "आता रुग्ण बरा होण्याची काहीही आशा नाही" असं सांगून जवळ जवळ आल्यापावलीच परत गेला. अखेर उपरोल्लेखित घटनेच्या तीन दिवसांनंतर त्याच्या कुटुंबाच्या परवानगीने त्याचा लाईफ सपोर्ट काढून टाकण्यात आला. बायको किम आणि पाच वर्षांचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी त्यावेळी लांबाच्या अखेरीचे साक्षीदार होते.

ब्रॅडमनच्या काळात हेल्मेट कसं नव्हतं आणि आज सचिन तेंडुलकर कसं हेल्मेट, आर्म गार्ड, चेस्ट गार्ड पासून कसं सगळं घालून खेळतो याबद्दल उहापोह करणारा (आणि आजकालच्या फ्याशनीप्रमाणे सचिनला नावं ठेवणारा) एका इंग्रजाचा लेख नुकताच वाचनात आला. अनेक कारणांनी त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटली, पण त्याला लांबाचा मृत्यू कसा झाला ते अर्थातच ठावूक नसावं. किकेटमधे हेल्मेट हा प्रकार प्रचलित झाल्याला साधारण तीसेक वर्ष झाली असतील. या शिरस्त्राणाने असंख्य फलंदाज आणि क्षेत्ररक्षक जायबंदी होण्यापासून वाचलेले आहेत. जवळजवळ सगळे फलंदाज हल्ली हेल्मेट वापरताना दिसत असले, तरी फलंदाजाजवळ क्षेत्ररक्षण करणारे अनेक खेळाडू आजही एकनाथ सोलकरी थाटात हेल्मेट घालायचा कंटाळा करतात. अशांनी रमण लांबाची दुर्दैवी गोष्ट आठवावी आणि हेल्मेट घालायला सुरवात करावी. शेवटी 'शीर सलामत तो कॅच पचास' हेच खरं, नाही का?

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर आणि वर्षा विशेषांक ’ऋतू हिरवा २०११’ मधे पुर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संदर्भः विविध वृत्तपत्र कात्रणे, क्रिकइन्फो डॉटकॉम, स्पोर्टस्टार.
रमण लांबाच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लांबाबद्दल काही दिवसांपूर्वी वाचलं होतं. एकदा ईएसपीएन वर त्याचा खेळही पाहीला होता. ऑफ स्टंपकडे येत लेगसाईडला चेंडू वळवायचं त्याचं स्किल नजरेत भरलं. देखणा आणि उमदा खेळाडू गेला.

तीन वर्षाची पोर ...........................

काय म्हणाव,
लांबा चांगला फलंदाज होता, सर्वच त्याला विसरलेले दिसतात, बिसीसीआय नेही कुठली मदत केल्याचे वाचनात आले नाही

हेल्मेटची उपयुक्तता नक्कीच आहे. १९७५-७६ मध्ये जलदगती गोलंदाजांना घाबरून पळणारा मदनलाल १९८० नंतर हेल्मेट वापरायला लागून एका नव्याच अवतारात प्रकट झाला. १९८५-८६ पर्यंत बहुसंख्य फलंदाज हेल्मेट वापरत नव्हते याचे कारण म्हणजे त्यांचा तंत्रशुध्द खेळ. गावसकर, रिचर्डस, विश्वनाथ इं. नी कधीच हेल्मेट वापरले नाही कारण अतिशय तंत्रशुध्द खेळामुळे चेंडू कुठे पडेल व तो कसा खेळायचा त्याचे तंत्र त्यांनी वर्षानुवर्षे घोटवलेले होते.

छान लिहिलायंस लेख. रमण लांबाच्या मृत्यू विषयी नव्हतं माहीती.. Sad
बाकी क्रिकेटबद्दल फारशी आस्था नाही.

मला नेहमी उत्सुकता होती...लांबाच्या मृत्यु बद्द्ल सविस्तर वर्णन जाणुन घ्यायची......

धन्स मंदारभौ... Happy

अशांनी रमण लांबाची दुर्दैवी गोष्ट आठवावी आणि हेल्मेट घालायला सुरवात करावी. >>> खरंय..

मंदार,
ज्या पद्धतीने संकलन करून मांडलं आहेस त्याचं कौतुक, लांबा चा मृत्यु कसा झाला होता ते ऐकुन होते, इतकी सविस्तर माहिती नव्हती त्याच्या कारकिर्दीबद्दल आणि लेख संपताना जो लाखमोलाचा सल्ला दिलास तो ही वाखाणनीय!

असाच इंग्लंड च्या दौर्‍यावर असताना.......युवराजसिंगने मारलेला फटका थेट गोलंदाजाच्या डोक्याला बसला.............ती एक लोकल प्रक्टीस मॅच होती आणि स्थानीक गोलंदाज होता...........१ महीन्याच्या वर दवाखाण्यात तो होता..............

असाच फटका अश्विन ला बसलेला आताच्या ipl मॅच मधे........सौरभ तिवारी चा................

एक वेळ क्षेत्ररक्षका साठी हेल्मेट बरोबर आहे...पण गोलंदाजांचे काय.....??????/ जलदगतीचे गोलंदाज फलंदाजाच्या किती जवळ जातात...त्याच बरोबर त्यांना वेळ देखिल नसतो बाजुला होण्यासाठी.........

लांबा दुर्दैवी ठरला..

माही (धोणी) त्याच्या ऊमेदीच्या काळात फलंदाजी करायचा तेव्हा त्याच्या समोर ऊभ्या असलेल्या पंचांना देखिल हेलमेट घालावेसे वाटायचे ईतके आक्रमक अन निव्वळ घणाघाती फटके त्याच्या बॅट मधून निघायचे. मध्यंतरी कुठल्यातरी प्रसिध्द कांगारू अंपायरने हे एका मुलाखतीत सांगीतले होते.

दूर्दैवी घटना! Sad अजिबात माहिती नव्हती!


ज्या पद्धतीने संकलन करून मांडलं आहेस त्याचं कौतुक, लांबा चा मृत्यु कसा झाला होता ते ऐकुन होते, इतकी सविस्तर माहिती नव्हती त्याच्या कारकिर्दीबद्दल आणि लेख संपताना जो लाखमोलाचा सल्ला दिलास तो ही वाखाणनीय!
>>> बागेश्रीला अनुमोदन!

यानिमित्ताने परत एकदा हेल्मेटचे महत्त्व पटले, मग ते क्रिकेटसाठी असो नाहीतर बाकीच्या वाहनांना चालवण्यासाठी! जर्मनीत (मला बाकी देशांचे नियम माहिती नाहीत.) तर सायकलचालकसुद्धा हेल्मेट वापरतात. आपण सायकलवरुनसुद्धा पडलो, तरीही कशा प्रकारे पडू यावरच आपल्या जीवाची सुरक्षितता अवलंबून असते, त्यामुळे निदान डोक्याचे संरक्षण झाले, तरी बाकीच्या जखमांना तोंड द्यायला आपण जिवंत असतो! म्हणून ही काळजी घेतली जाते.

शिवाय इकडे मोटारबाईक चालवतांना किडनीचे जोरदार वार्‍याच्या फटक्यापासून संरक्षण व्हावे, म्हणून कमरेला एक पट्टाही बांधतात. हातात ग्लोव्हज आणि अंगात स्पेशल जॅकेटपण इकडे घालावेच लागते! नियमाचा भागच आहे तो! कधी काय होऊ शकते, हे आपण नाही सांगू शकत, म्हणून काळजी घ्यायलाच हवी!

आपल्याकडे कारमध्ये बसल्यावर बेल्ट बांधायचीपण किती अळमटळम केली जाते! आपल्याच संरक्षणासाठी असते ना हे सगळे?? शिवाय आपल्या देशात बर्‍याचदा कारमध्ये एअरबॅगसुद्धा अ‍ॅक्टिवेट केलेली नसते! म्हणजे अपघाताच्या दृष्टीने काहीच उपाययोजना करत नाहीत! आयुष्य काय एवढं स्वस्त असतं, जे आपण असं सहजासहजी गमवावं?

साधे स्कूटरवर बसतांनाही मागे बसणार्‍या बायका दोन्हीकडे पाय करुन बसत नाहीत(हे साडीमुळे करावेच लागते Sad ). एकाच बाजूने पाय ठेऊन बसल्याने आणि स्पीडब्रेकर न दिसल्याने करकचून दाबलेल्या ब्रेकमुळे धक्का बसून स्कूटरवरुन खाली पडून माझ्या मैत्रीणीची आई जागीच निधन पावली! Sad

काळजी घ्या लोक्स! आणि हो! हेल्मेटसुद्धा चांगल्या कंपनीचेच हवे! सुरक्षिततेच्या सगळ्या चाचण्यांमधून यशस्वीपणे पार पडलेले हेल्मेट महाग असते! पण जीवासाठी तेवढा खर्च पेलायलाच हवा! परिक्षेत नापास झालेले असे स्वस्त हेल्मेट घेतले तर एकवेळ पोलिसांच्या दंडापासून सुटका होईल, जीव जाण्यापासून नाही!!!!!

वेस्ट ईन्डिजच्या दौर्‍यावर असताना नरी काँट्रॅक्टर नावाच्या भारतीय आघाडीच्या फलंदाजाच्या डोक्यावर एका बंपरचा मार बसून त्याचे क्रिकेट खेळणे कायमचे बंद झाले. नक्की कुणाच्या गोलंदाजीवर ते माहित नाही. हॉल, ग्रिफिथ असे वेस्ट इंडिजचे गोलंदाज अतिशय तुफानी गोलंदाजी करणारे खेळाडू प्रसिद्ध होते.

सी के नायडू म्हणून भारताचे एक फलंदाज अतिशय प्रसिद्ध होते १९३० च्या सुमारास. त्यांनी त्यांच्या अत्मचरित्रात लिहीले आहे की, सराव म्हणून त्यांचे वडील त्यांना उभे करून त्यांच्या डोक्याकडे जोरात चेंडू फेकत. ते चुकवण्याचा किंवा खेळण्याचा सराव करून ते पुढे इंग्लंडच्या त्या काळच्या जलदगती गोलंदाजांना यशस्वी रीतीने तोंड देत.

भारताचा रमाकांत देसाई हा शरीराने किरकोळ असूनहि बंपर टाकू शकणारा एकच गोलंदाज त्याच्या काळात भारतीय संघात होता. त्याने कुणाचे डोके फोडले नाही, पण हनिफ महम्मद हा जागतिक विक्रम करणारा फलंदाज त्याला जाम टरकून असे, असे हनीफने स्वतःच कबूल केले आहे.

>>वेस्ट ईन्डिजच्या दौर्‍यावर असताना नरी काँट्रॅक्टर नावाच्या भारतीय आघाडीच्या फलंदाजाच्या डोक्यावर एका बंपरचा मार बसून त्याचे क्रिकेट खेळणे कायमचे बंद झाले.

हो झक्की, ही गोष्ट माझे वडील, आजोबा आणि अनेक वयस्कर नातेवाईकांकडून ऐकली आहे Happy

>>> वेस्ट ईन्डिजच्या दौर्‍यावर असताना नरी काँट्रॅक्टर नावाच्या भारतीय आघाडीच्या फलंदाजाच्या डोक्यावर एका बंपरचा मार बसून त्याचे क्रिकेट खेळणे कायमचे बंद झाले.

१९६७-६८ च्या सुमारास चेंडू डोक्यावर बसून नरी कॉन्ट्रॅक्टरच्या कवटीला क्रॅक गेला होता. मैदानावर हेलिकॉप्टर मागवून त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेल्यामुळे तो वाचला. तो नंतर कधीही क्रिकेट खेळू शकला नाही. गोलंदाज बहुतेक हॉल होता.

मंदार. लांबाची आठवण बर्‍याच वर्षांनी झाली. जे झालं ते फार दुर्दैवी होत यात शंका नाही. अपघात कधीही होऊ शकतो याचं हे उदाहरण. त्यामुळे कायम सावधगिरी बाळगण्यातच शहाणपण आहे हे काहींना कळलं तरी.

या दुर्घटनेबद्दल अर्धवट माहिती होती.
तुझ्या लेखामुळे तपशीलवार माहिती मिळाली.
या दुर्दैवी घटनेपासून सर्वांनी बोध घेणं अत्यंत गरजेचं आहे.
क्रिकेटच नव्हे तर इतरही ठिकाणी हेल्मेट तसेच संरक्षणाची साधने
आळस न करता वापरली पाहिजेत.
-------------------------------------------------------------------------------
लेख वाचता वाचता नरी काँट्रॅक्टरची आठवण झाली.
(वरील काही प्रतिसादांत त्याचा उल्लेख आला आहेच.)

वेस्ट ईन्डिजच्या दौर्‍यावर असताना नरी काँट्रॅक्टर नावाच्या भारतीय आघाडीच्या फलंदाजाच्या डोक्यावर एका बंपरचा मार बसून त्याचे क्रिकेट खेळणे कायमचे बंद झाले. नक्की कुणाच्या गोलंदाजीवर ते माहित नाही>>ग्रिफिथ

मंदार,
लेख कळकळीने लिहिला आहेस. त्याबद्दल धन्यवाद.
सुरक्षेच्या गोष्टी माहित असतात सगळ्यांना, पण एक तर आपण अमर आहोत अशा भ्रमात किंवा नको इतक्या कंटाळ्यामुळे जीव जाऊ शकतो याकडे कुणी लक्ष देत नाहीत.

(अवांतरः उल्लिखित (उल्लेखित नाही) म्हणजेच 'वर लिहिलेले' त्यामुळे उपरोल्लेखित हा शब्द जाम खटकला.
तुझ्या इतरही काही लेखात वाचल्याचे आठवले म्हणून इथे लिहिले, राग नसावा. आणि आला तर आला :फिदी:)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कप्तान मन्सुर अली खान पतौडीची क्रिकेट कारकिर्द सुरु होताच एका कार अपघातात उजवा डोळा निकामी झाला होता. नंतर त्यात बकर्‍याचा डोळा बसविण्यात आला होता.

मंदारजी, क्रिकेटमधला 'रिस्क फॅक्टर' इतक्या छान पद्धतिने अधोरेखित केल्याबद्दल धन्यवाद.
<< भारताचा रमाकांत देसाई.......त्याने कुणाचे डोके फोडले नाही >> झक्कीजी, ब्रेबोर्न स्टेडियमवर पाकिस्तानच्या सईद अहमद या आक्रमक खेळाडूच्या कपाळावर रमाकांतचा 'बंपर' आदळून तो खाली कोसळला होता [ माबोच्या क्रिकेटच्या धाग्यावर याचा उल्लेखही झाला होता] ; पण उठून सईदने त्याच्या पुढच्याच बंपरला सीमापार धाडले होते व अख्ख्या स्टेडियमने टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं होतं. हे सर्व बघायला व वाचायला रोमहर्षक असलं तरीही हेल्मेटची सुविधा असूनही न वापरणं चूकीचंच.
रमाकांत देसाई 'गूडलेंग्थ' चेंडूलाही उसळी देऊं शकत असे, हे त्याचं खास वैशिष्ठ्य; बॉयकॉटसारख्या अनेक चिवट, तंत्रशुद्ध फलंदाजालाही त्याने त्यामुळेच हैराण केलं होतं.
<< १९८५-८६ पर्यंत बहुसंख्य फलंदाज हेल्मेट वापरत नव्हते याचे कारण म्हणजे त्यांचा तंत्रशुध्द खेळ. >> मास्तुरेजी, त्याआधी हेल्मेट वापरणं रुढ झालं नव्हतं हेही आणखी एक कारण आहेच. शिवाय, कितीही तंत्रशुद्ध फलंदाज असला तरीही एकाग्रतेमधे क्षणाचाही भंग न होणं शक्य नसतं; नरि कॉन्ट्रॅक्टर म्हणतो कीं ग्रिफीथ चेंडू टाकतोय इतक्यांत समोरच्या खिडकीच्या हललेल्या तावदानावरची प्रकाशाची तिरीप त्याच्या डोळ्यावर आली व त्यामुळे तो चेंडू त्याला दिसलाच नाही !

रमण लांबाचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. मला क्रिकेट्मधलं फारसं कळत नसलं तरी द्वारकानाथ संझगिरींनी एकदा रमण लांबाचं उदाहरण दिलेलं लक्षात राहीलं. हा लेख खूप छान आहे, प्रभावी आहे.
छान !!

@ भाऊ ~ "समोरच्या खिडकीच्या हललेल्या तावदानावरची प्रकाशाची तिरीप त्याच्या डोळ्यावर आली"...

~ ही माहिती फार मौल्यवान आहे. ती अशासाठी की सध्याच्या ए-वन टीव्ही कॅमेरा करामतीमुळे आपण आता फलंदाजाच्याच नव्हे तर अन्य ११ क्षेत्ररक्षकांच्या चेहर्‍यावरील घामाचे बिंदू सहज पाहू शकतो. अशावेळी ज्यावेळी फलंदाज धावत मारा करायला येणार्‍या गोलंदाजाला थांबवतो आणि त्यामागील 'साईट स्क्रीन' कडे बॅटने निर्देश करतो. त्यावेळी अर्धवट ज्ञानी टीव्हीप्रेक्षक "हा काय भाव खातोय उगाच,,,!" अशा स्वरूपाची शेरेबाजी करतात. पण प्रत्यक्षात त्या साईट स्क्रीनचा अगदी हातभर तुकडा वार्‍याने हलत असेल वा तेथील जाहीरातीचे बॅनर तिरके झाले असेल तर इकडे फलंदाजाचे लक्ष एका क्षणात विचलित होऊन जरी हेल्मेट असले तरी त्या येणार्‍या चेंडूला तो फेस करू इच्छित नाही. त्या फलंदाजाचा तो हक्कच आहे.

'एकनाथ सोलकरी' क्षेत्ररक्षण टाळ्या घेण्यासाठी ठीक होते. पण आता काळाच्या कसोटीवर जर अंपायरलादेखील हेल्मेट द्यावे का असा विचार चालू झाला असेल तर फलंदाज आणि क्लोज सर्कल फिल्डर्सनी हेल्मेट घालणे हे त्यांचा 'रमण लांबा' होऊ नये यासाठी हिताचेच ठरणार आहे.

दुसरीही महत्वाची गोष्ट - जलदगती गोलंदाजाचा चेंडू ज्या गतीने येतो त्याच गतीने तो टीव्हीवर दाखवला तर आपल्याला न दिसण्याचीच शक्यता अधिक; म्हणून प्रक्षेपणाच्या प्रक्रियेत तो किंचित संथ करूनच दाखवला जातो ['स्लो मोशन' नव्हे, नियमित प्रक्षेपणात ]. ' अरे, बॉल स्विंग होताना चक्क दिसतोय तरी साधी बॅट बाजूला नाही काढता येत बावळटाला !', अशी वाक्य म्हणूनच आपण जरा जपूनच वापरायला हवीत !! Wink

Pages