हे राम!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शेवटच्या क्षणी "हे राम!" असे उद्गार काढले होते का याबद्दल आजही वाद आहे. शाळेतील ईतीहासाच्या पुस्तकात तरी तसेच नमूद केले असल्याने माझ्या पुरता किंवा आमच्या पिढीपुरता तो वाद तिथेच संपला होता. बापूंच्या काळी मोबाईल रेकॉर्डींग नसल्याने तसा थेट पुरावा तरी ऊपलब्ध नाही त्यामूळे अनेक शंका, वाद आणि सोयीस्कर थियरीज सो कॉल्ड तज्ञांनी आजवर नाचवल्या आहेत. काळाच्या ओघात पुस्तके बदलली (निव्वळ पुढचे मागचे कव्हर नव्हे तर आतील मजकूर देखिल. बापूंचा अंत झाल्याची तारीख मात्र तीच आहे, हे नशीब!) त्याचबरोबर अनेक तथाकथीत गोष्टी आणि ईतीहासही बदलला? बदलली नाही ती सामान्य जनतेची अवस्था.

गेल्या दशकातील सत्तांतरे, सोयीस्कर खिचडी सरकारे-जी खिचडी ऊपवासाच्या खिचडी एव्हडी देखिल टीकत नाही, सर्व सिध्दांत, संकेत यांना धाब्यावर बसवून स्वार्थापोटी ऊभारलेले पक्ष आणि युती, आणि मूठभर प्रतिनिधींनी अनेक करोडोंना निव्वळ उल्लू बनवण्याचे सुरू असलेले धंदे पहाता खरं तर एव्हाना तग धरून राहिलेल्या समाजाने "हे राम" म्हणायला हवे होते पण चिवटपणा सामान्यांच्या रक्तात आहे. "बचेंगे तो और भी लढेंगे" हे चूकीच्या अर्थाने पिढ्यान पिढ्या रक्तात भिनल्याने आजचे मरण ऊद्यावर ढकलत सामान्य मनुष्य जगतोच आहे. पण गेले तीन दिवस रामलीला मैदानावर घडलेल्या घटनांच्या अनुशंगाने चाललेला तमाशा पाहिल्यावर मात्र "हे राम" हे शब्द आपसूक ओठावर येतात.

लोकशाहीचे चार आधारस्तंभ- संसद, न्यायव्यवस्था, कार्यकारीणी (राष्ट्रपती हा सर्वोच्च पद आणि हक्क), समाजव्यवस्था असे काहीसे वाचल्याचे स्मरणात आहे (संदर्भ अर्थातच जुनी पाठ्यपुस्तके).
यातला प्रत्त्येक आधारस्तंभ कोलमडायच्या स्थितीत असल्यासारखे वाटते.

१. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि सरकार संसदेत कुठलेच काम करत नसल्याने, अलिकडे तर प्रश्ण ऊत्तरेही होवू देत नसल्याने, जे प्रश्ण संसदेच्या मंचावर चर्चिले वा सोडवले जायाला हवेत ते प्रश्ण "रस्त्यावर" ऊतरून सोडवायची नविन फॅशन आहे, किंवा तशी वेळ आली आहे? आणि रस्त्यावर जागा नसेल, कुणि ऐकत नसेल तर भांडवलशाही मिडीया ला हाताशी धरून अशा अनेक प्रश्णांची भाडोत्री सर्कस रोज प्रसारमाध्यमातून पहायला मिळते. मग प्रश्ण ऊठवणारा कुणी का असेना- बाबा, महाराज, अण्णा, योगा गुरू, साधू, बुवा, भाई, ईत्यादी. थोडक्यात आजच्या तारखेला "संसद" नावाला देखिल ऊरलेली नाही. खेरीज या संसदेवरच हल्ला करणार्‍यांना अजूनही कडक शिक्षा दिली जात नाही हे जखमेवर मीठ आहेच.

२. देशात एकूण ५०० न्यायालये तर ५०,००० प्रलंबीत खटले असे काहीसे चित्र आहे असे कानावर येत असते. गम्मत म्हणजे सरकार बदलले की न्याय बदलतो असे दृष्य आहे. अलिकडे तिहार तुरूंगात जी "खास भरती" चालू आहे ती पहाता ईतके वर्ष या खास लोकांचे खास अपराध, गुन्हे, कुठल्या खास कपाटात बंदीस्त होते असा प्रश्ण पडतो. फायली गहाळ होतात हे ऐकून आहे, अनुभवले आहे, पण ईथे तर ईतके वर्ष कायदा आणि न्यायालयेच गहाळ होती का काय अशी शंका येते. भोपाळ पासून ते काल रामलीला मैदानापर्यंत अशा अनेक हजारो प्रलंबीत खटल्यातून अजूनही सामान्यांना न्याय मिळालेला नाही. "जस्टीस डिलेड इईज जस्टीस डीनाईड" अशी म्हण आहे, त्या अर्थी अनेक न्याय निव्वळ कागदोपत्री शिल्लक आहेत असे म्हणावे लगेल.

३. कार्यकारीणी बद्दल काय बोलावे? आपले हक्क, आपले देशाप्रती कर्तव्य, देशहीत आणि सामाजिक बांधिलकी याबद्दल तीळमात्रही आस्था नसलेल्या अन असलीच तर सत्तेसाठी कुणाच्याही पायाशी आपली अस्मिता गहाण टाकणार्‍या नेभळट नेते, नेत्रूत्वाकडून काही अपेक्षा करणे म्हणजे प्रत्त्येक शेंदूर फासल्या दगडातून देव प्रकट होण्याची अंधश्रध्दा जपणे आहे. एकवेळ खाल्ल्या नैवेद्याला जागून तोही प्रकटेल!

४. समाजशास्त्र हा विषय कायम ऑप्शन ला टाकल्याचे दुष्परिणाम व्यावहारीक आयुष्यात रोज समोर येतात तेव्हा अचानक एखाद्या निर्वात पोकळीत किंवा अंधार गर्तेत अडकून बसल्यागत होते. त्यात आपण एकटेच नाही हाच काय तो दिलासा? आज या समाज व्यवस्थेचा प्रत्त्येक घटक कुठल्यातरी ग्रहणाने ग्रस्त आहे- शिक्षण, प्रसार माध्यमे, जातीपाती- वर्ण भेदभाव, गरीब्-श्रीमंत यांतील झपाट्याने वाढणारी दरी, ढासळणारी मूल्ये, कष्टकरी आणि शेतकरी समुदायाची मरणासन्न अवस्था, सुरक्षा, ईत्यादी एक ना अनेक घटकांना लागलेले ग्रहण सुटायची लक्षणे नाहीत.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान प. जवाहरलाल नेहेरू यांचे स्वातंत्र्यपूर्व संध्येचे फेमस शब्द आधी पुस्तकात वाचलेले आणि काही दुर्मिळ चित्रफितीतून पाहिलेले, वा ऐकलेले, त्याची सुरुवात काय ती लक्षात आहे- (Speech On the Granting of Indian Independence, August 14, 1947)

"At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom.. "

वस्तूस्थिति मात्र क्लेषदायक आहे: In the midnight hours of June 5, 2011, India woke up to a different kind of reality.

आणि आजच्या पार्श्वभूमीवर पं. नेहेरूंच्या त्या भाषणातील हा परिच्छेद:

On this day our first thoughts go to the architect of this freedom, the Father of our Nation [Gandhi], who, embodying the old spirit of India, held aloft the torch of freedom and lighted up the darkness that surrounded us. We have often been unworthy followers of his and have strayed from his message, but not only we but succeeding generations will remember this message and bear the imprint in their hearts of this great son of India, magnificent in his faith and strength and courage and humility. We shall never allow that torch of freedom to be blown out, however high the wind or stormy the tempest.

ओठांवर नकळत शब्द येतातः "हे राम!"

विषय: 
प्रकार: 

दिनेशदा,
तुमचे म्हणणे बरोबर आहे.. सर्वोच्च न्यायलयाने स्वतः चौकशीची सूत्रे हाती घेतल्यानेच अलिकडे बडी धेंडे तिहार जेल मध्ये हवा खात आहेत.
लोकसत्ताचा हा लेख त्याच अनुशंगाने:
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=162...

आपण फक्त लेख लिहुया, उरलेल्यांनी वाचुया आणि चर्चा करुया. रामदेवबाबा कसे चुकले, अण्णांनी ग्रामविकास सोडुन नाहीत्या मुद्यात कशाला लक्ष घालायचे इ.

आणि सगळ संपल की राम आहेच. नागरिक म्हणुन आपण सर्वकाही सहन करतो त्याची फळ.