माझे मातीचे प्रयोग ४- Crystalline Glaze

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

पॉटरी क्लास मध्ये अर्धे सेमिस्टर संपत आले की मग सर पुढच्या सेमिस्टरमध्ये त्यांचा काय शिकवायचा विचार आहे हे जाहीर करतात. यावेळी त्यांनी जाहीर केले Crystalline Glaze.
ते ऐकल्यावर काहींनी आनंदाने उड्या मारल्या, काहींनी ओ नोऽऽ असा उसासा सोडला आणि आमच्यासारख्या मातीकामात थोड्या नवख्या थोड्या रुळलेल्या लोकांच्या चेहर्‍यावर हे नक्की काय आहे, मुख्य म्हणजे यासाठी prerequisites काय हा प्रश्न उभा राहिला. या आधी सुमारे ४ वर्षापूर्वी हा कोर्स शिकवला गेला होता त्यानंतर इतक्या वर्षांनी सरांनी परत हा कोर्स शिकवायची तयारी दाखवली होती (असे का याचे कारण पुढे येईलच)
तर कोर्स करण्यासाठीच्या दोनच अटी होत्या, पहिली म्हणजे पोर्सलिन (porcelain) ही माती वापरावी लागेल आणि दुसरी narrow neck vases थोडक्यात आपल्या फुलदाण्या करता यायला हव्यात कारण spherical surface वर हा रंग यशस्वी होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे . बोंबला, झाला ना पोपट. या दोन्ही गोष्टी मला येत नाहीत. पोर्सलीन (चायना वेअर साठी वापरतात) ही माती वापरायला एकदम तशी अवघड कारण ती लोण्यासारखी मऊ असते, खूप कमी पाणी वापरून आणि मुख्य म्हणजे फार पटकन काम करावे लागते नाही तर भांडे न बनता लगदा होतो. थोडक्यात आमच्यासारखे तल्लीन होत तासन् तास एकच भांडे करू बघणार्‍या लोकांसाठी a.k.a. beginner/intermediate वाल्यांसाठी नाही.
दुसरे म्हणजे फुलदाण्या करता येणे, माझ्यासाठी नॅरो नेक हा प्रकार म्हणजे आपण काही गोष्टी कश्या अभ्यासक्रमात असल्या तरी फक्त परीक्षेच्या आदल्या रात्री बघतो या प्रकारात मोडणारा होता त्यामुळे इथेही बोंबच. दिलासा देणारी गोष्ट ही की मी अशी एकटीच नव्हते.
मग सरांनी या दोन्हीवर उपाय सुचवला पोर्सलिन सारखी दिसणारी पण जास्त पाणी वापरता येईल अशी एक माती सुचवली, आणि फुलदाणी साठी उपाय - करायला शिकणे हाच. थोडक्यात या क्लास मध्ये दुसरे काही जमले नाही तर निदान या प्रकारच्या आकाराचा तरी सराव होईल ह्या उद्देशाने नाव नोंदवले.
आता मूळ मुद्द्याकडे -
Crystalline Glaze म्हणजे नक्की काय असते?
Crystalline glazes are specialty glazes that show visible and distinct crystal growth in the matrix of the fired glaze. Although most flower-like crystals are not large, some can grow up to four or five inches across within the glaze matrix

तर हे एक विशिष्ट प्रकारचे रंग असतात, जे भांड्यांना लावून भट्टीत विशिष्ट तापमानाला भाजल्यावर फुलासारखे दिसणारे क्रिस्ट्ल तयार होतात.
हे क्रिस्टल नक्की कसे तयार होतात?
The macro-crystals found in crystalline glazes form around an nucleus of a tiny titanium oxide or zinc oxide crystal. In the right circumstances, zinc and silica oxide molecules will begin attaching themselves to the nucleus crystal. These molecular bonds are in very specific arrangements, which we see as crystals

थोडक्यात ग्लेझमध्ये असलेले झिंक आणि सिलीकॉन ऑक्साइड हे दोन घटक यांची प्रक्रिया सुरू होते आणि त्यांची साखळी तयार होते. टायटॅनियमच्या न्युक्लीसस भोवती ह्या साखळ्या तयार व्हायला सुरूवात होते. सुईच्या आकाराच्या ह्या साखळ्या एका शेजारी एक तयार व्हायला लागतात आणि चायनीज फॅन प्रमाणे याचा आकार मोठा होत होत एक संपूर्ण वर्तुळ म्हणजेच फुलासारखे दिसणारे क्रिस्टल तयार होतात. विशिष्ट तापमानाला ही सगळी रासायनिक प्रक्रिया घडते.
खर तर क्रिस्टलाइन ग्लेझची संपूर्ण प्रक्रिया ही एखाद्या mathematical equation सारखी असते. सगळ्या variables, constants यांच्या ठराविक किमतीलाच ते गणित सुटते तसच काहीसे. मग यात एवढे अवघड काय आहे, Crystalline glazes is a science and requires patience, lot of patience. Exact Solution थोडक्यात हमखास यशस्वी होणारी पद्धत हा प्रकार यात नाही. इथे काम करावे लागते ते trial and error पद्धतीने.
करणार्‍याच्या दृष्टीने ही सगळी प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि सहनशक्तीची मर्यादा बघणारी असते. एकतर तुम्हाला पोर्सलिन मातीच वापरावी लागते का तर या मातीचे भांडी पांढरी आणि गुळगुळीत होतात मी बीमिक्स नावाची त्यातल्या त्यात पोर्सलिन सारखे गुणधर्म असणारी माती वापरली. क्रिस्टल्स तयार होण्यासाठी ही एक अत्यावश्यक बाब आहे.
दुसरे म्हणजे तुम्हाला सगळे रंग स्वतः बनवावे लागतात. अरे देवा, रंग बनवणे म्हणजे मेंदीचा कोन बनवण्यासाठी जे काय कष्ट काही लोकांनी आधी घेतलेत (वस्त्रगाळ, चहाचे पाणी, साखर, लिंबू, निलगिरी तेल, लवंग, चूना इ.इ.) त्यांनाच हे थोडेफार कळेल.
आत्तापर्यंत आम्ही सरांनी तयार केलेला ग्लेझ वर्गात वापरत होतो त्यामुळे मेंदीचा तयार कोण वापरणार्‍यांना आता मेंदीचे झाड शोधुन मग कोन तयार करायला सांगितल्यासारखे झाले. ठीक आहे तेही करू, पण सरांनी पुढचा भाग सांगितला हे crystalline glazes हे प्रत्येक वेळी ताजे बनवून घ्यावे लागतील एकदाच बादलीभर करुन ठेवला असे जमणार नाही. म्हणजे सगळे केमीकल्स अगदी मोजून न चुकता घ्यायचे, ते गाळायचे त्यात हवे ते रंग टाकायचे, कालवायचे, गाळायचे इ.इ. थोडक्यात हे केले की लगेच वापरून संपवायचे आणि सारखे परत परत करायचे. बरं क्लास मधल्या एक दोघांना ग्लेझ बनवायला बसवले तर तेही नाही. प्रत्येकाने आपापले ग्लेझ बनवायचे.
आता हळू हळू लोकांनी क्लासच्या सुरुवातीला का सुस्कारा सोडला, आणि सरांनी तब्बल चार वर्षानंतर हा कोर्स शिकवायला का घेतला हे लक्षात यायला लागले. एकदा सगळे केल्यावर परत कोण करणार, बर एवढे करून हे कष्ट संपले असे नाही. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.
हे रंग भट्टीत अत्यंत प्रवाही असतात म्हणजे भट्टीत भाजले जात असतांना द्रव स्वरूपात अगदी पाण्यासारखे वहातात. भांड्यांवरून वाहून गेले तर मग भांड्यावर काय रहाणार आणि हे वाहून जातात म्हणजे भट्टीत कुठे जातात?
आता पुढची पायरी रंग वाहू नयेत म्हणून छोट्या छोट्या ताटल्या करतात (कॅचर्स) आणि या कॅचर्समध्ये रंगवलेली भांडी ठेवतात भट्टीत भाजायला ठेवतांना. जेवढी भांडी तेवढे कॅचर्स, यात ठेवून भांडे भाजल्याने वाहून गेलेला रंग त्या ताटलीत जमा होतो आणि भट्टी खराब होत नाही. हा ग्लेझ म्हणजे खरतर द्रव काच म्हणता येईल ते भांडे त्या ताटलीला कायमचे चिकटते. यावर उपाय काय तर भांडे आणि कॅचर यांच्यामध्ये काहीतरी ठेवायला हवे जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाही. हा मधला भाग म्हणजे बिस्कीट - हे लाकडाचा भुस्सा, अ‍ॅल्युमिनियम हायड्रेट आणि पाणी यांच्यापासून बनवलेले असते.
हे पण प्रत्येकाने आपापले बनवायचे. म्हणजे भांडे, मग ताजे रंग, बिस्कीट, कॅचर असे सगळे बनवायचे. अशी सगळी जय्यत तयारी झाली की मग भांडे रंगवायचे. बर एरवी रंगात भांडे बुडवता येईल इतका जास्त आणि पातळरंग क्लास मध्ये नेहमी असतो. इथे मात्र १००-२०० ग्रॅम रंग आणि तोही अगदी घट्ट. मग लावायचे कसे तर छोट्या ब्रशने. ते पण ५-६ थर. प्रवाही असतात ना, मग जास्त थर द्यावे लागतील. ह्या सगळ्या पायर्‍या खालच्या फोटोत आहेत.

एवढे सगळे करून भांडे भट्टीत जायला तयार झाले की मग गणित सुरू होते तापमानाचे. कुठल्या तापमानाला कुठला ग्लेझ किती वाहतो, किती क्रिस्टल तयार होतात, कुठल्या आकाराचे इ. सगळे प्रयोग सुरू होतात. यातला प्रत्येक घटक हा गणितातल्या variable सारखा गृहीत धरावा लागतो. एक छोटीशी गोष्ट बदलली की संपूर्ण equation बदलते. त्यामुळे या सगळ्या प्रयोगांच्या अगदी नियमित नोंदी ठेवाव्या लागतात. प्रत्येक बदल लिहून ठेवावा लागतो, कुठला बदल करायचा का करायचा हे आपापले ठरवायचे असते आणि याच कारणासाठी प्रत्येकाने हा सगळा प्रयोग आपापला वेगळा करायचा असतो. हे सगळे काम अत्यंत वेळखाऊ, किचकट तर असतेच पण एवढे करूनही यश येईलच असे नाही, केलेली सगळी मेहनत वाया जाणार. सगळ्यांनी सारखे केले तरी प्रत्येकाचा निकाल वेगळा येतो कोणाचा चांगला तर कोणाचा अतिशय वाईट, कधी भांडी फुटतात, कधी तडे जातात कधी कॅचर फुटते कधी भांडे कलंडते, बर्‍याचदा क्रिस्टल्स तयारच होत नाहीत इ.
भट्टीतून भांडे भाजल्यावर पण काम संपत नाही, भांडे कॅचरपासून वेगळे करणे, बुडाचा खडबडीत भाग ग्राइंड-सँड करणे असे सगळे करावे लागते.
या सगळ्या दिव्यातून गेल्यावर सुद्धा जी भांडी शहाण्या मुलांसारखी वागली त्यांनाच मायबोलीवर यायला मिळाले बाकीच्यांना नाही.
यातले प्रत्येक भांडे हे गणितातले एक समीकरण आहे असे समजायला हरकत नाही.
१. यात आलेला क्रिस्टलचा निळा आणि मागचा पिवळसर सोनेरी रंग ग्लेझमध्ये टाकलेल्या २% निकेलमुळे आलेला आहे.

२. मॅगनीझ ३%, कॉपर १% तर कोबाल्ट ०.१%

३.

४. कॉपर २% व कोबाल्ट ०.५%

५. मँगनीज ३%, आयर्न ऑक्साइड २% व कोबाल्ट ०.१%

६.

७.

८. मँगनीज ३% व कोबाल्ट -.१%

९. कॉपर ३%, आयर्न २%

१०.

११.

१२. डावीकडचा निळा २% कोबाल्ट

१३. आयर्न ऑक्साइड २%

१४. डावीकडचे भांडे - आयर्न ३%, कोबाल्ट ०.१% तर उजवीकडचे भांडे - मँगनीज ३%, आयर्न २%, कोबाल्ट ०.१

१५.

१६. ३% कॉपर कार्बोनेट

१७.

१८.

१९.

२०.

२१.

या कोर्सचा साइड इफेक्ट म्हणजे मला आता बर्‍यापैकी फुलदाण्या करता यायला लागल्यात आणि संयम पण वाढला. Happy

संदर्भ :
Macro Crystalline Glazes - The Challenge of Crystals - Peter Ilsely

याआधीचा भाग माझे मातीचे प्रयोग ३

विषय: 
प्रकार: 

ह्या तू केलेल्या फुलदाण्या रुनी पॉटर? एकदम भारी आहेत गं! Happy
लेख आता सावकाशीने वाचते, आधी तुझ्या कामाला दाद देण्यासाठी ही पोस्ट Happy
ते फुलांसारखे दिसणारे क्रिस्टल्स एकदम भारी!
मस्त, मस्त! Happy

जब्बरदस्त!!!!

ग्रेट कलाकारी रुनी Happy सह्हीच जमलय... सगळेच पॉट्स मस्त... प्रचि १, २, १५, १८, २१ तर क्या बात है Happy

लगे रहो Happy

रूनी मी पण लेख नंतर वाचेन. पण तुझी कलाकृती पाहून डोळ्याचे पारणे फिटले. कुणितरी स्वत:च्या हाताने इतके सुंदर पॉट्स बनवू शकतं यावर आज विश्वास बसला.. Happy

माझ्या आवडत्या १०त. Happy

रूनी मी पण लेख नंतर वाचेन. पण तुझी कलाकृती पाहून डोळ्याचे पारणे फिटले. कुणितरी स्वत:च्या हाताने इतके सुंदर पॉट्स बनवू शकतं यावर आज विश्वास बसला.. Happy

माझ्या आवडत्या १०त. Happy

सही रूनी!! मस्त एकदम!!! एकसे बढकर एक झालेत सगळे पॉट्स. बॉटल्स करायला आता मजा येत असेल ना?
पोर्सलीन थ्रो करायला शिक आता लवकर!

रूनी, अप्रतिम झालंय हे सगळं.

किती मेहनत आहे यामागे हे तू लिहिले नसतेस तर कळलेच नसते.

अतिशय सुंदर. अगदी हात लावावासा वाटतोय. अशा कालाकृतींमागे कलाकाराची किती मेहनत असते, ते कधी जाणवतच नाही.

अप्रतिम.सुरेख...बरंच किचकट / सबुरी चे काम आहे..सरतेशेवटी खुपस काही नवीन शिकण्याचा आनंद नक्कीच मिळत असेल नाही का?

रुनी खुप खुप खुप सुंदर. तुझ्या पेशन्स व कलाकृतींचे कौतुक करावे तितके कमीच आहे. बर्‍याच वेळा असे पॉट बघते पण ते अश्या पद्धतीने बनतात हे पहिल्यांदाच पाहीले.

Pages