उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ५ - अब तुम्हारे हवाले वतन साथीयों ... !

Submitted by सेनापती... on 19 August, 2010 - 06:45

"ईश्वर आणि सैनिक या दोघांचे आपल्याला संकटाच्या वेळीचं स्मरण होते. त्या संकटात मदत मिळाल्यानंतर ईश्वराचा विसर पडतो आणि सैनिकाची उपेक्षा होते."

ज्यांनी 'आपल्या उदयासाठी स्वतःचा आज दिला' अश्या वीर जवानांचे स्मरण आणि आपल्या आयुष्यातले काही क्षण त्यांना अर्पण करावे याहेतूने आम्ही 'द्रास वॉर मेमोरिअल'ला भेट द्यायला निघालो होतो. डाक बंगल्यावरुन बाहेर पडतानाच समोर 'टायगर हिल' दिसत होते. त्याच्या बाजुलाच पॉइंट ४८७५ म्हणजेच ज्याला आता 'कॅप्टन विक्रम बत्रा टॉप' म्हणतात ते दिसत होते. संध्याकाळ होत आली होती. द्रासवरुन पुढे कारगीलकडे निघालो की ७ की.मी वर डाव्या हाताला वॉर मेमोरिअल आहे. द्रासमध्ये सध्या पंजाबची माउंटन ब्रिगेड स्थित आहे. २६ जुलै २००९ रोजी संपूर्ण भागात आर्मीने १० वा कारगील विजयदिन मोठ्या उत्साहात आणि मिश्र भावनांमध्ये साजरा केला. एकीकडे विजयाचा आनंद तर दूसरीकडे गमावलेल्या जवानांचे दुखः सर्व उंच पर्वतांच्या उतारांवर '10th Anniversary of Operation Vijay' असे कोरले होते.

खरं तरं २६ जुलैलाच या ठिकाणी यायची इच्छा होती. मात्र मी कामावर असल्याने ते शक्य झाले नाही. तेंव्हा १५ ऑगस्टला जोडून या ठिकाणी भेट द्यायची असे आधीच नक्की झाले होते. लडाख मोहिमेचे महत्वाचे उद्दिष्ट हेच होते. २० एक मिं. मध्ये मेमोरिअलला पोचलो. परिसर अतिशय शांत आणि पवित्र वाटत होता. सध्या ह्या स्मारकाची जबाबदारी '२ ग्रेनेडिअर' ह्या रेजिमेंटकडे आहे. 'Indian Army - Serving God and Country With Pride' हे प्रवेशद्वारावरचे वाक्य वाचून नकळत डोळे पाणावले गेले.

मुख्य प्रवेशद्वारापासून खुद्द स्मारकापर्यंत जाणाऱ्या पदपथाला 'विजयपथ' असे नाव दिले गेले आहे. या पदपथावरुन थेट समोर दिसत होते एक स्मारक. ज्याठिकाणी पर्वतांच्या उत्तुंग कडयांवर आपल्या जवानांनी प्राणांचे बलिदान दिले त्याच ठिकाणी त्या वीरांचे एक सुंदर स्मारक उभे केले आहे.

त्या विजयपथावरुन चालताना मला आठवत होती १० वर्षांपूर्वीची ती एक-एक चढाई... एक-एक क्षणाचा दिलेला तो अथक लढा. धारातीर्थी पडलेले ते एक-एक जवान आणि ते एक-एक पाउल विजयाच्या दिशेने टाकलेले. १९९८ चा हिवाळ्यामध्येच पाकिस्तानी सैन्याने घुसखोरीची संपूर्ण तयारी केली होती. या ऑपरेशनचे नाव होते 'अल-बदर'. पाकिस्तानी ६२ नॉर्थ इंफंट्री ब्रिगेडला याची जबाबदारी दिली गेली होती. झोजी-ला येथील 'घुमरी' ते बटालिक येथील 'तुरतुक' ह्या मधल्या द्रास - कारगील - तोलोलिंग - काकसर - बटालिक ह्या १४० की.मी च्या पट्यामध्ये ५००० पाकिस्तानी सैनिकांनी सुयोग्य अश्या ४०० शिखरांवर ठाणी प्रस्थापित केली होती. हा साराच प्रदेश उंचचं-उंच शिखरांनी व्यापलेला. हिवाळ्यामध्ये तापमान -३० ते -४० डिग. इतके उतरल्यावर माणसाला इकडे राहणे अशक्य. भारतीय सेना हिवाळ्याच्या सुरवातीला विंटर पोस्टवर सरकल्याचा फायदा घेत करार तोडून पाकिस्तानी सैन्याने ह्या संपूर्ण भागात घूसखोरी केली आणि १९४८ पासून मनाशी बाळगगेले सुप्तस्वप्न पुन्हा एकदा साकारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आपलीच इंच-इंच भूमी पुन्हा मिळवण्यासाठी मग भारतीय सेनेने एक जबरदस्त लढा देत पुन्हा एकदा आपले कर्तुत्व दाखवून दिले. जगातल्या लढण्यासाठी अत्यंत प्रतिकूल समजल्या जाणाऱ्या युद्धभूमीवर अवघ्या ३ महिन्यांच्या आत त्यांनी शत्रूला खडे चारून अक्षरश: धुळीत मिळवले. झोजी-ला ते बटालिक ह्या २५० की.मी. लांब ताबारेषेचे संरक्षण हे १२१ इंफंट्री ब्रिगेडचे काम होते. ह्या भागात १९४८ मध्ये झालेल्या घुसखोरीनंतर भारतीय सैन्याने मोठ्या मुश्कीलीने हा भूभाग परत मिळवला होता. १९६५ आणि १९७१ मध्ये सुद्धा ह्या भागात तुंबळ लढाया झाल्या होत्या.

४ मे ला बटालिकच्या जुब्बार टेकडी परिसरात घूसखोरी झाल्याची बातमी मिळाल्यानंतर आर्मीची हालचाल सुरू झाली. ७-८ मे पासून परिसरात जोरदार तोफखाने धडधडू लागले आणि पाहिल्या काही चकमकी घडल्या. पुढच्या काही दिवसात संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली आहे हे लक्षात आल्यावर वातावरणाशी समरस होत भारतीय सेना पुढे सरकू लागली. पण हे सर्वसामान्य लोकांसमोर यायला मात्र २५ मे उगवला. जागतिक क्रिकेट करंडकाच्या सोहळ्यात गुंतलेल्या भारतीयांना - खास करून पत्रकारांना इतर गोष्टींकडे बघायला वेळ होताच कुठे???

२६ मे रोजी वायुसेनेची लढाउ विमाने 'ऑपरेशन सफेद सागर' सुरू करीत आसमंतात झेपावली. दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी फ्लाइट ले. नाचिकेत यांचे विमान 'फ्लेम आउट' झाल्याने दुर्घटनाग्रस्त झाले तर त्यांना शोधण्यात स्क्वाड्रन लीडर अजय आहूजा हे पाकिस्तानी सैन्याच्या हातात सापडले. या नंतर मात्र वायुसेनेने मिराज २००० ही लढाउ विमाने वापरली ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या कुमक आणि रसद वर परिणाम झाला. 'ऑपरेशन सफेद सागर' हे 'ऑपरेशन विजय'च्या जोडीने शेवटपर्यंत सुरू होते.

दुसरीकडे भारतीय सेनेने २२ मे पासून सर्वत्र चढाई सुरू केली होती. १५००० फुट उंचीच्या तोलोलिंग आणि आसपासच्या परिसरात म्हणजेच एरिया फ्लैट, बरबाद बंकर या भागात १८ ग्रेनेडिअर्सने हल्लाबोल केला. ह्या लढाई मध्ये ३ जून रोजी ले. कर्नल विश्वनाथन यांना वीरमरण आले. ११ जूनपर्यंत बोफोर्सने शत्रूला ठोकून काढल्यावर १२ जून रोजी तोलोलिंगची जबाबदारी २ 'राजरीफ'ला (राजपूत रायफल्स) देण्यात आली. १२ जूनच्या रात्री मेजर गुप्ता काही सैनिकांसोबत मागच्याबाजूने चाल करून गेले. ह्या लढाईमध्ये मेजर गुप्ता यांच्या सोबत सर्वच्या सर्व जवान शहीद झाले पण तोलोलिंग मात्र हाती आले. भारतीय सेनेचा पहिला विजय १२ जूनच्या रात्री घडून आला. त्यानंतर मात्र भारतीय सेनेने मागे पाहिले नाही. एकामागुन एक विजय सर करीत ते पुढे सरकू लागले. १४ जूनला 'हम्प' जिंकल्यावर २ राजरिफच्या जागी तिकडे १३ जैकरीफ (J & K रायफल्स) ने ताबा घेतला आणि १४ जूनला त्यांनी 'रोंकी नॉब' जिंकला.

आता लक्ष्य होते पॉइंट ५१४०. ह्यावर १३ जैकरीफ दक्षिणेकडून, २ नागा बटालियन पश्चिमेकडून तर १८ गढवाल पूर्वेकडून चाल करून गेल्या. २० जून रोजी पहाटे ३:३५ ला कॅप्टन विक्रम बत्राच्या डेल्टा कंपनीने पश्चिमेकडच्या भागावर पूर्ण भाग हातात घेतला. १६००० फुट उंचीवर त्यांचे शत्रुशी रेडियो वर संभाषण झाले. पलीकडचा आवाज बोलत होता, 'शेरशहा, ऊपर तो आ गए हो, अब वापस नही जा सकोगे.' शेरशहा हे कॅप्टन विक्रम बत्रा यांचे लढाईमधले टोपण नाव होते. शेरशहा कडून लगेच प्रत्युत्तर गेले. 'एक घंटे मे देखते है, कौन ऊपर रहेगा.' आणि १ तासात त्यांनी आपले शब्द खरे करून दाखवले. समोरून येणाऱ्या गोळीबाराला न जुमानता ५ जवान घेउन ते शत्रुच्या खंदकला भिडले. २ संगर उडवले आणि शत्रुच्या ३ सैनिकांशी एकट्याने लढून ठार केले. पॉइंट ५१४० जिंकल्यावर रेडियोवर आपल्या कमांडिंग ऑफिसरला सांगितले. 'सर, ये दिल माँगे मोअर'. पुढे पॉइंट ४८७५ च्या लढाईमध्ये ५ जुलै रोजी शेरशहा उर्फ़ कॅप्टन विक्रम बत्रा यांना वीरमरण आले. 'रायफलमन संजय कुमार' यांनी पॉइंट ४८७५ वर अत्तुच्च पराक्रम करत १३ जैकरीफला 'फ्लैट टॉप'वर विजय प्राप्त करून दिला. ह्या दोघांना 'परमवीर चक्र' प्रदान केले गेले.

यानंतर पॉइंट ५१००, पॉइंट ४७००, थ्री पिंपल असे एकामागुन एक विजय मिळवत भारतीय सेनेने अखेर ३ जुलैच्या रात्री १६५०० फुट उंचीच्या 'टायगर हील'वर हल्लाबोल केला. ८ सिख, १८ गढवाल आणि १८ ग्रेनेडिअर्सने आपापले मोर्चे जिंकत आगेकूच सुरू ठेवली होती. ग्रेनेडिअर योगेंद्रसिंग यादव यांनी ह्या लढाईमध्ये अत्तुच्च पराक्रम केला. त्यांना 'परमवीर चक्र' प्रदान करण्यात आले. अखेरचा हल्ला १८ ग्रेनेडिअर्सच्या कॅप्टन सचिन निंबाळकर यांनी चढवला आणि विजय प्राप्त केला. 'Sir. I am on the Top' अशी आरोळी त्यांनी रेडियोवर ठोकली.

कारगील येथील पॉइंट १३६२० ह्या ठिकाणी लढाईमध्ये कश्मीरासिंगचा एक हातच धडा वेगळा झाला. त्याने स्वतःचा हात स्वतःच उचलून घेतला आणि इतर सैनिकांनी त्याला आर्मी हॉस्पिटलकडे नेले. वाटेमध्ये तो आपल्या लढाईची झटपट त्या २ सैनिकांना सांगण्यात मग्न होता. अचानक एकाने विचारले,"कश्मीरा, टाइम काय झाला असेल रे?"कश्मीराने उत्तर दिले,"माझ्या त्या तुटलेल्या हातावर घड्याळ आहे. तूच बघ ना."

दोस्तहो ... आता काय बोलू अजून ??? खरंतरं मला पुढे काही लिहायचे सुचत नाही आहे. इतकच म्हणीन...

When you go home, tell them of us & say,
for your tomorrow we gave our today"

ऑपरेशन विजयमध्ये शहीद आणि जखमी झालेल्या सर्व १०९१ अधिकारी आणि जवानांची नावे...

स्मारकासमोर २ मिं. नतमस्तक होउन त्यांना मूक श्रद्धांजली वाहिली आणि बाजूला असलेल्या शहीद ले. मनोज पांडे 'एक्सिबिट'मध्ये गेलो. प्रवेशद्वारातून आत गेलो की समोरच शहीद ले. मनोज पांडे यांचा डोक्यावर काळी कफनी बांधलेला आणि हातात इंसास रायफल असलेला अर्धाकृति पुतळा आहे. त्यांच्यामागे भारताचा तिरंगा आणि ग्रेनेडिअर्सचा कलर फ्लॅग आहे.

उजव्या हाताला 'कारगील शहीद कलश' आहे. ह्यात सर्व शहीद जवानांच्या पवित्र अस्थि जतन केल्या गेल्या आहेत. कारगील लढाईमध्ये वापरलेल्या, शत्रुकडून हस्तगत केलेल्या अश्या बऱ्याच गोष्टी आत मांडल्या आहेत. या लढाईमध्ये परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र मिळालेल्या वीरांचे फोटो आहेत. तोलोलिंग, पॉइंट ४८७५, टायगर हिल वर कोणी कशी चढाई केली त्याचे मोडल्स बनवलेले आहेत.

लढाईचे वर्णन करणारे शेकडो फोटो येथे आहेत. हे फोटो बघताना उर जसा अभिमानाने भरून येतो तश्या हाताच्या मुठी सुद्धा घट्ट होतात. आपल्या सैनिकांनी जे बलिदान दिले आहे ते पाहून डोळे भरून येतात. एक वेगळीच विरश्री अंगात भिनते. कुठल्या परिस्थितिमध्ये आपल्या वीरांनी हा असीम पराक्रम केला हे एक्सिबिट बघून लगेच समजते. काहीवेळ तिकडे असणाऱ्या सैनिकंशी बोललो. अधिक माहिती घेतली.

८ वाजत आले होते तेंव्हा तिकडून बाहेर पडलो आणि पुन्हा एकदा मेमोरियल समोर उभे राहिलो. दिवस संपला होता. एक जवान शहीद स्मारकासमोर ज्योत पेटवत होता. त्याला प्रतिसाद म्हणुन बहूदा ते शहीद वीर वरुन म्हणत असतील. 'कर चले हम फिदा जान और तन साथियों ... अब तुम्हारे हवाले वतन साथीयों...'

तिकडून निघालो तेंव्हा आमच्यापाशी एक अनुभव होता. असा अनुभव जो आम्हाला कधीच विसरता येणार नव्हता. ते काही क्षण जे आम्हाला त्या थरारक रणभूमीवर घेउन गेले होते. शहीद कॅप्टन विक्रम बत्राचा फोटो आणि शहीद ले. मनोज पांडे यांचा पुतळा पाहून अंगावर अवचित उठलेला तो शहारा मी जन्मभर विसरु शकणार नाही. त्या सर्व ज्ञात-अज्ञात सैनिकांचे स्मरण करण्यासाठी मी इकडे पुन्हा-पुन्हा येइन. जसे-जेंव्हा जमेल तसे...

पुन्हा एकदा माघारी निघालो. ८:३० वाजता डाक बंगल्यावर पोचलो. ड्रायवर अजून सोबतचं होता. आम्हाला उदया लेहला सोडुनच तो परत जाणार होता. जेवणानंतर उदयाचा प्लान ठरवला. कारगील बेसला जास्त वेळ लागणार असल्याने साधना, उमेश, अमेय म्हात्रे, ऐश्वर्या आणि पूनम गाडीमधुन येणार होते. बाकी सर्व बायकर्स पुढे सटकणार होते. सकाळी ६ ला निघायचे असे ठरले आणि सर्वजण झोपेसाठी पांगलो. द्रास पाठोपाठ आता उदया कारगील शहर बघायचे होते आणि त्याहून पुढे जाउन कुठल्याही परिस्थितीमध्ये लेह गाठायचे होतेच...

लढाईचे संदर्भ - 'डोमेल ते कारगील' - लेखक मे. जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे.

पुढील भाग : 'फोटू-ला' - श्रीनगर ते लेहच्या सर्वोच्च उंचीवर ... !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरच युद्धाच वर्णन खूपच सुरेख केले आहेस. वाचून अंगावर काटा आला.

सैनिकाच्यामुळे आपले जीवन किती सुरक्षित आहे याची नव्याने जाणीव झाली.

सर्व फोटो पण मस्त आले आहेत.

रोहन... या लेखातील प्रत्येक शब्द आणि प्रचिसाठी... HATS OFF!!!

'कर चले हम फिदा जान और तन साथियों ... अब तुम्हारे हवाले वतन साथीयों...' >>> स्क्रिन धुसर झाली वाचताना

रोहन....

तू ज्या तारखेला हा लेख लिहिला होतास त्या काळात मी इथला सदस्य नव्हतो, पण आज योगायोगाने इतका भावस्पर्शी आणि तितकाच प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटावा अशा वर्णनाचा लेख वाचला आणि जणू काही मीदेखील तुम्हा मित्रांसमवेत त्या भागात असून त्या ज्ञातअज्ञात शूरवीरांचे स्मरण करीत आहे असेच वाटत राहिले.

दोनतीन वेळा वाचूनही ना मन भरले नसल्याने पुन्हा चौथ्यांदा लेख आणि फोटो नजरेखाली घातले.

२६ जुलै......अगदी २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टच्या तुलनेचा हा पवित्र दिवस आहे, म्हणून सेनापतीचा हा धागा पुनःश्च चर्चेला वर आणीत आहे.

अशोक पाटील

आज सोळावा कारगील, "ऑपरेशन विजय दिवस"
या लढाईत शहीद झालेल्या सर्व ज्ञात अज्ञात हिंदुस्थानी जवानानां भावपुर्ण श्रध्दांजली.

भावपूर्ण श्रध्दांजली...

कालच आर्मी जनरल यांनी भारत पुन्हा कारगील सारखी परिस्थिती ओढावून घेणार नाही असे सूचक वक्तव्य केले.

जन गण मन म्हणतांना, ऐकतांना सुद्धा डोळे भरून येणारी मी, हे तुम्ही केलेले वर्णन आणि फोटो बघून काय प्रातिसाद देणार? केवळ अप्रतिम....
त्या सर्व शुरवीरांना विनम्र अभिवादन आणि हा धागा अगदी समयोचित वर आणल्याबद्दल अशोक यांचे आभार.

आज कारगील विजय दिवस.
मातृभुमीसाठी बलिदान देणार्‍या सर्व शहिद जवानांना अभिवादन.

Pages