केरळ डायरी - भाग २

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

भाग १: http://www.maayboli.com/node/22402

महिन्याभरात बरेच फिरायचे होते तरी मुख्य मुक्काम कोट्टयमलाच असणार होता. तिथल्या अनेक इयत्तांच्या विद्यार्थ्यांबरोबर चर्चा व अनेक अौपचारीक व अनौपचारीक टॉक्स. त्यादरम्यान असलेल्या इतर अनेक पाहुण्यांबरोबर गप्पा मारायची पण संधी मीळणार होती. केरळ राज्यसरकारच्या या उपक्रमात (Erudite scheme - Scholar In residence) वर्षभरात अनेक देशी-विदेशी विद्वान येणार होते त्यातील काही मी असतांना पण असणार होते.

महात्मा गांधी विश्वविद्यालयात स्नातकोत्तर व डॉक्टरेटचे विद्यार्थी तर आहेतच पण एक पाच वर्षांचा थेट दहावीनंतर असलेला एक शिक्षणक्रम आहे. या मुलांची पुर्वतयारी कमी, पण नव्या गोष्टी शिकण्याची गती जास्त. मायक्रोसॉफ्ट रिसर्चचे World Wide Telescope नामक सुंदर sky browser आहे. गुगल स्काय प्रमाणेच त्यात आकाशातील विविध भागात भ्रमंती करता येते, पण त्याचबरोबर पॉवरपॉईंट व चित्रफिती या दरम्यानचा टूर नामक प्रकार करता येतो. यात नक्षत्रापासुन एकाच ताऱ्यावर झूम-ईन करणे, आकाशाच्या एका भागापासुन दुसऱ्या भागाकडे चित्रफितीप्रमाणे सरकणे, आवाज व फोटो हवे तिथे वापरता येणे असे अनेक पैलु आहेत. यात ग्रहणे चंद्राच्या अनुशंगाने कशी दाखवायची हे मी त्यांना दाखवत होतो. पाच मिनिटात ज्युनियर्स तरबेज झाले होते व सिनियर्सना शिकवत होते.

त्याच आठवड्यात कोणत्यातरी एका शैक्षणीक महोत्सवामुळे केरळभरातील अनेक आठवीच्या वर्गांमधील दोन-दोन निवडक विद्यार्थी कोट्टयमला आले होते. त्यांच्याशी खगोलशास्त्राविषयी बोलण्याबद्दल मला विचारण्यात आले. 'Catch them young' या आवडत्या तत्वानुसार मी होकार भरला. येथील महाराष्ट्र मंडळाला व नागपुरमधील काही शाळांना दिलेल्या सुर्यमालेचे घटक, दिर्घीकांचे प्रकार, विश्वाच्या पसाऱ्याचा आढावा, भारतीय खगोलशास्त्रज्ञ या गोष्टी अंतर्भुत असलेले टॉक देता येणार होते. त्यातील एक कॅच नंतर समजली - त्यांच्यातील बहुतांशांचे ईग्रजीचे ज्ञान जुजबीच आहे. म्हणजे मला अर्धाच तास मिळणार, व उरलेला अर्धा कोणीतरी मल्लु भाषांतर (पुन्हा!) करणार त्यात जाणार. कधिकधि भाषणाचा विस्तार करणे सोपे असते - पण द्यायचा तो संदेश शाबुत ठेऊन ५० टक्के मटेरीयल गाळणे सहजी जमत नाही. बराच प्रयत्न करुन बसवले व ते सफलही झाल्याचे नंतर कळले. निदान प्रकाश प्रदुषण कसे टाळता येईल व खगोलशास्त्रात इतर कोणकोणत्या व्यवसायातील लोक काम करु शकतात (व कोणते) हे जरी सर्वांना कळले असेल तरी उत्तम. या मुलांनीच सर्वात जास्त प्रश्न विचारले. गम्मत म्हणजे प्रश्न ईंग्रजीत होते (चिठ्ठ्या) त्यामुळे तिथे भाषांतराचा प्रश्न आला नाही. मला अमेरीकन अॅक्सेंट मुळीच नाही, पण माझा महाराष्ट्रीयन अॅक्सेंट त्यांना कळणे कठीण जाते असे मला सांगण्यात आले. त्याचबरोबर शक्य तेवढे साधेवरण-भात ईंग्रजी (स्लॅंग्स व ईडियम्स नसलेले) वापरलेले बरे असेही सांगण्यात आले.

आठवड्यातील पाचपैकी चार दिवस टॉक्स होते. पाचव्या दिवशी अचानक साडेतीन वाजता सांगण्यात आले की स्मार्ट क्लासरुमच्या उद्घाटनाकरता केरळचे शिक्षणमंत्री येताहेत व सध्या हजर असलेल्या आम्हा तिन्ही Erudites ना त्यांच्याबरोबर स्टेज भूषवायचे आहे. आता आली पंचाईत. आज टॉक द्यायचे नाही म्हणुन साध्या टीशर्ट वर होतो. खोलीवर जाऊन कपडे बदलायला देखिल वेळ नव्हता. इथे केरळची परंपरा मदतीला आली - मंत्र्यांचा शासकीय पेहराव शर्ट व मुन्डु आहे. मंत्री जर लुंगीत स्टेजवर येऊ शकतात तर मला टी-शर्टमध्ये यायला काहीच हरकत नाही. सर हेरॉल्ड वॉल्टर क्रोटो त्यांच्या नास्तीकते करता प्रसिद्धच आहेत पण पहिल्यांदाच एका मंत्र्याला खुलेआम नास्तीकतेच्या बाजुने बोलतांना ऐकले. एम. ए. बेबी अतिशय पुरोगामी आहेत व अनेक विषयांवरील त्यांचे पांडीत्य जवळुन न्याहाळता आले. कार्यक्रमानंतरही थोड्याफार गप्पा झाल्या व नंतर पुन्हा सुरु झालेल्या पावसात मी खोलीवर परतलो.

KeralaPhoto.jpg

(1) http://www.worldwidetelescope.org
(2) http://www.hindu.com/2011/01/06/stories/2011010661260300.htm
---------------------------------------------------------
भाग ३: http://www.maayboli.com/node/25476
मधले भाग अजुन तयार नाहीत
भाग ७: http://www.maayboli.com/node/23569
भाग ८: http://www.maayboli.com/node/23702
भाग ९: http://www.maayboli.com/node/23781

विषय: