मकिंडो गुरुद्वारा, रिफ्ट व्हॅली आणि पावसाचा पाठलाग वगैरे

Submitted by दिनेश. on 23 April, 2011 - 16:13

केनयामधे ब्रिटीशांनी एक महत्वाकांक्षी रेल्वेलाईनीचा प्रकल्प पूर्ण केला. मोंबासा-नैरोबी-किसूमु ते पुढे लेक व्हिक्टोरिया मार्गे युगांडा पर्यंत हि रेल्वेलाईन जाते. अजूनही ती चालू आहे, पण तिचा केनयाच्या अर्थव्यवस्थेतील हाअभार नगण्य आहे.
या प्रकल्पासाठी भारतातून मजूर नेण्यात आले होते. त्यात बरेच गुजराथी आणि पंजाबी शिख होते. या दोन्ही समाजातले लोक मग इथेच स्थायिक झाले. आणि आज इथे जी भारतीय संस्कृती नांदताना दिसते त्याचे श्रेय या दोन्ही समाजांना आहे.
इथली देवळे आणि गुरुद्वारा, भव्य आणि प्रेक्षणीय आहेत. अश्याच एका गुरुद्वाराला मी आज भेट दिली.
नैरोबी मोंबासा रोडवर, नैरोबीपासून १७० किमी वर मकिंडो नावाचे गाव आहे आणि तिथे हमरस्त्यावरच हा गुरुद्वारा आहे. खूपच विस्तीर्ण आवार आहे.

गुरुद्वारा, दरबार, तर आहेतच पण रहायची देखील उत्तम सोय आहे. हॉस्पिटल आहे. विस्तीर्ण आवारात मोकळे फिरणारे मोर. पेरू, बोरे, आंबा, जांभूळ, पपई, लिंबू यांची नीट जोपासलेली झाडे, मूलांसाठी खेळायची साधने सगळे आहे.

जाताना अथी रिव्हर ओलांडली कि आपण रिफ्ट व्हॅलीत प्रवेश करतो. दोन्ही बाजूला विस्तीर्ण गवताळ प्रदेश. मधूनच दिसणारे खास आकाराचे डोंगर. यातून हा प्रवास होतो.
गेल्या गेल्या गुरुद्वारात माथा टेकला, तर तिथे कडा प्रसाद मिळाला. मग नाश्ता करायला गेलो. पुरी, माखी दाल, बटाटा भाजी, मठरी, लोणचे असा भरगच्च नाश्या. व सोबत चहा. मग सगळे आवार आम्हाला मोकळेच. पेरु, बोरे असले प्रकार माझ्या तावडीतून सुटणे अशक्य. अनेकवेळा चकरा मारुन, तिथले प्रत्येक झाड मी निरखून घेतले.

थोड्या वेळाने जेवणाची वेळ झाली. जेवणात रोट्या, सूजी हलवा, भात, डाळ, कारल्याची भाजी, बटाट्याची भाजी, बुंदी रायता, फ्रूट सलाद, अनेक प्रकारची लोणची, ताक अशी रेलचेल होती. आग्रह करकरुन वाढ होते पण कुणी ताटात काही टाकू नये, असा कटाक्षही होता. त्या लंगरमधली व्यवस्था एखाद्या तारांकीत हॉटेलच्या तोडीची होती. बहुतेक कामं स्वयंसेवकच करत ह्ते पण स्थानिक माणसेही होती. इथे अनेक देवळात / गुरुद्वारात ही माणसे मन लावून सेवा करताना दिसतात.

भरपेट जेवल्यावर आम्ही लॉनवरच ताणून दिली. तसा हवेत उष्मा नव्हता, पण नैरोबीमधली थंड हवा अंगवळणी पडल्याने, आम्हाला जरा गरम वाटत होते. तरी दुपारचा चहा घेऊन आम्ही निघालोच.
त्या गुरुद्वाराच्या बाहेरच स्थानिक भाजी मार्केट होते. तशी नैरोबीच्या सिटी मार्केटमधे ताज्या भाज्यांची रेलचेल असते, तरी पण मला तिथे शिरायचा मोह आवरला नाहीच. उगाचच बरीच खरेदी केली.

दुपारनंतर या व्हॅलीत वादळी पाऊस पडतो. असाच एक दूरवर पडणारा पाऊस टिपता आला.
आम्ही त्याच्या तडाख्यातून तिथे बचावलो, पण घरी आल्यावर मात्र तो पडलाच.

तर ही चित्रझलक..

१) ही सुरवात. विस्तीर्ण गवताळ प्रदेश, दूरवर डोंगर आणि ढग.

२) हे आमचं ड्यूक्स नोज बरं का. याला पाहून माझ्या मनात आले, जर गिरिराज माझ्याबरोबर असता आणि माझं वय (शारिरीक) जरा कमी असतं, तर आम्ही एकमेकांना या डोंगरावर चलायचा नक्कीच आग्रह केला असता.

३) हा कधीकाळी ज्वालामुखी असणार, आता सगळीच टोकं झिजलेली दिसताहेत. पण आकार मजेदार आहे नाही ?

४) हा फोटो बघून तूम्हाला इथल्या टोपोग्राफीची नीट कल्पना येईल

५) हे आहे गुरुद्वारा

६) हे तिथले हॉस्पिटल

७) हे तिथले विस्तीर्ण आवार, त्यामागे राहण्यासाठीची घरे.

८) तिथल्या लंगरमधे चहाचा स्वाद घेताना मी

९) तिथे मुक्त वावरणारे मोर

१०) सध्या त्या परिसरात या फूलांची चलती आहे. सगळीकडे हिच दिसत होती. फोटोत गोखरू पण आहे

११) इथे बिटकीची फूले आपल्याकडच्या पेक्षा जरा जास्त उमलतात, मोठीही असतात.

१२) तसेच आपल्याकडे कण्हेरीच्या शेंगा क्वचितच दिसतात, इथे मात्र खूप दिसतात.

१३) इथल्या लोकजीवनात मानाचे स्थान असलेला बाओबाब किंवा सेतूर. आपल्याकडे याला गोरखचिंच म्हणतात. याच्या फळाचा गर खाद्य तर असतोच, पण पाण्याचे दुर्भिक्ष झाल्यास, याच्या खोडातून भरपूर पाणी मिळू शकते.

१४) आणि आता पावसाचा पाठलाग

१५) जरा जवळून

१६) आता अंगावरच आला की !

१७ ) पण नाही, परत सगळे निरभ्र...

यातले अनेक फोटो, चालत्या गाडीतून काढले आहेत. तेव्हा..

गुलमोहर: 

मस्त फोटो आणि माहिती Happy
भारतातल्या गुरुद्वारांपेक्षा हा गुरुद्वारा जरा वेगळाच वाटला. नेहमीचा पांढरा रंग दिसला नाही.

भारतातल्या गुरुद्वारांपेक्षा हा गुरुद्वारा जरा वेगळाच वाटला. नेहमीचा पांढरा रंग दिसला नाही. >> आशुतोष०७११, परदेशातील बहुतेक हिंदू धर्मिय देउळ, मंदीरे वा इतर धार्मिक स्थळे यांची रचना 'बंगलो' टाइप असतात. बाहेरुन वाटतं कुणाचे तरी घर, कॉटेज वगैरे असावे.

श्री, हॉस्पिटलसमोर त्यांचेच बेडशीट्स वगैरे वाळत घातले होते.

आशुतोष,चातक, इथल्या जून्या देवळाबाबत हे खरे आहे. नव्याने बांधलेल्या देवळांना मात्र असे बचावात्मक बांधकाम करायची गरज वाटत नाही. कारण तशी इथे कुठलीच बंधने नाहीत. इथली काही देवळे भारतातील, सोमनाथ मंदिर आदिंच्या प्रतिकृति आहेत.
बाकी गुरुद्वाराचा स्तंभ मात्र बराच उंच आहे, आणि लांबूनही तो दिसतो.

व्व.. मस्त आलेत फोटो. पावसाचा तर अप्रतिम!! खूप शांत वातावरण दिसतंय..
मागे केंव्हातरी बाओबाब चा फोटू पाठवला होता ना तुम्हाला>.. त्यापेक्षा हा जर्रासा बुटका दिस्तोय.

वर्षू, हा बाओबाब अजून लहान आहे, वाढेल !!
आणि पहिल्यांदा जेव्हा हे पावसाचे दृष्य बघितले त्यावेळी डोळ्यावर विश्वासच बसला नाही, कि असा एकाच जागी नेम धरुन पाऊस पडत असेल यावर !

अच्छा..म्हणून लहानसा वाटला Happy
पाऊस तर अमेझिंग आहे..
पनामाला पाहिला होता असा पाऊस.. आपण गाडीत आहोत आणी दूर समोर धो धो सरी कोसळतायेत वेड्यासारख्या.. आपण त्या जागी पोचलो तर चक्क ऊन .. रस्ते मात्र ओले गच्च..

आपण गाडीत आहोत आणी दूर समोर धो धो सरी कोसळतायेत वेड्यासारख्या.. >>>दिनेशदा, निलतै, इथे वाळवंटात, एखाद्या उंच ३०-४० मजली इमरतिच्या गच्चीवरुन कोणत्या तरी दिशेत 'दुरवर वाळवंटात' असा पाउस फेब्-एप्रिलमध्ये (महीन्यातल्या एखाद दिवशीच नंतर पाउसच नसतो वर्षभर) पहायला मिळतो. आठवड्याभरा पुर्विच मी पाहीला Happy

दिनेशदा,
सगळे फोटो आवडले !

जर गिरिराज माझ्याबरोबर असता आणि माझं >> गिरिराज कोण हे नाही कळालं ?
तिकडे पाऊस असा अचानक येतो आणि जातो पण ....काय वेगली मजा येत असेल ना !
Happy

नं ४ फोटो बघायला सही वाटतोय. तिथेही पावसाळा असा वेगळा सिझन असतो का? या फोटोंत सगळेच हिरवे दिसतेय. नॅट जिओ, अ‍ॅनिमल प्लॅनेट वर इतकी हिरवीगार कुरणे बघितल्याचे आठवत नाहीये कधी.

सह्ही वर्णन आणि फोटो Happy

मलापण ४ नंबर फोटो जास्त आवडला. Happy

काही दिवस तुमच्या बरोबर राहुन भटकण्याचा मोह होत आहे>>>>>अगदी अगदी Happy

या कि सगळ्यांनी भटकायला.
चातक मस्कतमधला पाऊस मी बघितलाय, पण असा उंचावरुन नाही बघायला मिळाला.
HH,
इथे थिअरीमधे तरी वेगळा पावसाळा असतो, पण तसे अनुभवायला काही येत नाही. कधी म्हणजे कधीही पाऊस पडतो. आणि एक पाऊस झाला को दोन दिवसात हे गवत हिरवे होते. परत काहि दिवस कोरडे गेले कि परत सगळे सुकून जाते.
इथेच मसाई लोक त्यांची गुरे जोपासतात. त्यांना दूरवरून येणारा पाऊस किंवा जनावर अगदी अचूक ओळखता येते.
यापैकी खूपसा भाग जंगलाखालीच आहे. पण जिथे चहा, बटाटा, कॉफी, भाजीपाला, (कोबी जास्तकरुन)
,तांदूळ, ऊस, पायरेथ्रम आणि गुलाब अशी पिके घेतात तो भाग मात्र कायम हिरवागार असतो. हा भाग साधारण नैरोबीच्या पश्चिमेला येतो.
वाढलेल्या गवतात जनावर दिसत नाही, म्हणून शुटींग करताना जरासे वाळलेलेच गवत असेल असा भूभाग निवडत असावेत. पण आऊट ऑफ आफ्रिका सारख्या जून्या चित्रपटात असा भाग दिसतो. या भागातून जी रेल्वे जाते, तिच्यापासूनच हा चित्रपट सुरु होतो.

गिरीराज म्हणजे एक जूना मायबोलीकर .त्याच्याबरोबर मी भन्नाट भटकलोय.

वा! दिनेशदा, सुंदर सफर घडवलीत.
शिवाय वाहे गुरूदा लंगरचे सुरेख वर्णन.

एकूण सर्व परिसरच सुंदर, स्वच्छ आणि पवित्र वाटला.
तो परिसर आणि त्याचे वर्णन दोन्हीही आवडले.

सुरेख. असा ढगातून पडणारा पाऊस खरच मस्त वाटतो. तुमचा चहाचा फोटोही मस्त आलाय. Happy

>>>>> यातले अनेक फोटो, चालत्या गाडीतून काढले आहेत. तेव्हा.. >>>> मस्त येतात फोटो. मीसुध्दा GBB टेक्नॉलॉजी वापरून(च) फोटो काढते. त्यात जरा आणखी इंप्रोव्हायझेशन करायचे तर K3 टेक्नॉलॉजीही वापरायची. अतिशय उत्तम फोटो येतात.

GBB : गाडीत बसल्या बसल्या
K3 : काचा खाली करून
Proud

मामी अगदी अगदी, तूझीच आठवण काढली होती. पण काचा खाली पण नाही करता येत इथे. भन्नाट वारा असतो. फक्त १७ वा तसा काढलाय.
चहाच्या फोटोबद्दल, फेसबुक वर माझ्या मित्राने भन्नाट कॉमेंट केलीय !

Pages