ग्लुवाईन (Glühwein)

Submitted by रूनी पॉटर on 5 January, 2009 - 16:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ग्लुवाईन हे जर्मनी आणि ऑस्ट्रीयात नाताळच्या सुट्टीत केले जाणारे पेय. गावागावात लागलेल्या प्रत्येक ख्रिसमस मार्केटमध्ये हे मिळते. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे गरम असतांनाच प्यायला देतात (आपल्या चहासारखे) त्यामुळे कडाक्याच्या थंडीत सगळीकडे खरेदीसाठी भटकल्यावर ख्रिसमस मार्केटमध्ये वाफाळती ग्लुवाईन पिण्याची मजा काही औरच. याला after-ski drink असे पण म्हणतात. Happy

३/४ कप पाणी
३/४ कप साखर
२ सिनेमन (दालचिनी)च्या काड्या
१ संत्र
१० लवंगा
१ (७५० मिली) रेड वाईनची बाटली

क्रमवार पाककृती: 

१. गॅसवर एका जाड बुडाच्या पातेल्यात पाणी, साखर आणि दालचिनी टाकुन मिश्रणाला एक उकळी येवु द्या, त्यानंतर मंद गॅस वर मिश्रण ५ मि. तापत ठेवा (simmer - याला मराठीत काय म्हणतात ते मला आठवत नाहीये)

२. त्यानंतर संत्र्याचे २ तुकडे करुन त्यातला रस या मिश्रणात टाका आणि सालींना सगळ्या लवंगा टोचुन त्या सालीपण या भांड्यात टाका. हे मिश्रण मंद गॅसवर साधारण ३०-३५ मि. शिजू द्या. याचा घट्टसर पाक व्हायला हवा.

३. ह्यानंतर यात संपूर्ण वाईन ओता, मिश्रण गरम व्हायला हवे पण वाईन उकळु देवू नये (simmer). त्यामुळे वाफा यायला लागल्या की गॅस वरुन खाली उतरवायचे आणि लवंगांसह संत्र्याच्या साली काढुन टाकायच्या.

४. गरम गरम सगळ्यांना प्यायला द्या.

वाढणी/प्रमाण: 
४-६ जण किंवा प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे
अधिक टिपा: 

१. पारंपारीक जर्मन पद्धतीत यात संत्र्यासोबत लिंबू पण टाकलेले मी बघीतलय आणि त्यांची ग्लुवाईन करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे पण घरी करण्यासाठी मला त्यातल्या त्यात हीच सोपी पद्धत सापडली. पारंपारीक पद्धतीत ते भांड्यावर एक छिद्र असलेली स्टीलची पट्टी ठेवतात, त्यावर साखरेची ढेप (खास या प्रकारासाठी गुळाच्या ढेपेसारखी साखरेची ढेप बाजारात मिळते) त्यावर थोडी रम किंवा व्हिस्की टाकुन पेटवुन ठेवतात, मग हळु हळु ती साखर वितळुन पट्टीच्या छिद्रातुन खालच्या गॅसवर ठेवलेल्या भांड्यात पडते.
स्कॅन्डेनेव्हीयन देशात पण अश्याच पद्धतीची वाईन बनवतात त्यात ते किसमिस, वॅनीला, बदाम पण टाकतात पण मी ते कधी करुन बघीतले नाही.

२. सुरुवातीच्या क्र. १ च्या कृतीसाठी काही लोक ३/४ कप पाण्याऐवजी तेवढाच संत्र्याचा रस वापरतात.

३. ज्या काचेच्या कपात/ग्लासात वाईन द्यायची आहे ते एकदा गरम पाण्यातुन काढुन घ्या, काचेच्या थंड ग्लासात गरम वाईन ओतली तर काचेला तडा जावू शकतो.

३. यावेळी ख्रिसमस पार्टीसाठी हा प्रकार केला होता. एरवी कधीही वाईन न घेणारे लोकपण आवडीने ही वाईन घेतात, ही वाईन चवीला गोड लागते, त्यात गरम असते त्यामुळे लवकर चढते तेव्हा सांभाळून. ही वाईन घेतल्यावर काही झाल्यास (किंवा काहीच न झाल्यास) मी जबाबदार नाही :).

माहितीचा स्रोत: 
जर्मन मित्र आणि नेटवर बर्‍याच ठिकाणी वाचुन.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, रूनी ! धन्यवाद.. आत्ताच कुठेसं नाताळनिमित्त जर्मनी मधे वगैरे ग्लुवाईन पितात असा उल्लेख वाचला.. ग्लुवाईन नावानेच उत्सुकता चाळवली गेली.. आणि रेसीपी हाजिर.. सहीच वाटलं...
जमलं तर नक्की करून पाहीन, व सांगेन तुला...

रुनी.. जले पे नमक अगदी माझ्या..! Sad
मला ही वाईन जबरदस्त आवडते आणि फ्रांसमध्ये असताना अनेक वेळा घरी आणि ख्रिसमस मार्केट मध्ये मनसोक्त प्यायली आहे. एकदम आठवण आणून दिलीस त्या दिवसांची.. माझी एक रुममेट ऑस्ट्रियन होती आणि ती खूप प्रेमाने ही वाईन बनवत असे. एका रात्री हाच प्रकार माझ्या रशियन रुममेटने केला.. किती प्यायला ते तीच किंवा देवच जाणे.. पण दुसर्‍या दिवशी सकाळी मी उठून चहा करायला गेले तेव्हा hotplate high वर चालू होती आणि वरच्या non-stick मधली वाईन पार तळाला जाऊन फक्त मसाले त्यात दिसत होते.. घरभर एक उग्र वास पसरलेला होता आणि रुममेटही मी अर्धा दिवस कामाला जाऊन येई पर्यंत बिछान्यातच होती..
तर असो सांगायचे हे की ह्या वाईन ला Vin brule (जळलेली/उकळलेली ) किंवा Vin chaud {गरम वाईन} असेही म्हणतात फ्रेंच मध्ये.. कदाचित त्या व्हिस्की/रम घालून जाळण्याच्या प्रकारामुळे ते नाव आलेही असेल.. हम्म्म तर माझी मैत्रीण त्यात ऑरेंज ज्युस घालायची.. बाकी कृती हीच..

धन्यवाद .... रेसिपी नोटेड Happy चव घेतल्यावर पुढची प्रतिक्रिया Happy

आता इथे चवीचे काय महत्व? पण प्रतिक्रिया लिहायचीच तर घेतल्याच्या दुसर्‍या दिवशी लिही! Light 1

रुनी, छान आहे रेसिपी. यावरुन एक कुठेतरी वाचलेली आठवली मला. वाईन, मध, दालचिनी आणि फळांचा स्ट्यू. apricot, prunes किंवा पीच, चेरी अशी फळं घालून oven किंवा स्टोव्हवर फळं मऊ होईपर्यंत मंद आचेवर गरम करायचे. थंड करुन फ्रिजमध्ये टिकते काही दिवस. टॉपिंग म्हणून वापरतात. ब्रेकफास्टला पॅनकेक, ओटमील, फ्रेंच टोस्ट वरही घालता येते सकाळी सकाळी. Happy

रुनी , माझं वाईन या विषयावरच ज्ञान खूपच कमी आहे अन त्यात वाचनात हे आलं

05012009313.jpg

सॉरी हे इथं टाकतोय पण हे कितपत खर आहे ? तुम्ही जाणकार मंडळी सांगू शकाल काही त्याबद्दल म्हणून हा प्रपंच !

वाईन पीण्यापूर्वी लोक इतका विचार करतात का? Proud
म्हणजे, ती इतकी चांगली आहे म्हणून प्यावी यापेक्षा, जेवणापूर्वी किंवा समारंभात ज्याला सोशल ड्रिंकिंग म्हणतात तिथे रिवाज म्हणून, आवडते म्हणून प्यायली जात असावी.

दीपुर्झा, भारतामध्ये वाईनरी या नव्यानेच सुरू झाल्या आहेत. पुण्यामध्ये तर वाईन फेस्टीव्हलही झाला होता, ही त्यातली जाहिरात आहे असे वाट्टेय Happy
------------------------------------------
A good listener is not only popular everywhere, but after a while he knows something.