काठावरून निरखलेला कामाठीपुरा

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

दचकायला होत ना? एक मध्यमवर्गीय घरातल्या व्यक्तीकडून, त्यातल्या त्यात स्त्रीकडून/ मुलीकडून हा शब्द ऐकला तरी आजूबाजूच्या भुवया लगेच उंचावतात!! या शब्दाचा उच्चार करण म्हणजे देखील पाप जणू.... तुमच्या आमच्या मध्यमवर्गीय आयुष्यात या शब्दाला जागा नसते, जणू काही हे जग अस्तित्वातच नसत आपल्यासाठी. तर, अश्याच मध्यमवर्गीय गर्दीतली आणि बर्‍यापैकी तशीच मानसिकता असलेली मी एक. मुंबईमधेच, कामाठीपुरा म्हणून एक भाग, वसाहत आहे हेच मला माहीत नव्हत. याबाबत मी पूर्ण अनभिज्ञ होते, आणि मग एके दिवशी अचानक कामाठीपुरा माझ्यासमोर उलगडला.... उलगडला कसला, अंगावरच आला एकदम...

काही वर्षांपूर्वी, काही वैयक्तिक कामांसाठी, काही महिने तरी मुंबईमधे फ़ोर्टला सतत भेट द्यावी लागणार, हे स्पष्ट झाल आणि पोटात पहिला गोळा तिथेच आला! मुंबईच्या अफ़ाट बिनचेहर्‍याच्या गर्दीची मला नेहमीच धास्ती वाटते, सहनच होत नाही ती गर्दी मला. नेहमीच धावत पळत असणारी माणस बघूनच मला गुदमरायला होत आणि आता त्याच गर्दीचा एक नगण्य भाग बनून मला त्यांच्यामधेच वावरायच होत. एक बर होत की रोजची कसरत असणार नव्हती. मधून मधून सलग, पुण्यात परतायला पण मिळणार होत आणि मुंबईच्या मानाने निवांत अस आयुष्य पण जगायला मिळणार होत. तेवढच बर वाटायच. सात समुद्रापार जाऊन देखील पुण्याची ओढ आणि थोडाफार पुणेरीपणा काही सुटत नाही!! मानाची बिरूद मिरवायला कोणाला आवडत नाही म्हणा!!

म्हणता, म्हणता, मुंबईलाही आपल म्हणायचे दिवस उजाडले आणि, मनात बरीच धाकधूक घेऊन, मी मुंबईत पोहोचले.

नशिबाने, मुंबईमधे नातेवाईक आहेत. मी मावशीकडेच राहणार होते. तिच्या घरापासून लोकल स्टेशन आणि बेस्टचा डेपो, जवळच आहेत. एक दिवस सोबत बरोबर घेऊन , लोकलची आणि पर्यायाने लोकांची गडबड, धांदल बघूनच लक्षात आले की हे काही आपल्याला झेपणारे नाही, आपल्यासाठी बसच बरी. मी बसच्या पहिल्या स्टॉपलाच चढणार होते, त्यामुळे गर्दी वगैरेची चिंता नव्हती, गंतव्य स्थानाच्या बर्‍यापैकी दारातच उतरू शकले असते, त्यामुले ती ही चिंता राहिली नव्हती. मुंबईमधे जर आधी कधीच वावरला नसाल आणि एकदम असे फ़िरायला लागले, तर मी काय म्हणते आहे ते लक्षात येईल, निदान मला तरी सुरुवातीला खूपच गोंधळल्यासारखे वाटत असे. तर पहिले दोन तीन दिवस मामाने बरोबर यायचे ठरवले. त्याच्या बरोबर गप्पांमधे प्रवासात वेळ कसा जायचा समजत नसे, बाहेरची गर्दी, रस्ता, कशाकडेच फ़ारसे लक्ष न देता, आम्ही खूप गप्पा मारत असू. बरे, तो बरोबर असल्याने मी ही निर्धास्त.

मग, दोन तीन दिवसांनी मी एकटेच जायचे ठरवले, रोज रोज मामाला तरी कुठे जमणार होते माझ्या बरोबर यायला? त्यालाही त्याचे घड्याळाच्या काट्यांवर पळणारे आयुष्य होतेच की. आता इतका आत्मविश्वास नक्कीच आला होता, कि एकटी जाऊ येऊ शकेन, आणि बरोबर घरच्यांचा फ़ोन नंबर होताच. पुस्तक पण घेतले होते वाचायला बरोबर. पुस्तक घेऊन गेले की कुठला ही प्रवास कंटाळवाणा होत नाही, त्यामुळे प्रवासात एक वेळ तिकिट विसरेन, पण पुस्तक नाही!! पहिले तीन चार दिवस, बसमधे चढून एकदा तिकीट काढल की मी पुस्तकात डोके खूपसून वाचत बसत असे. साधारण फ़ोर्टचा भाग लागला, की कंडक्टर ओरडून सांगतच असे, त्यामुळे तशी काळजी नसे. आणि एक दिवस असच वाचत बसलेले असताना, बसच्या बाहेर खूप गलका ऐकयला आला अन, वाचनाच्या तंद्रीतून एकदम जागी झाले.

पहाते तो काय, समोरचा माहौल इतका वेगळा होता... साधारण मध्यमवर्गीय किंवा अतिशय उच्चभ्रू वातावरणापेक्षा अतिशय वेगळ, भसकन अंगावर येईल अस वातावरण वाटल मला ते त्या वेळी.

पहिली पाच दहा मिनिट केवळ अवाक होऊन बसच्या खिडकीतून बाहेर बघण्यातच गेली!! आणि एकदम लक्षात आल, ही वेश्या वस्ती!! तेवढयात पाटीही दिसली लहानशी, कामाठीपुरा. बस, येवढच लिहिलेल. कदाचित, ज्यांना इथे यायची गरज पडते, त्यांच्या साठी पुरेस असाव तेवढच. बस वेश्या वस्तीतून जाते आहे, लक्षात आल, आणि उगीचच माझच मन कसनुस झाल! म्हणजे रोज बस इथून जात होती?? आणि आपल्या काहीच नाही लक्षात आल?? मला खरच वाटेना.... नंतर किती तरी वेळ माझ्या मनातून ते वातावरण पुसलच जात नव्हत. विदारक हा शब्द ऐकला होता, पण विदारक शब्दाचा अर्थ त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिला. अतिशय सुन्न करून टाकणारा असा तो अनुभव होता....

तेह्वासुध्द्धा, पाहताक्षणी जाणवल, ते अतिशय भकास वातावरण, आणि तसेच उदास चेहरे. रस्त्यातली वर्दळही तशीच. कोणाची दखल न घेता, अलिप्त आणि मख्ख देहबोली घेऊन जगणारी, आपल्या आपल्या आयुष्याचे भार सांभाळणारी अन ओढणारी, दैन्य पांघरलेली गर्दी. अन त्यानंतर बसच्या बाहेर पहायच धाडस उरलच नाही त्या दिवशी. परत एकदा मी पुस्तकात डोक खुपसल आणि तशीच बसून राहिले. फ़ोर्ट आल, तस कंडक्टरने ओरडून सूचना दिली अन, मी तंद्रीतून जागी झाले!! इतका वेळ मी एकाच पानावर डोळे खिळवून बसले होते? लक्षातच नाही आल! एक प्रकारचा सुन्नपणा मला वेढून राहिला होता.... त्यातल्यात्यात एवढेच बरे होते, की परत जाताना मी जी बस घेत होते, ती कामाठी पुर्‍यातून जात नसे. कदाचित दुसरी बस मिळत असावी. माझा शेवटचा थांबा असल्याने, त्या थांब्याच्या नावाचा फ़लक बसवर लावलेला दिसला की मी जास्त विचार न करता बसमधे चढत असे!! काम संपवून घरी पोचले तरी, डोक्यातून विषय जात नव्हता... उद्या परत बस तिथूनच जाणार हे जाणवून उगाचच एक दडपण आले होते मनावर.

... आणि परत एकदा, दुसर्‍या दिवशी मी त्याच बसमधे चढले. आज पहिल्यांदाच मी बसमधे वाचत नव्हते. परत एकदा बस कामाठी पुर्‍याच्या रस्त्याला लागली, पण आज मी सारे पाहणार होते.. मनात थोडी भीती, थोडी जिज्ञासा, कुतूहल... हळू हळू नजर एकेक तपशील टिपत गेली... गलिच्छ रस्ता, ठिकठिकाणी फ़ेकलेला कचरा, सांडपाणी, त्यातच खाण्याच्या पदार्थाचे ठेले मांडलेले विक्रेते, चहावाले, इतर दुकाने, विक्रेते, दुकानातली गिर्‍हाईके. मला सगळयात आश्चर्य वाटत होते ते म्हणजे त्यांच्या तिथल्या सराईत वावरण्याचे. अर्थात, त्यांच्या साठी ते रोजचेच जगणे होते, अन रोज मरे त्याला कोण रडे, असेच होत असावे त्यांचे.

रोज सकाळच्या वेळी तिथल्या, देह विक्रयाचा व्यवसाय करणार्‍या स्त्रिया, रस्त्यावर किंवा त्यांच्या खोल्यांच्या दारांत बसलेल्या असायच्या. काही एकमेकींशी बोलत असायच्या, काही जणी उगाच थकून भागून बसलेल्या. सगळे काही स्वीकारल्या सारख्या. तर काही उगाच कुठे तरी भकास नजरेने पहात हरवलेल्या.. सार्‍याच थकलेल्या, भागलेल्या.. आणि काही आक्रस्ताळेपणे झगडताना दिसायच्या. नक्की कोणाशी भांडत असायच्या कोण जाणे? समोरच्या व्यक्तीशी? नशीबाशी? नियतीशी? दैवाशी?? की देवाशी?? या स्त्रियांना बघणे, त्यांच निरीक्षण करणे हा एक कडवट अनुभव होता माझ्यासाठी. का म्हणून यांच्या नशिबात हे दान पडल होत?

इथे येताना कितीजणींना आपण कुठे आणि का चाललोय ते माहीत असेल? अजाणत्या वयात काय अनुभव घेतले असतील? मनावर ओरखडे उठले असतीलच ना? नक्कीच.. आणि मग कदाचित एक दिवस सार काही मनाविरुद्ध अंगवळणी पडल असेल, पाडून घ्याव लागल असेल.. काहींनी कळत्या वयात, नाइलाज म्हणून हे अग्निदिव्य स्वीकारल असेल, घरच्यांवर मायेची पाखर घालण्यासाठी स्वत: अंतर्बाह्य जळत असतील, आणि ही पाखर घालतानाही आपल अस्तित्व दृष्टीआड ठेवून. घरचे लोकही कदाचित दृष्टीआड सृष्टी म्हणत असतील का?? कधीकधी माणसाचे नाइलाज किती पराकोटीचे असू शकतात..... सारच अर्तक्य! काहींची स्वप्नं चुरगाळली गेली असतील, ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकावी अश्याच कोणी नवर्‍याने, प्रियकराने, भावाने, नात्यातल्या काका, मामानेच या लेकी बाळींना इथे आणून इथल्या गिधाडंपुढे फेकून दिल असेल! या लेकी बाळी ही कधी काळी निरागसपणे कुठे तरी, आपापल्या घरच्या अंगणात बागडल्या असतील, काहींनी परकराच्या ओच्यात फुल, पान जमवली असतील, काहींनी भातुकलीचे संसार मांडले असतील, सख्यांबरोबर साईसुट्यो खेळल्या असतील.. घरच अठरा विश्व दारिद्र्य आणि झोपडीतला अंधार देखील यांच्या स्वच्छ हसण्याने उजळून निघाला असेल..... आज तस हसू फ़ुलेल कधी यांच्या चेहर्‍यावर? आयुष्यात परत या स्त्रियांचा कधी, कोणावर विश्वास बसेल??

आणि रस्त्यालगतच बागडणारी या माउल्यांची लहान मुल?? त्यांच्या आठवणी आजही मला अस्वस्थ करतात!! त्या निरागस, निर्व्याज लहानग्यांना रस्त्यावर अजाणता बागडताना पाहून खर तर मला उदास, अस्वस्थ व्हायला झाल….. काय भविष्य आहे यांच, हा प्रश्न सतत मनत आल्याशिवाय राहिला नाही… यातल्या मुली असतील, त्यांच हे हसू असच कायम राहील?? का आसूंत बदलेल? या मुलांच निरागस मन निब्बर व्हायला किती लवकर सुरुवात होत असेल! त्यांना देखील याच खातेर्‍यात उडी घ्यावी लागणार आहे का? काय वाटत असेल तिथे व्यवसाय करणार्‍या आईला, लेक पोटी आली म्हणून? काय विचार करत असतील ह्या आया आपल्या लेकरांच्या भवितव्याचा? असा काही विचार करायची मुभा नियती देत असेल त्यांना ?? सगळीच परिस्थिती, दाटला अंधार अशी.....

तिथल्या ह्या स्त्रियांच्या खोल्यांकडे बघवत नव्हतं, मोठया मोठया खिडक्या असणार्‍या काडेपेट्यांसारख्या, तितकीच लांबी, रुंदी असलेल्या ह्या खोल्या पाहून, कबुतरांची खुराडी सुद्धा बरी अस वाटल्या वाचून राहिल नाही. रात्रीच्या वेळेस, ह्याच काडेपेट्यांचे विलास महाल बनतात? तेव्हा, या विलास महालातली औट घटकेची रातराणी, आपल्या कच्च्या बच्च्यांना कुठे आसरा देत असेल? कोणा महाभागाची औट घटकेची सोबत करताना, तिच्या मनात काय येत असेल? मन कस आणि किती आक्रंदत असेल? असे किती मातांचे, नवतरुणींचे, अबोध बालिकांचे आक्रोश या भिंतींनी पाहिले असतील? पचवू शकल्या असतील? सकाळच्या वेळेस, या खोल्यांच्या भिंती अगदी भकास वाटायच्या, जणू काही या बायकांच्या मनातल्या मूक आक्रोशाच्या साक्षीदार होता होता, जगायच विसरून गेल्यासारख्या. सार्‍या वातावरणातच एक मृतप्राय कळा, एक उदासवाणा, अलिप्त भाव. जणू माणूसकीची जिती जागती कबर.

उगाचच एक वाक्य आठवल होत तेह्वा. स्त्री ही क्षणकालची पत्नी अन अनंतकालची माता असते.... किती वेगळ्या अर्थाने ते वाक्य तिथे साकार झाल होत!

.... अजून एक विरोधाभास पाहिला अन खूप जाणवलाही.

एक रेणुकामातेच देऊळ होत, छोटस, सुंदरस.. मनोभावे स्त्री रुपाची, आदिशक्तीची पूजा झालेली दिसत होती. देवीची मुद्रा प्रसन्न, हसरी, नजर तिच्या ह्या लेकींकडे. देवळाच्या बाहेर एक पताका लावलेली होती, त्यावर देवी सूक्तातले मंत्र ठळक अक्षरात लिहिले होते...

ll या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता l नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम: ll

काय पाहत होती आई उघड्या डोळ्यांनी? मानवरुपातल्या स्त्रीशक्तीची, मातृरुपाची विटंबना? दैन्य, लाचारी, असहायता???

का सगळे फक्त शब्दांचे बुडबुडे केवळ???

विषय: 
प्रकार: 

शैलजा, मनातले विचार शब्दात सुरेख उतरले आहेत.

ह्या स्त्रियांना जिवंतपणी ज्या नरकयातना भोगायला लागतायत त्याला जबाबदार असणारे उजळ माथ्याने समाजात वावरतायत हा विरोधाभास चीड आणणारा आहे.

अशा वस्तीत काम करणार्‍या NGOs च्या कार्यकर्त्यांच खरंच कौतुक वाटतं.

शैलजा,

दचकवणारे नाही (मुंबईकरांसाठी तर नाहीच!) पण दाहक सत्त्य आहे हे, भावनिक तत्वावर हतबल करणारं. पण व्यावहारीक दृष्ट्या हे सत्य स्विकारून, वेश्या व्यवसाय व त्यांचे अधिकार याला कायद्यात संरक्षक स्वरूप देण्याच्या बाबतीत अजूनही आपल्याकडे सरकार ऊदासीन आहे. बहुतांशी एनजीओ च्या सहाय्याने त्यांचं अन त्यांच्या मुलांचं आयुष्य कसंबसं चालू रहातं..

नी,
yes the random probablity is the reality! आपण "या" तीरावर आहोत यासाठी केवळ ईश्वराचेच आभार मानावे लागतील.. बुप्रावाद ईथेही खड्यात जातो नाही?

मन सुन्न करणारा लेख.हे तर फक्त काठावरचे दृश्य वाचुन आपण एव्हढे अस्वस्थ होतो,मग हे आयुष्य जगणार्‍या स्त्रिया रोज मनाने मरण अनुभवित असतील.

काठावरून हा शब्द किती छान वापरलाय.. छान वगैरे काही म्हणायची चोरी झालीये आशयामुळे. एका संवेदनशील विषयाला नेमकी आणि सभ्यपणे वाचा फोडतो हा लेख..

Sad

काय भयाण आयुष्य देव देतो काहींच्या वाट्याला.. या नरकापेक्षा मरण परवडेल पण तेही मिळत नाही या बापड्यांना.

शैलजा, अतिशय संवेदनाशील व अवघड विषय अतिशय संयतपणे तरीही तितक्याच प्रभावीपणे मांडला आहेस. बी ने लिहील्या प्रमाणे फक्त वस्ती वर्णन आणि तुझी घालमेल यावरून एका बोचर्‍या, अंगावर येणार्‍या वास्तवाची प्रखरपणे जाणीव होते... खूप प्रभावी लिहीलंयस. शुभेच्छा!

आज मंडईच्या इथे फिरत असताना चुकून बुधवार पेठेत शिरलो, "त्या" बायका दिसल्या आणि कधी एकदा रिक्षा मिळते आणि इथून बाहेर पडतो असं झालं Sad , खरचं किती सुरक्षित आयुष्य जगतो आपण

शैलजा, खूप मनापासून लिहिलं आहेस गं....

बुधवार पेठ, रविवार पेठेचा पुण्यातील जो रेड लाईट एरिया आहे तिथे असलेल्या वेश्यावस्तीतील लहान मुलांना पाहिलंय मी.... त्यांच्या आया दारात उभं राहून गिर्‍हाईक पटवत किंवा शोधत असतात, कोणी गिर्‍हाइकाशी हुज्जत घालत असतात, कोणी त्याच्याबरोबर आत जात असतात आणि हे सर्व बघत, अनुभवत त्यांची मुलं बाहेर रस्त्यावर खेळत असतात.....

या वर्षी सुपंथ व संयुक्ता तर्फे आपण अशा मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी मदत गोळा करायचं ठरवलंय हे खरंच खूप चांगलं आहे. जाता जाता, महिला दिन सर्व्हे रिपोर्ट साठी संकलित केलेल्या माहितीतील हा एक जळजळीत भाग :

  • १,६०,००० नेपाळी स्त्रियांना भारतातील वेश्यागृहात ठेवलेले आहे. (कार्यकारी संचालक SANLAAP, इंद्राणी सिन्हा, ‘पेपर ऑन ग्लोबलिएशन एण्ड ह्यूमन राइटस्’)
  • भारतात कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, आणि तामिळनाडु या राज्यांत वेश्याव्यवसायातील स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो. विजापूर, बेळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतून स्त्रिया मोठ्या शहरांत एका संघटित अनैतिक व्यापार समूहाच्या नेटवर्कचा एक भाग म्हणून स्थलांतरीत केल्या जातात. (सेंट्रल वेलफेअर बोर्ड, मीना मेनन, "दि अननोन फेसेस्")
  • महाराष्ट्र आणि कर्नाटक जिल्ह्यांच्या सीमा ‘देवदासी पट्टा’ (देवदासी बेल्ट) म्हणून ओळखला जातो. येथून विभिन्न पातळीवर अनैतिक व्यापार करण्यात येतो. येथील स्त्रिया वेश्याव्यवसायामध्ये असण्याचे कारण म्हणजे त्यांच्या पतींनी त्यांना सोडलेले असते किंवा त्यांना विश्वासघात व बलात्कार यांसारख्या प्रसंगातून वेश्या बनण्यास भाग पाडले जाते. पुष्कळशा देवदासींना वेश्याव्यवसायासाठी देवी यलम्माला समर्पित करतात. कर्नाटक येथील एका वेश्यागृहातील सर्व १५ मुली देवदासी आहेत. (मीना मेनन, "अननोन फेसेस्")
  • भारतातील वेश्यागृहांमधील १००००० ते १६०००० नेपाळी स्त्रिया आणि मुलींना (म्हणजे सुमारे ३५ टक्के) चांगली नोकरी देण्याच्या आमिषाने किंवा लग्न करण्याच्या खोट्या आश्वासनावर येथे आणलेले आहे. (राधिका कुमारस्वामी, यूएन स्पेशल रिपोर्ट ऑन व्हायोलंस अगेन्स्ट विमेन, गस्टावो कॅपडेलिव्हा, आईपीएस, 2 एप्रिल 1997)
  • भारतामध्ये दररोज सुमारे ५००० ते ७००० नेपाळी मुलींचा अनैतिक व्यापार केला जातो.
  • १००००० ते १६०००० नेपाळी मुली भारतातील वेश्यागृहांमध्ये डांबलेल्या आहेत. सुमारे ४५००० नेपाळी मुली मुंबईतील वेश्यागृहांमध्ये आहेत आणि ४०००० कोलकातामध्ये आहेत. (विमेन्स ग्रुप्स् इन नेपाल, ट्रॅफिकिंग इन विमेन एण्ड चिल्ड्रन: द केसेस ऑफ बांगलादेश, pp.8 व 9, UBINIG, 1995)
  • भारतातून अनेक स्त्रिया आणि मुलांना दररोज मध्य-पूर्व राष्ट्रांमध्ये पाठविले जाते. भारत, पाकिस्तान आणि मध्यपूर्वेतील घरकाम करणार्या आणि वेश्याव्यवसायातील मुलींना यातना दिल्या जातात, कैदेत ठेवले जाते आणि बलात्कार करण्यात येतात. (इंद्राणी सिन्हा, SANLAAP भारत, ‘पेपर ऑन ग्लोबलिएशन एण्ड ह्यूमन राइटस्’)

हे विदारक सत्य आहे, व समाजाची "प्रत्यक्षातली" लायकी काय आहे ते दर्शविणारे आहे.
पण या वस्तीत या ना त्या कारणाने जाऊ न शकणारे पण प्रत्यक्षात अनेक सार्वजनिक ठिकाणि वावरणारे उपद्रवी वासनान्ध बुभुक्षितान्ची सन्ख्या किती असेल काय कि! समाज हा असा(ही) आहे.

>>> yes the random probablity is the reality! आपण "या" तीरावर आहोत यासाठी केवळ ईश्वराचेच आभार मानावे लागतील.. बुप्रावाद ईथेही खड्यात जातो नाही?
काही खड्यात बिड्यात जात नाही. निर्लज्ज्यासारखे ते लगेच, एकुण स्त्रीयान्च्या लोकसन्ख्येच्या प्रमाणात वेश्याव्यवसायात उतरावे लागलेल्यान्च्या सन्ख्येची तुलना करीत टक्केवारी काढतील (अन तोन्डात गुळण्याधरुन गप्प बसतील - त्यान्ची धाव हिन्दूधर्मशास्त्रान्ची निन्दा करण्याइतपतच)
अन कदाचित वर तोन्ड काढुन असेही विचारतील की, "तुम्ही सगळे त्यान्चि येवढी कीव वगैरे का करताय? कशावरुन त्यान्चे स्वतःचे मत त्या व्यवसायाबद्दल तसेच असेल? कशावरुन त्यान्नी स्वखुशीने तो व्यवसाय स्विकारला नसेल? आकडेवारीने काय सिद्ध होते तेवढे बोला!"

ह्म्म्म्म, विदारक आहे पण काही उपाय नाही.
आमचा वाडा पुण्यात बुधवार पेठेत होता, माझे लहानपण त्या भागात गेले आहे.
अगदी ९० दशकाच्या पहिल्या काही वर्षांपर्यंत अनेक चांगली कुटुंबे त्या भागात रहात होती.
आधी वाडा असताना बरे होते, एकदा वाड्याचे भले भक्कम दार लावून घेतले की बाहेरच्या जगाचा संबंध कमी व्हायचा.
पण नंतर त्रास वाढत गेला, तसेच वाडे नाहीसे होऊ लागले त्यामुळे एक प्रकारची असुरक्षितता आली,
मग आमच्या प्रमाणे अनेक कुटुंबे त्या भागातुन दुसरीकडे हलली.

काय द्यावी प्रतिक्रीया या लेखा बद्दल. किती कळकळीने मांडलय.

एकदा नागपाड्यात एका इंपोर्टरला भेटायला जात होतो. टॅक्सी त्या अलेक्झांड्रा थिएटरच्या नाक्यावर थांबली. पहात होतो ती हॉटेल्स लॉज त्यांचे ते विशिष्ट नंबर. त्या भयानक मेकअप मधल्या बाया.
अचानक एकजण माझ्या खिडकीशी येऊन बोलायला लागला" साहब चलेंगे क्या एकसे एक है'
आतापपर्यंत फक्त फेरीवाले भिका-यांची सवय असलेल्या मला या मार्केटींग वर काय बोलाव तेच कळेना
टॅक्सी वाला ओरडला " ए चल ये उसमे से नाही"
तो "अरे इनको चाहीये तो तेरे को क्या'
"ए चल भाग!!"

अजुन काही लोकही येत होते पण सिग्नल पडला आणि टॅक्सी तिथून बाहेर पडली.

तिथेच समोर एक जिना होता वरच्या खोलीतला गडद लाल रंगाचा काळोख सांडला होता किती दाहकता होती त्यात.
विचार करत होतो कोण जात असतिल हे जीने चढून ...

खरच आपण किती सिक्युर्ड लाईफची सर्टीफिकेटस तोंडावर घेऊन फिरतो.

इथे आमच्या युनीव्हर्सीटीतल्या मॅडमनी सांगितलेला एक किस्सा आठवला.
त्या एका NGO साठी कामाठीपुर्यात काम करत होत्या.
एकिशी त्यांच बोलण चालू होत. ती साधारण सहा सात वर्ष तरी तिथे होती.
ती म्हणाली "ये देखो बिलकुल बाप पे गया है"
उत्सुकतेने त्यानी विचारल "तुझे कैसे मालुम की..."
"बिबीजी मै चार महीनेसे थी जब मेरे मरदने मुझे यहां बेचा"
नंतर म्हणाली "एक बार अगर आप ले जा सके तो मुझे समुंदर देखना है"

सांगताना आमच्या मॅडमचे डोळे पाणावलेले.

फक्त दोन रस्त्यांपलिकडला समुद्र तिने पाहीला नव्हता.

२ रा प्रतिसाद, पाटिल यांना अनुमोदन, प्रितीताइंचा उल्लेख झाल्याखेरिज, विषय संपुच शकत नाही. मी खुप छान ओळखते त्यांना. एक सरळ्साधे व्यक्तिमत्व. त्यांच्या कार्याला सलाम.
शैलजा, तुमचे लिखाण खुप आतुन आले आहे. ही कळकळ आवडली. पु,ले.शु.

सार्‍यांचे सहसंवेदनेबद्दल आभार. सगळ्यांनी मांडलेले अनुभव पुरेसे बोलके आहेत. Sad
>>आपल्या तथाकथित नॉर्मल आयुष्याबद्दल मग उगाचच अपराधीपणा येतो. >> मणि, हो. खरं आहे.
>>काठावरून हा शब्द >> सांजसंध्या, भापो, पण तसंच तर आहे, नुसती झलक पाहतानाही अवाक्, सुन्न आणि त्याहीपलिकडे वाटलं. मणि म्हणते तसा अपराधीपणा.
योग, मला ते सारं जग अंगावर आलं आणि दचकायला झालं खरं.
अरुंधती, माहितीपूर्ण पोस्ट. धन्यवाद.

शैलजा, लिखाण मनापासून उतरलंय. भयाण वास्तव.

>>शैलजा, तुला बस त्या वस्तीतून जातांना जसा त्रास व्हायचा तसाच किंबहुना अधिकच ती कादंबरी वाचतांना मला झाला होता...
सानी, भावनीक त्रास होणं समजण्यासारखं आहे. पण 'शैलजापेक्षा अधिकच त्रास झाला' हा प्रकार कळला नाही. त्रासांची मापं असतात?

कुणी ठेवलं असेल हे नाव ? कामाठीपुरा !!

@ आशय
अनिल अवचटांचं अंधाराचं जग हे पुस्तक आत काय लिहीलय हे माहीत नसल्यानं कोवळ्या वयात वाचलं गेलं होतं. ते चित्र अजून मनावर कोरलं गेलंय.. कीव येते.
गोलपिठा वाचलेलं नाही अद्याप.. पण अनिल कांबळेंचं

त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहीला मी..

हे गीत महाराष्ट्र चहा मधे रांगेत उभं राहीलं कि हमखास आठवतं..

@ शैलजाताई

तुम्ही तुमच्या अँगलने कॅमेरा फिरवून दाखवलाय.. तुमच्या नजरेतून जो वेध घेतलाय तो उत्तम प्रकारे चित्रित केलाय.

खूप सुंदर आणि मनापासून लिहिलयस. वाचल्यावर अस्वस्थ व्हायला होतंच. भावना थेट भिडतात>>
खरंच कधी कधी एक योगायोग म्हणून आपण सामान्य जीवन जगतोय असंच वाटत राहतं. अशा कुठल्या ठिकाणी जन्माला आलो असतो तर????<<<<
खरंच... टोटल रॅण्डम.. अपघातानेच केवळ!>>अगदी हेच लिहायला आले होते मी इथे

अगदी मनापासून लिहिलं आहेस, या विषयावर काहीही वाचलं की मी नेहमीच सुन्न होते. कामाठीपुर्‍यात नाही गेले कधीच पण बुधवारातल्या त्या बायका पाहिल्या आहेत. खरच त्यांच्या नजरेला नजर देववत नाही Sad

हे सत्य माहित असूनही प्रत्यक्ष सविस्तर वाचताना हादरून गेलो.
याला छान तरी कसे म्हणू??
विदारक्,जळजळीत्-केवळ सत्य!!!

या व्यवसायाच्या चालिका बहुदा स्त्रीया असतात. किमान सिनेमातुन तरी हेच दाखवल आहे. त्याही बहुदा स्वतः आयुष्यभर हाच व्यवसाय करुन पुढे चालक बनतात. त्यांना स्वतःला या नरकातुन सुटण्याची प्रेरणा का होत नसावी ? त्यांच पुनर्वसन अशक्यप्राय आहे म्हणुन ?

Pages