काळाचे अनंत!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

जुनीच कविता. परत एकदा. हा सगळा अनुभव मात्र परत परत जगूनही तेवढाच नवा.
--------------------------------------------------------------
काळाचे अनंत.
आपण देतो त्याला परिमाणं
मोजमापसाठी
संदर्भासाठी..
करतो त्याचे तुकडे
देत लयीचं नाव

असं करताकरता वाटायला लागतं
मीच नेतेय त्याला पुढे
आणि इथेच तो माझ्यासाठी थांबतो

म्हणजे तो जातोच पुढे
पण मी थांबते, अडकते एका तुकड्यात.
मग काळाचे वेगवेगळे तुकडे
स्वतःचे संदर्भ सोडून
मला भेटायला येतात...
माझ्यावर आदळतात.
त्यांना नसतो क्रम, नियम आणि अपवादही.

माझा पूर्ण गोंधळ होतो.
माझा तुकडा कुठला?
आजचा तुकडा कुठला?
व्हॉट काइंड ऑफ आयडिया आय अ‍ॅम?
सगळंच मस्त उलटंपालटं होतं.
निरर्थकही..

असं माझं वेड विकोपाला जात रहातं.
मला मजा येत जाते

आता तुम्ही गोंधळू लागता!

- नी

प्रकार: 
शब्दखुणा: