स्त्रीमुक्तीच्या माझ्या कल्पना (खोखो - ३)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 March, 2011 - 23:08

कृपया स्वतःला खो मिळाल्याशिवाय लिहू नये. तुम्हाला लिहायची इच्छा असल्यास तुम्ही खो मागू शकता. प्रत्येकाने खो शिवाय लिहिले तर संपूर्ण उपक्रम गोंधळाचा होईल. हे या खेळाचे नियम आहेत ते पाळून सहकार्य करावे. खो घेण्याची इच्छा असूनही खो मिळाला नाही तर शेवटच्या दिवशी तुम्हाला आपले मत मांडण्याची संधी नक्कीच मिळेल.

संयोजक खो (३)- सिंडरेला
सिंडरेला खो (१)- वैद्यबुवा, सिंडरेला खो (२)- नताशा-एक फुल
किंवा आगाऊ
आगाऊ खो (१)- दाद , आगाऊ खो (२)- नानबा
वैद्यबुवा खो (१)- साजिरा, वैद्यबुवा खो (२)- मैत्रेयी
मैत्रेयी खो (१) - लिंबूटिंबू मैत्रेयी खो (२) - हसरी
साजिरा खो (१) - रैना साजिरा खो (२) - झक्की
नताशा खो (१)- झेलम, नताशा खो (२)- फचिन
नानबा खो (१)- सायलीमी, नानबा खो (२)- स्वरूप
सायलीमी खो (१)- मितान/ दक्षिणा, सायलीमी खो (२)- राखी/ केदार
हसरी खो (१)- डुआय
झेलम खो (१)- सावनी झेलम खो (२ )- मनिषा लिमये
फचिन खो (१ )-लालू
सावनी खो (१) -बी/ संपदा/ श्रुती सावनी खो (२ )- रुणूझुणू/ वर्षा ११
राखी खो (१) - मीपुणेकर राखी खो (२ )- आउटडोअर्स
आउटडोअर्स खो (१) - भानस आउटडोअर्स खो (२) - मिनी
मिनी खो (१) - मनकवडा मिनी खो (२) - राहुल (rj)
डूआय खो १ - अनिल७६ डूआय खो २ - रितू
लालू खो १ - विकु (vijayakulakarnai) लालू खो २ - आर्च
मीपुणेकर खो १ -महागुरु/ प्रवीणपा मीपुणेकर खो २ - रमा/ आश

वाचायला सोपे जावे यासाठी ४ धागे केले आहेत. कृपया या गटातील सहभागी होणार्‍यांनी इथे लिहा.

सिंडरेला | 8 March, 2011 - 12:29
सर्व प्रथम खो दिल्याबद्दल संयोजकांचे आभार.

*********

विषय इतका जिव्हाळ्याचा. लिहिण्यासारखं खूप आहे. पण इथे फक्त एक छोटीशी गोष्ट देते आहे. लालूच्या बहिणीने अमृता प्रितमच्या 'पाँच बहनें' कथेचा अनुवाद 'पाच बहिणी' इथे मायबोलीवर प्रसिद्ध केला होता. पाच तर्‍हेच्या पाच बहिणी आणि त्यांची आयुष्ये म्हणजे स्त्रीजातीच्या आयुष्याचे सार जणु. तो अनुवाद वाचून मला हे सुचलं होतं (प्रकाशित केलं नाही कारण फॉरमॅट जसाच्या तसा होता). कॉपी म्हणा हवं तर पण माझ्या दृष्टीने 'स्त्री मुक्ती' हा विषय स्त्रियांच्या राज्यांत जिथे सुरु होउन ज्या दिशेने जातो आहे ते थोडक्यात सांगण्याचा माझा हा प्रयत्न.

"...जीवन मग सहाव्या बहिणीच्या भेटीस आले. उंच उंच भिंती आणि काटेरी कुंपण असलेल्या तिच्या महालात आत जाण्यास वारा धजावेना. जीवन एकटेच आत गेले. कर्मठ भावविहिन चेहर्‍याची सहावी त्याला सामोरी आली. आत महालात तिच्याच असंख्य प्रतिकृती मेंढरांसारख्या दावणीला बांधल्या होत्या. रिती, परंपरा, धर्म अशी अनेक जोखडे त्यांना घातली होती. जोखडांनी त्या दुर्बल झाल्या होत्या. परंतु त्याचे त्यांना दु:ख नव्हते. त्या आनंदाने तिथे नांदत होत्या. कुणाचे जोखड सैल झाले आहे असे दिसताच दुसरी तत्परतेने ते अधिक करकचुन बांधत होती. जीवनाने सहावीला म्हणावे, 'मी तुमच्यासाठी भेट आणली आहे.'

सहावीच्या प्रतिकृतींनी उत्सुकतेने त्या पेटार्‍याकडे पाहिले. काही आशेने जीवनाकडे धावल्या. परंतु बाकीच्यांनी त्यांचे पाय खेचले, ओरबाडले, बोचकारले. त्या जखमी झाल्या, रक्तबंबाळ झाल्या. काहींनी तेथेच हार मानली, काहींनी मान टाकली तर काही नेटाने जीवनाकडे चालत राहिल्या. त्यांच्या वाटेत होते असंख्य बोचरे काटे पण त्यांनी जिद्द सोडली नाही. कारण जीवनाने त्यांसाठी आणले होते एक मोकळे आकाश आणि विस्तिर्ण
क्षितीज...उरभरुन श्वास आणि स्वातंत्र्य !!!"

आगाऊ | 8 March, 2011
सिंडरेला, 'खो' साठी धन्यवाद.
*****************
स्त्रीमुक्ती म्हणजे नेमके काय? मुक्ती कुणापासून? सामाजिक बंधनांपासून? पुरुषांच्या वर्चस्वापासून? की स्त्रीत्वाच्या मूलभूत वैशिष्ठ्यापासूनच? माझ्या मते याचे उत्तर प्रत्येक स्त्रीपरत्वे बदलणारे आहे त्यामुळे स्त्रीमुक्तीची एकचएक व्याख्या करणे अवघड आहे. स्त्रीला आत्मभान येणे आणि तिने पुरूषनिरपेक्ष विचार आणि कृती करायची संधी मिळणे हा माझ्या दृष्टीने स्त्रीमुक्तीचा संपूर्ण आविष्कार आहे.

ह्या निकषावर माझी आजी ही मी पाहिलेली सर्वात मुक्त स्त्री असेल. याच माणसाशी का लग्न केले या प्रश्नाचे, ' ही वॉज इन नीड.रिक्वायर्ड हेल्प इन हिज प्रोफेशन' असे अत्यंत प्रॅक्टीकल उत्तर देणारी, घरातल्या अर्थकारणावर आणि निर्णयप्रक्रियेवर घट्ट पकड असलेली, अत्यंत काटेकोर लाईफस्टाईल असलेली आणि तरीही स्वतःची मते आणि पद्धती मुलांवर अजिबात न लादणारी, अत्यंत स्वतंत्र स्त्री.
मात्र भावनिक पातळीवरील तिची ही अलिप्तता, कोरडेपणा घरातल्या इतर सर्वांनाच अस्वस्थ करतो. तिची सर्व मुले आज अनेकार्थाने यशस्वी आहेत आणि त्याचे श्रेय तिने त्यांना दिलेल्या पूर्ण स्वातंत्र्याला आहेच. पण त्याचबरोबर आपल्या यशाने आपली आई आनंदी आहे का? मुळात ती व्यक्ती म्हणून काय आहे? हे त्यांच्यापैकी कोणालाच माहिती नाही ही बोचही आहे.

त्यामुळे एका बाजूला स्त्री स्वतंत्र झाली तरी तिच्याकडून अपेक्षित असलेल्या 'इमोशनल कोशंट'ची ही पूर्तता होणे गरजेचे आहे असे मला वाटते. इमोशनल कोशंटचे गृहितक आहे आणि त्याने स्त्री आणि पुरुष, दोघांवरही अन्याय होतो. स्त्रीने किती भावनिक असावे याचा काय मापदंड आहे ते माहिती नाही, पण वैयक्तिकदृष्ट्या असे वाटते की माझ्या आजीसारखी माझी आई असती तर मला ते झेपले नसते! पण याच आजीबरोबर मी जेंव्हा पदवीची तीन वर्षे राहिलो तेंव्हा तिने मला पूर्ण स्वातंत्र्य आणि त्याबरोबर येणारी पूर्ण जबाबदारी; दोन्ही दिले. त्या अनुभवानेच मला 'मोठा' केले, जे माझ्या आईला शक्य झाले नसते, हेही खरे.

तिढा आहे तो असा आहे!
*****************

वैद्यबुवा | 9 March, 2011 - 12:34
सिंड्रेलानी "खो" दिला तेव्हा थोडासा विचार करुन स्त्रीमुक्ती बद्द्लच्या माझ्या कल्पनांबद्दल लिहेन म्हंटलो पण लिहायला बसलो आणि नेमके विचार मांडायला म्हणून डोक्याचे यंत्र पळवायला सुरवात केली खरी पण स्त्रीमुक्ती ह्या शब्दाशी निगडीत असे फारसे अनुभव, विचार किंवा उल्लेखनीय अशी उदाहरणं काही सर्च रिजल्ट्स मध्ये आलेच नाहीत. जरा वाईट वाटलं पण त्याच बरोबर नेमकी अडचण काय आहे हे सुद्धा लक्षात आलं.
तर अडचण अशी होती की जेव्हा पासून थोडं फार समजायला लागलं तेव्हा पासून ते साधारण वयाच्या २५ एक वर्षांपर्यंत "स्त्रीमुक्ती" किंवा स्त्रीयांना खरच काही अडचणी असतात आणि असल्या तरी माझ्या आयुष्यात जे काही चाललय त्या गोष्टींपेक्षा कधी ह्या विषयाला जास्त प्राधान्य देऊन त्याच्याशी निगडीत स्त्रीयांशी मी ह्या विषयावर बोलल्याचे तर लांबच पण साधी दखल घेतल्याची सुद्धा आठवत नाही. थोडक्यात हा विषय माझ्या "रेडार" वरच नव्हता. हे म्हणजे अगदी "बेसिक मध्ये लोचा" ह्या क्याटेगरीत मोडत असलं तरी माझ्या बाबतीत ते सत्य आहे. वयाची २५शी गाठे पर्यंत हा विषय माझ्या रेडार वर नव्हता ही गोष्ट आणि वर काही मायबोलीकर मित्र मैत्रिणींनी दिलेल्या अन्य बर्‍याच गोष्टी, माझ्यामते आपण आज "स्त्रीमुक्ती" ह्या विषयावर बोलतोय ह्याला कारणीभुत आहे.
मी स्वतः अगदी समाजामधल्या माझ्या सारख्या अन्य पुरुषांचे प्रातिनिधीक (?) असं उदाहरण जरी नसलो तरी माझ्यासारखे अजून बरेच पुरुष अस्तित्वात असल्याची खुप दाट शक्यता आहे. मी थोडा अजून खोलवर विचार करत ह्या गोष्टीला नेमकं कोण/काय जवाबदार आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि असं लक्षात आलं की माझ्या आजुबाजुला असलेल्या स्त्रीयांनाच स्वतः स्त्रीमुक्ती म्हणजे नेमकं काय ह्याची जाणीव नव्हती. माझं लग्न झाल्यावर काही वर्षांनी माझ्या आईनी आमची संसार करायची पद्द्त पाहून खुप आश्चर्य व्यक्त केलं होतं. नवरा-बायकोनी एकत्र बसून एखाद्या गोष्टी बद्द्ल निर्णय घेणे, बायकोनी स्वतंत्रपणे स्वतःच्या नोकरीबद्दल, पैसे गुंतवणुकीबद्द्ल निर्णय घेणे, चार लोकात नवर्‍याच्या बरोबरीनी एखाद्या विषयाबद्दल ठाम आणि वेगळं मत देणे ह्या बद्दल आईनी आश्चर्य तर व्यक्त केलच पण आपल्याला ते करता नाही आलं ह्याची खंत सुद्धा व्यक्त केली. हे उलट आता माझ्या दृष्टिनी सांगायचे म्हंटले तर लग्न झाल्यावर बायकोशी एक "मित्र" म्हणून झालेल्या संवादामधून आणि तिनी मांडलेल्या विचारांमधून माझ्या स्वतःच्या आईनी आतापर्यंत घालवलेल्या जीवनाच्या पद्धतीबद्दल मतं एकदम बदलली.

आता काळ पुष्कळ बदलला आहे असं जरी आपण म्हंटलो तरी माझ्या आई सारख्या स्त्रीमुक्तीच्या खर्‍या व्याख्येची ओळख नसलेल्या स्त्रीया सर्रास आढळतात. खर्‍या व्याख्येची ओळख नेमकी कशी होते? एक उत्तर समाजानी (इथे स्त्री पुरुष दोन्ही आले) पुढाकार घेऊन स्त्रीयांना त्यांचा "fair share" (समान हिस्सा?) देणे हे असु शकतं. हा मार्ग चांगला जरी असला तरी माझ्या मते indirect आहे आणि म्हणून कदाचित इतका प्रभावी होऊ नाही शकणार. ह्या उलट अरुंधती ह्यांच्या आजी, आई, आगाऊंची आजी ह्यांनी निवडलेले मार्ग माझ्यामते तरी सरवात प्रभावी आहेत. बर्‍याच स्त्रीया घराची गरज म्हणून नोकरी/व्यवसाय करुन स्वतःच्या पायावर उभ्या राहतात पण माझ्या मते गरज सुद्धा सापेक्ष आहे आणि ती वाटली नाही तरी स्वतःच्या पायावर उभं राहाणं फार गरजेचे आहे . हे विधान खरं तर पुरुषांना पण लागू होऊ शकतं पण बर्‍याच वेळा गरज वाटली नाही म्हणून फक्त चुलमुल आनंदानी संभाळणार्‍या स्त्रीया आढळतात म्हणून मुद्दाम स्त्रीयांना उद्देशून हे विधान केलं. पैसा ह्या गोष्टीला समजात खुप महत्व आहे आणि अर्थातच घरात/कुटूंबात ज्याच्या हातात पैसा त्याची चलती असते हे आपसुकच येतं. चलती आली की मग कितीही नाही म्हंटलं, व्यक्ती कितीही चांगली आहे म्हंटलं तरी त्यांच्या कलानी घेणं, तडजोड करणं हे येतच. त्यात चलती असलेल्या व्यक्तीला इतरांच्या भावनांविषयी, हक्कांविषयी फारशी जाणीव नसली की मग इतरांच्या किंवा मुख्यतः घरातील स्त्रीयांच्या बर्‍याच स्वातंत्र्यांवर नकळत बुल्डोजर फिरवला जात असतो.
स्त्रीयांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं ह्या गोष्टी कडे इथून पुढे गरज आहे म्हणून न बघता शिक्षणाइतकेच महत्व देऊन जगण्यासाठी एक अत्यावशक गोष्ट म्हणून पाहावे आणि ह्यालाच मी मुक्तीची गरज नसलेली स्त्री ह्या स्थिती कडे होणार्‍या वाटचालीचे पहिले पाऊल म्हणेन.

माझे "खो" साजिरा आणि मैत्रेयी ह्यांना.

साजिरा | 9 March, 2011 - 15:00
सिंडरेला, आगाऊ आणि वैद्यबुवा.. लिहिलेले आवडले.

खो साठी धन्यवाद रे नयनीशा.

नयनीशचे पूर्ण पटले. तरूण असो की वयस्कर- पुरूषांचे सोडाच, पण माझ्याच घरातल्या स्त्रियांमध्येही याबद्दल गोंधळ उडताना दिसतोय. काही वर्षांपूर्वी वडील गेल्यावर, आणि घरातले महत्वाचे निर्णय स्वतःलाच घ्यायला लागल्यावरही आईला याबद्दल प्रश्न विचारले, तर ती नीट ठोस उत्तर देऊ शकणार नाही. आणि कदाचित तिलाही तेव्हा कळेल, की याबद्दल इतके वाचन करून, आजूबाजूला इतके अनुभव बघूनही स्वतःचा असा काही स्टँड बनवता आलेला नाही.

माझ्याच आजूबाजूची उदाहरणे तर सोडाच, पण घरातली आणि जवळच्या नात्यातलीच काही उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत.

१) काही वर्षांपूर्वी बायकोने काय करावे- या प्रश्नावर जेव्हा विचार करायची वेळ आली, आणि बायकोने विचारले, की मी तुझ्याच ऑफिसात मला जमेल तेवढी मदत करू का? आता ती मला जी मदत करू शकणार होती, ती मी थोडेसे पैसे देऊन कुठूनही आऊटसोर्स करू शकत होतो. तिला ज्या कामात रस आहे, तोच व्यवसाय तिने करावा असं मी ठामपणे सुचवलं. दोघांना आपापल्या कामात स्वतंत्र निर्णयप्रक्रियांतून गेल्यावर अनेक गोष्टींचा फायदा होईल, जरा काहीतरी- आयुष्यभर उपयोगी पडेल, असे शिकायला मिळेल- हा हेतू. यावेळी माझाही व्यवसाय नवीनच होता. म्हणजे उमेदवारीचाच काळ म्हणा. धंद्यातल्या अनंत अडचणी बघून तिने आधी स्वतंत्र व्यवसाय करायला सपशेल नकारच दिला. पण आपण साधे कचरा गोळा करायचेही काम आत्मविश्वासाने, मन लावून केले, तरी त्यातून काहीतरी चांगलेच निघते, याचा मला विश्वास होता. अडचणी- आज असतात, उद्या नाही. मला प्रचंड समजावून सांगावे लागले. तिला ते काम उत्तम जमत असूनही आत्मविश्वास नव्हता- हा प्रॉब्लेम. काही महिने कानीकपाळी तेच ते सांगत राहिल्यावर रडतराऊत एकदाचे घोड्यावर बसायला तयार झाले. भाड्याने एक शॉप घेतले. आणि काम सुरू झाले. आज तिचे स्वतःचे शॉप आहे. तिच्या कामाचे भरपूर कौतुक आणि थोडेफार नावही झाले आहे. आज तिच्या व्यवसायाबद्दलचे सारे निर्णय तीच घेते. माझ्या व्यवसायातले मी. बोलणे आणि मतांची देवाणघेवाण होते, पण अंतिम निर्णय ज्याचे त्यानेच. घरातलेही निर्णय अर्थातच एकमेकांचे मत बघून, मग.
आता तिला स्त्रीमुक्तीबद्दल काही विचारले, तर तिचे काय उत्तर असणार, हे बघणे खरेच मनोरंजक असणार.

२) आमची आई एम.ए.बी.एड. शिकलीय. वडिल गेल्यावर आईला बरेच निर्णय घ्यावे लागले. तिला मी धरून तीन मुले आणि तीन सुना. पण त्यातले बरेच निर्णय मुलेसुना तर जाऊच देत, पण नातेवाईक आणि गोतावळा काय म्हणेल, याचा संपूर्ण विचार करूनच. अनेक वेळेला पटत नसलेल्या गोष्टीही करणारच ती. इथे तिच्या मनात स्त्रीमुक्ती, स्वातंत्र्य वगैरे काहीही येत नाही.

३) आमच्या मावशीचे भलेमोठे एकत्र कुटुंब आहे. तिचीही तीन मुले, तीन सुना आणि ७-८ नातवंडे. यातली २ तरी मुली लग्नाच्या. काका काही वर्षांपुर्वी गेले. काकांनी बांधलेल्या घरातच अजूनही एवढे मोठे कुटुंब राहते. तसेच घर. धड रंग सुद्धा बदललेला नाही. घरात अत्यंत मरगळलेले वातावरण. हेवेदावे रुसवे फुगवे भांडणे सारे रीतसर आहेच. प्रत्येक काम दुसरेच कुणीतरी करेल, याची वाट बघितली जाते. संपूर्ण कुटुंबावर मावशीचा अंमल. मुलांनी आणि सुनांनी आलटून पालटून विभक्त होण्याच्या, स्वतंत्र होण्याच्या मागण्या केल्या, भांडणेही केली, पण मावशीचा ठाम नकार. मोठा मुलगा आता पन्नाशीला पोचेल, पण डोके दुखतेय, आणि क्रोसिन हवी आहे, तरी मावशीकडे पैसे मागावे लागणार. अगदीच अडाणी नसूनही तिन्ही सुना घरात आणि शेतात जनावरासारख्या राबतात. त्यांच्या मागण्या आणि अपेक्षांकडे तर सोडाच, पण दुखण्या खुपण्याकडेही सपशेल दुर्लक्ष केले जाते. विभक्त झाले, तर ज्याचे त्याचे जो तो काम करेल, प्रगती करेल, किंवा काहीतरी होईल, पण हे मावशीलाच नको आहे. कारण तिचा एकछत्री अंमल नाहीसा होणार. तिला मग कुणी विचारणारच नाही, अशी भिती वाटते. त्यांची २-३ ठिकाणी शेती आहे. त्यातले एक ठिकाण गावाच्या अगदी जवळ आहे, आणि गावाची वाढ झाल्याने बिल्डर लोक ती जमीन काही कोटी रुपयांना मागत आहेत. ती विकून जरा लांब, भरपूर बागायती शेती मिळेल. ती घेतली, वाटण्या केल्या, तर सारी मरगळ जाऊन आबादीआबाद होईल, पण मावशीला नकोच आहे. आता 'आमची जमीन इतक्या कोटी रुपयाला मागितलीय' असं भेटेल त्याला ती दु:खी चेहेरा करून सांगते. मग बघणारा आश्चर्यचकित नजरेने किंवा आदराने तिच्याकडे पाहतो. (इतके पैसे मिळताहेत, तर असे विपन्नावस्थेत का राहता? असाही प्रश्न त्या समोरच्याच्या आश्चर्यात असेल बहुधा!). असे समोरच्याने बघितले, की मावशीला समाधान वाटते. ती कुटुंबप्रमुख असल्याचा, तिचा अंमल असल्याचा, आणि सारे निर्णय घरात तिचेच असल्याचा. मग ही स्टोरी सांगायला ती रोज नवीन श्रोते शोधते.
मला खात्री आहे, तिचा जीव असेतोवर ती काहीच निर्णय घेणार नाही. आणि शेवटपर्यंत अशा दरिद्री संसारावर एकछत्री अंमल असल्याचे समाधान पदरी बाळगत राहील. तोपर्यंत तिच्यासोबत त्या तीनही संसारांची फरपट.

४) शास्त्रीय संगीत शिकवणार्‍या एका बाईंकडे माझ्या लेकीला नेले. त्यांनी एखादे गाणे म्हणून दाखव म्हणल्यावर लेकीने 'शीला की जवानी' म्हणून दाखवले. आम्हा दोघांत मान खाली घालायची स्पर्धा. घरी आल्यावर 'तुला काय दुसरे गाणेच येत नव्हते काय?' असं दरडावून विचारलं, तर लेक स्पष्ट म्हणाली, 'त्यांना माझा फक्त आवाज कसा आहे, तेच ऐकायचे होते ना? मग कुठचेही गाणे असले, तरी काय फरक पडतो?'
आमच्याकडे अर्थातच उत्तर नव्हते. असे योग्य ठिकाणी आणि ठिकठिकाणी आमच्याकडे उत्तर नसण्याचे प्रसंग आता भरपूर येतील यापुढे. आमची इच्छा असो, नसो. आणि हे अर्थातच बरं आहे.

नानबा | 10 March, 2011 - 00:45
आगाऊ, खो करता धन्यवाद!
ह्या विषयावरचे वेगवेगळ्या लोकांचे पोस्टस वाचताना पहिल्यांदा आठवल्या त्या २ घटना. एक साधारण ३० -३५ वर्षांपूर्वीची आणि एक ७ वर्षापूर्वीची
किस्सा १: लग्नघटिका जवळ आली आहे. अशा वेळेस मुलाच्या वडिलांनी हुंड्याबद्दल बोलायला सुरुवात केली.. ही बातमी गौरीहर पुजणार्‍या मुलीच्या कानावर पडली .. ऐकल्या ऐकल्या ती मुलगी तिथून उठली आणि मंडपात नवर्‍याच्या इथे आली. मुंडावळ्या बाजूला करून त्याला म्हणाली "दिलीप, तुम्हा लोकांना हुंडा हवाय असं मी ऐकतेय.. खरं आहे का? तसं असेल तर मी नाही करणार बरका लग्न वगैरे." दिलीपनं अर्थातच नाही नाही.. तसं काही नाही.. असं करून स्वतःच्या वडिलांना समजावलं.. अर्थातच हुंड्याशिवाय ते लग्न लागलं.
किस्सा नं २: ग्रॅज्युएशन पर्यंत हुंडाविरोधी बोलणारी मुलगी. ग्रॅज्युएशन झालं, मग नोकरी मिळेना म्हणताना मुलं बघायला लागली. लग्न ठरलंही.. मुलगा उत्तम शिकलेला - मुलाला उत्तम पगारही होता.. तरीही हुंडा ठरला - त्याच्या एका महिन्याच्या पगाराइतकी रक्कम आणि तितकेच तोळे सोनं. मुलीनही आपली तत्व वगैरे बाजूला ठेवली आणि लग्न केलं!
आता मला सांगा ह्यातली कुठली घटना किती साली झाली असेल? मी त्रयस्थ असते तर मला वाटलं असतं की किस्सा क्रं एक ६ वर्षापूर्वीचा असेल आणि किस्सा क्रं दोन ३० वर्षापूर्वीचा..
पण तसं नाहीये. ह्या घटनांचे क्रम वर लिहिलेत तसेच आहेत. ३० वर्षांपूर्वी अगदी लग्नघरातही आपल्या मतांवर ठाम असलेली आईची मैत्रिण आणि ६ वर्षापूर्वी असं लग्न मान्य करणारी माझी मैत्रिण- ह्या दोघींनी मला शिकवलं की ह्यात कदाचित शिक्षण, काळ वगैरेचा तितका हात नसतो जितका एखादी गोष्ट आपल्याला किती मॅटर करते आणि तिच्याकरता काय देण्याची आपली तयारी आहे ह्या गोष्टीचा हात असतो! म्हणजे आपलं स्वातंत्र्य, स्वतःची किम्मत ह्या गोष्टी आधी आपल्याला कळायला लागतात - तरच आपण त्या दुसर्‍याला पटवून देऊ शकतो. नुसतं तेवढच नाही तर त्या मिळवण्याकरता लागणारी किम्मत द्यायची आपली तयारी असायला लागते - मग कधी ती गोष्ट समाजाचा रोष म्हणून येईल तर कधी घरच्यांचा, कधी कष्ट, हालअपेष्टातून दिसेल तर कधी हे सगळं केल्यानंतर मिळणार्‍या (मोस्ट डिझर्वड) स्वातंत्र्यातून.
अर्थात ही गोष्ट इथे संपत नाही. ह्याला अनेक पदर असतात.
ह्या हुंडा देणार्‍या माझ्या मैत्रिणीला दोन मुली झाल्या. दुसरीही मुलगीच कळाल्यावर सासूनं तिसरा चान्स घ्या म्हणून भूणभूण सुरु केली. ह्यावर मैत्रिणीचं उत्तर खूप छान होतं "चालेल. मग तिसरी मुलगी झाली की चौथा चान्स घेतो. चौथी मुलगी झाली की पाचवा... मी म्हणजे मुलं जन्माला घालायचं मशिनच आहे ना"
तिनं हुंडा दिल्यानं मला जे वाईट वाटलेलं - तिच्या वरच्या उत्तरानं त्यावर मलम लागल्यासारखं झालं
म्हणूनच हा "२+२=४" इतका सोपा प्रश्न नाहीये! ह्याला अनेक पदर आहेत. एखादिला जे मह्त्त्वाचं वाटेल ते दुसरीला वाटेलच असं नाही. आणि ज्याला जे जितकं महत्त्वाचं वाटेल त्याप्रमाणात त्याच्या लढ्याची तीव्रता!

अर्थात मी बर्‍याच पोस्टसमधे जेवढा निगेटीव सूर वाचला तेवढी परिस्थिती सगळीकडेच वाईट नाहिये.
बदल ही एका रात्रीत होणारी गोष्ट नाहिये. सुरुवात तर आधीच झालीये, आपण फक्त मधले टप्पे आहोत. आईवडिलांच्या पिढीतली- फक्त दोन मुली असलेले आणि आमच्या पिढीतली फक्त एकच मुलगी असलेले (आणि ह्याचं दु:ख नसलेले) कित्येक लोक माझ्या ओळखीचे आहेत.
माझे बाबा आईला घरातल्या कामांमधे मदत करायचे - माझा नवरा मला मदत करत नाही, तर आमच्या घरातली कामं त्याची स्वतःची समजून करतो. हे दृष्य आज कित्येक घरांमधून दिसतं - हा मोठा बदलही नजरेआड करून चालणार नाही. साधारणतः आजीच्या पिढीपासून आपण कमवायला लागलो, मागच्या पिढीपासून आपल्याला कमी जास्त प्रमाणात आर्थिक/वैचारिक स्वातंत्र्य आहे - हे महत्त्वाचं. बदलाची सुरुवात आधीच झालेली आहे.
आता ह्याच्या पुढची पायरी म्हणजे ज्यांना हे हवसं वाटतय पण मिळत नाही त्यांनी हे मिळवण्याचा प्रयत्न करणं आणि ज्यांना "हे हवसं वाटायला हवं" हे ही कळत नसेल त्यांच्या मधे जाणीव निर्माण व्हावी म्हणून ज्यांच्याकडे आधीच आहे त्यांनी प्रयत्न करणं! (संयुक्ताची ही लेखमाला त्याला काही प्रमाणात तरी हातभार लावेल असं वाटतय!)
अजूनही बर्‍याच सुशिक्षित ठिकाणीही स्वैपाकात मदत न करणारी नातेवाईक बाई वाईट ठरते, पण नातेवाईक पुरुषाला मात्र गप्पा मारत त्या बाईला नावं ठेवण्याचा अधिकार असतो! ह्या गोष्टीचं एखाद्या बाईला जेवढं वाईट वाटतं, तेवढंच तिला एखाद्या नोकरी न करणार्‍या पुरुषाला नावं ठेवण्याचंही वाटेल - हे बदलण्याकरता जेव्हा प्रयत्न होतील - तेच माझ्या मते स्वातंत्र्य.

नताशा -एक फूल | 9 March, 2011 - 22:52
माझा खो अजुन व्हॅलिड आहे का? जाउदे, लिहितेच
मी बरेचदा या विषयावरची माझी मतं मांडली आहेत. आज जरा वेगळे मुद्दे लिहिते.

मला स्त्रीमुक्ती म्हणजे काय ते नीटसं कळत नाही. त्यापेक्षा स्त्री-पुरुष समानता जास्त भावते. जेव्हा आपण स्त्रिया "स्त्रीमुक्ती/समानता" हवी म्हणतो, तेव्हा आपण नाण्याची दुसरी बाजूदेखिल स्विकारायला तयार आहोत ना, हा विचार केलाच पाहिजे.
खालील काही मुद्दे मी तपासून बघत असते.
उदा. १. मला माझ्या भावाइतकेच शिक्षण मिळावे अशी अपेक्षा मी करते आणि ते मला मिळतेही, तेव्हा भावाइतकीच आपल्या आई-वडिल्-भावंडांची जबाबदारी घेणे मी टाळत नाहिये ना?
२. मी जेव्हा उत्तम शिक्षण घेतले आहे, तेव्हा "नवरा करतोय ना नोकरी, मला काय गरज?" असा नकळत दांभिक विचार तर मी करत नाहिये ना? या शिक्षणाचा मी सर्वोत्तम उपयोग करतेय ना? हे शिक्षण मला मिळावे म्हणून सावित्रीबाई ,ज्योतिबा फुले, म्.कर्वे यासारख्या अनेक लोकांना लढा द्यावा लागला होता, हे मी विसरत तर नाहिये ना?
३. कामाच्या ठिकाणी मी "ग्लास सीलिंग" म्हणून आवाज उठवते, तेव्हा "केवळ" मी स्त्री असल्याने "घर्/मुलं/संसार्/पाहुणे" अशा कुठल्याही कारणानी कन्सेशन तर घेत नाहीये ना?
४. माझ्या कुठल्याही सहकारी स्त्रीने करिअरसाठी जास्त वेळ दिला तर "हिला घरदार नाहिये का/ अशी कशी बाई मुलांकडे दुर्लक्ष करते इ." कमेण्ट्स तर मारत नाही ना? मारणार्‍यांना अनुमोदन देत नाहिये ना?
५. उद्या माझ्या नवर्‍याने काही व्हॅलिड कारणाने नोकरी सोडायचे ठरवले तर मी त्याला "समाज काय म्हणेल" असे म्हणून साथ नाकारत नाहिये ना? (जर मी husband should be primary bread-winner असा हट्ट केला तर मी स्वत:ला आपण होऊनच दुय्यम स्थान घेतेय, मग त्याविरोधी आवाज उठवण्याचा मला काय अधिकार?)
५. माझ्या मुलाला/मुलीला वाढवताना मी कुठल्याही स्टिरिओटाइप्सना बळी पडत नाहिये ना? जसे मुलीला केवळ बाहुल्या आणि भांडी व मुलाला केवळ कार्स आणि सुपरमॅन? (त्यांची इच्छा असेल तर ठीक पण स्टिरिओटाइप म्हणून नको) किंवा नकळत "फक्त" मुलीलाच "पाणी दे/पसारा आवर" म्हणणे?

अशा बर्‍याच गोष्टी आहेत. यापैकी कुठलेही उत्तर "हो" असेल तर माझी "स्त्रीमुक्ती/समानता" ही तितकीच दांभिक आहे जितका आपल्या समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन!!

मी स्वतःशी केलेला निर्धार, जो मी आतापर्यंत नेहमीच पाळत आलेय: "केवळ" मी स्त्री असल्याचा फायदा घेऊन कुठलीही जबाबदारी टाळणार नाही, कुठलेही फेवर्स घेणार नाही. मात्र "केवळ" मी स्त्री असल्यामुळे कुठल्याही संधींपासुन वंचित राहाणे देखिल मला पटणार नाही.

maitreyee | 10 March, 2011 - 04:01
"स्त्रीमुक्ती" - या शब्दाची मला सर्वप्रथम केव्हा 'जाणीव ' झाली हे आठवायचा प्रयत्न करत होते.
लहानपणी आज्जी आईने क्वचित स्त्रीजन्माला आली वगैरे उल्लेख केले असतील पण कौतुके ,लाड त्याहून जास्तच होती, त्यामुळे घरात सगळ्यात लहान भाऊ असला तरी त्याला अन आम्हा बहिणींना कधी खुपण्यासारखी सापत्न वागणूक मिळतेय असे कधीच वाटले नाही. शेजारी पाजारी त्या काळानुसार मुलींना वेगळे ट्रीट केले जायचे (बहुधा) पण तिकडे लक्ष जायचे नाही बहुतेक. एकूणात खुशालचेंडू होते मी बर्‍यापैकी.
मग आठवले, साधारण सातवीत वगैरे असताना असेल, तेव्हा शैला लाटकर, मंजुश्री सारडा खून खटले फार गाजले होते. रोज पेपर्स मधे सासरच्यांनी त्या दोघींचा केलेला अमानुष छळ आणि खून याची मोठी वर्णने यायची. त्या काळात मला स्त्रीचे असहाय असणे, सासरच्यांनी केलेल्या अपेक्षा, हुंडा, छळ या गोष्टींची पहिल्यांदाच गंभीर जाणीव झाली. "हे असं का?" "हे भयंकर चूक आहे" असे प्रश्न मनात मूळ धरायला लागले. अर्थात माझी लगेच बालिश प्रतिक्रिया "मला कुणी असे केले ना तर मीच जाळीन त्या लोकांना" असली वक्तव्ये होती एकूणात बंडखोर असण्याच्या वयात 'स्त्रीमुक्ती' या शब्दाची जाणीव झाल्यामुळे कायमच स्त्री म्हणून मला वेगळे वागवले जातंय का हे तपासण्याची अन विरोध करण्याची , किमान, " हा नियम मलाच का ? " हा प्रश्न विचारायची सवयच लागली. ती मला , एक व्यक्ती म्हणून ,एक स्त्री म्हणून माझ्या स्वतंत्र अस्तित्वाची एक सुरुवात वाटते ! अन ती अजूनही महत्त्वाची वाटते.
सुरुवातीला स्त्रीमुक्ती चळवळ म्हणजे एकूण प्रस्थापित कुटुंब्संस्थेबद्दल राग , पुरुषद्वेष, आवेशपूर्ण भाषणे, मुद्दाम रुक्ष दिसणे, असा काहीसा बहुसंख्य लोकांचा समज होता!! बहुधा 'स्त्रीमुक्तीवाल्या' म्हणजे घर दार वार्‍यावर सोडलेल्या भांडखोर बायका, किंवा अशा , ज्यांचे लग्न होत नसल्याने त्या अशा वागत असाव्यात इथपासून ते आपल्या घरातील मुली-सुनांनी (किंवा कुणीच) या असल्या कजाग बायांच्या नादी लागू नये असे लोकांचे विचार असायचे.
थोडक्यात स्त्रियांना पूर्णपणे नियंत्रणा मधे ठेवण्याची व्रूत्ती इतकी खोल रुजली होती की आत्त्त आतापर्यन्त स्त्रियांना पण त्या वागणुकीचे काही न वाटणे, त्याला काही पर्याय आहे हे लक्षातही न येणे हे कॉमन होते. या मानसिकतेने कायम स्त्रीमुक्तीला या ना त्या प्रकारे विरोध केलेला आहे. आता इतक्या वर्षानंतर समाजात बदल झाले, नाही असे नाही, पण ही विचारसरणी इतकी खोलवर रुजली आहे की आतासुद्धा हे विचार बर्‍याच लोकांमधे सुप्त रित्या शिल्लक आहेत याचे वाईट वाटते.काही लोक उघड अन भडक भाषेत ते बोलण्या वागण्यात दाखवत असतात तर काही लोक वरवर सुशिक्षित, सोफिस्टिकेटेड, लिबरल वगैरे दिसत असले तरी (कदाचित त्यांच्याही नकळत) मनात खोल रुजलेल्या पुरुषी वर्चस्ववादाचे नमुने अचानक वागण्यात दाखवतात. आपल्या नेहमीच्या ओळखीतल्या पुरुषाचे असं लख्खन 'खरे दर्शन ' झाले की धक्का बसतोच पण त्याच्याकडे बघण्याची नवीच दृष्टी मिळते
हे कधी बदलणार ? असे नेहमीच बहुतेक सजग स्त्रियांना वाटते. त्यापेक्षा जास्त आपण विचार करायला हवा की मी हे बदलण्यासाठी काय करू शकते! मुळात जे चूक आहे ते आधी जाणवायला हवे अन मग ते बदलता कसे येईल हे निदान स्वतःच्या बाबतीत तरी पहावे. जे घडतेय ते चूक आहे हे निदान जाणवले तरी ती एक सुरुवात असेल
१. मी स्वतःला स्त्री म्हणून कमी लेखणार नाही, अन इतरांनाही लेखू देणार नाही
२. मुलांना - मुलगा मुलगी दोघांना सारखी वागणूक हे वर बर्‍याच लोकांनी लिहिलेच आहे. शिवाय अजून म्हणजे आजूबाजूला खटकणार्या गोष्टी दिसल्या तर वयानुरुप मुलांना दाखवून हेही विचारते मी, की हे दिसतेय त्यावर तुझे काय मत ? तुला हे बरोबर वाटते का? त्यांच्या जाणिवा विकसित करण्याचा हा एक प्रयत्न.
३. जमेल तेव्हा ही जाणीव, हा अवेअरनेस इतरांमधेही जागवण्याव्चा प्रयत्न करणे
हा शेवटचा मुद्दा साधा वाटतो पण तो सगळ्यात अवघड आहे माझा स्वतःचा अनुभव आहे की असे काही आपण सहज जरी बोलायला लागलो (हे बाईलाच का, जाचक प्रथा का वगैरे!!) की कोणत्याही ग्रुप मधे काही टिपिकल डीफेन्सिव मुद्दे, छुपे विरोध, उपहासाचे कटाक्ष किंवा चीड आणणारे विनोद (तुझा नवरा बिच्चारा वगैरे) हे होतेच होते. अनेक वेळा कित्येक पुरुषांकडून, काही वेळा बायकांकडून पण, "ठीक आहे तुझं , पण सासरचे अन नवरा यांना तेवढ्यावरून दुखवायवे का." "प्रत्येक वेळी वाद घालताच पाहिजे का?" " बदल होतील तेव्हा हळूहळू होतीलच, प्रत्येक बाबतीत तुम्हा बायकांना भांडायची गरज काय" असे शेरे मिळतात !! अरे वा हे बरंय की !! म्हणजे बदल अपरिहार्यपणे होतील , अगदी जेव्हा स्वीकारावेच लागतील तोवर चाललेय ते बरेय की, अन हे बदल आपोआप होतील का? कुणीतरी सुरुवात केल्याशिवाय , कुणीतरी झगडल्याशिवाय होतील कसे? की आपले घर सोडून इतर घरात सावित्रीबाई जन्माव्या ही सोय बरी वाटतेय ?
मी तरी जिथे स्त्री संदर्भात थोडेफार सापत्न विचार किंवा वागणूक पहाते तिथे तिथे कधी गंभीर किंवा कधी हसून का होईना प॑ण बोलून दाखवतेच दाखवते. बर्‍याच चेहर्‍यांवर उपहास, विरोध (आगाऊच दिसतेय ही बया!) दिसतो, तर काही चेहर्‍यांवर निदान मनात काहीतरी विचार होतोय अशी आशादायक जाणीव पण होते! अर्थात मी तरी आदत् से मजबूर! त्यामुळे ही आगाऊपणा करण्याची सवय कुठली जातेय

सायलीमी | 10 March, 2011 - 04:12
नानबा खो बद्दल धन्यवाद.
चारही खोखो मधे बहूतेक सगळे विषय लिहून झालेले आहेत. माझे पण काही थोड्याफार फरकाने असेच अनुभव आहेत. त्याबद्दल परत लिहित नाही.
मला असं वाटतं की एक व्यक्ती म्हणून आपण हे मानायला हवं की कोणतेही काम किंवा जबाबदारी मग ती घरातली असू दे किंवा बाहेरची ती बाई किंवा पुरूष सारख्याच पद्धतीने करू शकतात. हे जेव्हा सगळे समजतील ती खरी समानता.
घरातल्या कामांबद्दल माझे बाबा नेहेमी सगळ्यांना सांगतात, जो पुरूष बायकोबरोबर अगदी सुरूवातीपासून बरोबरीने संसारात काम करतो त्या बाईचे आयूष्य ५ % वाढते आणी मुलांना पण लहान पणापासूनच समानतेचे किंवा कोणतेही काम कमी न लेखण्याचे संस्कार आपोआप होत जातात.

हल्लीच अनुभवलेला प्रसंग.
मैत्रिणीचा नवरा अगदी उत्साहाने सगळी कामं करतो. त्याला मनापासून मुलाचं सगळं करायचं असतं पण मैत्रिणीचा कायम विरोध कारण तो नीट करणार नाही किंवा मुलाला भरवायच त्याला कळत नाही. असं का? त्यांचा पण मुल आहे ना ते कळेल त्याला पण कसं भरवायचं ते किंवा आपल्यला मुलं व्ह्यायच्या आधी माहिती होतं का सगळं?

नताशा ने लिहिलय तसं नाण्याची दुसरी बाजू पण स्विकारायची स्त्रीची तयारी असायला हवी. तरच आपण समानता मानू शकतो

आज आपण मुलांना काय शिकवतो यावर आपली पुढची पिढी ठरवेल समनतेबद्दल आणी कदाचित त्यावेळी स्त्रियांची स्तिथी आजच्यापेक्षा अजून चांगली असेल.
यावरून काही दिवसापूर्वी झालेला प्रसंग आज माझ्या मुलाकडे कार आहेत पण त्याबरोबर बाहुल्या, किचन सेट हे पण सगळं आहे आणी तो हे दोन्ही तितक्याच आवडीने खेळतो. काही दिवसापूर्वी त्याचा मित्र खेळायला आला होता. थोडा वेळ खेळून झाल्यावर मुलाने किचनसेट खेळायचे मित्राला सुचवले. त्यावर मित्राने सांगितले, किचन मुली खेळतात मुलं नाही. मी जस्ट बघत होते त्यांच काय बोलणं चालू आहे. माझ्या मुलाने मित्राला सांगितलं, आमच्या कडे मॉम आणी डॅड दोघही कूकिंग करतात आणी दोघही ऑफिसला money आणायला जातात. मी पण मोठा झालो की दोन्ही करणार.

अरूंधतीच्या खोमधले आजचे आकडे नक्कीच निराश करणारे आहेत पण आज जर आपण मुलांना आतापासूनच समानता शिकवू शकलो तर भविष्यात नक्कीच चित्र बदलेल.

फचिन | 10 March, 2011 - 02:55
नताशा आणि मृण्मयी, मला खो दिल्याबद्दल धन्यवाद. इतक्या लोकांनी लिहिलं आहे की माझ्याकडे काही विशेष लिहिण्यासारखे नाही हो. पण तरी काही गोष्टींना अनुमोदन तरी देतो.

नताशा, तुम्ही खरेच छान लिहिले आहे. आवडले. खालील वाक्यावर फक्त प्रतिक्रिया द्यावीशी वाटली.

<<मला स्त्रीमुक्ती म्हणजे काय ते नीटसं कळत नाही. त्यापेक्षा स्त्री-पुरुष समानता जास्त भावते.>>
दोन्ही एकच आहेत, फक्त डिग्रीमध्ये फरक आहे. म्हणजे सुनांचा छळ, हुंडा, स्त्रीभ्रूणहत्या ह्यांचे गांभीर्य फार आहे, त्यामुळे त्यातून मुक्तीला स्त्रीमुक्ती म्हणता येईल. जिथे फरक थोडा सूक्ष्म आहे तिथे समानता म्हणता येईल.

माझा अनुभवही अगदी वैद्यबुवांसारखाच आहे. स्त्रीमुक्ती वगैरे कधी फारसा विचार केलाच नाही. मी जेव्हा शिकायला अमेरिकेत आलो, तेव्हा दर तीन दिवसांनी रुममेट लोकांसाठी स्वयपाक करावा लागे. दोन वर्षात त्याला कंटाळलो. तेव्हा असे वाटले की आई वर्षानुवर्षे तेच करत आहे, केवढा कंटाळा येत असेल. पण साजिरा म्हणतो त्याप्रमाणे तसे विचारले तर आईचे उत्तर काय असेल माहीत नाही.

टण्याच्या लिस्टमध्ये दोन गोष्टी मला टाकाव्याशा वाटतात. एक म्हणजे वेतनातली समानता. बर्‍याच ठिकाणी असे वाचले आहे की एकाच प्रकारची कुशलता असण्यार्‍या स्त्रीला पुरूषांपेक्षा कमी वेतन मिळते. हे बंद होणे हा एक चांगला प्रगतीचा टप्पा असेल असे वाटते.

दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पिढीतल्या बर्‍याच मुली तंत्रज्ञानासारख्या विषयात शिकलेल्या, तज्ञ असून इंटरनेटवर बर्‍याच फोरमवर किंवा चर्चेत त्यांचा सहभाग फार कमी दिसतो. तीच गोष्ट खेळ, राजकारण, अर्थकारण ह्याबाबतीत आहे. फक्त चित्रपट ह्या एकाच विषयावर स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने चर्चा करताना मला दिसल्या आहेत. इतर गोष्टीतही तसे झाले पाहिजे असे मला वाटते. हा असा माझा अनुभव आहे, सगळ्यांना तसे वाटत असेल असे नाही.

बाकी महिला दिनाच्या दिवशी जीन(च) / साडी(च) घालून जाणे, वगैरे सगळा फार्स आहे. नथ, मंगळसूत्र घालणे/ न घालणे ह्यासुद्धा बर्‍यापैकी दुय्यम गोष्टी वाटतात. असल्या गोष्टींनी अहंकार सुखावण्याच्या पलीकडे काही होत नाही. तसेच कोणीतरी वर लिहिलेले महिला दिनाच्या दिवशीचे तणावमुक्तीचे लेक्चर हासुद्धा वेळ घालवण्याचा प्रकार आहे. किमान महिलांशी संबंधित तरी विषय ठेवावा. लोक कॉल करणारच कामासाठी. मी सध्या जिथे आलो आहे तिथल्या कंपनीत महिला दिनानिमित्त साप्ताहिक असते तसे छोटे पुस्तक दिले प्रत्येकीला. म्हणजे कामाच्या वेळी काम करा आणि वेळ मिळेल तसं ते पुस्तक निवांत वाचा असा उद्देश असावा.

हसरी | 10 March, 2011 - 09:50

स्री या शब्दाची व्याख्या आता बदलली आहे. ती अबला नसुन सबला झाली आहे. आपल्याला जर
कोणी बदलत असेल तर आपण स्वतः च आणि आपले विचार. मुलगा हवाय म्हणुन लोकं जशी शहरात
गर्भ लिंग चाचणी करतात तसेच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात चालते.

१) नात्यातलचं ओळखीच्या कुटुंबामध्ये घरचे सगळे शिकलेले आणि सधन आहेत. त्यांना पहिल्या दोन मुली आहेत आणि आता मुलगा हवाय. आतापर्यत किती वेळा गर्भपात केला माहित नाही पण मुलगा होईपर्यत हे चालुच राहणार...

२) माझी मैत्रिण - त्या चौघी बहिणीच मोठी बहिणीच लग्नाच वय झालं तरी आई वडीलाचे
मुलासाठी प्रयत्न चालुच. त्या बाईच्या ४५ व्या वर्षी त्यांना मुलागा आहे असं डॉ. नी सांगितले पण हे बाळतपण झाल्यावर तुम्ही एका जागेवरच बसाल जास्त काम करता येणार नाही असे सांगितल्यावर त्यांनी गर्भपात केला. म्हणजे मिळालं तेव्हा नको झालं. आजच्या शिकलेल्या मुलीही असा विचार करतात (सगळ्याचं नाही). आपल्या तब्येतीची काळजी का घेत नाहीत?

३) माझ्या काकीने दोन मुली झाल्यावर सरळ ऑपरेशन करुन टाकले. तिने कोणत्याच वेळा
गर्भ चाचणी केली नाही आणि घरात कुणाल न विचारताच निर्णय घेतला. आज ही तिला किती जण
सहानुभुती दाखवतात आणि अजुन प्रयत्न करायला हवा एकदा असे म्हणतात.

ग्रामीण भागात मुलींचं खुप विदारक चित्र आहे. बर्‍याचदा अन्याय होत असलेली स्त्री गप्प असते आणि आपण मदत करायला जावं तर हा आमच्या घरचा प्रश्न आहे असं जेव्हा ती स्वतः बोलते तेव्हा तिची दयाच येते. ज्या स्वतः कमवतात त्याही स्वतःचा पगार नवर्‍याकडे देतात तो हिशेब करुन पैसे देणार खर्च करायला. म्हणुन मुलीने फक्त शिक्षण घेउन चालणार नाही तर आपले विचार बदल्याची गरज आहे.
जेव्हा ग्रामीण भागातली स्त्री जेव्हा सुधारेल तेव्हा तो दिवस महिला दिन म्हणुन साजरा करायला आवडेल.

झेलम | 10 March, 2011 - 16:08

नताशा धन्यवाद खो दिल्याबद्दल.

एलेनॉर रूसवेल्ट्चं एक प्रसिद्ध वाक्य आहे - 'No one can make you feel inferior without
your consent.' अर्थात 'तुमच्या परवानगीशिवाय कुणीच तुम्हाला कमी लेखू शकणार नाही.' याच धर्तीवर सगळ्या स्त्रियानी स्वतःला मुक्त समजलं तर त्याना मुक्त करायचा प्रश्न येणार नाही. अर्थात मुक्तीपक्षा समानता हवी असं वाटतं. समानता म्हणजे तू एक काम केलस तर मीपण एकच काम करणार असं नाही. तर समानता म्हणजे एकमेकाना complement करणं आणि निर्भेळ सहजीवन अनुभवणं.

मुलीनी सुरुवातीपासून आपल्या अपेक्षा बोलून दाखवणं गरजेचं आहे. कधीकधी होतं काय की मुलगी नवीन सून बनून दुसर्‍या घरात गेलेली असते. काही गोष्टी नाही पटल्या तर सुरुवातीला बोलून दाखवल्या जात नाहीत. नंतर मग ती सून अपेक्षांच्या ओझ्याखाली दबली तरी जाते नाहीतर मग एकदम ज्वालामुखीसारखी उसळून वाईट तरी ठरते. आधीपासूनच आपलं ठाम मत मांडणं आणि दबावाला बळी न पडणं हे गरजेचं आहे. निदान सुशिक्षित मुलींमध्ये तरी ही समज आली पाहिजे.

मी पाहिलेलं आहे की काही घरांमध्ये मुलाना खरोखरीच इकडची काडी तिकडे करावी लागत नाही. अगदी चहाचा कपसुद्धा सिंकमध्ये ठेवावा लागत नाही. मुलींकडून/सुनांकडून मात्र हे अपेक्षितच असतं. त्यावर कुणीच चहाचा कप उचलू नये ये solution नाही. सुरुवातीपासूनच असे संस्कार असल्याने स्त्री-पुरुष समानता वगैरे नंतरच्या काळात पटलेल्यानाही बदलणं (स्त्री - पुरुष दोघानाही) अवघड जातं. हा अडथळा पार करणही आवश्यक आहे.

समाजात होत असलेले बदल हळूहळू तळागाळापर्यंत झिरपत जातात. माझ्या आईकडे काम करणार्‍या बाईची तिन्ही मुलं (२ मुली आणि तिसरा मुलगा. मुलगा नव्हता म्हणून तिसरा chance घेतला आईने खूप समजावलेलं असूनही) छान शिकली आहेत. निदान ती तरी त्यांच्या आईसारखा विचार करणार नाहीत अशी आशा. स्त्री-पुरुष समानतेचं बाळकडू लहानपणापासूनच पाजलं गेलं तर हाही चांगला बदल दिसेल हे नक्की. फक्त त्याला वेळ द्यायला हवा.

थोडक्यात कुणी आपल्याला मुक्त वगैरे करेल अशी अपेक्षा न बाळगता आपल्यापासूनच सुरुवात करणे हे मस्ट. बर्‍याच जणानी आपले विचार लिहिले आहेत. सगळच सार त्या पोस्टमध्ये आहे तरी लिहिण्याचा मोह आवरला नाही. असो. शेवट परत एलेनॉर रूसवेल्टच्याच विधानाने. Do what you feel in your heart to be right - for you'll be criticized anyway. You'll be damned if you do, and damned if you don't. मग जे बरोबर आहे असं हृदयापासून वाटतय ते करण्यात काय चूक?

राखी. | 11 March, 2011

सायलीमी, खो दिल्याबद्दल धन्यवाद!

प्रसंग १:
मला दुसरी मुलगी झाली तो दिवस. मला पहिलीही मुलगीच आहे. २० तासाच्या लेबरनंतर सगळं सुखरूप पार पडलं म्हणून मी, नवरा, सासुबाई खूप खूश होतो. डिलीव्हरी होउन जेमतेम अर्धा तास होत होता. लेबर रूममध्ये आत्तापर्यंत मदतीला असलेली अमेरिकन नर्स म्हणाली "आता तिसरा पण चान्स घेच. एक मुलगा पाहिजेच".

प्रसंग २:
५ वर्षाच्या ब्रेकनंतर परत नोकरी शोधणे सुरू होते. ५ वर्षाच्या ब्रेकचे कारण मी सरळ त्या काळात मुले झाली आणि त्यांच्या बरोबर राहता यावे म्हणून ब्रेक घेतला असे खरे खरे सांगायचे. एका मोठ्या प्लेस्मेंट एजन्सीच्या अमेरिकन बाईनी मला सांगितले की, "हे कारण देत जाऊ नकोस. मी पण आई आहे आणि मला कळतंय तुझं कारण तुझ्या दृष्टीनी किती बरोबर आहे ते. पण कंपन्यांना हे ऐकायचं नसतं हे मी माझ्या अनुभवावरून सांगतिये. ते तुझ्याकडे २ मुलांची आई, मग हिला जास्त काम सांगता येणार नाही असं बघतील आणि तुला सिलेक्ट करणार नाहीत." शेवटी माझे खरे कारण सांगून मला चांगल्या कंपनीत नोकरी पण मिळाली, त्यामुळे सगळ्याच कंपन्या असा विचार करत नाहीत. पण तिला मला हे सांगावसं वाटलं त्यावरून काही कंपन्यातरी असा विचार करतात हे कळले.

वर ह्या दोन्ही बायका अमेरिकन होत्या हे सांगायचं कारण म्हणजे सगळे प्रगत प्रगत म्हणतात त्या देशात वाढलेल्या स्त्रीयादेखिल अजून असेच विचार करतात किंवा दुसर्‍या प्रसंगानुसार तसे विचार करायला लागतात ह्या बद्दल खूप आश्चर्य वाटलं होतं. लहानपणापासून घरी स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं, स्वतःचे विचार असण्याचं स्वातंत्र्य मिळालं. मुलगी म्हणून कधीही दुय्यम वागणूक मिळाली नाही. आजुबाजुलापण मुलगे आणि मुली सरख्याच पद्धतीनी वाढवलेले आढळले. त्यामुळे स्त्रीमुक्ती ही पेपरमध्ये छापून येणार्‍या काही बातम्यांमधील दुर्दैवी स्त्रीयांना लागू होणारी कन्सेप्ट आहे, अशी माझी कितीतरी वर्षे कल्पना होती. पण वरील २ प्रसंगामुळे ती नक्कीच बदलली.

सायलीमीनी लिहील्या प्रमाणे आताच्या पिढीतील बरेच पालक मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक न करता अतिशय उत्तम रितीने मुलांना वाढवत आहेत. पण अशा पालकांची टक्केवारी काय आहे? ही टक्केवारी जेंव्हा वाढेल आणि अरुंधतीनी दिलेली टक्केवारी जेंव्हा बदलेल तो असेल खरा महिला दिन!

आऊटडोअर्स | 12 March, 2011

महिला दिनानिमित्त हा बीबी सुरु केल्याबद्दल संयुक्ता संयोजकांचे आभार. मला खो दिल्याबद्दल राखीचीही आभारी आहे.

मला चांगलं लिहिता येईल की नाही माहित नाही, परंतू खो दिलाय तर थोडंफार काहीतरी मनातलं मांडते. स्वातंत्र्याची किंमत त्यांनाच कळते ज्यांना ते मिळत नाही. माझ्याबाबत बोलायचं झालं तर सुदैवाने आजपर्यंत अशी वेळ कधीच आली नाही. सायोने वर लिहिलंच आहे, आम्ही चार बहिणी. त्यावेळेस कदाचित आई-बाबांना एखादा मुलगा व्हावा असं वाटलंही असेल, माहित नाही. पण मुलगा झाला नाही म्हणून त्याचा खेद्/खंत आम्हांला कधीच जाणवली नाही. साधारण मुलांना जे स्वातंत्र्य दिलं जातं तेच स्वातंत्र्य आम्हांलाही कायम मिळालं. त्यात आम्ही मधल्या दोघी जुळ्या. दोघींमधला फरक ओळखायला सोपं जावं म्हणून असेल, पण मी कायम पँट-शर्ट मध्ये व बहिणाबाई कायम मुलीच्या वेशात. आवडी-निवडीही तशाच. मला आठवतही नाही मी कधी भातुकली किंवा साधारण मुली जे खेळ खेळतात ते खेळल्याची. मी कायम मुलांमध्ये क्रिकेट खेळत असायची. बिनदिक्कत हाफ पँटमध्ये आसपासच्या भागात फिरायचे. पण त्यावरून आई-बाबांनी कधी टोकल्याचं मला आठवतही नाही. ट्रेक्सना जातानाही आई-बाबांनी कधीच आडकाठी केली नाही. एकंदरीत एक मुलगी म्हणून कधीच वेगळी वागणूक मिळाली नाही घरी किंवा बाहेर अथवा कामाच्या ठिकाणीही.

लग्नानंतरही असं कधीच जाणवलं नाही. घरातल्या कामामध्ये नवरा कधीही लाज न बाळगता मदत करायची तयारी दर्शवतो. कधी मी जेवत असेन तर सिंकमधली भांडी घासून टाकतो, त्यात माझंही ताट घासणं ओघाने आलंच. त्यामुळे हे काम तुझं आहे, तूच करायचं हे ऐकायची वेळ आली नाहीये.

बाकी मैत्रिणींमध्ये किंवा ओळखीमध्ये वर सगळ्यांनी लिहिलेली उदाहरणं बघण्यात आली आहेत. परंतू स्वानुभव नाही. पण एकंदरीत वरचं सगळं वाचल्यावर असं वाटतं की हे फक्त भारतातच नाही तर जगभरात सगळीकडेच चालतं. पुरुषांना व बायकांनाही आपले विचार बदलण्याची खूप आवश्यकता आहे व बाकीचे बदलायची वाट न बघता आपण आपल्यापासूनच सुरुवात करायला हवी.

सावनी | 12 March, 2011

"स्री मुक्ती" खरं सांगू का मला ह्या शब्दाचा अर्थ नीटसा कधी लावताच येत नाही. स्री ची मुक्तता ?? कशातून? कोणापासून? इथे बर्‍याच जणांच्या पोस्ट्स मधून हाच प्रश्न बघितला पण बर्‍याच जणांच उत्तर स्री-पुरूष समानता ह्या शब्दापाशी थांबलेलं पाहिलं. "स्री पुरूष समानता" हा शब्द जास्ती पटतो मनाला. स्त्री मुक्ती म्हणलं की माझ्या सुद्धा मनात काहीसे पौर्णिमेच्या पोस्ट मध्ये तिने लिहिलयं तसेच विचार येतात.
स्त्री-पुरूष समानता ह्यावर वेगळा काही विचार करण्याची कधी वेळच आली नाही. कारण लहानपणापासून ती बघतच आले.घरात आई आणि बाबा दोघही नोकरी करणारे असल्याने त्यांच्यात कामाची कायमच समान वाटणी होती. अगदी बाबांच्या लहानपणापासून सांगायचं तर ते ५ ही मुलगेच घरात आणि आईची तब्येत कायम तोळामासा असल्याने माझे सगळे काका, बाबा घरकामात, स्वैपाकात अगदी तरबेज आहेत. या उलट आईकडे तिघी बहीणी त्या काळात डबल ग्रॅज्युएट झालेल्या. मामी घरात आली तेव्हा ग्रॅज्युएट नव्हती आणि आजोबांना शिक्षणाची अतिशय आवड त्यानी धाकट्या मावशीच्या प्रवेशाच्या वेळी मामी ला सुद्धा कॉलेजात नाव घालायला सांगितलं. मामीने लग्नानंतर २ मुलांना सांभाळत डिग्री पूर्ण केली. ह्या सगळ्यामुळे मी मोठी होत असताना स्त्री चा दुय्यम दर्जा वगैरे हे विचार मनाला शिवले देखिल नाहीत. नात्यात, शेजारीपाजारी, कितीतरी मैत्रिणी ह्यात दोघी मुलीच किंवा एकुलती एक मुलगीच असलेली उदाहरणं आहेत पण त्यासाठी कधीच कुणी वाईट वाटून घेतय असं एकही उदाहरण मी पाह्यलं नव्हतं. आई बाबांनी ही कधीच माझ्यात आणि भावात फरक केला नाही. उलट माझं इंजिनीयरींग चं शिक्षण पेमेंट सीट मधून झालयं आणि धाकट्या भावाचं फ्री सीट. डिप्लोमा करताना आधीच ३ वर्षे दूर राहिल्याने बाबांना जेव्हा लक्षात आलं की कदाचित थोडक्यासाठी मला पुन्हा एकदा पुण्याबाहेर जावं लागेल त्यांनी निर्णय घेऊन टाकला. कॉलेजमध्ये सुद्धा ५ पैकी ३ मुली होतो आम्ही पेमेंट्सीटच्या. आणि गंमत म्हन्जे आम्ही तिघी जणी फर्स्ट क्लास ने बी ई पास झालो पण ती मुलं मात्र रखडली होती.

लग्नानंतर सासर सुद्धा मोकळ्या वातावरणाचं मिळालं. सासरच्यांनी अवास्तव अपेक्षा, बंधन ह्यात कधीच अडकवलं नाही. सासरी सुद्धा शिक्षणाला खूप महत्व. लग्नानंतर आधी नवर्‍याने त्याचे दुसरे मास्टर्स पूर्ण केले. मग मुलगा दोन वर्षाचा झाल्यावर नवरा म्हणाला आता मी बॅकसीट वर आणि तू एम एस करायला घे.
घरात मी अन नवर्‍याने कामाची वाटणी अशी केलेलीच नाही. ज्याला समोर जे काम दिसेल , वेळ असेल त्याने करायचं.
माझ्या कामाचं स्वरूप असंय की मी घरून काम करूच शकत नाही. पण त्याला २४/७ घरून केले तरी चालते. त्यामुळे मुलांच्या आजारपणात बर्‍याचदा त्यालाच घरी रहावं लागतं.

पण ही झाली माझ्या घरापुरती माझ्यापुरती स्त्री पुरूष समानता. इकडे अमेरिकेत आल्यानंतर उलट अंजली, दीपांजली ने लिहिलेली उदाहरणं पाहिली की चिडचिड व्हायची. उच्चशिक्षीत मुली सुद्धा जेव्हा असे विचार करतात ते बघून स्पीचलेस व्हायला होतं. मी दुसर्‍यांदा प्रेग्नंट असताना एका मैत्रिणीने विचारलं होतं, काय ग पहिला मुलगाच आहे न मग कशाला दुसर्‍याचा विचार? मला खरच त्याक्षणी तिच्या पदव्यांची कीव आली. एवढं शिकून विचार जर अठराव्या शतकातलेच राहणार असतील तर काय उपयोग? विचारांना काळ, स्थळ याचं बंधन नाही हे बघून वाईट वाटलं.
अरूंधती ने दिलेली आकडेवारी खडबडीत जागं करणारी आहे. पण आजूबाजुला सुशिक्षीत आणि सो कॉल्ड सुसंस्कृत म्हणवणार्‍या समाजात सुद्धा हे बघितलं की चिड्चिड होते.
ते जसं म्हणतात की छोटी छोटी गोल्स ठेवून त्यांची पूर्तता करावी. त्याप्रमाणे आपण प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरवात करायला हवी. आज जी परिस्थिती आहे ती पूर्णतः बदलणं कदाचित शक्य नाही पण निदान हे विषारी विचार पुढच्या पिढीपर्यंत पोचणार नाहीत एवढा प्रयत्न तर आपण सगळे नक्कीच करू शकतो. आज आपण जे वागणार आहोत , जे विचार रुजवणार आहोत त्यातून पुढची पिढी तयार होणार आहे. त्यामुळे सुशिक्षीत अणि तेवढीच सुसंस्कृत पिढी तयार करुया.

मिनी | 13 March, 2011

सर्वप्रथम संयुक्ता आणि आडोला खुप खुप धन्यवाद.

ह्या विषयावर भरपूर जणांनी भरपूर लिहिलं आहे आत्तापर्यंत. पण माझ्यामनातलं थोडंसं लिहिण्याचा प्रयत्न करते.

मला स्वःताला "मुक्ती" ह्या गोष्टीपेक्षा "सुख/ समाधान" ही गोष्ट जास्त महत्त्वाची वाटते. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या (मी मुद्दाम व्यक्ती असं म्ह्टलं आहे, कारण ही गोष्ट पुरुष किंवा स्त्री दोघांना सारखीच लागू होते. ) आयुष्यात सगळ्या प्रकारचं स्वातंत्र, स्थैर्य, आर्थिक सुबत्ता आहे, पण ती व्यक्ती इतकं सगळं असुनही सुखी/ समाधानी नसेल तर मग त्या सगळ्या गोष्टी असण्याला काहीच अर्थ नाही. माझ्या पाहण्यात किती तरी अश्या मुली/ स्त्रीया आहेत की ज्या नवर्‍याला/ सासु-सासर्‍यांना विचारल्या शिवाय किंवा त्याच्या परवांगीशिवाय काही करत नाही. पण त्यात त्यांना समाधान मिळतं. वरकरणी पहाणार्‍याला असं वाटू शकतं की ह्या स्त्रीला काहीच निर्णय स्वातंत्र नाही. पण तिच्या दृष्टीने कदाचित ह्या गोष्टीने ती खुष आणि समाधानी असेल. मला वाटतं की स्त्री मुक्ती हे खुप अंशी व्यक्ती सापेक्ष आहे. मला जी गोष्ट खटकते, ती समोरचीला खटकू शकेल असं नाही. As long as some one is doing something by his/ her choice and he/ she is happy about it, it shouldn't be an issue.

आणि आपण खरं तर खुप लकी आहोत. खरी स्त्रीमुक्तीची गरज खेड्या-पाड्यात आहे. जिथे आजही स्त्रियांना बेसिक सुविधा मिळत नाहीत. माझ्या पहाण्यात अश्या कितीतरी मुली आहेत कि ज्यांचं वयात येण्याच्या आधी लग्न झालेलं पाहिलं आहे. तिथे अजुनही त्यांच्या आहाराविषयी, तब्येतीविषयी आणि मुख्य म्हणजे त्यांच्या सुरक्षतेविषयी जागरुकता नाही. आजही पेपरामध्ये उन्हाळ्यात पाण्याचे हंडे घेऊन फिरण्यार्‍या बायकांचे फोटो दिसतात पण त्यात फार कमी वेळा एखाद्या पुरुषाचा फोटो असतो. खरं तर ४-५ किमी अंतरावरुन पाण्याचे हंडे आणणं हे प्रचंड कष्टाचं काम. पण त्याकामाचा भार कायम घरच्या स्त्रीवर पडलेला दिसतो. माझ्या दृष्टीने खेड्यातल्या महिलांना, २ वेळेचं पोटभर अन्न, अंग झाकायला पुरेसे कपडे आणि निर्भिडपणे कुठेही वावरता येईल तो खरा सुदिन. वैचारिक स्वतंत्र, निर्णय घेण्याचं स्वातंत्र ह्या गोष्टी खुप नंतरच्या आहेत.

मला नेहमी वाटतं की पुरुष आणि स्त्री ह्या एकमेकांना पुरक असतात. म्हणजे मला जर माहित आहे की माझा नवरा अमुक एक गोष्टीमध्ये माझ्यापेक्षा खुप चांगला आहे तर ते काम त्याला करु द्यावं. मग तिथे उगाच मी किंवा बाकीच्यांनी "मला अमुक एक गोष्ट करण्याचं स्वातंत्र नाही" असं म्हणणं चुकीचं आहे.
निसर्गाने स्त्री आणि पुरुषांनी असंच घडवलं आहे की जेणेकरुन ते एकामेकांच्या वैचारिक, मानसिक, शारिरिक गरजा पूर्ण करु शकतील. मग जर हे असं आहे तर आपण सगळ्यांनी ते स्विकारुन सगळ्याच व्यक्तींना समानतेची वागणुक द्यायला हवी आणि हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी अखिल मानवजात मुक्त होईल. हे सगळं एका दिवसात किंवा एका पिढीत होईल असं ही नाही. पण सध्याचं चित्रं नक्कीच आशादायक आहे.

डुआय | 13 March, 2011

हसरी व संयुक्ता संयोजक दोहोंचे सर्वप्रथम आभार.

स्त्रीमुक्ती ह्या शब्दातून तुम्हांला काय अपेक्षित आहे? काय वाटतं? >> खरं तर स्त्री मुक्ती ऐवजी दुसरी काही पर्यायी शब्दयोजना होणे शक्य नाही का? मुक्ती म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? कुणाच्या पाशातून / मोहातून मुक्ती? की कुणाच्या जाचातून मुक्ती? माझ्या मते अशी स्त्री काय तर पुरूष मुक्ती सुद्धा शक्य नाही!

>>>मुक्त, मुक्त म्हणजे तरी काय म्हणे? एखादी साधी, सोपी, सरळ आणि बहुसंख्य समाजमनाला मान्य होणारी व्याख्या आहे का? कोण्या एका वा एकीला जी व्याख्या मान्य असेल, जवळची वाटेल, तशी त्याच तीव्रतेने दुसर्‍या व्यक्तीला महत्वाची आणि आपलीशी वाटेलच, असं नसतंच कधी.>>> हे एकदम पटलं पण मी म्हणतो समाजाला पटेल, रूचेल अशी काही मुक्तीची व्याख्या जर शक्य नाही तर तशी ती न करता आपल्याला काय वाटतं हे सांगणं व जमल्यास पटवणं, न पटल्यास सोडून देणं आपल्या हातात आहे!

जे काय थोडं फार वाचलंय आणि बघितलंय त्यावरून लिहायचा प्रयत्न करतोय. सर्व पातळीवर समान संधी (जन्म, शिक्षण, करिअर इ.) मिळणं अन् तशी ती मिळवणं हे अत्यंत महत्वाचं. मग त्यासाठी भले ५० % आरक्षण असलं तरी चालेल.

आर्थिक स्वातंत्र्य अन् त्याद्वारे मिळणारं निर्णय स्वातंत्र्य. हे ही तितकंच गरजेच आहे. वेतनात समानता हा मुद्दा कुठंतरी वाचला. दोन्ही ठिकाणी कामं (ऑफिस अन् घर) करून समसमान वेतन मिळणार असेल तर घरच्या कामांचे दिवस समसमान ३-३ असे वाटले गेले पाहिजेत. आधीची पिढी अन् आत्ताची पिढी हयात फार फरक आहे! का म्हणून? हा प्रश्न जेवढ्या ईझिली आम्ही विचारू शकतो तेवढ्याच ईझिली कामाची समसमान वाटणी (मदत नव्हे!) करणे जमलेच पाहिजे.

सामाजिक पातळीवर हे बदल घडण्यासाठी फार मोलाची मदत होईल ती 'ईडियट बॉक्सची' हो! रूढीप्रिय तद्दन बेक्कार मालिका न बनविता काही तरी नवे प्रयोग केले गेले तर मदतच होईल. टण्याचा मुद्दा क्र ३ ज्या दिवशी प्रत्यक्षात येईल तो सुदिन म्हणावा लागेल. पण त्याला अजून खूप वेळ जावा लागेल.

लालू | 13 March, 2011

फचिन, खो दिल्याबद्दल आभार.

लोकांनी इथे लिहिलेले त्यांचे वैयक्तिक अनुभव, स्त्रीमुक्तीच्या त्यांच्या कल्पना, काय करायला हवे त्याबद्दलची मते वाचली.

अगदी जगण्याचा हक्क नाकारला जातो ते स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसली तरी तिला आर्थिक स्वातंत्र्य कसे असले पाहिजे इथपर्यंतची चर्चा वाचली. या सगळ्य गोष्टी एकाच वेळी चर्चिल्या जाता यावरुन हेच लक्षात येते की जगातले लोक 'स्त्री मुक्ती' किंवा 'स्त्री पुरुष समानता' किंवा जास्त योग्य संकल्पना म्हणजे 'सर्व लोक समान आहेत' या ध्येयापर्यंत पोचण्याच्या वाटेतल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. काहींना बराच पल्ला गाठावा लागेल तर काहींना अजून थोडे टप्पे गाठावे लागतील. इथे काही लोक 'पुढे' किंवा 'मागे' आहेत म्हणण्यापेक्षा असं म्हणणंच जास्त योग्य वाटतं. कष्ट्करी समाजातल्या ज्या स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करतात त्यांना जे स्वातंत्र्य असते तेच एखाद्या शिकलेल्या पांढरपेश्या कुटुंबातील स्त्रीला नसू शकते. 'समाज किंवा लोक काय म्हणतील' याची चिंता पांढरपेशा वर्गाला जास्त! दोन वेळा खाण्याची चिंता असणार्‍यांना आणि संपत्तीचे मालक असणारे त्याची पर्वा करत नाहीत. त्यामुळे या प्रत्येक वर्गातले स्त्रियांचे प्रश्न वेगळे.

हे टप्पे गाठणे किती सोपे/अवघड हे प्रत्येकाच्या दृष्टीने बदलणार. कोण कुठे आहे हे बर्‍याच घटकांवर अवलंबून आहे. आर्थिक परिस्थिती, सामाजिक स्तर, कुटुंबाची घडण, संस्कार, देश, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकारण, धर्म, धर्माचा पगडा, जात (जिथे लागू पडेल तिथे), रहाण्याचे ठिकाण, शहर, खेडे इ. आणि हे सगळे घटक मिळून एकाच वेळी परिणाम साधतील असंही नाही. त्यामुळे काय करावे लागेल हे ज्या त्या वर्गाची गरज पाहून ठरवावे लागेल. तरी खालील काही गोष्टींना पर्याय नाही असे मला वाटते-

१. आर्थिक स्वावलंबन
स्त्रीला स्वतःच्या पायावर उभे रहाणे किंवा ती क्षमता असणे याला पर्याय नाही. 'हा केवळ एक भाग आहे', 'स्त्रीला कमावत नसली तरी कुटुंबात पुरुषाइतके निर्णयस्वातंत्र्य असावे' असा विचार मी वाचला. एकतर हे विधान फार मर्यादित गटाला (काही ट्प्पे गाठलेल्या) लागू पडते. ते असे की इथे स्त्री कुटुंबात आहे, एकतर तिला नवरा किंवा आर्थिक आधार देणारे कुणी आहे हे गृहित धरले आहे. जिथे स्त्रीला माणूस म्हणून असावे ते अगदी प्राथमिक हक्क नाकारले जातात तिथे असले निर्णयस्वातंत्र्य ही लांबची गोष्ट आहे.

बर्‍याचदा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसल्याचा फायदा घेऊन छळ केला जातो. त्यातून बाहेर पडायला मार्ग नसतो. आर्थिक स्वावलंबन असले म्हणजे तिला आर्थिक स्वातंत्र्य असेलच असे नाही. त्यावरही काही पुरुष आपला ताबा ठेवतात पण स्वावलंबन असले तर त्रासातून बाहेर पडण्याचा एक महत्त्वाचा मार्ग उपलब्ध होतो.

२. शिक्षण
स्वतःच्या पायावर उभे रहायचे असेल तर शिक्षणाला पर्याय नाही. भारतात मुलींना (यात कुटुंबनियोजनाशी निगडीत काही अटी होत्या) हायस्कूलपर्यंत शिक्षण मोफत ठेवून सरकारने एक चांगली सुरुवात केली होती. अमेरिकेसारख्या देशात सर्वांनाच (मुलामुलींना) हायस्कूलपर्यंतचे (१२ वी) शिक्षण मोफत आहे. त्यानंतर त्याला पूरक व्यावसायिक शिक्षण आणि रोजगाराच्या संधीही उपलब्ध हव्यात. यासाठी देशाची, देशातल्या खाजगी उद्योगांची आर्थिक परिस्थिती मजबूत हवी. देशातल्याच लोकांना रोजगार मिळतील अशी सरकारी धोरणे हवीत.

३. कायदा आणि सुव्यवस्था
स्त्रियांमध्ये सुरक्षिततेची भावना असायला हवी त्यासाठी कायदा आणि त्याचे काटेकोर पालन हे कायमस्वरुपी उत्तर आहे. भ्रष्टाचाराला थारा देता कामा नये. याच्या अभावाचा त्रास स्त्री आणि पुरूषांना सारखाच होतो. सध्या स्त्रियांच्या बाबतीत तो जास्त दिसून येतो तिच्याविरुद्ध गुन्हे जास्त होतात.

४. 'धर्म' नावाची गोष्ट
ही 'वैयक्तिक' आहे. आणि ती तशीच ठेवावी. 'जगातील सर्व लोक समान आहेत' या विधानाला छेद देणारे त्यात काही सांगितले असेल तर ते बाजूला काढावे.

५. सत्ता आणि राजकारण
स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांसाठी पन्नास ट्क्के राखीव जागा ठेवण्याचे महाराष्ट्र सरकारने नुकत्च जाहीर केले. (समान पातळीवर आणण्यासाठी आरक्षण असावे हा मुद्दा येऊन गेला आहेच, काही काळाने त्याची गरज भासू नये. पण भारतातले 'आरक्षण' हा पूर्ण वेगळा मुद्दा आहे त्यावर इथे काही लिहीत नाही) . मला वाटते हा निर्णय स्तुत्य आहे. पण भारतातले राजकारणाचे स्वरुप पहाता तिथे आधी जे पुरुष होते त्यांच्याच घरच्या स्त्रिया येणार आणि खरा कारभार मागून त्यांचे पुरुषच चालवणार असे नको. खर्‍या अर्थाने स्त्रियांना राजकारणात संधी उपलब्ध व्हावी. हे फक्त भारतापुरतेच नव्हे. भ्रष्टाचारात स्त्रियांचा सहभाग कमी असतो ही वस्तुस्थिती आहे. ही संधी स्थानिक पातळीवरच जास्त हवी. तिथे लोकांशी थेट संपर्क असतो आणि त्यांचे प्रश्न अगदी जवळून पहाता येतात.
--

देशाच्या राजकारणात सर्वात वरच्या पदावरच्या स्त्रिया आणि त्या देशातल्या स्त्रियांची स्थिती याचा काही थेट संबंध नाही. अमेरिकेसारख्या देशातही अजून स्त्री अध्यक्ष झाली नाही याबद्दल मत वाचले. इथे स्त्रीला माणून म्हणून आणि मुक्तपणे जगण्यासाठी हवे ते सगळे आहे पण तरीही काही उदाहरणे पाहिली तर ते खरे वाटत नसेल. तो त्या स्त्रियांनी स्वतःहून निवडलेला मार्ग असेल किंवा हक्काची जाणीव नसेल किंवा निव्वळ करंटेपणा.

आपल्याला काय करता येईल हे पहाण्यासाठी प्रत्येकाने आपण स्वतः कुठल्या टप्प्यावर आहोत ते ओळखण्याची गरज आहे. इतरांना मदत करायची असेल तर ते कुठे आहेत आणि अजून एक टप्पा पूर्ण करण्यासाठी त्यांना कश्याची गरज आहे हे पाहून त्यादृष्टीने मदत करता येईल. त्यांनी जो टप्पा आधी पूर्ण केला असेल त्याची तुम्हाला मदत होऊ शकेल. कारण या पायर्‍या नाहीत, यात कोणी पुढे किंवा मागे नाही. टप्पे म्हणण्यापेक्षा कदाचित १० गोष्टींची एक यादी आहे आणि त्यातली प्रत्येक गोष्ट करायची आहे असे म्हणता येईल. कोणी १,२,३,६,,७ केल्या असतील तर कोणी ८,९.

'संयुक्ता' सारख्या ग्रूपची गरज भासायला नको असेही कुठेतरी वाचले. स्त्री मुक्त नाही म्हणून हा ग्रूप अस्तित्वात आहे असे काही नाही. समान प्रश्न, रुची असलेले इथे अजून काही ग्रूप आहे त्यातलाच हा. माणूस म्हणून जरी समान असले तरी स्त्री आणि पुरुष म्हणून त्यांचे वेगळेपण कायम राहीलच. गरज आहे की नाही हे ज्या त्या वेळच्या स्त्रियांनाच ठरवू दे.

आपल्या घरापासून/मुलांपासून, विद्यार्थ्यांपासून तर बहुतेकांना सुरुवात करता येईल. जे आपल्याला कळायला काही काळ जावा लागला तेच त्यांच्यावर लहानपणापासून बिंबवले किंवा साध्या कृतीतून दाखवून दिले तर पुढच्या पिढीत यादीतून काही गोष्टी वगळल्याच जातील.

मीपुणेकर | 14 March, 2011

सर्वप्रथम मला खो देऊन लिहिण्याची संधी दिल्याबद्दल राखी चे आभार. आतापर्यंत आलेल्या पोस्टस मधून स्त्रीमुक्ती बद्दल सर्व मुद्दे चर्चेत येऊन गेले आहेत, पण तरीही माझे २ सेंट्स.

माझ्या आई बाबांनी मी, बहीण व भाऊ तिघांनाही सगळ्याचे बाबतीत (शिक्षण, घरकाम, जबाबदारी , घराचे नियम, बँका किंवा बाकी रोजचे दैनंदीन व्यवहार ई) तितक्याच बरोबरीने वागवले.
काही बेसीक गोष्टी जसे की जुजबी स्वेपाक, बँका व बाहेरचे आर्थिक व्यवहार,घरगुती ईले़क्ट्रीक वै ची काम ई तिघांनाही जमल्या पाहिजेत याकडे लक्ष दिलं. मुलगा किंवा मुलगी म्हणुन आम्हाला, भावाला कुठलीही या बाबतीत सवलत नव्हती. आजुबाजूच्या घरांमधे पण असा भेदभाव दिसला नाही, पण काही नातेवाईकांच्या वागण्यामधून हा भेद दिसला, जेव्हा दिसला गोष्ट खटकली तेव्हा मी आणि बहीणीने समोरच्याला विरोध केलाय जेणेकरून असं वागण्यास, बोलण्यास कोणी परत धजावणार नाही.

स्त्रीमुक्ती कि स्त्रीपुरुष समानता? माझ्यामते हे मात्र प्रत्येक उदाहरणानुसार लागू होईल.
१>काही ठिकाणी खरच स्त्रीमुक्ती हेच बिरुद योग्य होईल. कारण समानता वगैरे खूप लांब पण आधी स्त्रीला गुलामासारख वागवण थांबवाव लागेल. आजोळचं फार्म हाऊस एका आडगावी आहे, शाळेत असताना दरवर्षी सुट्टीत तिथे भरपूर रहाणं व्हायच. तेव्हा तिथल्या आजुबाजूच्या काही स्त्रीया त्यांच जगणं (?), त्यांचे प्रॉब्लेम्स हे कितीतरी मोठे आहेत, त्यांना खरच आधी माणूस म्हणून वागवायला हवं हे त्या शाळकरी वयातही कळायचं. दिवसभर त्या बायका शेतात काबाडकष्ट करून. उन्हातान्हात राबून जे ४ पैसे कमवायच्या ते त्यांचे नवरे दारू, बाई चैनीपायी ओरबाडून घेऊन, अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारायचे. त्यांची पोरं भेदरून हा तमाशा रोज पहायची. सकाळी झाली कि मात्र अगदी साळसुद पणे महादेवाच्या देवळात दर्शनाला येणारे त्यांच्यातले काही नवरे दिसले की जिवाचा संताप व्हायचा असं वाटायच की त्यांनी डोकं टेकवल नंदीपुढे कि नंदीने पण त्यांना तशीच लाथ मारायला हवी...

२>स्त्रीपुरुष समानता- माहेरी आमच्या सोसायटीमधे सर्व पांढरपेशे शेजारी, बहुतेक नवराबायको दोघेही नोकरी. आईबाबांच्या जनरेशन मधे नवरे हे वर नताशाने म्हटलय त्या प्रमाणे 'मदत' करायचे. तेव्हा नवरा घरात थोडीफार मदत करतो हेच खूप वाटायचे. माझे बाबा सर्व बँकाचे व्यवहार,बील भरणे, भाजी,ग्रोसरी वगैरे करतात, भाज्या निवडून चिरुन, खोब्र खोऊन देतात , कामवाली बाई नसेल तर दळण पण आणून देतात.थोडक्यात आईवर खूप जास्त लोड येऊ नये म्हणून जमेल तशी मदत करतात. या जनरेशन/या वर्गा मधे स्त्रीमुक्ती पेक्षा स्त्री पुरुष समानता वगैरे च्या दृष्टीने विचार होऊ शकेल असे वाटते.

३>सामाजीक बदलाची गरज, आपल्या घरापासून सुरवात - सुदैवाने मला नवरापण समजुतदार मिळाला.
आम्ही दोघे मिळून घरातील पडतील, असतील ती कामे करतो. कोणा एकावर लोड येत नाही ना हे पाहतो.
जर कोणी माझ्या ओळखीतले लोकं /मित्रमैत्रीणी आले तर तो उत्स्फुर्तपणे चहापाणी करतो कि जेणेकरून मला त्यांच्याबरोबर निवांत गप्पा मारता याव्यात. जर त्याचे मित्र आले तर हेच मी करते. कोणी पाहुणे जेवायला असतील तर जेवाणाचे किंवा खाण्यापिण्याचे मात्र मी स्वतः आवडीने करते,त्याच वेळी तो बाकी जबाबदारी घेतो जसे की डिशवॉशर, घराचा पसारा आवरणे, स्वच्छता करणे. यात प्रत्येक वेळी मला अस जाणवत की तो जेव्हा चहा करतो , व आणून देतो तेव्हा बहुतेक सर्व लोक यात अगदी माझ्या काही मैत्रीणीसुधा (ज्या एरवी स्त्री पुरुष समानता वगैरे बोलताना दिसतात) 'बिच्चारा' नवरा असे म्हणताना दिसतात. पण हेच मी जेव्हा त्याच्या मित्रांसाठी करते (अगदी साग्रसंगीत जेवण वै सुध्दा) तेव्हा त्यापैकी बहुतेक पुरुषांच्या वागण्या/बोलण्यात असे काही 'बिच्चारे' पण माझ्या वाट्याला येत नाही. जसे कि हे माझे कामच आहे आणि त्यात मी केल तर विशेष ते काय?

समानतेसाठी गरजेच्या गोष्टी:
१>आर्थिक स्वावलंबन - मला सर्वात महत्वाचे वाटते ते म्हणजे स्त्रीयांना आर्थिक स्वावलंबन अगदी हवेचं.
यामुळे आपसुक घरातील प्रत्येक निर्णायात सहभाग होतो. म्हणजे ते असेल तर १००% समानता येतेच असे नाही, पण त्यात सुधारणा नक्कीच होते. आर्थिक स्वावलंबनाबरोबर आर्थिक नियोजनही स्त्रीयांनी करायला हवे. माझ्या पाहण्यात अशीही उदा. आहेत ज्या स्त्रीया नोकरी करतात व त्यांच्या पैशाचे पूर्ण व्यवहार पुरुष बघतो आणि त्याने घेतलेल्या निर्णयांची त्यांच्या बायकांना माहितीही नसते. जरी नवर्‍याच्या/बायकोच्या सल्लामसलतीने गुंतवणूक केली त्या व्यवहारांची पूर्ण माहिती दोघांनाही हवी.

२>स्वतःच्या हक्कांबाबतीत जागरुकता- काही स्त्रीया अशा बघण्यात आहेत (अगदी ईथे अमेरिकेत पण) की त्या कुठल्यातरी रीतीचा, परंपरेच्या नावाखाली नवरा, सासरच्यांकडून होणारा अन्याय (हुंडा, लग्नातील मानपान, खर्च) निमुटपणे सहन करतात, त्याला तोंड उघडून साधा विरोधही करताना दिसत नाहीत तुम्हाला स्वतःला स्वतःच्या मदतीची जास्त गरज असते, दुसरा कोणी येऊन आपली सुटका करेल अशी अपेक्षा करु नका.

यामधे पण समानता हवीच :

१>केवळ स्त्री आहे म्हणून ऑफीसमधे मी कोणतीही सवलत घेतली नाही. ऑफीसमधे काही ईश्यु आला तर अगदी २० तास पण थांबून पुरुष सहकार्‍यांबरोबरीने कामे केली आहेत. (यात स्त्रीयांना त्या अनुषंगाने असणारी सवलत जसे की बाळंतपणाची रजा पुर्ण मान्य किंवा अपेक्षीतच)

२> सीनीअर सीटीझन्स पालकांची जबाबदारी :ही पण फक्त मुलाची नसून ती सर्व भावंडांची (मुलगा , मुलगी ) असायला हवी. वृध्द पालक, त्यांचे आजारपण, त्यांची आर्थीक गरज, त्यांना सांभाळण हे सगळं 'फक्त मुलांचीच' जबाबदारी नसावी. त्यातही समानता हवीच.

खरतरं सुरवातीला ही खो लिहायची कल्पना वाचून क्षणभर असं वाटून गेलं, खरच याविषयी फक्त लिहून काही फरक पडणारे का? पण आता मला वाटत जे कोणी आधी 'स्त्रीमुक्ती' या विषयाकडे कुत्सीतपणे/काहीसे टिंगलीच्या भावनेने बघत असतील त्या पैकीने एका व्यक्तीने जरी यामुळे आत्मपरीक्षण केले, त्यांच्या दृष्टीकोनात जर काही पॉसीटीव्ह बदल घडला, अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीमधे हे वाचून जर काही जागरुकता आली तर खरचं हे सगळं सार्थकी लागलं असं मनापासून वाटेल.
संयुक्ता संयोजकांनी यामागे भरपूर परीश्रम घेतलेत व एकूणच या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन, आभार व धन्यवाद!!

महागुरु | 14 March, 2011

अनेकांनी बरीच माहिती/ उपाय लिहलेले आहेत, त्यांचे अनुभव पण लिहले आहेत. बहुतेक सर्वांचे लिहलेले पटले आणि आवडलेही. माझे पण काही अनुभव ...

माझे लहानपण तुलनेने खुप लहान शहरात /गावात गेले. अनेक लोकांच्या विचारावर पारांपारिक रितीरिवाजांचा पगडा. पण अनेक गोष्टींमधुन वेगळेपणाचे अनुभव आले.

१) लग्नामुळे आईचे शिक्षण अर्धवट राहिले होते. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे तिने शिक्षण पुर्ण करण्यासाठी स्थानिक कॉलेजमधे विचारणा केली. सत्तरच्या सुमारास गावात उच्च शिक्षण घेणार्‍या मुली दुर्मिळच.पण कॉलेजमधील सर्व प्रोफेसरांपासुन इतर लोकांनीही प्रोत्साहन दिले.

२) सन ७२-७४ च्या सुमारास, औरंगाबादहुन आलेल्या एका कुटुंबातील बाईने सायकल चालवायला सुरुवात केली. त्यावेळी याचे अनेकांना कुतुहल वाटले असावे पण आज त्याच गोष्टी सहज झाल्या आहेत.
आज अनेक बायका स्वतःच्या (स्व-कमाईच्या) कार मधुन फिरतात.

३) आमची भांडेवाली ही अशीच जवळपासच्या झोपडपट्टीत राहणारी. तिचा नवरा काही-बाही काम करायचा पण सगळा पैसा दारु-जुगार ह्यात जायचा. मग टिपिकल मारहाण वगैरे वगैरे. त्या बाईने काही दिवस सहन केले पण नंतर सव्तःच्या पायावर उभे रहायचे ठरवले. ती अनेक ठिकाणी काम करते, दोन्ही मुलांना (१ मुलगा, १ मुलगी) यांना शाळेत पाठवते. मुले जरी तिच्याबरोबर आली तरी त्यांना तिथे अभ्यासाला बसवायची नाहीतर पेपर वाचायला लावायची. सगळे पैसे बँकेत तिच्या नावावर ठेवले होते. अगदी थोडे घरखर्चासाठी वापरत असे. त्या बाईचे इतरांना पण कौतुक असायचे. तिला झोपडपट्टीत पण कोणी त्रास दिल्याचे तिने कधी सांगितल्याचे ऐकिवात नाही.

४) कोणे एके काळी गावातील बायकांचे आयुष्य चुल-मुल पुरते मर्यादित असेलही पण काळाप्रमाणे बहुतेकांनी विचारचसणी बदलली.शहर खुप छोटे असल्याने नवरा-बायको दोघांनीही नोकरी करायची गरज नाही पण अनेक बायका नोकरी करतात, मुला-मुलीना समान शिक्षण देतात. अनेक बायकातर स्वतः कामधंदा (दुकान वगैरे) अथवा नोकरी करुन घर चालवतात तर घरातील पुरुष सामाजिक कार्य, राजकारण/ समाजकारण, शेती आदी गोष्टींकडे लक्ष देतात.

वरील अनेक घटना सकारात्मक असल्यातरी गावात स्त्रियांना कमीदर्जाची वागणुक देणारी माणसे आहेतच. संपुर्ण परिवर्तनासाठी अनेक वर्षे समाजप्रबोधन करावे लागेल. पण हुंडबळी/ घरातील स्त्रीयांचा छळ ह्या प्रकरणाशी प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष संबंध असेलेल्यांना पण लोक तुच्छतेने वागवतात. त्यामुळे मला अनेकदा मोठ्या शहरातील आम्ही फॉर्वर्ड आहोत असे मिरवणार्‍या आणि घरात सनातनी वृत्तीने वागणार्‍या ढोंगी लोकांचा जास्त तिटकारा येतो त्याच वेळी ह्या लहान सहान घटनेतुन दिसणारा सकारात्मक बदल ही आशादायी आहे

असो, ह्या सर्व गोष्टी एका रात्रीत बदलता येणार नाहीत. वर अनेकांनी लिहल्याप्रमाणे, स्त्री मुक्ती/ स्त्री सन्मान ह्यासाठी सुरुवात स्वतः पासुन करणे योग्य राहील. पुढील वर्षी एकवर्षात ह्या साठी काय काय केले ह्याबद्दलचे अनुभव वाचायला आवडेल.
-----

अगोदर ह्या विषयी मी नविन काय लिहिणार म्हणुन मी खो नाकारला होता. सर्वांचे वाचुन प्रेरणा आली आणि मी ही लिहायचा प्रयत्न केला. संयोजकांनी सर्वांना भाग घेता येईल असा कार्यक्रम आखल्याबद्दल मनःपुर्वक आभार आणि अभिनंदनही.

अनिल७६ | 14 March, 2011

डुआय, खो दिल्याबद्दल धन्स !

स्त्रीला सर्वत्र समान न्याय,वागणुक मिळाली पाहिजे, त्यासाठी स्त्रीनेच जास्त प्रयत्न केले पाहिजेत,तेही पुरुष वर्गाचा याला सुप्त विरोध गृहित धरुन.एका स्त्रीने आपल्याजवळच्या,शेजारच्या,आपल्याशी सबंधित दुसर्‍या स्त्रीला देखील समान वागणुक मिळण्यासाठी आणि देण्यासाठी ठाम रहायल हवं.स्त्री शक्तीमध्ये खुप ताकत आहे पण ती एकत्र येताना खुप कमी दिसते. राज्यामध्ये दारु बंदी विरोधात काही जिल्ह्यात तर खुप चांगल काम करुन दाखवलयं,हे सगळीकडे का होत नाही ,हाही एक प्रश्न आहेच, यासाठी अजुन प्रयत्न व्हायला हवेत अस मला वाटतं.

सर्व पातळीवर समान संधी (जन्म, शिक्षण, करिअर इ.) मिळणं अन् तशी ती मिळवणं हे अत्यंत महत्वाचं. मग त्यासाठी भले ५० % आरक्षण असलं तरी चालेल.पुर्ण अनुमोदन !

आर्थिक स्वातंत्र्य अन् त्याद्वारे मिळणारं निर्णय स्वातंत्र्य. हे ही तितकंच गरजेच आहे. पुर्ण अनुमोदन !

शेवटी या वरील दोन वाक्यांमध्ये बरच काही आलं अस मला वाटतयं ..!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यामुळे माझी सगळ्यांनाच अशी विनंती आहे की, खो देताना नेहेमीची नावे टाळून नव्या / ज्यांचे विचार आपण ऐकले नाहीत अश्या आयडींना द्या. >>> अनुमोदन Happy

हसरी- छान लिहीलेस. लिहीत रहा. Happy
मैत्रेयी, नताशा, नानबा, सायलीमी- अनुमोदन.
फचिन- प्रामाणिक पोस्ट आवडली.

नताशा धन्यवाद खो दिल्याबद्दल.

एलेनॉर रूसवेल्ट्चं एक प्रसिद्ध वाक्य आहे - 'No one can make you feel inferior without
your consent.' अर्थात 'तुमच्या परवानगीशिवाय कुणीच तुम्हाला कमी लेखू शकणार नाही.'
याच धर्तीवर सगळ्या स्त्रियानी स्वतःला मुक्त समजलं तर त्याना मुक्त करायचा प्रश्न येणार नाही.

अर्थात मुक्तीपक्षा समानता हवी असं वाटतं. समानता म्हणजे तू एक काम केलस तर मीपण एकच काम करणार असं नाही. तर समानता म्हणजे एकमेकाना complement करणं आणि निर्भेळ सहजीवन अनुभवणं.

मुलीनी सुरुवातीपासून आपल्या अपेक्षा बोलून दाखवणं गरजेचं आहे. कधीकधी होतं काय की मुलगी नवीन सून बनून दुसर्‍या घरात गेलेली असते. काही गोष्टी नाही पटल्या तर सुरुवातीला बोलून दाखवल्या जात नाहीत. नंतर मग ती सून अपेक्षांच्या ओझ्याखाली दबली तरी जाते नाहीतर मग एकदम ज्वालामुखीसारखी उसळून वाईट तरी ठरते. आधीपासूनच आपलं ठाम मत मांडणं आणि दबावाला बळी न पडणं हे गरजेचं आहे. निदान सुशिक्षित मुलींमध्ये तरी ही समज आली पाहिजे.

मी पाहिलेलं आहे की काही घरांमध्ये मुलाना खरोखरीच इकडची काडी तिकडे करावी लागत नाही. अगदी चहाचा कपसुद्धा सिंकमध्ये ठेवावा लागत नाही. मुलींकडून/सुनांकडून मात्र हे अपेक्षितच असतं. त्यावर कुणीच चहाचा कप उचलू नये ये solution नाही. सुरुवातीपासूनच असे संस्कार असल्याने स्त्री-पुरुष समानता वगैरे नंतरच्या काळात पटलेल्यानाही बदलणं (स्त्री - पुरुष दोघानाही) अवघड जातं. हा अडथळा पार करणही आवश्यक आहे.

समाजात होत असलेले बदल हळूहळू तळागाळापर्यंत झिरपत जातात. माझ्या आईकडे काम करणार्‍या बाईची तिन्ही मुलं (२ मुली आणि तिसरा मुलगा. मुलगा नव्हता म्हणून तिसरा chance घेतला आईने खूप समजावलेलं असूनही) छान शिकली आहेत. निदान ती तरी त्यांच्या आईसारखा विचार करणार नाहीत अशी आशा. स्त्री-पुरुष समानतेचं बाळकडू लहानपणापासूनच पाजलं गेलं तर हाही चांगला बदल दिसेल हे नक्की. फक्त त्याला वेळ द्यायला हवा.

थोडक्यात कुणी आपल्याला मुक्त वगैरे करेल अशी अपेक्षा न बाळगता आपल्यापासूनच सुरुवात करणे हे मस्ट.

बर्‍याच जणानी आपले विचार लिहिले आहेत. सगळच सार त्या पोस्टमध्ये आहे तरी लिहिण्याचा मोह आवरला नाही.

असो. शेवट परत एलेनॉर रूसवेल्टच्याच विधानाने. Do what you feel in your heart to be right - for you'll be criticized anyway. You'll be damned if you do, and damned if you don't.
मग जे बरोबर आहे असं हृदयापासून वाटतय ते करण्यात काय चूक?

माझा खो सावनी आणि मनिषा लिमये याना.

क्षमस्व, मी खो द्यायला विसरलो. मला खो लालूला द्यायचा आहे. लालूने कृपया लिहावे ही विनंती. Happy

नानबा, सायलीमी, मैत्रेयी, फचिन सगळ्यांच्याच पोस्ट्स आवडल्या.
समानता म्हणजे तू एक काम केलस तर मीपण एकच काम करणार असं नाही. समानता म्हणजे एकमेकाना complement करणं>> अगदी अगदी झेलम. चांगली पोस्ट. आणि हो, मला खो दिल्याबद्दल धन्यवाद Happy उद्या रात्रीपर्यंत नक्की लिहीन.

थॅक्स झेलम. मला खो दिल्याबद्दल.

आधी काय लिहायचय ते वाचते सगळ आणि मग या विकांताला लिहिते त्यावर.

सायलीमी, खो दिल्याबद्दल धन्यवाद!

प्रसंग १:
मला दुसरी मुलगी झाली तो दिवस. मला पहिलीही मुलगीच आहे. २० तासाच्या लेबरनंतर सगळं सुखरूप पार पडलं म्हणून मी, नवरा, सासुबाई खूप खूश होतो. डिलीव्हरी होउन जेमतेम अर्धा तास होत होता. लेबर रूममध्ये आत्तापर्यंत मदतीला असलेली अमेरिकन नर्स म्हणाली "आता तिसरा पण चान्स घेच. एक मुलगा पाहिजेच".

प्रसंग २:
५ वर्षाच्या ब्रेकनंतर परत नोकरी शोधणे सुरू होते. ५ वर्षाच्या ब्रेकचे कारण मी सरळ त्या काळात मुले झाली आणि त्यांच्या बरोबर राहता यावे म्हणून ब्रेक घेतला असे खरे खरे सांगायचे. एका मोठ्या प्लेस्मेंट एजन्सीच्या अमेरिकन बाईनी मला सांगितले की, "हे कारण देत जाऊ नकोस. मी पण आई आहे आणि मला कळतंय तुझं कारण तुझ्या दृष्टीनी किती बरोबर आहे ते. पण कंपन्यांना हे ऐकायचं नसतं हे मी माझ्या अनुभवावरून सांगतिये. ते तुझ्याकडे २ मुलांची आई, मग हिला जास्त काम सांगता येणार नाही असं बघतील आणि तुला सिलेक्ट करणार नाहीत." शेवटी माझे खरे कारण सांगून मला चांगल्या कंपनीत नोकरी पण मिळाली, त्यामुळे सगळ्याच कंपन्या असा विचार करत नाहीत. पण तिला मला हे सांगावसं वाटलं त्यावरून काही कंपन्यातरी असा विचार करतात हे कळले.

वर ह्या दोन्ही बायका अमेरिकन होत्या हे सांगायचं कारण म्हणजे सगळे प्रगत प्रगत म्हणतात त्या देशात वाढलेल्या स्त्रीयादेखिल अजून असेच विचार करतात किंवा दुसर्‍या प्रसंगानुसार तसे विचार करायला लागतात ह्या बद्दल खूप आश्चर्य वाटलं होतं. लहानपणापासून घरी स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं, स्वतःचे विचार असण्याचं स्वातंत्र्य मिळालं. मुलगी म्हणून कधीही दुय्यम वागणूक मिळाली नाही. आजुबाजुलापण मुलगे आणि मुली सरख्याच पद्धतीनी वाढवलेले आढळले. त्यामुळे स्त्रीमुक्ती ही पेपरमध्ये छापून येणार्‍या काही बातम्यांमधील दुर्दैवी स्त्रीयांना लागू होणारी कन्सेप्ट आहे, अशी माझी कितीतरी वर्षे कल्पना होती. पण वरील २ प्रसंगामुळे ती नक्कीच बदलली.

सायलीमीनी लिहील्या प्रमाणे आताच्या पिढीतील बरेच पालक मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक न करता अतिशय उत्तम रितीने मुलांना वाढवत आहेत. पण अशा पालकांची टक्केवारी काय आहे? ही टक्केवारी जेंव्हा वाढेल आणि अरुंधतीनी दिलेली टक्केवारी जेंव्हा बदलेल तो असेल खरा महिल दिन!

माझा खो (१) : आऊटडोअर्स, खो (२): मीपुणेकर

महिला दिनानिमित्त हा बीबी सुरु केल्याबद्दल संयुक्ता संयोजकांचे आभार. मला खो दिल्याबद्दल राखीचीही आभारी आहे.

मला चांगलं लिहिता येईल की नाही माहित नाही, परंतू खो दिलाय तर थोडंफार काहीतरी मनातलं मांडते. स्वातंत्र्याची किंमत त्यांनाच कळते ज्यांना ते मिळत नाही. माझ्याबाबत बोलायचं झालं तर सुदैवाने आजपर्यंत अशी वेळ कधीच आली नाही. सायोने वर लिहिलंच आहे, आम्ही चार बहिणी. त्यावेळेस कदाचित आई-बाबांना एखादा मुलगा व्हावा असं वाटलंही असेल, माहित नाही. पण मुलगा झाला नाही म्हणून त्याचा खेद्/खंत आम्हांला कधीच जाणवली नाही. साधारण मुलांना जे स्वातंत्र्य दिलं जातं तेच स्वातंत्र्य आम्हांलाही कायम मिळालं. त्यात आम्ही मधल्या दोघी जुळ्या. दोघींमधला फरक ओळखायला सोपं जावं म्हणून असेल, पण मी कायम पँट-शर्ट मध्ये व बहिणाबाई कायम मुलीच्या वेशात. आवडी-निवडीही तशाच. मला आठवतही नाही मी कधी भातुकली किंवा साधारण मुली जे खेळ खेळतात ते खेळल्याची. मी कायम मुलांमध्ये क्रिकेट खेळत असायची. बिनदिक्कत हाफ पँटमध्ये आसपासच्या भागात फिरायचे. पण त्यावरून आई-बाबांनी कधी टोकल्याचं मला आठवतही नाही. ट्रेक्सना जातानाही आई-बाबांनी कधीच आडकाठी केली नाही. एकंदरीत एक मुलगी म्हणून कधीच वेगळी वागणूक मिळाली नाही घरी किंवा बाहेर अथवा कामाच्या ठिकाणीही.

लग्नानंतरही असं कधीच जाणवलं नाही. घरातल्या कामामध्ये नवरा कधीही लाज न बाळगता मदत करायची तयारी दर्शवतो. कधी मी जेवत असेन तर सिंकमधली भांडी घासून टाकतो, त्यात माझंही ताट घासणं ओघाने आलंच. त्यामुळे हे काम तुझं आहे, तूच करायचं हे ऐकायची वेळ आली नाहीये.

बाकी मैत्रिणींमध्ये किंवा ओळखीमध्ये वर सगळ्यांनी लिहिलेली उदाहरणं बघण्यात आली आहेत. परंतू स्वानुभव नाही. पण एकंदरीत वरचं सगळं वाचल्यावर असं वाटतं की हे फक्त भारतातच नाही तर जगभरात सगळीकडेच चालतं. पुरुषांना व बायकांनाही आपले विचार बदलण्याची खूप आवश्यकता आहे व बाकीचे बदलायची वाट न बघता आपण आपल्यापासूनच सुरुवात करायला हवी.

माझा खो - भानस व मिनी

"स्री मुक्ती" खरं सांगू का मला ह्या शब्दाचा अर्थ नीटसा कधी लावताच येत नाही. स्री ची मुक्तता ?? कशातून? कोणापासून? इथे बर्‍याच जणांच्या पोस्ट्स मधून हाच प्रश्न बघितला पण बर्‍याच जणांच उत्तर स्री-पुरूष समानता ह्या शब्दापाशी थांबलेलं पाहिलं. "स्री पुरूष समानता" हा शब्द जास्ती पटतो मनाला. स्त्री मुक्ती म्हणलं की माझ्या सुद्धा मनात काहीसे पौर्णिमेच्या पोस्ट मध्ये तिने लिहिलयं तसेच विचार येतात.
स्त्री-पुरूष समानता ह्यावर वेगळा काही विचार करण्याची कधी वेळच आली नाही. कारण लहानपणापासून ती बघतच आले.घरात आई आणि बाबा दोघही नोकरी करणारे असल्याने त्यांच्यात कामाची कायमच समान वाटणी होती. अगदी बाबांच्या लहानपणापासून सांगायचं तर ते ५ ही मुलगेच घरात आणि आईची तब्येत कायम तोळामासा असल्याने माझे सगळे काका, बाबा घरकामात, स्वैपाकात अगदी तरबेज आहेत. या उलट आईकडे तिघी बहीणी त्या काळात डबल ग्रॅज्युएट झालेल्या. मामी घरात आली तेव्हा ग्रॅज्युएट नव्हती आणि आजोबांना शिक्षणाची अतिशय आवड त्यानी धाकट्या मावशीच्या प्रवेशाच्या वेळी मामी ला सुद्धा कॉलेजात नाव घालायला सांगितलं. मामीने लग्नानंतर २ मुलांना सांभाळत डिग्री पूर्ण केली. ह्या सगळ्यामुळे मी मोठी होत असताना स्त्री चा दुय्यम दर्जा वगैरे हे विचार मनाला शिवले देखिल नाहीत. नात्यात, शेजारीपाजारी, कितीतरी मैत्रिणी ह्यात दोघी मुलीच किंवा एकुलती एक मुलगीच असलेली उदाहरणं आहेत पण त्यासाठी कधीच कुणी वाईट वाटून घेतय असं एकही उदाहरण मी पाह्यलं नव्हतं. आई बाबांनी ही कधीच माझ्यात आणि भावात फरक केला नाही. उलट माझं इंजिनीयरींग चं शिक्षण पेमेंट सीट मधून झालयं आणि धाकट्या भावाचं फ्री सीट. डिप्लोमा करताना आधीच ३ वर्षे दूर राहिल्याने बाबांना जेव्हा लक्षात आलं की कदाचित थोडक्यासाठी मला पुन्हा एकदा पुण्याबाहेर जावं लागेल त्यांनी निर्णय घेऊन टाकला. कॉलेजमध्ये सुद्धा ५ पैकी ३ मुली होतो आम्ही पेमेंट्सीटच्या. आणि गंमत म्हन्जे आम्ही तिघी जणी फर्स्ट क्लास ने बी ई पास झालो पण ती मुलं मात्र रखडली होती.

लग्नानंतर सासर सुद्धा मोकळ्या वातावरणाचं मिळालं. सासरच्यांनी अवास्तव अपेक्षा, बंधन ह्यात कधीच अडकवलं नाही. सासरी सुद्धा शिक्षणाला खूप महत्व. लग्नानंतर आधी नवर्‍याने त्याचे दुसरे मास्टर्स पूर्ण केले. मग मुलगा दोन वर्षाचा झाल्यावर नवरा म्हणाला आता मी बॅकसीट वर आणि तू एम एस करायला घे.
घरात मी अन नवर्‍याने कामाची वाटणी अशी केलेलीच नाही. ज्याला समोर जे काम दिसेल , वेळ असेल त्याने करायचं.
माझ्या कामाचं स्वरूप असंय की मी घरून काम करूच शकत नाही. पण त्याला २४/७ घरून केले तरी चालते. त्यामुळे मुलांच्या आजारपणात बर्‍याचदा त्यालाच घरी रहावं लागतं.

पण ही झाली माझ्या घरापुरती माझ्यापुरती स्त्री पुरूष समानता. इकडे अमेरिकेत आल्यानंतर उलट अंजली, दीपांजली ने लिहिलेली उदाहरणं पाहिली की चिडचिड व्हायची. उच्चशिक्षीत मुली सुद्धा जेव्हा असे विचार करतात ते बघून स्पीचलेस व्हायला होतं. मी दुसर्‍यांदा प्रेग्नंट असताना एका मैत्रिणीने विचारलं होतं, काय ग पहिला मुलगाच आहे न मग कशाला दुसर्‍याचा विचार? मला खरच त्याक्षणी तिच्या पदव्यांची कीव आली. एवढं शिकून विचार जर अठराव्या शतकातलेच राहणार असतील तर काय उपयोग? विचारांना काळ, स्थळ याचं बंधन नाही हे बघून वाईट वाटलं.
अरूंधती ने दिलेली आकडेवारी खडबडीत जागं करणारी आहे. पण आजूबाजुला सुशिक्षीत आणि सो कॉल्ड सुसंस्कृत म्हणवणार्‍या समाजात सुद्धा हे बघितलं की चिड्चिड होते.
ते जसं म्हणतात की छोटी छोटी गोल्स ठेवून त्यांची पूर्तता करावी. त्याप्रमाणे आपण प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरवात करायला हवी. आज जी परिस्थिती आहे ती पूर्णतः बदलणं कदाचित शक्य नाही पण निदान हे विषारी विचार पुढच्या पिढीपर्यंत पोचणार नाहीत एवढा प्रयत्न तर आपण सगळे नक्कीच करू शकतो. आज आपण जे वागणार आहोत , जे विचार रुजवणार आहोत त्यातून पुढची पिढी तयार होणार आहे. त्यामुळे सुशिक्षीत अणि तेवढीच सुसंस्कृत पिढी तयार करुया.

संयोजक लिहायला उशीर झाल्याबद्दल सॉरी. झेलम खो साठी धन्यवाद Happy

अगं मी परवाच बी आणि रूणुझुणु ला देऊन ठेवला होता खो जेणेकरून त्यांना वेळ मिळेल लिहायला. पण त्यांना जमत नसेल तर माझा पुढचा खो
१) संपदा
२) श्रुती
३) वर्षा ११

सर्वप्रथम संयुक्ता आणि आडोला खुप खुप धन्यवाद.

ह्या विषयावर भरपूर जणांनी भरपूर लिहिलं आहे आत्तापर्यंत. पण माझ्यामनातलं थोडंसं लिहिण्याचा प्रयत्न करते.

मला स्वःताला "मुक्ती" ह्या गोष्टीपेक्षा "सुख/ समाधान" ही गोष्ट जास्त महत्त्वाची वाटते. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या (मी मुद्दाम व्यक्ती असं म्ह्टलं आहे, कारण ही गोष्ट पुरुष किंवा स्त्री दोघांना सारखीच लागू होते. ) आयुष्यात सगळ्या प्रकारचं स्वातंत्र, स्थैर्य, आर्थिक सुबत्ता आहे, पण ती व्यक्ती इतकं सगळं असुनही सुखी/ समाधानी नसेल तर मग त्या सगळ्या गोष्टी असण्याला काहीच अर्थ नाही. माझ्या पाहण्यात किती तरी अश्या मुली/ स्त्रीया आहेत की ज्या नवर्‍याला/ सासु-सासर्‍यांना विचारल्या शिवाय किंवा त्याच्या परवांगीशिवाय काही करत नाही. पण त्यात त्यांना समाधान मिळतं. वरकरणी पहाणार्‍याला असं वाटू शकतं की ह्या स्त्रीला काहीच निर्णय स्वातंत्र नाही. पण तिच्या दृष्टीने कदाचित ह्या गोष्टीने ती खुष आणि समाधानी असेल. मला वाटतं की स्त्री मुक्ती हे खुप अंशी व्यक्ती सापेक्ष आहे. मला जी गोष्ट खटकते, ती समोरचीला खटकू शकेल असं नाही. As long as some one is doing something by his/ her choice and he/ she is happy about it, it shouldn't be an issue.

आणि आपण खरं तर खुप लकी आहोत. खरी स्त्रीमुक्तीची गरज खेड्या-पाड्यात आहे. जिथे आजही स्त्रियांना बेसिक सुविधा मिळत नाहीत. माझ्या पहाण्यात अश्या कितीतरी मुली आहेत कि ज्यांचं वयात येण्याच्या आधी लग्न झालेलं पाहिलं आहे. तिथे अजुनही त्यांच्या आहाराविषयी, तब्येतीविषयी आणि मुख्य म्हणजे त्यांच्या सुरक्षतेविषयी जागरुकता नाही. आजही पेपरामध्ये उन्हाळ्यात पाण्याचे हंडे घेऊन फिरण्यार्‍या बायकांचे फोटो दिसतात पण त्यात फार कमी वेळा एखाद्या पुरुषाचा फोटो असतो. खरं तर ४-५ किमी अंतरावरुन पाण्याचे हंडे आणणं हे प्रचंड कष्टाचं काम. पण त्याकामाचा भार कायम घरच्या स्त्रीवर पडलेला दिसतो. माझ्या दृष्टीने खेड्यातल्या महिलांना, २ वेळेचं पोटभर अन्न, अंग झाकायला पुरेसे कपडे आणि निर्भिडपणे कुठेही वावरता येईल तो खरा सुदिन. वैचारिक स्वतंत्र, निर्णय घेण्याचं स्वातंत्र ह्या गोष्टी खुप नंतरच्या आहेत.

मला नेहमी वाटतं की पुरुष आणि स्त्री ह्या एकमेकांना पुरक असतात. म्हणजे मला जर माहित आहे की माझा नवरा अमुक एक गोष्टीमध्ये माझ्यापेक्षा खुप चांगला आहे तर ते काम त्याला करु द्यावं. मग तिथे उगाच मी किंवा बाकीच्यांनी "मला अमुक एक गोष्ट करण्याचं स्वातंत्र नाही" असं म्हणणं चुकीचं आहे.
निसर्गाने स्त्री आणि पुरुषांनी असंच घडवलं आहे की जेणेकरुन ते एकामेकांच्या वैचारिक, मानसिक, शारिरिक गरजा पूर्ण करु शकतील. मग जर हे असं आहे तर आपण सगळ्यांनी ते स्विकारुन सगळ्याच व्यक्तींना समानतेची वागणुक द्यायला हवी आणि हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी अखिल मानवजात मुक्त होईल. हे सगळं एका दिवसात किंवा एका पिढीत होईल असं ही नाही. पण सध्याचं चित्रं नक्कीच आशादायक आहे.

माझा खो, मन्-कवडा आणि राहुल (काका)

भावना मस्त लिहिलयस.. माझ्या पोस्टमध्ये मी ह्या मुद्द्याचा फक्त ओझरता उल्लेख केला होता.. तू एकदम नीट मांडलायस... Happy

मला नेहमी वाटतं की पुरुष आणि स्त्री ह्या एकमेकांना पुरक असतात. म्हणजे मला जर माहित आहे की माझा नवरा अमुक एक गोष्टीमध्ये माझ्यापेक्षा खुप चांगला आहे तर ते काम त्याला करु द्यावं. मग तिथे उगाच मी किंवा बाकीच्यांनी "मला अमुक एक गोष्ट करण्याचं स्वातंत्र नाही" असं म्हणणं चुकीचं आहे. >>>>>>
मागे लालूने कुठेतरी साधारण असेल विचार मांडले होते (कुठल्या बाफवर की चॅटवर ते आठवत नाही.. ) तिने स्वयंपाक आणि बाकीची कामे अशी उदाहरणं दिली होती.. ती पण एकदम पटली होती..

बाकीच्यांच्या पोस्टही छान.. !

मिनी, चांगली पोस्ट. पुरक असण्याचा मुद्दा थोडा पटला थोडा नाही. एखादं काम तुझ्या नवर्‍याला चांगलं जमतय म्हणून तू ते त्याला करु देणं आणि एखादं काम बाई आहे म्हणून मला जमणारच नाही किंवा ते मी करणारच नाही ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्याचं क्लासिक उदाहरणं म्हणजे ड्रायव्हिंग. किती तरी बायका मी ड्रायव्हिंग करतच नाही, करणारच नाही, मी फक्त हाय वे वर ड्राइव्ह करते, मी हाय वे वर ड्राइव्ह करत नाही ह्यातलं काय काय म्हणतात. मग जी गोष्ट आपण कधी केलीच नाही ती गोष्ट आपोआपच नवरा सवयीने आपल्यापेक्षा जास्त चांगली करणारच.

पुरुषांच्या बाबतीत ह्याचं उदाहरण म्हणजे अर्थातच स्वयंपाक आणि घरकाम. आपल्याला बॉ नाही सवय घरकामांची आणि सवय करायची पण नाही हे इतकं बेजबाबदार विधान इतक्या सहजपणे लोकं करतात. मुलींना घरकाम शिकवण्याकडे बर्‍याच लोकांचा कल असतोच. मग हे असे नग नवरे भेटल्यावर पुन्हा तेच होतं. कालांतराने सवयीने बाई ही कामं अधिक चांगली करु लागते.

पुरुषांच्या बाबतीत ह्याचं उदाहरण म्हणजे अर्थातच स्वयंपाक आणि घरकाम. आपल्याला बॉ नाही सवय घरकामांची आणि सवय करायची पण नाही हे इतकं बेजबाबदार विधान इतक्या सहजपणे लोकं करतात. मुलींना घरकाम शिकवण्याकडे बर्‍याच लोकांचा कल असतोच. मग हे असे नग नवरे भेटल्यावर पुन्हा तेच होतं. कालांतराने सवयीने बाई ही कामं अधिक चांगली करु लागते.

<< अगदी !!
अत्ताचं माहित नाही पण मी भारतात होते त्या वेळी होम सायन्स ला तर काय फक्त मुलीच अ‍ॅडमिशन घेउ शकायच्या.. मुलं नाही.. Uhoh
शाळेत सहावीत मुलींना हॉबी सब्जेक्ट शिवण आणि मुलांना हस्तव्यवसाय.

डिजे याच्या अगदी उलट ,आमच्या कॉलेज मध्ये प्रॉडक्शन इंजिनियरिंग ला कधीतरी एखादीच मुलगी असायची. कारण मशीन जॉब जमणार नाही. त्यामुळे बर्‍याचजणी prod/mech ची आवड असुनही इले. किंवा कंप्युटर घ्यायच्या.
मिनी , आडो, सावनी छान लिहिलय.

सिंडी आणि डीजेला अनुमोदन. बर्‍याच गोष्टी या सरावाने जमतात. स्वयंपाक, शिवण वगैरे घरगुती पातळीवर बायकांची समजली जाणारी कामे जेव्हा व्यावसायीक जगात आचारी, शिंपी म्हणून पुरुष करतात तेव्हा अतिशय सफाईने करतात . तिच गोष्ट ड्रायविंगची. इथे बराच काळ राहिल्यावर सवय गेल्याने देशात ड्रायविंग करायला नवरा कचरतो, त्याचवेळी रोजच्या सवयीने बहिणी, वहिन्या, भाच्या वगैरे स्रीवर्ग बिंदास गाड्या हाकतात.
ज्या गोष्टी करण्यासाठी शारिरीक बळ लागते त्या बाबतीत जर का स्त्री दणकट असेल तर सहज करते या उलट तब्येत नाजूक असेल तर पुरुषालाही हे जमत नाही. इथे जेव्हा भिन्नवंशाच्या लोकांमध्ये काम करायची वेळ येते तेव्हा हे अधिकच जाणवते. माझा नवरा फाउंड्री इंडस्ट्रीत हे रोज अनुभवतो. बेताची उंची, त्यात हार्नियाच्या ऑपरेशनमुळे वजन उचलण्यावर रेस्टिक्शन. लाईनवर काम करणार्‍या ६फूट उंच, डबल हाडापेराच्या स्त्रीया अवजड कास्टिंग सहज उजलुन याच्या टेबलवर टाकतात. वर बजावून सांगतात एकटा उचलायला जाऊ नकोस. तेच कास्टींग दुसर्‍या टेबलवर टाकायला माझ्या नवर्‍याला अजुन दोन जपानी मदतीला लागतात.

हसरी व संयुक्ता संयोजक दोहोंचे सर्वप्रथम आभार.

स्त्रीमुक्ती ह्या शब्दातून तुम्हांला काय अपेक्षित आहे? काय वाटतं? >> खरं तर स्त्री मुक्ती ऐवजी दुसरी काही पर्यायी शब्दयोजना होणे शक्य नाही का? मुक्ती म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? कुणाच्या पाशातून / मोहातून मुक्ती? की कुणाच्या जाचातून मुक्ती? माझ्या मते अशी स्त्री काय तर पुरूष मुक्ती सुद्धा शक्य नाही!

>>>मुक्त, मुक्त म्हणजे तरी काय म्हणे? एखादी साधी, सोपी, सरळ आणि बहुसंख्य समाजमनाला मान्य होणारी व्याख्या आहे का? कोण्या एका वा एकीला जी व्याख्या मान्य असेल, जवळची वाटेल, तशी त्याच तीव्रतेने दुसर्‍या व्यक्तीला महत्वाची आणि आपलीशी वाटेलच, असं नसतंच कधी.>>> हे एकदम पटलं पण मी म्हणतो समाजाला पटेल, रूचेल अशी काही मुक्तीची व्याख्या जर शक्य नाही तर तशी ती न करता आपल्याला काय वाटतं हे सांगणं व जमल्यास पटवणं, न पटल्यास सोडून देणं आपल्या हातात आहे!

जे काय थोडं फार वाचलंय आणि बघितलंय त्यावरून लिहायचा प्रयत्न करतोय.

सर्व पातळीवर समान संधी (जन्म, शिक्षण, करिअर इ.) मिळणं अन् तशी ती मिळवणं हे अत्यंत महत्वाचं. मग त्यासाठी भले ५० % आरक्षण असलं तरी चालेल.

आर्थिक स्वातंत्र्य अन् त्याद्वारे मिळणारं निर्णय स्वातंत्र्य. हे ही तितकंच गरजेच आहे.
वेतनात समानता हा मुद्दा कुठंतरी वाचला. दोन्ही ठिकाणी कामं (ऑफिस अन् घर) करून समसमान वेतन मिळणार असेल तर घरच्या कामांचे दिवस समसमान ३-३ असे वाटले गेले पाहिजेत.
आधीची पिढी अन् आत्ताची पिढी हयात फार फरक आहे! का म्हणून? हा प्रश्न जेवढ्या ईझिली आम्ही विचारू शकतो तेवढ्याच ईझिली कामाची समसमान वाटणी (मदत नव्हे!) करणे जमलेच पाहिजे.

सामाजिक पातळीवर हे बदल घडण्यासाठी फार मोलाची मदत होईल ती 'ईडियट बॉक्सची' हो! रूढीप्रिय तद्दन बेक्कार मालिका न बनविता काही तरी नवे प्रयोग केले गेले तर मदतच होईल.

टण्याचा मुद्दा क्र ३ ज्या दिवशी प्रत्यक्षात येईल तो सुदिन म्हणावा लागेल. पण त्याला अजून खूप वेळ जावा लागेल.

माझा खो - अनिल ७६ अन् रितू ह्यांना.

एखादं काम बाई आहे म्हणून मला जमणारच नाही किंवा ते मी करणारच नाही >>>>>> हे किंवा अश्यासंदर्भातलं काही मिनीच्या पोस्टमध्ये कुठे आहे ??? Uhoh

"एखादी गोष्ट दुसर्‍याला चांगली येत असल्यास (आणि आपल्याला ती नीट जमत नसल्यास) ती त्याला करू द्यावी.." हा मिनीचा मुद्दा आहे (असं मला वाटतय)...
मला तरी ह्यात "दुसर्‍याला चांगली येते म्हणून मी ती शिकणारच / कधी करणारच नाही" असं काही म्हंटल्याचं जाणवत नाहीये..

असो..

ड्युआय, छान मांडलं आहेस मित्रा. पण काही मुद्यांना फाटे फोडतो आहे त्याच समाजाचा एक घटक म्हणून.

सर्वात कठीण म्हणजे 'समाज' या प्रवृत्तीला स्त्रीमुक्ती कल्पनेच्या एका साचेबंद आखाड्यात आणणं. कारण आपण तितका मुद्दा मांडू शकतो पटवूनही देऊ शकतो अगदी म्हणायचंच झालं तर पेटवून स्त्री क्रांतीचा उदयही साध्य करू शकतो. पण तो समाज जेव्हा वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर विचार करेल तेव्हा त्याच्या कुटुंबातल्या स्त्रीला त्याचा थोडा त्रास सहन करावा लागेल. हा मोठा अन गहनप्रश्न आहे ह्या एकंदरीत झालेल्या चर्चेचा.

एका स्त्रीचे कार्यक्षेत्र निवडण्याचा अधिकार हा समाजाला देण्यापेक्षा तो सर्वस्वी त्या स्त्री ला द्यावा. अन त्या स्त्रीला तो भार यशस्वीरित्या पेलण्याचा आत्मविश्वास पुन्हा त्या समाजातूनच मिळावा हे म्हणजे स्त्रीमुक्तीसाठी मिळालेलं किंवा मिळवलेले ऐच्छिक यश असेल. याबाबत उत्तम उदाहरण हवं असल्यास. सुधा मुर्ती अन त्यांचा टाटा मोटर्स पुणे येथिल संघर्ष. शॉप फ्लोअरवर त्याकाळात पुरषांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारी ती यशस्वी स्त्री ठरली.

मालिका, नाटक, कादंबर्‍या किंवा लेख ललित यासारख्या गोष्टी फक्त त्यासाठीच लिहिल्या जात नाही. आपल्याला दाखवलं जातं ते पटत नसेल तर आपण त्यातून शहाणं व्हायचं हे मला वाटतं. कारण जेव्हा ती स्त्री त्या एखाद्या खडूस सासूचं पात्र निभावत असते तेव्हा ती तशीच असते असं नाही किंवा एखादी स्त्री बलात्कारीक स्त्रीची भूमिका दाद देण्यासारखी निभावते म्हणजे खरोखर तीच्यावर तो प्रसंग घडत नसतो. ते जर दाखवलंच गेलं नाही तर काय होईल? विचार करा. मास्तर चुकले म्हणून विद्यार्थ्याने तीच चुक केली तर तो अभ्यास म्हणवत नाही. अभ्यास हा मार्गदर्शनातून स्वकिय कृतीतून योग्य अन ऐच्छिक यश संपादित करण्यासाठी असतो.

मुळात ५०-५० ची गरजंच काय आहे? एखाद्या स्त्री कडे बघताना या अश्या भेदभाव पातळीचा विचारच करू नका. उलंट एवढं कठीण अन खडतर आयुष्य जगणारी ऐकमेव व्यक्ती आहे ती,जीला आई होण्यासाठी संघर्ष करावा लागतो, जी ला बहिण होण्यासाठी प्रेम,जिव्हाळा सतत जोपासावा लागतो, जीला बायको म्हणून जगताना पुर्वायुष्य अन भविष्य यामधे आयुष्यभर डोंबार्‍याचा खेळ खेळावा लागतो तीला स्त्री-पुरूष पातळीच्या लेखाजोखामधे का सामील करायचं. तीला फुलपाखरू म्हणून जगायचंय ना तीच्या जबाबदार्‍या संभाळून मग जगू द्या. तीला परी म्हणून काळजी करायचीये ना सगळ्यांची मग करू द्या ना. आपण का उगाच भुतांच्या राज्यात जाऊन रहायचं. माणसं आहोत ना मग माणसारखं वागूयात ना थोडं. काय म्हणता?

पराग म्हणतोय ते बरोबर आहे. असं नाहिए की आपण एकदी गोष्ट शिकु(च) नये. पण मला जर माहित आहे कि दुसर्‍याला ते जास्त चांगल्ं जमतं तर त्याला करु द्यावं. अर्थात हे सगळ्याच गोष्टींना लागू होतं असं काहीच नाहिए. सिंडी, तु म्हणालीस तसं ड्रायव्हिंग शिकणं, किंवा स्वयंपाक शिकणं हे खुप आवश्यक आहे. अगदीच एक्पर्ट व्हायला हवं असं काही नाही, पण वेळ पडली की करता आलं की पुरेसं आहे.
अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याकडे सुनितला फायनान्स नीट मॅनेज करता येत नाही. आणि मला त्याच्यापेक्षा ते चांगलं जमतं, तसं तो मान्य ही करतो. ज्या दिवशी मी लग्न करुन इथे आले, त्या दिवशी त्याने सगळे व्यवहार माझ्या हातात दिले. आणि तेव्हापासुन सगळं मीच बघते. पण ह्याचा अर्थ असा नाही कि त्याला काही माहित नसतं. मी त्याला दर वेळी कंन्सल्ट करत असते, सगळ्या गोष्टी दोघं मिळुन ठरवतो. ह्यात कुठेही तो घरातला मुख्य कर्ता पुरुष असुन त्याच्या हातात व्यवहार नाही असा भाव नाही. मला ते चांगलं जमतं आणि म्हणुन मी ते करते. इतका साधा सरळ अर्थ आहे. मी ह्या अश्या गोष्टींबद्दल बोलत होते. Happy

एखादं काम बाई आहे म्हणून मला जमणारच नाही किंवा ते मी करणारच नाही > हे किंवा अश्यासंदर्भातलं काही मिनीच्या पोस्टमध्ये कुठे आहे ?
>>

मी पण आधी हेच लिहिणार होतो. पण म्हटलं, जाऊ दे.

Pages