तुरीया पात्रा वाटाणा

Submitted by मंजूडी on 12 March, 2010 - 02:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शिरा, साल काढलेले मध्यम आकाराचे दोडक्याचे तुकडे - २ वाट्या
मटाराचे दाणे - २ वाट्या
अळूवड्या - एका उंड्याचे तुकडे म्हणजे साधारण दिड वाट्या(उकडलेल्या पण न तळलेल्या)
जिरं (फोडणीत घालण्यासाठी) - १ चहाचा चमचा
आल्याचा कीस - १ चहाचा चमचा
२ हिरव्या मिरच्या
जिरं - १ चहाचा चमचा
धने - १ चहाचा चमचा
हळद - पाव चहाचा चमचा
एका लिंबाचा रस
ओलं खोबरं - ७-८ चमचे
बारीक चिरलेली कोथिंबीर - ३-४ चमचे
मीठ, साखर चवीप्रमाणे
फोडणीसाठी साजूक तूप - ३ चहाचे चमचे

क्रमवार पाककृती: 

तुरीया म्हणजे दोडका, पात्रा म्हणजे अळूवडी. एरवी दोडक्याची फारशी न आवडणारी भाजी ह्या गुजराथी प्रकाराने केली तर फारच छान लागते.

कढईत धने आणि जिरं कोरडंच भाजून त्याची बारीक पावडर करून घ्यावी. मिरच्यांचे बिया काढून मध्ये चीर देऊन अगदी बारीक तुकडे करून घ्यावेत. कढईत फोडणीसाठी तूप तापवून घेऊन त्यात जिरं आणि मिरच्यांचे तुकडे घालावेत. आल्याचा कीस घालून जरा परतावे. मग दोड्क्याचे तुकडे घालून कढईवर झाकण ठेवून एक दणदणीत वाफ येऊ द्यावी. मग झाकण काढून त्यात मटाराचे दाणे आणि २ वाट्या पाणी घालावे. पाणी उकळू लागले की त्यात हळद, धने-जिर्‍याची पावडर घालावी. अळूवड्या घालाव्यात. ४-५ चमचे ओलं खोबरं आणि १-२ चमचे कोथिंबीर घालावी. चवीप्रमाणे मीठ साखर आणि लिंबाचा रस घालावा. झाकण न ठेवता मंदाग्नीवर भाजी उकळू द्यावी. दोडका शिजला की भाजी तयार झाली. पण ही भाजी अगदी गिच्च शिजवायची नाही. रस सुद्धा अगदी खूप ठेवायचा नाही. कारण तो दाट नसतो. वरून उरलेलं खोबरं - कोथिंबीर पेरून गरम गरम फुलक्यांबरोबर खावी.

वाढणी/प्रमाण: 
४ माणसांसाठी
माहितीचा स्रोत: 
ही गुजराथी पारंपारीक भाजी एका लग्नात खाल्ली होती. त्याच्या चवीवरून साधारण घटक पदार्थ समजून घेऊन आईने तयार केलेली पाककृती.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अळूवड्या नसतील तरी दोडक्याची मटार घालून अशी भाजी केली तरी छान लागते पण अळूवड्या घातल्यावरची चव अगदी वेगळीच आणि अप्रतिम लागते. गुजराथी लोकांच्या अळूवड्यांचे उंडेही आपल्यापेक्षा छोटे असतात आणि त्यात बडिशेप घातलेली असते. त्याची चव अगदी निराळीच आणि सुंदर लागते.

मग नुसतीच पात्रा वाटाणा कर, हाकानाका Wink

आवडत असेल ती फळभाजी घाल, मसाला महत्वाचा, कारण त्याचीच चव भाजीला येते.

पण दोडका तो दोडकाच Happy

छान कृति. इथे आफ्रिकेत बाजारात नाही मिळत, पण हा अळू जागोजाग उगवलेला असतो. आम्ही तोच वापरतो.
त्यांच्या अळूवड्यांच्या अख्य्ख्या उंड्यांची पण रसभाजी खाल्ली होती मी (जामनगरला ). दोडक्याचा किस, अळूवड्याच्या (आपल्या पद्धतीच्या ) सारणात घातला तर त्या कुरकुरीत होतात.

मंजूडी, ही रेसिपी शोधत होते ती मिळाली. एक शंका: ह्यात वाटाणा म्हणजे मटार अपेक्षित आहे की हिरवा वाटाणा?

शीर्षक वाचून एकदम गुजरातचं फील आलं. (ते 'वटाना' असतं तर गुज्जुंमधे परतल्यासारखंच वाटलं असतं. :फिदी:)

ही भाजी मी मुळीच करणार नाही,
कारण केली तरी ती कुणीच खाणार नाही ! (शीघ्र काव्य झालं... :हाहा:)

मंजूडी, आज करुन बघितली ही भाजी, मस्त झाली आहे, राजधानी (गुजराती थाली) मध्ये अशीच चव असणारी भाजी असते दोडक्याची बर्‍याच वेळेला. एक चूक झाली फक्त स्वयंपाकवाल्या बाईंकडुन, त्यांनी पात्रा आधीच टाकल्याने, सगळ्यांचा लगदा झाला व भाजी जास्त दाट झाली. दोडक्याच्या नविन पा.कृ. बद्दल धन्यवाद.

मंजु, कधी करतेयस ही भाजी?
कारण केली तरी ती कुणीच खाणार नाही !<<<<<<<लले, किती हा आत्मविश्वास! Happy

मस्त पाकृ. करून बघितली. भाजी फारच आवडली. दोडकं नव्हतं, लाल भोपळा मिळाला म्हणून तोच घातला. चव चांगली लागली. आता दोडकं घालून करून बघेन.

धन्यवाद मंजु!

दोडकं नव्हतं, लाल भोपळा मिळाला म्हणून तोच घातला.>>>>>>

Lol

लालभोपळा घालून 'तुरीया'पात्रा वाटाणा..

असो, भा.पो. Happy धन्यवाद.

दोड'कं' काय गं मृण? 'दांडकं'सारखं वाटतं, भाजी वाटत नाही! Lol

अळू वड्या करणे हाच एक मुख्य अडथळा आहे. मटार मिळतोय तोवर दोडके खपवण्यासाठी 'पात्रा' वगळून तुरिया-वाटाणा भाजी करावी तू वर म्हटली आहेस तशी. बडीशेपही घालेन. कळवते Happy

मंजूडी, गुजराथी किंवा पारसी लोकात, कोलमीनु पाटीया असा प्रकार करतात. मी एकदा केला होता (काजू वापरून) पण आता त्याचे घटक विसरलो. खूप चवदार असतो तो प्रकार, त्यात हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर, आले, लसूण असे हिरवे वाटण असते आणि बहुतेक व्हीनीगर असते. कुठे ऑथेंटिक रेसिपी मिळाली तर मला हवीय.

पूनम, दोडकं कसं लिहू? Proud

>>>लालभोपळा घालून 'तुरीया'पात्रा वाटाणा..
Biggrin त्यात वाटाणा कमी वाटला म्हणून पोपटीचे दाणे (लायमा बीन्स) पण घातले. Proud असो, जे काय झालं ते चवदार होतं आणि श्रेय मंजुडीला. तर भाजी अशी दिसली...

turiya-patra-variation-maayboli.JPG

मृण, तुझी भोपळा- लिमाबीन्स भाजी चा फोटो इथे तुरिया पात्रा वाटाणा बाफवर चुकून टाकलायस का Proud ही सुद्धा भाजी छान दिसतेय हो पण.

Pages