"ओपन" अगासी.....

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

आंद्रे अगासी आणि स्टेफी ग्राफ हे माझे सर्वात नावडते टेनीसपटू. त्यामुळे आंद्रे अगासीचं "ओपन" हे आत्मचरित्र जेव्हा प्रसिध्द झालं तेव्हा ते वाचायची प्रचंड उत्सुकता वगैरे मला अजिबात नव्हती. आधीच अगासीचं पुस्तक, त्यात स्टेफी ग्राफ बद्दलही बरच काही येणार तेव्हा नकोच ते असा विचार करून मी एकदा जवळजवळ विकत घेतलेलं पुस्तक परत ठेऊन दिलं होतं. पण माझ्यातला टेनीस फॅन मला स्वस्थ बसू देईना. वेळ झाल्याझाल्या पहिल्यांदा लायब्ररीच्या वेबसाईटवर नंबर लावायला गेलो तर त्या पुस्तकासाठी माझा १५९ वा नंबर होता. मग मायबोलीकर लालूने पुस्तक घेतल्याचं ती म्हणाली आणि अगासीच्याच गावाला म्हणजे लास-वेगसला आमची भेट होणार होती तेव्हा मी ते तिच्या कडून घ्यायचं ठरलं. लास-वेगस ला आम्ही भेटेपर्यंत तिचं ते वाचून झालं नाही आणि मीही नंतर त्याबद्दल विसरून गेलो. पण नंतर जेव्हा आमची डिसीत परत भेट झाली तेव्हा तिने ते आठवणीने मला दिलं. पुस्तक वाचल्यानंतर मात्र जर मी ते वाचलं नसतं तर मी एका चांगल्या पुस्तकाला आणि एका चांगल्या खेळाडूच्या खेळाबद्दल, एकंदरीत करीयर बद्दल मांडलेल्या दृष्टीकोनाला आणि अनेक उत्कंठावर्धक सामन्यांच्या (ज्यातले बरेच मी पाहिले देखील आहेत) वर्णनाला मुकलो असतो असं निश्चीतपणे वाटलं !!

आत्तापर्यंत मी वाचलेल्या खेळाडूंच्या चरित्र-आत्मचरित्रांमधलं हे सगळ्यात "anti-sports" म्हणता येईल असं पुस्तक आहे. पुस्तकाची सुरुवात होते ती अगासीच्या कारकिर्दीतल्या शेवटच्या विजयापासून, जो त्याने खेळलेला शेवटून दुसरा सामना होता. अमेरीकन ओपन स्पर्धेतला बघदातीस विरुध्दचा हा सामना जिंकत असूनही त्याने अनेकदा मनात विचार केला होता की हे सगळं एकदाचं संपू दे !! पुस्तक ह्या प्रकरणापासूनच इतकं पकड घेतं की आपण त्यातला घटना त्या जागी उपस्थित राहून प्रत्यक्ष अनुभवत आहोत असं वाटायला लागतं.
अमेरीकेत स्थलांतरीत झालेल्या माईक अगासी नामक इराण्याच्या पोटी जन्मलेलं आंद्रे हे चौथं आणि सगळ्यात धाकटं अपत्य. माईक स्वतः ऑलिंपियन आहेत आणि आपल्या मुलांपैकी एकाला तरी टेनीसपटू करायचचं असं त्यांचं स्वप्न होतं. मोठ्या तिनही मुलांना त्यांनी टेनीसचे धडे द्यायचा प्रयत्न केला पण त्यांच्यामते मोठ्या तीनही मुलांमधे मुळातच 'किलर इंस्टींक्ट' चा अभाव होता. मात्र आंद्रेची गोष्ट वेगळी होती. हा मुलगा नक्की यशस्वी खेळाडू बनू शकेल ह्याची त्यांना खात्री वाटली आणि त्यांनी आपल्या बॅकयार्डात टेनीस कोर्ट आणि बॉल्सचा मारा करणारं ड्रॅगनच्या आकाराचं मशिन बनवलं. सात वर्षाचा आंद्रे रोज २००० ते २५०० बॉल्स मारून सराव करत असे. बॉल्सचा मारा करणारं ते मशिन हे आपलं सर्वात नावडतं खेळणं होतं आणि आजही ते आपल्या स्वप्नात येतं असं आंद्रे म्हणतो. एकूणच त्याला ते बालपण अजिबातच आवडलं नाही असं दिसतं. इतक्या लहान वयात बराच वेळ चालणारा सराव, सतात अंगावर खेकसणारे वडील, लास वेगसचं गरम हवामान आणि ते बॅकयार्ड हे त्याला कित्येकदा नकोसं व्हायचं आणि काही वेळापुरता का होईना ती प्रॅक्टीस थांबवण्यासाठी तो मुद्दाम बॉल बाहेर मारायचा. ह्याबद्दल अगासी म्हणतो, "The game I mastered was a prison, I spent some 30 years trying to escape and the first cell was the backyard court." इतर टेनीसपटूंच्या तुलनेत ऊचीने कमी असलेल्या आंद्रेला सर्व्हीसवर थोड्याफार मर्यादा येत असतं त्यामुळे वडिलांनी ह्याच कोर्टवर त्याच्या कडून रिटर्नचे धडे गिरवून घेतले. पुढे प्रतिस्पर्ध्याने केलेल्या घणाघाती सर्व्हिसला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आंद्रे प्रसिध्द झाला आणि ते त्याचं महत्त्वाचं शक्तिस्थान झालं !
लहान मुलांच्या स्पर्धांमध्ये आंद्रेने चांगली चुणूक दाखवली आणि पुढे त्या विभागातली जवळजवळ सर्व विजेतेपदं देखील मिळवली. एव्हडं झाल्यावर आता आणखी प्रगती व्हावी म्हणून वडिलांनी आंद्रेची रवानगी फ्लोरीडा मधल्या Bollettieri Academy मधे केली. ह्यालाही आंद्रे "glorified prison camp" म्हणतो. ह्या कँपमधले अनुभव लिहिताना तो म्हणतो, "The constant pressure, the cutthroat competition, the total lack of adult supervision — it slowly turns us into animals,”

ह्या कँपमधेही आंद्रेचा खेळ इतर खेळाडूंपेक्षा सरस ठरला आणि संचालक निक, जो पुढे बरेच वर्ष त्याचा कोच होता, आंद्रेकडून कोणतीही फी न घेता तिथे रहायची परवानगी द्यायला तयार झाला. आंद्रेच्या हे खूपच मनाविरुध्द होतं कारण त्याला त्याचं घर, त्याचा मोठा भाऊ फिली, त्याचा जिवलग मित्र पेरी आणि मैत्रीण वेंडी ह्यांच्या शिवाय इथे रहाणं अजिबातच आवडत नव्हतं. टेनीस खेळणं मनापासून आवडत नसल्याने, तसेच मनाविरुध्द तिथे रहावं लागल्याने त्याने शाळेचे नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली. निदान ह्यामुळेतरी आपल्याला इथून हाकलून देतील अशी त्याला आशा होती. पण झालं उलटच ! कोच निकने त्याचा सगळ्या मुलांसमोर अपमान केला आणि त्याला साफसफाई करणे, हॉस्टेल बाहेर न जाणे इत्यादी शिक्षा सुनावल्या. आंद्रेने नंतर निकशी कोणत्याही प्रकारे संवाद साधणं बंद केलं आणि एकदा निकच्या ऑफिसमधे त्याच्या सगळ्या संतापाचा स्फोट झाला. निकलाही आपल्या हातून हे रत्न घालवायचं नव्हतं कारण अगासी जितका जास्त जिंकेल तितकी त्याला आणि त्याच्या अ‍ॅकॅडमीला प्रसिध्दी आणि पैसा मिळणार होता. निकने आंद्रेच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि ही त्याची व्यवसायिक टेनीसपटू होण्याच्या दृष्टीने पहिली पायरी होती. बंडखोरीची सुरुवात इथूनच झाली होती आणि हीच बंडखोर वृत्ती पुढे विंबल्डन मधे पांढरे कपडे घालायला लागतात म्हणून त्यावर बहिष्कार टाकणे, वडिल/शिक्षक नको सांगत असतानाही कानात डूल घालणे/ केस वाढवणे, टेनीसचा पोशाख म्हणून सहसा कोणी वापरत नसलेली डेनिम शॉर्ट्स वापरणे अश्या गोष्टींमधून आणि सामन्यांदरम्यान प्रतिस्पर्ध्याचं शक्तिस्थान ओळ्खून त्यावरच हल्ला चढवण्याच्या मनोवृत्तीतून दिसली.

आंद्रे ह्या ना त्या कारणाने नेहमीच प्रसिध्दीच्या झोतात राहिला. सुरुवातीच्या काळात त्याचा पोशाख, त्याचे केस, त्याचं काही स्पर्धांमधे भाग ने घेणं/ काही स्पर्धांमध्ये दरवर्षी भाग घेणं, पीट सँप्रस/जीम कुरीयर/मायकेल चँग ह्या त्याच्या समकालीन खेळाडूंनी त्याच्या आधी मिळवले ग्रँडस्लॅम विजेतेपद, त्याने एका कॅमेर्‍याच्या जाहिरातीत बोललेलं "Image is everything" हे वाक्य अश्या गोष्टींवरून पत्रकारांनी त्याच्यावर टिकेची झोड उठवली. तर नंतरच्या काळात ब्रूक शिल्ड आणि स्टेफी ग्राफ ह्यांच्याबरोबरचे प्रेम-संबंध, लग्न, ब्रूक बरोबर झालेला घटस्फोट ह्या वरून माध्यामांनी टिका केली. तर कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात निवृत्ती कधी स्विकारणार हे विचारून किंवा निवृत्त होण्यासाठी हीच वेळ योग्य आहे हे सांगून भंडावून सोडलं.

अगासी हा कारकिर्दीत चारही ग्रँडस्लॅमची विजेतेपदं आणि ऑलिंपीक सुवर्णपदक अशी दुर्मिळ कामगिरी करणारा टेनीसपटू आहे. त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याला साथ देणारी आणि मदत करणारी काही लोकं होती त्यातली महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्याचा फिटनेस ट्रेनर गील. तो ट्रेनर बरोबरच त्याचा मित्र, बॉडीगार्ड, सल्लागार सर्वकाही होता. "Gil was standing there for me, as always" असं अगासी पुस्तकात बर्‍याचदा म्हणतो. सुरुवातीच्या काळात शारीरि़क क्षमता काहीशी कमी पडत असताना गील भेटल्याचा त्याला खूपच फायदा झाला. कारकिर्दीच्या ऐन भरात असताना आणि तीन वेळेला ग्रँडस्लॅम विजेता झालेला असताना तो अचानक फॉर्म हरवून बसला आणि त्याची अधोगती होत तो क्रमवारीतही बराच घसरला त्यात त्याचा कोच निक त्याला सोडून गेला. पुढे तो ड्रग्जसेवनाच्या सवयीलाही बळी पडला. परंतु ह्यातून सावरून आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्दीने आणि त्याचे मित्र, गील आणि नविन कोच ह्यांच्या मदतीने पुन्हा अग्रस्थानी पोचला. ह्या प्रवासादरम्यान त्याने जिंकलेल्या, खेचून आणलेल्या अनेक सामन्यांची अतिशय सुरस वर्णनं पुस्तकात येतात !

पुस्तक वाचायला सुरुवात करायच्या आधी मला काही काही गोष्टींबद्दल अगासीने काय लिहिलय हे वाचायची खूप उत्सुकता होती. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पीट सँप्रस आणि त्याची स्पर्धा. पुस्तकात पीटचा पहिला उल्लेख येतो तो "My next game was lined up with a kid named Pete something.. Sampras I think.." असा. Happy ग्रँडस्लॅमचा बर्‍याच अंतिम सामन्यांमधे पीट ने अगासीला हरवलं आणि तरीही त्यांच्यामधली स्पर्धा ही नेहमीच निखळ स्पर्धा राहिली आणि त्याचा प्रत्यय पुस्तकातून पण मिळतो. अगासीच्या मते पीटसाठी टेनीस हे सर्वस्व होतं आणि तो प्रामाणिकपणे पण जिद्दीने खेळत असे आणि त्यासाठी पीट बद्दल अगासीला आदर वाटतो. ह्या उलट कुरीयर, बेकर, कॉनर्स ह्या खेळाडूंबरोबर त्याचे संबंध कधीच चांगले नव्हते. एकाच अ‍ॅकॅडमीत असून अगासीमधल्या उपजत गुणांमूळे आपल्याला दुय्यम वागणूक मिळते ह्या कारणाने कुरियर चिडलेला असायचा तर बेकरचे आणि त्याचे बर्‍याचदा खटके उडायचे. विंबल्डनच्या एका उपांत्य फेरी मधे बेकर जिंकूनही बेकरने पत्रकार परिषदेत अगासीला संयोजकांकडून आपल्यापेक्षा वरची वागणूक मिळाल्याची तक्रार केली. मिडीयानेही ती उचलून धरली. ह्या वर चिडून अगासी आणि त्याच्या कोचने "summer of revenge" जाहिर केला आणि बेकरला त्या उन्हाळ्यातल्या सगळ्या स्पर्धांमधे तसच युएस ओपन मधेही हरवलं. अगासीचा कारकिर्दीतला शेवटचा सामना बेंजामीन बेकर नावाच्या नवोदीत खेळाडूबरोबर झाला. बोरीस बेकरच्या आणि त्याच्यातल्या तेढीचा संदर्भ देऊन तो म्हणतो, "How is it possible that my final opponent is a guy named B.Becker?" Happy

दुसरी एक गोष्ट जी मी पीटच्या पुस्तकात वाचली होती, त्याबद्दल अगासीचं मत. १९९० च्या युएस ओपन मधे अगासी वि पीट अशी फायनल होऊन त्यात पीट जिंकला होता. उपांत्य फेरीत पोचलेल्या तीन अमेरीकन खेळाडूंपैकी एकाला प्रेसिडेंट बुश फोन करणार होते. पीट जिंकलेला असूनही त्यांनी अगासीला फोन केला होता. नेहमीप्रमाणे कुठल्याही वादात न पडता पीटने "माझा फोन त्यावेळी बंद होता" असं पत्रकारांना सांगितलं होतं. ह्या घटनेबद्दल अगासीचं मत मला जाणून घ्यायचं होतं पण त्याबद्दल पुस्तकात काहीच उल्लेख दिसत नाही.

तिसरी गोष्ट म्हणजे १९९६ च्या अटलांटा ऑलिंपीक मधे अगासीला सुवर्ण पदक मिळालं होतं आणि त्यात त्याचा उपांत्य फेरीचा सामना लिएंडर पेस बरोबर झाला होता. मला त्याचं लिएंडर बद्दलच मत वाचायचं होतं. अगासी ह्या सामन्या बद्दल लिहीतो, "He's a flying jumping bean, a bundle of hyperkinetic energy, with the tour's quickest hands. Still, he's never learned to hit a tennis ball. He hits off speed, hacks, chips, lobs - he's the Brad of Bombay. Then, behind all his junk, he flies to the net and covers so well that it all seems to work. After an hour you feel as if he hasn't one ball cleanly and yet he's beating you soundly. Because I am prepared, I stay patient, stay calm, and beat Paes 7-6, 6-3."

जोडीदार आपल्या क्षेत्रातला असावा की नसावा ह्याबद्दल बर्‍याच ठिकाणी चर्चा चालू असतात. अगासीच्या गोष्टीतही हा मुद्दा दिसतो. ब्रूक शिल्डची आणि त्याची क्षेत्रं पूर्णपणे वेगळी. सुरुवातीचे "छान-छान" दिवस गेल्यानंतर दोघांनाही एकमेकांचे प्रश्न, मित्रमैत्रीणी, कामातल्या अडचणी, आनंदाच्या/यशाच्या कल्पना हे सगळच समजून घेणं अवघड जाऊ लागलं आणि त्याची परिणती घटस्फोटात झाली. ह्या उलट स्टेफीची आणि त्याची प्रेम काहाणी सुरु झाली तीच विंबल्डन दरम्यान. ती स्पर्धा स्टेफीची शेवटची विंबल्डन स्पर्धा ठरली पण त्यांनी त्या स्पर्धेत एकत्र सराव केला होता. स्टेफीला व्यावसायीक टेनीसपटूच्या आयुष्यातल्या समस्या, ताण-तणाव, आनंदाचे क्षण व्यवस्थित माहित असल्याने तीने नेहमीच आंद्रेला योग्य ती साथ दिली. अर्थात टेनीस मधे दोघांनीही सुमारे १५ ते २० वर्ष काढलेली असल्याने आपल्या मुलांसाठी बॅकयार्डात टेनीस कोर्ट न बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. Happy

ह्याच संदर्भात एक गमतीदार प्रसंग अगासीने पुस्तकात सांगितला आहे. आंद्रे आणि स्टेफीच्या लग्नाच्या काही दिवस आधी स्टेफीचे वडिल, पीटर, आंद्रेच्या वडिलांना भेटायला लास-वेगसला गेले होते. त्यांना तेव्हा आंद्रेच्या सरावासाठी बनवलं गेलेलं सुप्रसिध्द ड्रॅगन मशिन पण बघायचं होतं. पीटर म्हणजे माईक अगासी ह्यांचं जर्मन रूप आहे. स्टेफीला घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ड्रॅगन मशिनचा उपयोग समजून घेण्यासाठी त्यांनी आंद्रेला बॉल मारायला सांगितले आणि आंद्रेच्या वडिलांकडे दुर्लक्ष करून ते आंद्रेला त्याने कोणता शॉट मारायला हवा होता हे सांगायला सुरुवात केली. ७ ग्रँडस्लॅम जिंकलेल्या आपल्या मुलाला दुसर्‍या कोणी येऊन धडे द्यावे हे माईकला अजिबातच आवडलं नाही आणि त्यातून सुरु झालं ते जोरदार भांडण ! ह्या बद्दल अगासी लिहितो,
"The two men can't understand each other and yet they're managing a heated argument. My father comes around the net shouting. The slice is bullshit ! If Stefanie had this shot, she would been better off. He then demonstrated two-handed backhand he taught me. With this shot, my father says, Stefanie would have won thirty-two slams ! Occasionally I hear Peter mentioning my rivals, Pete and Rafter, and then my father responds with Stefanie's nemeses, Monica Seles and Lindsey Davenport." नवरा-बायको होऊ घातलेल्या दोन स्टार खेळाडूंचे वडिल आणि एकेकाळचे गुरु असे कोर्टवर भांडत असताना आंद्रेची काय अवस्था झाली असेल ह्या विचाराने हसू येतं. Happy

मध्यंतरी सेरेनाचं विल्यम्सचं पुस्तक वाचलं होतं, त्याआधी पीटचं वाचलं होतं. सेरेना(आणि व्हिनस सुध्दा), पीट आणि आता आंद्रे, स्टेफी ह्या सगळ्या बड्या खेळाडूंच्या यशात त्यांच्या वडिलांचा मोठा वाटा असल्याचं दिसून येतं. ह्या सगळ्यांमधे गुणवत्ता अर्थातच आहे. पण त्यांच्या वडिलांनी योग्य वेळी ती गुणवत्ता ओळ्खून आणि दुरदृष्टीने त्यांची केलेई घडण हेच त्यांच्या यशाचे मुख्य कारण असू शकेल का ?

आंद्रेने पुस्तकात सांगितलेली स्वतःच्या आयुष्याची गोष्ट खूपच प्रेरणादायी आहे, त्याचबरोबर अतिशय प्रामाणिक आहे. ड्र्ग्ज प्रकरणापासून सगळ्या गोष्टी काहीही हातच राखून न ठेवता आपल्या चाहत्यांना सांगून टाकल्या आहेत हे जाणवतं पण काही गोष्टी इतक्या नाट्यमय रितीने खरोखरच घडल्या असतीला का की त्या नाट्यमय रितीने आपल्या समोर मांडण्याचं श्रेय पुस्तकाचा Ghost writer J.R. Moehringer ह्याला द्यावं असा प्रश्नही पडतो.
पण एकंदरीत पुस्तक संपल्यावर "Hats off to this great player !!!! " अशी वाचकाची अवस्था होते हे मात्र नक्की. Happy

प्रकार: 

सुपर्ब, वाचायलाच पाहिजे एकदा!
अगासी आणि स्टेफी दोघेही माझे फेवरिट.
परिक्षणासाठी धन्यवाद Happy

अ‍ॅडम.. धन्यवाद! Happy

आंद्रे अगासी आणि स्टेफी ग्राफ हे माझे सर्वात आवडते टेनीसपटू. बेस लाईन वर खेळुन विंब्लडन जिंकणारा आंद्रे महान! अन, स्टेफी ला बघुन तर टेनीस आवडायला लागले Happy

मी अमेरिकेत आलो त्यावर्षी अगासी नामक एक खेळाडू Flushing Medows ला पाहिला. प्रतिस्पर्ध्याने मारलेल्या अप्रतिम शॉटवर त्याला टाळ्या वाजवताना पाहून खूप बरं वाटलं.
परीक्षण छान लिहलंयस.

अडम.. मस्तच लिहील आहेस परिक्षण.

अ‍ॅगॅसी मला स्वतःला त्याच्या दोन गोष्टींमुळे आवडायचा.. एक म्हणजे त्याची खिलाडीवृत्ती व दुसरे म्हणजे त्याची कुठलीही सर्व्हिस रिटर्न करण्याची हातोटी.. मला वाटत टेनिसच्या इतिहासात सर्व्हिस रिटर्न करण्यात अ‍ॅगॅसीइतका चांगला खेळाडु मी तरी पाहीला नाही. आणी तो खेळत असताना टेनिसमधले एकापेक्षा एक ग्रेट सर्व्हिस करणारे खेळत होते हे लक्षात घ्या... पिट(पीस्तोल) सँप्रास,बोरिस्(बुमबुम)बेकर, गोरान इव्होनोव्हिक,अँडी रॉडिक व रॉजर फेडरर.. टु नेम अ फ्यु!

मला स्वतःला अ‍ॅगॅसीला १९९६ च्या अ‍ॅटलांटा ऑलिंपिकमधे.. सेमि फायनलमधे लिअँडर पेअस बरोबर खेळताना व २००४ च्या यु एस ओपनमधे फ्लशिंग मेडोजला .. नन अदर दॅन फेडरर बरोबर खेळताना ‍पाहण्याचे भाग्य लाभले होते. २००४ ची ती यु एस ओपन क्वार्टरफायनलची मॅच पावसामुळे त्या दिवशी रद्द होणार होती पण अचानक ६.३० ला पाउस थांबला व ७ ला त्यांची मॅच सुरु झाली. पण फक्त ३च सेट झाले ज्यात फेडरर २-१ असा पुढे होता व परत पाउस सुरु झाला. ती मॅच दुसर्‍या दिवशी संपली व त्यात अ‍ॅगॅसीने फेडररला ५ सेटमधे कडवी लढत दिली पण शेवटी फेडरर जिंकला. पण ती मॅच बघताना मला प्रकर्षाने जाणवले की अ‍ॅगॅसी न्यु यॉर्क ला यु एस ओपन क्राउडमधे किती फेव्हरेट आहे.. न्यु यॉर्कच्या प्रेक्षकांनी अ‍ॅगॅसीला नेहमीच उचलुन धरले आहे. माफ करा पण न्यु यॉर्कला त्याच्या शेवटच्या .. २००६ यु एस ओपनमधे.. मधे तिसर्‍या फेरीत हरल्यावर.. त्याने दिलेले फेअरवेल स्पिच इथे जसेच्या तसे द्यावेसे वाटले.. तो न्यु यॉर्कच्या पेक्षकांना डोळे पाणावत म्हणाला...

The scoreboard said I lost today, but what the scoreboard doesn’t say is what it is I have found. Over the last 21 yesar, I have found loyalty. You have pulled for me on the court - and also in life.

I have found inspiration. You have willed me to succeed, sometimes even in my lowest moment. And I have found generosity. You have given me your shoulder to stand on, to reach for my dreams. Dreams I could never have reached without you.

Over the last 21 years, I have found you. And I will take you and the memory of you with me for the rest of my life. Thank you.

कॅननच्या इमेज इज एव्हरीथिंग या अ‍ॅड्मधली सुरुवातीची अ‍ॅगॅसीची इमेज व २० वर्षांनतर २००६ मधे रिटायर झालेल्या अ‍ॅगॅसीची इमेज.. या अगदी दोन टोकाच्या.. अगदी न ओळखु येणार्‍या अ‍ॅगॅसीच्या इमेजेस होत्या... त्या २ इमेजेस दरम्यानची त्याची २० वर्षाची टेनिस कारकिर्द्रीतली वाटचाल मला बघायला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.. टेनीसच्या इतिहासात आपल्या नावाचा ठसा उमटवणारी जी काही बोटावर मोजता येतील इतकी नावे घेता येतील त्यात अँड्रॅ अ‍ॅगॅसीचे नाव निश्चितच असेल यात काही दुमत नसावे..

अडम.. तु केलेल्या या पुस्तकपरिक्षणाच्या निमित्ताने.. त्याच्या सँप्रास,मॅकेन्रो,इव्होनोव्हिक(१९९२.. विंबल्डन फायनल!) व बेकर बरोबरच्या मेमोरबल टेनीस मॅचेस माझ्या डोळ्यासमोर तरळुन गेल्या.. त्याबद्दल व त्याच्या पुस्तकाच्या या वर.. तु केलेल्या सुंदर परिक्षणाबद्दल धन्यवाद..:)

अडमा, धन्यवाद. अगासी आणि स्टेफी माझे आवडते खेळाडू. अगासीची बंडखोर वृत्ती मला जास्त भावून जायची. खासकरून ते कानात डूल आणि डेनिम शॉर्ट्स॑ मुद्दाम वापरणं. Happy

हे पुस्तक एकदा लायब्ररीमधून आणलं होतं. अर्धवट वाचलं आणि मग नंतर परत दिलं. Sad आता पुन्हा एकदा मिळवून पूर्ण वाचायला हवय.

आंद्रे अगासी आणि स्टेफी ग्राफ हे माझे सर्वात नावडते टेनीसपटू. >> ऑ.. ऑस्सकस्स ! Happy
'ओपन आगासी' आवडले.. खुप छान परिक्षण.. मुळात पुस्तकेच कमी चाळणार्‍या माझ्यासारख्या टेनिस चाहत्यांसाठी हे परिक्षण नसे थोडके.. Happy

धन्यवाद देसाई, अगो, ज्ञाती, नंदिनी, डुआय Happy

यो.. आता हे वाचलच आहेस ना.. पुस्तक पण वाचून टाक.. इंटरेस्टींग आहे... Happy

मुकूंद, माझा हा लेख तू वाचावास आणि तुझ्या खास शैलीत एखादी प्रतिक्रीया लिहावीस अशी माझी मनापासून इच्छा होती !!! पण तुझ्या विपूत / मेल मधे रिक्षा घेऊन येणं नको वाटत होतं... आज लाँग विकेंडच्या ट्रिपहून येऊन बघतो तर तुझी प्रतिक्रीया होती.. फार्फार आनंद झाला... !! धन्यवाद ते भाषण लिहिल्याबद्दल.. Happy
ही त्याची लिंक : http://www.youtube.com/watch?v=xqLfan0R0b8
शेवटचा विजय : http://www.youtube.com/watch?v=Uh7szUy__BY&feature=related
ऑलिंपीक गोल्ड : http://www.youtube.com/watch?v=XplBkrvvgfo
Image is everything : http://www.youtube.com/watch?v=WpuFEpbE0d0
सँप्रस अगासी विंबल्डन : http://www.youtube.com/watch?v=n2taM_NytHY

पराग म्हणजेच अडम.. हे मी विसरलोच!

पराग.. तु अ‍ॅगॅसीच्या पुस्तकाचे परिक्षण लिहीलेस व तेही इतके मस्त!... मग ते माझ्यासारख्या टेनिस प्रेमी माणसांच्या डोळ्यातुन निसटणे कसे शक्य आहे?:)

( बाय द वे.. लाँग विकेंडला कुठली ट्रिप करुन आलास?:))