अक्षय कविता

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

तुला कसे कळत नाही?
फुलत्या वेलीस वय नाही!
क्षितिज ज्याचे थांबले नाही,
त्याला कसलेच भय नाही,
त्याला कसलाच क्षय नाही....

असाच काहीसा अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली बोरकरांची लख्ख आरस्पानी कविता. लयीत उलगडणारी आणि शब्दचित्रांचा उत्कट अनुभव वाचकांसमोर अलगद आणून ठेवणारी, अशी. कवितेची जातकुळीच अर्थगर्भित. चित्रवाही शब्दकळेचे लेणे ल्यालेली. आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाला तितक्याच समरसतेने आपलंसं करुन, अनुभवून आपल्या अवधूती मस्तीत धुंद होताना, त्या अनुभवांचा मुक्त उद्घोष करणारी, शुद्ध अभिजात अशी ही कविता. आत्मनिष्ठ.

बोरकरांनीच म्हटल्याप्रमाणे, त्यांनी कधी कविता केल्या नाहीत, बोरकरांना कविता झाल्या. त्यांचे शब्दही शब्दवतीचा साज धारण करुन आलेले आणि चराचराच्या रंगागंधांमध्ये न्हाऊन निघालेले. भोवतालच्या सृष्टीला हाक घालणारे, पण ती कशी? नुसतीच नव्हे, तर नादवेडात रंगून आणि गंधाटून!

मी रंगवतीचा भुलवा
मी गंधवतीचा फुलवा
मी शब्दवतीचा झुलवा
तुज बाहतसे....

असं म्हणत. रंगांची भुलावणी शब्दांच्या फुलोर्‍यात पेरुन, त्यांचे झुलवे गात मारलेली हाक.

कवींचा मूळ पिंडच सौंदर्योपासकाचा. हिरवळ आणिक पाणी, तेथे स्फुरती मजला गाणी अशी भाववेडी अवस्था. इतर कोणत्याही ओळखीपेक्षा, पोएट बोरकर हीच त्यांची स्वतःशीही असलेली खरी ओळख. मनातून आणि शब्दांतून ओसंडत असलेले कवीवृत्तीचे इमान. "मी प्रतिभावंत आहेच, पण प्रज्ञावंतही आहे" हे सांगण्याची आणि ओळखण्याची शक्ती. जोपासलेला निगर्वी अभिमान. स्वतः सरस्वतीपुत्र असल्याची सतत जागती जाणीव.

कवितांविषयी बोरकरांची धारणा मुळातूनच वाचण्यासारखी आहे. बोरकरांच्या मते काव्य ही आध्यात्मिक साधना.

"लौकिक जीवनात राहणार्‍या कवीला जेव्हा अलौकिकाची जाणीव प्राप्त होते, तेह्वा तो केवळ कवी रहात नाही, पण संतही होतो. आपल्या देशात तरी वारंवार असे घडत आले आहे. कवी जगात इतर ठिकाणीही झाले आहेत, पण त्यातले संत झाले, असे फारच थोडे. असे का व्हावे? मला वाटते, हा फरक काव्याकडे पाहण्याच्या दृष्टीमुळे पडतो. काव्य ही एक अध्यात्मिक साधना आहे. आत्मविद्येचा हा एक आगळा आणि लोभसवाणा अविष्कार आहे. लय, योगाची ही एक हृदयंगम कला आहे, असे ज्यांनी मनापासून मानले आणि या साधनेची वाट जे शोधीत, चोखाळीत राहिले, ते संत झाले आणि ज्यांनी काव्य, कला हा एक शौक किंवा छंद मानला ते कवीच राहिले किंवा कवी म्हणून देखील फार लवकर संपले, असे आढळून येईल..."

कवितेची चाहूल घेता घेता लौकिकातून अलौकिकाच्या जगात मुशाफिरी करणारं कवीमन, आणि अशा ह्या कवीची आयुष्याकडे पाहताना, ते अनुभवताना आणि चराचराला न्याहाळताना, सहजरीत्या त्यातल्या सौंदर्यठश्यांचा वेध घेत, त्यांचे सौंदर्यसुभग तराणे बनवत, नाद, सूर, लय आणि शब्द ह्यांना सांगाती घेऊन जन्माला आलेली, चिरंतनाचे गाणे बनून गेलेली अशी कविता.

छंद माझा दिवाणा,
नकळत मन्मुखी सुंदरतेचा तरळे तरल तराणा..
स्वसुखास्तव जरी गुणगुणतो मी
हर्ष कणकणी उधळी स्वामी
प्रकाश पाहूनी अंतर्यामी
सोडवी गहन उखाणा....

ह्या कवितेला आतूनच जीवनाची ओढ आहे. सुख, दु:ख, एखादा निरव नि:स्तब्धतेचा वा सुखावणारा समाधानाचा क्षण, ह्या सार्‍याला ही कविता शब्दाशब्दांने आपलं म्हणते, आतल्या खुणा उकलू पाहते आणि ज्ञानियाच्या अमृत ओवींच्या संगतीने मनातलं द्वैत उजळत, स्नेहभावाने सामोरी येते.

गोव्याच्या भूमीचं सौंदर्य आणि हिरवा निसर्ग, तिथल्या मातीचा गंध, समुद्राची गाज, पोफळी, माडांच्या झावळ्यांची सळसळ... गोव्याच्या भूमीचं सारं सारं ताजेपण बोरकरांच्या कवितेतून उमलून येतं आणि मग तिथल्या नारळाची चव मधाची होते आणि दर्‍यां कपार्‍यांतून नाचत, खळाळत उतरणारं पाणीही दुधासारखं भासतं. जगाला आपल्या सौम्य रुपाने आल्हाद देणार्‍या चांदण्याला माहेरी आल्याचं समाधान इथेच मिळतं, आणि अबोल, शालीन अशा चाफ्याच्या साक्षीने निळ्या नभाशी समुद्र गळाभेठी इथेच करतो. गोव्याच्या निसर्गाची घडोघडी दिसणारी वेगवेगळी रुपं, बोरकरांच्या कवितेत वेगवेगळ्या भावनांना चित्ररुप देतात...

ही कविता, मराठी सारस्वताचे, लावण्यमयी लेणे आहे. संतवाङमयासारखी प्रासादिकता, संस्कारक्षम मनाची शुचिता त्या कवितेत आहे हे खरेच. पण, म्हणून त्या कवितेला विमुक्त मनाच्या रसरंगाचे वावडे नाही. ...

क्रमशः...

भाग २ -राजसगाणी

विषय: 
प्रकार: 

बोरकरांची निसर्ग सौंदर्योपासना आणि ना. धों.चं रांगडं निसर्गवर्णन...... काव्यवेड्या मराठी मना ची मर्मबंधातली ठेव... फार आवडला हा लेख. पुढच्या लेखाच्या प्रतीक्षेत. Happy

छान लिहिलंयस शैलजा. Happy

बोरकरांच्या कवितांमध्ये मला नेहमीच एक अतिशय उत्कट अशी जीवनाभिमुखता जाणवते. आयुष्यातल्या सगळ्या कडुगोड अनुभवांना आत्मीयतेने उराशी धरणारा कवी!

स्वर्ग नको, सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ती नको, मज मुक्ती नको, मज येथिल हर्ष नि शोक हवा

ही माझी अत्यंत आवडती कविता. त्यांच्या वृत्तीचं सार यात आहे असं वाटतं मला.

त्यांना कधीच 'तेच ते तेच ते' किंवा 'कंटाळ्याचादेखिल आता कंटाळा येतो' वगैरे शिवलंच नाही बहुतेक.

इंद्राचा मज भोग हवा अन् चंद्राचा हृद्रोग हवा
योग असो, रतिभोग असो, अति जागृत त्यात प्रयोग हवा

हविभुक् सुरमुख मी वैश्वानर, नित्य नवा मज ग्रास हवा
हे सुख दुर्लभ वाढविण्या मज चौर्‍यांशीत प्रवास हवा

असं म्हणणार्‍याला कंटाळा कसा शिवेल?

तसंच त्यांच्या कवितांतल्या phoneticsचं मला नेहमी आकर्षण वाटलं आहे.
उदा.

शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले..
रजत नील, ताम्र नील, स्थिर पल जल, पल सलील


इथे अनुप्रास केवळ अनुप्रासाकरता येत नाही. त्या वार्‍याच्या, पाण्याच्या गती, त्यांच्या सगळ्या लीला ते उच्चारतांना अनुभवाला येतात. स्वतःशीच मोठ्याने वाचून पहाव्यात त्यांच्या कविता. त्या नादाचा फार सुंदर अनुभव मिळतो!

खूप सुंदर लिहिलयस शैलजा....मागेपण तू ऐकवलेल्या काही ओळींमुळे पुन्हा बोरकर वाचायला लागले..आवडत गेलं..हे वेगळ सांगायलाच नको.
पुन्हा बोरकरांच्या कवितेची वाट दाखवल्याबद्दल तुला अनेकानेक धन्यवाद Happy
पुढच्या लेखाची वाट बघत्ये. Happy

सुरेख लिहलेय.
बोरकरांनीच म्हटल्याप्रमाणे, त्यांनी कधी कविता केल्या नाहीत, बोरकरांना कविता झाल्या.>>>>> हे आणि शेवटच्या दोन ओळी खूप काही सांगून गेल्या.
लिहित रहा, पुलेशु. Happy

>>रंगांची भुलावणी शब्दांच्या फुलोर्‍यात पेरुन, त्यांचे झुलवे गात मारलेली हाक>> व्व्वा सु रे ख!!! छान लेख Happy
पण अर्धवट का ठेवलायस????? लिह पटापटा पुढचे Happy

शैलजा

सुंदर लेख, या व्यतिरीक्त काय लिहीणार ....

स्वातीनी केलेलं भाष्य्ही अप्रतीम ....

अजून वाचायला नक्कीच आवडेल

सुधीर

सुंदर लिहिलेस गं....

बोरकरांच्या फार थोड्याच कविता वाचल्यात (शाळेच्या पुस्तकात होत्या तितक्याच) Sad
आता पुस्तके आणुन वाचेन परत. इथे संगणकावर वाचण्यात गंमत नाही. बाहेर जाऊन झाडाखाली बसुन एकेक ओळ वाचत आजुबाजुला त्याचा प्रत्यय घेत बघत वाचायला पाहिजे.