हे आहे स्ट्रेलित्झिया किंवा बर्ड ऑफ पॅराडाईझ फ्लॉवर. मराठीत याचे नाव दीपकळी असल्याचे एका
प्रदर्शनात बघितले होते.
वंशसातत्य टिकवणे हे तर प्रत्येक सजीवाचे धेय असते, अगदी सूक्ष्म वनस्पती पण त्यांना
अपवाद नसतात.पण वनस्पतिंवर असणारे एक सर्वात मोठे बंधन म्हणजे ते इतर सजीव,
म्हणजेच किटक, पक्षी व प्राणी यांच्याप्रमाणे हालचाल करू शकत नाहीत. पण यावर
त्यांनी अफ़लातून उपाय शोधून काढलेले असतात.
रुढ अर्थाने, म्हणजे आपल्या डोळ्यांना जाणवेल अशी हालचाल म्हणजेच स्थलांतर
त्या करत नाहीत. त्यांचा प्रवास होतो तो मुख्यता परागकणांच्या रुपात किंवा
बीजांच्या रुपात. आणि यासाठी त्यांना इतर सजीवांची मदत घ्यावी लागते.
हि मदत अर्थात विनामोबदला क्वचितच असते. आजकाल कोण कुणासाठी
काय करतो हो ? यात काहीवेळा फ़सवणुकीचे प्रकार होतातच. पण एकमेकांवर
कुरघोडी करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी होत असतात. या प्रयत्नांतून जे बदल
फायदेशीर ठरतात, ते पुढच्या पिढीत उतरतात.
हि जी प्रक्रिया असते ती आपल्या आयूष्यमानाच्या तूलनेत इतकी संथ असते,
की आपल्याला एका आयूष्यात ती अनुभवणे अशक्य असते. ठराविक वनस्पति
आणि ठराविक किटक वा पक्षी यांचे परस्पर संबंध इतके दृढ असतात की काही
कारणाने, एका प्रजातीला धोका झाल्यास वा त्यांची संख्या घटल्यास, त्याच्याशी
संबंधित असणारी दुसरी प्रजाती नष्ट होण्याचा धोका असतो. मानवाच्या बाबतीत
मात्र याची शक्यता कमी आहे. संपूर्ण मानवजात पृथ्वीवरून नष्ट झाली, तरी फारसे
काहि बिघडणार नाही. (कदाचित कोंबडी, कुत्रे, गहू, बटाटा वगैरे नष्ट होतील.)
तर हे जे बदल होत असतात, ते आपल्याला जाणवतील इतक्या वेगाने होत
नाहीत, पण असे एक उदाहरण मलाच काय तूम्हालाही अनुभवता येईल.
वरच्या फ़ोटोत जे "फूल" दिसतेय, ते असा प्रयत्न सध्या करत आहे.
या "फूला"चे काही प्रकार तूम्ही आजूबाजूला बघितले असतील. (इथे जमल्यास
अवश्य फ़ोटो टाका.) फूलाचा उल्लेख केला तर एक बेसिक रचना आपल्या
डोळ्यासमोर येते. पाकळ्यांची गोलाकार रचना आणि मधे स्त्रीकेसर आणि
पूंकेसर यांची दाटी (शिवाय मादी फूल असेल तर बाल्यावस्थेतला बीजकोषही.)
इथे तशी काही रचना दिसत नाही. म्हणजे पाकळ्यासदृष्य काहीतरी आहे पण
ते गोलाकार नाही.
परागीभवन करणारे दोन मुख्य सजीव घटक म्हणजे किटक आणि पक्षी.
(इतर निर्जीव घटकात वारा येईल.) पण या दोघांच्या सवयीत फ़रक आहे.
दोघांना ही मोबदला म्हणून झाडे साखरपाणी देतात. (हो ते केवळ साखरपाणीच
असते. मध ही पूर्णत: मधमाश्यांची निर्मिती असते.)
या दोघांतला मुख्य फरक आहे तो त्यांच्या रंग आणि गंध ओळखण्याच्या
क्षमतेत. किटकांची नजर वर्णपटलाच्या अतिनील टोकाकडे जास्त संवेदनशील
असते. आपल्याला पिवळा दिसणारा रंग त्यांना जांभळा दिसू शकतो. तसेच
त्यांची गंधांची जाणीव खूपच तीव्र असते. फुलांनी निर्माण केलेले गंध त्यांना
दूर अंतरावरून ओळखता येतात. आणि त्याचा मागोवा घेत ते फुलांकडे येतात.
रंग काय किंवा गंध काय, ते निर्माण करण्यासाठी झाडांना बराच कच्चा माल
जमवावा लागतो. त्यामूळे जर गंध तीव्र असेल आणि त्याने काम भागणार
असेल तर रंग निर्माण केले जात नाहीत. रात्री उमलणारी अनेक फूले यासाठीच
सुगंधी आणि शुभ्र असतात. रात्री तसाही रंगांचा उपयोग नसतो.
पक्ष्यांची नजर मात्र वर्णपटलाच्या लाल टोकाकडे तीव्र असते. त्यांनाही आपल्या
प्रमाणेच, लाल, नारिंगी, पिवळा या रंगांचे आकर्षण असते. (आपण खातो ती
बहुतेक फळे याच रंगात असतात.) ते रंग त्यांना दूरवरून ओळखता येतात.
आपल्याकडची सावर, पांगारा, पळस फूलायला लागले कि त्याच्यावर पक्षी
सम्मेलनच भरलेले दिसते. पण या तिन्ही फूलांना गंध नसतो, कारण पक्षांचे गंधज्ञान
तितकेसे चांगले नसते.
आता पक्षी यायला हवे असतील तर आणखी सोयी कराव्या लागतात. एकतर
फूलाचा आकार एवढा मोठा हवा कि पक्षी त्यात चोच घालू शकेल. तसे असे
करताना, त्याचे डोके, छाती, गळा वगैरे अशा स्थितीत असले पाहिजेत कि
त्यावर परागकणांचा शिडकावा करता येईल. शिवाय पक्षाला बसायला मजबूत
आधार दिला पाहिजे. यासाठी फूलांचा देठही आखूड हवा, पण जवळची फ़ांदी
मजबूत हवी. हे सगळे वरच्या तीन झाडांत दिसतेच.
वटवाघूळ जरी उडत असले तरी ते पक्षी नसल्याने, त्याचे गंध ज्ञान चांगले
असते. त्यामूळे परागीभवनासाठी त्याच्यावर अवलंबून असणारी, वाघूळफूले
(ब्रम्हदंड) खास वेगळ्या डीझाईनची असतात. आणि त्यांना सडणार्या मांसाचा
गंध असतो.
तर आता परत वरच्या फूलाकडे वळू. यातली फक्त एकच "पाकळी" जांभळी
व बाकीच्या केशरी आहेत. म्हणजे या फूलाला, पक्षी आकर्षित करायचे आहेत.
मग त्यात यश मिळालेय का ?
तूमच्या बघण्यात ही फूले असतील, तर यावर सकाळच्या वेळी सूर्यपक्षी आलेले
दिसतात.
या झाडाने "विचार" केलाय कि जर तो सूर्यपक्षी त्या जांभळ्या "धावपट्टी" वर
उतरला, तर त्याच्या डोक्यावर परागकण चिकटवता येतील. कधीकाळी सूर्यपक्ष्याने
ते करून बघितलेही असेल. पण त्यात सूर्यपक्ष्याचे नूकसान झाले असणार.
या झाडाचे परागकण जरा ओलसर आणि चिकट असतात. ते डोक्यावर चिकटलेले
त्याला आवडत नाहीत. शिवाय ती जांभळी पाकळीही त्याला बसण्याइतकी मजबूत
नसते.
पण एकदा चटक लावल्यामूळे सूर्यपक्षी या फूलावर येतच राहतो. पण आता त्याची
बसण्याची जागा ती आडवी रंगहीन पाकळी असते. तिथेही तो जरा लांबच संभाळून
बसतो. त्याची चोच लांब व बांकदार असल्याने, त्याचा खाऊ मिळवण्यात त्याला
काही अडचण येत नाही, पण अंगाला परागकण लावून घ्यायचे मात्र तो टाळतो.
यात नूकसान आहे त्या झाडाचे, कारण त्याचे साखरपाणी तर द्यावे लागतेय, पण
परागीभवन काही होत नाही.
पण मूळात असे अडनिडे डिझाईनच का निर्माण झाले ? तर दक्षिण आफ्रिका, जे
या झाडाचे मूळ स्थान आहे, तिथे आधी पालसदृष्य गेको प्राण्यांचे वर्चस्व होते.
पालीसारखा प्राणी जर त्या जांभळ्या पाकळीवर बसला (आणि त्याच्या पुढच्या
पायांना आधार देणारे कंगोरेदेखील आहेत.) तर बाकिच्या पाकळ्या योग्य रितीने
वळून, त्या पालीच्या डोक्यावर परागकण ओतले जाऊ शकतात.
आता पाल हा प्राणी परागीभवन करु शकतो का असा प्रश्न पडेल. न्य़ू झीलंड मधे
सर्वत्र आढळणारा पोहोतुकावा हा लाल फूलांचा वृक्ष अजूनही त्यांच्याचकडून
परागीभवन करुन घेतो. तिथे बाकिचे किटक, पक्षी तूलनेने कमी संख्येत आहेत,
म्हणून ही व्यवस्था अजूनही टिकून आहे.
दक्षिण आफ़्रिकेत मात्र बदल झाले. एकतर पाली तितक्या उरल्या नाहीत,
ज्या उरल्यात त्यांनी मांसाहार करायचा असे ठरवले त्यामूळे त्या फूलांवर जात
नाहीत. तिथे गेल्या तर त्यांना पक्ष्यांपासून धोका आहे. (काही सरपटणार्या
प्राण्यांपासूनच पक्षी उत्क्रांत झालेत.) म्हणजे पालींचा आणि या झाडाचा
ऋणानुबंध संपलाय. आता पुढे काय ?
हा या झाडाच्या उत्क्रांतीचा एक टप्पा आहे. सध्यातरी नैसर्गिक रित्या याचे
परागीभवन होत नाही. मानवी प्रयत्नातूनच ते शक्य होते.
कदाचित हे झाड जगभरच्या बागांमधे इतके लोकप्रिय होईल, कि त्याला स्वत:
काही प्रयत्न करावे लागणार नाहीत. मानवाला आकर्षित करण्यासाठी जास्त
पाकळ्या, अनेक रंग, मोठा आकार असे बदल, कदाचित मानवाकडून होतील.
सुर्यपक्षी आपल्या सवयी बदलेल, अशी शक्यता कमी आहे. पण इतर दुसरा
कुठलातरी पक्षी आकर्षित करण्याचा प्रयत्न हे झाड नक्कीच करेल.
सूर्यपक्ष्याला पर्याय सापडला नाही तर पुंकेसरांचे स्थान बदलण्यात येईल,
परागकण अधिक कोरडे व हलके करण्यात येतील, ज्यामूळे त्याला
परागकणांचा त्रास होणार नाही.
समजा पक्ष्याचा नाद सोडून किटकांचा उपयोग करायचा असे ठरले तर
या "फूला"ला सुगंध प्राप्त होईल. पाकळ्यांची रचना गोलाकार करण्यात येईल.
रंगातही काही बदल केले जातील.
नेमके काय होईल ते सांगता येत नाही, आणि ते बघायला मी असणार नाही.

उत्क्रांतीवरचा अनिल अवचटांचा
उत्क्रांतीवरचा अनिल अवचटांचा सा. सकाळ मधला लेख वाचनात आला. त्यात ही कल्पना सोप्या शब्दात छान समजावुन देण्यात आली आहे.
http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20101102/5578957639629892580.htm
डेलिया, हेच सांगणार होते मी
डेलिया, हेच सांगणार होते मी आता.
मीना प्रभुंनी त्यांच्या प्रवासवर्णात याच गालापागोसच बेटांचे वर्णन केले आहे. त्याही असंच म्हणतात.
भन्नाट...मस्त...असेच लेख टाकत
भन्नाट...मस्त...असेच लेख टाकत जा...तेवढीच ज्ञानात भर.
सुगरण घरटे बांधतो आणि सुगरीण
सुगरण घरटे बांधतो आणि सुगरीण ते तपासायला येते. तिला ते पसंद पडले तर त्यांचे सुत पुढे सरकते
आता ही बया ते घरटे पसंत कसे करते? पसंतीचे निकष काय? तेही जनुकातुन आलेले असतात?
घरटे बांधणे जनुकातुन आले, त्यात त्या विशिष्ट पक्षाची स्वतःची करामत काहीच नाही, पसंत करणेही जनुकातुन आले, त्यात त्या मादीची स्वतःची आवडनिवड काही नाही. याचा अर्थ असा निघतो का की जी घरटी निवडली जात नाहीत ती घरटी बांधणा-या नरांमध्ये त्या प्रकारची घरटी बांधण्याचीच जनुके होती, पण त्या प्रकारची घरटी पसंत करणारी जनुके माद्यांमध्ये नसल्याने ते नर बिचारे नामशेष होणार? आणि तो नर परत बांधायला घेतो ते घरटे पण आधीसारखेच असणार. मग त्याला तसले घरटे पसंत करण्याची जनुके असलेल्या मादीची वाट पाहात परत परत घरटे बांधण्याशिवाय पर्याय उरणार नाही. आणि एखाद्याला ह्या जन्मी तसली बया सापडली नाही तर संपला कारभार त्याचा
सोल्लिड गुंतागुंत...... यापेक्षा सगळ्यांनाच बुद्धी देऊन टाकलेली परवडली. जो तो स्वत:चा कारभार स्वतःच पाहिल
दिनेशदा फारच सुंदर लेख.
दिनेशदा फारच सुंदर लेख. चांगली माहीती मिळाली.

झाडाच्या पानावरुन आणि पाकळ्यांवरुन भारतातल्या देवकेळीची (कर्दळ) जात साधारण अशीच आहे अस वाटत.
हा फोटो पाहा.
साधना सुगरण घरटे बांधत असताना मी बरेचदा पाहते. आमच्या समोरच्या नारळावर भरपुर सुगरणी घरटी बनवतात. सगळ्या एकाच वेळी बांधत असतात तेंव्हा भरपुर चिवचिवाट चालु असतो त्यांचा. काय चालु असत त्यांच्यात कोण जाणे तुझ घरट माझ्या अधी की एकमेकांना मदत करत असतात काय माहीत ?
आमच्या समोरच्या नारळावर भरपुर
आमच्या समोरच्या नारळावर भरपुर सुगरणी घरटी बनवतात.
माझ्या इथे पण नारळावर घरटी बांधतात. घरटी हिरवीगार असतात बांधताना. चिंचेवर पण बांधतात. मला खुपदा वाटते एखादे नाकारलेले घरटे आणावे घरी. पण नारळाच्या झाडावर चढणार कोण?? माझ्याकडे एक होते आधी. पण ते हिरवेगार नव्हते. कधी कधी सकाळी एखादा पक्षी उडताना लांब शेपुट दिसते, वाटते कोण हा नवा बाबा?? नीट पाहिले तर दिसते की चोचीत एखादे लांब पान किंवा तसेच काहीतरी घेऊन बाबा चाललाय घर बांधायला...
नेरुळ स्टेशनच्या दारात बांबुचे मोठे बन आहे. संध्याकाळी चिमण्या इतक्या गोंधळ घालत असतात की वाटते निदान हजारभर चिमण्या त्या बनात आल्या असतिल निजायला.
आता ही सगळी मंडळी काय बोलत असतात माहित नाही, मी कल्पनेने १०० पाने डायलाग लिहु शकेन पण मग तज्ज्ञ मंडळी म्हणतील मानव सोडुन इतरांमध्ये मुळात संवादच नसतो..
मग झाले, झोपली माझी १०० पाने..... 
अगं तु मागे टाकलेले ना
अगं तु मागे टाकलेले ना हेलिकोनिया, हे त्याच फॅमिलीतले. कर्दळ सुद्धा याच फॅमिलीतली असेल कदाचित. आपला सोनटक्का पण याच ऑर्डरमधला.
साधना मग त्यांचेही फोटो
साधना मग त्यांचेही फोटो टाकते.


जागु, देवकेळीची (कर्दळ) ची
जागु,

देवकेळीची (कर्दळ) ची झाडे पुर्वी लहानपणी मी खुप पाहत होतो,त्याच्या बिया गोल, काळसर रंगाच्या पण कडक असतात त्या आम्ही बारीक नळी करुन तोंडाने फुंकुन या बिया हवेत तरंगवायचो ,पण सध्या ते दुर्मिळ झालेत अस दिसतयं
त्याच्या काही लाल्,पिवळ्या अशा काही जाती मी पाहिल्या आहेत ..
तुम्ही,दिनेशदा किंवा इतर जाणकारांनी याबद्दल आणखी माहिती द्यावी
> पण मग तज्ज्ञ मंडळी म्हणतील
> पण मग तज्ज्ञ मंडळी म्हणतील मानव सोडुन इतरांमध्ये मुळात संवादच नसतो.. अरेरे मग झाले, झोपली माझी १०० पाने..... स्मित
Fiction म्हणुन लिहायची
> आता ही बया ते घरटे पसंत कसे करते? पसंतीचे निकष काय? तेही जनुकातुन आलेले असतात?
जनुकातुन instincts येतात - अगदी नेमके आदेश नाही. कोणत्याही २ जिवांमध्ये जे संख्याशास्त्रीय (statistical) फरक असतात त्यामुळे पुढे बराच फरक पडु शकतो. पण एकुण नेमका कोणता आणि किती भाग जनुकीय आहे आपल्याला पुर्णपणे कळलेले नाही. (मला तरी माहीत नाही). तिथे genotype-phenotype हा फरक येणार. त्यासंबंधी इथे कुणी तज्ञ असतील तर लिहु शकतील.
अनिल कर्दळ तुम्ही म्हणता
अनिल कर्दळ तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पिवळी आणि त्यावर थोडे लालसर डॉट असलेली असते तसेच पुर्ण लालभडकही असते आणि त्यांची पाने रुंद, गोलाकार असतात साधारण सोनटक्क्याप्रमाणेच. फोटो मिळाले तर टाकेन.
अश्चिग धन्यवाद... आता ह्या
अश्चिग धन्यवाद...
आता ह्या विषयावर आहोतच तर मग किटक/पक्षी यांना आपल्यापेक्षा जास्त रंग दिसतात, कुत्र्याला फक्त काळे/पांढरे दिसतात किंवा अजुनही जे काय माणुस सोडुन इतरांना दिसते ते तसे दिसते हे माणसाने कसे काय ओळखले??
हे माझ्या हाफिसातले वरसारखेच
हे माझ्या हाफिसातले वरसारखेच दिसणार फुल.
टायगर कर्दळ पण आहे पण आता फोटो काढुन इथे चिकटवेपर्यंत इथले नेट कनेक्षन गायब होईल
कर्दळीमध्ये पण आता बरेच बदल केलेत माणसाने. पिवळी आणि वर लाल ठिपके असलेली टायगर कर्दळ पहिल्यांदा कुठल्याही गटाराच्या बाजुला दिसायची. पण आता जास्त दिसत नाही. मानखुर्द स्टेशनच्या बाजुच्या दलदलीत मात्र कित्येक वर्षे तिचे साम्राज्य अबाधित राहिले आहे.
माझ्या ऑफिसात अगदी बुटकी आणि रक्तवर्णी फुले असलेली कर्दळही आहे. या फुलांना पाकळ्याही भरपुर असतात. मुळ कर्दळीला पाकळ्या इतकया नव्हत्या.
साधना साधारण तसेच आहे ग हे
साधना साधारण तसेच आहे ग हे फुल.
मृदुल, सॅम आणि आस्चिग, मला
मृदुल, सॅम आणि आस्चिग, मला वाटते "विचार" या शब्दावर आपले एकमत होत नाही. ज्या अर्थाने आपण प्राण्यांच्या संदर्भात हा शब्द वापरतो, तो अर्थ मला अपेक्षित नाहीच, पण पर्यायी शब्दही सूचत नाही.
सर्व बदल जनूकातच असतात, प्राणी, पक्षी अनूभवाने काही शिकत नाहीत, हे मला मान्य नाही. माकडातल्या काही जाती, उपकरणे वापरायला शिकल्या आहेत (दगडाने कठीण बिया फोडणे, वारुळात काडी घालून मूंग्या बाहेर काढणे वगैरे ) असे जे करतात, त्यांच्या आजूबाजूची माकडे ते बघून शिकतात. मग काही पिढ्यानंतर हे कौशल्य त्यांच्यामधे आपसूकच येईल ना.
जपानमधले काही पक्षी सिग्नलजवळ बिया टाकून त्या गाड्यांखाली फोडून घेतात, आणि मग पुढच्या वेळी सिग्नललाच गाड्या थांबल्या, कि त्या बियांतला गर खातात, हे ही कौशल्य त्यांच्या जनूकात उतरेलच.
तर हेच तर्कट (लॉजिक) मला झाडांच्या बाबतीत चालवावेसे वाटते. मी सुलभीकरणासाठी बी ऑर्किडचेच उदाहरण घेतो. हा गंध झाडाकडे अपघातनेच आला, म्हणजे झाडाजवळ आलेल्या एका बी (किटक) कडूनच. रसायनशास्त्रात आपण शिकतो कि काही नव्याने तयार होत नाही, म्हणजे झाडाच्या अंतर्गत प्रक्रियेतूनच त्या गंधाचे रेणू निर्माण झाले पाहिजेत.(म्हणजे प्रत्येकवेळी मादि येऊन आपला गंध त्या फूलावर सोडेल, मग त्या गंधाने नर येईल, हे कसे शक्य आहे?) मग नेमकी हि क्रिया अगदी पहिल्यांदा कशी घडली असेल. तो क्षण मला महत्वाचा वाटतो.
वरती अनिलने लिहिले आहे कि कर्दळी आता कमी दिसतात. अनिल माझ्यापेक्षा वयाने नक्कीच लहान आहे, पण सॅम ला आठवायला हरकत नाही, २५/३० वर्षांपूर्वी मुंबईत भरपूर कर्दळी होत्या. गोरेगावच्या आरे कॉलनीत तर अनेक रंगांच्या होत्या. मंत्रालयाच्या बागेत होत्या. त्याकाळी तिथे शूटींग झालेल्या अनेक हिंदी गाण्यात त्या आहेत. त्या काळात कर्दळीच्या नवनवीन जाती, रंग आले होते. त्यांची लागवड कंदाने आणि वरच्या जागूच्या फोटोतल्या लाल छोट्या कर्दळीची लागवड तर बियांनेही होत असे. (ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेल्या मी पून्हा फिरेन वनांतरी हरीणीवाणी, या नाट्यगीतात पण कर्दळीचा उल्लेख आहे.) पण अचानक कर्दळींची लोकप्रियता कमी झाली. आता कर्दळी आपला वंश टिकवण्यासाठी काय करतील ?
वरच्या जागूने दिलेल्या फोटोतील लाल पिवळ्या फूलांचे परागीकरण सूर्यपक्षी किंवा हमींग बर्डच करू शकेल. साधना ने जो पिवळ्या फूलांचा फोटो दिलाय त्यातही फूलासारखी रचना नाही, पण बिया तयार झालेल्या दिसतात.
पण आपल्या आयूष्यमानाचा विचार केला, तर ते आपल्याला बघता येणार नाही.
मला असे अनेक बदल आजूबाजूला होताना दिसत आहेत. त्यातले काही फोटोसकट इथे मांडणार आहे,
> त्यांच्या आजूबाजूची माकडे
> त्यांच्या आजूबाजूची माकडे ते बघून शिकतात. मग काही पिढ्यानंतर हे कौशल्य त्यांच्यामधे आपसूकच येईल ना.
दिनेशदा, तुम्ही म्हणता आहात ती लमार्कीय उत्क्रांती, डार्वीनीय नाही.
त्याबद्दल मागे एकदा मी थोडे लिहिले होते.
http://www.maayboli.com/node/14292
त्याचा जनुकांशी थेट संबंध नाही.
<<<आता ही बया ते घरटे पसंत
<<<आता ही बया ते घरटे पसंत कसे करते? पसंतीचे निकष काय? तेही जनुकातुन आलेले असतात?
आता बायका नाही वेगवेगळे निकष लाऊन पुरुष निवडत? आता बिनधास्त बोलतात आधी मनातच ठेवायच्या बहुतेक
एक प्रश्न दिनेशदा यांना :
एक प्रश्न दिनेशदा यांना : सुर्यपक्षी म्हणजे कोणता? फोटो वगैरे आहे का? गुगलवर काय शोधायचे?
@aschig : जनुकांशी थेट संबंध
@aschig : जनुकांशी थेट संबंध सुरूवातीला नसेल पण त्या स्किलच्या अनुसार बदल शरीरात होते गेले की ते जनुकीय होतील असे वाटते. उदा. भाषांसाठी असणारी फॉक्सपी२ जीन.
शिल्पा, हा एक प्रकारचा
शिल्पा, हा एक प्रकारचा सनबर्ड (सुर्यपक्षी). याच्यात खुप रंग आहेत असे मला तरी वाटते. मी घराच्या बाजुला हिरवे पाहिलेत. माझ्या बागेत रोज येतो तो काळा वाटतो पण खरे तर अतिशय गडद मोरपंखी निळा रंग आहे त्याचा. एका विशिष्ट कोनातुन उन पडले त्याच्यावर की तो मोरपंखी रंग चमकतो.
इथे त्याला इंग्रजीतल्या सनबर्डवरुन सुर्यपक्षी म्हटलेय बहुतेक, किंवा त्याचे नाव सुर्यपक्षीच असावे. दुर्गाबाईंच्या ऋतुचक्रमध्ये त्यांनी यांना फुलचुख्या म्हटलेय. आणि ते अगदी सार्थ आहे.
फुलचुख्या...मस्त नाव !
फुलचुख्या...मस्त नाव !
हे झाड वर्षभरापूर्वी मी
हे झाड वर्षभरापूर्वी मी कुठेतरी पहिले होते.. त्यानंतर गणपतीच्या दिवसात दादर फुल बाजारात मला ६० रुपये जोडी अश्या दराने ते मिळाले.. अर्थात लावायला नाही तर सजावटीसाठी.
ह्यानंतर अनेक महिने मी ते झाड कुठे सापडेल का म्हणून शोधत होतो. अखेर जिजामाता उद्यानात भरणाऱ्या प्रदर्शनात दापोलीच्या एका नर्सरीमध्ये ही झाडे मिळतात असे कळले. मार्च महिन्यात सहज वेळास - मुरुड येथे गेलो असता गावात सर्वत्र ही झाडे आढळली. दापोली येथे गेलो असता दापोली कृषी विद्यापीठाच्या नर्सरीमध्ये पिवळे हेलीकोनिया सापडले. तसेच बर्ड ऑफ पॅराडाईझ देखील सापडले. ह्याच्या विविध १०-१२ जाती आहेत त्याचा तक्ता सुद्धा मिळाला सध्या माझ्या घरच्या बागेत अशी ४ झाडे डोलत आहेत.
काही दिवसांपूर्वी कामावर निघालो तेंव्हा एक फुल नुकतेच डोके बाहेर काढू लागले होते. आता त्याला फक्त फोटोतच बघावे लागेल...
सध्या ठाण्यात हायवेच्या बाजूने दुतर्फा (नितीन कंपनी जवळ) ही झाडे लावली आहेत.. त्यांचे संगोपन आणि राखण केली तर परिसर छान खुलून येईल... मला खात्री आहे की ह्या झाडाला येत्या काळात चांगले दिवस येणार...
सजावटीला मागे दोन्ही बाजूला
सजावटीला मागे दोन्ही बाजूला वापरलेले दीपकळी....

विषयांतर होतय. पण राहवलं
विषयांतर होतय. पण राहवलं नाही. गणपतीची सजावट सुरेख दिसतेय.
साष्टांग नमस्कार दिनेशदा,
साष्टांग नमस्कार

दिनेशदा, खरेच ग्रेट आहात, तुमचा प्रत्येक लेख म्हणाजे एक पर्वणीच असते. धन्यवाद
Pages