हे आहे स्ट्रेलित्झिया किंवा बर्ड ऑफ पॅराडाईझ फ्लॉवर. मराठीत याचे नाव दीपकळी असल्याचे एका
प्रदर्शनात बघितले होते.
वंशसातत्य टिकवणे हे तर प्रत्येक सजीवाचे धेय असते, अगदी सूक्ष्म वनस्पती पण त्यांना
अपवाद नसतात.पण वनस्पतिंवर असणारे एक सर्वात मोठे बंधन म्हणजे ते इतर सजीव,
म्हणजेच किटक, पक्षी व प्राणी यांच्याप्रमाणे हालचाल करू शकत नाहीत. पण यावर
त्यांनी अफ़लातून उपाय शोधून काढलेले असतात.
रुढ अर्थाने, म्हणजे आपल्या डोळ्यांना जाणवेल अशी हालचाल म्हणजेच स्थलांतर
त्या करत नाहीत. त्यांचा प्रवास होतो तो मुख्यता परागकणांच्या रुपात किंवा
बीजांच्या रुपात. आणि यासाठी त्यांना इतर सजीवांची मदत घ्यावी लागते.
हि मदत अर्थात विनामोबदला क्वचितच असते. आजकाल कोण कुणासाठी
काय करतो हो ? यात काहीवेळा फ़सवणुकीचे प्रकार होतातच. पण एकमेकांवर
कुरघोडी करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी होत असतात. या प्रयत्नांतून जे बदल
फायदेशीर ठरतात, ते पुढच्या पिढीत उतरतात.
हि जी प्रक्रिया असते ती आपल्या आयूष्यमानाच्या तूलनेत इतकी संथ असते,
की आपल्याला एका आयूष्यात ती अनुभवणे अशक्य असते. ठराविक वनस्पति
आणि ठराविक किटक वा पक्षी यांचे परस्पर संबंध इतके दृढ असतात की काही
कारणाने, एका प्रजातीला धोका झाल्यास वा त्यांची संख्या घटल्यास, त्याच्याशी
संबंधित असणारी दुसरी प्रजाती नष्ट होण्याचा धोका असतो. मानवाच्या बाबतीत
मात्र याची शक्यता कमी आहे. संपूर्ण मानवजात पृथ्वीवरून नष्ट झाली, तरी फारसे
काहि बिघडणार नाही. (कदाचित कोंबडी, कुत्रे, गहू, बटाटा वगैरे नष्ट होतील.)
तर हे जे बदल होत असतात, ते आपल्याला जाणवतील इतक्या वेगाने होत
नाहीत, पण असे एक उदाहरण मलाच काय तूम्हालाही अनुभवता येईल.
वरच्या फ़ोटोत जे "फूल" दिसतेय, ते असा प्रयत्न सध्या करत आहे.
या "फूला"चे काही प्रकार तूम्ही आजूबाजूला बघितले असतील. (इथे जमल्यास
अवश्य फ़ोटो टाका.) फूलाचा उल्लेख केला तर एक बेसिक रचना आपल्या
डोळ्यासमोर येते. पाकळ्यांची गोलाकार रचना आणि मधे स्त्रीकेसर आणि
पूंकेसर यांची दाटी (शिवाय मादी फूल असेल तर बाल्यावस्थेतला बीजकोषही.)
इथे तशी काही रचना दिसत नाही. म्हणजे पाकळ्यासदृष्य काहीतरी आहे पण
ते गोलाकार नाही.
परागीभवन करणारे दोन मुख्य सजीव घटक म्हणजे किटक आणि पक्षी.
(इतर निर्जीव घटकात वारा येईल.) पण या दोघांच्या सवयीत फ़रक आहे.
दोघांना ही मोबदला म्हणून झाडे साखरपाणी देतात. (हो ते केवळ साखरपाणीच
असते. मध ही पूर्णत: मधमाश्यांची निर्मिती असते.)
या दोघांतला मुख्य फरक आहे तो त्यांच्या रंग आणि गंध ओळखण्याच्या
क्षमतेत. किटकांची नजर वर्णपटलाच्या अतिनील टोकाकडे जास्त संवेदनशील
असते. आपल्याला पिवळा दिसणारा रंग त्यांना जांभळा दिसू शकतो. तसेच
त्यांची गंधांची जाणीव खूपच तीव्र असते. फुलांनी निर्माण केलेले गंध त्यांना
दूर अंतरावरून ओळखता येतात. आणि त्याचा मागोवा घेत ते फुलांकडे येतात.
रंग काय किंवा गंध काय, ते निर्माण करण्यासाठी झाडांना बराच कच्चा माल
जमवावा लागतो. त्यामूळे जर गंध तीव्र असेल आणि त्याने काम भागणार
असेल तर रंग निर्माण केले जात नाहीत. रात्री उमलणारी अनेक फूले यासाठीच
सुगंधी आणि शुभ्र असतात. रात्री तसाही रंगांचा उपयोग नसतो.
पक्ष्यांची नजर मात्र वर्णपटलाच्या लाल टोकाकडे तीव्र असते. त्यांनाही आपल्या
प्रमाणेच, लाल, नारिंगी, पिवळा या रंगांचे आकर्षण असते. (आपण खातो ती
बहुतेक फळे याच रंगात असतात.) ते रंग त्यांना दूरवरून ओळखता येतात.
आपल्याकडची सावर, पांगारा, पळस फूलायला लागले कि त्याच्यावर पक्षी
सम्मेलनच भरलेले दिसते. पण या तिन्ही फूलांना गंध नसतो, कारण पक्षांचे गंधज्ञान
तितकेसे चांगले नसते.
आता पक्षी यायला हवे असतील तर आणखी सोयी कराव्या लागतात. एकतर
फूलाचा आकार एवढा मोठा हवा कि पक्षी त्यात चोच घालू शकेल. तसे असे
करताना, त्याचे डोके, छाती, गळा वगैरे अशा स्थितीत असले पाहिजेत कि
त्यावर परागकणांचा शिडकावा करता येईल. शिवाय पक्षाला बसायला मजबूत
आधार दिला पाहिजे. यासाठी फूलांचा देठही आखूड हवा, पण जवळची फ़ांदी
मजबूत हवी. हे सगळे वरच्या तीन झाडांत दिसतेच.
वटवाघूळ जरी उडत असले तरी ते पक्षी नसल्याने, त्याचे गंध ज्ञान चांगले
असते. त्यामूळे परागीभवनासाठी त्याच्यावर अवलंबून असणारी, वाघूळफूले
(ब्रम्हदंड) खास वेगळ्या डीझाईनची असतात. आणि त्यांना सडणार्या मांसाचा
गंध असतो.
तर आता परत वरच्या फूलाकडे वळू. यातली फक्त एकच "पाकळी" जांभळी
व बाकीच्या केशरी आहेत. म्हणजे या फूलाला, पक्षी आकर्षित करायचे आहेत.
मग त्यात यश मिळालेय का ?
तूमच्या बघण्यात ही फूले असतील, तर यावर सकाळच्या वेळी सूर्यपक्षी आलेले
दिसतात.
या झाडाने "विचार" केलाय कि जर तो सूर्यपक्षी त्या जांभळ्या "धावपट्टी" वर
उतरला, तर त्याच्या डोक्यावर परागकण चिकटवता येतील. कधीकाळी सूर्यपक्ष्याने
ते करून बघितलेही असेल. पण त्यात सूर्यपक्ष्याचे नूकसान झाले असणार.
या झाडाचे परागकण जरा ओलसर आणि चिकट असतात. ते डोक्यावर चिकटलेले
त्याला आवडत नाहीत. शिवाय ती जांभळी पाकळीही त्याला बसण्याइतकी मजबूत
नसते.
पण एकदा चटक लावल्यामूळे सूर्यपक्षी या फूलावर येतच राहतो. पण आता त्याची
बसण्याची जागा ती आडवी रंगहीन पाकळी असते. तिथेही तो जरा लांबच संभाळून
बसतो. त्याची चोच लांब व बांकदार असल्याने, त्याचा खाऊ मिळवण्यात त्याला
काही अडचण येत नाही, पण अंगाला परागकण लावून घ्यायचे मात्र तो टाळतो.
यात नूकसान आहे त्या झाडाचे, कारण त्याचे साखरपाणी तर द्यावे लागतेय, पण
परागीभवन काही होत नाही.
पण मूळात असे अडनिडे डिझाईनच का निर्माण झाले ? तर दक्षिण आफ्रिका, जे
या झाडाचे मूळ स्थान आहे, तिथे आधी पालसदृष्य गेको प्राण्यांचे वर्चस्व होते.
पालीसारखा प्राणी जर त्या जांभळ्या पाकळीवर बसला (आणि त्याच्या पुढच्या
पायांना आधार देणारे कंगोरेदेखील आहेत.) तर बाकिच्या पाकळ्या योग्य रितीने
वळून, त्या पालीच्या डोक्यावर परागकण ओतले जाऊ शकतात.
आता पाल हा प्राणी परागीभवन करु शकतो का असा प्रश्न पडेल. न्य़ू झीलंड मधे
सर्वत्र आढळणारा पोहोतुकावा हा लाल फूलांचा वृक्ष अजूनही त्यांच्याचकडून
परागीभवन करुन घेतो. तिथे बाकिचे किटक, पक्षी तूलनेने कमी संख्येत आहेत,
म्हणून ही व्यवस्था अजूनही टिकून आहे.
दक्षिण आफ़्रिकेत मात्र बदल झाले. एकतर पाली तितक्या उरल्या नाहीत,
ज्या उरल्यात त्यांनी मांसाहार करायचा असे ठरवले त्यामूळे त्या फूलांवर जात
नाहीत. तिथे गेल्या तर त्यांना पक्ष्यांपासून धोका आहे. (काही सरपटणार्या
प्राण्यांपासूनच पक्षी उत्क्रांत झालेत.) म्हणजे पालींचा आणि या झाडाचा
ऋणानुबंध संपलाय. आता पुढे काय ?
हा या झाडाच्या उत्क्रांतीचा एक टप्पा आहे. सध्यातरी नैसर्गिक रित्या याचे
परागीभवन होत नाही. मानवी प्रयत्नातूनच ते शक्य होते.
कदाचित हे झाड जगभरच्या बागांमधे इतके लोकप्रिय होईल, कि त्याला स्वत:
काही प्रयत्न करावे लागणार नाहीत. मानवाला आकर्षित करण्यासाठी जास्त
पाकळ्या, अनेक रंग, मोठा आकार असे बदल, कदाचित मानवाकडून होतील.
सुर्यपक्षी आपल्या सवयी बदलेल, अशी शक्यता कमी आहे. पण इतर दुसरा
कुठलातरी पक्षी आकर्षित करण्याचा प्रयत्न हे झाड नक्कीच करेल.
सूर्यपक्ष्याला पर्याय सापडला नाही तर पुंकेसरांचे स्थान बदलण्यात येईल,
परागकण अधिक कोरडे व हलके करण्यात येतील, ज्यामूळे त्याला
परागकणांचा त्रास होणार नाही.
समजा पक्ष्याचा नाद सोडून किटकांचा उपयोग करायचा असे ठरले तर
या "फूला"ला सुगंध प्राप्त होईल. पाकळ्यांची रचना गोलाकार करण्यात येईल.
रंगातही काही बदल केले जातील.
नेमके काय होईल ते सांगता येत नाही, आणि ते बघायला मी असणार नाही.

मानवाच्या बाबतीतली माझी काही
मानवाच्या बाबतीतली माझी काही निरिक्षणे. हे ही उत्कांतीचीच उदाहरणे का? :
१. पूर्वी नविनच जन्मलेली बाळे डोळे बंद करून दिवसेंदिवस पडून असायची. आता जन्मताच डोळे उघडतात.
२. हाताच्या मुठी वळवलेल्या नसतात.
३. मुलांचे बोबडे बोलणे खूपच कमी झालेय.
दिनेशदा.... लेख खुप खुप खुप
दिनेशदा.... लेख खुप खुप खुप खुप खुप्प्प्प्प्प्प्प्प आवडला.... अॅनिमल प्लॅनेटवर मराठीत डॉक्युमेंटरी पहातेय असा भास होत होता... वेगळीच दृष्टी मिळाली आज... केवढा गाढा अभ्यास आहे तुमचा सर्वच क्षेत्रांचा!!! मानलं बुवा तुम्हाला... ____/\____
तुम्ही वापरलेले शब्दसुद्धा खुप छान आहेत... जसे साखरपाणी, अतिनील टोक, जांभळी धावपट्टी, सूर्यपक्षी, परागकण ओतणे... इतक्या सुंदर फुलाचे दीपकळी हे तितकेच सार्थ आणि सुंदर नाव... आहाहा... एका वेगळ्याच विश्वात आहे मी आत्ता...
साधनाचे प्रश्न आणि तुमचे त्यावरचे उत्तरसुद्धा खुप आवडले.
खरंच! मामी, उत्तम
खरंच!
मामी, उत्तम निरीक्षण!
('यातली अनेक लक्षणे नंतर मायबोलीवर आल्यावर दिसून येतात' हा विनोदाचा प्रयत्न समजावात! )
सापांना आधी पाय होते ही खरच नवीन माहिती मिळाली. काही कोंबड्या मात्र उडतात ! पण स्टॅटिस्टिकली कमी झाले असल्यास अजिबात माहीत नाही. याच्यात 'मुद्दाम पोसलेल्या कोंबड्या' या प्रकारामुळे काही फरक पडला असेल का? उदाहरणार्थ वेन्कीज वगैरे!
-'बेफिकीर'!
<<आपल्या लहानपणी पेरुचा असा
<<आपल्या लहानपणी पेरुचा असा एक आकार असायचा, चित्रकलेत आपण नेहमी तोच आकार काढायचो. आता बहुतेक सगळे पेरु गोल गरगरीत असतात. मग ते पेरू, हळू हळू मागे पडत नष्ट होतील...............................................मानवाच्या बाबतीत देखील, आपल्या नैसर्गिक क्षमतांचा वापरच आपण केला नाही, (उदा तोंडी हिशेब ) तर काही पिढ्यांनंतर ती क्षमताच उरणार नाही.>>
खरंच फार इंटरेस्टंस्टिंग माहिती दिनेशदा.
आजकाल मोजून दहासुद्धा फोन नंबर्स तोंडपाठ नसतात,हेसुद्धा ह्यातलंच एक उदाहरण ना !...वापरा नाहीतर विसरा !
रु़णुझुणूशी सहमत आहे. मेंदू
रु़णुझुणूशी सहमत आहे.
मेंदू जितका वापरला जाईल तितका पुढच्या पिढ्यांसाठी उपलब्ध होत असावा.
सानी, मी भाग्यवान आहे कारण
सानी, मी भाग्यवान आहे कारण असा निसर्ग माझ्या आजूबाजूला नेहमीच राहिलाय. फक्त डोळे उघडून त्याचा आस्वाद घ्यायचा एवढेच तर मला करायचे असते.
मामी, अगदी बरोबर.
पुर्वी कुशीवर वळणे, पालथे पडणे, पुढे सरकणे, रांगणे, बसणे, उभे राहणे, चालणे असे टप्पे असायचे आता बरीच बाळं यातले काही टप्पे टाळून प्रगती करतात.
पण आपल्या काही क्षमता मात्र कमी होत चालल्या आहेत. बारिक आवाज ऐकण्याची क्षमता, बारीक वस्तू बघण्याची क्षमता, चालण्या पळण्याची क्षमता कमी होत चाललीय. दात, केस पण आता तितके मजबूत नसतात.
मेंदूचा वापर कमी झाला नसून,
मेंदूचा वापर कमी झाला नसून, मेंदूच्या वेगळ्या भागाचा वापर होऊ लागला आहे असे मला वाटते. आताच्या पिढीला स्मरणशक्तीपेक्षाही गरज आहे ती इतर काही गोष्टींची उदा.मल्टीपल चॉईस मधून अचूक निवड करण्याची (माहितीचा अखंड धबधबा विविध मिडियाद्वारे समोर ओतला जात असताना आपल्याला आवश्यक तेवढी माहिती मिळविणे).
बेफिकिर, अगदी
बेफिकिर, अगदी खरंय.
कोंबड्यांच्या बाबतीत, आता नैसर्गिक रित्या वाढणार्या, म्हणजे माणसाने न पाळलेल्या कोंबड्या असतातच कुठे ?
मामी, हेच तर नैसर्गिक निवडीचे तत्व आहे. आता भकाभक प्रकाश असताना, पुर्वीसारखे अंधारात धान्य निवडण्याची गरज उरली नाही, म्हणून ती क्षमता कमी झाली. आपण मेंदूचा जो भाग वापरू तो जास्त विकसित होणार.
आज आपल्याला निवड करण्याची क्षमता, जास्त वापरावी लागते. त्यामूळे ती विकसित होणार पण कदाचित स्मरणशक्ती कमी होईल. सध्या तरी आपल्या हातात तर्क करणे एवढेच आहे, नेमके काय होईल, ते सांगणे कठीण आहे.
लेख फारसा पटला
लेख फारसा पटला नाही.
शिवाय
पुर्वी कुशीवर वळणे, पालथे पडणे, पुढे सरकणे, रांगणे, बसणे, उभे राहणे, चालणे असे टप्पे असायचे आता बरीच बाळं यातले काही टप्पे टाळून प्रगती करतात. >>>> हे तर अजिबातच कळले नाही... टप्पे गाळून म्हणजे नक्की काय ? एखादं लहान बाळ जे सुरुवातीला उताणं झोपतं ते कुशीवर न वळता एकदमं पालथच होतं ?? की रांगता रांगता उभं न रहाता एकदम चालायला लागतं ??? तुम्ही लिहिलेल्या ह्या प्रोसेसमधले कुठले टप्पे पूर्ण गाळणे शक्य आहे का ?
ह्या तसच
पण आपल्या काही क्षमता मात्र कमी होत चालल्या आहेत. बारिक आवाज ऐकण्याची क्षमता, बारीक वस्तू बघण्याची क्षमता, चालण्या पळण्याची क्षमता कमी होत चाललीय. दात, केस पण आता तितके मजबूत नसतात. >>> ह्या निरिक्षणांना काही स्टॅटीसटीकल आधार आहे का ?
दिनेशदा, चांगला
दिनेशदा, चांगला लेख!
माझ्याकडे काही फोटो असायला हवे (हवाई ला भरपुर दिसतात ही फुले, आणि बहुदा पॅसॅडेना मध्येही आहेत). सापडले की डकवीन इथे.
पण उत्क्रांतीचे किंचीत trivialization होते आहे असे वाटते.
नुसती चित्रे पाहुन, ती पण वेगवेगळ्या ठिकाणची, काही ठरवता येणार नाही. एकाच झाडापासुन सुरु झालेल्या अनेक पिढ्या पहाव्या लागतील.
> या झाडाने "विचार" केलाय कि जर तो सूर्यपक्षी त्या जांभळ्या "धावपट्टी" वर उतरला, तर त्याच्या डोक्यावर परागकण चिकटवता येतील.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे उत्क्रांती ही विचारपुर्वक होत नसते तर अपघाती/योगायोगी असते. बरेच छोटे छोटे बदल होत असतात. त्यापैकी जे वाचतात ते पुढे जात राहतात, पसरतात.
गम्मत म्हणजे या झाडातच पहिल्यांदा असा एक रंग सापडला आहे की जो केवळ प्राण्यांमध्ये असतो असे समजले जायचे.
http://www.redorbit.com/news/oddities/1914689/bilirubin_discovered_in_bi...
परागशी सहमत. तुमचे शरीर एकदा
परागशी सहमत.
तुमचे शरीर एकदा बनले की त्याचा तुम्ही वापर कसा करता हे तुमच्यावर असते - त्याची क्षमता कमी झाली आहे असे नाही. आंत्रपुच्छ अनावश्यक असणे, अक्कलदाढेची आवश्यकता नसणे या गोश्टी उत्क्रांतीशी संबंधीत आहेत.
सध्या उडता येत नसलेले साप उडु शकतील किंवा उडतील का हे ते साप सुद्धा सांगु/ठरवु शकणार नाहीत.
लेख वाचायला मजा आली पुर्वी
लेख वाचायला मजा आली
माझ्या मुलाने मात्र हे सगळे टप्पे अगदी वेळच्यावेळी घेतले. उत्क्रांतीचा भाग असता तर असं झालं नसतं ना ?
पुर्वी कुशीवर वळणे, पालथे पडणे, पुढे सरकणे, रांगणे, बसणे, उभे राहणे, चालणे असे टप्पे असायचे आता बरीच बाळं यातले काही टप्पे टाळून प्रगती करतात. >>> ह्यात उत्क्रांतीपेक्षा मानवी स्वभावाचा भाग असावा. मी माझ्या लहानपणी पुढे सरकणे आणि रांगणे हे दोन टप्पे घेतलेच नाहीत. डायरेक्ट बसायला आणि नंतर धरुन उभं राहायला, चालायला शिकले. आळशीपणा दुसरं काय !
पुर्वी कुशीवर वळणे, पालथे
पुर्वी कुशीवर वळणे, पालथे पडणे, पुढे सरकणे, रांगणे, बसणे, उभे राहणे, चालणे असे टप्पे असायचे आता बरीच बाळं यातले काही टप्पे टाळून प्रगती करतात.>>>
मला पण हे फारस पटल नाही. माझी मुलगी कधीच रांगली नाही. बसायला लागल्यानंतर पुढची स्टेप रांगण्या ऐवजी ती स्कुटिंग करत असे.
पण उत्क्रांतीशी रिलेटेड अशा प्रकारच्व बिहेव्हियर नसावेत अस वाटत. मुलांना ज्या प्रकारच स्टिम्युलेशन मिळत , जीन्स , वातावरण इत्यादींचा त्यांच्यावर परिणाम जास्त होतो.
आजकालची मुल फार स्मार्ट झाली आहेत. फार लवकर सगळ कळत त्यांना . अस विधान आपण करतो पण तेव्हा त्याचा संबध उत्क्रांतीशी नसुन "आजुबाजुला इझीली माहिती अव्हाइलेबल असण" हा आहे , अस जास्त वाटत.
aschig <उत्क्रांती ही
aschig <उत्क्रांती ही विचारपुर्वक होत नसते तर अपघाती/योगायोगी असते. बरेच छोटे छोटे बदल होत असतात. त्यापैकी जे वाचतात ते पुढे जात राहतात, पसरतात. > हे पटले. पण तरिही मला नेहेमी पडलेला प्रश्न असा कि हे बदल नक्की कोणत्या निकषांवर घडतात. कोण आणि कसं ठरवतं की हा बदल केल्यास या प्रकारच्या प्रजाती सस्टेन होण्याची शक्यता वाढेल.
बाकी कोंबड्या, गहू वगरे मधले बदल पूर्णपणे माणसांच्या हस्तक्षेपाने झालेले आहेत असं मला वाटतं.
पण तरीही रानकोंबड्या, रानबदकं बर्यापैकी उडतात. पाळलेले प्राणी शिकार करु शकत नाहीत कारण त्यांना कशी शिकार करायची हेच माहीत नसतं. वाघ सिंह सुद्धा जन्मापासुन पाळलेले असतील तर जंगलातलं आयुष्य जगु शकणार नाहीत. (जंगलात या प्राण्यांची आई शिकार कशी करायची हे लहानपणी त्यांना शिकवते.)
> कोण आणि कसं ठरवतं की हा बदल
> कोण आणि कसं ठरवतं की हा बदल केल्यास या प्रकारच्या प्रजाती सस्टेन होण्याची शक्यता वाढेल.
कुणीही नाही. परस्परस्थानांतर (crossover) व गुणांतर (mutation) या प्रक्रियांमुळे सततच बदल होत असतात.
कोट्यावधी, अब्जावधी. त्यातील एखादा बदल तग धरतो (परिस्थीतीमुळे). बाकी सर्व विरुन जातात (व पुन्हा पुन्हा तपासुन पण पहिल्या जातात).
रिक्षा फिरवणे बरे नाही, पण एका संलग्न विषयावर दिवाळी अंकात एक लेख लिहिला आहे, ईच्छा असल्यास जरुर वाचा:
http://vishesh.maayboli.com/node/787
aschig धन्यवाद. लेख वाचुन
aschig धन्यवाद. लेख वाचुन आवडल्याची प्रतिक्रिया पण दिली होती लग्गेच.
पराग/आशिषना
पराग/आशिषना अनुमोदन.
developmental milestones skip होणे म्हणुन त्याला उत्क्रांती म्हणणे हे अतिसुलभिकरण झालं.
(मराठीत लिहीता येतं हे दाखवायलाच केवळ - प्रगतीचे/वाढीचे काही टप्पे चुकवून पुढील टप्प्यांपर्यंत जाणे/ गेल्यासारखे वाटणे या क्रियेला उत्क्रांती म्हणणे हे अतिसुलभिकरण झालं )
छान. दिनेशदा, विकिपेडियावरची
छान.
दिनेशदा, विकिपेडियावरची चुकीची माहीती तुम्ही दुरूस्त करा की.. हा का ना का.
दिनेशदा, विकिपेडियावरची
दिनेशदा, विकिपेडियावरची चुकीची माहीती तुम्ही दुरूस्त करा की
सहमत.. तोही एक ओपन फोरमच आहे.
बाकी माहिती अगदी इंटरेस्टींग.
aschig च्या माहितीनेही ज्ञानात भर घातली. मीही विचार करत होते की अमुक एक गोष्ट अशी केली तर टिकेल हे कळते कसे आणि मुळात तीच गोष्ट करायची हे कसे कळते. हजारो गोष्टी घडत राहतात आणि त्यातल्या कामाच्या असतात त्याच पुढे टिकतात. अर्थात हे काही १० वर्षात होणार नाही. नकळत बदल होत राहणार.
आज आपल्याला हे बदल अगदी चित्रपटासारखे सलग दिसत नाहीत पण आतापासुन ५०-१०० व्या पिढीला कदाचित हे बदल चित्रपटासारखे दिसतीलही. १००-१५० वर्षांपुर्वीचे दस्ताऐवजीकरण केवळ लिखित स्वरुपात असायचे, आता ते प्रकाशचित्रे, फिल्म ह्या स्वरुपात केले जातेय. पुढच्या पिढ्या नशिबवान आहेत. मला परत मनुष्यजन्म घ्यायला आवडेल.
aschig तुमचा दिवाळीअंकातला लेख फक्त पाहिला. अजुन वाचला नाही. तो निवांतपणे डोके थंड असताना वाचणे आवश्यक आहे आणि तेही चारदा.... तेव्हाच काहीतरी थोडेफार कळण्याची शक्यता आहे... अर्थात हे तुमच्या लिखाणाला उद्देशुन नाही तर विषयाला उद्देशुन आहे. तुमचे विषयच असे असतात की ते वाचायला तीव्र इच्छा तर होते पण एकाच वाचनात काही हाती लागेल याची खात्री मात्र देता येत नाही.
सही लिहिले आहे.. इंटरेस्टिंग!
सही लिहिले आहे.. इंटरेस्टिंग! उत्कांतीचे वगैरे माहिती नाही, पण आजूबाजूच्या झाडा-पाना-फुलांची रचना बघून, त्यामागे निसर्गाचा असा इतका अफाट विचार असू शकेल, हे बघून स्तिमित व्हायला झाले.
पराग आणि अश्चिगच्या पोस्टला
पराग आणि अश्चिगच्या पोस्टला अनुमोदन.
उत्क्रांती व्यक्तिगत पातळीवर घडून काही उपयोग नसतो, ती मोठ्या लोकसंख्येच्या पातळीवर झाली तरच ती पुढच्या पिढ्यात संक्रमित होउ शकते.
उत्क्रांती ही एक प्लॅन्ड, विचारपूर्वक, चाललेली प्रक्रिया आहे आणि तिची काही विशिष्ट सुरुवात अथवा शेवट आहे/ दिशा आहे या दोन्ही अत्यंत कॉमन व चुकीच्या धारणा आहेत.
>>आजूबाजूच्या
>>आजूबाजूच्या झाडा-पाना-फुलांची रचना बघून, त्यामागे निसर्गाचा असा इतका अफाट विचार असू शकेल, हे बघून स्तिमित व्हायला झाले
अनुमोदन साजिर्या.
दिनेशदा विचार करायला लावणारी
दिनेशदा विचार करायला लावणारी माहिती.
दिनेशदा, अतिशय प्रगल्भ लेख!!
दिनेशदा, अतिशय प्रगल्भ लेख!! आणी त्यात माझ्या आवडीच्या विषयात असल्याने खुप छान वाटले.
<<आपण मेंदूचा जो भाग वापरू तो जास्त विकसित होणार.
आज आपल्याला निवड करण्याची क्षमता, जास्त वापरावी लागते. त्यामूळे ती विकसित होणार पण कदाचित स्मरणशक्ती कमी होईल. सध्या तरी आपल्या हातात तर्क करणे एवढेच आहे, नेमके काय होईल, ते सांगणे कठीण आहे.<<
अनुमोदन!! शाळेत असतांना सरांनी सांगितलेले आठवतेय की यापुढील मानवाची पिढी म्हणजे डोके मोठे, कानाची पाळी नसलेल्या स्थितीत असणार कारण, डोक्याचा उपयोग वाढलाय! कानाची पाळी, अपेंडीक्स यासारखे निरुपयोगी भागांना अस्तित्वच उरणार नाही.
मस्त लेख. सेल्फिश जीनची आठवण
मस्त लेख. सेल्फिश जीनची आठवण झाली.
कानाची पाळी, अपेंडीक्स
कानाची पाळी, अपेंडीक्स यासारखे निरुपयोगी भागांना अस्तित्वच उरणार नाही.>>> सायंटीफिक अमेरिकनच्या नव्या अंकात ह्यावरच कव्हर स्टोरी आहे, त्यांच्या मते, ही प्रक्रिया प्रचंड संथ गतीने आणि कुठल्याही स्पष्ट दिशेशिवाय होते आहे. तिबेटीअन पॉप्युलेशनमधे कमी ऑक्सिजन लेव्हलला काम करु शकणार्या हिमोग्लोबिनचा जीन मिळाला आहे.
अरे वा अजून चर्चा चाललीय का
अरे वा अजून चर्चा चाललीय का ?
पराग आणि इतर अनुमोदक, मूळ लेखातले काय आवडले / पटले नाही, ते लिहिले नाहीत. असो
आपल्या मतांचा मी आदर करतो.
बाकी रैना सुलभीकरणाचा मुद्दा मला मान्य आहे. चारजणांना सहज कळेल
अशा भाषेत लिहायला मला आवडते, आणि तसे लिहिलेले वाचायलाही... , मराठीत लिहिता
येते, हे कुणाला दाखवायचेय ? मायबोलीवर मराठीत लिहा, असे झक्की कायम सांगतच असतात,
त्यामुळे जे काय लिहायचे, ते मराठीतच लिहायचे, असे ठरवलेय बुवा.
ललिता, तो बदल करण्यासाठी योग्य ते संदर्भ माझ्याकडे आहेत, पण नको वाटते.
आर्या तसा एक धडा आम्हाला मराठीच्या पुस्तकात होता. यापुढे मानवाच्या क्षमतेत कायकाय बदल
होऊ शकतात, त्याबद्दल कल्पना केल्या होता. कदाचित आपल्या डोळ्यांना जास्त सूक्ष्म दिसू शकेल किंवा
जास्त दूरवरचे दिसू शकेल. कानांच्या पाळ्या टिकाव्यात म्हणून आजकाल मुले पण डूल घालायला
लागलेत का ? माझे एक डॉक्टर मित्र म्हणतात कि पूर्वी अपेंडिक्स आणि टॉन्सिल्स वर अनेक डॉक्टरांनी
बंगले बांधले.
सजीवांत होणारे बदल आपल्या डोळ्यासमोर होतील वा आपल्याला जाणवतील अशा रितीने होतील, अशी
अपेक्षा नाहीच. याबाबतीत नोंदी तरी नाहीत, कदाचित यापुढे ते शक्य असेल. पण होणारे बदल हे
अपघातानेच होतात, हे मला वैयक्तीक रित्या पटत नाही.
मी मागेही बी ऑर्किड चे उदाहरण दिले होते. हे फ़ूल मादी फ़ुलाची नक्कल करते. हि नक्कल दिसण्याची,
रंगरुपाची, अंगावरील सूक्ष्म केसांची तर असतेच, पण ती उडण्याची आणि गंधाची पण असते. एक लांब
लवचिक देठावर हे फ़ूल येत असल्याने, उडण्याची नक्कल होते पण ती मादी जो गंध सोडते, तसाच गंध
निर्माण केला जातो. त्याला भूलून मिलनाच्या ईच्छेने नर या फ़ूलावर येतो. (यातही फूलाकडे तोंड केलेल्या
स्थितीत आणि त्याविरुद्ध असे दोन प्रकार आहेत.) बराच वेळ झटापट केल्यावर नराला आपण फ़सवलो
गेल्याचे कळते, पण तेवढ्या काळात त्याच्या अंगावर परागकणांचा शिडकावा झालेला असतो.
आता नर शहाणा होईल, व तसाच गंध असलेल्या फूलाकडे फिरकणार नाही, याची शक्यता गृहीत धरली
जाते आणि त्याच प्रकारातले दूसरे फूल मात्र, किंचीत वेगळा गंध निर्माण करते. आता हे सगळे बदल
अपघाताने झाले (आजकाल रस्त्यावरचे अपघात देखील अपघाताने होतात, हे कुणी छातीठोकपणे सांगू
शकत नाहीत.) असे ठामपणे म्हणणे, मला पटत नाही. माझी कल्पनाशक्ती यावेळी अनेक भराऱ्या घेते.
पहिल्यांदा हा नर समजा अपघाताने या फूलावर बसला असेल, आणि त्याच्या अंगावर परागकण
पडले असतील, त्याचवेळी त्याच्या गंधाचे काही कण, फूलावर सांडले असतील, त्याचे पृथकरण करुन
तसा गंध निर्माण करता येईल का, याचा "विचार" झाला असेल. मग दुसऱ्या झाडाने पण असाच
विचार केला असेल. पण तो नर तिथे फ़िरकला नसेल, पण दुसरी मादी तिथे आली असेल. छे..
कल्पना करु तितके थोडेच.
मेंदू असणे, विचार करणे, निर्णय घेणे या संकल्पना ठाशीव झाल्या आहेत. झाडांच्या या अवयवांना
आणि क्षमतेला कदाचित वेगळी नावे द्यावी लागतील.
आपल्याला वर्णपटातील लाल ते जांभळा एवढेच रंग दिसतात. पण लालच्या आधी इन्फ़्रारेड (मराठी
शब्द ?) आणि जांभळ्यानंतर अतिनील किरणे असतातच. आणि काही किटकांना ती दिसतात. काही’
खास उपकरणे वापरून आपल्याला ती दिसू शकतात. म्हणजे आता त्यांचे अस्तित्व नाकारता येत नाही.
मग त्याच्याही अलिकडे पलिकडे काहितरी असेलच. एखादा अपघात घडायला हवा किंवा नवीन उपकरण
शोधायला हवे. तोपर्यंत असण्यानसण्याबाबत ठाम विधान करता येणार नाही.
अणूंच्या आतले बरेचसे आपल्याला आता कळतेय, त्याही पलिकडे शोध चालूच आहे. तसेच इथे व्हावे.
असे मला वाटते.
प्रायव्हेट लाईफ़ ऑफ़ प्लांट्स या प्रकल्पासाठी कुणी आर्थिक मदत करायला तयार नव्हते. त्यावेळीही
हेटाळणीच झाली होती. हूं झाडाबद्दलचा कार्यक्रम ? कोण बघणार तो ? असेच बोलले गेले. पण त्यावेळी
अभिनेत्री जेन फोंडा ने मदतीचा हात पुढे केला. आणि मग हा अप्रतिम प्रकल्प पूर्ण झाला.
दिनेशदा, सुंदर लेख.
दिनेशदा, सुंदर लेख. नेहमीप्रमाणेच.
मला पण अश्चिगचे म्हणणे पटते.
>> उत्क्रांती ही विचारपुर्वक होत नसते तर अपघाती/योगायोगी असते. बरेच छोटे छोटे बदल होत असतात. त्यापैकी जे वाचतात ते पुढे जात राहतात, पसरतात.
हे फक्त झाडांच्या बाबतीत नाही तर प्राण्यांच्या बाबतीत पण खरंय, उदा. वाघ मागे लागतो म्हणुन हरीण "विचार करुन" त्याची धावण्याची क्षमता वाढवू शकत नाही. (तो जीव खाउन पळेल पण त्याच्या 'क्षमते'हुन जास्त त्याला पळता येणार नाही) हरणांच्या पुढच्या पिढ्यांमधे होत असलेल्या जनुकीय बदलांच्या परिणामस्वरुप ज्या काही हरणांची धावण्याची क्षमता वाढेल तीच हरणं जिवंत राहातील आणि हा उपयुक्त बदल पुढच्या पिढ्यांमधे जाईल. (हिच प्रक्रिया वाघांच्या पिढ्यांमधे देखिल होणार)
आणि हो... हे फुल, (जारदँ एक्झॉटिक, मोनाको)

>>या झाडाने "विचार" केलाय हे
>>या झाडाने "विचार" केलाय
हे वाक्य आणि एकंदरित लेखाची थीम चुकली आहे.
उत्क्रांती म्हणजे जाणीवपूर्वक बदल घडवून स्वतःच्या जीवजातीला (स्पेसीज) टिकवणे नव्हे. सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे टिकण्यासाठी फिटेस्ट व्हायचा प्रयत्न करणे नव्हे. तर जे जीव फिटेस्ट असतील (जनुकीय दृष्ट्या) ते टिकणे.
आपली वागणूक (बिहेविअरल पॅटर्न), स्वभाव या गोष्टींवरही आपल्या जनुकांचा प्रभाव असतो.
सुगरण पक्ष्याच्या घरट्याच्या आकारावर, स्थापत्यावर त्याच्या प्रजननाची शक्यता ठरते. घरटे बनवणे सुगरण केवळ इकडे तिकडे बघून शिकत नाही तर ते त्याच्या जनुकांतून येते. म्हणजे एखाद्या मोराचा पिसारा किती सुंदर असेल हे जसे मोर अंड्यात असतानाच ठरते तसेच एखादा सुगरण किती सुबक घरटे बांधू शकेल हेही आणि तसेच बर्ड ऑफ पॅरडाईज ची फुले कोणत्या आकाराची/ रंगाची असतील हेही ते झाड रुजतानाच नक्की झालेले असते.
प्रत्येक सुगरणाचे घरटे, प्रत्येक मोराचा पिसारा, प्रत्येक झाडाची फुले थोडी वेगवेगळी असणारच.
उत्क्रांतीचा अर्थ एव्हढाच की एखादे नेहमीपेक्षा वेगळ्या आकाराची फुले येणारे झाड 'नेहमीच्या' परिस्थितीत प्रजनन करू शकले नसते. पण नव्या परिस्थितीत करू शकते आणि त्यामुळे जराशी वेगळी फुले येणार्या झाडांचा एक छोटा गट तयार होतो. नवी परिस्थिती बदलत बदलत नेहमीच्या (जुन्या) परिस्थितीच्या मानाने खूप वेगळी झाल्यावर मूळ गट कदाचित तग धरू शकत नाही आणि नवा गट तरून जातो. असे होतेच असे नाही. खरेतर ९९% हून अधिक वेळा नवा गट लगेच नि:शेष होतो. असो.
मृदुलाच्या प्रतिक्रीयेवरुन
मृदुलाच्या प्रतिक्रीयेवरुन १-२ गोष्टी आठवल्या. ती म्हणते त्याप्रमाणे अनेक 'अप्रगत' प्राण्यांमधील बरीच वागणुक हार्ड-वायर्ड असते (म्हणजेच ते त्या गोष्टी विचार न करता करु शकतात - नव्हे, करतात). एक नाकतोडा आहे जो आपल्या पिल्लाकरता खाद्यपदार्थ आणले की (१) बिळाबाहेर ठेवतो, (२) आत आल-बेल आहे हे तपासतो, (३) बाहेर येतो, (४) खाद्यपदार्थ घेऊन आत जातो. एकदा काही क्रुर वैज्ञानिकांनी पाळत ठेवली आणि त्याने बिळाबाहेर ठेवलेले अन्न थोडे सरकवले. आला तो बाहेर ठाकठीक आहे हे पाहुन, खाद्यपदार्थ उचलले, बिळाबाहेर नेहमीच्या जागी ठेवले आणि गेला पहायला आत ठीक आहे का ते. पुन्हा यांनी ते सरकवुन ठेवले. पुन्हा आला तो बाहेर, आधीच्या जागी ठेवले, व गेला आत तपासायला. असे चाळीसेक वेळा झाल्यावर वैज्ञानिक कंटाळले पण तो साधु किडा नाही कंटाळला - त्याची क्षमताच नव्हती कंटाळायची.
सुगरण घरटे बांधतो आणि सुगरीण ते तपासायला येते. तिला ते पसंद पडले तर त्यांचे सुत पुढे सरकते, नाहितर बिचारा नर दुसरे घरटे बांधायला घेतो - बांधावेच लागते. एक गेली तर दुसरी असे चालत नाही. दुसरे नर पण अर्थातच ती घरटी घेत नाहीत. मुनिया नामक पक्षी मात्र छान मुव्ह-ईन होतात या घरट्यांमध्ये - आयत्या घरट्यावर मुनियाबा.
आणि मानव माकडापासुन उत्क्रांत झाला असे न म्हणता, मानवाचे व माकडांचे कोणतेतरी खापर^n पणजोबा एकच असे म्हणणे योग्य आहे.
Pages