मिश्र कडधान्य घालून भात/ खिचडी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 16 November, 2010 - 07:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदूळ - एक वाटी
मूगडाळ - अर्धी वाटी
मोड आलेली मिश्र कडधान्ये - पाऊण ते एक वाटी

फोडणीसाठी :

शुध्द तूप - एक टीस्पून
जिरे, सुक्या लाल मिरच्या (२) ऐच्छिक, तिखट (ऐच्छिक)
कढीपत्त्याची पाने - आठ ते दहा
बारीक चिरलेले/ किसलेले आले - पाव टीस्पून

चवीप्रमाणे मीठ

क्रमवार पाककृती: 

सर्वप्रथम तांदूळ व मुगाची डाळ धुवून निथळत किमान अर्धा तास तरी ठेवावी.
मिश्र कडधान्ये प्रेशर कुकरला एक शिट्टी काढून शिजवून घ्यावीत. (मी उकळत्या पाण्यात, साध्या पातेल्यात शिजवली.) त्याचे पाणी फेकून देऊ नये. तेच पाणी भात शिजवताना वापरता येते.

हा भात दोन पध्दतीने करता येतो. (मी पध्दत क्रमांक १ ने केला.)

पध्दत क्रमांक १ : एकीकडे कडधान्य शिजवलेले पाणी व आवश्यकतेनुसार जास्तीचे पाणी घालून तांदूळ + मुगाची डाळ एकत्र एका जाड बुडाच्या पातेल्यात शिजवत ठेवावेत. दुसरीकडे लोखंडी कढई/ पॅनमध्ये तूप गरम करावे. त्यात चिरलेले/ किसलेले आले घालावे. मग जिरे, सुक्या मिरच्या, कढीपत्ता घालून फोडणी करावी. ह्या फोडणीत शिजलेली कडधान्ये घालून चांगली परतावीत. मिरच्या काढून टाकाव्यात. तिखट घातल्यास बेतानेच घालावे.
पातेल्यातला भात शिजत आला की त्यात ही परतलेली कडधान्ये घालावीत. चवीप्रमाणे मीठ घालावे. दणदणून वाफ आणावी. भात शिजला की त्यावर झाकण ठेवून तो जरा मुरू द्यावा.

पध्दत क्र. २ : वरीलप्रमाणे फोडणीत कडधान्ये परतून घेतल्यावर त्यातच भिजलेले डाळ -तांदूळ घालून परतावेत. आवश्यकता वाटल्यास थोडे तूप बाजूने सोडावे. खरपूस परतल्यावर त्यात कडधान्ये शिजलेले पाणी व गरजेप्रमाणे अधिक पाणी, मीठ घालून भात शिजवावा.

तसेच प्रेशर कुकरमध्येही हा भात करता येईल. (पॅन/ कढईमध्ये फोडणीत कडधान्ये व डाळ-तांदूळ परतून कुकरच्या भांड्यात त्यात आवश्यक तेवढे पाणी व मीठ घालून प्रेशर कुकरमध्ये शिजविणे.)

नंतर गरमागरम भातावर थोडे तूप, लिंबाचा रस इत्यादी घालून हादडावा. ज्यांना आवडते/ पेशन्स आहे त्यांनी वरून ओले खोबरे, कोथिंबीर भुरभुरावी. सोबत कैरीचे लोणचे/ रसलिंबू, भाजलेला पापड फर्मास लागते. जोडीला सॅलड/ रायते असेल तर अजूनच उत्तम! कालच रात्री हा बेत केला होता. मस्त जमला होता! Happy

वाढणी/प्रमाण: 
दोन माणसांसाठी
अधिक टिपा: 

आवडत असल्यास फोडणीत बारीक चिरलेला लसूण, आणि कडधान्ये परतताना धणे-जिरे पूडही घालू शकता. मला भाताला कडधान्यांचा मूळ स्वाद हवा असल्यामुळे मी ते जिन्नस वापरले नाहीत.
हिवाळ्यात थंडीत रात्री असा गरम-गरम भात खायला खूप छान वाटते! गार झाल्यावरही हा भात चांगला लागतो. डब्यात न्यायलाही वेगळा प्रकार आहे. तसेच मूग डाळ व कडधान्ये असल्यामुळे पोषक.

माहितीचा स्रोत: 
स्वतः केलेले प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टाकणार होते वरच्या पोस्टमध्येच. पण म्हटलं तुझ्या रेसिपीवर माझी टाकावी का?

माझी पद्धत (सगळंच अंदाजे):
तांदूळ, हिरव्या सालीसकट मूगडाळ (भात कमी आणि मूगडाळ जास्त)- एकत्र धुवून ,
फोडणीसाठी- तेल, हिंग, हळद, मोहरी, जिरं, कढिपत्ता,
कांदा, मटार, गाजर, ओले हरभरे, वाल पापडीचे दाणे, कॉर्न (मटारासकट बाकी सगळं फ्रोजन), टोमॅटो.
मसाला- खिचडी मसाला, किंचित लाल तिखट, गोडा मसाला.
वरुन कोथिंबीर, खोबरं, तूप.
चवीप्रमाणे मीठ.

तेलाची हिंग, हळद, मोहरी, जिरं, कढिपत्ता घालून फोडणी करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, गाजर, टोमॅटो आणि बाकीच्या भाज्या घालून परतून घ्यावं. त्यावर खिचडी मसाला घालून परतून एक वाफ काढावी. त्यावर तांदूळ-डाळ परतावी. जशी खिचडी हवी असेल त्याप्रमाणात पाणी घालुन शिजवावी. पाणी शिल्लक असतानाच गोडा मसाला, मीठ,तिख्ट घालावं. शिजल्यावर वरुन तूप, खोबरं, कोथिंबीर घालून गरम गरम ओरपावं.

अरे वा! ह्यातल्या खिचडी मसाल्याखेरीज इतर सर्व जिन्नस वापरून बहुतांशी ह्याच पध्दतीने एरवी आम्ही भाज्या घालून खिचडी करतो. सांबार शिल्लक असेल तर ते सांबारही त्यात लोटून देतो! Wink आता तुझ्या पध्दतीने (खिचडी मसाला वापरून) खिचडी करायला हवी!

काढलाय फोटो, पण इतका खास नाही आलाय म्हणून अपलोड नव्हता केला..... Proud (खूप भूक लागल्यामुळे खायची घाई झालेली!!!) पण स्वाद एकदम यम्म्मी!! Happy

हा अजून एक :

खिचडी मसाला म्हणजे कोणता मसाला? Uhoh
दाल-खिचडी हा एक अत्यंत चविष्ट प्रकार आहे पण तो मला तितकासा जमत नाही असे मला(च) वाटते. Sad

चिंगी, सॉरी, सध्याचा मसाला बादशाहचा आहे. मागे होता तो एमडीएच चा होता. तो बादशाहपेक्षा जास्त चविष्ट होता पण आमच्याकडे हल्ली मिळत नाहीये.

कडधान्ये वेगळी का शिजवून घ्यायची ? मोड आलेली कडधान्य घालून खिचडी करायची असेल तर मी डाळ-तांदळाच्या खिचडीसारखंच दोन्ही एकदम शिजवते.

मी पण कडधान्य वेगळे शिजवुन घेत नाही.

माझी रेगुलर खिचडी म्हणजे सायो म्हणते तशी त्यात अजुन मी असेल ती पालेभाजी जसे पालक, मेथी, चार्ड किंवा मग कोबी घालते. खिचडी मसाला नाही वापरत घरचा गरम मसाला घालते.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद! Happy

कडधान्ये वेगळी शिजवून न घेताही खिचडी करता येते. पण कधी ती नीट शिजली नाहीत तर टोचरी, कचरट लागतात ते आमच्या घरी कोणाला आवडत नाही, म्हणून वेगळे शिजवून घ्यायचा प्रपंच! Happy

यम्मो सायो Happy

भाजी घालुन खिचडी करतो त्यात सांबार मसाला किंवा इव्हन पावभाजी मसाला पण अल्टी लागतो Happy ट्राय करा. सोबत टॉम सार Happy

खिचडी मसाला वेगळा मी कधी वापरला नाहीये. मी आपला गोडा किंवा गरम मसाला घालते किंवा गोडा, गरम, सांबार, पाभा असे सगळे मसाले चिमूट चिमूट... त्याने पण धमाल येते.
आता गुहागर ला जाईन तेव्हा खिचडी मसाला वेगळा मिळतोय का खातू प्रॉडक्ट्स मधे बघते. आणि घेऊन येते. कुणाला हवाय? अजून कसला मसाला? खातूचा गोडा मसाला तर मला जाम आवडलाय. संडे मसाला म्हणून एक आहे रोजच्या भाज्यांबिज्यांसाठी तो पण मस्त आहे. गुहागर तालुक्यात फॅक्टरी आहे. तिथे बाहेर मिळतात. या महिनाअखेरीस तिकडे चक्कर आहे. हवे असल्यास सांगा.

सायो....गरमागरम खिचडी आणि कढी...यम्मी.... Happy

लाजो, मी तर कधी छोले मसाला, किंवा कधी बिर्याणी मसाला वगैरे (थोडक्यात, हाताला येईल तो मसाला) घालते. नेहमीप्रमाणे पारंपरिक मुगाच्या डाळीची खिचडी करायची असेल तर सुक्या खोबर्‍याचा तुकडा जाळते आणि तोही घालते. त्याचा स्मोकी फ्लेवर फार मस्त लागतो. कधी आमसूल घालते, कधी टोमॅटो - बटाटे- वांग्याच्या चकत्या वगैरे. आणि हो, माझी आई खिचडीत गूळदेखील घालते. थोडा गोडसर फ्लेवर व चव येते.

मोनाली, फोडणीत आता बडीशेप टाकून बघेन. कांद्याच्या चकत्या + लिंबू असतेच. Happy

नी, चिमूट चिमूट सगळे मसाले...... सेम पिंच! जाम धम्माल येते. खाणार्‍याला ''ओळख कोणता मसाला वापरलाय,'' म्हणून गोंधळात टाकायला मजा येते! Wink

दिनेशदा, तसा शॉर्टकट मी होस्टेलला असताना वापरायचे. हॉटप्लेटवर खिचडी करायची म्हणजे धुतलेल्या डाळतांदळात आधीच तिखट, मसाले, भाज्या वगैरे घालायचे, फोडणीत ते सगळे मिश्रण घालायचे, त्यात पाणी ओतायचे, झाकण ठेवायचे आणि मग पंधरा-वीस मिनिटांनी बघायचे. त्या खिचडीला कसलेही लाड नसायचे, पण मेसच्या अन्नापेक्षा आपल्या हाताने बनवलेली ती खिचडी शतपटीने चांगली लागायची! Happy

माझी आई खिचडीत गूळदेखील घालते. << मी पण घालते... गोडा मसाला घालुन केली की Happy

छोले मसाला नाही ट्राय केला मी.... नेक्श्ट टाइम छोले मसाला.....खिचडी Happy