आलु-कचोडी

आलु टमाटर

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन मध्यम आकाराचे कांदे किसुन, चार टोमॅटो किसुन,चार -पाच बटाटे मध्यम आकारचे मोठ्या फोडी करुन एक इंच आलं किसुन, २-४ लसणाच्या पाकळ्या, २-३ हिरव्या मिरच्या बारिक चिरुन, धणे पावडर २ चमचे, जिरे पुड १ चमचा, २ चमचे गरम मसाला, १ चमचा देगी मिर्च पावडर, १ चमचा हळद, १ चमचा बडीशेप अर्धवट कुटुन, थोडेसे अख्खे धणे, जिरे, मेथ्या, मीठ

क्रमवार पाककृती: 

एका प्रेशर पॅनमध्ये किंवा कुकर मध्ये थोडेसे तेल घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यात धणे, जिरे व मेथ्या हातावर चोळुन फोडणीत टाकाव्यात. नंतर त्यात लसुण, आले व हिरवी मिरची घालुन परतावे. लसुण थोडासा लालसर झाला व मिरच्या परतल्या गेल्या कि त्यात किसलेला कांदा घालुन नीट परतावे. २-३ मिनिटं झाकण ठेवुन कांदा शिजु द्यावा. परत थोडावेळ मंद गॅसवर परतावा. आता त्यात टॉमॅटो , हळद, तिखट व इतर मसाला टाकावा. पाच मिनिटं परतावे. नंतर यात बटाट्याच्या फोडी व थोडेसे पाणी अन मीठ घालावे. कुकरचे किंवा पॅनचे झाकण लावावे. एखाद्-दुसर्‍या शिट्टीत भाजी शिजते.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जण
अधिक टिपा: 

टॉमॅटोमुळे भाजी किंचित आंबट व चटपटीत लागते. जर आंबुसपणा जास्त हवा असेल तर यात अर्धा चमचा आमचुर पावडर घालता येते. ही भाजी कचोड्यांबरोबर (बिहार्-युपी मध्ये कचोर्‍या किंवा कचोड्या म्हणतात पुर्‍यांना) खातात. सोबत मुळ्याची चाट मसाला व लिंबु पिळलेली कोशिंबीर अन पकोड्या (म्हणजे दही-बुंदी) असा बेत असतो.
याच भाजीत मटर घालुन आलु मटर करता येते..

माहितीचा स्रोत: 
नवरा, सासुबाई