मोरोक्को

मोरोक्कन पिझा

लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

पिझाचे आपण खातो ते अमेरिकन व्हर्जन आहे. (म्हणजे जाड गोल बेस)
मूळ इतालियन पिझा, अगदि पातळ असतो, आणि तो कुरकुरीत लागतो.
हे आहे मोरोक्कन व्हर्जन. यात वर टॉपींग न करता, पिठातच सर्व
मिसळतात. याने मस्त चव येते यासाठी ड्राय यीस्ट लागेल, पण अवन नसला
तरी चालेल.

साहित्य दोन कप मैदा वा कणीक वा दोन्हीचे मिश्रण
एक चहाचा चमचा ड्राय यीस्ट
अर्धा चमचा साखर
दोन टेबलस्पून तेल
मीठ

आत भरण्यासाठी
एक मोठा कांदा, उभा चिरून
एक मोठा टोमेटो, बारिक चिरुन
एक दोन हिरव्या मिरच्या, बारिक चिरुन,
अर्धा कप शेडार चीज, किसुन
थोडे जिरे, मीठ, तेल वा तूप

क्रमवार पाककृती: 

एका कपात अर्धा कप कोमट पाणी घ्या, व त्यात साखर टाका
जरा हलवून त्यात यीस्ट टाका, व दहा मिनिटे बाजूला ठेवा.
मैदा वा कणीक चाळून घ्या. त्यात खळगा करुन, यीस्टचे मिश्रण
टाका. मीठ व थोडे तेल घालून मळून घ्या. लागेल तसे पाणी
घालून सैलसर मळा. वरून तेल लावून झाकून ठेवा. अर्ध्या पाऊण
तासाने मिश्रण फ़ुगुन दुप्पट होईल.

त्या दरम्यान, तेलावर वा तूपावर जिरे मिरच्याची फ़ोडणी करुन कांदा सोनेरी
परता. त्यात टोमेटॊ घाला. जरा परतून सारण थंड करत ठेवा.
त्यात मीठ टाका ( सारणात आवडीप्रमाणे, बेसिल, पुदिना, कोथिंबीर
टाकता येईल. ) त्यात चीज किसून हलक्या हाताने मिसळा.
आता पिठाचे मिश्रण परत मळून त्यातली हवा काढून टाका.
लांबट लाटून त्यावर थोडे सारण पसरा. घडी घाला, परत लाटून
आणखी थोडे सारण पसरा, परत घडी घाला ( असे केल्याने
सारण नीट पसरते ) आता एका नॉन स्टीक पॅनला पुसट
तेल लावून त्यावर हे मिश्रण थापा. तासभर झाकून ठेवा. मिश्रण
परत फ़ुगुन येईल. तसे आले की मंद गॅसवर भाजायला ठेवा. पंधरा
वीस मिनिटाने पॅनवर डिश टाकून पिझा डिशमधे काढा. परत पॅनमधे
ठेवून दुसर्‍या बाजूने भाजा (अवनमधे केले तर असे करायची गरज
नाही. भाजताना वरून हवे तर तीळ वा खसखस लावता येईल.
हा प्रकार थंड झाल्यावर पण छान लागतो. सोबत ग्रीक सलाद घ्या
( फ़ेटा, काकडी, सिमला मिरची, टोमेटॊ, ऒलिव्ह, बेसिल व थोडे क्रीम
वा दही एकत्र करा. मीठ घालायचे नाही कारण फ़ेटा खुप खारट असते.
वरुन मिरपूड घाला. )

वाढणी/प्रमाण: 
एक मोठा पिझा होईल
अधिक टिपा: 

हा प्रकार भाजताना मस्त वास सुटतो. भूक चाळवणारच !!!