गोबी

गोबी की कढी

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक फ्लॉवरचे छोटे फुल, २ बटाटे, जीरे, धणे,मेथ्या,हळद, एक आल्याचा तुकडा, २ हिरव्या मिरच्या, २ चमचा धण्याची पुड, १ चमचा गरम मसाला, फोडणीसाठी सरसोचे तेल, चवीप्रमाणे मीठ
कढीसाठी - २ वाट्या दही, ४ मोठे चमचे बेसन

क्रमवार पाककृती: 

पंजाबी भाज्यांमध्ये असतात त्याप्रमाणे फ्लॉवरचे मोठे मोठे तुरे चिरुन उकळत्या पाण्यातून काढावेत. बटाट्याच्या उभ्या काचर्‍या (लांब फोडी) कराव्यात. अद्रक व मिरची बारिक चिरून घ्यावी.
कढईमध्ये थोडंसं सरसोचं तेल घ्यावं. तेल भरपूर तापले की (तेल नीट तापले की त्याचा वास निघून जातो.) त्यात हातवर चोळलेले किंवा अर्धवट भरडलेले धणे, जीरे व मेथ्या घालाव्या. जीरे वैगरे तडतडले की बारीक चिरलेले अद्रक व हिरवी मिरची घालावी व परतून घ्यावे. आता त्यात १ चमचा हळद घालावी व फ्लॉवर अन बटाट्याचे तुकडे घालावेत. गरम मसाला, धण्याची पुड व चवीप्रमाणे मीठ घालुन भाजी झाकण ठेवुन शिजवून घ्यावी. खाली लागु नये म्हणून मधून मधून हलवावी लागेल.
भाजी शिजेपर्यंत २ वाटी दह्यात बेसन व गऱजेप्रमाणे पाणी घालून नीट घुसळून घ्यावे.
भाजी नीट शिजली की त्यात बेसन घातलेले ताक / दही घालावे व एक उकळी आणावी. कढी फुटु नये म्हणून उकळी येईपर्यंत कढीला मधून मधून हलवावे लागते.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
अधिक टिपा: 

माझा नवरा आलु-गोबीच्या भाजीत कधीच कांदा व लसुण घालत नाही म्हणून मी पण घालत नाही.
आवडत असल्यास भाजी करताना त्यात उभा चिरलेला कांदा घालता येईल. काहीजण लसूण पण घालतात.
अशीच कढी आलु व बडीया (मुगाच्या किंवा मिश्र डाळींच्या वड्या ज्या दुकानात मिळतात. बहुतेक सांडग्यांसारखा प्रकार असतो.), फक्त प्याज्-आलु, काले चने, रौंगी म्हणजेच चवळी वैगरे पदार्थांची पण करतात.

माहितीचा स्रोत: 
नवरा. आत्तापर्यंत घरी कढी नवराच करत आलाय. त्याने मला कधी रेसेपी सांगितली नाही. गेल्या आठवड्यात तो कढी करत असताना अट्टहासाने सरसोच्या तेलाचा वास सहन करत मी स्वैपाकघरात उभी राहिले व त्याची कढी बनवायची पद्धत पाहिली.