पर्यटकांचे निषेधार्ह वर्तन

Submitted by बेफ़िकीर on 27 March, 2014 - 11:40

नुकताच अंदमानला जाऊन आलो. आठवडाभर अनेक समुद्र किनारे पाहण्याचे शेड्यूल होते मात्र पहिल्याच दिवशी पहिलेच ठिकाण जे होते ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेथे ठेवण्यात आले होते ते सेल्यूलर जेल!

ह्या कारागृहाची रचना, अंगावर येणारी भीषणता, स्वातंत्र्यपूर्व काळात तेथे असू शकणारी सुविधांची दयनीय अवस्था जिची आपण कल्पना करू शकतो, अंदमानची दमट हवा, कैद्यांना मिळणार्‍या अस्वच्छ व जेमतेम सोयी, कमालीच्या शारीरिक यातना असलेल्या शिक्षा, मार्गदर्शकाने केलेले काटा आणणारे वर्णन, फाशी घर, रक्तबंबाऴ होईपर्यंत चाबूक मारण्यासाठी असलेला चौथरा, खूप वजनाचे लोखंड अडकवून मग कामे करवून घेतली जात असणे, कामात चूक झाल्यास होणारे अपरिमित हाल, तीन तीन दिवस उपाशी ठेवणे, पोत्याच्या कापडाचे कपडे (ज्याने घामोळे व्हावे हाच हेतू) ह्या आणि अश्या सर्वच्या सर्व बाबी मन विषण्ण करतातच. कोणत्याही सहृदय माणसाला स्वतःच्या आरामात जगण्याची लाज वाटू लागेल अशी त्या कारागृहाची भीषणता आहे. काही छायाचित्रे देत आहे ज्यावरून (जे अजून तेथे गेले नसतील त्यांना) कल्पना येऊ शकेल की माणूसच माणसाला किती यातना देत होता.

तरीही, थोडेसे वर्णन करणे आवश्यक वाटत आहे.

१. सावरकरांना खास अश्या ठिकाणची कोठडी दिली होती जेथून त्यांना फाशीच्या कैद्यांना फाशी दिलेली बघता येईलच असे नव्हे तर त्यांना मुद्दाम ती बघायला लावली जायची.

२. सात विंग्जपैकी एका विंगचे कैदी दुसर्‍या विंगशी काहीही संपर्क ठेवू शकायचे काहीत, किंबहुना ते एकमेकांना दिसूही शकायचे नाहीत.

३. जनावरांनाही काढता येणार नाही इतके तेल एका कैद्याला एका दिवसात काढायला लावायची शिक्षा असे.

४. ते काम कैद्याने केले नाही तर त्याच्या चुकीच्या प्रमाणावर अवलंबून तीन प्रकारच्या बेड्या असत त्या घातल्या जात. पहिल्या सोप्या प्रकारात दोन्ही हात व दोन्ही पाय वजनाने जखडले असले तरीही निदान मुक्तपणे हालवता यायचे. दुसर्‍या स्टेजला पाय हालवता यायचे पण हात आखडले जायचे. तिसर्‍या स्टेजमध्ये पायही आखडले जायचे. त्याच अवस्थेत काम करावे लागायचे.

५. कामात कमी पडलेला कैदी किंवा चुकीचा वागलेला कोणी कैदी असला तर त्याला एका चौथर्‍यावर बांधून चाबकाचे फटके मारले जायचे. फटके मारणारा माणूस भारतीयच असायचा व त्याच्यावर हे बंधन असायचे की कैद्याच्या पाठीतून रक्त यायलाच हवे, रक्त आले नाही तर त्या फटके मारणार्‍यालाच फटके देऊन त्याचे रक्त काढले जायचे.

६. तूर्त सर्व बाजूंनी भिंती बांधलेल्या असल्या तरी तेव्हाच फाशी घर एका बाजूने व वरच्या बाजूने खुले होते. फाशीची शिक्षा झाल्या झाल्या सेंट्रल टॉवरवरील घड्याळात मोठे टोल दिले जायचे, ज्यायोगे समुद्रात कित्येक मैलांवर असलेल्या बेटांवरील नागरिकांनाही समजायचे की आत्ताच कोणालातरी फाशी दिली गेली. ते टोल वाजले की अर्थातच कारागृहातील कैदी भीषण ओरडू लागायचे कारण त्यांना आपलाही अंत दिसू लागायचा.

त्या कारागृहात सायंकाळी दोन वेळा एक लाईट व साऊंड शो होतो, पहिला हिंदीमधून व दुसरा इंग्लिशमधून! त्यातूनही बरीच माहिती मिळते त्या हालअपेष्टांची! कैद्यांना दोनच भांडी दिली जायची. एक मातीचे व एक लोखंडाचे! एक भांडे अन्नपाण्यासाठी व एक नैसर्गीक विधींसाठी! दररोज येणारा भंगी दोन तीन दिवस आला नाही तर कोठडीत तसेच घाणीत बसून राहावे लागायचे. शौचास व बाथरूमला जाण्याच्या वेळा ठराविक होत्या, त्याच पाळाव्या लागत. पाणीही मोजून मिळे!

स्वातंत्रवीर सावरकर ह्या सर्वातून स्वतःही गेलेले होते. ६९३ कैद्यांना सामावू शकणारे हे राक्षसी कारागृह 'काळ्या पाण्याच्या' शिक्षेच्या भीषणतेची दु:खद आठवण देऊन मनात कालवाकालव करते. लाईट आणि साऊंड शो पाहून बाहेर पडणारे अनेक चेहरे खर्रकन उतरल्यासारखे असतात.

कर्नल की कॅप्टन डेव्हिड बेरी नावाचा एक कारागृह प्रमुख अत्यंत क्रूर होता व त्याच्यासाठी एक खास खुर्ची केलेली असावी. ह्या डेव्हिडने छद्मीपणाने सावरकरांना सांगितले की होते पन्नास वर्षे झाली की तुम्हाला सोडतीलच. त्यावर सावरकरांनी विचारले होते की तुम्हाला कशावरून असे वाटते की तुमचे सरकार येथे इतकी वर्षे टिकेल?

अविश्वसनीय अश्या हा हालअपेष्टांची वर्णने ऐकताना, वाचताना आपण गंभीर होत जातो आणि त्या गांभीर्यावर नादानपणाचे, पोरकटपणाचे, घृणास्पद, लज्जास्पद ओरखडे उठतात ते आलेल्या कित्येक पर्यटकांमुळे! खासकरून महाराष्ट्राबाहेरचे पर्यटक आणि हनीमून कपल्स तसेच तरुण मुलांची टोळकी ह्या सर्वांचे वर्तन असे असते की त्यांनाच तेथे चाबकाचे फटके द्यावेत.

कर्नल डेव्हिडच्या त्या खुर्चीवर थाटात बसून स्वतःचे फोटो काढून घेतले जातात. हाल सहन करून घाण्याभोवती फिरणार्‍या कैद्याच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून एखादी नववधू हासत हासत उभी राहते आणि तिची मोहक छबी तिचा हबी कॅमेर्‍यात टिपतो. सावरकरांच्या कोठडीच्या उंबर्‍यावर तीनतीनदा डोके घासून आत पाऊल टाकणारे आपल्यासारखे अनेक असूनही त्या उंबर्‍याचे महत्वच न समजलेले अनेक जण आत जाऊन सावरकरांची माहिती देणार्‍या फलकाशेजारी उभे राहून फोटो काढून घेतात.

हास्यविनोद, टवाळक्या चाललेल्याच असतात.

पुढील संपूर्ण ट्रीपमधील सर्वच मनोरंजक उपक्रमांवर ह्या कारागृह भेटीच्या पहिल्याच कार्यक्रमाचे अंशतः तरी सावट भरून राहते. पण ते काहींसाठीच! बाकीच्यांना प्रत्यक्ष कारागृह हाही एक पिकनिक स्पॉट वाटतो.

गाईड आणि काही जबाबदार नागरीक परोपरीने समजावून सांगत असूनही 'आपलाही फोटो आलाच पाहिजे' ह्याची अहमअहमिका लागलेली असते. त्यातही विविध अदा, पोझिशन्स, त्यातच पुन्हा उघडपणे केलेले सहेतूक देहप्रदर्शन, उगीचच केलेली जवळीक!

वाईट वाटते.

काही छायाचित्रे देत आहे. ही छायाचित्रे घ्यायला त्या कारागृहाच्या प्रशासनाची अर्थातच परवानगी आहे.

IMG_0429.JPGIMG_0430.JPGIMG_0432.JPGIMG_0434.JPGIMG_0435.JPGIMG_0440.JPGIMG_0443.JPGIMG_0450.JPGIMG_0451.JPGIMG_0452.JPGIMG_0453.JPGIMG_0454.JPGIMG_0474.JPGIMG_0478.JPG

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधीकधी तर कुठल्याही प्रकारचा वारसा असायची/ तो जपायची आपली सामाजिक लायकी नाही असंच वाटायला लागतं. + १०००

मला लेख खूप आवडला पण त्याचं शीर्षक अजिबात पटलं नाही, आवडलं नाही.

लेखात ८० % टक्के ज्या गोष्टीचं वर्णन आहे, स्फूर्तीदायक कहाणी आहे, ती कहाणी पर्यटकांच्या मूर्खपणापेक्षा, स्वार्थीपणापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. पण शीर्षकामुळे आणि शेवटच्या काही परिच्छेदामुळे त्यावरच लक्ष केंद्रीत होतंय. ती वर्तवणूक अतिशय चीड आणणारी आहे हे कबूल पण त्यावर नको तितकं लक्ष जातंय आणि लेख संपताना आधीची कहाणी विसरून जायला होतेय. त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही तेच सुचवतायत. तुम्हाला पर्यटकांच्या वर्तनाबद्दल लेख लिहायचा होता तर तो जास्त करून त्याच गोष्टीवर केंद्रीत करणारा वेगळा लेख हवा होता.

लेखातला संपूर्ण मजकूर आवडला आहे, पण तंत्रामुळे (Format), दोन चांगले लेख एकत्र आल्यामुळे, दोन्हीची वाट लागली असे माझे वैयक्तिक मत आहे.

थोडी ओढाताण करून एक विनोदी अ‍ॅनॉलॉजी सुचवतो म्हणजे माझे म्हणणे कदाचित स्पष्ट होईल होईल. अशी कल्पना करा की ज्ञानेश्वरी लिहिली जात असताना एक पत्रकार उपस्थित होते. त्यांनी दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात माउलींबद्दल एक अत्यंत सुंदर, रसाळ लेख लिहला. पण त्यांनी त्या लेखाचं शीर्षक "भावार्थदिपीकेच्या निरूपणाला श्रोत्यांच्या कुजबुजीचे गालबोट" असं लिहिलं आणि शेवटच्या परीच्छेदात काही लोक बडबड करून व्यत्यय आणत होते असं लिहल्यावर जे काही होईल, वाचकांच्या जे काही लक्षात राहील, तसं काहीसं इथं होतंय ! Happy

अनुमोदन सशल. !

सहानुभूतीपूर्ण समंजस शांतता >>>> हाच अनुभव ग्राऊंड झिरोलाही आला होता. मॅनहॅटनसारख्या गजबजलेलं ठिकाण असूनही ग्राऊंड झिरोच्या परिसरात कमालीची शांतत होती.

बेफिकीर, तिकडे जाऊन येऊ शकलात याबद्दल अभिनंदन. Happy
काशी यात्रेला जाऊन देवाचे दर्शन घेऊन परत आलेल्याच्या पाया पडतात, तसे अंदमानला जाऊन आल्याबद्दल तुमच्याही पाया पडतो.
इथे दिसतील अशा प्रकारे फोटो दिल्याबद्दल धन्यवाद.

निव्वळ पर्यटकान्ना दोष देऊन उपयोग नाही, गेल्या साठ वर्षातील "क्रान्तिकारकांबद्दलची व त्यान्च्या त्यागाबद्दलची" अहिन्सक उदासिनता शिक्षणपद्धतीत झिरपली, व त्याचीच ती फळे आहेत.

ज्यावेळेस शालेय महाविद्यालयीन जीवनात लष्करी शिक्षण सक्तिचे होईल, तो सुदिन, पण तोवर "व्यक्तिस्वातन्त्र्याचे" हिडीस प्रदर्शन बघणे नशिबात आहे. असो.

पुनःश्च अभिनंदन अन आभार.

उत्तम लेख बेफी..

सावरकर हा मुळातच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्यांचे कष्ट आणि मुळातच त्या सर्व अनाम स्वातंत्र्य-योद्ध्यांना मिळालेल्या ह्या व अश्या भयानक शिक्षेविषयी पुन्हा एकदा वाचुन खरोखर काटा उभा राहिला...
आशूडी वर म्हणतात त्या प्रमाणे 'समज' कमी पडते 'आपल्या'लोकांची , हे तुमच्या लेखातून ठळकपणे जाणवले !!!

अतिशय बोलका लेख भुषणजी !!
कारणे काहीही असोत पर्यंटकांचे वागणे समर्थनीय नाहीच...... Sad

याबद्दल काही न बोलणेच बरे.:अरेरे: आपले बरेचसे भारतीय बान्धव आणी त्यान्ची फॅमिली बाहेर आणी देशात पण सतत त्यान्च्या पूर्वजान्ची ( माकडे) आठवण का करुन देत असतात तेच जाणे.:राग:

"सारे जग हे माझे कचराघर आहे, आणी मी त्यात आपल्या परीने भर टाकणारच.". अशी प्रतिज्ञा करुनच आपले लोक वावरत असतात.

माझे नशीब मात्र जोरदार आहे. माझे काही नातेवाईक जाऊन आले तिथे, मात्र त्यानी त्यान्ची फॅशन परेड समुद्रावरच केली यात आनन्द आहे.:फिदी:

बाकी फोटो आणी माहितीबाबत धन्यवाद. स्व. स्वा. सावरकराना विनम्र अभिवादन!

उत्तम लेख.
----

कर्नल की कॅप्टन डेव्हिड बेरी नावाचा एक कारागृह प्रमुख अत्यंत क्रूर होता व त्याच्यासाठी एक खास खुर्ची केलेली असावी. ह्या डेव्हिडने छद्मीपणाने सावरकरांना सांगितले की होते पन्नास वर्षे झाली की तुम्हाला सोडतीलच. त्यावर सावरकरांनी विचारले होते की तुम्हाला कशावरून असे वाटते की तुमचे सरकार येथे इतकी वर्षे टिकेल? >>>> सणसणीत चपराक. ह्याबद्दल माहित झाल्यावर तरी पर्यटकांना त्या व्यक्तींच्या तेजाची चुणूक जाणवायला हवी आणि असे वर्तन घडायला नको. बाकी त्यांनी काढलेल्या हालअपेष्टा तर डोळ्यासमोर पुतळ्यांच्या रुपात उभ्या केल्याच आहेत. एक दिवस तरी एक तास तरी कोलू फिरवून दाखवा म्हणावं!

लेख चांगला आहे. बर्‍याच प्रतिसादांशी सहमत. लोकांना परिस्थितीचं भान नसतं वगैरे सगळं मान्यच. पण ही जेलची टूर घेणं अनिवार्यच आहे का? ऑप्शनल का नाही? ज्यांना सावरकर कोण हे माहित नाही, काळ्या पाण्याची शिक्षा वगैरे इतिहासात शिकवलं गेलं नसेल तर त्यांचाही फार दोष नाहीच त्यात. मग अशा लोकांना जेल टूर ऐवजी दुसरं काही बघता येत नाही का? उगाच मारून मुटकून जेल बघायला नेण्यात काय पॉईंट आहे?

मी अल्काट्राझ ला गेलो होतो.. अथात त्याची तुलना अंदमानशी करताच येत नाही.
बहुतेक पर्^यटकांचे वर्तन असेच होते.
जे अभ्यासपूर्वक येतात ते अन जे काहीही वाचून न येतात ते यात खूप फरक असतो

बेफिकीर तुमची तडफड जाणवली. पण दोन मुद्दे आपण लक्षात घेण्याची गरज आहे.

एकतर मुळात आपल्याकडे गांधी आणि नेहरूंनंतर पुढारी संपतातच. बाकी थोडेफार पुढारी त्यांच्या नीशमध्ये तग धरून असतात. आंबेडकर = घटना, सुभाषबाबु = आझाद हिंद फौज, टिळक = 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' वगैरे. आणि भारताने जगाला 'अहिंसा' शिकवली म्हटल्यावर क्रांतीकारक वगैरे सगळे सेकंडरीच झाले ना? या इतर थोर पुढार्‍यांची जाज्वल्य चरीत्र शिकवली, चर्चिली, अभ्यासली जातातच कुठे? प्रत्येकाच्या कामगिरीवर खंड लिहिता येतील अशी उत्तुंग कामगिरी केली आहे. पण फोकस जातोच कोठे यांच्यावर?

दुसरं म्हणजे आपल्याकडे राज्याराज्यांतून केवळ स्थानिक पुढार्‍यांबद्दल आस्था दिसून येते. टिळक, सावरकर, फुले, आंबेडकर, शिवाजी हे आपले म्हणून आम्हाला त्यांची खडानखडा माहिती आहे. पण तसंच इतर राज्यांतील पुढार्‍यांबद्दल, समाजसुधारकांबद्दल, क्रांतीकारकांबद्दल, तत्वज्ञांबद्दल बोलता येईल? याला कारण आपली कोती वृत्तीच आहे.

अशा परिस्थितीत दुसर्‍या राज्यांतून आलेल्या 'पर्यटकांना'च केवळ दोषी कसे काय ठरवू शकतो?

आपण सेल्युलर जेल = सावरकरांची सांगड घालतो पण त्याच सेल्युलर जेलमध्ये केवळ तीन मराठी कैदी होते आणि बहुसंख्य बंगाली कैदी होते. आपल्याला कितपत माहिती आहे त्यांच्याबद्दल?

मी आणि बेफिकीर एकाच सुमारास अंदमान मध्ये होतो. पण भेटण्याचा योग आला नाही.

सेल्युलर जेलची ही काही प्रचि माझ्याकडून.

रात्रीच्या लाईट अँड साउंड शोकरता सेल्युलर जेलमध्ये गेलो असताना काढलेली:

पहिल्या मजल्यावर जेलरचे ऑफिस आणि जेलच्या कामाविषयक इतर ऑफिसेस बांधली होती.

शो सुरू होण्याआधी काढलेले प्रचि. शो सुरू असताना फोटो काढण्याची वा रेकॉर्डिंग करण्याची परवानगी नाही.

दुसर्‍या दिवशी दिवसा भेट दिली असता काढलेली प्रचि :

ही कैद्यांकडून कामं करून घेण्याची जागा

जनरल बेरीची कुप्रसिद्ध खुर्ची

कटू आठवण करून देणारी अजून एक वस्तू - कोलू.

काम करणारे कैदी

तेथिल फाशीघरात एकावेळी तीन कैद्यांना फाशी दिली जात असे

डावीकडील लाकडी इमारत म्हणजेच फाशीघर

मामी तुम्हाला पाहिजे तितके खवा/काजू/ आम्बा मोदक. कारण इतक्या मार्मिक शब्दात असे विवेचन मला अजून विचार करुन करुन म्हातारपणापर्यन्तही जमले नसते ही स्पष्ट कबुली.:स्मित:

मामी,

>> पण त्याच सेल्युलर जेलमध्ये केवळ तीन मराठी कैदी होते आणि बहुसंख्य बंगाली कैदी होते.
>> आपल्याला कितपत माहिती आहे त्यांच्याबद्दल?

मलाही इतर बंगाली कैद्यांविषयी फारशी माहिती नाही. पण बंगाली कैदी सर्वात जास्त होते याच्या कारणाचा अंदाज लावतो. बंगालात वंगभंग चळवळ बंगाली क्रांतिकारकांनी एव्हढ्या कसोशीने चालवली की इंग्रज अधिकाऱ्यांना काम करणं मुश्कील झालं. शिवाय जिवाची भीती होतीच. इंग्रजी राज्यास बंगालात पार लकवा भरला होता. त्यामुळे त्यांनी राजधानी कलकत्त्याहून दिल्लीस हलवली. कल्पना करा इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज १९१२ साली कलकत्त्यात आलेला असतांना त्याच्यावर हल्ला झाला असता तर काय गहजब उडाला असता. त्याला दिल्लीला नेणंच सोयीचं होतं. म्हणून बंगालातून अंदमानात सर्वात जास्त कैदीभरती होत असावी.

तर १९०६ साली स्थापन झालेल्या मुस्लीम लीगला जराही भीक न घालता हिंदूंनी आंदोलन करून १९११ साली बंगालची फाळणी रद्द करवली. तर मग या हिंदूंना मूर्ख बनवायला इंग्रजांनी एका चमच्याची नियुक्ती केली. हा चमचा कोण ते मी सांगत बसत नाही.

हा इतिहास आपल्याला सांगितला जात नाही. का ते कळलं असेलंच! सांगण्याचा मुद्दा काय की एखाद्या आदरणीय प्रतीकाविषयी गांभीर्य उत्पन्न होत नाही याचं कारण बंगाली/मराठी/गुजराती इत्यादि तथाकथित फुटीरता नसून अभिमानास्पद इतिहास दडपून टाकला हे आहे.

आ.न.,
-गा.पै.

मुळात आपल्याला समाज म्हणून कुठल्याही तर्‍हेचा सिव्हिक सेन्स नसणे, कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नसणे, स्वतःच्या वारश्याविषयी (कुठल्याही प्रकारच्या - ऐतिहासिक, नैसर्गिक, सांस्कृतिक, धार्मिक, इ.) चाड, आस्था नसणे, समजून घ्यायची इच्छा नसणे हा कळीचा मुद्दा आहे.

मग सेल्युलर जेल असो, किंवा कान्हेरी, कार्ला लेण्यांमधे स्तूपांवर चढायचे आचरट प्रकार करणारं पब्लिक असो, तिथल्या लेण्यांमधे, गावोगावच्या मंदिरांमधे दारू पिणारं, जुगार खेळणारं पब्लिक असो किंवा किल्ले, लेण्या यांच्यावर बदामात आपली नावं कोरणारं पब्लिक, किंवा कास तलाव घाण करणारं पब्लिक, देवळांच्या, तीर्थक्षेत्रांच्या आसपासची बकाल परिस्थिती.... एकूण एकच.
इथे सावरकर, शिवाजी या व्यक्ती फक्त महत्वाच्या नाहीत तर मुळात अगदी जेलर बेरीची खुर्चीही वारसा याच गटात मोडते हे लक्षात घ्यायला हवं. सामाजिक पातळीवर आपली संस्कृती/इतिहास/निसर्ग धडपणे, देखणेपणे, हानी न पोचवता सांभाळायची आपली लायकी नाही.

मामीचा मुद्दा अजिबातच पटला नाही. एखाद्या जागेला, वास्तूला ऐतिहासिक / सांस्कृतिक संदर्भ आहेत इतकी 'माहिती' तिथे आदरपूर्वक वागायला पुरेशी असायला हवी. त्यात 'आपले'पणाचाही संबंध असता कामा नये खरंतर. कैदी मराठी होते की बंगाली की आणखी कोणी याने काय फरक पडतो / पडावा? जालियनवाला बागेत मेलेले सगळे पंजाबी होते म्हणून काय त्या गोळ्यांचे ठसे असलेल्या भिंतीला टेकून आपण भेळ खायची का? वरती एका प्रतिसादात नाझी छळछावणीचा उल्लेख आला आहे. एक संवेदनशील माणूस म्हणून ते संदर्भ आपल्याला भिडतात की नाही आणि एक सुजाण नागरीक म्हणून त्यांची कदर आहे की नाही इतकाच प्रश्न असतो.

अजय यांचाही मुद्दा नाही पटला. म्हणजे लिहिणार्‍याला खरंच हेच छळत असेल आणि तेच मांडायचं असेल तर काय हरकत आहे?

इतिहास शिकवला गेला नसेल, माहिती नसेल, पण जे इतकं धडधडीत डोळ्यासमोर दिसतं आहे (कैद्यांच्या प्रतिकृती इ.) ते बघूनही अस्वस्थ व्हायला होत नसेल तर कुठल्या मुशीतून घडली असतील असे लोक?

वरदाला अनुमोदन. मी एक पोस्ट लिहिले होते पण ते फार विस्कळित झाले होते. मला जे म्हणायचे आहे ते तिने अचूक मांडले आहे.

बे.फि.,

मी २००१ साली अंदमान ला गेलो होतो. त्यावेळी सावरकरांच्या सेलमध्ये दंडवत घालून अक्षरशः रडलो होतो.

पण या हरामखोर लोकांच्या वर्तनाची इतकी चीड येते की बस्स! हा विषय काढलात याबद्दल धन्यवाद. दोन पाच लोकांमध्ये जरी आपल्यामुळे राष्ट्रीय अस्मिता जागृत झाली तरी चांगलेच म्हणायचे!

>>अशा परिस्थितीत दुसर्‍या राज्यांतून आलेल्या 'पर्यटकांना'च केवळ दोषी कसे काय ठरवू शकतो?<<

खूपच हास्यास्पद युक्तीवाद आहे. उगाच नाही बाहेरचे फुटीचे राजकारण खेळून गेले.
ह्या न्यायानुसार मराठी माणूस म्हणु शकतो उद्या, व्हूज नेताजी बोस? तो तर बंगाली मग त्याचे काय एवढे वाटुन घ्यायचे असे समजायला हरकत नाही.
किंवा बंगाली किंवा मद्रासी म्हणु शकतो, व्हूज सावरकर? ओह... दॅट घाटी मराठी मॅन...
आणि दुसरे म्हणजे, बंगालच्या म्हणा, गुजरातच्या शाळेत काय फक्त राज्या राज्यानुसार त्या त्या राज्यातले क्रांतीकारकांचे धडे होते?
चला, एक वेळ इतिहासात नापास झाला असाल शाळेत समजुया... पण जरा शाळेत गेलात असाल समजुन , कुठल्या ठिकाणी गेलात ती जागा व त्याची माहिती वाचता येणे शक्य आहे व काय अपेक्षित आहे असे वाढलेल्या माणसाकडून गृहित धरु शकतो ना?

म्हणूनच म्हटले आधीच्या पोस्टीत की, हे असले(जे रायगडावर तोफेवर टांग टाकून बसून फोटो काढतात किंवा अंदमानातील वरील नोंदलेले नमुने) पर्यटक भारतात नाही पाळत पण न्युयॉर्क गेले की, आम्ही न्युयॉर्काला गेलो ना तेव्हा तिथे ग्राँउड झीरोला शांततेत वेळ घालवला. ह्यांव नी त्यांव मोठेपणा सांगतात. मग असले शुंभ मग आई-वडील झाले पुढे मागे की मुलांआ काय व्यॅलु देणार? )

(न्युयॉर्क चे फक्त उदाहरण दिलेय ह्याची नोंद घ्या. अडाणी).
---------------------------

अजय,
विषयाच्या नावावरूनच कळतेय की ,लेखकाला हेच नोंदवायचे आहे की पर्यटक कसे बेशिस्त वागतात.

क्रांतीवीरांची महती सांगायची असती तर नक्कीच तसे नाव असते लेखाचे.( अ. मा. म) Happy

पुण्यातल्या एम्प्रेस गार्डन मध्ये कोणी गेलंय का कधी? बॉटनी विषयाच्या अभ्यासकांकरिता एक उत्कृष्ट बाग आहे ती. २००४ मध्ये मी तिथे गेलो होतो. प्रत्येक झाडापाशी त्याचे शास्त्रीय नाव, प्रचलित नाव व इतर बरीच शास्त्रीय माहिती लिहिलेली आढळते. अनेक अभ्यासू लोक तिथे बसून ती सर्व माहिती लिहून घेत असतात. या अभ्यासूंना व्यत्यय होईल अशा तर्‍हेने इतर अनेक जोडपी बरेच "अशिष्ट" प्रकार तिथे करीत असतात. त्याविषयी मी सुरक्षा रक्षकांकडे तक्रार केली पण तेही "आम्हाला तुटपूंज्या पगारात काम करावे लागते, या लोकांना विरोध करून मनस्ताप पत्करण्यापेक्षा यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे पन्नास / शंभर रुपये इनाम घेणे जास्त सोयीस्कर" या मताचे व लाचार मनोवृत्तीचे असलेले आढळले.

कायद्यानेही यांच्या वर्तनात सुधारणा होणार नाहीच. दूरचित्रवाहिन्यांनीच पुढाकार घेऊन या मंडळींचे छायाचित्रण करावे आणि ते वाहिन्यांवर प्रक्षेपित करावे म्हणजे या गोष्टींना चाप बसेल.

खूप छान लिहिलंत. अंदमानला जायचंच आहे. ते जमेल तोपर्यंत इथल्या वर्णनाने आणि फोटोंनी थोडी का होईना पण मनाची तगमग शांत झाली.
राहता राहिला पर्यटकांचा मुद्दा. त्यासंदर्भात अनेकांच्या प्रतिसादांशी सहमती आहे. आपल्याकडचं अनेकांचं सार्वजनिक वर्तन अनेकदा आक्षेपार्ह असतं याच्याशी शंभर टक्के सहमती. इथे थोडंसं आपल्या आत डोकावून पहायला हवं. क्रांतीकारकांच्या गाथा सगळ्या मुलांपर्यंत नाही पण निदान आपल्या मुलांपर्यंत आणि त्यांच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याची धडपड आपण खरंच करतो का? त्यांच्या स्वभावात सामाजिक जाणीव रुजावी, त्यांना बांधिलकीचे भान यावे यासाठी प्रयत्न होतात का? मुलं उद्याचे आदर्श नागरिक आहेत असं म्हटलं जातं पण पालक खरंच आजचे आदर्श नागरिक आहेत का? उत्तम नागरिक घडविण्याची जबाबदारी निव्वळ शाळा आणि शिक्षणव्यवस्थेवर ढकलून चालेल का? तिथे सगळा ठणठणाट आहेच म्हणून तर पालकांची जबाबदारी जास्त वाढते ना! मुलांमध्ये ही मुल्य रुजवण्यात थोडेफार का होईना यश मिळाले तर मग कुठे कसे वागावे हे त्यांना सांगावेच लागत नाही. त्यांना ते भान आपसुकच यायला लागते.

बेफिकीर , अंदमानच्या सेल्युलर जेलचे दर्शन घेऊन मनाने सावरकरांपर्यंत पोचल्यावर पर्यटकांबद्दल चीड येणं अगदी स्वाभाविक.पण बहुसंख्य पर्यटक हे सामान्य वकूबाचेच नव्हे तर अतिसामान्य संवेदनशक्तीचे , सावरकरांच्याच भाषेत चिमण्याकावळ्यांचा संसार आणि त्यातली माफक सुखं यापलीकडे न गेलेलेच असू शकतात तेव्हा या प्रकारचे शौर्य ,त्याग वगैरे भानगडी त्यांनी समजून घेण्याची अपेक्षाच चुकीची.

''कोठडी'' नावाच्या एका दुर्मिळ कवितेत सावरकरांनी आपल्या तेव्हाच्या मनस्थितीवर प्रकाश टाकला होता, तिच्या रसग्रहणाची लिंक या निमित्ताने इथे पुन्हा द्यावीशी वाटते आहे. तुम्हाला चालेल अशी आशा करते.
http://www.maayboli.com/node/41465

स्वातीचे खालील मुद्दे फार पटले.
एखाद्या जागेला, वास्तूला ऐतिहासिक / सांस्कृतिक संदर्भ आहेत इतकी 'माहिती' तिथे आदरपूर्वक वागायला पुरेशी असायला हवी. त्यात 'आपले'पणाचाही संबंध असता कामा नये खरंतर.
इतिहास शिकवला गेला नसेल, माहिती नसेल, पण जे इतकं धडधडीत डोळ्यासमोर दिसतं आहे (कैद्यांच्या प्रतिकृती इ.) ते बघूनही अस्वस्थ व्हायला होत नसेल तर कुठल्या मुशीतून घडली असतील असे लोक?

भारताला स्वातंत्र्य मिळायला स्वातंत्र्यसैनिकांनी कायकाय सोसलेय ते तर सर्व भारतीयांना माहीत असते. तेच तिथे दिसतय तरी जाणीव होत नसेल तर अवघड आहे.

>>>> बघूनही अस्वस्थ व्हायला होत नसेल तर कुठल्या मुशीतून घडली असतील असे लोक? <<<<<
हल्लीची मूस कॉम्प्युटर/टीव्ही गेम्स्/सिनेमे यान्ची आहे असे मला वाटते.
स्वाती/झम्पी/गामा, सहमत.

Pages