पर्यटकांचे निषेधार्ह वर्तन

Submitted by बेफ़िकीर on 27 March, 2014 - 11:40

नुकताच अंदमानला जाऊन आलो. आठवडाभर अनेक समुद्र किनारे पाहण्याचे शेड्यूल होते मात्र पहिल्याच दिवशी पहिलेच ठिकाण जे होते ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेथे ठेवण्यात आले होते ते सेल्यूलर जेल!

ह्या कारागृहाची रचना, अंगावर येणारी भीषणता, स्वातंत्र्यपूर्व काळात तेथे असू शकणारी सुविधांची दयनीय अवस्था जिची आपण कल्पना करू शकतो, अंदमानची दमट हवा, कैद्यांना मिळणार्‍या अस्वच्छ व जेमतेम सोयी, कमालीच्या शारीरिक यातना असलेल्या शिक्षा, मार्गदर्शकाने केलेले काटा आणणारे वर्णन, फाशी घर, रक्तबंबाऴ होईपर्यंत चाबूक मारण्यासाठी असलेला चौथरा, खूप वजनाचे लोखंड अडकवून मग कामे करवून घेतली जात असणे, कामात चूक झाल्यास होणारे अपरिमित हाल, तीन तीन दिवस उपाशी ठेवणे, पोत्याच्या कापडाचे कपडे (ज्याने घामोळे व्हावे हाच हेतू) ह्या आणि अश्या सर्वच्या सर्व बाबी मन विषण्ण करतातच. कोणत्याही सहृदय माणसाला स्वतःच्या आरामात जगण्याची लाज वाटू लागेल अशी त्या कारागृहाची भीषणता आहे. काही छायाचित्रे देत आहे ज्यावरून (जे अजून तेथे गेले नसतील त्यांना) कल्पना येऊ शकेल की माणूसच माणसाला किती यातना देत होता.

तरीही, थोडेसे वर्णन करणे आवश्यक वाटत आहे.

१. सावरकरांना खास अश्या ठिकाणची कोठडी दिली होती जेथून त्यांना फाशीच्या कैद्यांना फाशी दिलेली बघता येईलच असे नव्हे तर त्यांना मुद्दाम ती बघायला लावली जायची.

२. सात विंग्जपैकी एका विंगचे कैदी दुसर्‍या विंगशी काहीही संपर्क ठेवू शकायचे काहीत, किंबहुना ते एकमेकांना दिसूही शकायचे नाहीत.

३. जनावरांनाही काढता येणार नाही इतके तेल एका कैद्याला एका दिवसात काढायला लावायची शिक्षा असे.

४. ते काम कैद्याने केले नाही तर त्याच्या चुकीच्या प्रमाणावर अवलंबून तीन प्रकारच्या बेड्या असत त्या घातल्या जात. पहिल्या सोप्या प्रकारात दोन्ही हात व दोन्ही पाय वजनाने जखडले असले तरीही निदान मुक्तपणे हालवता यायचे. दुसर्‍या स्टेजला पाय हालवता यायचे पण हात आखडले जायचे. तिसर्‍या स्टेजमध्ये पायही आखडले जायचे. त्याच अवस्थेत काम करावे लागायचे.

५. कामात कमी पडलेला कैदी किंवा चुकीचा वागलेला कोणी कैदी असला तर त्याला एका चौथर्‍यावर बांधून चाबकाचे फटके मारले जायचे. फटके मारणारा माणूस भारतीयच असायचा व त्याच्यावर हे बंधन असायचे की कैद्याच्या पाठीतून रक्त यायलाच हवे, रक्त आले नाही तर त्या फटके मारणार्‍यालाच फटके देऊन त्याचे रक्त काढले जायचे.

६. तूर्त सर्व बाजूंनी भिंती बांधलेल्या असल्या तरी तेव्हाच फाशी घर एका बाजूने व वरच्या बाजूने खुले होते. फाशीची शिक्षा झाल्या झाल्या सेंट्रल टॉवरवरील घड्याळात मोठे टोल दिले जायचे, ज्यायोगे समुद्रात कित्येक मैलांवर असलेल्या बेटांवरील नागरिकांनाही समजायचे की आत्ताच कोणालातरी फाशी दिली गेली. ते टोल वाजले की अर्थातच कारागृहातील कैदी भीषण ओरडू लागायचे कारण त्यांना आपलाही अंत दिसू लागायचा.

त्या कारागृहात सायंकाळी दोन वेळा एक लाईट व साऊंड शो होतो, पहिला हिंदीमधून व दुसरा इंग्लिशमधून! त्यातूनही बरीच माहिती मिळते त्या हालअपेष्टांची! कैद्यांना दोनच भांडी दिली जायची. एक मातीचे व एक लोखंडाचे! एक भांडे अन्नपाण्यासाठी व एक नैसर्गीक विधींसाठी! दररोज येणारा भंगी दोन तीन दिवस आला नाही तर कोठडीत तसेच घाणीत बसून राहावे लागायचे. शौचास व बाथरूमला जाण्याच्या वेळा ठराविक होत्या, त्याच पाळाव्या लागत. पाणीही मोजून मिळे!

स्वातंत्रवीर सावरकर ह्या सर्वातून स्वतःही गेलेले होते. ६९३ कैद्यांना सामावू शकणारे हे राक्षसी कारागृह 'काळ्या पाण्याच्या' शिक्षेच्या भीषणतेची दु:खद आठवण देऊन मनात कालवाकालव करते. लाईट आणि साऊंड शो पाहून बाहेर पडणारे अनेक चेहरे खर्रकन उतरल्यासारखे असतात.

कर्नल की कॅप्टन डेव्हिड बेरी नावाचा एक कारागृह प्रमुख अत्यंत क्रूर होता व त्याच्यासाठी एक खास खुर्ची केलेली असावी. ह्या डेव्हिडने छद्मीपणाने सावरकरांना सांगितले की होते पन्नास वर्षे झाली की तुम्हाला सोडतीलच. त्यावर सावरकरांनी विचारले होते की तुम्हाला कशावरून असे वाटते की तुमचे सरकार येथे इतकी वर्षे टिकेल?

अविश्वसनीय अश्या हा हालअपेष्टांची वर्णने ऐकताना, वाचताना आपण गंभीर होत जातो आणि त्या गांभीर्यावर नादानपणाचे, पोरकटपणाचे, घृणास्पद, लज्जास्पद ओरखडे उठतात ते आलेल्या कित्येक पर्यटकांमुळे! खासकरून महाराष्ट्राबाहेरचे पर्यटक आणि हनीमून कपल्स तसेच तरुण मुलांची टोळकी ह्या सर्वांचे वर्तन असे असते की त्यांनाच तेथे चाबकाचे फटके द्यावेत.

कर्नल डेव्हिडच्या त्या खुर्चीवर थाटात बसून स्वतःचे फोटो काढून घेतले जातात. हाल सहन करून घाण्याभोवती फिरणार्‍या कैद्याच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून एखादी नववधू हासत हासत उभी राहते आणि तिची मोहक छबी तिचा हबी कॅमेर्‍यात टिपतो. सावरकरांच्या कोठडीच्या उंबर्‍यावर तीनतीनदा डोके घासून आत पाऊल टाकणारे आपल्यासारखे अनेक असूनही त्या उंबर्‍याचे महत्वच न समजलेले अनेक जण आत जाऊन सावरकरांची माहिती देणार्‍या फलकाशेजारी उभे राहून फोटो काढून घेतात.

हास्यविनोद, टवाळक्या चाललेल्याच असतात.

पुढील संपूर्ण ट्रीपमधील सर्वच मनोरंजक उपक्रमांवर ह्या कारागृह भेटीच्या पहिल्याच कार्यक्रमाचे अंशतः तरी सावट भरून राहते. पण ते काहींसाठीच! बाकीच्यांना प्रत्यक्ष कारागृह हाही एक पिकनिक स्पॉट वाटतो.

गाईड आणि काही जबाबदार नागरीक परोपरीने समजावून सांगत असूनही 'आपलाही फोटो आलाच पाहिजे' ह्याची अहमअहमिका लागलेली असते. त्यातही विविध अदा, पोझिशन्स, त्यातच पुन्हा उघडपणे केलेले सहेतूक देहप्रदर्शन, उगीचच केलेली जवळीक!

वाईट वाटते.

काही छायाचित्रे देत आहे. ही छायाचित्रे घ्यायला त्या कारागृहाच्या प्रशासनाची अर्थातच परवानगी आहे.

IMG_0429.JPGIMG_0430.JPGIMG_0432.JPGIMG_0434.JPGIMG_0435.JPGIMG_0440.JPGIMG_0443.JPGIMG_0450.JPGIMG_0451.JPGIMG_0452.JPGIMG_0453.JPGIMG_0454.JPGIMG_0474.JPGIMG_0478.JPG

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वातंत्रवीर सावरकर ह्या सर्वातून स्वतःही गेलेले होते. >> बेफीजी सावरकरांचा "माझी जन्मठेप" वाचा. त्यात त्यानी स्वतःला अशी कोणतीच शिक्षा न झाल्याचं नमूद केलं आहे. आपण हा संदर्भ कुठून घेतला?

स्वातंत्रवीर सावरकर ह्या सर्वातून स्वतःही गेलेले होते. >> बेफीजी सावरकरांचा "माझी जन्मठेप" वाचा. त्यात त्यानी स्वतःला अशी कोणतीच शिक्षा न झाल्याचं नमूद केलं आहे. आपण हा संदर्भ कुठून घेतला?

सावरकर माझी जन्मठेप मध्ये लिहतात की सुरुआतीचे काही वर्षे त्याना अंधा-या कोठडीत रहावे लागेल. नंतर मात्र तेलाच्या स्टोअर रुमचे हेड म्हणून नोकरी मिळाली. सुशिक्षीत कैद्याना चांगली वर्तणूक असल्यास अशी नोकरी दिली जात असे व सावरकरांचे वर्तन चांगले असल्यामुळे त्याना नोकरी मिळाली याची नोंद खुद्द सावरकरानी केली आहे.

एवढेच नाही तर काही वर्षे शिक्षा भोगल्यावर कारागृहाच्या बाहेर सहकुटुंब राहण्यासाठी एक घरही दिले जात असे. या सगळ्या गोष्टी सावरकरानी लिहून ठेवल्या आहेत. अंदमान मध्ये कायमचे वास्तव्य करण्याची त्यांची ईच्छा होती हे सुद्धा सावरकरानी लिहून ठेवले आहे.

म्हणजे तुम्ही जे म्हणता तसे हाल बील काही झाले नाही...!!!

हतोडावाला यांनी जे लिहिले आहे ते खरे असेल तर माझी बरिच गृहितके पुन्हा तपासुन बघावी लागतील.

कोणी सत्य काय ते सांगेल का?

लेख वाचला. मन सुन्न करणारा आहे.
परदेशात कुठेही असे बघायला मिळणार नाही. फक्त मुक्त स्वातंत्र्य असलेल्या आपल्या भारतीय (स्वदेशी) पर्यटकांचे हे असे लाजिरवाणे / आक्षेपार्थ / धिक्कार करण्याजोगे / बेशरम व खचितच निषेधार्ह वर्तन आजकाल देशात कुठेही गेले तरी हेच आणि हेच पहाणे नशिबी येते व मन विषण्ण होऊन जाते.
स्मारके असोत वा ऐतिहासिक वास्तु अथवा पवित्र मंदिर कुठेही गेलो तरी सगळीकडे प्रेमवीरांची नावे कोरलेली. अगदी इंच न इंच व्यापून टाकलेला असतो.
मुळात सामाजिक जाणिवा बोथट असणारे किंवा जाणिवाच नसणारे हे बधिर लोक असंच वागतात.
दुर्दैवाने आपल्याकडे जर शैक्षणिक अभ्यासक्रमात ही जाणीव प्रयत्नपुर्वक निर्माणच केली जात नाही तर मग सुजाण नागरिक होणार तरी कसे तयार ?
लेख वाचल्यावर विचार करकरून डोक्याचा नुसता भुंगा झालाय,अजून बरच काही मनात येतय पण विचारांचा गुंता झाल्याने मनात येणारे सर्वच काही इथे शब्दबद्ध करता येत नाहिये याचे शल्य आहे.

स्वातंत्र्य मिळवण्याच मुल्य पुढच्या पिढ्यांना समजलच नाही. त्यातुन स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वतंत्र भारतात भाषण करायला अनेक परवानग्या घ्याव्या लागत. महाराष्ट्राच्या बाहेर ते कुणाला समजले असावेत की नाही काही कल्पना नाही .

सावरकरांना छिलका कुटण्याचे काम दिले त्याचे वर्णन माझी जन्मठेप या पुस्तकात आहे. काथ्यांच्या जुड्यांवर सावरकरांच्या हातातून सांडलेल्या रक्ताचे डाग असत. कोलूला जुंपल्यावर सतत तेलाचा घाणा फिरवून चक्कर येत असे.
संप केला म्हणून दोन आठवड्याची आढाबेडीची शिक्षा झाली वगैरे उल्लेख आहे. अशावेळी सावरकरांना शिक्षा झाली नव्हती असे हातोडावाला कसे म्हणू शकतात?

अवांतरः हा प्रतिसाद लिहित असताना माझी जन्मठेप हे पुस्तक माझ्या समोर डेस्कवर आहे.

शिक्षा झाल्याशिवाय ऐकणार्‍याच्या डोळ्यात पाणी आणणारी आणि व्याकुळ करणारी, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला सारखी आर्त कलाकृती कुणालाच सुचू शकणार नाही.

इकडची चर्चा वेगळ्याच दिशेला चालली आहे ..

>> शिक्षा झाल्याशिवाय ऐकणार्‍याच्या डोळ्यात पाणी आणणारी आणि व्याकुळ करणारी, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला सारखी आर्त कलाकृती कुणालाच सुचू शकणार नाही.

दक्षिणा, ही कविता सावरकरांनीं लंडन शिकायला गेलेले असताना लिहिली आहे बहुतेक .. अंदमानला नाही ..

सावरकरांच्या शिक्षेच्या तपशीलाने या लेखाच्या एकूण संदर्भात फारसा फरक पडायला नको. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या कोणत्याही क्रांतिकारकाला हे हाल सहन करावे लागले असतील तरी त्या ठिकाणचे महत्त्व भारतीयांच्या दृष्टीने तेवढेच महत्त्वाचे आहे, त्यामुळे हा लेख असाच्या असा लागू पडेल.

शिक्षा झाल्याशिवाय ऐकणार्‍याच्या डोळ्यात पाणी आणणारी आणि व्याकुळ करणारी, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला सारखी आर्त कलाकृती कुणालाच सुचू शकणार नाही. >>>

ब्रायटन च्या समुद्र किनारी, त्यांच्या पुत्र मेल्याच्या वार्तेने व्याकुळ होऊन ही कविता सुचली आहे. तो "बाल गुलाबही" म्हणजे तो पुत्र.

माझी जन्मठेप, पृ. क्र. ११५...
सावरकर स्वतः लिहतात की त्याना कोलू(तेलाचा घाणा) फिरविण्याची शिक्षा सुनाविण्यात आली. एकून चौदा दिवस कोलू फिरवायचा होता. पण सावरकर हे सुशिक्षीत व फारसं अंगमेहनतीचं काम केलेले नसल्यामुळे त्याना बेरी साहेबानी (जेलरनी) कोलू फिरविण्याच्या कामे एक मदतनीस दिला होता.

तेंव्हा इतर कैद्यांच्या तुलनेत सावरकराना कोलूच्या कामे कशी सूट मिळाली हे खुद्द सावरकरानी माझी जन्मठेपमध्ये नोंदवून ठेवले आहे.

१४ वर्षाच्या काळात १४ दिवस कोलू फिरविला म्हणजे वर्षाला एक दिवस असा एवरेज निघतो. सुरुवातीचे काही वर्षे बंद कोठडीतील शिक्षा वगळल्यास नंतरच्या काळात सावरकरानी या कारागृहात सुशिक्षीत कैदी म्हणून नोकरी केली.

अरेरे, शेळी गेली जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड ह्या धर्तीवरच्या पोस्ट्स येत आहेत. दुर्दैवी आहे !

स्वाती_आंबोळे ह्यांची पोस्ट उत्तम ! पटलीच.

अरेरे, शेळी गेली जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड ह्या धर्तीवरच्या पोस्ट्स येत आहेत. दुर्दैवी आहे ! >>> + १ खरंच दुर्दैवी आहे. अख्ख्या पुस्तकातून केवळ स्वतःला सोयीस्कर असे संदर्भ निवडून त्यावरून निष्कर्ष काढून मोकळे झाले आहेत.

हातोडावाला,

>> तेंव्हा इतर कैद्यांच्या तुलनेत सावरकराना कोलूच्या कामे कशी सूट मिळाली हे खुद्द सावरकरानी
>> माझी जन्मठेपमध्ये नोंदवून ठेवले आहे.

मला कुठेतरी वाचलेलं आठवतं त्याप्रमाणे सावरकर आणि डेव्हिड बारी यांचा वादविवाद झडला होता. त्यात सावरकरांनी त्याची अक्कल काढली होती. की किरकोळ प्रकृतीच्या माणसाला (=सावरकरांना) अंगमेहनतीची कामं देतोस म्हणून! तसेच बारी आयरिश होता. सावरकर आणि शिन फेन या संघटनेची एकमेकांना सहानुभूती होती. ही संघटना आयर्लंडला ब्रिटनपासून स्वतंत्र करायच्या मागे असे. बारी आयरिश असूनही शिन फेन च्या विरोधात ब्रिटीशांसाठी कसंकाय काम करतो, असं सावरकरांनी खोचकपणे विचारलं.

सांगण्याचा मुद्दा काय की, सावरकरांचे धैर्य कोलमडावे म्हणून १५ दिवस कोलू देण्यात आला. मात्र त्यांचं धैर्य अभंगच राहिलं. त्यांना कोलू देण्याचा मूळ हेतू अजिबात साध्य झाला नाही.

आ.न.,
-गा.पै.

हतोडावाला, तुमचा मुद्दा काय आहे नेमका? ह्यात तिरकसपणा वगैरे काही नाही. पण खरच तुमचा मुद्दा नाही कळला. सावरकर ११ वर्ष बंदीवासात होते, ज्यात त्यांचे शारिरीक आणि मानसिक हाल झाले (हाल-अपेष्टा भोगल्या असं म्हणू). अर्थात ह्याविषयी त्यांची स्वतःची तक्रार नव्हती / नसावी कारण he called it upon himself. पण आपल्याला त्याविषयी आदरही बाळगता येऊ नये किंवा ते acknowledge ही करताना त्यात ईतक्या कुशंका काढाव्या हे मला तरी वैय्यक्तिक पातळीवर पटत नाही. अर्थात प्रत्येकाच्या मत-स्वातंत्र्याचा आदर आहेच.

पण मला वाटतं कि ईथे मुद्दा ईतकाच आहे की एखाद्या ठिकाणी जिथे ईतिहासातलं काही महत्वाचं घडलय तिथे गेल्यावर त्या स्थानाला / त्या ऐतिहासिक घटनेला यथोचित सन्मान द्यावा. अर्थात म्हणून अशा ठिकाणी स्वतःचे फोटोज काढून घेऊ नये हे काही मला फारसं पटत नाही. एखाद्या ठिकाणी मी माझे फोटोज काढून घेतो ते मी तिथे गेल्याची आठवण म्हणून. नुसत्या जागांचे फोटोज तर नेटवरही मिळतात. अशा ठिकाणी फोटोज काढून घेतल्यामुळे माझा आदर कमी होत नाही किंवा न घेतल्यामुळे तो ईतरांपेक्षा जास्त वगैरे असल्याचं सिद्ध होत नाही.

केदार, बाल गुलाबाचा संदर्भ सावरकरांच्या मुलाचा आहे का? मला तो नेहेमी त्यांच्या धाकट्या भावाचा वाटायचा.

एकतर मुळात आपल्याकडे गांधी आणि नेहरूंनंतर पुढारी संपतातच. बाकी थोडेफार पुढारी त्यांच्या नीशमध्ये तग धरून असतात. आंबेडकर = घटना, सुभाषबाबु = आझाद हिंद फौज, टिळक = 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' वगैरे. आणि भारताने जगाला 'अहिंसा' शिकवली म्हटल्यावर क्रांतीकारक वगैरे सगळे सेकंडरीच झाले ना? या इतर थोर पुढार्‍यांची जाज्वल्य चरीत्र शिकवली, चर्चिली, अभ्यासली जातातच कुठे? प्रत्येकाच्या कामगिरीवर खंड लिहिता येतील अशी उत्तुंग कामगिरी केली आहे. पण फोकस जातोच कोठे यांच्यावर?

आपल्याकडे राज्याराज्यांतून केवळ स्थानिक पुढार्‍यांबद्दल आस्था दिसून येते. टिळक, सावरकर, फुले, आंबेडकर, शिवाजी हे आपले म्हणून आम्हाला त्यांची खडानखडा माहिती आहे. पण तसंच इतर राज्यांतील पुढार्‍यांबद्दल, समाजसुधारकांबद्दल, क्रांतीकारकांबद्दल, तत्वज्ञांबद्दल बोलता येईल? याला कारण आपली कोती वृत्तीच आहे.>>

पूर्ण अनुमोदन.

बेफि आणि इतरांना दिसलेले पर्यटक आणि इतर अनेक ठिकाणे दिसतात. एक उदा म्हणजे गड किल्ल्यांवरच्या तोफांवर बसून फोटो काढून घेणारे. प्रचंड संताप येतो, तिथे त्यांना समजवण्याचा किंवा अक्कल काढण्याचा उपद्व्यापही माझ्याकडून केला जातो पण शेवटी आजूबाजूचे लोक आपल्यावरच हसतात, बरोबरचे आपल्यालाच गप्प बसवतात. असो, समाज प्रबोधनाचे कार्य अशा पद्धतीने चालू ठेवण्याचे चालू राहिल.

लेख वाचून भरून आलं आणि संतापही आला.

फेफ - एखाद्या ठिकाणी मी माझे फोटोज काढून घेतो ते मी तिथे गेल्याची आठवण म्हणून.>> फोटो काढणे चूक नाहीच पण आपण कसे फोटो काढून घेतो आहोत काय कपदे घातले आहेत. काय अंगविक्षेप करत फोटो काधत आहोत, कुठे उभे आहोत, कुठे बसलो आहोत ह्याच सारासार विचार करणे महत्वाचे नक्कीच आहे.

अति आगाऊ आणि बथ्थड अशा हौशी पर्यटकांसाठी त्यांची हौस पूर्ण करायला म्हणून अंदमानात कोलू चालवणे काथ्या कुटणे, जेलमधले कपडे आणि बेड्या घालून फिरणे, जालियनवाला बागेत त्यांना खर्‍या नाही पण कडक रबराच्या गोळ्यामारणे असे करायला लावायला काय हरकत आहे. त्यातून त्यांची एक्स्ट्रा हौस पूर्ण होईल आणि कदाचित थोडा सिरियसनेस, मॅच्युरिटि येइल.

बाकी अनेक पोस्टींबद्दल काय बोलावे. असे वाचावे लागते हीच खंत आहे.

रश्मी - माझी जन्मठेप वाचा

आणि आपण सार्‍यांनी काही आक्षेपार्ह मजकूर कुठेही वाचला असल्यास एका ठिकाणी शेअर करून तो बदलण्याच्या मागे लागू शकतो का ह्याचा विचार करायला हरकत नाही.

लेख आवडला.

पर्यटकांची मर्कटलीला कायमची जडलेली आहे. अशा ठिकाणी (विशेषतः ऐतिहासिक पाश्वभूमी असलेल्या स्थळे) या सर्व गोष्टी होऊ नये म्हणून आवश्यक नियमावली करुन त्याचे पालन करणे वा करुन घेणे तितकेच आवश्यक.भले त्यासाठी चाबकाच्या फटक्यंची तरतूद असू दे.याबाबतीत पुरोगामी महाराष्ट्र तितकाच मागासलेला आहे असच मी म्हणेन.

बालाजी दर्शनाला गेल्यानंतर तिरुमला डोंगर चढायच्या आधीच सर्व पर्यटकांच्या बॅगा,खिसे तपासून मग प्रवेश दिला जातो, तेच केरळमध्ये सार्वजनिक ठिकाणी तुम्ही धूम्रपानही करु शकत नाही. मग स्वराज्याचे संस्थापक छत्रपतीच्या किल्ल्यावर खूशाल बियर आणि सिगरेटचे धूरके उडवत जाणारे पर्यटक बघितले कि हळहळ वाटते.मग पुरातत्व विभाग कि महाराष्ट्र सरकारला केवळ दोष देउन पुढे चालत रहायचे का? ही सामाजिक जागृती केवळ समजावून सांगून होणार नाही त्याला शिक्षा असायलाच हवी.

Pages