कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी २

Submitted by नरेंद्र गोळे on 26 June, 2013 - 22:02

कर्काकरताचे धोकेघटक

डॉक्टर्स अनेकदा हे सांगू शकत नाहीत की एखाद्या व्यक्तीस कर्क का व्हावा आणि इतर एखाद्या व्यक्तीस तो का होऊ नये. खाली, कर्काकरताचे सर्वात प्रचूर असलेले धोकेघटक दिलेले आहेत.

१. वयोमान
२. तंबाखू
३. सूर्यप्रकाश
४. मूलककारी प्रारण
५. काही रसायने व इतर पदार्थ
६. काही विषाणू आणि जीवाणू
७. काही उत्प्रेरके
८. कर्काबाबतचा कौटुंबिक इतिहास
९. मद्यार्क
१०. निकृष्ट आहार, शारीरिक सक्रियतेचा अभाव किंवा स्थूलता

ह्यांपैकी अनेक धोकेघटक टाळले जाऊ शकतात. कौटुंबिक इतिहासासारखे काही घटक टाळले जाऊ शकत नाहीत. शक्य असेल तेव्हा ज्ञात धोकेघटकांपासून दूर राहून, लोक स्वतःचे रक्षण करू शकतात.

जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला कर्काचा धोका आहे तर, तुम्ही तुमच्या किंतुबाबत डॉक्टरशी चर्चा करायला हवी. तुमचा धोका कसा कमी करता येऊ शकेल ह्याबाबत आणि तपासण्यांच्या वेळापत्रकाबाबत तुम्ही त्यांना विचारू चाहाल.

यथावकाश, अनेक घटक एकवटून प्राकृत पेशींना कर्कपेशींत घडवत जातात. कर्कापासूनच्या धोक्यांचा विचार करत असता, खालील काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

१. प्रत्येक गोष्टीनेच काही कर्क उद्‌भवत नाही.
२. टेंगुळ येणे खिंवा खरचटणे ह्यांसारख्या जखमांमुळे कर्क होत नाही.
३. आधीच कुठल्याशा विषाणूंनी किंवा जीवाणूंनी संसर्गग्रस्त असल्यास, काही प्रकारच्या कर्क उद्‌भवांचा धोका वाढत असला तरीही, कर्क संसर्गजन्य असत नाही. दुसर्‍या व्यक्तीपासून कुणीही कर्क घेऊ शकत नाही.
४. एक वा अनेक धोकेघटक अस्तित्वात असले म्हणजे कर्क होईल असे नाही. धोकेघटक बाळगणार्‍या बहुतेक लोकांना कधीही कर्क होत नाही.
५. काही लोक इतरांपेक्षा धोकेघटकांस अधिक संवेदनाक्षम असतात.

वयोमानः कर्काकरताचा सर्वात महत्त्वाचा धोकेघटक असतो वयोमान हा. लोकांत उद्‌भवणारे बहुतेक कर्क, वयाच्या ६५ व्या वर्षानंतर उद्‌भवत असतात. पण बालकांसहित सर्व वयाच्या लोकांनाही कर्क होऊ शकत असतो.

तंबाखूः तंबाखू हे मृत्यूचे सर्वात अधिक प्रतिबंधनक्षम कारण आहे. दरवर्षी १,८०,००० हून अधिक अमेरिकन लोक तंबाखू-वापरा-संबंधित कर्करोगाने मृत्यूमुखी पडत असतात.

तंबाखू-उत्पादने वापरणे किंवा नियमितपणे तंबाखूच्या (पर्यावरणीय अथवा दुय्यम) धुराच्या आसपास राहण्याने कर्काचा धोका वाढत असतो.

विडी न ओढणार्‍यांपेक्षा ओढणार्‍यांना फुफ्फुसाचा, स्वरयंत्राचा, मुखाचा, अन्ननलिकेचा, मूत्राशयाचा, मूत्रपिंडाचा, घशाचा, पोटाचा, स्वादुपिंडांचा किंवा गर्भाशय-ग्रीवेचा कर्क उद्‌भवण्याची शक्यता अधिक असते. अशा लोकांत, कुशाग्र-अस्थीमज्जोद्भव-रक्तपेशी-कर्क उद्‌भवण्याची शक्यताही अधिकच असते.

धूरविरहित तंबाखू (तपकीर किंवा खाण्याचा तंबाखू) सेवन करणार्‍या लोकांना तोंडाच्या कर्काचा धोका वाढता असतो. ज्यांना आधीच कर्कबाधा झालेली असते अशांनी तंबाखू सेवन सोडल्यास त्यांना आणखी एखादा कर्क होण्याचा धोका घटू शकत असतो.

लोकांना तंबाखू सोडण्यास मदत करणारे अनेक स्त्रोत अस्तित्वात आहेत.

१. संघराज्यीय सरकारचे संकेतस्थळावर, म्हणजेच http://www.smokefree.gov वर, तंबाखू सोडण्यास मदत करणारे जालसंजीवित (ऑन-लाईन) मार्गदर्शन आणि इतर मदत-स्त्रोतांची यादीही दिलेली आहे.
२. डॉक्टर्स आणि दंतवैद्य त्यांच्या रुग्णांना, स्थानिक कार्यक्रम किंवा तंबाखू सोडण्यास मदत करणार्‍या प्रशिक्षित व्यक्ती शोधण्यास, मदत करू शकतात.
३. डॉक्टर्स आणि दंतवैद्य त्यांच्या रुग्णांना, औषधे किंवा पट्टी, चघळगोंद (गम), लोझेंगे (शंकरपाळ्याच्या आकाराच्या खोकल्याच्या गोळ्या), फव्वारा किंवा श्वसनाद्वारे आत घ्यावयाचे औषध, यांसारख्या निकोटीनच्या पर्यायी उपचारपद्धती सुचवू शकतात.

सूर्यप्रकाशः स्वतःस सूर्यप्रकाशापासून वाचवा. सौर दिव्यांपासून आणि वाळवण-मंचां (टॅनिंग बेड) पासूनही जम्बुपार प्रारणे येत असतात. त्यांच्यामुळे त्वचा अकाली वृद्ध होते आणि त्वचेची त्वचाकर्काप्रत नेणारी हानी होते.

डॉक्टर्स सर्व वयातील लोकांना सूर्यप्रकाशातील वावर कमी करण्यास आणि जम्बुपार-प्रारण-स्त्रोत टाळण्यास प्रोत्साहन देत असतात.

१. शक्य असेल तेव्हा, माध्यान्हीचा (सकाळी उशीरापासून तर दुपारी उशीरापर्यंत) सूर्य टाळणेच सर्वोत्तम. याशिवाय तुम्ही, वाळू, हिम आणि बर्फ यांपासून परावर्तित झालेल्या जम्बुपार प्रारणांपासूनही स्वतःचे रक्षण करावयास हवे. जम्बुपार प्रारणे पातळ कपड्यांतून, वारा-रोधकांतून आणि खिडक्यांतून आत शिरू शकतात.
२. लांब बाह्यांचे सदरे, लांब विजारी, कडा असलेल्या टोप्या, जम्बुपार प्रारणे शोषून घेणारे सौर काचांचे चष्मे परिधान करावेत.
३. सौर-संरक्षक-मलम वापरावे. सौर-संरक्षक-मलम त्वचेस त्वचाकर्कापासून वाचविण्यास उपयुक्त ठरते. विशेषतः किमान १.५ सौर-संरक्षण-गुणक असलेले सौर-संरक्षक मलम वापरावे. मात्र सौर प्रारणे टाळण्यास आणि त्वचारक्षणार्थ कपडे घालण्यास ते पर्यायी ठरू शकत नाही.
४. सौर दिव्यांपासून आणि वाळवण-मंचां (टॅनिंग बेड) पासून दूर राहा. ते काही सौर-प्रकाशाहून अधिक सुरक्षित नाहीत.

मूलककारी प्रारणः असे प्रारण पेशीहानी घडवून कर्काप्रत नेऊ शकते. बाह्य अवकाशातून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेशणारी किरणे, किरणोत्सारी धुराळा, रेडॉन वायू, क्ष-किरणे ह्यांपासून असे प्रारण येत असते.

आण्विक-संयंत्रे, अण्वस्त्रनिर्मिती वा चाचण्या ह्यांदरम्यान घडून येणारे अपघात किंवा अण्वस्त्रांचा वापर ह्यांमधून किरणोत्सारी धुराळा निर्माण होत असतो. ह्याचे संसर्गाने लोकांना कर्काचा धोका वाढत असतो, विशेषतः रक्तकर्क तसेच अवटूग्रंथी, फुफ्फुसे आणि पोट ह्यांच्या कर्कांचा.

रेडॉन हा किरणोत्सारी वायू असतो, जो तुम्ही पाहू शकत नाही, त्याचा वासही घेऊ शकत नाही किंवा त्याची चवही घेऊ शकत नाही. तो जमिनीत आणि पत्थरांत निर्माण होत असतो. खाणींत काम करणार्‍या लोकांना रेडॉनसंसर्ग होऊ शकतो. अमेरिकेत, देशाच्या काही भागांत, रेडॉन घरांतही आढळून येत असतो. रेडॉनसंसर्ग झालेल्या लोकांना फुफ्फुसांच्या कर्काचा धोका, वाढलेला असतो.

वैद्यकीय कार्यवाही हाही प्रारणाचा प्रचूर स्त्रोत ठरत असतो.

· डॉक्टर्स शरीरांतर्गत चित्रे मिळविण्याकरता (निम्न-मात्रा क्ष-किरणे) प्रारणे वापरतात. अशी चित्रे भंगलेल्या अस्थी आणि इतर समस्यांचे निदान करण्यास मदत करतात.
· डॉक्टर्स कर्कोपचारार्थ (मोठ्या यंत्रांतून किंवा किरणोत्सारी पदार्थांतून प्राप्त होणार्‍या उच्च-मात्रा) प्रारणांचा उपयोग करत असतात.

निम्न-मात्रा-क्ष-किरणांपासूनचा कर्काचा धोका अतिशयच कमी असतो. प्रारणोपचारांपासूनचा धोका काहीसा अधिक असतो. दोन्हींपासून प्राप्त होणारे लाभ, किरकोळीत वाढणार्‍या धोक्याच्या तुलनेत जवळजवळ नेहमीच भारी ठरत असतात.

जर प्रारणांपासून तुम्हाला कर्काचा धोका जाणवत असेल तर, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे.

जर तुम्ही देशाच्या रेडॉन असलेल्या भागात राहत असाल तर, तुमच्या घरात त्या वायूच्या उच्च पातळ्यांचा शोध घ्यावा. घरगुती रेडॉन चाचणी वापरास सोपी असते आणि फारशी खर्चिकही नसते. बहुतेक स्थापत्यदुकानांतून चाचणीसंच विकले जातात. प्रत्येक आवश्यक ठरणार्‍या क्ष-किरण चाचणीबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी किंवा दंतवैद्यांशी बोला. शरीराच्या, संबंधित नसलेल्या इतर भागांच्या संरक्षणार्थ ढाल पुरविण्यास सांगा.

प्रारणोपचार घेतल्यानंतर पुन्हा दुसरा कर्क उद्‌भवण्याचा धोका कसा वाढत असतो ह्याबाबत कर्करुग्णांनी त्यांच्या डॉक्टरांशी बोलावे.

काही रसायने आणि इतर पदार्थ

काही विशिष्ट कामे करणार्‍या लोकांना (जसे की रंगारी, बांधकाम मजूर आणि रासायनिक उद्योगांतील कामगार) कर्क उद्‌भवाचा धोका वाढलेला असतो. अनेक अभ्यासांनी असे दाखवून दिलेले आहे की, ऍसबेस्टॉस, बेन्झिन, बेन्झिडाईन, कॅडमियम, निकेल किंवा व्हिनील क्लोराईड ह्यांवरील कामांत होणारा त्यांचा संसर्ग कर्कास कारणीभूत ठरू शकतो.

घरी असता आणि कामावर गेल्यावरही, हानीकारक पदार्थांचा संपर्क टाळण्यासाठी किंवा घटविण्याकरता, माहिती आणि सुरक्षितता सूचनांवर अंमल करा.

अनेक वर्षे संसर्ग सोसलेल्या कामगारांना सर्वाधिक धोका असत असतो, तरीही घरी गेल्यावर कीटकनाशके, वापरलेले इंजिनऑईल, रंग, द्रावके (सॉल्व्हंटस) आणि इतर रसायने हाताळतांना काळजी घेण्याने लाभच होईल.

काही विषाणू आणि जीवाणू

काही विशिष्ट विषाणू अथवा जीवाणूंमुळे होणारा संसर्ग, कर्क उद्‌भवाचा धोका वाढवत असतो.

१. मानवी-चामखीळ-विषाणू (एच.पी.व्ही. – ह्युमन पापिलोमा व्हायरस): गर्भाशयग्रीवेच्या कर्काचे प्रमुख कारण, हाच संसर्ग असतो. हा संसर्ग इतर प्रकारच्या कर्कांकरताही वाढता धोका ठरू शकतो.
२. हेपटायटिस-बी आणि हेपटायटिस-सी विषाणूः यकृतास ह्या विषाणूंचा संसर्ग अनेक वर्षे राहिल्यास कर्क उद्‌भवू शकतो.
३. मानवी टी-सेल रक्तकर्क किंवा लसिकाकर्क विषाणू (एच.टी.एल.व्ही.-१ ह्युमन-टी-सेल-ल्युकेमिया/लिम्फोमा-व्हायरस): ह्या विषाणूच्या संसर्गामुळे लसिकाकर्क आणि रक्तकर्क उद्‌भवण्याचा धोका वाढत असतो.
४. मानवी-प्रतिरक्षा-कमतरता-विषाणू (एच.आय.व्ही. ह्युमन-इम्युनोडेफिशिअन्सी-व्हायरस): ह्याच विषाणूंमुळे एडस होत असतो. हा संसर्ग असलेल्या व्यक्तीना, लसिकाकर्क आणि क्वचित आढळून येणारा कापोसी-अस्थीबंध-कर्क यांसारख्या कर्काच्या उद्‌भवाचा धोका अधिक असतो.
५. ईप्स्टीन-बार्र-विषाणू (ई.बी.व्ही.): ह्या संसर्गाचा संबंध लसिकाकर्काच्या वाढत्या धोक्याशी जोडला गेलेला आहे.
६. मानवी-नागीण-विषाणू (एच.एच.व्ही.-८ ह्युमन-हर्पिस-व्हायरस): हा विषाणू, कापोसी-अस्थीबंध-कर्काकरताचा धोकेगुणक ठरत असतो.
७. पोटात आढळून येणारे मळसूत्री-जीवाणू-१ (हेलिकोबॅक्टर पायलोरी): हे जीवाणू पोटात व्रण (अल्सर) निर्माण करू शकतात. हे पोटाचा कर्क आणि पोटाच्या अस्तरातील लसिकाकर्क ह्यांसही कारण ठरू शकतात.

असुरक्षित संभोग करू नका किंवा सुयांचा सहवापर करू नका. संसर्गबाधित व्यक्तीशी संभोग केल्यास एच.पी.व्ही. संसर्ग संक्रमित होऊ शकत असतो. असुरक्षित संभोगामुळे किंवा संसर्गबाधित व्यक्तींसोबत सुयांचा सहवापर केल्याने तुम्हाला हेपटायटिस-बी आणि हेपटायटिस-सी, किंवा एच.आय.व्ही. संसर्ग होऊ शकतो.

हेपटायटिस-बी संसर्ग रोखणारी लस तुम्ही घेऊ शकता. आरोग्य-निगा-कार्यकर्ते आणि दुसर्‍याच्या रक्ताशी संपर्कात येऊ शकणार्‍या इतर व्यक्तींनी ह्या लसीबाबत विचारले पाहिजे.

जर तुम्हाला एच.आय.व्ही. किंवा हेपटायटिस संसर्गाचा धोका जाणवत असेल तर तुमच्या डॉक्टरांना तपासणी करण्यास सांगा. असे संसर्ग लक्षणहीन असू शकतात, पण रक्त-तपासणीत विषाणूचे अस्तित्व स्पष्ट होऊ शकत असते. असल्यास डॉक्टर उपचार सुचवतीलच.

याशिवाय, डॉक्टर तुम्हाला इतर लोकांना संसर्ग होण्यापासून कसे वाचवावे हेही सांगतीलच.

जर तुम्हाला पोटाच्या समस्या असतील तर डॉक्टरांकडे जा. एच.पायलोरी संसर्ग शोधला जाऊन त्यावर उपचार करणे शक्य असते.

रजोनिवृत्तीच्या काळातील (अंगातून गरम झळा येणे, योनीशुष्कता आणि अस्थी-सच्छिद्रता यांसारख्या) समस्यांच्या नियंत्रणार्थ, डॉक्टर्स (केवळ ईस्ट्रोजन अथवा ईस्ट्रोजन आणि प्रोजेस्टीन यांसारखी) काही अंतर्प्रेरके संस्तुत करतात. मात्र अभ्यास असे दर्शवतात की रजोनिवृत्तीकाळातील-अंतर्प्रेरक-उपचारांचे गंभीर उपप्रभाव निर्माण होऊ शकतात. अंतर्प्रेरकांमुळे स्तनांच्या कर्काचा, हृदयधक्क्याचा, पक्षाघाताचा किंवा रक्तगुठळीचा धोका वाढत असतो.

रजोनिवृत्तीकाळातील-अंतर्प्रेरक-उपचारांचा विचार करत असलेल्या स्त्रीने, संभाव्य धोक्यांची आणि लाभांची चर्चा तिच्या डॉक्टरशी करायला हवी.

सुमारे १९४० ते १९७१ दरम्यान गर्भार स्त्रियांना दिला गेलेला कृत्रिम अंतर्स्त्राव, डाय-ईथिल-स्टिलबेस्ट्रॉल (डी.ई.एस.) हा, इस्ट्रोजनचाच एक प्रकार आहे. ज्या स्त्रियांनी गर्भार असता डी.ई.एस. घेतले होते, त्यांचेकरता स्तनांच्या कर्काचा धोका किंचित वाढलेला असू शकतो. त्यांच्या मुलीच्या बाबतीत, क्वचित आढळून येणार्‍या एका गर्भाशयग्रीवेच्या कर्काचा धोकाही वाढलेला असतो. त्यांचे मुलांवरील संभाव्य प्रभाव अभ्यासाधीन आहेत.

ज्या स्त्रियांना आपण डी.ई.एस.घेतले आहे असे माहीत आहे आणि जन्मापूर्वीच डी.ई.एस. चा संसर्ग झालेल्या मुलींनी डॉक्टरकडे तपासणीबाबत चौकशी करावी.

कर्काचा कौटुंबिक इतिहास

बहुतांशी कर्क हे जनुकांतील बदलांमुळे (परस्पर-स्वभाव-अंतरणांमुळे) विकसित होत असतात. जनुकीय बदलांच्या एका मालिकेनंतर, एक प्राकृत पेशी कर्कपेशीत परिवर्तित होऊ शकते. तंबाखूचा वापर, काही विषाणू किंवा व्यक्तीच्या जीवनशैलीतील वा पर्यावरणातील इतर घटक अशा प्रकारचे बदल, काही प्रकारच्या पेशींत घडवून आणू शकतात.

कर्काचे धोके वाढवणारे काही जनुकीय बदल अनुवांशिक असतात. असे बदल जन्मापासूनच शरीराच्या प्रत्येक पेशीत उपस्थित असतात.

कर्क अनुवांशिकतेने एखाद्या कुटुंबात वावरणे सामान्यतः प्रचूर नाही. मात्र, काही प्रकारचे कर्क कुटुंबात उर्वरित लोकसंख्येपेक्षा अधिक प्रमाणात आढळून येतात. उदाहरणार्थ, त्वचारंजन, स्तनांचा, बिजांडकोशाचा, पुरस्थग्रंथींचा आणि आतड्याचा कर्क काही वेळेस अनुवांशिक ठरत असतात. एकाच कर्कप्रकाराची एकाच कुटुंबातील अनेक प्रकरणे वारशाने येणार्‍या जनुकीय बदलांशी जोडली जाऊ शकतात, जे कर्कविकसनाचे धोके वाढवू शकत असतात. मात्र, पर्यावरणीय घटकही सहभागी असू शकतात. बहुधा, एकाच कुटुंबातील अनेक प्रकरणे केवळ एक योगायोगही असू शकतात.

जर तुम्हाला असे वाटत असेल की एखादा विशिष्ट प्रकारचा कर्क तुमच्या कुटुंबात असण्याचा इतिहास आहे, तर त्याविषयी डॉक्टरांशी बोला. ते तुम्हाला कर्काचा धोका घटवण्याचे उपाय सुचवतील. लवकर कर्क शोधून काढणार्‍या चाचण्याही ते सुचवू शकतील.

त्यांना तुम्ही अनुवांशिकतेबाबतच्या चाचण्यांसंबंधीही विचारू शकता. अशा चाचण्या, कर्कविकसनाचा धोका वाढविणार्‍या काही विशिष्ट अनुवांशिक जनुकीय बदलांचा तपास करू शकतात. जनुकीय बदल मात्र अनुवांशिक असल्यास, तुम्हाला नक्कीच कर्क होईल असा त्याचा अर्थ नसतो. तुम्हाला रोगविकसनाचा असलेला धोका वाढलेला असतो, इतकाच त्याचा अर्थ असतो.

मद्यार्क

वर्षानुवर्षे दिवसाला दोनहून अधिक मद्यार्क घेत राहण्याने; मुख, घसा, कंठनलिका, अन्ननलिका, यकृत आणि छाती ह्यांचा कर्क विकसित होण्याची शक्यता वाढत असते. मद्यार्काच्या परिमाणासोबतच धोकाही वाढत असतो. ह्यांपैकी बहुतेक कर्कांबाबत, मद्यपान करणारा जर तंबाखू सेवन करत असेल तर धोका वाढता असतो.

म्हणूनच डॉक्टर, लोकांना मद्यार्काचे प्रमाण कमी करण्यासच सुचवत असतात. कमी म्हणजे स्त्रियांकरता दिवसात एक पेय तर पुरूषांकरता दिवसात दोन पेये याहून जास्त नसावे.

अपुरा आहार, शारीरिक निष्क्रियता किंवा स्थूलता यांपैकी एक एक किंवा एकाहून अधिक योग जुळून आल्यास अनेक प्रकारच्या कर्कांचा धोका वाढता असणे शक्य असते. उदाहरणार्थ, अभ्यास असे सुचवितात की, मेदात उच्च असलेला आहार घेणार्‍या लोकांत आतड्याचा, गर्भाशयाचा आणि पुरस्थग्रंथींचा कर्क होण्याचा धोका वाढलेला असतो. छातीचा, आतड्याचा, अन्ननलिकेचा, मूत्रपिंडांचा आणि गर्भाशयाचा ह्या कर्कांकरता, निष्क्रियता आणि स्थूलता हे धोकेघटक ठरत असतात.

फळे व भाज्यांनी समृद्ध आहाराची निवड करा

आरोग्यपूर्ण आहार, शारीरिक सक्रियता आणि आरोग्यपूर्ण शारीरिक वजन राखणे ह्यांमुळे कर्काचा धोका घटण्यास मदत होत असते. डॉक्टर्स ह्याकरता खालील उपाय सुचवतात.

१. चांगलेचुंगले खाः आरोग्यपूर्ण आहारात चघळचोथा, जीवनसत्त्वे आणि क्षारांत भरपूर असलेल्या अन्नपदार्थांचा समावेश होत असतो. दररोज, एकदल धान्यांचे ब्रेड आणि कडधान्ये, ५ ते ९ वाटे (सर्विंग्ज) फळे आणि भाज्या ह्यांचा समावेश होत असतो. त्याशिवाय, आरोग्यपूर्ण आहार म्हणजे, मर्यादित उच्च-मेद (जसे की लोणी, मलईदार दूध, तळलेले अन्नपदार्थ आणि लाल मांस) अन्नपदार्थांचे सेवन करणे होय.
२. सक्रिय राहा आणि आरोग्यपूर्ण वजन सांभाळाः शारीरिक सक्रियता, वजन नियंत्रणात राखण्यास आणि शरीरातील मेद घटवण्यास उपयुक्त ठरू शकते. प्रत्येक प्रौढ व्यक्तीने, सप्ताहातील पाच दिवसांहून अधिक वेळा, किमान ३० मिनिटे माफक शारीरिक सक्रियता (जसे की जलद चालणे) राखणे चांगले असते, ह्याबाबत बव्हंशी शास्त्रज्ञ सहमत असतात.

कर्काकरताची गाळणी

काही प्रकारचे कर्क लक्षणे दाखवू लागण्यापूर्वीच शोधून काढले जाऊ शकतात. लक्षणे नसलेल्या लोकांत कर्काचा (किंवा कर्काप्रत नेणार्‍या परिस्थितीचा) शोध घेण्याकरताच्या तपासणीस ’गाळणी’ म्हणतात.

गाळणीमुळे डॉक्टरांना, काही प्रकारचे कर्करुग्ण शोधून काढण्यास आणि त्यांना लवकर उपचार देण्यास, मदत होत असते. सामान्यतः कर्क लवकर आढळून आल्यास कर्कोपचार अधिक प्रभावी ठरत असतात.

छाती, गर्भाशयग्रीवा, आतडी आणि गुद यांच्या कर्काकरता गाळणी चाचण्या सर्वदूर वापरल्या जात असतात.

१. छातीः डॉक्टरांकरता छातीचा कर्क लवकर शोधून काढण्यासाठी, छातीआलेख (मामोग्राम) हे एक सर्वोत्तम अवजार असते. ह्यात क्ष-किरणांद्वारे छातीचे चित्र तयार केले जात असते. एन.सी.आय. पद्धत असे संस्तुत करते की, चाळीशीतील आणि त्याहून वयस्कर स्त्रियांनी दर एक वा दोन वर्षांनी छातीआलेख काढून घ्यावेत. ज्या स्त्रियांना स्तनाच्या कर्काचा सरासरीहून अधिक प्रमाणात धोका असतो, त्यांनी वयाच्या चाळीशीपूर्वीच छातीआलेख काढावा काय आणि तत्पश्चात किती वारंवारतेने काढत राहावा ह्याबाबत, त्यांच्या आरोग्य-निगा-दात्यांशी चर्चा करावी.
२. गर्भाशयग्रीवाः पॅप चाचणी (हिलाच काही वेळेस पॅप स्मिअर चाचणी असेही म्हटले जात असते), गर्भाशयग्रीवेवरील पेशी तपासण्याकरता केली जात असते. डॉक्टर गर्भाशयग्रीवेवरील नमुना पेशी खरवडून काढून घेत असतात. एक प्रयोगशाळा मग, पेशींची किंवा कर्काप्रत नेणार्‍या बदलांची (ज्यात गर्भाशयग्रीवेच्या कर्काकरता सर्वाधिक महत्त्वाचा धोकेघटक असलेल्या मानवी-चामखीळ-विषाणूने घडवलेल्या बदलांचाही समावेश होत असतो), कर्काकरता तपासणी करते. स्त्रियांनी लैंगिक संभोगास सुरूवात केल्यानंतर तीन वर्षांनी किंवा वयाची २१ वर्षे पूर्ण केल्यानंतर, यांपैकी जे प्रथम घडेल तेव्हापासून पॅप चाचणी करून घेण्यास सुरूवात करावी. प्रत्येक स्त्रीने दर तीन वर्षांतून किमान एकदा तरी ही चाचणी करवून घ्यावी.
३. आतडी आणि गुदः आतडी आणि गुदातील, अनैसर्गिक वाढ, कर्क आणि इतर समस्या शोधून काढण्याकरता अनेक गाळणी चाचण्या वापरल्या जात असतात. ५० वर्षे आणि त्यावरील वय असलेल्या व्यक्तींची गाळणी होणे आवश्यक असते. ज्या व्यक्तींना आतडी वा गुदाच्या कर्कसंभवाचा सरासरीहून अधिक धोका असेल त्यांनी, वयाच्या ५० वर्षांपूर्वीच गाळणी चाचण्या करवून घ्यावयात की नाही आणि त्या किती वारंवारितेनी करत राहाव्यात ह्याबाबत, त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

शौच्यातील-अदृष्ट-रक्त-चाचणीः काही वेळेस, कर्क किंवा अनैसर्गिक वाढींत रक्तस्त्राव होतो. ह्या चाचणीत, शौच्यातील अतिशय सूक्ष्म प्रमाणातील रक्तस्त्रावही शोधू शकते.
प्रकाशित-नलिका-आंत्रदर्शक (सिग्मोईडोस्कोपी): डॉक्टर मोठ्या आतड्याच्या खालील भागात आणि गुदात, प्रकाशित-नलिकेद्वारे तपासणी करतात. डॉक्टर बहुधा ह्या नलिकेतूनच अनिसर्गिक वाढ काढून टाकू शकत असतात.
प्रकाशित-नलिका-आंत्रदर्शनः डॉक्टर, गुदावाटे शिरवलेल्या, बारीक, लांब, प्रकाशित-नलिका-दर्शका (कोलोनोस्कोप) चा उपयोग करून गुदाची व आतड्याच्या संपूर्ण आतील भागाची तपासणी करतात. अपसामान्य भाग लक्षात आल्यास, ऊतींचे नमुने काढून घेण्यात येतात आणि रोगाचे अस्तित्व निर्धारित करण्यासाठी, सूक्ष्मदर्शकाखाली तपासले जातात. डॉक्टर बहुधा ह्या नलिकेतूनच अनैसर्गिक वाढ काढून टाकू शकत असतात.
दुहेरी-गुणविधर्म-बेरियम-बस्तीः ह्या कार्यवाहीत आतडी व गुदाची अनेक क्ष-किरण चित्रांकने केली जातात. रुग्णास बेरियम द्रावणाची बस्ती दिली जाते आणि गुदात हवाही शिरवली जात असते. बेरियम व हवेमुळे आतडी व गुदाची चित्रे सुधारतात.
अंकीय गुदपरीक्षण (डी.आर.ई. डिजिटल-रेक्टल-एक्झामिनेशन): ही चाचणी नेहमीच्या शारीरिक तपासणीचा हा एक भाग असते. ह्या परीक्षणात आरोग्य-निगा-दाता एक वंगणस्निग्धित, हातमोज्याने वेष्ठित बोट गुदात शिरवून अपसामान्यतांचा वेध घेत असतो. ह्या चाचणीत गुदाच्या बुडाचाच भाग केवळ तपासता येत असतो.

शरीराच्या इतर भागांतील कर्काच्या तपासणीकरता असलेल्या इतर चाचण्यांबाबतही तुम्ही ऐकलेलेच असेल. वर्तमानात, ह्या इतर चाचण्यांनी केलेल्या गाळणी-चाचण्या प्राणरक्षक ठरू शकतील की नाही हे आपल्याला माहीत नाही. छाती, गर्भाशयग्रीवा, आतडी, फुफ्फुस, बिजांडकोश, पुरस्थग्रंथी, आणि त्वचा ह्यांच्या कर्कांकरताच्या गाळण्याबाबत माहिती मिळवण्यासाठी होणार्‍या संशोधनास एन.सी.आय. आधार देत आहे. पाहा “कर्क संशोधनापासूनच्या आशा” हा अनुभाग.

एखादी गाळणी चाचणी सुचविण्यापूर्वी डॉक्टर अनेक घटकांचा विचार करत असतात. चाचणीसंबंधित घटकांचे आणि ती चाचणी ज्या कर्काचा शोध घेऊ पाहत असते त्या कर्काचे, ते यथायोग्य तौलनिक मूल्यमापन करत असतात. व्यक्तीस, काही विशिष्ट कर्कांच्या विकसनाबाबत असलेल्या धोक्यांवरही ते विशेष लक्ष ठेवून असतात.

उदाहरणार्थ, डॉक्टर व्यक्तीचे वय, वैद्यकीय इतिहास, सामान्य आरोग्य, कौटुंबिक इतिहास आणि जीवनशैली इत्यादी गोष्टीही विचारात घेत असतात. याशिवाय, प्रत्यक्ष गाळणी-चाचणीपासून संभवणारे धोकेही ते लक्षात घेत असतात. शिवाय, चाचणी निष्कर्ष अपसामान्य निघाल्यास, त्यांचा अर्थ कर्क अस्तित्वात आहे असाच होतो हे निश्चित करण्यासाठी त्या व्यक्तीस नंतर आवश्यक ठरू शकणार्‍या, पाठपुरावा चाचण्या वा शल्यकर्म यांपासूनच्या धोक्यांचाही ते विचार करत असतात. त्याव्यतिरिक्त जर चाचण्यांत कर्क आढळून आला तर, डॉक्टर कर्कोपचारांचे धोके व लाभ यांचाही विचार करतात. उपचार कितपत उपायकारक ठरत आहेत आणि त्यांचे काय उपप्रभाव होऊ शकतात ह्याचाही ते विचार करतात.

कर्काकरता तपासणी होण्यापासूनचे लाभ व हानी ह्यांबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करू शकता. अनेक वैद्यकीय निर्णयांप्रमाणेच, गाळणी-चाचणी करण्याचा निर्णयही व्यक्तीगत असतो. प्रत्येक व्यक्तीस पक्षकर आणि विपक्षकर मुद्दे लक्षात घेऊन स्वतःच निर्णय घ्यावा लागत असतो.

गाळणी-चाचणीविषयी एन.सी.आय.पाशी अनेक वस्तुस्थिती-दर्शक कागद आहेत.

तुम्ही डॉक्टरांना गाळणी-चाचणीविषयी खालील प्रश्न विचारू शकता.

१. तुम्ही माझ्याकरता कुठल्या चाचण्या संस्तुत करत आहात? आणि का?
२. ह्या चाचण्यांना किती खर्च येतो? तो माझ्या आरोग्य-विम्यातून देता येऊ शकेल काय?
३. त्या चाचण्या दुःखकारक आहेत का? त्यांचेपासून काही धोके आहेत का?
४. चाचण्यांनंतर किती वेळात मला त्यांचे निष्कर्ष समजू शकतील?
५. जर चाचण्यांत समस्या आढळून आली तर, कर्क आहे हे तुम्हाला कसे निश्चित करता येईल?

कर्काची लक्षणे

कर्काची अनेक निरनिराळी लक्षणे असतात.

१. छातीत वा शरीरातील इतर भागांत जाड-मांसल-लपके तयार होणे
२. नवीन तीळ येणे किंवा अस्तित्वात असलेल्या तिळात परिवर्तन होणे
३. बरा न होणारा फोड
४. दीर्घकाळ घसा बसणे वा खोकला असणे
५. कोष्ठ अथवा मूत्राशयाबाबतच्या सवयींतील बदल
६. खाण्यानंतर वाटणारी अस्वस्थता
७. गिळण्यास होणारा त्रास
८. अज्ञात कारणांनी होणारी शारीरिक वजनातील वाढ वा घट
९. अपसामान्य रक्तस्त्राव वा विसर्ग
१०. खूप अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे

अनेकदा ही लक्षणे कर्कामुळे नसतात. ती सौम्य अर्बुदांमुळे किंवा इतर समस्यांमुळेही उद्‌भवू शकतात. केवळ एक डॉक्टरच नक्की काय ते सांगू शकेल. अशी लक्षणे असलेल्या किंवा इतर आरोग्य-बदल अनुभवणार्‍या व्यक्तीने निदानाकरता आणि लवकरात लवकर समस्येवर उपचार मिळवण्यासाठी डॉक्टरांना भेटावे.

बहुधा, सुरूवातीचा कर्क दुःखकारक नसतो. तुम्हाला लक्षणे दिसत असतील, दुःख होण्याची वाट पाहू नका. डॉक्टरांना भेटा.

कर्काचे निदान

जर तुम्हाला लक्षणे जाणवत असतील किंवा तुमची गाळणी चाचणी कर्क सुचवत असेल तर, डॉक्टरांनी हे शोधून काढायला हवे की, असे कर्कामुळेच घडत आहे की इतर कुठल्याशा कारणाने. डॉक्टर अशावेळी तुम्हाला तुमच्या कौटुंबिक-वैद्यकीय-इतिहासाबाबतही विचारू शकतील आणि शारीरिक तपासण्याही करू शकतील.

डॉक्टर प्रयोगशालेय चाचण्या, क्ष-किरण-चित्रांकन किंवा इतर चाचण्या वा कार्यवाही करण्यासही सांगू शकतील.

प्रयोगशालेय चाचण्या

रक्त, लघवी किंवा इतर द्रवांच्या चाचण्या डॉक्टरांना निदान करण्यास मदत करत असतात. ह्या चाचण्या हे दाखवून देऊ शकत असतात की, एखादा अवयव (जसे की मूत्रपिंड) त्याचे काम कशा प्रकारे करत आहे. शिवाय, काही पदार्थांच्या उच्च मात्रांचा आढळ कर्काचे चिन्ह ठरू शकतात. अशा पदार्थांना अनेकदा चिन्हांकक म्हटले जात असते. मात्र, अपसामान्य प्रयोगशालेय निष्कर्ष मिळणे म्हणजे कर्क असल्याचे पक्के चिन्ह ठरत नसते. कर्कनिदानार्थ, डॉक्टर्स केवळ प्रयोगशालेय निष्कर्षांवर अवलंबून राहू शकत नाहीत. अनेक प्रयोगशालेय चाचण्यांबाबतचे वस्तुस्थितीदर्शक कागद एन.सी.आय. देत असते.

प्रतिमांकन पद्धती

प्रतिमांकन पद्धती शरीरांतर्गत भागांची चित्रे तयार करून, डॉक्टरला अर्बुदाचे अस्तित्व निश्चित करण्यास मदत करतात.

अशी चित्रे अनेक पद्धतींनी काढली जात असतात.

१. क्ष-किरण-चित्रांकनः शरीरांतर्गत अवयव आणि अस्थींची चित्रे तयार करण्यासाठी, क्ष-किरण-चित्रांकनांची पद्धत सर्वात प्रचूर आहे.
२. संगणित-त्रिमिती-चित्रांकनः संगणकास संलग्न केलेले एक क्ष-किरण यंत्र, तुमच्या अवयवाच्या तपशीलवार चित्रांची मालिकाच तयार करते. चित्रे अधिक सुस्पष्ट यावीत म्हणून तुम्हाला चित्रांकनापूर्वी गुणविधर्मी पदार्थही (जसे की रंगद्रव्य) दिले जातील.
३. प्रारक-अणुगर्भ-चित्रांकनः लहान प्रमाणात किरणोत्सारी पदार्थ तुमच्या शरीरात टोचला जातो. तो तुमच्या रक्तवाहिन्यांतून प्रवाहित होतो आणि काही विशिष्ट अस्थी वा अवयवांत साचत जातो. चित्रांकक म्हटले जाणारे यंत्र मग, त्यापासूनच्या किरणोत्साराचा शोध घेऊन त्याचे मापन करते. चित्रांकक संगणकाच्या पडद्यावर किंवा फितीवर अस्थी वा अवयवाची चित्रे तयार करतो. तुमचे शरीर मग किरणोत्सारी पदार्थाचा झपाट्याने निचरा करून टाकते.
४. ध्वन्यातीत-लहरी-चित्रांकनः ध्वन्यातीत साधन, ध्वन्यातीत लहरी प्रक्षेपित करत असते. लोक त्या ऐकू शकत नाहीत. लहरी तुमच्या शरीरांतर्गत ऊतींवरून प्रतिध्वनीप्रमाणे परावर्तित होत असतात. संगणक अशा प्रतिध्वनींचा उपयोग करून ध्वन्यालेख (सोनोग्राम) नावाचा आलेख तयार करतो.
५. चुंबकीय-अनुनादी-चित्रांकनः ह्यात संगणकास संलग्न केलेला एक सशक्त चुंबक, शरीरांतर्गत भागाची तपशीलवार चित्रे तयार करण्यासाठी वापरला जात असतो. तुमचे डॉक्टर अशी चित्रे पडद्यावर पाहू शकतात किंवा फितीवर मुद्रितही करून घेऊ शकतात.
६. धनविजक-उत्सर्जन-त्रिमिती-चित्रांकनः लहान प्रमाणात किरणोत्सारी पदार्थ तुमच्या शरीरात टोचला जातो. तो तुमच्या रक्तवाहिन्यांतून प्रवाहित होतो आणि काही विशिष्ट अस्थी वा अवयवांत साचत जातो. एक यंत्र मग तुमच्या शरीरातील रासायनिक सक्रियतेची चित्रे तयार करते. कर्कपेशी काही वेळेस उच्च-सक्रियता-क्षेत्र म्हणून प्रकट होत असतात.

नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिया

बव्हंशी प्रकरणांत कर्कनिदान करण्यासाठी डॉक्टरांना नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिया करणे आवश्यक असते. शल्यक्रियेदरम्यान डॉक्टर नमुना-ऊती काढून घेऊन ती प्रयोगशाळेत पाठवतात. रोगनिदानतज्ञ अशा ऊती सूक्ष्मदर्शकाखाली तपासतो.

नमुना अनेक प्रकारे काढून घेण्यात येत असतो.

सुईनेः ऊती किंवा द्रव काढून घेण्याकरता डॉक्टर सुईचा उपयोग करतात.
प्रकाशित-नलिका-दर्शकः शरीरांतर्गत भागांचे दर्शन करण्यासाठी डॉक्टर एका प्रकाशित नलिकेचा उपयोग करत असतात.
शल्यक्रियेनेः शल्यक्रिया पूर्णछेदक किंवा अंशछेदक असू शकते.

१. पूर्णछेदक नमुना-निष्कर्षण-शल्यक्रियेत, शल्यविशारद संपूर्ण अर्बुद काढून टाकत असतो. अनेकदा अर्बुदाभोवतालच्या काही प्राकृत ऊतीही काढून टाकल्या जात असतात.
२. अंशछेदक नमुना-निष्कर्षण-शल्यक्रियेत शल्यविशारद अर्बुद अंशतः काढून टाकत असतो.

नमुना-निष्कर्षण-शल्यक्रियेपूर्वी डॉक्टरांना तुम्ही खालील गोष्टी विचारू शकता.

१. माझी शल्यक्रिया कुठे होईल?
२. शल्यक्रियेस किती वेळ लागेल? त्यावेळी मी जागृत असेन का? त्यामुळे मला दुःख होईल का?
३. ह्यात काही धोके आहेत का? संसर्गाची किंवा कार्यवाहीअखेर रक्तस्त्राव होण्याची शक्यता किती असते?
४. किती लवकर मला परिणाम समजू शकतील?
५. जर मला कर्क असेल तर मला पुढे काय करावे लागेल? ह्याबाबत कोण सांगेल? कधी सांगेल?

कर्काचे अवस्थांकन

कर्काकरता सर्वोत्तम उपचारांची योजना करायची तर, डॉक्टरला तुमच्या रोगाची अवस्था माहीत असायला हवी. बहुतेक (जसे की छाती, फुफ्फुस, पुरस्थग्रंथी किंवा आतडी यांच्या) कर्कांकरता, अर्बुदाच्या आकारावर आणि लसिकाजोड किंवा शरीराच्या इतर भागांत कर्क पसरलेला आहे की नाही ह्यावर अवलंबून कर्काची अवस्था ठरत असते. डॉक्टर रोगाचा विस्तार जाणून घेण्याकरता क्ष-किरण-चाचणी, प्रयोगशालेय आणि इतर चाचण्या किंवा कार्यवाही करण्यास सुचवू शकतात.
.
http://anuvad-ranjan.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी १
http://www.maayboli.com/node/43780

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी २
http://www.maayboli.com/node/43781

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी ३
http://www.maayboli.com/node/43782

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी ४
http://www.maayboli.com/node/43783

Group content visibility: 
Public - accessible to all site users