कोळाचे पोहे

Submitted by स्वाती_आंबोळे on 20 September, 2012 - 10:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. जाडे पोहे
२. नारळाचं दूध
३. चिंचेचा कोळ किंवा आगळ
४. गू़ळ
५. लाल तिखट
६. मीठ
७. फोडणीसाठी तूप आणि जिरं
८. कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

१. जाडे पोहे धुवून निथळून ठेवायचे.
२. नारळाच्या दुधात चवीनुसार चिंच किंवा आगळ, गूळ, लाल तिखट आणि मीठ घालून त्याला तूप/जिर्‍याची फोडणी द्यायची. आवश्यकता वाटल्यास एक चटका देऊन (थोडं गरम करून) गूळ विरघळवून घ्यायचा. उकळी आणायची आवश्यकता नाही. कोळ गारच चांगला लागतो.
३. उपलब्ध असल्यास मिरगुंडं किंवा पोह्याचे पापड तळायचे.
३. बोलमधे पोहे घालून त्यावर ते बुडतील इतका कोळ घालायचा, वरून भरपूर कोथिंबीर घालायची. मिरगुंडं/पापड हवं तर कुस्करून त्यावर घालायचे किंवा जोडीला घ्यायचे.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

१. नारळाचं दूध मी कॅनमधलं वापरते म्हणून एकूण वेळ १५ मिनिटं म्हटला आहे. नारळ खवून दूध काढणार असाल तर अर्थातच जास्त वेळ लागेल.
२. इथे अमेरिकेत मी AROY-D ब्रॅन्डचा कॅन आणते. त्यात प्रिझर्व्हेटिव्ह्ज नसतात (असा त्यांचा दावाही आहे आणि तशी चवही असते). भारतात आता माझ्या माहितीनुसार नेस्लेची पावडर मिळते नारळाच्या दुधाची. कोमट पाण्यात मिसळली की झालं.

एकूण झटपट होणारा सोपा आणि चविष्ट प्रकार आहे.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा .. कोकण स्पेशल ..

खूप वर्षांपूर्वी खाल्ला होता हा प्रकार .. एकदा करून बघायला हवा .. तूप, जिरं, नारळाचं दूध मग त्याला हिरवी मिरची नको का?

सायो, एकदम कालवून ठेवायचे नसल्यामुळे कोणाला कसे आवडतात त्यावर अवलंबून आहे.
मी त्याच पोह्यांवर पुन्हा पुन्हा कोळ घेऊनसुद्धा खाते (मिसळीच्या कटासारखं.)

पारंपारिक काय असतं सांग ना स्वाती..
गूळ कोळाचं १ टीन दुधाला प्रमाण ही सांग.. कधीच खाल्ले नाहियेत, त्यामुळे काय अपेक्षा करायची माहित नाहिये..

नानबा, अवघड प्रश्न! Happy
पोहे बुडतील इतका कोळ घालतात सर्व्ह करताना - तेव्हा दहीपोह्यांपेक्षा नक्कीच पातळ.

प्रमाण - मी अंदाजेच घेते. आता करेन तेव्हा मोजून सांगेन. Happy
कोळात पोह्यांची भर पडणार आहे हे लक्षात घेऊन सगळ्याच चवी थोड्या स्ट्रॉन्ग ठेवायच्या हा थम्ब रूल. Happy

अहाहा! माझा आवडता पदार्थ Happy
आई जाड पोहे थोडेसे भाजून घेऊन मग पोहे भिजतील एव्हढेच पाणी घालून निथळत ठेवते. मस्त खमंग चव येते. आम्ही सहसा हिरवी मिरची घालूनच करतो.

@ नानबा - कोळ हा आंबट, गोडसर आणि तिखट अशा चवीचा असतो. ती चव जमेल इतपत कोकमाचा आगळ/ चिंचेचा कोळ , गूळ आणि लाल तिखट/ हिरवी मिरची घालायची. कोणतीही एक चव डोमिनेटिंग होता कामा नये. नारळाचं ताझं दूध / टिनमधलं दूध हे जेव्हढं पातळ असतं तीच कंसिस्टंसी ठेवायची. जास्त दाटपणा येण्यासाठी काही घातलं जात नाही. चिंचेचा कोळ / कोकम आगळ ह्यामुळे जितका पातळपणा येईल तेव्हढाच ठेवायचा. Happy

स्वाती, ह्यात भरताच्या वांग्याचा गर पण घालतात का? दिवेआगरला आवळसकरांकडे स्पेशल म्हणून कोळाचे पोहे बनवून मिळतील का असे विचारले होते तेव्हा ते म्हणाले होते की त्यात वांगे वगैरे घालावे लागते...जरा कुटाणा असतो..त्यापेक्षा आम्हाला साधे पोहे पटकन देता येतात.

अहाहा. अस्सल कोकणी पदार्थ. लहानपणची आठवण आली. ३-३ बोल भरून खायचे आणि शेवटी वाटीभर नुसताच कोळ प्यायचा!

पोहे आधी किंचित वाफवून घेतले तर छानच.

करून बघितले पाहिजेत.

स्वाती२ ने मोदकासाठी चव करताना नारळाच्या दूधाचा कॅन कशाला वापरला? काही ट्रिक वगैरे आहे का चव करायची?

मी केले, मला आवडले... पोह्याचे पापड, मिरगुंड घरात नाहियेत ह्याचं अफाट दु:ख झालं!

रेसिपी आणि टीप्स करता थँक्स स्वाती आणि संपदा!

खूपचं छान! फोटो हवे होते जोडीला अजून मज्जा आल्ली असती!

आगळ म्हणजेचं का? की कोकमाचा रस असेल तर आगळ चिंचेचा असेल तर कोळ?

माझा एक रुमी म्हैसुरचा होता. त्याची आई इथे सिंगापूरला आली होती. त्यांनी एकदा चिंचेचा कोळ घालून पोहे दिले होते खायला. बहुतेक ती हीच पाककृती असेल.

झकास कृती, ऐकलेय नुसती, खाल्ले नाहीत. करायला हरकत नाही सोपी असल्यान ना.दु. ऐवजी नारळ खवलेला घातला तर ? अन थोडे भाजके शेंगदाणे.. चांगलच लागेल ना.. आयत्या वेळेला शें. घालावे लागतील.. करून पहातेच रविवारी. Happy

अनघा, नारळाच्या दूधाऐवजी नारळाचा चव वापरला तर ते कोलाचे पोहे न होता वेरिएशन ऑफ दडपे पोहे होईल.

हो साती, अस मलाही वाटल, पण श्रम किती वाचतील - नो मिक्सर, नो भांडे धुणे.इ.इ. अन हे जरा गुळगुळीत लागतील अस वाटल Happy

ही रेसिपी छान आहे.. पण मी पाण्यात भिजवून घेत नाही पोहे.. पोह्यात आधीच पाणी मुरल्यामुळे कोळ कमी मुरतो नि त्यामुळे कधी कधी कोळाची चव कमी नि पाणारलेले पचपचीत लागतात पोहे.. तसेच मी कर्ते त्या कृतीने आंबट-गोड होतात कोळपोहे नि त्याबरोबर तिखट तोंडीलावणं.. म्ह्ण्जे आवडत अस्तील तर तसेच आंबट-गोड खायचे कोळपोहे नाहीतर तिखट पापड नि चटणी आहेच.. Happy

http://www.maayboli.com/node/20831 इथे बघ निंबे..

कोळाचे पोहे! आई गं! आत्ता समोर नाहीयेत तर कळ उठली काळजात!
माझ्यासाठी हे भयानक कम्फर्ट फूड आहे!

बाई, पार्ल्यातल्या चर्चेनंतर लगेच मी केले होते घरी! आता परत केले की फोटो टाकेन. Happy

आजच केले मी पण ही रेसिपी वाचून. प्रचंड टेस्टी लागले. कोकणातली असूनही ही रेसिपी माहीत नव्हती. मी लाल तिखटाऐवजी हि.मिरची घातली. पोह्यांचे पापड/मिरगुंडावर कॉम्प्रो केलं.

अत्यंत सोप्पी व चविष्ट रेसिपी शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद स्वाती.

Pages